शुक्रवार, ५ जून, २०२०

ती मी नव्हेच


ती, संवेदनशील कलाकार वगैरे
मी? प्रॅक्टिकल रुक्ष स्वार्थी वगैरे
ती, गाते नाचते भाव प्रकटते
मी? अभावानेही व्यक्त न होते
ती, नि:शब्दालाही वश करते
मी? शब्दांमधेही चाचपडते
ती, मोत्याचे दाणे पेरते
मी? उगवेल ते आपलं म्हणते
ती, देहात अडकूनही मुक्त
मी? मुक्त असूनही बांधलेली
ती, अस्वस्थ झाली कि साद घालते
मी? तिच्या अस्वस्थतेला वाट देते
ती, मग येते माझ्या स्वप्नात कधीकधी
मी? मग उतरवते तिची स्वप्न कधीकधी
ती, व्यक्त होऊन माझ्यापाशी, परत रिती होते
मी? तिच्या व्यक्त होण्याला माझी कविता म्हणून मोकळी होते
ती,  त्यावरही कधी आक्षेप घेत नाही
मी? स्वार्थी असले तरी इतकीही धाडसी नाही
म्हणूनच आज हे मान्य करायला हवेच
माझ्यातच रहात असली तरी
ती मी नव्हेच

शनिवार, ९ मे, २०२०

In the gloomy days



If the days are gloomy
If u are doomy
if nothing seems right
& you lost a ray of light
Just hang in my dear
You may shade a tear
Don't pretend to be happy
some days are just sappy
Its ok to feel sad
Its ok to be mad
Don' put pressure
to be optimistic
pretence is harmful
than being pecimistic
this too shall pass
This is just a phase
If days can be gloomy
there can be happy days

Trust issues animal phobia lalya and I


मला प्रचंड ॲनिमल फोबिया आहे

तसे इतरही बरेच फोबिया आहेत जसं Dance-o-phobia, Dentophobia वगैरे वगैरे. Dentophobia तर इतका कि मी अगदीच असह्य झाल्याशिवाय dentist गाठत नाही. Stich in time saves nine वगैरे मला पाठ आहे आणि वेळेवर आठवतही फक्त ते या अशा फोबिया केसेस मधे वळत नाही. एकदा तर रुट कॅनलने दाढ वाचेल अस निदान होऊनही केवळ त्या डेंटिस्टच्या चेअरवर किमान तीन वेळा बसाव लागेल म्हणून मी एका सिटिंगमधे होणारा पर्याय निवडून "काढून टाका ती दाढ" अस म्हणत आमच्या जुन्या फॅमिली डेंटिस्टना हैराण केलं होतं.

तर असो ते डेंटोपुराण. ॲनिमल फोबिया हा त्याहून वरच्या लेव्हलचा आहे. लांबून मला प्राणि दया, ओह छो छ्विट वगैरे म्हणायला जमतं. मी ॲनिमल हेटर नाहीये पण त्यांची भिती इतकी आहे कि मी आणि ते एका खोलीत एका घरात एका सर्कलमधे आलो तर मी गायब व्हायच पोशन आहे का शोधते. बुद्धीबळ खेळाव तस मी इकडून गेले तर चेक मेट टळेल कि तिकडून या विचाराने रेस्टलेस होते.

लेक तर प्रचंड प्राणीप्रेमी. तिला कुत्रा मांजर घरात आणायचय कधीचं. खरतर तिला आवडणारा प्राणी आहे 'फॉक्स', पण आईच्या फोबियाची कल्पना असल्याने ती तो पाळूया का अस उघड उघड विचारत नाही इतकच.

तस अजूनही मी तिला कुत्रा मांजर पाळायला ग्रीन सिग्नल दिला नसला तरी कधीच मनात होतं कि हे अस इतकं घाबरणही काही बर नव्हे. 

आज सकाळी चालायला गेले तेव्हा आमच्या कॉलनीतला लाल्या कुत्रा स्वागताला गेटवरच होता बागेच्या. एरव्ही लाल्या तसा शांती प्रिय आहे म्हणे पण आमच्या शेजाऱ्याने त्याच्या लाडक्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवला होता तेव्हा शेजारी त्या व्यक्तीवर अटॅक करतोय अस वाटून म्हणे लाल्या शेजाऱ्याला चावला होता. त्याच्या गैरसमजाची शिक्षा शेजाऱ्याला आणि भितीत वाढ मात्र माझ्या असा लोचा असताना लाल्या एकदम समोर कि आला आज. मी श्वास रोखून इकडून चेकमेट टळेल कि तिकडून या विचारात आणि लाल्या मात्र माझ्या गार पडलेल्या हाताला नाक लावत उभा तिथे.

मनाचा हिय्या करुन मी त्याच्या डोक्यावरुन हात फिरवला (ज्याला हा फोबिया आहे तोच जाणेल हे हिय्या करण म्हणजे खतरों के खिलाडीची अंतीम फेरी गाठण्यासारख आहे)

थोडावेळ लाल्याने असे लाड करुन घेतले. हाताचा वास घेऊन झाला आणि मग लाल्याशेट माझ्या पायाला टेकून उभे राहिले. मी जागा बदलली कि परत येऊन पाठ टेकून तोंडाने ऊम्म म्हणत माझा हात डोक्यावर फिरायची वाट बघत लाल्या तिथेच उभा. अस थोपटून घेणं आवडल्याच आणि त्याने माझ्यावर विश्वास टाकल्याच त्याच्या बॉडी लॅंग्वेजमधून कळत होतं. 

विश्वास टाकण्यावरुन आठवलं, I have developed trust issues over couple of years. म्हणजे पूर्वी मी "चोरी सिद्ध होई पर्यंत समोरच्याला क्लिनचिट द्यायचे किंवा बेनेफिट ऑफ डाऊट वगैरे" आता "चोर नाही सिद्ध झाल्यावर व्यक्ती ट्रस्टेड लिस्टमधे शिफ्ट होते"  आणि हे अंध विश्वास ते डोळस विश्वास असं हेल्दी ट्रान्झिशन नाहीये हे नक्की. लोकं याला अनुभवाने आलेलं शहाणपण म्हणोत पण एका पॉईंटला मला असा स्वभाव होत जाण्याची भिती वाटते. I was optimistic and I wanted to be optimistic by heart mind and brain. बऱ्याच जणांना वाटतं मला खूप मित्र मैत्रिणी आहेत. माझं फ्रेंड सर्कल खूप मोठ आहे. I can easily mingle with all पण हे तितकही खरं नाहीये. म्हणजे मी माझ्यात बरीच कुंपणं घालून घेतली आहेत. बरेच ओळखदेख असलेले हे अगदी बाह्य वर्तुळात असतात. या कुंपणाच्या अलीकडे असलेले तसे कमी आहेत आणि त्याही आत अगदी close to heart असलेल्यांची संख्या अजूनच कमी आहे. काही गेट्स तर अशी आहेत ज्याला कुलूप लावून  किल्ली मी स्वत:च लांब फेकून दिलेय समुद्रात.

इतके ट्रस्ट इश्यू मला असताना लाल्या मात्र नुसत्या दोन मिनिटाच्या थोपटण्याने माझ्यावर विश्वास टाकून मोकळा झाला पण. माझ्याकडून धोका जाणवला तर लाल्या मला कधीही इंजेक्शन घ्यायची वेळ आणू शकतो पण मी धोकाच देईन अस मानून तो विश्वास टाकायच थांबवत तरी नाहीये.

ॲनिमल फोबियावर काम करायल सुरुवात करताना लाल्याने मला जाणवून दिलं कि u can trust anyone because u have the power to bite and fight if required. ;) 

कविता

थोडी थोडी जमलेली
थोडी थोडी फसलेली
एक कविता उगाच
रंग शाईचे ल्यालेली

आच लागली लागली
कढ आली, उतू गेली
उतू जाता जाता तिची
एक कविताच झाली

झाली कोरडी कोरडी
उन्हामधे करपली
वाफ होऊन कविता
हवेमधे मिसळली

पुन्हा पाऊस होऊन
मातीमध्ये ती रुजली
एक कविता वेडीशी
मला नव्याने भेटली

थोडी थोडी आकळली 
थोडी कोडंच भासली 
एक कविता मनाचा
तळ गाठून बसली  

अनुबंध



तुझे माझे अनुबंध
बकुळीचा जणू हार
सुकलेल्या क्षणांना ही
येतो सुगंध अपार

कढ कोंडते जे आत
बने त्याचेही अत्तर
गंधाळतो देह सारा
मनी तुझाच जागर

मन कोरडे कराया
केली रिती मी घागर
आठवांचा कढ येता
पुन्हा पाझरे पाझर

पुन्हा रुजते नव्याने
पुन्हा येतसे बहर
पुन्हा सुकती नव्याने
पुन्हा उमले अत्तर

काय म्हणू या नात्याला?
तू प्रश्न, तूच उत्तर
जीवाशीवाचे हे बंध
इथे नुरते अंतर



तिची कथा

'धबधब्याखाली दहा वाजता. Belated celebration..' इतका तूटक निरोप कोणी देत का? पण या मन्याच सगळं असच असत. मोजकच बोलणार आणि नेमकच बोलणार. बर जमत याला अस नाहीतर मी, अघळपघळ. एका वाक्यातल्या उत्तराकरताही अख्ख पानभर खरडणार. बरं निरोप धाडलान तसं उत्तरही ऐकून जायच ना माझं? ते नाही. पलट निरोपाची काही सोयच नाही. स्वत: जाऊन उभा राहील तिथे डॉट दहाला. प्रॉब्लेम माझाच आहे. त्यात इतर कोणता दिवस असता तर ठिक होतं. आज जमवायच जरा कठीणच आहे. घरात पाहुणे जमलेत. बाबा तिकडे बाहेर हॉलमधे
 व्यवस्था बघतायत. आईला आज किचन पुरुन उरणार आहे. पिंट्याची एकट्याची धावपळ सकाळपासून, आई म्हणे अरे जरा दूधवाल्याला फोन कर आणि दोन दिवस जास्तीच दूध टाकायला सांग. बाबा म्हणे, पिंट्या गुरुजींना फोन कर. सामानाची यादी चेक कर.  मी आपली घरात एका कोपऱ्यात बसून आहे. मला तिथून उठून जायची परमिशन नाहीये किमान पुजा होई पर्यंत तरी. सोवळ ओवळ एरव्हीही असतच आजीच पण आता जरा जास्तच काक नजर तिची सगळ्यांवर. आई दिव्यात तेल घालायला आली तेव्हा तिचा उजवा डोळा लवतोय का बघायची उगीचच इच्छा झाली. तितक्यात सुमाक्काने आईला हाक मारली. "मावशी या दोन दिवसाच्या भाज्या निवडून ठेवल्यात. निघू मी?" म्हणत आईच्या चहा तरी घेऊन जा या वाक्यावर मानेनेच नको म्हणत आजीने टोकायच्या आत निघूनही गेली. आजीच्या तावडीत सापडती तर वाटच होती तिची हे गो काय नखरे केस बांधून ना कराव काम अस वर ऐकाव लागल असत तिला. पण आज ती होती म्हणून आईला मदत तरी होत होती. माझा इथे बसून काहीही उपयोग होण्यासारखा नव्हता तसाही.  पण इथून निघायचीही परमिशन नव्हती. हे सगळ मन्याला सांगायच होतं पण
आहे कुठे तो इथे?तो जाऊन बसला असेल तिथे धबधब्याखाली.

समोर असता तरी म्हणाला असता "ना माझा विश्वास आहे या सगळ्यावर ना माझ्या घरच्यांचा"
विश्वास तर माझाही नव्हता रे पण तरी का कोण जाणे पाय निघत नाहीये इथून. पहिल्यांदाच ऐकाव वाटतय घरच्यांच. कोपऱ्यात बसून का होईना पण हे सगळं  बघाव वाटतय.
पण हे सगळं बोलायला भेटायला तर हवा तो. तो तर आत्तापर्यंत पोहोचला असेल तिथे धबधब्याखाली.
नेहमीची सवय आहे हि त्याची. त्यादिवशीही असच केल त्याने. एक sms तेव्हढा केला हा असाच आजच्यासारखा 'धबधब्याखाली १० वाजता see u - love'

त्याला आमची प्रपोज ॲनिव्हर्सरी त्याच स्पॉटला साजरी करायची होती जिथे त्याने प्रपोज केलं होतं.

पावसाने जोर धरला होता आई म्हणाली होती नको बाहेर पडूस आज. जीव घाबरा होतो अशा पावसाने त्यात उजवा डोळा फडफडतोय सकाळपासून.
आई ग कसल्या अंध्रश्रद्धा बाळगून आहेस म्हणत हसून आलेच जाऊन म्हणत निघाले ॲक्टिव्हा घेऊन.

दोन गल्ल्यापुढे मन्याला पिक अप केलं. पाऊस वेड्यासारखा कोसळत होता. मन्या माझ्या कानात काहीतरी बोलत होता. काहीतरी इंटिमेट असं. पावसाच्या आवाजात शब्द नीट कळत नव्हते. धबधबा आता अगदी जवळ आला होता. समोरच्या उजव्या वळणावरुन एक अर्धा किलोमीटर आत गेलं कि आलाच धबधब्याकडे जाणारा रस्ता. उजव्या वळणावर गाडी व्यवस्थित इंडीकेटर देऊन वळवली मात्र समोरुन एक ट्रक इतक्या झपकन आला कि धस्स झालं एकदम. तिथेच थांबाव लागलं. गाडी स्किड झाली. ट्रकवाला आमच्या समोरुनच पळून गेला. बऱ्याच वेळाने त्या रस्त्याला गाडी आल्यावर मदत मिळाली. आमचं सेलेब्रेशन अर्धवटच राहिलं. तेच साजर करायला तो  भेटायचा निरोप. मन्या जाऊन पोहोचला असणार खात्रीने. पण मी कशी निघू इतक सगळ होऊन गेल्यावर आई बाबांना न सांगता ते हि माझ्याच दहाव्याची तयारी सुरु असताना. मी नाही निघू शकत. सगळं आटपेपर्यंत, गुरुजी असेपर्यंत, आईचे अश्रू सुकेपर्यंत.. पिंट्या कर्ता होई पर्यंत. 

You-Know-Who"

You-Know-Who" 

सध्या त्याने थैमान घातलय
सध्या त्याने होम अरेस्टवर पाठवलय

बातम्या म्हणू नका
सोशल मिडीया म्हणू नका
त्याने सगळच हायजॅक केलय

कोणी म्हणे हा श्लोक म्हणा
कोणी म्हणे तो मंत्र म्हणा
तर कोणी म्हणे तिथे मंदिरांना कुलपं लागली
तुम्ही आता तरी हा येडेपणा सोडा
कोण चूक कोण बरोबर?
मी कोण ठरवणार? नास्तिक असो कि आस्तिक सगळ्यांच्या डोक्याला भुंगा सोडून तो अजून फिरतोय इथे तिथे

तो म्हणजे तोच हो He-Who-Must-Not-Be-Named


बुडत्याला काठीचा आधार तसा तिला मंत्राचा आणि मला मास्कचा
पॉझिटिव्हिटी आणा बॉ कुठून तरी
कशी किलो मिळते म्हणे हि पॉझिटिव्हिटी?
आयर्न सप्लिमेंट सारखी कॅप्स्युल फॉर्म मधे येते कि अजून कशी?

रामदेव बाबा नामक कोणीतरी परवा टॉक शो मधे दाखवल म्हणे योगा करा कपालभाती करा म्हणजे तो लांब राहील.
अजून कोणी महनीय व्यक्तीने सांगितल भारतीय स्ट्रॉंग आहेत. आपली खाद्य संस्कृती जगात बेस्ट आहे. आपल सोवळ ओवळ बेस्ट आपले पूर्वज बेस्ट आपण इतके बेस्ट आहोत मग इतक्या विविध साथींनी इतक्या वर्षात इतके बळी गेलेच कसे आपले?  पण हे विचारायच नाही. सध्या आपण कोणालाच काहीच विचारायच नाही. जो तो साबणाच्या फुग्यांचा खेळ खेळण्यात मग्न आहे. फुगा फोडलात तर नवीन खेळ द्यायची ताकद आपल्यात आहे? माझ्यात तरी नाही. जाऊदेत मी सध्या साबणाच्या बुडबुड्यांकडे दुर्लक्ष करुन त्याऐवजी साबणाने हात धुतेय. निवांतपणात आनंद शोधतेय, जसे ते बुडबुड्यांच्या खेळात जीव रमवतायत, ती जंतू जलाल तू आई बला को टाल तू म्हणत  पुजाअर्चा करण्यात गुंतवून घेतेय. आणि तो सुद्धा कुठेतरी दबा धरुन बसलाय.  तो म्हणजे तोच हो He-Who-Must-Not-Be-Named.

सात होरकृक्स होते ना त्याचे? मग आता शेवटचा तेव्हढा बाकी आहे. तो सातवा horcrux संपला कि तो ही संपेल. 'उम्मीद पे दुनिया कायम है |' अस कोणीतरी म्हणून गेलय आणि ते अगदीच खोटं नाही याबद्दल माझी खात्री आहे कदाचित हिच माझी काडी आहे आधाराची.
तुम्ही कोणत्या काडीला धरुन आहात?





genes,legacy, heredity आणि आपण


दिवाळीत रांगोळी काढत होते. मागे उभं राहून लेक बघत होती. मला म्हणे,
 "आई ज्ञानकमळ मस्त आलय"

तिला म्हंटल ते तर यायलाच हव होतं तुझे पणजोबा लक्ष ठेवून असतील आज 😄

मग तिचा इंटरेस्ट रांगोळीवरुन पणजोबा का लक्ष ठेवत असतील वर शिफ्ट झाला. तिला त्यामागची स्टोरी ऐकवताना अशा अनेक गोष्टी एकामागोमाग एक आठवायला लागल्या.
ज्ञानकमळाची रांगोळी जेव्हा कधी काढते तेव्हा मला अस वाटत अण्णा बघतायत ती बाजूला उभे राहून. गेरु सारवतानाही हमखास त्यांची आठवण येते. अशीच एक खास रांगोळी आजीच्या आठवणीत नेणारी आहे.

कधीतरी पोळ्या करताना अचानक एखाद्या फुगलेल्या फुलक्याला गॅसवरुन खाली काढताना हलके अंगावर काटा येतो तेव्हाही वाटत अण्णा मागे उभे राहून त्याच कौतुकभरल्या प्रेमळ नजरेने लक्ष ठेवून आहेत जसे ते, मी कॉलेजमधे असताना दाराच्या चौकटीत उभे राहून मला कौतुकाने बघायचे.
गणपतीत हार करताना, दूर्वा निवडताना हमखास अण्णा आठवतात. आठ नातवंडांना एंगेज ठेवायच त्यांच कसब आठवतं.

हे अण्णा आणि आजी माझ्या आईचे आई वडील. घरातली पहिली नात म्हणून फार जास्त जीव त्यांचा माझ्यावर.


बाबांच्या आईचा सहवास फार नाही लाभला पण बेसन लाडू मला आवडायचे म्हणून ती मी तिकडे जाणार असेन तर करायचीच आणि अचानक जाणं झालं तर किमान पणशीकरांकडून आणून खाऊ घालायची असं माझी आई आणि आत्याने सांगितल होतं पूर्वी. हे कळल्यापासून मला बेसन लाडू अधिकच आवडायला लागले. मी पहिल्यांदा केले तेव्हा मला माझी आजी आणि हे आई आत्याच सांगण आठवलं. लेक पूर्वी खायची नाही पण मी पहिल्यांदा केले तेव्हापासून तिला आवडायला लागले. त्यावेळी का कोण जाणे पण मला अस वाटल आजीने तिचं प्रेम त्यात मुरवलं म्हणून लाडू पणतीला आवडले तिच्या आणि म्हणून तिच्या या नातीला करायलाही जमले. आत्याही खाऊन म्हणाली तेव्हा कि एकदम तुझ्या आजीसारखे झालेत गं.

मला आषाढीला हमखास मामा आठवतो माझा.वारी सुरु झाली कि पण तो आठवतो. मामा भाचे डोंगरसफारी, डोंगरावर केलेली भेळपार्टी, झब्बूचा रंगलेला खेळ, टेलिस्कोपमधून आकाशदर्शन, आ वासून ऐकलेल्या विज्ञान गप्पा.. अशा अनेको आठवणीतून मामा डोकावतो.

अस वाटत हि मंडळी या रुपाने अंशतः आहेतच इथे माझ्यात

आपलं एखाद माणूस जातं ना तेव्हा आपल्यातला एक अंश त्यांच्यासोबत जातो (part of us dies with the person म्हणतात तस) तसच त्यांच्यातला एक अंश आपल्यात उरतोच उरतो.

यालाच genes,legacy, heredity म्हणत असावेत का?


तात्पर्य, जजमेंट आणि आपण



तुम्ही ती 'मऊशार कापसाच्या गाद्यांमध्ये, खालच्या कुठल्यातरी थरात असलेला खडा टोचून झोप न लागणाऱ्या राजकन्येची' गोष्ट ऐकली असेलच पूर्वीही. अशा गोष्टींखाली पूर्वी तात्पर्य नावाचा प्रकारही वाचायला मिळायचा. सोबत दिला नसेल तरी तो कथा सांगणारी व्यक्ती सांगायचीच. तर या ही गोष्टी सोबत "सूख बोचतं ते असं" अशा अर्थाच काही तात्पर्य वाचल्याच + ऐकल्याच आठवतय.

पण खरच असेल ना अशी एखादी राजकन्या / राजपुत्र ज्याला हा असा खडा टोचत असेल. टोचणी बारीकशी असेल पण तरी पाठ टेकली कि जाणवणारी असेल.

आणि आपणच काय पण तिने/त्यानेही ही राजकन्येची गोष्ट त्यातल्या तात्पर्यासकट ऐकलेली असल्यामुळे, स्वत:च स्वत:ला,"सूख बोचतय बर हे" म्हणत झटकून टाकलं असेल.

अस झटकून टाकल तरी पाठ टेकल्यावरच टोचणं मात्र झटकलं गेलं नसेल.

सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशा कितीतरी प्रकारच्या खड्यांमुळे तिची/त्याची झोप उडाली असेल. इतरांच जाऊदेत पण अशी तात्पर्य स्वत:च्याही मनात खोल रुतल्यामुळे आधी "छे! कुठे काही खडाच नाही" पासून ते, हे जे टोचतय ते "आपल्याच मनाचे चोचले आहेत" म्हणत स्वत:ला दोष दिला गेला असेल.

आणि कधीतरी या द्वंद्वात उध्वस्त होऊन कसं सावराव हे न कळून आयुष्य उधळून देत तिने/त्याने आपल्यापरीने त्याचा शेवट केला असेल.

हे मनात यायच कारण नुकत्याच ऐकलेल्या काही  आत्महत्येच्या घटना हे आहे. वरकरणी खूप सुखात भासणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत, हसत्याखेळत्या कुटुंबात घडलेल्या या घटना. नंतर मागे राहिलेल्यांना मात्र विचाराच्या वावटळीत सोडून देतात. काहीच कारण सापडत नसतं. उगा एखादा बारीकसा खडा असावा अस वाटत रहातं. आपल्या लेखी 'ते' त्या राजकन्येसारखच आयुष्य जगत असतात.

पण खर सांगू? तर तो खडा खरा असतो, त्याच टोचणं खर असतं. किमान त्यांच्यापुरत तरी ते खरं असतं.

सर्वात पहिले हे जे तात्पर्याचे, आदर्शाचे 'कोट्स' आपल्या मनात बसलेले असतात ना घट्ट ते अक्षरश: बॅन केले पाहीजेत.

कदाचित त्यांनीही हे आदर्शाचे कोट मनात वाजत राहिल्यामुळे आपल्याच मनाचे चोचले म्हणत गिल्ट बाळगून त्यांच अस्तित्वच नाकारल असेल.

त्यांनी 'हे खडे आहेत तिथे त्या सुखाच्या गादीतही लपलेले' आणि 'त्यांच्या टोचण्याने त्रास होतो' हे इतपत मान्य केल असत ना तर, तर कदाचित त्यांनी मदत मागितली देखील असती आणि मग कदाचित सूख बोचतंय अस न म्हणता 'एकतरी' मदतीचा हात त्यांच्यापुढे केला असता कोणीतरी.
आणि अस झाल असत तर मग मागे राहिलेल्यांना विचारांच्या वावटळीत जर तर ची कारण पिंजत बसाव लागलं नसतं.

तात्पर्य टाळून जजमेंटल न होता आपण इतरांकडे आणि त्याही आधी स्वत:कडे बघायला शिकूनच घेऊया आता. हे एक तात्पर्य तेव्हढ बॅन न करता शिकून घेऊया. काय म्हणता?

स्पेस

काहीगोष्टीनाएकदमघिश्यापिट्यावाटतीलपणतरीत्याआवश्यकआहेतपटतनाहीनामाझंम्हणणंपणतेनीटबघितलसतरपटेलकिमानकाहीनाहीतरएकटक्कातरीनक्कीपटेल.

काय झालं? वाचताना अवघड जातय? दमायला होतय समजून घेताना?

का होतय असं? कारण मी वाक्य, वाक्यासारख नीट तोडून लिहीत नाहीये. एक वाक्य संपल कि द्यायचा पूर्णविराम मी देत नाहीये. ना कुठे स्वल्पविराम देतेय.

तुझही तेच होतय का? ध्येय समोर ठेवणं, त्या ध्येयाचा पाठलाग करणं, ते करताना त्याचा आनंद घेणं हे छानच आहे सगळं पण जरा श्वासही घे अधूनमधून. थोडी विश्रांती घे. फुलस्टॉप दे गरज असेल तिथे आणि काही ठिकाणी स्वल्पविराम तरी नक्की वापर. काहीही न करता घालव एखादा दिवस. किंवा त्या दिवसाकडे ठरवून 'एक उनाड दिवस साजरा करायचा आहे' असच ध्येय आहे असं म्हणून बघ. दुसरा श्वास घेण्यासाठी आधी उच्छ्वास सोडावा लागतो आणि विश्वास ठेव या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत.

अस्वस्थ वाटतय? वाटूदेत की. अस्वस्थ असणही चांगलं असतं. अस्वस्थ असणं म्हणजेच प्रवास सुरु असण्याच लक्षण आहे. प्रवास आपली दिशा घेऊन येतो. आपण फक्तं कान बंद करुन मनाच ऐकायच, मन दिशा ओळखत.

आणि चुकली दिशा अस वाटल एक क्षण,नाही अगदी ते वाटणं खर जरी आहे मान्य केलं आपण तरी त्या दिशेने चालताना मनाला आलेला सुंदर अनुभव तर खरा असेल ना? तो घेऊन फिरायच मागे नवीन दिशा शोधायला.

प्रत्येकाच अस्वस्थ होणं वेगळ आणि प्रत्येकाचा 'पीस ऑफ माईंडही' वेगळा त्यामुळे आपण फक्त आपल्याशी प्रामाणिक रहातोय ना हे बघायच. तेव्हढही खूप आहे, खरच! स्वत:वर विश्वास ठेव नक्की मार्ग सापडेल.

दोन शब्दांमधेही अंतर असतं आणि ते असतं म्हणून ते शब्द नीट वाचता येतात. हि जी दोन शब्दांमधली ब्लॅन्क स्पेस आहे ना ती खूप महत्वाची आहे. त्यामुळे तू ब्लॅंक स्पेसच गिल्ट कधीच नको बाळगूस. हि ब्लॅंक स्पेसच तुझा पुढचा प्रवास ठरवेल कुणी सांगाव?

म्हंटल ना मगाशीच, काही गोष्टी ना एकदम घिश्यापिट्या वाटतील पण तरी त्या आवश्यक आहेत. पटत नाही ना माझं म्हणणं? पण ते नीट बघितलस तर पटेल. किमान काही नाही, तर एक टक्का तरी नक्की पटेल.

बोलके मौन

शब्दांच्या पाऊलवाटी
बोलके मौन साथीला
ऊन कवडसे शब्द
मौनाच्या भेटीला

हे नाते असते खास
शब्दाचे नि:शब्दाशी
स्पर्शीत झाले तरिही
उरतेच जरा अस्पर्शी 

ऋतू हा हवासा



ऋतू हा हवासा, हवा ही गुलाबी
तुझा हात हाती असा राहूदे -२ 

तुझा हात हाती गुंफूनिया मी 
जरी टाकते हे पाऊल नवे 
वाटा नव्या या, खुणवी मला; पण 
मनी हुरहुरी का उगा दाटते   

तुझी साथ असता, तुझ्या सोबतीने 
मिटवीन साऱ्या शंका प्रिये 
तुझा स्पर्श होता, स्पर्शातूनीया 
मुक्यानेच सारे मला आकळे 

तुझे स्वप्न हलके बिलगले मला अन्
अता काही दुसरे मला ना दिसे 
अनवट सुरांच्या किनाऱ्यावरी या 
तुझ्या भावनांचे उमटले ठसे 

कोर्ट म्हणत..

कोर्ट म्हणत, वेगळं व्हायला
काहीतरी कारण असावं लागतं 
ठोस आणि व्हॅलिड 
त्याच वजन पडाव लागत 

भांडण ?मारझोड ? 
व्यसन? गेलाबाजार अफेअर ?

नाही ? 
यातल काहीच नाही?

मग कठीण आहे तुमची केस 
वेगळ व्हायला नाहीये काहीच बेस 

मग काय? रहातोय एकत्र अजूनही 
एकत्र रहायला, काहीतरी कारण लागत 
अस कोर्ट म्हणत नाही, म्हणूनही

Life


Life is like a reality game
It's different; though rules are same
It's you who decide
to go left or right
Either way is uncertain
but 'hope' is the source of light
Even though it turns out to be
as dark as the night
This too shall pass
& you'll be alright
Not to forget
life is like a game
losers just blame
& fighters win acclaim
-Kavita Navare
26/09/2018

अक्षरगाणे

अ अ रे आईचा
ब ब रे बाळाचा
क क रे कोणाचा?
काळ्या काळ्या केसांचा
ख ख रे खाण्याचा
ग ग रे गाण्याचा
घ घ रे कोणाचा ?
तो तर माझ्या घराचा
च च रे चकलीचा
छ छ रे छत्रीचा
ज ज रे कोणाचा?
जेवणातल्या जिलबीचा
झ झ रे झोपेचा
ट ट रे टोपीचा
ठ ठ रे कोणाचा?
ठ तर आहे ठेंग्याचा
ड ड रे डब्याचा
डबा असतो खाऊचा
ढ ढ रे ढगाचा
काळा ढग पावसाचा
ण ण रे कशाचा?
पाणी गाणी शब्दामध्ये
ण तर असतो शेवटचा
त त रे तबल्याचा
थ थ रे थेंबाचा
द तर असतो दादाचा
ध तर धमाल धिंग्याचा
न न रे कोणाचा?
नाचूयातल्या नाचाचा
प प रे परीचा
फ फ रे फुलाचा
ब तर असतो बर्फीचा
भ आवडत्या भजीचा
म म रे कोणाचा?
म लब्बाड माऊचा
य य रे यशाचा
र र रे राजाचा
ल लपाछुपीचा
व तर आहे वहीचा
श सांग कोणाचा?
श माझ्या शाळेचा
पोटफोड्या ष म्हणतो
नाही बरं मी शेताचा
मी तर षटकोनाचा
ळ ळ रे कोणाचा?
माळ, बाळ या शब्दांमध्ये
ळ तर असतो शेवटचा
स स रे सशाचा
ह ह रे हरणाचा
क्ष क्षमा क्षमतेचा
ज्ञ सांग तू कोणाचा?
जे शिकतो त्या ज्ञानाचा
हि तर आहे बाराखडी
चालीत रोज म्हणूया
सोपी सगळी अक्षरे ही
गाण्यामधून शिकूया

पाळणा / अंगाई

बाळा जो जो अंगाई | गाई तुझी ग आई
बाळा जो जो अंगाई
आली घरा ती आली, बनून गवराई
बाळा जो जो अंगाई
बाळलेणी ती ल्याली | लावा तीट हो गाली
भाग्य रेखाया भाळी, आली दुरून सटवाई
बाळा जो जो अंगाई
अंगडी टोपडी ल्याली | हसू फुलले गाली
जणू अंगणी माझ्या, फुलली हि जाई
बाळा जो जो अंगाई
रक्षितो बाळाला माझा रामराया
कोड पुरवी अंबाबाई, कौतुके पाही आई
बाळा जो जो अंगाई

इजा बिजा...

गॅलरीत कावळा कधीचा केकाटत होता. "आता नको रे बाबा कोणी पाहुणा!" म्हणत ती उठायला गेली तर ओल आलेल्या फरशीवरुन तोलच गेला.
आज काही खरं नाही सकाळी पायऱ्यांवरुन पडत होते. इजा झालं बिजा झालं, मन परत अस्वस्थ झालं. तिने मूड बदलायला रेडीओ सुरु केला.
"तू जहां जहां चलेगा मेरा साया.." स्वरांनी कानाला हलकेच स्पर्श केला. हेच गाणं का? तिला अजूनच अस्वस्थ वाटायला लागलं. चॅनल बदलून ती दिवा लावायला उठली.
वीजा भेसूर चमकत होत्या. कावळा कर्कश्श ओरडत होता. त्याला उडवायला गेली आणि छातीत जोरदार कळ आली.
कावळा उडाला, पाऊस थांबला, सगळच थांबलं.
रेडिओवर आता आएगा आनेवाला संपून जितनी चाबी भरी रामने लागलं होतं.

घटनाक्रम

घटना घडत गेल्या, क्रम काहीही असेल याचा.
थांब ॲडम! ती विनवणीच्या स्वरात म्हणाली. माझा श्वास थांबला एक क्षण.
त्या बंद दारापलिकडे म्हणे सैतानाचे राज्य आहे आणि कसलेसे संस्कार केलेल्या मंतरलेल्या धाग्याने म्हणे त्याला रोखून धरलय. बूलशीट! या अंधश्रद्धेलाच मला तोडायचे आहे.
तिच्या म्हाताऱ्या हाताचा खरखरीत स्पर्श गालाला झाला. फूल पडलेल्या डोळ्यातून अश्रू तिच्या गालावर ओघळले.
“ती सैतानाची खोली आहे. त्याला बाहेर येऊ दिला तर अनर्थ होईल. काळजी वाटते रे मला तुझी” ती कळवळून म्हणाली.
म्हातारी सरणावर गेली. मी दोर कापून टाकला. दार उघडले. खोल भरून श्वास घेतला.
घटना घडत गेल्या, क्रम काहीही असेल याचा. लोकं म्हणतात ”ॲडम आता कुमार्गाला लागलाय”

चक्रव्यूह

किती पावलं चालले असेन? १०००? २०००? आणि किती बाकी आहेत? काहीच कळेना आता. परत फिरले तर बाहेर पडायची वाट तरी सापडेल का माहिती नाही.
“फार काही वेळ नाही लागणार मला. पायाखालची तर वाट आहे माझ्या” असं ऐकवलं होतं ना मी, मला जाण्यापासून अडवल्यावर?”
पण हा रस्ता, या गल्ल्या.. चकवा लागल्यासारखं झालय मला. बहूतेक मी फिरुन परत तिथेच येतेय. मंद सुगंधाची गल्ली लागली होती मगाशी. बहूतेक त्याच्या पुढच्या वळणावर आहे एक्झिट. पण ती गल्ली परत फिरुन लागतच नाहीये. I am sorry dear, you were right हे चक्रव्यूह भेदायची ताकद नाहीये माझ्यात. ’down the memory lane’ मधे आज माझा अभिमन्यु झाला गं.

वटपौर्णिमा: contract renewal (शतशब्दकथा)

(Version 1)
हॅलो! पोहोचलीस का ऑफीसला? गर्दी होती का?
हो, मगाशीच पोहोचले आणि गर्दीही नव्हती फारशी आज. चक्कं बसायलाही मिळालं.
नशीब म्हणायच. पण काय अडलं होतं का इतक्या गर्दीत साडी नेसून जायच?
अरे! वटपोर्णिमा आहे आज.
ते मलाही माहिती आहे. पण पुजा आणि उपवास दोन्ही तू बंद केल होतस ना?
हो रे, केव्हाच बंद केलय.
मग? हे साडीच काय खूळ उगाच?
हे असच नटायला निमित्त रे काहीतरी
ह्म्म! मग ठिक आहे. पण आपला पॅक्ट लक्षात आहे ना?
येस बॉस! तो नाही विसरले
विसरू पण नकोस. आपापल्या जोडीदारांसोबत हा शेवटचा जन्म. पुढचे सगळे जन्म तू माझी आणि मी तुझा! पॅक्ट आहे हा आपला.
---------------------------------- -------------------------
(Version 2)
हॅलो! पोहोचलीस का ऑफीसला? गर्दी होती का?
हो, मगाशीच पोहोचले आणि गर्दीही नव्हती फारशी आज. चक्कं बसायलाही मिळालं.
नशीब म्हणायच. पण काय अडलं होतं का इतक्या गर्दीत साडी नेसून जायच?
ओय! वटपोर्णिमा आहे आज.
ते मलाही माहिती आहे. पण पुजा आणि उपवास दोन्ही तू बंद केल होतस ना?
हो ते फार पूर्वीच बंद केलय.
मग? वटपोर्णिमेनिमित्त म्हणत साडीच काय खूळ उगाच?
हे असच नटायला निमित्त नको का?
ह्म्म! मग ठिक आहे. पण आपला पॅक्ट लक्षात आहे ना?
येस! तो नाही विसरले.
विसरू पण नकोस. आपापल्या जोडीदारांसोबत हा शेवटचा जन्म. पुढचे सगळे जन्म तू माझी आणि मी तुझी असा पॅक्ट आहे.

पुन्हा एकदा

शब्द हरले, पुन्हा एकदा
सूर विरले, पुन्हा एकदा
सख्या तुझ्या मौनापुढे
नाते हरले, पुन्हा एकदा
शब्दाला धार, शब्दाचे वार
निष्प्रभ सारे, पुन्हा एकदा
संपले नाते, वरचढ ठरले
मौन विखारी, पुन्हा एकदा
नात्याच्या या शोकसभेची
चर्चा झाली, पुन्हा एकदा
मूक अश्रू मी ढाळून गेले
अबोल वणवा, पुन्हा एकदा

जरा ऐक ना! मना ऐक ना !



जरा ऐक ना
मना ऐक ना
कसे सावरु?
कसे आवरु?
मला सांग ना
मना ऐक ना !

कुठूनी येतसे
वादळ वारे,
कसे शोधू मी
स्तब्ध किनारे
मलाच माझी
वाट दिसेना
डुबकी मारुनी
आले तरीही
ठक्क कोरडी
कशी? कळेना
मना सांग ना

जरा दूरशी
किनाऱ्यावरी
अंग चोरुनी
बसले असता,
तुषार उडले
उगा जरासे
चिंब भिजले
माझे मी पण
कसे? कळेना
जरा सांग ना

जरा ऐक ना!
मना ऐक ना!

die hoffnung...The hope... आशा

*die hoffnung*
Es ist schwierig
Es ist leidig
Es gibt keine licht
alles ist richtig nicht
vergessen nicht
sonne die untergeht
Morgen es aufsteht
hoffe es geht gut
Morgen wird es gut
*The hope*
It's tough
It's annoying
There is no light
Nothing seems to be right
But do not forget
sun that sets
Rises again
Keep the hope alive
Tomorrow will be alright
*आशा*
काळ जरी हा कठीण असे
मनी उदासी विलसतसे
तिमीर तिमीर हा भरलासे
चुकतच जाते सर्व कसे?
तरी जाण तू मर्म असे
चक्र निरंतर चालतसे
मावळताना आज दिसे
तो सूर्य नव्याने उगवतसे
आशेचे या बोट पकडता
पुन्हा नव्याने वाट दिसे

पण मी..? माझं काय ..?

पण मी..?
माझं काय ..?
नुसता प्रश्नाचा दिवा सोडलायस पाण्यात?
कि उत्तराच्या प्रतिक्षेत आहेस?
नुसता प्रश्न पडून आणि तो मांडून
झालं असेल समाधान
तर थांबूया इथेच काठावर
सोडलेला दिवा, पाण्यात विझत
दूर जाताना बघत
उत्तर हव असेल,
तर मात्र उतराव लागेल पाण्यात
आहे तयारी? मनाची, शरीराची.. सगळ्याचीच?
उत्तम, आदर्श मुलगी पत्नी सून आई
अशा शेऱ्यांचा करावा लागेल त्याग तुला
जमेल तुला?
सुपरवूमन हि शिवी आहे
अस बिंबवाव लागेल मनावर
जमेल तुला?
'हाऊस हजबंड' व्हायचा चॉईस
पुरुषालाही असू शकतो
हे घेशील समजून?
रचशील का नवीन कथा?
ज्यात राजकुमार कायम
ताकदवान शूर नसेल आणि
ऱाजकुमारी कायम गोरीपान
दुर्बल नसेल?
बाईच्या त्यागाच ग्लोरिफिकेशन नसेल
आणि सगळच जमाव असा अट्टाहासही नसेल
मदत घेण्यात आणि करण्यातही
कमीपणा नसेल
पण प्रत्येकच वेळी आसरा शोधायची त्यात घाईही नसेल
जमेल अशी कथा शोधायला, वाचायला, लिहायला आणि जगायला?
हरकत नाही. कर विचार निवांत
आणि उत्तर शोधायची आस नसेल उरली आता
तर थांबूया काठावरच,
तो प्रश्नाचा दिवा विझलाय कि अजून कोणी तेवत ठेवलाय बघत
पण उत्तरच हवी असतील अजूनही तर मग ऐक
प्रत्येक उत्तराची असते एक किंमत
ती चुकवल्याखेरीज मिळत नाही काहीच, कुठेच आणि कधीच
आणि कधीकधी स्वत:च कृष्ण बनून
पुरवावी लागतात स्वत:तल्या द्रौपदीला वस्त्रही
बाई ग! काठावरुन नाही कळत हे काहीच
त्यासाठी झोकूनच द्याव लागत पाण्यात,
बुडायची भिती काठावरच ठेवून
जमेल का तुला?
म्हणून म्हणते बाई नुसता प्रश्न विचारणार असलीस तर राहू दे
गेली कित्येक शतक ऐकतेय मी प्रश्न हा,
तस अजून काही शतकं ऐकेन असाच
प्रश्न ऐकेन
त्यावर वाह वाह ऐकेन
त्यावर टिकाही ऐकेन
पण उत्तर? अहं! ते नाही ऐकवणार ऐकायच असल्याखेरीज

पाळणा / अंगाई


बाळा जो जो अंगाई | गाई तुझी ग आई
बाळा जो जो अंगाई
आली घरा ती आली, बनून गवराई
बाळा जो जो अंगाई
बाळलेणी ती ल्याली | लावा तीट हो गाली
भाग्य रेखाया भाळी, आली दुरून सटवाई
बाळा जो जो अंगाई
अंगडी टोपडी ल्याली | हसू फुलले गाली
जणू अंगणी माझ्या, फुलली हि जाई
बाळा जो जो अंगाई
रक्षितो बाळाला माझा रामराया
कोड पुरवी अंबाबाई, कौतुके पाही आई
बाळा जो जो अंगाई

आई म्हणूनी वय माझेही

आई म्हणूनी वय माझेही
तुझ्यासारखे 'सोळा' आहे
बंडखोरीचा शाप आपुल्या
नात्यामधल्या 'वयास' आहे
कधी झुकावे, कधी झुकवावे
अपुले-तुपले सुरुच आहे
बेफिकीरीचा आव आणला
तरी काळजी करणे आहे
आई म्हणूनी वय माझेही
तुझ्यासारखे 'सोळा' आहे
तुझी भरारी तुझी झेप ही,
दुरुन पाहणे सुखदच आहे
तरी वादळ-वाऱ्याची हूल
मनात वादळ उठवत आहे
आई म्हणूनी वय माझेही
तुझ्यासारखे 'सोळा' आहे
काढू थोडे रुसवे-फुगवे
'फेज' उद्या जाणरच आहे
ठिणग्या उडल्या किती जरीही
प्रेम अबाधित तसेच आहे
तोवर सोसू कळ थोडी,
या भांडणातही गंमत आहे
आई म्हणूनी वय माझेही
तुझ्यासारखे 'सोळा' आहे
बंडखोरीचा शाप आपुल्या
नात्यामधल्या 'वयास' आहे
- एक आई 
कविता नवरे

सावली


"काय गं थकलेली दिसत्येस आज फार? खूप हेक्टीक दिवस होता का?" घरात आल्याआल्या प्रतिमाच्या प्रश्नावर सावलीने नुसतच "ह्म्म" असा त्रोटक रिप्लाय दिला त्यावरूनच प्रतिमाने ओळखलं, "आज स्वारी गंभीर दिसते आहे."
"मग, आज जेडीची काय नवीन खबरबात?" एकीकडे कॉफी घेताना, मुद्दामच गंभीर विषय टाळत प्रतिमाने हलक्याफुलक्या विषयाने सुरुवात केली.

"जेडी? अरे बाप रे! तो तर एक अजबच माणूस आहे. आज नवीन माहिती कळली त्याच्याबद्दल. फेसबूकवर या प्राण्याची म्हणे फेक प्रोफाईल आहेत आणि मायबोलीवर तर ३ डुप्लिकेट आयडी."
"काय करतो काय इतक्या सगळ्या प्रोफाईल्सचं? कसं मॅनेज करतो?"
"काही नाही गं. नुसता ढोल बडवत असतो, फेसबूक फ़्रेन्डलिस्टमधे इतके मित्र आहेत, अन् ब्लॉग पोस्टवर आज इतक्या कमेन्ट्स पडल्या... फालतूपणा नुसता!."
"सावलीऽ हाच सगळी प्रोफ़ाईल्स आळीपाळीने वापरून कमेन्ट्स करत नसेल कशावरून?"
"हं... शक्य आहे. माझा तर त्याच्यावर काडीचाही विश्वास नाही. तोच काय, कुणावरच नाही."
हे शेवटचं ‘कुणावरच नाही’ म्हणतानाचा तिचा आवाज काळजात कळ देऊन गेला.
"काय होतय नक्की?" हीच ती योग्य वेळ म्हणत प्रतिमाने मुद्द्याला हात घातला.
“आमच्या काळजीवाहू ताईसाहेबांचा फोन येऊन गेला. या जागेचं काहीतरी करायला हवं म्हणे. आईला जाऊन सहा महिने होतील आता. इतक्या महिन्यांत माझ्या एकटेपणाची काळजी नाही वाटली आणि आता मी माझीच कंपनी एन्जॉय करायला शिकल्यावर आला हिला पुळका! माझा आता तिच्यावरही विश्वास नाही. जगात कुणावरही नाही, तुझ्याशिवाय. मला फक्त तुझी सोबत पुरे आहे. तू रहाशील ना सोबत कायम?" सावलीने हात पुढे करून विचारलं.
तिच्या हाताला आरशातल्या प्रतिमानेही हात लावला तेव्हा कुठे सावली जरा रिलॅक्स झाली. या सगळ्या गडबडीत गार झालेली कॉफी संपवली आणि मग सावली, प्रतिमाला एक स्मितहास्य देत कप घेऊन स्वयंपाकघराकडे वळली; नेहमीप्रमाणे तिच्या एकटीसाठी कुकर लावायला...

प्राक्तन


उष्टेमाष्टे खरकटलेले
असे काही मी खातच नाही
स्वप्न पहावे असे काही तर,
पोट रिकामे; झोपच नाही
उजाड माळावरी वस्तीला,
क्षण सुखाचा फिरकत नाही
भुयारातल्या अंधाराची,
ओढ अताशा थांबत नाही
इतके सारे वार सोसूनी
उमेद कशी रे संपत नाही?
वेताळाचा प्रश्न 'उगाचच'
तरी उत्तरे विक्रम काही
गतकाळाचे व्रण पुसटसे,
वस्तीवर ना दुसरे काही
सुर्य उगवतो नेमाने, तो
वसा घेतला मोडत नाही
गोठवणाऱ्या थंडीसारखे
दु:ख जाहले, हरकत नाही
पाणी बन तू, पाण्यामधले
जीवन गोठून थांबत नाही
असेच असते वेताळा हे,
चक्र अखंडीत चालत राही
जसे तुझे नि माझे प्राक्तन,
याला दुसरे उत्तर नाही

आमिष


साम दाम दंड भेद वापरत
मी स्वत:ला वश केलं
शांत सुखी आयुष्याच
आमिष देत,
मी हृदयालाही गप्प केलं
फक्तं या बंडखोर डोळ्यांच
काय करु?
हेच तेव्हढ कळत नाही
- कविता नवरे
०२/११/२०१८

तुझ्यासवे तुझ्यामनी


श्वास तुझा
भास तुझा,
तुझाच ध्यास
हा मनी
तुझ्याविना
हि राधिका,
रितीच भासते
वनी
कृष्ण सखा
मी तुझा,
तुला गुपित
सांगतो
ऐक तू,
तुझ्यासवे
मलाच मीच
ऐकतो
तुझाच मी,
तुझ्यात मी
पहा जरा
तुझ्या मनी
डाव रंगतो अता
तुझ्यासवे तुझ्यामनी

नि:शब्द सूरवाही


आज ओठांनी तुझ्या
अडवून धरले
बंद रस्ता पाहूनी मग
शब्द खचले
जिंकल्याचा आवेश म्हणूनी
ओठ हसले
शब्द डोळ्यातून आणि
हलके निसटले
बोलले गेले न जे जे
ऐकण्या ते
मन माझे आज बघ ना
कान झाले
या मनाने ऐकले
नि:शब्द सारे
अन् तयाचे सूरवाही
गीत झाले
- कविता नवरे
२३.०८.२०१८

खेळ

लेक काल रुस्सून बसली;
हट्टून बसली
साबणाच्या फुग्याचा खेळ हव्वाच;
म्हणून अडून बसली
जाऊदेत दहा रुपयासाठी कुठे मन मोडायच?
म्हणत मी हि दिलं घेऊन ते कचकड्याच खेळणं
आणि बसले बघत तिचं ते 'बुडबुड्यांच्या' मागे पळणं
लहान आहे तोवर खेळेल, रमेल
मोठी झाली कि आपोआप हे थांबेल
बुडबुड्यांच्या जगाची जागा
तिची तिलाच कळेल
कळेल का?
कि प्रत्येक वयाचे बुडबुडे वेगळे
हे सत्य तेव्हढ मागे उरेल?
- कविता नवरे
२८/११/2018

राधा


जितकी ओळखीची,
तितकीच अनोळखी
माझ्यापासून वेगळी,
तरीही जोडलेली
माझ्याही मनाच्या तळाशी
अशीच एक राधा लपलेली
राधा तृप्त तृप्त, तरी अतृप्त
मनभर तिचा स्पर्श
तरीही ती अस्पर्श
खोल खोल खूप खोल
जखम वेडी रुतलेली
माझ्याही मनाच्या तळाशी
अशीच एक राधा जपलेली

असे वाटते असे जगावे


वाटे उठूनी प्रवासास या निघून जावे
पुरेल सोबत माझीच मजला असे जगावे
कुणी म्हणाले जीवनगाणे सुरेल व्हावे
असू दे कणसुर हरकत नाही, खरे असावे
वाट पाहते दु:ख आपुली दबा धरुनी
गळाभेट दु:खाची घेऊन पुढे निघावे
हेवा करण्याजोगे मजला नकोच काही
श्वासाइतुके नाते अपुले सहज असावे
गुरफटले जरी कोषामध्ये हरकत नाही
फुलपाखरू बनून तरीही पुन्हा उडावे
किंमत चुकवून शिकतो आपण इथेच सारे
कुणी कुणाच्या साठी केव्हा किती रडावे

एक अस्वस्थता आहे आत लपलेली

एक अस्वस्थता आहे आत लपलेली
काय हवय तिला?
नेमकं तेच कळत नाही
काही खुपलं नाही
की दुखलही नाही
कशाचं ओझं नाही
कुणावर बोजाही नाही
तरीही पक्षाला उडता येत नाही
का होतय हे?
नेमकं तेच कळत नाही
एक अस्वस्थता आहे आत लपलेली
काय हवय तिला?
नेमकं तेच कळत नाही
'ती' ओळखेल सर्व काही
सुचवेल हमखास उपायही
शोधायला हवं तिला, पण
नक्की कसं? ते कळत नाही
कधी सुटला हात आमचा?
नेमकं तेच कळत नाही
मनाचा डोह इतका खोल
की न बुडण्याची खात्री नाही
सेफ्टी गिअर्स शिवाय उतरायची
आता माझ्यात हिंमत नाही
मी काठावर, ती खोल आत
दोघीही आपापल्या जागी सुस्तं
कदाचित, म्हणूनच होतो मस्त
पण आजच तिला झालय काय?
हेच कळत नाही
एक अस्वस्थता आहे आत लपलेली
काय हवय तिला?
नेमकं तेच कळत नाही
- कविता नवरे

विना शर्त ते मान्य मला

'सोडून जाशील अर्ध्यावरती'
दिलास हा अभिशाप मला
अन् जाता जाता विस्मरणाचा
दिलास तू उ:शाप मला
तुला, नशीबा...; बोल लावू मी (?)
कणखर केले तूच मला
चौकट व्यापक करण्याचेही
तूच दिले सामर्थ्य मला
तुझ्या नि माझ्या मधले अंतर
'मिटावेच', ना ध्यास मला
जसे नि जेव्हा जे जे होईल
विना शर्त ते मान्य मला

गोष्ट तिची त्याची


काल आपला लेक विचारत होता, "आ‌ई, तुमचं लव्ह मॅरेज की अरेन्ज? बाबाने प्रपोज केलं की तू?"
म्हंटलं आम्ही कोणीच नाही प्रपोज केलं. तर म्हणे असं कसं शक्यय?. आता त्याला तुच सांग तुझ्या भाषेत.
तुला आठवतय? आपण पहिलीत होतो. माझ्या हाताला गॅदरींगसाठी आळता लावला होता. तो ओला होता म्हणून आ‌ई म्हणाली होती की, “इथे तिथे हात नको लावूस नाहीतर डाग जाणार नाहीत.” मला तो आळता सुकवायची घा‌ई झाली होती, तेव्हा तू तुझी लाडकी टेबलफ़ॅनच्या समोरची जागा माझ्यासाठी रिकामी करुन दिली होतीस.
आणि ४थी मधली गोष्टं आठवतेय? परिक्षा संपली की आपल्याला पेप्सिकोला मिळायचा या प्रथेप्रमाणे तुझे बाबा आपल्या सगळ्यांसाठी पेप्सिकोला घेऊन आले होते. तुला खुप आवडायचा ना? पण टॉन्सील्सने खूप हैराण झाले होते मी म्हणून काकांना अगदी चार चार वेळा सांगितलं होतं, माझ्या वाटणीचाही पेप्सिकोला तुलाच द्यायला नाहीतर त्यावर तुझ्या धाकट्या बहिणीचा चिंगीचाच डोळा होता आणि संध्याकाळी काकी आमच्या आ‌ईला सांगत होत्या, "आज चिंगीची चंगळ झाली. तिला ३ पेप्सीकोले मिळाले."
माझ्या काही तपासण्या करायच्या होत्या. त्याकरता संध्याकाळनंतर काहीही खायचं-प्यायचं नव्हतं. तपासण्यांना वेळ लागला होता आणि ते १४-१५ तास तू ही माझ्यासोबत उपाशी राहीला होतास.
तुला आठवतं एका उन्हाळी सुट्टीत फ़ास्टर फ़ेणेने भारावून जाऊन मी त्या पुस्तकांची पारायणं केली होती आणि मग त्यावरची मालिका सुरू झाल्यावर तर त्यातला फ़ास्टर फ़ेणे नंबर एक आवडता हिरो म्हणून जाहीर केलं होतं मी. किती राग यायचा तुला प्रत्येक वेळी त्या फ़ास्टर फ़ेणेचा? मोठ्या घुश्यात सांगितल होतस मला, “याच्या पेक्षा चांगली गोष्टी लिहेन तुझ्यासाठी.” इतकं हसायला आलं होतं मला तुझा आवेश बघून. अजून पर्यंत वाट बघतेय मी तुझ्या गोष्टीची. कधी लिहीशील? आता हसशील ना या प्रश्नाने रोजच्यासारखा?
लब्बाड आहेस तू. बाकीच्यांसमोर पण दाखव की रे जरा हे हसू. त्यांना उगाचच वाटतं तू कधी बाहेरच येणार नाहीस कोमातून.

प्रेम?


कुणी सांगितलं तुला?
मी तुझ्यावर प्रेम करते
तुझं नाव उच्चारताना
गालावर हलकेच पसरतो
त्या रक्तिम्यावर मी प्रेम करते
तुझ्या स्पर्शाच्या आठवणीने
अंगावर जे रोमांच उमटते
त्यावर मी प्रेम करते
मी तुझ्यावर प्रेम करते का?
बहुतेक नाहीच
तुझ्यामुळे जिवंत होणाऱ्या
माझ्याच जगण्यावर मी प्रेम करते
मी तुझ्यावर प्रेम करतच नाही
नक्कीच नाही
- कविता नवरे
२६/११/१८

सांग सांग भोलानाथ,

*पाडगावकरांची क्षमा मागून हे आमचं बी मागणं भोलेनाथाकडे*
सांग सांग भोलानाथ,
पाऊस पडेल काय?
रुळांवरती तळे साचून,
सुटटी मिळेल काय?
भोलानाथ दुपारी वीज जाईल काय?
काम ठप्प होऊन बॉस घरी सोडेल काय?
भोलानाथ… भोलानाथ…
भोलानाथ, भोलानाथ.. खरं सांग एकदा
आठवडयातून गाड्या बंद पडतील का रे तीनदा?
भोलानाथ… भोलानाथ…
भोलानाथ उद्या आहे, ऑफीसमधे मिटिंग
कॅन्सल व्हावी मिटींग अशी करशील का रे सेटींग?
भोलानाथ… भोलानाथ…

असते जर..


खरे सांगते तुला कुणीही 'पटले' असते;
दिसण्यावरती केवळ जर का भुलले असते
अपुल्या-तुपल्या गप्पांमधे रमले असते;
नजर मला अन् स्पर्श तुला जर कळले असते
खरा सोबती कोण मला हे दिसले असते;
आरश्याचे जर कपाट माझ्या घरात असते
अपुल्या मधले अंतर जर का मिटले असते;
'दीर्घदृष्टी' बाधीत मग मी फसले असते
काटा रुतला असता तर खुपलेही असते;
नीबर झाले तरी कदाचित दुखले असते
शब्द विखारी असते तर डसलेही असते;
रक्षण करण्या माझे, मी झटलेही असते

मैं एक छोटी बच्ची हू

मैं एक छोटी बच्ची हू,
माँ के गोद मे सोती हू
और लग जाए डर कभी
तो उसे लिपटके रोती हू
जब वो अपने हाथोसे
आसू पोछके चुमती है
डर जाता है भाग कही
और, मैं फिरसे हसती हू
माँ के हाथों मे जादू है
वो प्यार बटोरे फिरती है
दुनियामे सबसे निराली है
मा मुझको सबसे प्यारी है

(भाचीसाठी लिहिलेली बालकविता)

कहानी


बचपन से सुनते आए हैं
यही एक कहानी
शूरवीर था राजा जिसमें
और कोमलसी रानी
राजकुमारी भी थी उसमें
गोरी और सुहानी
बचपनसे सुनते आए हैं
यही एक कहानी
मुख्य किरदार निभानेवाले
होते हमेशा सुंदर
या मानो, वो ही मुख्य हैं
जो होते हैं बस सुंदर
बात नही ये झूठी
ये तो हैं जानीमानी
बचपनसे सुनते आए हैं
यही एक कहानी
साँवली सूरत, छोटासा कद
ना हो प्यारी सी अदा
मुख्य किरदार की मदद करना
काम हैं इनका सदा
यही देखते बडे हुए हम
बात हैं बडी पुरानी
बचपन से सुनते आए हैं
यही एक कहानी
मिले अगर जादू की सियाही
बदलू मैं बात पुरानी
पहचान न जिनकी कोई
लिख दूँ मैं उनकी कहानी
देस भेस और रंग रुपसे
कोई न होगा कम
कुछ तो होता खास सभी में
तोलेंगे ना हम
सच्चे मनसे देखोगे
तो बदसूरत ना कोई
अंदाज अलग होता हैं
बस इतनी सी सच्चाई
छोडो सुनी सुनाई
जो थी बात पुरानी
अब के बच्चे तो सुनले
अब से ये नयी कहानी

हिमालय (मूळ हिन्दी कविता आणि मी केलेला भावानुवाद)

खड़ा हिमालय बता रहा है
डरो न आंधी पानी में।
खड़े रहो तुम अविचल होकर
सब संकट तूफानी में।
डिगो ना अपने प्रण से‚ तो तुम
सब कुछ पा सकते हो प्यारे,
तुम भी ऊंचे उठ सकते हो
छू सकते हो नभ के तारे।
अचल रहा जो अपने पथ पर
लाख मुसीबत आने में‚
मिली सफलता जग में उस को
जीने में मर जाने में।
~ सोहनलाल द्विवेदी
*भावानुवाद*
असे हिमालय अविचल निश्चल
झेलत वादळ पाऊस हा
तसेच संकट झेलायाचे
स्वत:शीच कर निश्चय हा
ढळू नको तू ध्येया पासून
मिळेल सर्व जे हवे तुला
होशील तू ही इतुका मोठा
आभाळ ठेंगणे हो तुजला
लाख संकटे आली तरीही
जो ना सोडी मार्ग खरा
जगणे मरणे दोन्ही त्याचे
सार्थ होतसे जाण जरा
~ कविता नवरे

उंदीर, भीति आणि मी





झुरळ हा समस्त बायकांना घाबरवणारा किटक आहे असं म्हणतात. आठवा, अशी ही बनवाबनवीतला अशोक सराफ़ आणि अश्विनी भावे मधला प्रसंग! बरं राहिलं, तो पडला पडद्यावरचा प्रसंग. काल्पनिक म्हणून तो काही प्रमाण मानणार नाही तुम्ही. नका मानू. पण लोकलमधे, घरात, ऑफ़ीसात अशा कुठल्यातरी ठिकाणी आलाच असेल की जवळपास असाच काहीसा अनुभव तुम्हाला! थोडक्यात काय तर मुद्दा हा आहे की नॉर्मली बायका या झुरळ नामक किटकाला घाबरतात. त्यांच्या मते त्या घाबरत नसुन त्यांना त्याची किळस वाटते म्हणून त्या किंचाळतात. असो बापड्या. पण आम्ही पडलो ऍबनॉर्मल कॅटेगरीमधल्या. आम्ही अशा क्षुद्र किटकाला बघून घाबरु की काय? छ्या! अजाबात नाही. ह्म्म! आता झुरळाच्या जागी एखादा उंदीर दिसला तर मात्र आम्ही घाबरु. ते काय तुम्हीही घाबराल हो, अनलेस तुम्ही मार्जार वर्गातले आहात. पण आता मी त्या भीतिवरही लवकरच मात करायचं ठरवलय. हे कधी ठरलं म्हणताय? तर झालं असं की यावेळी मी ते न्यु इयर रिझोल्युशन म्हणतात ते केलय. त्यामुळे यावेळी तरी मी माझी उंदीर या प्राण्याविषयीची भीति बाटलीत बंद करुन समुद्रात फ़ेकून देणार आहे हे नक्की.

मी असं ठरवलेलं बहुतेक उंदरलाही कळलं असावं. आणि त्यानेही "बघू कशी हिची भीति बाटली बंद होते" म्हणत त्याचे इवलेसे दंड थोपटले असावेत असा मला दाट संशय यायला लागलाय. या संशयालाही आधार आहे, मी उगाच लोकांसारखं हवेत तीर नाही मारत. तर याला कारणीभूत आहे माझ्या जागेत रोज खुडबुडून जाणारा एक उंदीर. जाणारा म्हंटलं असलं तरी तो जा ये करतोय की तिथेच कुठेतरी आत घर करुन दडून बसतो याचा अजून स्पष्ट पुरावा मलाही मिळालेला नाही. पण तो आहे आणि अधूनमधून येऊन (किंवा दडलेल्या जागेतून बाहेर येऊन म्हणू हवतर) नासधूस करुन जातो हे नक्की.

अर्धवट कुरतडून ठेवलेले कागदपत्रं, फ़ाईली इतकच काय पण डस्टबीन मधल्या फ़ेकून दिलेल्या वस्तूंनाही चावे घेऊन करुन ठेवलेला पसारा यावरुन तो स्वत:च अस्तित्व दाखवून देतोय पण लेकाचा हाती काही लागत नाही.

इथे तिथे नेटवर वाचून रॅट किलर आणून ठेवून पाहीलं पण काहीही झालं नाही. सापळा पण आणला विकत. त्यात त्याच्या आवडीच्या "चीज वस्तू" ठेवून त्याला पकडायचा प्रयत्नही करुन पाहीला. पण अहं! स्वारी काही बधली नाही. कुरतडणं आपलं चालूच. सगळी कागदपत्रं, महत्वाच्या वाटणाऱ्या फ़ाईल्स सगळं सगळं कडी कुलपात ठेवायला सुरवात केली. पण अशाने गोंधळ व्हायला लागला फ़ार. एक चिटकोरा कागद काढायलाही सिक्युरिटी चेकिंग पार करत जायचं यानेच जीव उबला पार. बरं, या उपायाने कुरतडणं कमी झालं का? तर नाहीच. पठ्ठ्या, कुठून मार्ग शोधायचा काय माहीत? पण त्याने तिथेच आतच कुठेतरी बीळातून भुयारी मार्ग केला असणार असं शेवटी शेवटी वाटायला लागलं मला.

मांजरही पाळून बघीतली पण हाय रे कर्मा तिने दुधाचं पातेलं त्यातल्या सायीसकट साफ़ केलं पण उंदराच्या वाटेलाही गेली नाही. बहुतेक तिचा चातुर्मास संपला नसावा. पण पुन्हा एन्ड रिझल्ट काय? तर तो उंदीर व्यवस्थित बागडत राहीला आणि दिसेल ते कुरतडत मला छळत राहीला. मी मारे रिझोल्युशन केलेलं की उंदराच्या भीतिला बाटलीत बंद करुन समुद्रात फ़ेकून देईन पण त्यादिवशी तो दिसला तेव्हा हातात काठी असूनही मी टूणकन उडी मारुन पलंगावर चढले ते तो वाकुल्या दाखवून दिसेनासा होईपर्यंत तिथेच होते. कोणी म्हंटलं पेस्ट कंट्रोल करुन घ्या तर ते ही करुन बघीतलं . तात्पुरतं दोन चार दिवस सगळं आलबेल वाटलं पण परत येरेमाझ्या मागल्या सुरूच.

त्यादिवशी मात्रं वाटलं वर्ष संपत आलं. आज तर वर्षाचा शेवटचा दिवस. उद्या नवीन रिझॉल्युशन करण्याचा दिवस मग किमान आजतरी जुनी रिझॉल्युशन पुर्ण व्हायलाच हवी. त्याला हुडकायचं ठरवून सगळे कानेकोपरे तपासले. शेवटी तो एका अगदीच सामान्य जागी (म्हणजे अडीअडचणीच्या नसलेल्या अशा जागी) दिसला. बहुतेक मी काहीच करत नाही म्हणून कॉन्फ़िडन्ट झाला होता तो. म्हंटलं या ओव्हरकॉन्फ़िडंट उंदराला आत्ताच ठीक करु. अजून आजचा दिवस आहेच रिझॉल्युशन प्रुव करायला. मग काय? सगळा जोर एकवटून ती काठी हाणली आणि दिला फ़ेकून त्याला बाहेर.

त्यादिवसापासून माझ्या मनात बीळ करुन राहीलेल्या आणि मनाला कुरतडणाऱ्या त्या उंदरापासून मला मुक्ती मिळाली.

हे एकमेव न्यु इयर रिझॉल्युशन असेल जे माझ्याकडून पुर्ण झालं.

बिंगो! म्हणत मी ३१ डिसेंबर २०१५ चं पान उलटलं डायरी बंद केली आणि २०१६ च्या नवीन कोऱ्या करकरीत डायरीचं पहीलं पान उघडलं

आई घरी जाताना..

नजर बोलते आणि नजरेची भाषा
नजरेला अगदी सहज वाचता येते
पण कधीकधी नजर जे वाचते, ते शब्द
ओठांवर येऊ नयेत आणि मनातही झिरपू नयेत वाटण्याचे क्षण येतात
आज असाच एक क्षण आला
माहेरपणाला आलेली आई आज घरी निघाली
मी पाया पडले, तिने डोक्यावर हात ठेवला
मी उठताना म्हंटल, "तब्येतीची काळजी घे. औषधपाणी वेळेवर घेत जा."
माझं वाक्य पुरही व्ह्यायच्या आत तिचे डोळे बोलू लागले. म्हंटल तर तसा दरवेळचाच सीन हा पण दरवेळी आधीच्यापेक्षा जास्त पोटात तुटतं. ती घराबाहेर पडताना दिसेनाशी होईपर्यंत दहावेळा मागे बघते तेव्हा नजरेत साठवण्याची धडपड जीवघेणी असते.

मी परत ये म्हणते तेव्हा हो म्हणण्याच्याही आधी ती जे पुसटसं हसते ते नको वाटतं.
अशावेळी वाटतं हसणं, बघणं वाचता येणं आणि नि:शब्दाचे अर्थ कळणं हा शाप आहे.

मग मी जरा मोठ्यानेच घरात बघून सांगते लेकीला, नवऱ्याला, "आज्जी येणार आहे पुढल्या महिन्यात. सांगून गेलेय तसं"

Looks are deceptive. Don't b so judgemental


समुपदेशकाच्या रुमबाहेर आमचा नंबर यायची वाट बघत बसलेली मी आणि माझ्या आधी त्याच्या बहिणीचा (बहुतेक बहीण किंवा सोबत असलेली मुलगी म्हणू) नंबर असल्याने ती बाहेर यायची वाट बघत बसलेला तो आणि मुलीची आई.

तो केसांची विचित्रशी स्टाईल, ढॅंचिक टिशर्ट, एकाच कानात इयररिंग, हातात कडं एकूणातच पेहराव रहाणी स्टाईल ही नाक्यावर जमणाऱ्या टपोरी युवकाची

तिला बाहेर यायला वेळ लागल्याने आई थोडी अधिक अस्वस्थ. या पार्श्वभूमीवर तो आईशी बोलतोय.

अगदी बाजूलाच बसल्याने नाही म्हंटल तरी कानावर पडतय संभाषण आणि जे काही ऐकू येतय ते संभाषणात खेचून घेणार आहे

तो : आई ती चांगली आहे तू नको काळजी करु. जस तापाला औषध घेतो तसच हिथ घेतोय. बरी होणं महत्वाच. लग्नाची घाई नका करु तिच्या. येव्हढच आहे तर बाबाना सांग बाकीच्या दोघींची घ्या करुन. बरी होऊदेत हिला मग हिच करु. आता फोर्सपण नका करु. बरी झाली ना की सगळं आयुष्य आहे. बरी होणं महत्वाच आहे, लग्न नंतर पण होईल.

विषय इन डिटेल काय असेल ते असो पण त्याच समजूतदारपणे विचार करणं, तो विचार नेमक्या शब्दात समजावून देणं हे फारच भावलं मला.

त्याच बोलणं ऐकल्यावर 'टपरीवरचा छपरी' नाव मनात का होईना दिल्याबद्दल माझी मीच खजील झाले.

Looks are deceptive. Dont b so judgemental पटलच एकदम

तुम्ही फक्तं हेच करा!

अपघात झालाय?
मोर्चे काढा
काळी फीत लावा
मेणबत्त्या जाळा
बंद पुकारा
काहीही करा पण,
अपघात 'इश्यु' एन्कॅश करा

विरोधक असाल तर ?
सरकारवर खापर फोडा
आणि सरकारात असाल तर ?
इस्पितळात जाऊन हात जोडा
हे करा किंवा ते करा
काहीही करा पण,
अपघात 'इश्यु' एन्कॅश करा

सनसनाटी बातमी घेऊन
तुम्हीही टीआरपी वाढवा
पार चिपाड होई पर्यंत
तुमचं गुऱ्हाळ चालवा
असलेल तर दाखवाच
पण नसलेलही दाखवा
काहीही करा पण,
अपघात 'इश्यु' एन्कॅश करा

सामान्यांनो तुम्ही रडा, चीडा
पोस्टी पाडा, कविता करा
चार दिवस तावातावाने
'अपघात' चघळा
स्पिरीटच्या नावाखाली
सगळच ढकला आणि
कामाला लागा
तुम्हीही असच करा
अपघात इश्यु एन्कॅश करा

करु नका फक्त एकच
स्वत:ची जबाबदारी ओळखत
शिस्तीचा अंगिकार