रविवार, १४ मे, २०१७

"हॅपी मदर्स डे!"

हिने तिचा डायपर बदलून थोडं स्पंजिंग केलं. लाळेरं बदलून चेहराही हलक्या हाताने टॉवेलने पुसून घेतला. पावडर लावून केस विंचरून जेव्हा तिला लोडाच्या आधाराने पलंगावर बसवलं तेव्हाचं तिचं हसू हिच्याही गाली उमटलं. तिचे हुंकार आणि त्याचे हिने लावलेले अर्थ यात चांगला अर्धा पा‌ऊण तास गेला. मग तिला खिमटी भरवून तोंड पुसून हिने थोपटून झोपवलं आणि न विसरता तिच्या भोवती लोड लावून ती पडणार नाही याची काळजी घे‌ऊन ही "मी टा‌ईम" म्हणत फ़ेसबूकवर गेली.

मदर्स-डे च्या शुभेच्छांनी भारलेल्या पोस्ट्स वाचून हिला जाणिव झाली की ही चक्क मदर्स-डे विसरली. लोडाला पाठ टेकवून झोपलेल्या तिला मग हिने हलकेच थोपटत विश केलं "हॅपी मदर्स डे!"