बुधवार, ६ जुलै, २०११

अडाण्याचा गाडा (आधार कडून साभार)

आमच्या तात्याने (तात्या म्हणजे आमच्या ऑफिसचा हेड माणूस) "सोशल रिस्पॉन्सिबिलिटी" ह्या नावाच्या विषयावर आम्हाला आमचा चहा थंडं होऊन त्याचं कोल्ड ड्रिंक मधे रुपांतर होईपर्यंत (ह्यात अजिब्बात अतिषयोक्ती अलंकार वापरलेला नसून ते एक दुर्दैवी सत्यवचन आहे) व्याख्यान दिल्याने आमच्या समोर पाण्यात उडी मारण्यावाचून गत्यंतरच नव्हतं. तसं केलं नसतं तर विकांता नंतरचा सोमवार पुन्हा एकदा अमृत तुल्य चहा नावाचं शीतपेयं पिण्यात घालवावा लागला असता शिवाय आमचा पुन्हा एकदा तास दोन तास खडा पारशी झाला असता ते वेगळच.

गेल्या वेळी त्याने "मतदान केलच पाहिजे" ह्या विषयावर बौद्धिक घेतलं होतं पण एकाच वेळी साईट विझिट ती ही परगावची आणि आमच्या गावातलं मतदान कसं करायचं हे मात्र सांगायचं शिताफीने टाळलं होतं. नाही मतदान हे केलच पाहिजे हे आम्हालाही मान्य आहेच आणि ते आम्ही करतोच करतो पण त्यात्याचं व्याख्यान इतकं कशाने तरी भारलेलं असतं ना की आम्हाला नेहमी वाटतं वोटर्स कार्डची योजना राबवणार्‍या आणि आमच्या सारख्या सामान्य माणसांचे कार्ड चुकीचे छापणार्‍यांना एकदिवस तरी तात्याचं व्याख्यान ऐकायला लावलं पाहिजे.

ह्यावेळी त्याला व्याख्यान द्यायला "आधार कार्ड" चा आधार मिळाला होता. त्यापायी आमच्या शुक्रवारचा त्याने बट्ट्याबोळ केला होता. त्याच्या समोर "नो आर्ग्युमेंटस" त्यामुळे आम्ही "होयबा होयबा" चा गजर करत होतो आणि तो "टाईम्स ऑफ इंडीया" मधली जाहिरात दाखवून आम्हाला "सी हाऊ इझी थिस ऑल प्रोसिजर इज. डाऊनलोड द फॉर्म, टेक प्रिंट आऊट्स एन्ड गेSट इSट डSन - धीSस विकेंड. आय विल आस्क अबाउट धिस इन अवर मन्डे मिटिंग. टेक प्रिंट आऊटस फॉर मी अल्सो" असं एकेका शब्दावर जोर देऊन बोलत होता

"तुम्ही हे आत्ता पर्यंत केलेलं असेल अस मी समजत होतो. विकेंडस फक्त मजा मस्ती करण्यासाठी नाही देत कंपनी तुम्हाला. ही असली सामाजिक जबाबदारीची कामं पण करायची असतात वेळ काढून" वगैरे वगैरे चाऊन चोथा झालेलं वाक्य ऐकवून "नाऊ गो टू योर टेबल" म्हणत दम भरत आम्हाला गारढोण चहा प्यायला आमच्या डेस्कांवर पिटाळण्यात आलं.

वास्तविक गेले दोन्ही तिन्ही विकांतं तो त्याची कौटुंबिक जबाबदारी पार पाडत कुठेशी दूर देशी कडमडलेला आणि जाताना डेडलाईनची धमकी आम्हाला देऊन आमच्या प्रत्येक विकांतावर घाला घालून आम्हाला मात्र घाण्याला जुंपून गेलेला. जळ्ळा ही जाहिरात त्याच्याच कृपेने हाफिसात येणार्‍या पेपरात गेल्या आठवड्यातच वाचलेली आम्ही. ते फॉर्म पण डाऊनलोड करुन प्रिंट काढून रेडी होते. पण सायबाला कधी आपण त्याच्या आधी केलेली हुषारी दाखवून दुखवू नये हे तत्व वेळीच जाणल्याने आम्ही आपले "होयबा तुचबा खराबा" असं म्हणत बुगुबुगु करत पुढचा अर्धा तास गेल्या विकांतालाच डाऊनलोड केलेला फॉर्म तुमच्या सांगण्या बरहुकूम डाऊनलोड करतोय असं दाखवण्यात खर्ची घातला. आणि प्रॉम्प्ट्पणाची शाबासकीची थाप पाठीवर पाडून घेतली.

सोमवारला पुन्हा एकदा तो हा विषय छेडणार म्हणून विकांताला अगदी ठरवून ते काम करायचं पक्क केलं. त्याप्रमाणे भल्यापहाटे उठून सगळे डॉक्युमेंटस घेऊन एक सेंटर गाठलं. घड्याळात वाजले होते सकाळचे ९.३० म्हणजे आता युं युं म्हणत चुटकी सरशी काम करुन आपण मोकळे होऊ असं वाटून रांगेतल्या लोकांच्या "एऽ एऽऽ लाईन दिसत नाही का रे" म्हणणार्‍या गर्दीला न जुमानता चौकशी खिडकी शोधायचा प्रयत्न केला.

फॉर्म घेण्यासाठी असलेल्या रांगेकडे तु.क. टाकत आणि माझ्या हातातले आधीच भरलेले फॉर्म नाचवत गर्दीतून वाट काढत एकदाची खिडकी शोधण्यात यशस्वी झालो. चला म्हंटलं संघर्ष संपला. विकांत साजरा करायला आपण १०-१५ मिनिटात मोकळे. पण कसचं काय त्या खिडकीतल्या माणसाने माझे फॉर्म बघायचेही कष्ट न घेता तोंडातला गुटखा चघळत चघळत आणि त्याच्या त्या स्पेशल वासाने आम्हाला वांतीची उबळ आणत "हे इथे नाही चालायचे. आम्ही फक्त ह्याच सेंटर वरुन दिलेले फॉर्म ऍक्सेप्ट करतो" म्हणत मला फॉर्म सकट तु.क. टाकून बाजुला केलं.

"अहोSS पSण पेपर मधे तर पानभर जाहिरात आलेय छापून, चालेल म्हणालेत पेपरवाले नेट वरुन डाऊनलोड केलेला फॉर्म" असं म्हणायचा एक निष्फळ प्रयत्न करुन बघितला.

"पेपर मधे चालेल म्हनलय तर तुम्ही पेपरवाल्यांनाच विच्चारा. माझा टाईम नका वेस्ट करु. नेक्स्ट" असं म्हणत मला चक्क हाकलून लावलं.

"उद्या कधी येऊ मग साहेब?" असं जरा त्याला साहेब म्हणून हरभर्‍याच्या झाडावर चढवून विचारलं तर म्हणे "या ९ वाजता. ९.३० पर्यंत आम्ही काम सुरु करतो. ५० फॉर्म देतो एका दिवशी. रेशन कार्ड घेऊन या. तुम्हाला एक फॉर्म मिलेल मग तुम्ही फॅमिलीसाठी झेराक्स घ्या करुन"

"अहो पण झेरॉक्स चालत नाहीत ना?" मी उगाचच माझं तुटपुंजं ज्ञान पाजळत विचारलं.

"कोण म्हऽन्तं, आमच्या इथे चाल्तं" त्याने एका वाक्यात माझ्या ज्ञानाला मोडीत काढत मलाही मोडीत काढलं.

ठिक आहे ठिक आहे तू नही तो और सही असं मनात म्हणत आम्ही मोर्चा दुसर्‍या सेंटर पाशी वळवला. तिथेही नेटवाले फॉर्म चालणारच नव्हते. शेवटी "उद्या सकाळी नवालाच या आणि फॉर्म घ्या" असं म्हणून आमची बोळवण करण्यात आली.

दुसर्‍या दिवशी रविवारचा "बाजार" सोडून मोर्चा त्या सेंटर पाशी न्यावा लागणार ह्या विचारानेच मी हैराण झालो. करतो काय जावं तर लागणारच होतं नाहीतर पुन्हा एकदा सोमवारच्या मिटींग मधे आमचा उद्धार झाला असता.

रविवारची झोपमोड सहन करुन गेलो त्या "नवालाच या" म्हणणाऱ्या ठिकाणी. चुकून सिद्धिविनायकाला तर आलो नाही ना असं वाटून गेलं ती रांग बघून. पण नाही ती रांग त्या दिव्य आधारासाठीच होती हे लक्षात घेऊन आम्हीही रांगेत उभे राहिलो. उगाच काही रहायला नको आपल्या कडून म्हणून बरोबर ओरिजिनल रेशन कार्ड, पॅनकार्ड, इलेक्ट्रिकचं बील, टेलिफोनचं बील, कंपनी ओळख पत्र अशी यादीत लिहीलेली यच्चयावत कागदपत्र आणि त्या प्रत्येकाची अटेस्टेड फोटोकॉपी घेऊन गेलो जाताना. आता वास्तविक अटेस्टेड कॉपी न्यायची गरज नव्हती पण न जाणो ह्या सेंटरचा नियम असायचा तसा आणि घोडं त्यामुळे पेंड घायला नको म्हणून नेलं झालं. पण येव्हढा वेळ त्या रांगेत तिष्ठत उभं राहून जेव्हा नंबर आला तेव्हा कळलं "आज फॉर्म मिळणार नाहीत. आज फक्त नाव नोंदवून घेणार रेशन कार्ड बघून. फॉर्म घ्यायला दोन दिवसांनी यायचं" आता आली का पंचाईत. म्हणजे आता परवा त्या फॉर्म घेण्यासाठी एक सुट्टी टाकायची. मग पुन्हा एकदा तो भरलेला फॉर्म देण्यासाठी सुट्टी घ्यायची नाहीतर अजून एक विकांतं खर्ची घालायचा आणि हे सगळं होईपर्यंतं तात्याचं व्याख्यान ऐकायचं.

सोमवारी तात्याला हे सगळं ऐकवलं आणि सुट्टीचा अर्जही सोबत जोडून दिला तेव्हा वाटलं समदु:खी माणसा प्रमाणे त्याचा खांदा मिळेल रडायला आम्हाला पण कसचं काय सालं नशिब पण ना आम आदमी बघूनच रुसायचं धारिष्ठ दाखवतं. त्या तात्याचे नेटवाले फॉर्म ऍक्सेप्ट होऊन त्याला आधारवाली रिसिट पण मिळाली आणि आता घरपोच कार्ड पण मिळेल काही महिन्यांनी.

"तुम्हा लोकांना डिसिप्लीन माहीत नाही. एकाला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय असते ते कळत नाही. फायदा कळतो पण कायदा नाही" अशी जी तात्याच्या तोंडाची तोफ सुरु झाली ती आम्हाला खडा पारशी करुन आणि आमच्या वाफाळत्या चहाचे शीतपेयात रुपांतर करुनच शमली.

"जळ्ळा हा सगळा अडाण्याचा गाडा. ह्याचा नियम वेगळा नी त्याचा नियम वेगळा. उद्या अजून काही एक टूम निघाली की पहिला धडा पुसायचा नी नविन गिरवायचा. अजून पर्यंत वोटर्स कार्ड करेक्शन होऊन हातात मिळालेलं नाही. आधार कार्ड म्हणे प्रत्येकाला युनिक नंबर सकट मिळणार पण ते मिळवण्यासाठीची नियमावली युनिक नाही. ती मात्र राबवणार्‍या सेंटरगणिक वेगळी. एक म्हणतं फोटोकॉपी केलेले फॉर्म चालतात दुसरा म्हणतो चालत नाही. एक नेटवरुन डाऊनलोड केलेले फॉर्म ऍक्सेप्ट करतो तर दुसरा त्याकडे तु.क. टाकतो. येव्हढच काय चिडून जाऊन त्या युआयडी वाल्या वेबसाईटवर दिलेल्या कंप्लेट ऍट द रेट वाल्या इमेल आयडीवर पाठवलेलं कंप्लेंटचं इमेल देखील बाउंस होऊन आधार कडून साभार परत येतं." आमचा प्रोफेसर तावातावाने बोलत होता. (तो ही त्यात्यासारखा कधी कधी सुटतो आणि लेक्चर देतो म्हणून त्याला आम्ही प्रोफेसर म्हणतो)

आम्ही मग "आम आदमीच आम आदमीला आधार देगा" असा डायलॉग मारत त्याला आमचा खांदा रडायला दिला आणि त्याच्या "अडाण्याचा गाडा" आणि "आधार कडून साभार" शब्दांवर खुष होऊन त्याला कॅन्टीन मधला वाफाळता चहा स्वखर्चाने पाजून थंडं केला.