बुधवार, ६ ऑक्टोबर, २०१०

मळभ

बर्‍याच दिवसांचं साचलेपण मनभर पसरुन राहिलेलं. तिने तसच स्वतःला रेटत यांत्रिकपणे सगळी कामं उरकली. रोजच्या शिरस्त्याने पुस्तक हातात घेऊन, काल ठेवलेलं खूणेचं पान उघडून वाचायला सुरुवात केली. जेमतेम एक पान संपवलं आणि अस्वस्थ होऊन पुस्तक तसच हातात ठेवून, डोळे मिटून मळभ दूर होण्याची वाट बघत खुर्चीत पडून राहिली.

फोनच्या रिंगने जाग आली, तेव्हा "आई गं!" म्हणत, खुर्चीच्या हातावर स्वतःच्या एका हाताचा जोर देत, दुसरा हात डोळ्यावर धरत वातावरणाशी अ‍ॅड्जस्ट होत ती उठली आणि इतका वेळ एकाजागी अवघडून झोपल्यामुळे पायाला आलेल्या मुंग्यांमुळे अडखळत फोनपाशी गेली.

फोनपाशी जाता जाता एक नजर सोफ्यावर बसल्या बसल्या डुलकी लागलेल्या अभय कडे गेली. "टिव्ही बघता बघता झोप लागली वाटतं ह्याला!"

टिव्हीचं बटण बंद करता करता फोनपाशी जात मनाशी आलं "तब्येत तर ठिक आहे ना ह्याची, अशी अवेळी कधी झोप लागत नाही एरव्ही?"

फोन झाला की बघुयात म्हणून रिसीव्हर उचलून कानाला लावला आणि पलिकडुन नेहमीचाच वहात्या झर्‍यासारखा आवाज कानावर पडला "हाय आई! मी बोलतेय"

"हम्म!" इथुन नुसताच हुंकार.

तिकडे वहात्या पाण्याचा खळखळाट तर इथे साचलेपणातनं आलेलं शेवाळं, तुलना करायला एक सेकंदही लागला नाही मनाला.

"आई, तुम्ही दोघं जेवलात?" पलिकडून पुन्हा एकदा आवाज आला.

उत्तर द्यायला तिने तोंड उघडलं आणि जाणवलं...घसा सुकलाय कधीचा. तसाच आवंढा गिळून तिने विचारलं "आजपण उशीर होणारे तुला?"

"हो... म्हणजे... जरा काम आहे आई, पण तुम्ही जेवून घ्या. माझी वाट बघु नका"

"बरं" असं म्हणेपर्यंत पलिकडून फोन कट पण झालेला.

ती तशीच बसून राहिली रिसिव्हर हातात धरुन, तिथून उठायची देखील शक्ती नव्हती आत्ता तिच्यात.

"काय होतय नेमक?"

तेच तर कळत नव्हतं ना तिला. कसला असा काळोख मनभर पसरला होता, कोण जाणे.

"आई, रिटायरमेंट जवळ आलेय ना तुझी म्हणून असं वाटतं तुला" लेकीने दहा हज्जार वेळा ऐकवलेलं वाक्य पुन्हा एकदा मनात घुमलं.

"खरच?" तिने स्वतःलाच प्रश्न केला, उत्तराची अपेक्षा न करता. आजकाल स्वतःपाशीही बोलायचा कंटाळा यायचा तिला.

तिला आठवलं, पुर्वी ती किती बोलायची.. भरभरुन बोलायची. समोरच्याच्या एका वाक्यावर तिची कमीत कमी पाच वाक्य तरी असायचीच. त्यावरुन तर बर्‍याचदा बापलेक दोघेही चेष्टा करायचे तिची. कोणी नसेल बोलायला तर स्वतःपाशीच बोलायची, इतकी ती बोलघेवडी होती. आणि आज? आज तिला स्वतःशी देखील संवाद नकोसा वाटत होता.

तिने बाहेर नजर टाकली. बाहेर अजुनच अंधारुनच आलेलं. पण नुसतच झाकोळलं होतं. भरलेलं आभाळ रिकामं काही होत नव्हतं.

टाचणी लागावी आणि फुगा फुटावा तसं आभाळ फुटून जावं, इतकं की त्याच्या बरोबर मनभर पसरलेलं हे मळभ देखील वाहून जावं असं एक क्षण वाटलं तिला.

सवयीनेच बाहेर नजर गेली. बाहेर अंगणात साळुंक्यांची जोडी दाणे टिपताना दिसली. पुर्वीच्या म्हणजे फार पुर्वीच्या ऐन तारुण्यातल्या तिने, अशी साळुंक्यांची जोडी बघून फिंगर्स क्रॉस करत त्याला ऐकवलं होतं 'टू फॉर लव्ह" आणि त्याने "वेडुबाई" म्हणत मारलेली टपली हळूच बोटांचा क्रॉस सोडुन मुठीत घट्ट धरुन ठेवली होती. पुढे बरीच वर्ष ह्या एका टपलीसाठी ती हे वाक्य त्याला ऐकवायची. पण आज तो बाजुला येउन उभा राहिल्याचही कळलं नाही तिला. मळभच कारणीभुत दुसरं काय?

"वादळ येइलसचं वाटतय, वारा पण सुटलाय. खिडकी लावुन घ्यायला हवी" त्याचं वाक्य तेव्हढं कानावर आलं.

"हम्म! वादळाचीच तर वाट बघतेय केव्हाची" तिने मनातल्या मनात म्हंटलं तरीही खिडकी घेतलीच लावून.

"मनूचा फोन होता? आजपण उशीर होणार म्हणालेय का?" त्याने विचारलं तशी त्याच्या प्रश्नावर कळेल न कळेलसा होकार देत ती आत जायला वळली.

"पाऊस पडला तर बर होईल ना! असा पाऊस कोसळावा की सारी तगमग दूर व्हावी आणि अशा पावसात तुझ्या हातची गरमा गरम भजी खावी.. अहाहा! स्वर्गच जणु. व्हावी आणि खावी... काय जुळतय का यमक तुझ्या भाषेत?" त्याने मुद्दाम चिडवत विचारलं. त्याचं चिडवणं फुकट गेलेलं बघून त्याने पुन्हा विचारलं "मग आज काय बेत आहे म्हणायचा?"

पुर्वी त्याच्या ह्याच प्रश्नाने उखडत "हे काय हॉटेल आहे का, नेहमी नेहमी वेगळे वेगळे बेत असायला?" असा प्रति टोला केलाच असता तिने. पण आज ती फक्त येव्हढच म्हणाली "काही विशेष नाही, नेहमीचच आहे. काही हवं होतं का वेगळं?"

"नाही नको, मनू आल्यावर जेवायलाच बसुयात" त्याने तिच्या मागून स्वयंपाक घरात येत म्हंटलं.

"नको, तिला उशीर होणारे. तिने जेवून घ्या म्हणून सांगितलय" तिने आमटीचं पातेलं गरम करायला ठेवत म्हंटलं.

"बरं वाटत नाहीयो का तुला?" त्याने विचारलं.

"नाही ठीक आहे" तिने आयुष्यात पहिल्यांदाच एका वाक्यात उत्तर दिलं असेल.

"ऑफिसमधे काही टेंशन आहे का? की मनूच्या लग्नाचं टेंशन घेतलयस?" "का रिटायरमेंट नंतर काय ह्याचं टेंशन घेतलयस तू?" त्याने कधी नव्हे ते वक्त्याची भुमिका घेत विचारलं.

"नाही रे तसं काही नाही आणि तशीही मी कुठे असणारे रिकामी. असतील की व्यवधानं पाठीमागे बरीच." तिने बर्‍याच वेळाने एक मोठ्ठं उत्तर दिलं त्याला.

"मग?" त्याच्या प्रश्नावर ती पुन्हा गप्प.

तिलाच कळत नव्हतं तर ती त्याला काय सांगणार होती?

कंटाळा... पुर्ण अंगात भरला होता, बाहेर जसा अंधार व्यापुन राहिलेला तसा. काय होतय? काय खुपतय? ह्याचा विचार करायचा देखील कंटाळा आलेला तिला.

"थोडे दिवस कुठे तरी फिरुन यायचं का? थोडा बदल झाला की बर वाटेल तुलाही" त्याने विषयाला वाट फोडायचा प्रयत्न करत म्हंटलं.

"मी काय विचार केला नाहिये का पुर्वीच ह्या शक्यतेचा?" तिने स्वतःच्याच मनाशी चिडून घेत मनातच म्हंटलं. बाहेर फक्त त्यातलं "नको, इथेच बरं आहे" इतकच उमटलं.

त्याची तिला बोलतं करायची धडपड तिला कळायची, पण बाहेर कुठेही जाण्याने काहीही होणार नाही ह्याबद्दल तिची पक्की खात्री होती. हे साचलेपण आजचं नव्हतं, रिटायरमेंटशी ह्याचा तसा काही संबंध नव्हता. अगदी पुर्वीपासून अधुन मधुन तिला वाटायचं "सगळं व्यर्थ आहे. कशालाच काही अर्थ नाही. आयुष्याचा प्रवास घडत गेला काय आणि आपण आखुन घडवला काय, दोन्ही शेवटी सारखच मिथ्या. पुन्हा बाकी शुन्यच. त्यापेक्षा गणित मांडणं नको आणि कसली समिकरणच नकोत."

तिला आठवले हट्टाने स्वतःला हवेत तसे आखून चाललेले काही क्षण. आठवले काही मिळवल्याचे...काही गमावल्याचे क्षण. त्या त्या वेळी कधी जिंकल्यासारखे.... कधी हरल्यासारखे वाटायला लावणारे क्षण.

पण तेव्हा हरल्या नंतर जिंकण्याची आशा होती. आता कळत चाललय, ते हरणं काय आणि जिंकणं काय दोन्हीही एक बुडबुडाच शेवटी. खरा आहे तो फक्त अंधार, आत बाहेर दोन्ही कडे पसरलाय तसा.

"ही नैराश्येची लक्षणं आहेत का?" तिला विचारांनीच दमायला झालं.

पण नाही ही नुसती निराशा नाही. हे त्यापलिकडचे काही आहे. Nothing is true वाटायला लावणारं. आपण करतोय ती कामं, जगतोय ते जगणं, हसणं...रडणं, घडणं .... घडवणं सगळच.. का? कशासाठी? हा प्रश्न विचारणारं आणि त्याचच उत्तर सापडत नाही किंवा शोधायची ताकद आणि इच्छा दोन्हीही नाही म्हणून मनाला आलेलं हे मळभ. ते कसं दूर होणार जागा बदलण्याने? ते तर आत आहे, मनात खोल. कुठेही गेलं तरी सोबत करणारं. काही काळ मनाला चकवा लागतही असेल अशा उपायांनी, पण त्याचा फोलपणा कळल्यावर मग काय? एक मिलीसेकंद देखील आपल्या मालकीचा नसतो हेच खरं.

गेल्या आठवड्यात उषा म्हणाली होती "सुंदराबाईला गार्डनचा सेल लागलाय, लंच मधे जाऊन येऊ"

"घरात इतक्या साड्या पडल्यात की त्याचाच सेल लावायची वेळ आलेय" तेव्हा तिला ऐकवलं होतं.

"चल ग! तू विकत काही घेउ नकोस. नुसती बघायला चल. नविन कपड्यांचा वास मनात भरुन घ्यायला चल." तिने आग्रहं करत हो म्हणायला भाग पाडलं होतं ते आठवलं आणि त्याच्याबरोबरीने तिला पॅरेलिसिस झाल्याचा फोन आल्यावर अडकलेला श्वासही आठवला जसाच्या तसा .

"असं कसं होईल, काल तर आम्ही ठरवत होतो सेल बघायला जायचं? ह्या प्रश्नाची टोचणी संपत नव्हती.

"मला मरणाची भीती वाटतेय का?" तिच्या मनात पटकन चमकून गेलं. "हे मळभ त्यामुळेच तर नव्हे?"

"नाही तसं नसावं. म्हणजे भीती तर असतेच की मनात कुठेतरी दडलेली, पण ही नुसत्या मरणाची भिती नाही. ही हतबलता, अस्वस्थता वेगळी आहे. पुढच्या क्षणाचं चित्र मला माहित नाही. त्यावर माझा कंट्रोल सोडा पण त्याचा साधा अंदाजही मला नाही, ह्यातून आली असावी कदाचित ही भीती.

पुढचा क्षण माहित नाही, गेलेला क्षण येव्हढच काय जाणारा क्षण देखिल पुर्णपणे माझा नव्हता. मी काहिही केलं नाही तरी आला दिवस संपणार आहे. पुढला क्षण यायचा तसाच येणार आहे. मग मी आत्ता पर्यंत केला तो प्रवास नक्की काय होता? मी काहीच केलं नाही? जो प्रवास केला तो झाला, इतकच? इतके दिवस "माझा माझा" पसारा म्हणत होते, त्याचं काय? मी काय करतेय? कशासाठी? आणि का?

ह्या का? का? आणि का? ची आवर्तनं संपत नव्हती.

डोळे मिटून ती विचारांच्या बरोबर फरफटत राहिली. तेव्हढ्यानेही दमली. हवा अजूनही तशीच होती.

"आई झोपलेय का बाबा?" दुरुन कुठुनतरी मनुने विचारल्या सारखं वाटलं का भास झाला? कुणास ठावूक.

रात्रीचे किती वाजलेत ठावूक नाही. जेवली असेल का मनू नीट? पांघरुण तरी घेतलय का बघायला हवं, गारवा वाढत चाललाय. मनाला ह्या विचारांच्या गोंधळातही जाणवलं.

"आई, तशीच झोपलीस ना अवघडुन? बाहेर गारवा वाढलाय" धडपडत उठणार्‍या शरिराला मनू अंगावर घालत असलेलं पांघरुण जाणवलं.

पांघरुणाच्या उबेत विरघळून जाताना वाटलं "सगळं मिथ्या वाटत असताना ही मधेच कोणती उब हविशी वाटते? धरुन ठेवावीशी वाटते? ज्याने अंधार पुर्णपणे संपला नाही तरी आता त्याची भिती कमी झाल्यासारखी वाटतेय?"

बहुतेक टाचणी लागून फुगा फुटलाय आणि आभाळही कोसळतय मोकळं होऊन.