गुरुवार, ३१ डिसेंबर, २००९

मिशन ए इयर एंड - भाग ३

"ले गई दिल गुडीया जापान की
पागल मुझे कर दियाSS"
अशी गाणी कानात वाजायला लागताSSत....(इथे समजुन जा ह्या रावसाहेबांची समाधी लागलेय ) जेव्हा "ती" "लिफ्टवाली" कुडी परत एकदा माझ्या ऑफिसमधे येते.
लिफ्ट मधे माझ्या जापनीज नॉलेजची चिंधी झाल्याप्रसंगा नंतर मी जरा जपुनच असतो (होय होय तोच तो प्रसंग साल्यांनो मी विसरायच ठरवल तरी तुम्ही काही विसरु देत नाही ...आता मी माझ्या तोंडुन परत कशाला सांगायला हवय मी वेंधळेपणाने तिच्याकडे बघता बघता "कितवा मजला?" ह्या प्रश्नाचे उत्तर "२५" हा माझ्या वयाचा आकडा सांउन दिल ते?)
अ‍ॅक्च्युअली तो गोंधळ माझ्या जपानी नॉलेजचा नसुन त्या "मिचीकोच्या" सौंदर्यामुळे झाला होता हे मी आज तुम्हाला मोकळे पणाने सांगु शकतो..
नाही नाही मी अजुनही भावना दिक्षित वर तेव्हढच प्रेम करतो..पण म्हणुन काय इथे डोळे मिटुन राहु की काय २४ तास? आ! तुम्हीच सांगा? तुम्हाला नाही हक्काची बायको समोर नसेल.. तेव्हा शेजारणीकडे बघावस वाटत्...आ..आ..सांगा ना?.....मग्....तेच तर म्हणत होतो मी पण्...आणि अजुन भावनाला प्रपोज कुठे केलय्...? तिने नाही म्हंटल तर.....किंवा त्याआधीच मामा बनवल तर्...तर दुसरा काही ऑप्शन नको? का देवदास बनुन फिरायच मी?
आज तुम्हाला हे सांगायच कारण म्हणजे त्या "लिफ्ट" प्रसंगा नंतर २-३ वेळा आमची "सहजच" "अचानक" अशी भेट झाली. कधी पार्किंग लॉट मधे......कधी मॉल मधे हातमोजे घ्यायच्या निमित्ताने.....अरे हो सांगायलाच विसरलो....ती फोटोग्राफी शिकतेय आणि विकेंडसना मॉलमधे सेल्स गर्ल म्हणुन काम करते..
हाय हॅलोच काय... नाव, गाव, शिक्षण, काम इथपर्यंतची कुंडली मिळवण्याइतपत ओळख झालेय आमची. आज तिने महत्त्वाच बोलायचय असा फोन केला आणि तेव्हा पासुन मी एकदम म्हणजे एकदम सातवे आसमा पर म्हणतात तसा अगदी मनातल्या मनात "चांदी की सायकल सोनेकी सिट आओ चले डार्लिंग चल्ले डब्बल सिट.." म्हणुन बघितल तिच्याबरोबर्....बरोब्बर ओळखलत्...देशात माझ्याकडे फोर व्हिलर आहे, इथेही मी घेतलेय नुकतीच गाडी तरी का कुणास ठावुक अगदी सर्वात आधी प्रेमाची खुण म्हणुन मला सायकलच आठवते.....लहान पणी भावना आणि मी भाड्याची सायकल आणुन एक राऊंड तू चालव एक राऊंड मी अस करुन शिकलोय ना...नाही नाही भलत्या शंका आणु नका मनात्...तेव्हा डबल सीट शक्य पण नव्हत घेण......पिताश्रींनी आधी मला आणि मग सायकलला मोडल असत असे काही दिवे लावले असते तर...
तर असो....ती आली...मिचिको....आम्ही दोघे...कॉफि शॉप्......आणि....
आणि तिने सांगितल्....हाय..! स्स्स...
"साSSरे खिलौनेSS कांचके निकलेS छन से टुट गये...."
असं काय झालं म्हणता? ऐकाच...
"तिला आणि तिच्या पार्टनरला म्हणजे "तिच्या गर्लफ्रेंडला" (येतय ना लक्षात मी कोणत्या शब्दावर जोर दिलाय ते?) भारतात यायच होत फोटो एक्झिबिशन च्या कामानिमित्त पण तिच्या गर्लफ्रेंडला म्हणे दुसरी असाईममेंट असल्यामुळे....यु नो...दॅट ...ईट इज नॉट पॉसिबल फॉर हर टु जॉइन मी...." इती मिचीको..
म्हणुन मी भारतात चाललोय ह्याचा सुगावा माझ्याच बडबड करण्याच्या सवयीमुळे लागल्याने तिला माझ्याबरोबर भारतात यायच होत....हे महत्त्वाच सांगायला ही बया इथे आली होती.."
"आता आली का पंचाईत्.....तिला नेल तर भावना मला उरला सुरला भाव पण देणार नाही वर आणि आईला वेगळीच शंका येणार् जापनीज मुलीशी सुत जमवल म्हणून्....ही भावना पण सुता वरुन स्वर्ग गाठणार आणि माझ आयुष्य ह्या दोन्ही बायका मिळुन नरक करणार्........."
अर्थात घरी हे अ‍ॅडिशनल लगेज येतय हे कळवायला तर हवच ना...
"आई... हॅलो....."
"हॅलो केद्या अरे येतोयस ना ३१ ला घरी....आपल्या आर्य रत्न मधे ह्यावेळी खुप धमाल कार्यक्रम ठेवलेत्...सगळे तुझी वाट बघतायत येतोयस म्हणुन..."
"आई....हो...येतोय्...अग.....ऐक...."
"हो...अग केव्हढ्यांदा ओरडलीस्....आल्यावर सांगतो सगळ्.....अग गप्प उगाच तारे नको तोडुस्....ठेवतो फोन...."
----------------------------------
मिचिको च्या बरोबर येण्याची खबर आणि आईची नाराजी सगळ्या सोसायटीभर झाल्याने आमच्या स्वागताला भावे फॅमिली (केवळ माथेरानला गेल्यामुळे) सोडतास बाकी झाडून सगळी कुटुंब गॅलर्‍या अडवुन उभी होती. भावनाने नाक उडवुन "हम्म गेलास उडत" असा एक कटाक्ष फेकला....च्यायला हे तर घर बसनेके पहेलेच उजड गया टाईप झाल...
आम्ही आल्या आल्या सगळे अगदी सत्यनारायणाला जोडीने याव तसे येऊन गेले...माझी विचारपुस कमी....मिचीकोची जास्त... खरतर तिचीच चौकशी करायला आलेल सगळे....
मल्ल्या ने तर मला डायरेक्ट विचारल कोपच्यात घेऊन...."काय बे लफड काय आहे तुझं आ?"
"अरे लफड बिफड नाही रे बाबा....ही फोटो एक्झिबिशन साठी भारत कॅप्चर करायला आलेय्...आणि तिची "गर्लफ्रेंड" (मी मुद्दाम ह्या शब्दावरचा जोर वाढवत म्हंटल) सध्या परदेशात आहे"
"गर्लफ्रेंड? च्यायला येव्हढी सुंदर मुलगी आणि तिला बॉय नाही मिळाला काय कोणी?"
"मल्ल्या जाऊ दे ना च्यायला......ती गेली खड्यात, तू माझा प्रॉब्लेम समजुन घे ना बाबा. मित्र माझा आहेस का तिचा? भावनाला कस समजवायच त्याचा विचार कर.."
"ओके पण मग हे आधी नाही का सांगायच बे?"
"मल्ल्या साल्या गळयात बोर्ड घालुन फिरतो आता......तिथे एक साल भावनाने पण टाळक सटकवलय्...तू विचारलस तरी तुला सांगायला....ती तर समोर पण येत नाही.....माझ तर पार तेल गेल तुप गेल हाती राहील धुपाटण तस झालय रे बाबा"
"अरे हसतोस काय? उपाय काढ साल्या काहीतरी शोधुन्.....तुला केली होती ना मी मदत तू "बॅचलर्स" पार्टिचा घोळ घातलेलास तो निस्तरायला..."
"अबे साल्या काही पण ताणु नको....मी कधी केली बॅचलर्स पार्टी...हा बे....जरा थोडी सरबतांची पार्टी केली तर लगेच ती बॅचलर्स पार्टि होते होय रे चोरा..."
"बर बर मला काय ते सोडव ह्यातुन्....उगा तुझ दळण नको दळु..."
"ओके! आज तू घिस्यापिट्या मार्गाने का होईना भावनाला प्रपोज करायच बाकी मी सांभाळतो..."
-----------------------------------
प्रत्येक जण आपल आपल मिशन घेऊन ३१ च्या रात्री गच्ची वर जमल...
मिचीको बाईंना साडी नेसायची होती म्हणुन खास बर्वे काकु म्हणजे केदारच्या आईने ही जबाबदारी यंग पिढीवर म्हणजे भावनावर सोपवली.....आत्ता पर्यंत भटक भवानी भावना असाच उल्लेख करणार्‍या काकुंना तिच्यात एकदम भारतीय नारी...सोज्वळ युवती...दिसायला लागली...(हा मिचीको नावाच्या जापनीज भुकंपाचा इफेक्ट होता हे कळलच असेल तुम्हाला)
भावनाला देखील ही कोण चेटुक करणारी चिको का फिको बघायचीच होती म्हणुन तिने पण हे काम लागलीच अंगावर घेतल नी स्वतःची एकमेव आवडती साडी तिला नेसवुन द्यायच कबुल केल.....
"तू तू मै मै" ह्या एकमेव चॅनल तर्फे हा वृत्तांत खास तुमच्यासाठी
कपल साठीच्या स्पर्धा सुरु झाल्या नी प्रत्येकाची एकच धडपड सुरु झाली....
फुगे फुगवायचे आणि फोडायचे स्पर्धेत अस्मिता आणि अनिकेत पटवर्धन विजयी झाले (ह्याच कारण त्यांच्या मुलिचा नुकताच वाढदिवस झाल्याने त्यांना चांगलिच प्रॅक्टिस झाली होती)
गाजर सोलायच्या स्पर्धेत मात्र दिप्याने बाजी मारली आणि मधुची शिकवणी सार्थकी लावली
मटार सोलण्यात मात्र त्याला तेव्हढ यश आल नाही...स्पर्धेसाठी तात्पुरती तयारी केलेला आणि मुळात
"नेहमीच कामसु असा नवरा ह्यात फरक हा दिसुन येतोच" अस तेव्हढ्यातल्या तेव्हढ्यात बर्वे आजोबांनी म्हणजे केद्याच्या आजोबांनी बोलुन दाखवल. त्यांच्या वयाचा मान ठेवुन त्यांना कोणी फारस काही बोलत नाही...ह्याचा फायदा घेऊन ते बर्‍याचदा बरच काही ऐकवुन घेतात...
मटार सोलण्यात मात्र मल्ल्या म्हणजे श्री.मल्लेश्वर सोलापुरे विजयी झाले
तरुणाईसाठी म्हणुन अंतक्षरीचा कार्यक्रम ठेवलेला...तेव्हढाच चांन्स घेऊन भावनाने "माझिया प्रियाला प्रित कळेना आणि झुट बोले कव्वा काटे..." अशी गाणि गाऊन आपला संताप व्यक्त केला.
केद्यानेही "कहदो के तुम हो मेरी वरना....पासुन सुरुवात्करुन "हम आपके है कोन...." म्हणत भावनेला वाट करुन दिली...आणि दिलेल्या वाटेने आधी भावना मग केदार गच्चीमधुन हळुच सटकले नी चांदणे मोजायला ग्राऊंड वर आले...
इथे स्पर्धा रंगात आल्याने हि जोडगोळी पसार झाल्याचे मल्ल्या सोडताच कोणाच्याही लक्षात आले नाही....पण आधी केलेल्या मदतीला जागुन त्यानेही अळी मिळी गुप चिळी करायच ठरवल...
इरसाल खोटे नी "काड्या लावा" (म्हणजे एका मिनिटात जास्तीत जास्त काडेपेटीच्या काड्या लावायच्या) स्पर्धेत यश मिळवल.
महिलांच्या संगित खुर्ची स्पर्धेत कधी नव्हे तो मयुरी सरदेसाईंचा नंबर लागला आणि पुरुषांची स्पर्धा मात्र योगेश महेश्वरीने जिंकली
तृप्ती दोषी ने सुचवलेली चमच्याने पाणी पाजायची स्पर्धा मात्र धमाल झाली... पण विजेता/विजेती मात्र कोणीच झाल नाही
राजश्री डी ह्यांनी सुचवलेली स्पर्धा मात्र जेष्ठ कपल्स ना थोडी त्रासदायक ठरली..... दोरीची रींग स्पर्धकांनी म्युझीक संपायच्या आत डोक्यातुन घालुन पायातुन बाहेर काढुन पुढल्या स्पर्धका कडे पास करायची अस स्पर्धेच स्वरुप होत...पण जेष्ठ कपल्स पैकी बरेचसे हे "खाते पिते घरके" असल्यामुळे आणि बाकिच्यांचीही पोटं वयोमाना प्रमाणे सुटलेली असल्या मुळे रिंग डोक्यातुन गेली तरी कंबरेतुन सरकवताना कसरत करावी लागत होती.....तरिही ह्या स्पर्धेत जिंकायचा मान हा "किर्ती कात्रे" ह्या संतुर मॉमला मिळाला तो केवळ तिच्या योगा मेंटेन एक्स्ट्रा चपळ स्ट्रेंथ मुळे..
आता शेवटच्या स्पर्धेकडे सगळ्यांचे डोळे लागले होते...ती स्पर्धा म्हणजे..."श्री तशी सौ"
स्पर्धक असे होते
१. प्रदिप आणि मधु पोवळे
२. मल्लेश्वर आणि मल्लीका सोलापुरे
३. इरसाल आणि मोगरा खोटे
४. मयुर आणि मयुरी सरदेसाई
५. अभिनय आणि किर्ती कात्रे
६. चिंतन आणि शांता गोखले
७. हरिणी आणि योगेश महेश्वरी
तर एक...दोन्...तीन..म्हणताच ह्या जोड्या सज्ज झाल्या आपली नसलेली कॉम्प्यॅटिबिलिट दाखवायला.....
आवडता रंग...
पदार्थ....
सगळ्या सगळ्याची उत्तर बरोबर देत दिप्याने आखीर कार आघाडी घेतली...चला ह्या नविन वर्षाची सुरुवात तरी सुखाची होणार आणि इतके दिवस चाललेल्या ह्या ऑनालाईन परीक्षेत आपण चक्क बोर्डात चमकणार ह्या कल्पनेने दिप्याच विमान आभाळात गेल
कुणाला सांगु नकोस ह ह्या "कानगोष्टीच्या खेळात" जवळ जवळ सगळ्या जोडप्यांना हे प्रश्न माहित झालेले होते
त्यामुळे एखाद दुसरा पाठांतर कच्चा असलेला अपवाद वगळता सगळे तसे एक दोन गुणांनीच मागे पुढे होते....दिप्या आघाडीवर असला तरी सामना पुर्ण पणे त्याच्या ताब्यात नव्हता. भारता बरोबरच्या मॅच सारखच कधीही काहीही होऊ शकत होत
ह्यात पण पाठांतर करायला कमी लागाव म्हणुन इरसाल आणि मोगरा ने एकच आवडता रंग दोघांचा, एकच पदार्थ अस करुन पाठ केलेल
म्हणजे मोगराला निळा आवडतो तर इरसाल ला पण निळा
तिला मोदक आवडतात तर ह्याला पण मोदकच
म्हणजे पाठांतराचे श्रम तेव्हढे कमी.... जिथे कुठे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न होते तिथे दोघांनीही "ब" पर्याय निवडायच ठरवल होत.... म्हणजे चुकायच लफडच नको...पण त्यामुळे एक लफड झाल.....प्रश्न काहीही असो..उत्तर "ब" च द्यायच ठरल्यामुळे   "नवरा फ्लर्ट आहे का?" ह्या प्रश्नाला पण बिचारीला ....अ)नाही...ब) हो...........आणि "बायको आवडते की शेजारिण?" ह्या प्रश्नावर अ)बायको...ब) शेजारिण...
पर्याय काय निवडायचा हे आधीच ठरवल्यामुळे केवळ्.....नाहीतर.....
जाऊद्या मार्क तर मिळाले त्यांना
(पण नंतरच्या वादाची नांदी झाली ती झालीच...)
ऑब्जेक्टिव्हच्या राऊंडला बरीच करमणुक झाली तरी त्यात खोटे फॅमिलीने आघाडी घेतली...
बाकीच्या जोड्या म्हणजे चिंतन आणि शांता गोखले, किर्ती आणि अभिनय कात्रे. मयुर आणि मयुरी सरदेसाई ह्या त्यामानाने वयोवृद्ध जोडपी गटात मोडत असल्यामुळे मुळातच क्रमाने चिंतन, अभिनय आणि मयुर ह्या तिघांच्या आवडी निवडी ते स्वतःच विसरुन गेल्याने त्यांची पाटी फक्त (हे देखील क्रमाने) शांता, किर्ती आणि मयुरी ह्या (आप)आपल्या धर्मपत्नीच्या आवडीने भरली होती म्हणुन वेगळ्या पाठांतराची त्यांना गरजच नव्हती.....तेव्हा दिप्याची आघाडी लवकरच धोक्यात आली हे सांगायला ज्योतिषी नकोच...
आणि आघाडी जरी कोणीही घेतली तरी विजेते ठरवताना प्रेक्षकांच्या मताचा देखील ५०% मान राखला जाईल हे डिक्लेअर झाल्याने दिप्याच स्थान चांगलच डळमळीत झालेल्...आणि निकाल लावण्यासाठी जोडप्यांच्या चेहर्‍यावरुन स्पॉटलाईट फिरवण्यात आला. इथे विनरच्या चेहर्‍यावर लाईट थांबणार होता...
आणि .....मत आणि गुण अशी बेरीज होऊन "गोखले" दांपत्याला विजयी म्हणुन घोषित करण्यात आले....त्यांच्या घरचा गोतावळाच मोठा....४ भाऊ भावांची प्रत्येकी हम दो हमारे दो अशी फॅमिली...त्यातल्या दोन भावांच्या बायका म्हणजे बी विंग मधल्या सखी पार्वती...म्हणजे भावांच्या सासरच मत पण ह्यांनाच्...तेव्हा गुण कमी असले तरी मतांच्या आघाडीने त्यांनी शेवटी क्राऊन पटकावलाच
आता पर्यंतच्या स्पर्धांमधे प्रत्येक फॅमिलीला कुठे ना कुठे एक तरी बक्षिस मिळाल तरी जास्तीत जास्त स्पर्धा जिंकणार्‍याला "श्री व सौ आर्यरत्न" चा मुकुट मिळणार होता.....तिथेही टॅली झाल्याने ....शेवटी...नाईलाजाने केवळ्....मतांचा आधार घ्यावा लागला....आणि...बरोबर्....निकाल अपेक्षेप्रमाणेच लागला...
तरीदेखील शेवटी प्रमुख पाहुणे म्हणुन बसलेल्या श्री अंतू बर्वे आजोबांनी "बाळांनो, ह्या स्पर्धा महत्वाच्या नाहीत तर त्यानिमित्ताने तुम्ही एकमेकांना समजुन घ्यायचे केलेले प्रयत्न महत्वाचे आहेत बर. आता भांडा,रुसा हवे तेव्हढे पुढे जेव्हा एकटेपणा येतो तेव्हा भांडण्यासाठी का होईना सोबती हवा अस वाटत..." आणि अजुन बरच काही प्रमुख पाहुण्यांच्या "चार शब्द" ह्या नावाखाली स्वतःच्या वयाच्या मानामुळे ऐकवले. अर्थात "अनुभव" संमृद्ध करतो ह्या उक्ती प्रमाणे समस्त जेष्ठ नागरिक गटाने डोळे पुसत त्याला पावती दिली.
बाकिच्यांना देखील काही ना काही मिळालेच...जसे..
दिप्याच्या प्रयत्नांना दाद म्हणुन त्याला त्याच्या सासुबाई ऑनलाइन परीक्षेत पास म्हणुन डिक्लेअर केले.....इरसाल आणि मोगरा पर्याय निवडी वरुन वाद न घालण्याचा संकल्प केला.........आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे आजच्या प्रमुख पाहुण्यांच्या घरी नातसुन येण्याची चिन्हे "भावनेच्या रुपाने" सगळ्यांना गच्चीतुन खाली बघताना सोसायटीच्या गार्डन मधे दिसुन आली....
अशा रितीने प्रत्येकाच मिशन ए इयर एंड ह्या ना त्या रुपाने यशस्वी झालं
समाप्त.

सोमवार, २८ डिसेंबर, २००९

मिशन ए इयर एंड - भाग २

काही काही गोष्टी असतात ना त्या आपल्या पायावर धोंडा पाडुन घेण्यासारख्या वाटतात नंतर.. तर त्यातलीच ही एक...

घरी आमची श्वसुर की श्वशुर म्हणायच? जे काही असेल ते पण ती शुरही असतात आणि असुरही त्यामुळे काहीही म्हणा सारखच. त्यातल्यात्यात श्वसुर म्हंटल की मनातल्या मनात तरी त्यांना असुर म्हंटल्याच समाधान वाटत की नाही?.. हम्म म्हणुनच मी सोयीने श्वसुरच म्हणतो..

तर आमची श्वसुर मंडळी आमच्या घरी त्यांच्या "बाबीचा" म्हणजे माझ्या बायकोचा "मधुचा" आणि माझा म्हणजे "प्रदिप पोवळेचा" संसार कसा चाललाय हे बघायला म्हणजे एकुणात माझी बोर्डाची परिक्षा घ्यायला गेले १५ दिवस येऊन राहिल्येत.

अस्मादिक सकाळी लवकरची शिफ्ट असल्याने भल्या पहाटे ६.३० लाच घर सोडतात. त्यामुळे त्यांच्या लाडिक रत्नाला म्हणजे आमच्या "सौ." ना फार त्रास होत असणार लवकर उठुन डबा वगैरे करायचा अस दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी मत नोंदवुन, बोर्डाच्या परीक्षेतल्या पहिल्या प्रश्नालाच भोपळा देऊन माझ्या "ऑनलाईन" परीक्षेची सुरुवात झाली.

सौ. नी पण त्यांच्या "हा मधे हा" मिळवल्याने मी "डबा नको पण मत आवरा.." अस म्हणुन तसाच ऑफिसला गेलो त्यादिवशी.

शिफ्ट ४ ला संपते आणि मी नेहमीच ४.३० ते ४.४५ पर्यंत घरी पोहोचतो. तसाच "त्याही" दिवशी मनात बाहेरच वेळ काढुन घरी जायची आलेली उबळ मारुन घरी गेलो. बाहेर भल मोठ्ठ कुलुप स्वागताला..... च्यायला ही मंडळी गेली की काय? अस म्हणुन येत नाही तरी शीळ वाजवायचा फुटकळ प्रयत्न करुन झाला...माझ्या कडच्या किल्लीने दार उघडून आत आलो.. ...तर........हाय रे दैवा.... माझ्या साठी दाराच्या बाजुलाच असलेल्या टेबल वर एक चिठ्ठी ठेवलेली...वाण्याच्या बीलाच्या मागच्या बाजुला गिचमिड ह्या शब्दालाही लाजवेल अशा हस्ताक्षरात....
"उशीर होईल.. .सकाळचा चहा उरलाय... तो गरम करुन घ्या... सॉक्स इथे तिथे न फेकता बथरुम मधे भिजवुन ठेवा....सखुबाई आज उशीरा येणारे, ती संध्याकाळी ५.३० पर्यंत येईल... तिला "बैरी पिया"चा रिपिट टेलिकास्ट लावुन देऊ नका.... वरणभाताचा कुकर लावुन ठेवा.......जमल तर २ गाजर.. साल काढुन किसुन ठेवा..बाकीच मी आल्यावर करेन..."

हवा गेलेल्या टायर सारखा ते वाचुन मी तिथेच बसलो. अरे काय आहे हे? पण न करुन चालणारच नव्हतं...मार्क द्यायला परीक्षक सॉरी एक सोडुन दोन दोन परीक्षक बसले होते येऊन्...त्यात बायको रुसली तर पंचाईत व्हायची...मग काय चिठ्ठीत लिहील्या प्रमाणे एक एक काम करत गेलो.
माझी सगळी काम संपल्यावर एक डूलकी काढणार तोच बरोब्बर कळल्यासारख दत्त म्हणुन हे तिघे हजर...

"काय बाई तरी तुमच्या पुण्यातली गर्दी...." म्हणत सासुबाईंनी सोफ्यावर अंग टाकल...

"तुम्हाला नेल असत तर निदान हातातल सामान तरी पकडल असतत्...बिचारे बाबा एकटेच होते उचलायला..नाही का ग आई?"

"आमच्या सौ नी माझी आणि तिच्या बाबांची देखील किंवा त्या निमित्ताने समस्त "नवरे" वर्गाची जागा "हमालाची" हे दाखवुन दिलं" (अर्थात हे मी माझ्या मनात नोंदवलेल मत्..आम्ही मनातच नोंदवणार्...बाहेर विचारतो कोण काळ कुत्र?)

"मी नेमुन दिलेली काम पार पाडल्यामुळे .कदाचित.. त्यादिवशी माझ्या पानात गरम गरम पोळी पडण्याचा बोनस मला मिळाला...शिवाय "बबीला" होते थोडी फार मदत.. काम थोड अव्यवस्थीत असत पण ठिक आहे.."ठकीच्या" नवर्‍यापेक्षा बर आहे हे..." अस एक मत पडल (सासरे बुवांना स्वतंत्र मत द्यायची परमिशन नसल्याने मी एक मत अस म्हंटलय म्हणुनच त्यांच प्रत्येक बाबतीत "एकमत" असतं अस त्या म्हणतात...) आणि "ऑनलाईन परीक्षेतला" हा प्रश्न मी पास झालो.

रात्री बायकोने तिची फेवरिट सिरियल बघायचा त्याग करुन मला जबरदस्तीने थंडीत "पोट कमी होण्यासाठी" म्हणुन शतपावली करायला जायचा आग्रह धरला.

गेल्या आठवड्यात असच तिच्या आग्रहाला बळी पडुन मी आमच्या ऑफिसच्या "तात्या"ला शेंडी लावुन हाफ डे घेऊन "चुपके चुपके" तिलाच भेटायला वैशालीत गेलो होतो...अर्धातास तिथे तिची वाट बघुन ३ कप चहा संपवुन निघायच्या बेतात असताना ती भाजी मंडईतल्या यच्चयावत भाज्या घेऊन तिथे आली. आली तेच माझ्यावर चिडत.."

"अरे खर तर माझा खडा पारशी केल्या बद्दल मी चिडायच का हिने?..." पण बायकांना म्हणजे स्पेशली (स्वतःच्या) बायकोला (स्वतःच्या) नवर्‍यावर चिडायचा पुर्णपणे कायदेशीर अधिकार असतो हे ठावुक असल्याने मी मुग (हिरवे मुग नव्हे) गिळुन गप्प बसलो आणि तिच ऐकत राहिलो.."

"तुम्हाला ना काही म्हणजे काही करायला नको माझ्यासाठी..."

"अग आता आलो की मी हाफ डे घेऊन तुला भेटायला इथे..अजुन काय करायला हव?"

"ते ही मीच मागे लागले म्हणुन आलात्...तुम्हाला कुठे वाटल आधी?"

"आयला आता आधी काय नी नंतर काय? आलो ना पण?"

"हो तर, भारी उपकारच ना केलेत माझ्यावर? आई म्हणाली तेच बरोबर आहे..!"

"काय म्हणाल्या तुमच्या मातोश्री?" (मला खर तर थेरडी असच म्हणायच होत पण मग स्फोट होऊन घटस्फोटाला वेळ लागणार नाही म्हणून गप्प बसलों. नाहितरी "बरे सत्य बोला यथा तथ्य चाला..." अस कुणीतरी म्हंटलच आहे ना...कुणी म्हंटलय बर...? जाउ दे ना लग्न झाल्यापासुन मला फक्त बायको...तिची आई...बाबा..मंडळींचीच नाव्..वाढदिवस्...लक्षात आहेत. शप्पत.. माझा स्वतःचा वाढदिवस पण मी विसरलो..)

"अग सांग ना काय म्हणाल्या?"

"हेच्..की तुम्ही अरसिक आहात्...कधी साधा गजरा नाही आणत माझ्यासाठी..कधी काही सरप्राईझ नाही देत की काही नाही..."

"मी गप्प..... च्यायला, आता गजरा घ्यायला जायच तर आधी ओळखता यायला हवीत ना फुल? आणि त्या बायका पण "सभ्य दिसतोय पण लफडेवाला असणार स्वतःच्या बायकोसाठी का कोणी गजरा घेतो?" अशा अर्थाने बघणार...पण आता हे हिला कस समजावणार..."

"मला काही कळत नाही ग त्यातल...आणि खर सांगु....तू गजरा..फुल...लिपस्टिक्..मेकप ह्याशिवायच छान दिसतेस ना की ह्याची काही गरजच नाही.."

"माझा बाजु सावरायचा शेवटचा प्रयत्न्...पण तो फसत नाही बरोब्बर लागु पडतो...हे तिच्या इश्शा वरुन कळत..."

तिला इंप्रेस करायच्या नादात मी "बोल काय करु तुझ्यासाठी?" अस बोलुन जातो आणि तिथेच माझ्या पायावर धोंडा पाडुन घेतो....

हा धोंडाच मला भारी पडतो अगदी आजच्या कुकर लावण्याच्या प्रसंगा पर्यंत पुरुन (म्हणजे मला पुरुन) उरतो..

तर त्यादिवशी असा धोंडा पाडुन घेऊन आम्ही वैशालीतुन बाहेर पडलो ते एक गोष्ट ठरवुनच्..म्हणजे ठरवली हिने मी फक्त हो ला हो करत होतो..

झाल होत अस की "मंद्या" म्हणजे आमच्या सोसायटीत रहाणारा मंदार भावे ३१ डिसेंबरच संकट टाळण्यासाठी माथेरानला चाललेला..आणि जाताना त्याची बायको म्हणजे आमच्या सौ. ची खास मैत्रिण माझ्या मथ्यावरच रान उडवण्याचा प्लॅन तिच्या हातात देऊन गेलेली.

माथेरानला जाण्यापुर्वी ३१ डिसेंबरला होणार्‍या कार्यक्रमाची रुपरेखा तिने "कोणाला सांगु नकोस ह्..तुला म्हणुन देतेय.." अस सांगुन आमच्या धर्मपत्नीकडे दिली.

(माझे आई बाबा फार आधीच गावी जाऊन राहिल्याने) त्यातल्या सास बहु वाल्या कार्यक्रमाची भीती मला नव्हती.

पण बाकीच्या स्पर्धापण काही कमी भीतीदायक नव्हत्या..तुम्हाला एक झलकच सांगतो..

१. श्री तशी सौ - म्हणजे (नसलेली) काँप्याटिबिलीटी टेस्ट
२. एक मिनिटात जास्तीत जास्त कांदे सोलणे/ मटार सोलणे (ह्यातल कांदे सोलणे नंतर रद्द झाल म्हणे कारण कांदे ३५ रुपये किलो झालेत)
३. एक मिनिटात जास्तीत जास्त गाजरांची साल काढणे/ गाजर किसणे

वरच्या ह्या स्पर्धा नवर्‍यांसाठी स्पेशल म्हणे...

४. एक मिनिटात नवर्‍याने जास्तीत जास्त फुगे फुगवणे आणि बायकोने ते फोडणे

५. बाकी संगित खुर्ची, उखाणा घेणे वगैरे वगैरेची नोंद होतीच

शिवाय बायकांसाठी खास पाककला स्पर्धा होती

आणि जास्तीत जास्त स्पर्धा जिंकणार्‍या जोडीला "श्री व सौ आर्यरत्न" असा किताब बहाल करण्यात येणार होता. (ह्यातल "आर्यरत्न" हे आमच्या सोसायटीच नाव आहे हे लक्षात आलच असेल तुमच्या..)

तर त्यादिवशी वैशालीत बसुन "तिने" जेव्हा मला हा स्पर्धांचा कागद हातात देऊन सांगितल की "गडेSS आपणच जिंकायची ह ही स्पर्धा.."

तेव्हाच मला कळुन चुकल..."बोल मी काय करु तुझ्यासाठी?" हा प्रश्न म्हणजे मी स्वतःच्या पायावर पाडुन घेतलेला धोंडा आहे...

आताही मला कामाला आवुन हि त्रयी वेगवेगळी पाककृतींची पुस्तक आणायला बाहेर गेलेली.
झटपट पाककृती..., १००१ पाककृती, हमखास पा.कृ. ., कोंड्याचा मांडा कृती....,तरला दलाल रेसिपीज...,संजीव कपुर्...खाना खजाना.... अशा ढिगभर पुस्तंकांची रद्दी घरात वाढली होती.

शिवाय स्पर्धा म्हणजे मग तिथे सगळेच येणार आणि मिरवायच तर नविन साडी नको? म्हणुन त्याचीही खरेदी झाली..बर ब्लाऊज वेळेवर नाही मिळाला तर अडायला नको म्हणुन रेडीमेड ड्रेस पण घेऊन झाले..

"माझ काय..?"
"मला गेल्यावर्षी हिच्या मावज बहिणीच्या लग्नात जेष्ठ जावयाचा मान म्हणुन मिळालेला शर्ट पीस होता ना तोच शिवायचा आदेश झाला"

आणि हे सगळ माहीत असुनही "ही" जेव्हा शतपावलीला जाऊयात म्हणाली तेव्हाही मी पुन्हा धोंडा पाडुन घ्यायला तय्यार झालो..

"उद्यापासुन तुम्ही लवकर उठणारात्...ह.. सकाळी सकाळी जरा स्टॉप वॉच लावुन गाजर/बटाट्याची साल काढायची प्रॅक्टिस करा...मटार पण सोलुन ठेवा....म्हणजे कस दोन दिवसात जरा हात बसेल नी तिथे हस होणार नाही.."

"इतक तिने सांगितलय मैत्रिण म्हणुन तर चीज नको का करायला? ..ते काही नाही... बक्षिस आपल्यालाच मिळायला हव..."

"आता सांगा बघु...माझ्या आवडता रंग कोणता ते?.."

"काळा.."

"चुक"

"अग पण तुच गेल्या आठवड्यात दोन काळ्या साड्या घेतल्यास ना आवडल्या म्हणुन.."

"हो पण त्या संक्रांती साठी..तुम्हाला ना खरच काSSही कळत नाही.."

"बर मग गुलाबी..." समस्त स्त्री वर्गाला लहानपणापासुन हा एकच रंग आवडतो अस आपल माझ मत

"चुक चुक चुक.." "मोरपिशी.."

"बर आता सांगा माझ्या आवडता पदार्थ्.."

"मी परत एकदा चुकलो.."

आणि हे असच आवडता पिक्चर पासुन ते आवडत अमुक्..तमुक पर्यंत चालु राहील..
शाळेत जस "...आवडता पक्षी" टाईप निबंध असतात तस मग हिने मला सगळ लिहायला लावलं

प्रश्न क्रमांक १) आवडता रंग
ऊत्तर :- मोरपीशी

प्रश्न क्रमांक २) आवडता पदार्थ
ऊत्तर :- उकडीचे मोदक, पाणी पुरी

प्रश्न क्रमांक ३)................
उत्तर :-.............................

अस सगळे प्रश्न संपेपर्यंत झाल..

पुन्हा एकदा उजळणी घेऊन झाली आणि मग आता हे दोन दिवसात पाठ करा ऑफिसात बसुन असा दम देखील देऊन झाला

"अग ऑफिस मधे काम असत" अस बोलायचा क्षीण प्रयत्न केला पण

"माहितेय माहितेय तुमच काम्....मायबोलीवर तर पडीक असता..असा टोला मिळाला"

प्रश्न अजुन संपले नव्हते. हे झाले आवडी निवडी बद्दलचे प्रश्न...

जीके राउंड मधे ....घरात महिन्याला तांदुळ किती लागतो? कोणता आणता? गहु कोणता? किती?
अशी समग्र टेस्ट होती..

त्यात पुन्हा अस्मादिक फेल्...मी आपल तांदुळ म्हणजे तोच थोडा जाड शित वाला कधी फडफडीत होतो कधी गच्च गोळा होतो तो... अस आपल अगाध ज्ञान पाजळल"

"त्यावर माहितेय माहितेय होत कमी जास्त पाणि भातात, तांदुळ नविन असला की नाही येत पटकन लक्षात त्यात येव्हढ काही बोलुन नकोय दाखवायला..."अस ऐकवुन झाल

"तिथेही मी सपशेल माघार पत्करुन टाकली..हे माघार घेण्याच तंत्र मात्र मी फार लवकर आत्मसात केलय त्यामुळे आमचे वाद फारसे होतच नाहीत.."

मग तांदुळ --- ८ किलो ...पनवेल कोलम

मधेच तुम्हाला माहितेय सहा महिन्यापुर्वी आपण वाडा कोलम खायचो.... तो आता ५६ रुपये किलो झालाय, आता २ महिन्यापासुन आपण पनवेल कोलमच आणतोय्...अजुन काही दिवसांनी रेशनचा तांदुळ आणावा लागेल... अस एक बैधिक घेऊन झालं

त्याच क्रमाने मग गहु, डाळी, भाज्या, दुध इ. सगळ्या गोष्टींची शिकवणी झाली

हि सगळी शिकवणी शतपावलीच्यावेळी झाल्याने येव्हढ सगळ बोलुन होईपर्यंत आम्ही बरेच पुढे आलो होतो. पायाचे तुकडे पडल्याने मग येताना रिक्षा करुन घरी आलो.

दुसर्‍या दिवशी पासुन माझी शिकवणी चारच्या गजरा बरोबर सुरु झाली. मला "वेकअप काँन्स्टंट" युज करु न देता हिने गदा गदा हलवुन उठवल.

उठल्या उठल्या आदल्या दिवशीच्या प्रश्नोत्तरांची उजळणी झाली...मग माझ्या हातात बटाटे, गाजर आणि सोलाण देऊन ही अंतर्धान पावली

त्यांच्याशी झटापट करुन झाल्या बरोबर एक किसणी घेऊन ही आली. गाजर किसायचा कोर्स पुर्ण झाला....आणि मी मटार सोलायला बसलो..

त्यादिवशी डब्यात मटार बटाटा रस्सा, गाजराची कोशिंबीर आणि संध्याकाळी मटार भात आणि गाजर हलवा इतका साग्रसंगित मेन्यु मिळाला हिच त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणायची

परत घरी आल्यावर एकदा त्याच क्रमाने उजळणी झाली नी बायकोच्या दुसर्‍या दिवशीच्या भाजीची तयारी करुन झाली...

ह्या सगळ्या प्रकाराने मी वैतागलेलो तर मधु आणि तिची आई अजुन अजुन उत्साहाने जिंकण्याच्या तयारिला लागलेले

हे सगळे शिकवणीचे सोपस्कार होत असतानाच एकिकडे मी चिरुन ठेवलेल्या भाज्यांमधुन रेसिपी पुस्तक पालथी घालुन एक मिश्र स्वरुपाची रेसिपी करायच्या मागे मधु लागलेली. त्यामुळे संध्याकाळी नेहमीच्या जेवणा बरोबर काय सरप्राईझ (?) असेल ह्या कल्पनेनेच माझी भुक मरायची.. पण दरवेळी व्वा! व्वा!...व्वा! फायस्टारच्या शेफच्या तोंडात मारेल असा झालाय हा पदार्थ अस म्हणुन मी माझी कातडी बचावायचो...नी रात्री न चुकता इनो घेऊन झोपायचो..

इथे एक गंम्मत बघा मित्रांनो...चॅनल वरच्या रिअ‍ॅलिटी शो प्रमाणेच हे शो होणार होते म्हणे आमच्या सोसायटीत. आम्ही स्पर्धक.. पण मला आतल्या गोटातुन प्रश्नपत्रिका मिळाली. त्यावर बायकोने उत्तर घोकुन घेऊन "वरचे सा" मिळालेच पाहिजेत अशी तय्यारी करुन घेतली. आता राहिला फक्त तिथे ही घोकमपट्टी मांडायचा संबंध्...की झालोच आम्ही "श्री व सौ आर्यरत्न"
आहे की नाही धम्माल....

असो काही हरकत नाही त्या निमित्ताने मला कळल तरी माझ्या बायकोला "मोरपिशी" रंग आवडतो, आम्ही "कोलम तांदुळ खातो.." तर आता मी अगदी एक्सपर्ट झालोय १ मिनिटात मटार सोलण्यात्/गाजराची साल काढण्यात/गाजर किसण्यात

आता फक्त ३१ ची वाट बघायची तेव्हढ बाकी आहे..... हा दिप्या हा किताब जिंकुन दाखवतोच की नाही बघा....

(डिस्क्लेमरः इथे कुणाला नामसाधर्म्य आढळल्यास तो योगायोग नसुन ती त्या व्यक्तीची स्पेशल रिक्वेस्ट होती ह्याची नोंद घ्यावी)

(सुचना: "आर्यरत्न मधे दोन विंग मधे मिळुन २४ कुटुंब रहातात. पैकी भाग एक मधे मंदार भावे उर्फ मंद्याचे कुटुंब भेटिस आले तर भाग दोन मधे प्रदिप पोवळे उर्फ दिप्या आपल्या भेटिस आला. अजुन कोणा कुटुंबास आपले मनोगत व्यक्त करायचे असल्यास कृपया इमेलने संपर्क साधावा ही विनंती. ह्या पहिल्या दोन कुटुंबांस त्यांचे मनोगत मांडण्यास भुतदये खातर काहीही फी लावली नाही तरी अशी दया दाखवणे दरवेळेस शक्य होणार नाही ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी)

शुक्रवार, २५ डिसेंबर, २००९

चक्र/वर्तुळ भाग ३

"Passengers your attention please....."
"यात्रीओसे निवेदन है..."
"प्रवाशांनी कृपया इथे ..."
अस तीन भाषांतुन ओरडत निवेदिका, गाड्या आज पण लेट असल्याच अनाउंस करत होती....."

"आत्त्ताच ह्या स्मी चा फोन बंद पडयला हवाय...?"

"नशीब लागला एकदाचा..हॅलो..."

"स्मि, कुठे आहेस? गाड्या लेट आहेत... ऐकु येत नाहीये मोठ्याने बोल्...काय माहीत फास्ट ट्रॅकला काहीतरी लोचा झालाय यार. तू ये लवकर. लेदिज स्पेशल ने जाऊयात. नको.. नको डोंबिवली नको ती कोपर पासुन भरुन येईल आज. लवकर ये घोडे..मी ब्रीज वर उभी आहे ३-४ च्या मधे"
"डोळे कसली बंद करत्येस स्मि... फालतु गिरी नको... चल गर्दी बघ खाली, उतर भर भर लेडीज अनाऊंस केलेय..."
"हुश्श! स्मि इथे एक मुलुंड आहे, घाटकोपर शिफ्टिंग आहे दादरला विंडो.... इथेच ये.. आज माझे पाय खुSSप दुखतायत" "नशीब मुलुंड सिट मिळाली ते"
"कशाने काय दुखतायत? वेंधळी कुठली सॅट-संडे ला ट्रेक ला गेलेलो ना येडचाप. ट्रेक गृपचा सहावा बर्थ्डे होता. काय धम्माल केली म्हणुन सांगु...आय्य आय्य .. जरा देखके जाओ ना आगे,धक्का देके चलते है.. हम भी रोज ट्रॅव्हल करते है.. हा हा तुममे तमीज है ना तो रखो तुम्हारे पास.. हमे मत सिखाओ कैसे खडा रहनेका ते..."
"अरे काय सोड ना स्मि? कशी बोलतेय ती बया? फालतुगिरी नुसती..!"
"आज च्यायला घरी आईची पण किटकिट चालु होती... फालतुगिरी नुसती..."
"काही विचारु नकोस काय झाल घरी म्हणुन...? नेहमीचच्...मी ट्रेक ला गेले ना.."
"मने...पुढच्या आठवड्यात जोश्यांकडची बघायला येतायत.. आता थोडे दिवस तरी ट्रेक बीक पुरे...हात पाय मोडुन बसाल नाहीतर चेहरा काळवंडून घ्याल उगाचच..." इति मातोश्री
"च्यायला या आईच पण फालतुच टेंशन असत हा...पुढच्या आठवड्यात येणारेत तर येऊदेत की..आता त्यासाठी मी काय मखरात गौर होऊन बसायच आत्तापासुन..."
"हसतेस काय? आ... तुझ बर आहे च्यायला कॉलेजमधेच झाल तुमच ढँन टॅन्..आम्ही ना घर के ना घाट के.. ना लव मॅरेज जमत ना अ‍ॅरेंज वाले कांदे पोहे पटत.. सगळा लफडाच साला फालतुगिरी नुसती.."
"आई ग! आज जाम म्हणजे सॉल्लेड दुखतय अंग.. सगळ रॅपलिंग येतय बाहेर. हे हात बघ ..ग्लोव्हज विसरले न्यायला.. हे बघ कसे झालेत ते..."
"हम्म.. पण धम्माल केली एकदम फालतु च्यायला तुला सांगते.. एक नविन बकरा आलेला ह्यावेळी गृप मधे "धनेश" गुज्जु. आयला काय खेचलाय ना बास रे बास नुसत "धनेस्स धनेस्स स्नेक करलो" म्हणुन हात धुवुन मागे लागलो त्याच्या"
"रॅपलिंग करताना काय तंतरलेय त्याची...अर्ध्यावर तसाच बसुन राहीला..म्हणे मी नाही येणार खाली तसाच वर चढु काय?.. आणि आमचा गृप माहीतेय ना तुला कसला अवलिया आहे म्हणे चढ तू वर आम्ही जातो खाली जेवायला..ये एकटाच मग.."
"त्याला येवह्ढ सांगतोय येड्या पाय परपेंडिक्युलर ठेवायचे चिकटवुन, हातातल्या दोर्‍याला ढील द्यायची हळु हळू .. आणि मॅड कॅप पडेल कसा तो इतक नीट बांधलेल असत की दोन्ही हात सोडुन लटकलो तरी खाली नाही पडणार.."
"स्मि पण च्यायला माझी पण तंतरलेली एक क्षण असला वारा सुटलेला ना मला धीरच होत नव्हता थोडावेळ ढील द्यायचा.. आणि वरन हे पंटर लोक म्हणे आता नाही उतरलिस तर दोरच कापु वरुन म्हणुन पिडत होते"
"पण धम्माल आली यार कधी नव्हे ते ताईंच्या घरी आम्ही जमतो ना तिथे कोबी नी फरसबीची भाजी खाल्ली वेड्यासारखी.. घरी कधी बघत पण नाही मी ह्या भाज्या"
"आज माहितेय मी गजर लावुन लवकर उठले, ट्रॅकची बॅग रिकामी केली कपडे मशीनला लावले, सॉक्स धुतले... आई हळुच बघत होती..तिला समजतो असा मस्का लावलेला.. पण काय यार ट्रेक ला गेले तर काय चिडायच त्यात.."
"पुढच्या आठवड्यात दिपु माहितेय ना आमच्या गृपची तिचा साखरपुडा आहे पराग बरोबर तोही आमच्याच गृपचा. त्यामुळे आई अजुन चिडलेय्..म्हणे करा लोकांचेच साखरपुडे अटेंड करा..स्वतःच्या लग्नाच बघु नका नी आईच्या मनासारख वागु नका.."
"इरिटेटिंग रे.. काय सारख फिरुन फिरुन माझ्या लग्नावर यायचं"
"ए थांब बीप वाजतेय समस बघते कोणाचा आहे ते.."
"हे बघ सुन्याचा समस तुझी स्कुटी घेऊन जातोय वर शिव्या घातल्यान म्हणे पेट्रोल भराव लागेल आधी.."
"अग अशी बघतेस काय? जवळपास आमच्या सगळ्यांच्या स्कुटी/बाईक्स आहेत. प्रत्येकाकडे प्रत्येकाच्या गाडीची चावी पण आहे. ज्याची फ्री असेल गाडी त्याची गाडी घेऊन निघायच्...मातोश्रींना नाही माहीत हे उद्योग्..सालंच काढतील माझी...ती मारत नाही ग पण बोलत नाही आणि मला तेच आवडत नाही...भांड्..रागव नी मोकळी हो ना हे काय बोलायच नाही म्हणजे.."
"आमच्या अड्ड्यावर भेटतो ना संध्याकाळचे किंवा शनिवारचे ते सुद्धा आवडत नाही तिला. चांगली देवळाच्या बाहेरची जागा आहे. तरी म्हणे कोणी बघितल तर विपर्यास करायच ...लग्न ठरायचय तुझ..तिच तिच रेकॉर्ड लावते"
"आय नो यार तिला काळजी वाटते माझी..आय लव हर टु.. तिच्यासाठी एक सरप्राईझ ठेवुन आलेय.."

"चल बाय माटुंगा गेल, तू नीघ संध्याकाळी भेट मी ६.०३ कल्याणला असेन..."
------------------------------------------------
"शेखर...अरे ऐकतोयस ना..पेपर ठेव बघु बाजुला.."
"हम्म बोला... अस मोघम नको बोलुस्..लक्ष दे मी काय म्हणतेय त्याकडे.."
"मला खुप काळजी वाटते रे मनुची..."
"का काय का? लहान नाही समजतय म्हणुन तर काळजी वाटते.."
"२८ म्हणजे आता ह्या वर्षी तरी जमायलाच हव ना तिच लग्न्..परवा दिप्तीचा साखरपुडा आहे"\
"हिच्यापेक्षा लहान मुलींची लग्न ठरतात होतात नी त्यांचे आईवडील नातवंड पण खेळवतात.."
"होईल होईल काय? कोण घोड्यावरुन येणारे का न्यायला राजकुमार? प्रयत्न नकोत करायला?"
"आपण बघतोय काय? त्याने काय होणार नुसत?"
"कुठे जमवलयस का?... नाही... "
"कांदेपोहे....प्रोग्रॅम आवडत नाही"
"मेळ्याव्यात काय जायच म्हणे भाजी खरेदीला गेल्यासारख.."
"मला पटतय रे..मलाही नव्हत आवडत कांदे पोहे वगैरे पण आपल्यावेळीही होता का ऑप्शन.."
"भाषा बघ एकदा तिची..कुलकर्ण्यांच्या घरी फिट बसते का? आ...सांग ना"
"माझा फक्त तिच्या ट्रेकला कट्ट्याला विरोध दिसतो त्यामागची काळजी नाही दिसत कोणाला..."
"आता आली घरी की तुच सांग तिला समजावुन..." "कितीही मी मला तिच्या जागी ठेवल तरी नाही जमत आता मला हे...."
चल तिचा खण आवरते जरा.... नुसता पसारा करुन गेलेय सकाळी..चार कपडे काय धुवायला टाकले मशिन मधे झाली हिची काम..."

"प्रिय मॉम्स,
मला माहित होत तू माझा खण आवरायला घेणार ते.. ममा मला तुझी काळजी कळते ग्...ठिक आहे मलाही लग्न करायचय पण म्हणुन ते जमत नाही तोपर्यंत सुतक असल्यासारखच का वागायचं. जमेल की जमायच तेव्हा..तू म्हणतेस तेही बरोबर आहे माझ मी जमवल नाहीये आणि दाखवायची पद्धत आवडत नाहीये. तरी सध्या काही पर्याय देखील दिसत नाहिये दुसरा..सो चील मॉम्स्...तू म्हणशील तशी मी वागेन बस्स्..खुष्..पण प्लीज माझ्याशी अबोला नको धरुस्....यु मीन अ लॉट टु मी...लव्ह यु ममा..
मनु"

"शेखर...शेखर्...हाका मारता मारता ..खणाच्या वर ठेवलेल पत्र हातात धरुन मी नुसतीच भीजवत राहीले स्वतःला.. "

नविन पिढी..अवतार वेगळा भासला तरी अंतरंग तसाच आहे म्हणायचा..माझाही चष्मा बदलायला हवा आता...गेल्यवेळी आईची मदत लागली हे चक्र/वर्तुळ समजावुन घ्यायला.. आता ही मुलगीच आई झाली माझी... ह्याला उत्तर लिहायलाच हव. ऑफिसमधे तिचा फोन सायलेंट वर असतो म्हणजे कॉल करुन उपयोग नाही....

लॉग्ड इन करुन मी इमेल टाईप करायला सुरुवात केली....
प्रिय बिट्टू,

तुला आठवतं तू १३-१४ वर्षाची असताना आपण असेच "अबोला"धरायचो. तुला बिट्टो म्हंटलेल नाही आवडायच्...बाळा तेव्हा तुझी आजी म्हणजे माझी आई आली होती माझ्या मदतीला धावुन..
मधे काही काळ गेला अ‍ॅडजस्ट होण्यात ...मग माझा हात फ्रॅक्चर झाला...त्यानंतरच तुझ गॅदरिंग मधे केलेल भाषण्..अजुन आठवतय मला सगळ..

पण तू ग्रॅज्युएशन पुर्ण केलस, पोस्ट ग्रॅज्युएशन केलस्...मग नोकरी....त्यातच तुझे ट्रेक्स्...तुझा कट्टा...
आणि एकेक करुन तुझ्या गृप मधल्या मुलिंची लग्न ठरण्..त्यांच आई होण्...आणि तुझ वरवरन बेफिकीरी दाखवण्..हे सगळच बाळा कुठेतरी आत मला दुखवुन जायच्...जात...त्यातुनच मग तुझ्यावर चिडण होतं

वाटत्...इतकी हुषार माझी लेक्..इतकी गोड ...मग तिचच का सगळ्यांसारख सगळ मार्गी लागत नाही

अर्थात लग्न होण म्हणजे आयुष्य मार्गी लागण नव्हे हे खर असल तरी "आईच्या" मनाला चारचौघींप्रमाणे आपल्याही लेकीच व्हाव अस मनातुन वाटतच असत ग..

असो काल मी तुझ्यावर रागावले...तू माझ्याकरता म्हणुन २ घास खाऊन झोपलीस्...आज पण थोडी गुश्श्यात गेलीस्...वाटल पुन्हा एकदा माझ्या आईने याव नी मला पुन्हा एकदा कुशीत घेऊन हे सार संपवाव पुन्हा सार हसतं खेळतं व्हाव...

अर्थात आज आई नाही येऊ शकत्...पण ते गाण तू म्हणायचीस ना लहानपणी रेडिओवर लागल की...
"आई व्हावी मुलगी माझी ...मी आईची व्हावे आई..."

"खरच बाळा आज तुच माझी आई झालीस..."

"लव्ह यु बेटा....लव्ह यु ऑलव्हेज इन एनी सर्कम्स्टंसेस ऑफ लाईफ.."

टेक केअर..

तुझी

ममा म्हणुन की तुझी लेक म्हणु?
---------
इमेल सेंट केल आणि मी तशीच बसुन राहीले...

गुरुवार, २४ डिसेंबर, २००९

मिशन - ए - इयर एंड (भाग १)

"डाSSडा डा, ड डाSSडा डा, डा डा डा डा डा....सँटाक्लॉज इज कमिंग.. ललाल... रायडिंग ऑन द स्ले....
डाSSडा डा, ड डाSSडा डा, डा डा डा ड डा..."

"ए पक्या सकाळी सकाळी डोक नको खाऊस तुझ्या डडानी.....आधीच कँटिन वाला २ वेळा फोन करुन पण चहा घेऊन आला नाहीये."

"चल बे मंद्या, चील याSSर. उद्या पासुन तीन दिवस सुट्टी.... चेहरा काय असा करतोयस तेराव्याला गेल्या सारखा?"

"तू हस बे, तुझं काय जातय" "एकतर मी सुट्टीला जोडुन एक दोन सुट्ट्या टाकुन बाहेर जायच्या प्लॅनला कात्री लावली म्हणुन बायको वैतागलेय.त्यावर मात म्हणुन ह्यावेळी आई सोसायटीच्या सांस्कृती़क कमिटिवर गेलेय नी त्यांच्या सुनबाईंनी कधी नव्हे तो शत्रुपक्षाशी हात मिळवणी करुन माझा मोरु करायचा चंग बांधलाय"

"मंद्याSS मंद्या शांत हो, हे पाणि पी आणि सविस्तर सांग बघु काय झाल ते?"

"अरे काय सांगणार कप्पाळ?"

"मग मी जाऊ?"

"पक्या, थांब ना प्लीज. महाभारतातल वस्त्रहरण व्हायची वेळ आलेय माझ्यावर.."

"मंद्या मंद्या पुरे मी मरेन आता हसुन हसुन.:D वस्त्रहरण.. ते ही तुझं?..."

"बर बर नाही हसत. चल बक ना बे आता काय ते"

"मी इयरएंड ला बाहेर जायचा प्रोग्रॅम कॅन्सल केला.. तेव्हाच आमच्या सोसायटीत ह्यावेळी सांस्कृतीक कार्यक्रमाच्या नावाने खिसा मोकळा करायचा ठराव पास झाला. आणि आमच्या होम मिनिस्टरने तो "सासुच्या राशीला सुन का सुनेच्या राशीला सासु" अशा कुठल्या तरी घरचे वाद चव्हाट्यावर आणणार्‍या सिरियल प्रमाणे तसाच शो करायची सुचना समस्त महिला वर्गाच्या गळ्यात उतरवली"

"अरे मग तुझ कस वस्त्र हरण होणार? ह्यात तू कुठे आलास मधे मंद्या? साला काही पण बोलत असतो नी सकाळी सकाळी फुकाचा चेहरा पाडुन बसतो"

"अरे नाही कसा संबंध?" "चार भिंतीत रस्सी खेच चालते तेव्हा मीच असतो की मधे समुद्र मंथनातल्या "वासुकी" सारखा. फक्त दोन्ही बाजुचे गट देव असुर असे नसुन त्या ही पेक्षा भयानक जमात असतात"

एक मला""ममाज बॉय" म्हणुन थपडावते, दुसरी "बायकोच्या ताटाखालच मांजर" म्हणते

"अरे पण तू बोका आहेस ना? मग मांजर कस म्हणतात काकु तुला?"

"पक्या... पाचकळ पणा पुरे. माझा जीव जातोय नी तुला फुटकळ विनोद सुचतोय?"

"बर बर सॉरी, चालुदे मांजर बॉय.. पुढे.."

"पक्या साल्या तू पुण्यवान आहेस रे, मारुतीचा उपासक परत रहायला एकटा.वाट्टेल तेव्हा एचबीओ बघु शकतोस साल्या.." "कधी मराठी सिरियल्स बघितल्यास का? त्याही दमुन भागुन घरी आल्यावर रात्री जेवताना? स्पेशली ती "सासु सुन राशी वाली सिरियल?"

"बघितलीच नसणार तू कधी. तुला थोडीच साडेसाती लागलेय.."

"अरे काय हिम्मत असते रे त्यात भाग घेणार्‍या बायकांची.. गेल्या वेळचा एपिसोड बघत होतो म्हणजे बघावा लागलेला म्हणुन बघत होतो. एक सुन चक्क येव्हढे बघे प्रेक्षक असणारेत हे कळुन सुद्धा म्हणाली "माझ्या सासुबाई आळशी आहेत" तिची सासु पण काही कमी नव्हती ती म्हणे "सुन उद्धट आहे"

"हे!हे! अरे म्हणजे हे तर तुमच्याच घरच ट्रेड वाक्य झालं.."

"अरे हो पण पक्या हे त्या बायका टिव्हीच्या कार्यक्रमात जाहिर रित्या बोलतात" "त्या सिरियल मधे आलेले त्यांचे त्यांचे नवरे नक्कीच सॉर्बिट्रेट जीभेखाली ठेवुनच बसत असणार कार्यक्रम भर. त्याच्या नंतर देखील महिनाभर भुकंप होत असणार नक्की त्यावरुन घरी."

"तिथे मेकप जाईल; उगाच का खराब दिसा म्हणुन हसुन ऐकुन घेत असतील सगळ्या साळकया माळकया पण नक्कीच नंतर "फियान" येत असणार"

"तर मुद्दा ती सिरियल नसुन आता तोच खेळ (खंडोबा) आमच्या सोसायटिच्या ३१ डिसेंबरच्या रात्री होणार आहे. ज्याचे पडसात २०१० मधे नक्कीच भुकंपाने होतील म्हणुन मला आत्ता पासुनच घाम फुटलाय"

"ओ बोकोबा, जरा बसा हा घ्या कँटिन वाल्याने आणलेला फुळकवणी चहा. नी विचार करुद्या जरा"
"एक तर हे सगळ टाळायच म्हणुन मी रामदास स्वामींचा भक्त झालो तर च्यायला आता दुसर्‍याची धुणी धुवायची वेळ आली."

"पक्या अस रे काय करतोस, मित्र म्हणवतोस ना"

"बर ए मांजर्‍या गप आता रडु नकोस. सरळ सांग ना दोघींना भाग घेऊ नका नाहीतर फक्त चांगल बोला एकमेकिंबदाल म्हणुन"

"व्वा! हे एव्हढ सोप्प आहे अस वाटतय तुला? अरे ब्रह्मचार्‍या एकमेकींना अडचणित आणायची संधी शत्रु कधी सोडतात काय? तुला काय कळणार म्हणा ते, पण आता डोक लाव नी सांग हे तिसर महायुद्ध कस टाळु?"

अरे काल आई मला प्रश्न दाखवत होती तिने काढलेले
१.सुनेचे न आवडणारे गुण (?) आणि ह्याच्या उत्तरात आळशी आहे, उद्धट आहे, मुलाला तोडला माझ्यापासुन असे एक एक बाँब आहेत
२.घरी काम कोण करत? कोणाच जेवण अधीक आवडत
३.सुन आल्यापासुन मुलामधे झालेला बदल
४.मुलगा कामात सुनेला मदत करतो तस आईला करायचा का आधीपासुन....

बायकोने पण अशीच प्रश्नावली तयार ठेवलेय
तिच्या उत्तरांमधेतर
सासुबाई दुटप्पी वागतात, सर्वांवर कंट्रोल ठेवायला बघतात. माझ्या माहेरच्या माणसांना पाण्यात बघतात पासुन ते मला ह्या घरात नुसती मोलकरीण म्हणुन आणलय इथपर्यंत सगळी क्षेपणास्त्र आहेत
हे मोलकरीण, पायपुसण वगैरे शब्द तर दोघींनी कॉपी पेस्ट केल्यासारखे वाटतात

"आता सांग पक्या, हे चार भिंतीत चालणार युद्ध जरी पीत पत्रकारिते मुळे सोसायटी भर होत होतं तरी ते दोन देशांपुरत म्हणजे आपापसात होतं आता ह्या कार्यक्रमामुळे ते जागतिक महायुद्ध होऊन इतरांचीच करमणुक नाही का होणार? बर ह्या मुळे वाद थांबणारेत का? तर उलट वाढतील पण हे समजुन उमजतील तर त्या बायका कसल्या. बर झाल तू लग्न नाही केलस.."

"अरे मग सोप्पय तू तिला घेऊन कुठेतरी बाहेरच का नाही जात त्या दिवशी? न रहेगा डॅश डॅश न तुटेगी बासरी अशी काय ती म्हण आहे ना.."

"अरे मी सुचवुन बघितलं, तिच म्हणणं मी आधी तिचा प्रोग्रॅम कॅन्सल केला म्हणुन आता तिला असा एक दिवसाचा प्रोग्रॅम नकोय."

"मग बिंधास्त सुट्टी टाक सोमवार पासुन ४ दिवस नी नविन वर्षाला ये ऑफिसला, सांग तिला सरप्राईझ होतं म्हणुन. या बायका ना पटकन फसतात अशा सरप्राईझेस ना..आणि कुठचच बुकिंग नाही मिळालं तर माझ्या माथेरानच्या घरी जाऊन रहा. आई बाबा गेल्यापासुन ते बंदच असत, शेजारच्या रामुकाकांना सांगुन साफ करुन घेऊ आधीच"

"च्यायला पक्या काय डोक आहे रे तुझं.. मान गये. ब्रह्मचार्‍या तुला रे बरी माहीती कशा फसतात सरप्राईझेस ला ते" "माथेरान तर माथेरान याSSर माहाभारत तर टळेल"
----------------------------------
ट्रिंग ट्रिंग...
"हाय अस्मि....मी स्वाती बोलतेय ..मिशन सक्सेसफुल.!.....येस्स मदाम.. तुझी पार्टी डन..हो..हो..अगदी तू म्हणालेलीस तसच झाल.."

"तू म्हणालीस तसच झालं त्या "सास बहु" खेळाच्या नावानेच मंदारच बीपी वाढल"

"तू म्हणालीस तसच अगदी मी वर्णन करुन करुन त्याला माझ्या प्रश्नोत्तरांची माहीती दिली"

"हो.. अग साहेब आज घरी आला तोच माथेरान माथेरान करत आला.. आधी सांगत होते तर ऐकतच नव्हता म्हणे सुट्टी नाही मिळणार.. इथेच मागवुयात जेवायच बाहेरुन....सोसायटीचा कार्यक्रम बघुयात...वगैरे वगैरे"

"आता म्हणतो आपण २-४ दिवस बाहेर जाऊयात" "माथेरान... तस ठिकाण काही माझ्या लिस्ट वर नव्हत पण ठिक आहे तसही आम्ही कुठे गेलोच नाही आहोत ३-४ वर्षात सुट्टी नाही म्हणुन"

माथेरान तर माथेरान. "अस्मि देवी आपण महान आहात. आपकी दवा काम कर गयी.."


"तथास्तु बालिके..."(डिस्क्लेमरः पात्र नी प्रसंग पुर्णपणे काल्पनिक असले तरी तसे साम्य आढळल्यास तो योगायोग नसुन ह्यालाच जीवन ऐसे नाव असे समजुन अळी मिळी गुप चिळी करावी. आणि घरोघरी मातीच्या चुली/बर्शन चे गॅस, खाई त्याला खवखवे, चो.च्या.म्.चा. अजुन किती साम्य वाटतील अशा म्हणी आठवल्यास मनातल्या मनात म्हणुन ४ थीच्या स्कॉलरशीप परिक्षेची (दिली असल्यास) उजळणी करावी)


स्टॅट्युटरी नोटिसः इथुन प्रेरणा घेऊन त्या सल्ल्याबरहुकुम कोणाला प्रयोग करुन बघायची उर्मी झाल्यास असे सल्ले उपाय हे स्वतःच्या अक्कल हुषारीवर अ‍ॅलर्जी टेस्ट घेऊन मग वापरावेत

सोमवार, १६ नोव्हेंबर, २००९

पिक्चर परफेक्ट

तू मलम लावल्या सारख कर
मी घाव भरल्या सारख करतो
म्हणजे कसं चौकटित
चित्र हसरच दिसेल
एकदम "पिक्चर परफेक्ट"
शेवटी, दिसणं जास्त महत्वाच.. असण्यापेक्षा
नाही का?

असं वाटतं

असं वाटतं, झोकुन देऊन
जीव लावणं सोडुन द्याव
प्रेमात देखील जमाखर्च
मांडायला शिकुन घ्याव

विषापेक्षा जहरी शब्द
वापरायला शिकुन घ्याव
आपण हरतोय वाटल की
शब्दांनाच हत्यार कराव

नात विरल पर्वा नाही
डाव आपण जिंकुन जाव
प्रेमात देखील जमाखर्च
मांडायला शिकुन घ्याव

अस वाटत.. वाटत खर
पण..मग वाटत, जाउदे
डावपेच की नातं, दान
ज्याच त्यानं निवडायच

तू खुशाल मांड हिशोब..प्रेमाचा
मांड जमाखर्च त्यातील नात्याचा
मी ठरवलय,माझ्यापुरत
माझ्यासाठी, हे नातं निभवायच

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २००९

महागाईग्रस्त मध्यमवर्गाचा अभंग

महागाईचा ह्या | उच्चांक रे झाला ||
फाटका हा झाला | खीसा माझा ||

भाजी घेऊ जाता | होतो बहु ताप ||
खाऊ काय काप? | बटाट्याचे ||

हापुसचा आंबा | चित्रात बघतो ||
आणि मी खातो | चीकु केळे ||

स्वप्न बघतो मी | मिळे मला धन ||
मिळता ते धन | घेऊ न्यानो ||

गरिब तरीही | लाचार मी नाही ||
कष्टाला ही नाही | घाबरत ||

एकवेळ ऐसी | चालेल गरिबी ||
नको रे गरिबी | वैचारिक ||


(मायबोलीच्या विंडबंन स्पर्धे साठी पोस्ट केलेली कविता)

ओझ्याचा बैल

नकाराच्या भीतीन मी न लिहीलेल प्रेमपत्र
रोझ डेला माझ्या हातून गळून गेलेला गुलाब
आमंत्रण येऊनही चुकवलेल तुझ लग्न
हे सारच आयुष्याच्या वळणावर
जेव्हा पुन्हा सामोर येईल
तेव्हा ओझ्याच्या बैलासारखा
वाकलेला नवरा मला दिसेल आणि त्या प्रसंगीही
मी वाचू शकेन थेट त्याच्या डोळ्यात
"साल्या, तू सुटलास नी मी झालो
फक्त ओझ्याचा बैल"


(मायबोलीच्या विडंबन स्पर्धेतली कविता)

सांग सख्या रे

 
सांग सख्या रे हे; असे काय व्हावे?
तू दूर तरिही; तुझे भास व्हावे!
 
जरी दर्पणी ह्या; मला मी बघावे  
तुझे रुप त्याने; हाय दाखवावे!
श्वासही माझे; तुला फितूर व्हावे?
कसे भान नुरले, मला ना कळावे
 
कळीने जसे त्या, उमलुन यावे
तसे मी फुलावे, बहरुन जावे
अशी काय जादु? असे काय व्हावे?
तीर नाही तरी मी, घायाळ व्हावे
 
सरींनी स्वरांच्या मन चिंब व्हावे
तू सूर अन मी तुझी वेणु व्हावे
तुझे श्वास, निश्वास मी ओळखावे
सांग सख्या रे हे; असे काय व्हावे?

काय रे देवा..(संदिप खरेच्या "काय रे देवा" च्या चालीवर)

आता पुन्हा
आपली मॅच असणार

आता पुन्हा आपली मॅच असणार
मग आपण टिव्ही पुढे चिकटणार
मग सचिन चा विक्रम होणार
पण तरिही आपण मॅच हरणार
काय रे देवा..
मॅच हरलो की आपण चिडणार
मग आपण फिक्सिंग फिक्सिंग ओरडणार
फक्त अ‍ॅड करत रहा म्हणणार
दुसर्‍या दिवशी हीच चर्चा रंगणार
ट्रेन पासुन - चॅटिंग पर्यंत
सगळी कडे हेच असणार
तरिही पुन्हा अशीच मॅच होणार
आपण टिव्हीपुढे असेच बसणार
मग पुन्हा आपण मॅच हरणार
मग पुन्हा आपण चिडणार
त्यांच्या नावाने लाखोली वहाणार
काय रे देवा...
तावातावाने, चवी चवीने
आपण तेच तेच बोलत रहाणार
मग विषय खेळण्याचा की खाण्याचा (पैसे)
ते विसरुन भरकटणार
विषय पलटी मारत रहाणार
क्रिकेट जाऊन शब्दांचा
खो खो मात्र खेळत रहाणार
एक बोट समोर रोखुन
ऐटित वाद घालत रहाणार
चार बोट आपल्या कडची
सोयिस्कर विसरुन जाणार
काय रे देवा..

वाद काल झाले.., आजही होतायत.., वाद उद्याही होणार...
काय रे देवा...

मंगळवार, १० नोव्हेंबर, २००९

ट्रेक नाणेघाटाचा - प्रवास एका इच्छाशक्तीचा..!

(जाऊन आल्यापासुन आज लिहू उद्या लिहू करत करत नोव्हेंबरची १० तारिख उजाडली. उत्साहाच्या भरात तिथुन आल्या आल्या लगेचच ड्राफ्ट लिहुन निवड्क मैत्रिणींना पोस्ट करुन झाल होत दरम्यान नेट गंडण, दिवाळी आणि सर्वात मुख्य माझा आळशीपणा ह्या सगळ्याचा एकत्रीत परिणाम म्हणुन लिखाण पुर्ण काही होत नव्हत. मग पहिला उत्साह मावळल्यावर वाटल
काय मोठासा वेगळा अनुभव आहे तर पुन्हा एक पान खर्च करा नी तेव्हढी पांढर्‍यावर काळी केलेली अक्षर इतरांना म्हणजे चुकुन माकुन जे मैत्रीण म्हणुन म्हणा किंवा सहज म्हणुन म्हणा वाचतील त्यांना शिक्षा केल्या सारखी वाचायला लावा?

मग पुन्हा एकदा मी माझा ड्राफ्ट वाचला. वाटलं एक वेगळा, म्हणजे नेहमीच्या ट्रेकर्सना येतो त्यापेक्षा एक वेगळा अनुभव पण आलाय की मला तिथे... ड्राफ्ट लिहायचा उत्साह देखील त्यामुळेच आला होता तेव्हा.
मग त्याच कारणा साठी पुर्ण करायला हवा हा लेख.. हे मनाशी घोकुन पुन्हा बसले टायपायला)

तर आता करते सुरुवात -- ट्रेक नाणेघाटाचा - प्रवास एका इच्छाशक्तीचा..!


(इथे पोहोचायचय आम्हाला)

बर्‍याच दिवसांपासुन चाललेलं विश्वेश नी त्याच्या गृपचं १०-११ ऑक्टोबरचा विकांत "नाणेघाटावर" घालवायचा. अनायसे सानुच्या शाळेला दिवाळीची सुट्टी लागत होती म्हणुन तिलाही नेतो असं त्याने आधीच डिक्लेअर केलेलं. मनातून एकीकडे मला देखील जायचं होतं. खरं खरं लिहायचं ठरवल्यावर खोट नाही लिहीणार, मला जायचं होतं त्याला दोन प्रमुख कारण होती.

जायचं ह्या यादीत सगळ्यात वरती कारण होतं "सानु".
ती बरोबर जाईल ना? तिच्याकडे बाबाचं "तेव्हढं" लक्ष राहील का दरवेळी?

अर्थात हे वाक्य तमाम बाबा लोकांच्या मते आक्षेपार्ह्य आहे ह्याची मला कल्पना आहे, पण.. आई ह्या कॅटेगरीला वाटणार्‍या "नको येव्हढ्या" काळजी ह्या सदरात ते मोडत असल्याने आणि सुदैवाने/दुर्दैवाने मी त्याच टाईपची आई असल्याने मला तसं वाटलं हे मी प्रामाणिकपणे इथे कबुल करतेय.

हे जरी प्रमुख कारण असलं तरी दुसर कारण हे माझ्या पुरतं महत्त्वाचंच होतं. एकतर मी असा ट्रेक ह्या आधी कधीच केला नव्हता. दरवेळी "सानिकाला घेऊन जाता येणार नाही”, “कठीण ट्रेक आहे" ह्या अधोरेखीत केलेल्या वाक्यांमुळे मी आणि सानु घरीच रहात होतो, नी ट्रेकला फक्त विश्वेशची हजेरी लागत असे.

त्याच्या गृपचे बरेच ट्रेक ओव्हर नाईट स्वरुपाचे असल्याने आठवड्यातले पाच दिवस नोकरी निमित्तम तिला घरी सोडुन जावच लागत मग पुन्हा विकांताला तिला घरी ठेवुन दोघच जाण मनाला पटायच नाही म्हणुन माझं एकतरी ट्रेक करायचाच हे स्वप्न तसच रहात होतं, ते ह्या निमित्ताने पुर्ण होणार होतं. पण दिवाळी तोंडावर आलेली असताना "दिवाळी स्पेशल" घरातली काम सोडुन असा सुट्टीचा विकांत घराबाहेर काढायचा म्हणजे आधीचे/नंतरचे दिवस घरी ओव्हरटाईम करायची तयारी ठेवावी लागणार हे सांगायला पंचांग बघायची गरज नव्हतीच, तरिही "ह्यावेळी हा अनुभव घेऊन बघायचाच" ह्या इच्छेने उचल खाल्ली नी जायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी मी माझीही सॅक पॅक केली.

घरातून निघाल्यापासुन मायबोली वरचे ट्रेकिंगचे लेख आठवत होते. "यो रॉक्स" तर ट्रेक मास्टर आहे त्यामुळे त्याची आठवण झाली तरी खर्‍या अर्थाने लेख आठवले ते "ललिता-प्रिती" नी "कायवाट्टेलते" ह्या दोघांचे. त्यात डोंबिवली - कल्याण वारी करेपर्यंतच सानुच्या पोटात दोन -तीन वेळा कळ आल्याने आमच्या ट्रेकची सांगता परतीच्या कल्याण लोकलने होते की काय अस वाटायला लागलेल.

पण नाही, इच्छाशक्ती इच्छाशक्ती अस घोकत पुढे निघालो.कल्याणहुन जीप करुन आम्ही पायथ्याच्या गावाशी (बहुतेक घाटघर) येऊन पोहोचलो. तेव्हढ्यातल्या तेव्हढ्यात हि एक्साईटमेंट ललिता-प्रितीशी शेअर करुन झाली. ह्यानंतर मोबाईलची रेंज जाणार ह्याची खात्री होती (तसाही माझा मोबाईल नेहमी आउट ऑफ कव्हरेज एरियाच असतो त्यावरुन मला...”फेकुन दे तो तुझा फोन" असा प्रेमळ सल्ला देखील ऐकावा लागतो हा भाग वेगळा )

"वेलकम टू नाणेघाट" ह्या बोर्ड ने आमच स्वागत केल नी दुप्पट उत्साहाने आम्ही सगळी मरगळ विसरुन चढण्यासाठी आतुर झालो.इथुन सुरु झाला आमचा ट्रेकचा प्रवास.एकुण २२ जणांच्या चमु मधे सानिका धरुन आम्ही चौघे पहिल्यांदा ट्रेक करणारे वीर होतो. सुरुवात तर मस्त झाली. वाटेत २ का ३ ओढे लागल्यावर तिथेच पाय सोडुन बसायचा मोह झाला खरा, पण कॅप्टनच्या "हाकाराच्या शिट्टी" मुळे तो बेत रहीत करुन "येताना इथे थांबुयात्" ह्या अश्वासनांवर मनाची समजुत काढुन आम्ही मार्गस्थ झालो.

जस जस चढाव चढु लागलो तस तस नेहमीचे ट्रेकर्स आणि आम्ही ह्यात अंतर पडु लागल. (हे तर होणारच होतं म्हणा, एरव्ही कुठे आलेय इतक चालायची सवय ते ही पाठीवर ओझं घेऊन!)

मला गावकर्‍यांची खरी कमाल वाटते काय झपाझप चढत उतरत होते ते. एका गावकर्‍याच्या टोपलीत खेकडे होते. नाणेघाट चढुन वरच्या पठारावरच्या भागात खेकड्यांची बीळं आहेत तिथुन खेकडे पकडुन नाणेघाट उतरुन घाटघर किंवा मुरबाड च्या बाजारात ते विकायचे हा त्याचा पोटापाण्याचा धंदा.

केव्हढी ती कसरत नी मेहनत पोटाची खळगी भरण्यासाठी? मला मात्र त्यावेळी माझाच भाजी किंवा तत्सम गोष्टी घेताना १-२ रुपयांसाठी घासाघीस करुन गड जिंकल्याचा आनंद व्यक्त करणारा चेहरा डोळ्यासमोर वाकुली दाखवत होता.

हळु हळु आमचा स्पीड चांगलाच मंदावला. शेवटी कॅप्टन ने आघाडीच्या वीरांना पुढे केव्हजच्या साफसफाईसाठी जाऊ देऊन दोन तीन ट्रेकर्स चा गृप आमच्या सारख्या नवख्यांसोबत ठेवला. सुरुवातीची बडबड संपुन आता फक्त जोर जोरात घेतलेले श्वासांचे आवाज येत होते स्वत:चे स्वतःलाच.

"कॅप्टन अजुन किती वेळ?" ह्या प्रश्नाला दरवेळी "और बस १० ही मिनीट, हे काय आलच" अस उत्तर मिळत होत. (आणि हे और बस दस मिनिट चांगल दिड दोन तास चाललेलं.) इतक चालायची सवय नसलेल्या पायांना चुचकारत माझ आपल चालण चालु होतं. पुढे पुढे तर स्पिड सोडुनच द्या पण प्रत्येक वळणाला "अरे! जरा थांबुयात. आजुबाजुच निसर्ग तर अनुभवुयात.." असा बहाणा करुन विश्रांती घेणं चालु होतं.

आता फक्त एकच वळण, कमॉन कविता तू चढू शकतेस अस माझं मीच माझ्या पायांना ओढत स्वतःशी म्हणत, एकदाचा हा दिड तासाचा ट्रेक तीन तासात का होईना पुर्ण करुन वरती झेंडा लावला.

समोर कॅप्टन बरोबर आधी पोहोचलेली सानिका मला आमची केव्हजमधली जागा दाखवत होती.
"आई, आपण इथे झोपायचं, इथे रुचा काकु,इथे हे काका नी तिथे अमुक तमुक अशी विभागणी तिची तिचीच करुन झालेली."(ते दोन दिवस हे आमच घर होतं)


(केव्ह्जच्या बाहेरच्या बाजुला असलेली हनुमंताची कोरीव मुर्ती)

आधी पोहोचलेल्यांनी साफसफाई करुन स्लिपिंग मॅटस अ‍ॅरेंज करुन ठेवलेल्या होत्या.
सानिकाला मात्र हे दाखवु आईला का ते अस झालं होतं.

"आई, इथे बघ पाणि आहे प्यायच. एकदम थंड, फ्रिज नसताना..!" तिचा जगातल सातव आश्चर्य बघितल्यासारखा चेहरा अस काही बाही सतत मला दाखवत होता.

"इथे बघ इथुन काय सुरेख दिसतय खालच..अस म्हणत माझा हात धरुन ती मला केव्हजच्या बाहेरच्या बाजुला घेऊन गेली."


ते दृश्य नी टाकांमधल थंडगार पाणि पिऊन सगळा थकवा, दुखणारे पाय विसरायला झालं.

(वदनी कवळ घेता...)
(पंच पक्वांनाच ताट..)

आणलेली शिदोरी मधोमध ठेवुन केळी सदृश्य पानांवर जेवणं झाली नी बरोबर आणलेल्या दुर्बिणीतून आलो तो पट्टा न्याहाळायचा कार्यक्रम सुरु झाला. दूरवर एक पांढरे-लाल टिशर्ट घातलेला गृप चढताना दिसत होता. आमच्या बॅगा लगेच केव्हजच्या एका बाजुला लावुन आम्ही आमची साईड सिक्युअर करुन घेतली. नविन येणारा गृप राहिलाच तिथे तर समोरचा एक भाग त्यांच्या साठी राहिल अस आमच सामान लावुन टाकलं नी रपेटी साठी निघालो.


सर्वात प्रथम "टोल स्पेशल" रांजण बघितला.(रांजणा कडे जाणारा रस्ता)(सातवाहन काळात ह्याचा जकात वसुली साठी उपयोग व्हायचा)
मग तसेच चालत पुढे जाऊन एका गावकर्‍याच्या घरी थोडी विश्रांती घेऊन त्यालाच वाटाड्या म्हणुन बरोबर घेऊन निघालो. "इथे वीज पडली होती", "इथे धबधबा आहे" , "इथे फायस्टार (त्याच्याच भाषेत लिहितेय) हॉटेल होणार होत", "ही मिलिंद गुणाजीची १ मजली बंगली" अस काही बाही तो दाखवेल ते बघत पुन्हा परतताना त्या वाटाड्याच्या घरी चहा पिऊन आम्ही नानाचा अंगठा चढण्यासाठी निघालो.(मिलिंद गुणाजीच्या बंगलीच्या अलिकडचा परिसर.इथेच कुठेतरी गुणाजी कडाचा मिलिंद गुणाजीने लावलेला नी गावकर्‍यांनी काढुन टाकलेला फलक बघायला मिळाला)(समोरच्या बाजुच्या ह्या डोंगर रांगेला "नवरा-नवरी करवली व वर्‍हाडी असं नाव आहे)(मिलिंद गुणाजीच्या बंगली समोर उभ राहुन घेतलेला आमच्या गृपचा फोटो)

सुर्यास्ताच्या आधी तिथे म्हणजे नानाच्या अंगठ्यावर पोहोचायचं होतं.
(हा नानाचा अंगठा)सानिका तिच्या महेंद्र काकांबरोबर माझ्या आधी वरती पोहोचली होती. सुर्यास्त व्हायला थोडाच अवकाश बाकी होता. कॅमेरे सरसावले. मी डोळ्याच्याच लेन्सने टिपायच ठरवल नी एकटक समोर बघत राहिले. एका हाताने सानुला घट्ट पकडुन ठेवल होत नी लक्ष समोरच्या लाल गोळ्याकडे होतं. सगळ आभाळ अस नजरेच्या टप्प्यातं. हळु हळु आपल्या सहस्त्र किरणांनी आम्हाला टाटा बाय बाय करत सुर्यनारायण त्यांच्या घरी गेले.
कितीही रेंगाळावस वाटल तरी भरभर केव्हज कडे जाणं भाग होतं. कारण सुर्यबाप्पा अस्ताला गेल्यावर थोड्याच वेळात अंधाराच राज्य सुरु होणार होतं. सात साडे सातलाच रात्रीचे १० वाजले असावेत इतका काळोख होता (खरतर शहरात कधीच रात्र नसते. The City that never sleeps अस नाहितरी मुंबापुरीला म्हणतातच. तर तिथे आम्ही खर्‍या अर्थाने अंधाराच साम्राज्य अनुभवलं)

अशा अंधारातच आम्ही आमचं कँडल लाईट डिनर केलं, दुसर्‍या दिवशी सकाळी चूल पेटवुन पोहे केले. खानविलकर काकांनी खास सानु साठी मॅगी करुन दिल (मॅगी चांगल नसत म्हणुन आई फारफार कमी वेळा करते अशी तिची माझ्या विषयी तक्रार सुद्धा करुन झाली) आणि हो ट्रेकच्या नियमाला अनुसरुन परत येताना आमच्या ग्रुपची चुकामुक देखील झाली. येताना बच्चे कंपनीच नी काही मोठ्यांच पण ओढ्यामधे मनसोक्त डुंबुन झालं. कपडे बदलायची सोय नसल्याने आम्ही पाय बुडवण्यात समाधान मानलं.

खाली उतरल्यावर खरतर कॅप्टनला ११ नंबरच्या बसने सगळ्यांना कल्याणला किमानपक्षी मुरबाड रोड पर्यंत न्यायच होत पण आमच्या दुखणार्‍या पायांनी नी पोटात खवळलेल्या भुकेनी त्याच्याशी असहकार करत तिथेच पथारी पसरली. आय आयटी मुंबई वाल्यांचा गृप आम्ही उतरत असताना चढत होता. त्यांच्याच बस वाल्याला रिक्वेस्ट करुन थोडे पैसे देऊन घाटघर पर्यंत आलो. तिथुन मुरबाड पर्यंत एक जीप नी पुढे कल्याण पर्यंत दुसरी अस करत आम्ही कल्याणला येऊन पोहोचलो नी हॉटेल गुरुदेव मधे पोटपुजा करुन आमच्या ट्रेकची उत्तर पुजा पुर्ण केली.

खरच, कल्याण ट्रेननेच सांगता झाली ट्रेकची पण ट्रेक पुर्ण करुन मगच.

--------------
आता विचाराल ह्यात कसला आलाय वेगळा अनुभव? हेच तर सगळ म्हणजे असच काहिस ललिताने किंवा काय वाट्टेलते ने लिहीलय की. मग वेगळा अनुभव नाही तर वेगळ ललित कशासाठी खर्च केलस? तिथे त्यांच्या लेखातच प्रतिसाद मधे लिहायच ना! मला माहित आहे असच काहिस येतय तुमच्या मनात.
हम्म थोडंफार खरय, पण थोडं फारच. कारण दमण जरी तसच असलं, इच्छाशक्तीही तशीच असली, वरती पोहोचल्या वरचा आनंदही तसाच असला तरिही हा ट्रेक एका वेगळ्या कारणा साठी मनावर कोरला गेलाय. आणि हे वेगळ कारणच मला लिहायला भाग पाडतय.

ज्या कारणासाठी हा ट्रेक विशेष करुन लक्षात राहिला ते मुद्दामच शेवटी नमुद करतेय कारण मला वाचताना तेच तेव्हढ लक्षात रहाव अस मनापासुन वाटतय.

आम्ही जेव्हा केव्ह्ज मधे परतत होतो तेव्हा "तो" दुपारी दुर्बिणीतून बघितलेला गृप हळु हळु वर चढत होता. "हा गृप, ह्या गृपचे ट्रेकर्स हाच तर वेगळेपणा आहे मला आलेल्या अनुभवात"

ह्या गृपविषयी सांगण्या पुर्वी मला एक सांगा...ट्रेक कशाच्या जोरावर पुर्ण होते?

स्टॅमिना..?

ट्रेकची सवय..?

शारिरी़क ताकद..?

हम्म! लागत असतील ह्या गोष्टी पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे "इच्छाशक्ती" हे मला त्यादिवशी कळलं जेव्हा मी "फिनिक्स" ह्या संस्थेचे "जवान" हा ट्रेक पुर्ण करत असताना बघितले.आम्ही दुर्बीणीतुन बघितला होता तो हाच गृप फिनिक्स च्या जवानांचा.

फिनिक्स ही तुमच्या आमच्या दृष्ट्या शारिरीक अपंगांची संस्था. कोणी पोलिओने पाय गमावलेत, कोणी अपघातात गमावलेत, कोणाला कृत्रिम पाय लावलाय, कोणाचा स्टिलचा पाय गुढग्यात वाकु शकत नाही अशा लोकांचा हा समुदाय जवळ जवळ २५०० फुट उंच अशी नागमोडी वाट चढतो तेव्हा स्टॅमिना,शरिराची ताकद ह्यापेक्षा त्यांची मनाची उभारी, दुर्दम्य इच्छाशक्ती आपल्याला त्या डोंगरा पेक्षाही उंच भासते.

(फिनिक्स चे हेच ते जवान वीर... केव्हजच्या इथे विश्रांती घेत असताना काढलेला फोटो)

शारिरिक अपंगत्वावर दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर विजय मिळवता येतो.. हा धडा मी त्यादिवशी शिकले.
हॅटस ऑफ टु देम यार.. म्हणुन हा स्वतंत्र लेखाचा प्रपंच त्यांना मानाची वंदना देण्यासाठी, त्यांची धडपड त्यांचा उत्साह तुमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठीमला दम लागला, माझी चढताना "नाही बॉ जमत आता मला" "मला नाही वाटत मी पुढचा काय हा ट्रेक पण पुर्ण करेन" अशी अवस्था एक नाही अनेक वेळा झाली. ह्या पार्श्वभुमीवर ह्या वीरांचं यश हे खरच कौतुकास्पद आहे. तुम्हा आम्हाला एक धडा शिकवणार आहे.

हा गॄप ह्या आधीही बर्‍याच गडांना पावन करुन गेलाय हे कळतं तेव्हा हाती पायी धडधाकट असलेल्या आपल्या सारख्या लोकांनी "किती छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडायचं?" अस स्वतःलाच विचारावसं वाटत. असं वाटायला लावणं हे माझ्या ह्या झालेल्या ट्रेकचं यश वाटलं, म्हणुन इथे तुमच्या समोर मांडायचा प्रामाणिक प्रयत्न केला.

पुढच्या वेळी ट्रेक करताना "नही जमेगा" वाटल ना तर हा गृप आणा डोळ्यासमोर. शिव खेराच "येस यु कॅन" न वाचता देखील समोर उभं राहिल ही खात्री मी देते.

(ह्या गृपच्या ह्या ट्रेक विषयी म.टा. मधे पहिल्या पानावर १३ ऑक्टोबरला बातमी आली होती)

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5117535.cms (ही त्या अर्टिकलची लिंक)

रविवार, २५ ऑक्टोबर, २००९

ती...स्वप्नपरी..!

सवयीने घड्याळाकडे नजर गेली. नऊ वाजले, म्हणजे 'ती' आता बसस्टॉपवर उभी असेल तिच्या मैत्रिणींबरोबर. घरातून निघून गाडीत बसल्याबरोबर मन तिचाच विचार करायला लागतं आजकाल. बसस्टॉप जवळ आला, की आपसूकच लक्ष घड्याळाकडे जातं.

ती दिसायला काही खूप सुंदर नाही, तरी तरतरीतपणा जाणवतोच. केस थोडेसे पोनीटेलमधून बाहेर आलेले, कपाळावर टिकली, क्वचित कधी साडी... म्हणजे सणासुदीला. एरवी सलवारसूट किंवा ट्राउझर आणि थोडा लाँगच कुर्ता अशीच असते ती. एखाददिवशी हलकी लिपस्टिक. एका हातात दोन बांगड्या... बहुतेक सोन्याच्या असाव्यात नि एका हातात घड्याळ, बस बाकी काहीच मेकअप नाही. तिची उभं राहायची जागासुद्धा ठरलेली. स्टॉपवर हीऽऽ भली मोठ्ठी रांग दिसते बससाठी. पण ही, मैत्रिणींबरोबर रांगेच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला उभी दिसते. बहुतेक मिळेल ती बस पकडून लटकून जात असावी. एक दिवस गाडी बाजूला उभं करून बघितलं पाहिजे. का तिलाच लिफ्ट द्यावी एक दिवस?

ह्या विचारानेच हसू आलं चेहर्‍यावर. जे शक्य नाही, त्याचंच का मन स्वप्न बघतं? पाच मिनिटांत गाडी बसस्टॉपपाशी आली. सगळ्या विचारांना आवरून डोळे तिला शोधायला लागले. तिचा ग्रूप होताच तिथे, नेहमीसारखाच हसत चेष्टामस्करी करत. पण ती नव्हती त्यात. काय झालं असेल? बरं नसेल का तिला? की गाडी चुकली असेल तिची? खरंच रोज लटकून प्रवास करणार्‍यांना साष्टांग दंडवतच घातला पाहिजे. सकाळी लवकर उठत असेल नाही ती? सगळं आटोपून धावतपळत ट्रेन गाठून यायचं, म्हणजे तारेवरची कसरतच होत असेल तिची. पण तरी किती फ्रेश दिसते ती... पूर्ण ग्रूपच तसाच म्हणा त्यांचा. तरी ती विशेष जवळची वाटते. कारण ठाऊक नाही. त्या रोजच काहीना काही बोलत असतात, हसत असतात. किती आनंदी इन्फॉर्मल वाटतात त्या!

क्वचित, अशा ह्या पावसाळ्यात जवळजवळ पूर्ण भिजलेल्या अवस्थेत बसची प्रतीक्षा करणार्‍या त्यांच्या चेहर्‍यांवर थोडा वैताग, नाराजी त्याहीपेक्षा मस्टर गाठून लेटमार्क टाळायची घाई किंवा त्यापायी आलेली चिंता दिसते... पण तरीही एक मोकळेपणा, खरेपणा, एक... एक वेगळंच स्मित, तेज असतं त्यांच्या चेहर्‍यांवर.

कुठून येतो एवढा उत्साह? थोडंसं का होईना स्वत:चं आकाश दिसतं, म्हणून येत असेल का?
तिलाही कळत असेल का माझं हे असं रोज तिचं निरीक्षण करणं? असावं बहुतेक.
आज काय झालं पण तिला? आता पूर्ण दिवस तिच्याच विचारात जाणार. धड ना काम होणार, ना माझे विचार संपणार...
"मितू, मी पुढच्या आठवड्यात दिल्लीला जाणारे. तिथे त्या कपूर अँड कपूरचं डील जवळजवळ फायनल झालंय. तो आठवडा इथले क्लाएंट्स तेवढे तुला मॅनेज करावे लागतील. त्या माथुरबरोबरची मीटिंग साळवींना घेऊन अटेंड कर. तो साऽला xxx असला तरी आपला इथला मोठ्ठा मासा आहे.. अगं, लक्ष कुठे आहे तुझं?"
"अं..अं..! नाही, काही नाही. जरा वेगळे विचार होते डोक्यात. सॉरी, काय म्हणालास?"
"मी इथे कपूरच्या डीलची गोष्ट करतोय.. हे डील फायनल झालं, की आपणही एसी गाडी घ्यायची. आजकाल ही असली साधी गाडी कुणाकडेही असते."
"अरे, पण ही काय वाईट आहे?" मी नाराजीच्या स्वरात म्हटलं. "आणि तुला माहीत आहे, मला ती बंद काचवाली एसी गाडी आवडत नाही, जीव घुसमटतो माझा त्यात. जगापासून तुटल्यासारखं वाटतं."
"तुझं आपलं काहीतरीच! म्हणे जगापासून तुटल्यासारखं वाटतं.. आणि खिडकी उघडून बाहेर बघायचं तरी काय? ती गर्दी, त्यात धक्के खात बसची वाट बघणारी माणसं? म्हणजे जे नको, म्हणून ही अशी स्वतःला विसरून मेहनत केली, तीच पुन्हा बघायची? बघायचंच असेल, तर मेहराकडे बघ, त्या माथुरकडे बघ. साले बापांच्या जिवांवर कसे ऐष करतायत, दोन-दोन एसी गाड्या बाळगून आहेत. तुझीच इच्छा होती ना, आपली स्वत:ची कंपनी असावी, बंगला असावा, गाडी असावी म्हणून? तुझं ना गणितच मला कळत नाही, अक्षता झाल्यापासून अधिकच बिघडलंय गणित!" इति शेखर.
'तुलाच काय मलाही कळेनासं झालंय माझं गणित' मी मनातच म्हटलं. हेही खरंय, माझीच इच्छा होती. पण मला नव्हतं रे ठाऊक मी हरवून जाईन ह्या सगळ्यांत. त्या सुरुवातीच्या काळात क्लाएंट मिळवण्यासाठी अटेंड केलेल्या पार्ट्या, काही आपण दिलेल्या.. ते चकचकीत दिखाऊपण, खोटं हास्य ह्यात कोणी खरं जवळचं, जिवाभावाचं जोडलंच गेलं नाही. जे होते, ते पाऽऽऽर लांब गेलेले आपल्यापासून...
'अजून काही वर्षं, अजून हे होईपर्यंत...' असं करत करत तू पार पुढे निघून गेलास. तुझा दोष नाही म्हणत मी, पण अक्षता झाल्यापासून माझी माझ्यातच हे दोन दुवे जोडताना दमछाक होते. पूर्वी वाटायचं, पैसा नाही किंवा कमी आहे म्हणून आपण सुखी नाही. आता वाटतं, हे धावणंही एक मृगजळ आहे. सुख, समाधान आतातरी कुठे आहे?
"हे सगळे मीडिऑकर विचार झाले मितू. जरा आपल्या स्टेटसप्रमाणे वाग. कंटाळा आला असेल, तर शॉपिंगला जा, कालच मिसेस मेहरांचा फोन आला होता ना तुला? किटीपार्टीला बोलावत होत्या म्हणालीस ना? तिथे जा. पैशांचा विचार करू नकोस. खर्च कर, राणी खर्च कर."
"गेलंच पाहिजे का तिथे? माझं मन नाही रमत अशा पार्टीत. काय आपलं दागिन्यांचं नि साड्यांच प्रदर्शन केल्यासारखं मिरवायचं?"
"Now stop crying, for God's sake! खोटं का होईना, पण रमता आलंच पाहिजे तुला अशा पार्टीत. त्याला बिझिनेस एटीकेट्स म्हणतात मॅडम. इस रेसमें आगे जाना है, तो ये सब करना पडता है."
"रेस, पैसा, एटीकेट्स ह्यांशिवाय दुसरं जगच नाहीये का शेखर? किती बदललास तू! दिवसचे दिवस आपला संवाद फक्त क्लाएंट, डील्स, गुंतवणूक ह्या नि अशाच गोष्टींमध्ये फिरतोय, लक्षात येतंय का तुला? त्यापेक्षा पैसा कमी होता, तेव्हा बरं होतं असं वाटायला लागलंय मला. निदान आपलं विश्वतरी एक होतं, स्वप्नं एक होती. मला खोटंखोटं हसत स्टेटसचं घोंगडं पांघरून प्रदर्शन करावं लागत नव्हतं. भले धावपळ होत होती, दाराशी गाडी नव्हती, पण तू आणलेला एक गजराही मला खुलवायला पुरेसा होता. आता वाटतं मीच पायावर धोंडा मारून घेतला माझ्या."
"तुला विश्रांतीची गरज आहे, बाकी काही नाही. मी परत आलो, की चार दिवस कुठेतरी जाऊन येऊ. तुलाही बरं वाटेल."
"ठीक आहे, तू म्हणशील तसं." असं म्हणत मी विषय संपवला. कारण तुझं पुढचं वाक्य मला पाठ झालेलं-'भावनांपेक्षा पैसा महत्त्वाचा राणी, पैसा हवा पैसा.. छन् छन् छन्...' मन मात्र तिच्याच विचारात गुरफटलं....

***

श्शी! आज खूपच उशीर झाला. सगळ्या गेल्या असतील आज. सकाळीसकाळी जरा दहा मिनिटं आरामात उठू म्हटलं एक दिवस, तरी बिघडलंच चक्र सगळं. नेहमीची गाडी चुकली, म्हणजे आलंच उभ्याने जाणं. सकाळी सगळ्या धावपळीत फुरसतीने एका जागी बसून चहासुद्धा प्यायला मिळत नाही कधी, ना पेपराचं तोंड बघायला मिळत. तशी ऐश करायला जावं, तर पळणारे घडयाळाचे काटे समोर दिसतात राक्षसांसारखे.
'तरी नशीब आजकालचे नवरे त्यांच्या बायकांना मदत करतात,' घराबाहेर पडतापडता हे वाक्य कानांवर येऊन आदळलंच नेहमीच्या सवयीने. गंमत वाटते ह्या वाक्याची, पण खरंही आहे म्हणा. तरीही वाटतं, किती हा सेकंदासेकंदाचा हिशोब, कसं हे काट्यावरच जगणं....?
अग्गंबाई! आज चढायलातरी मिळणार का गाडीत? आत्ताच ८.१५ होऊन गेलेत.. अजून इंडिकेटरही लावला नाहीये. आता आलीच गाडी नि चढले धकून त्यातच, आणि ती गेली जरी वेळेवर तरी ९.१५ - ९.३० होणार बसस्टॉपवर जाईपर्यंत. किती ते जर-तरचे डोंगर पार करायचे? आज तरी जायला हवं होतं नेहमीच्याच ट्रेनने. सगळ्या बरोबर असत्या, तर उभ्या उभ्या प्रवासाचं काही वाटलं नसतं.
९.३० झालेच शेवटी, आता बसच्या प्रतीक्षेत किती वेळ जातो कुणास ठाऊक! बस पटकन मिळाली, तर आजचा लेटमार्क वाचेल. बाकीच्या गेल्या असतील नेहमीच्या वेळेला.
'ती'सुद्धा गेली असेल, मस्त स्वतःच्या गाडीतून, खिडकीशेजारी बसून, वार्‍यावर उडणारे केस सारखे करत.. काल काय मस्त गुलाबी रंगाची लखनवी साडी नेसली होती तिने. तिच्या रंगाला खुलून दिसत होती. माझी लखनवी साडी दहा वेळा बाहेर काढून कपाटात ठेवली. कधी उशीर झाला म्हणून, कधी गर्दीच्या वेळी ऑफिसात पोचेपर्यंत पार चोळामोळा होईल म्हणून.. 'तिच्या सारखी गाडी असती तर.....!' तेवढं कुठचं भाग्य म्हणा. मग आहेच हाताला लागलेला पंजाबी ड्रेस - तोही शक्यतो पावसात, गाडीच्या गर्दीत चालेल असा. नाहीतर ट्राउझर झिंदाबाद. किती 'तिचा' विचार तो? 'तिच्या' खिजगणतीतही असू का आपण?? कशी भुर्रकन निघून जाते एखाद्या परीसारखी!
आणि केलाच जरी तिने विचार आपला, तरी काय.. कीवच करत असेल आपली.

***

हेवा.. हेवा वाटतो मला 'तिचा'! माझं मन अजूनही तिचाच विचार करत होतं. दगदग झाली, धावपळ झाली, घर चालवताना थोडीफार काटकसरही करावी लागली तिला, तरी ती राणी आहे तिच्या जगाची. निदान तिला मैत्रिणी आहेत, त्यांच्याबरोबर थोडाकाळ का होईना हसायचं, मनसोक्त मस्करी करायचं स्वातंत्र्य आहे तिला. तिचं हसू कसं स्वच्छ आहे एकदम, आकाशाच्या तुकड्यासारखं. नाहीतर मी.. काच खाली केली, तरी शेवटी खिडकीच्या चौकटीत दिसेल तेवढंच माझं आकाश नि तेवढंच माझं स्वातंत्र्य. नाही म्हणायला दिमतीला गाडी आहे. गाडी घेऊन कुठेही भटकायचं स्वातंत्र्य आहे, पण ह्याच्या इभ्रतीला शोभेल असंच.. म्हणजे किटीपार्टी, मॉल, मल्टीप्लेक्स वगैरे वगैरेच. त्याच्या म्हणण्यानुसार हाय स्टेटस जगायचं. सगळी सुखं विकत घेता येतील, इतका पैसा मिळवायचा आणि तो उपभोगायचासुद्धा. अक्षता दिमाखात गाडीने शाळेत जायला हवी, तेही IB School मध्ये. जे जे बेस्ट, ते ते सगळं तिला द्यायचं. त्यासाठी ह्या पार्ट्या आवश्यक. त्यातूनच क्लाएंटशी ओळख वाढते म्हणे. असेलही खरं त्याचं, पण त्यामुळे माझ्या ओळखीचा शेखर धूसर होत चाललाय ना, की मीच चुकतेय कळत नाही. आईलाही वाटतं माझंच चुकतंय, हे भिकेचे डोहाळे आहेत म्हणते...

पण मन परत परत 'तिच्या'भोवतीच फिरतंय. ती, तिचं जग, तिचा उत्साह, तिचा दमलेला तरीही आनंदी चेहरा... सगळं परत जुन्या 'मिता'पाशी घेऊन जातं. आरशात बघावं तसं. तिच्यात जुनी मिता शोधता शोधता, जुना शेखरसुद्धा कुठे हरवला ते शोधायला जावं, तेव्हा उमजतं कधी काळी किती चुकीचं गणित मांडल होतं आपण. दगदग, धावपळ करूनही तिच्या चेहर्‍यावर जो आनंद, समाधान दिसतं, ते मला गाडीतून प्रवास करूनही का मिळत नाही? तिच्याकडे गाडी नाही, तरीही ती आनंदी दिसते. शेखर म्हणतो तसं मिडिऑकर जगणं जगते ती, तरीही इतकी उल्हसित कशी असते? का तिच्या जगात अजूनही भावनांचंच पारडं झुकलेलं आहे म्हणून असं होतं? ते स्मित, तो उत्साह, ते समाधान मला ह्या ऐषारामात मिळत नाही, म्हणून मला तिचा हेवा वाटतो.
कितीतरी दिवस ठरवतेय वाळूत अनवाणी चालायचं. घामाच्या वासांनी गुदमरले तरी चालेल, पण गर्दीत हरवून जायचं. एकदातरी ही परीटघडी विसरून माणूस म्हणून श्वास घ्यायचाय. जमेल का? सतत स्टेटसचा विचार, त्याच त्याच लोकांशी बिझनेस पार्टीज, 'सोशल'च्या नावाखाली खोटंखोटं हसणं. ह्यालाच सुख म्हणतात का? बिझनेस एटीकेट्स, बिझनेस मॅनर्स, बिझनेस ग्रूप नि बिझनेस गप्पा.. इतके मिळवले, इतके गुंतवले.. नवीन गाडी घेतली, मग त्या अ‍ॅचीव्हमेंटचं प्रदर्शन म्हणून फॉर्मल पार्ट्या. तशीच बायको नावाची वस्तू ह्या सगळ्या अ‍ॅचीव्हमेंटपैकी एक.
पूर्वी असं अगदी नव्हतं ना...
कुणालाच त्रास होत नाही ह्याचा. ना आईला, ना बहिणीला, ना वहिनीला, भावाला, बाबांना, दिराला, नवर्‍याला. कुण्णाकुण्णालाच होत नाही. मग मलाच का होतो?
का मन सारखं सारखं बंद दारावर धडका मारतं? सोन्याचा झाला तरी हा पिंजराच शेवटी, असं मलाच का वाटतं?

***

शेवटी लेटमार्क लागलाच. हा या महिन्यातला दुसरा लेटमार्क! अजून एक झाला, तर हाफ डे कट होणार... मनूच्या वाढदिवसाला एक सुट्टी नक्की आहे. तरी नशीब सध्या कुणाची लग्नकार्यं नाहीयेत.. श्रावणातली सवाष्णदेखील आता सोयीने रविवारी चालते, सवाष्ण जेवायला येणारीला तरी कुठे सुट्टी घेणं परवडतंय त्यासाठी? तरीही सुट्ट्या वाचवायला हव्यात. आजारपणं, न जाऊन चालणार नाही अशी लग्नकार्यं नि अजून काय काय. तिथे सुट्ट्या जाणारच आहेत, अशी लेटमार्कपायी गेलेली फुकटची सुट्टी नाही परवडायची.

असा विचार करत करत टेबलापाशी येऊन कामाला लागताच ऑफिसमध्ये असलेल्या एसीचा सुखद गारवा मनालाही थंडावा देऊन जातो नि त्यासरशी एसी=श्रीमंती, एसी=सुखवस्तूपणा असा विचार मनात शिरताशिरताच तो गारवा 'तिची', त्या 'गुलाबी लखनवी साडीवाल्या परीची' आठवण करून देतो.
मज्जा असेल नाही तिची. गाडीची गर्दी सहन करणं नको, घामाच्या बजबजपुरीत घामेजलेलं होऊन निघणं नको, इस्रीची पार वाट लागेल म्हणून दहा वेळा विचार करून साडीची घडी मोडणं नको आणि आज काय पाणी साठलं म्हणून ट्रेन लेट आहेत, उद्या काय ओव्हरहेड वायर तुटली म्हणून खोळंबा आहे, असली कारणंही नकोत. मस्त गाडीत बसायचं, परीटघडीचे कपडे जस्से सकाळी, तस्सेच शेवटपर्यंत संध्याकाळी. नाहीतर आम्ही! कॉटनची साडी तर नेसायलाच नको गर्दीत. आणि मस्त नवर्‍याबरोबर ऑफिसला जायचं. नवराच सोडत असेल तिला. म्हणजे ओझरतंच बघितलंय बसस्टॉपवर उभं असताना, पण निमालाही नवराच वाटलेला तो तिचा. शोफर नसावाच तो. किती गप्पा मारतमारत, हसतखेळत जात असतील ना दोघं. नाहीतर आम्ही... फोनवर फक्त विचारणार - 'आज काय आणायचंय? काय संपलय? ह्यांव नि त्यांव'. गप्पा मारायला ना त्राण, ना वेळ. काही वाटलं, खुपलं, आवडलं, तर पहिले कळणार आमच्या ग्रूपला, ट्रेनमध्ये. कारण तोच तेवढा आमचा आमच्यासाठी विचार करायचा वेळ.
म्हणून तर, पेपर वाचायचा, ट्रेनमध्ये.
यादी करायची, ट्रेनमध्ये.
केळवण, हळदीकुंकू, डोहाळेजेवण, सगळं ट्रेनमध्येच.
"हॅलो! हॅलो!"
"हम्म, बोला.."
"अगं पोचलीस का नीट? आज लेट होत्या ना गाड्या? बसायला मिळालं का थोडावेळ तरी? बरं, आज निघालीस. की मला आठवण कर - येतानाच मनूचा युनिफॉर्म घेऊन यायचाय इस्रीवाल्याकडून, नाहीतर रात्री पुन्हा धावपळ होईल. आणि काहीतरी मागवून खा बाहेरून, आज नाष्ट्याचा डबा घरीच विसरलीस धावपळीत."
"होऽऽ, मागवते काहीतरी आणि करते तुला फोन नंतर. चल, ठेवू आता? आधीच लेटमार्क झालाय म्हणून साहेब खवळलाय" म्हणत मी फोन ठेवला नि कामाला लागले.
अशी अधूनमधून चौकशी करतो, नाही असं नाही. पण काल म्हटलं, 'ती नॅनो काय आलेय ना टाटाची. तर करूयात का SBIमध्ये लोनसाठी अर्ज?' तर म्हणे, 'हवीये कशाला कार? आपण रोज करणार ट्रेनचीच सवारी नि त्याच्या पेट्रोलसाठी दुसरं लोन काढावं लागेल त्याचं काय?'
थोडीही महत्त्वाकांक्षा नाही ह्या माणसात. कित्ती स्वप्न बघते मी, आमचं स्वतःचं घर असेल, घरापुढे बाग, एकतरी गाडी. एसी नसली, तरी चालेल. रोज ट्रेननेच जायचं झालं, तरी कधीतरी कुठे जायचं झालं की आरामात-सुखात, परीटघडी विस्कटेल, गर्दीत जीव घुसमटेल ह्याची पर्वा न करता जाता येईल. तो, मी नि मनू. टॅक्सी केली, तरी स्वतःच्या गाडीचं सुख मिळणार आहे का?
किती दिवसांत आमचे आम्ही म्हणजे मी, नवरा नि लेक कुठे गेलो नाही आहोत. कधी मिळेल तिच्यासारखं गाडीतून फिरायला? मग ती गर्दी नको, घामाची घुसमट नको नि परीटघडी मोडते म्हणून लखनवी साडी परत कपाटात ठेवणं नको.
हम्म! पुन्हा रमलं मन स्वप्नरंजनात...

***

काय झालंय मला? पुन्हा वेडं मन स्वप्नं बघायला लागलं. खरंच कधी हसू शकेन मी तिच्यासारखी मनमोकळं? कधीतरी मिळतील का मलाही सख्या जिवाभावाच्या - तिच्या ग्रूपसारख्या? अशी एकतरी जागा असेल का, जिथे मी हसू शकेन, रडू शकेन, मोठ्याने ओरडू शकेन, हा स्टेटसचा मुखवटा फेकून?
पूर्वी कधीतरी आईला, बहिणीला नि अगदी माझ्या जन्माचा सोबती असलेल्या नवर्‍यालाही हे सांगून बघितलं. सगळ्यांनी 'काय वेड लागलंय हिला,' असं बघितलं माझ्याकडे. खरंच का हे इतकं वेड्यासारखं मागणं आहे? का सतत पैसा एके पैसा नि पैसा दुणे पैसा अशा व्यापारी जगात मन नावाच्या गोष्टीला जागाच नाहीये?

किती सुखी असेल ना ती! कामावरून दमून घरी गेल्यावर, प्रेमाने विचारपूस करणारा नवरा, करत असेलच तिची विचारपूस तो. किती उत्साही नि आनंदी दिसते ती स्टॉपवर असते तेव्हा! काय बोलत असतील ते दोघे? कदाचित वाण्याची यादी नि भरायची बिलं, एकत्र बघितलेली स्वप्नं, आपण पूर्वी बघायचो तशी... असेना का तसंच... पण संवादतरी होतो त्यांचा. एकमेकांना जाणून घ्यायला वेळतरी देता येत असेल त्यांना. थोडीतरी समजत असतील ना त्याला तिची स्वप्नं, तिचे विचार. मुखवटा घालून तरी वावरावं लागत नसेल ना तिला सदासर्वकाळ. गर्दीतून धक्के खात येतानाही तिला तिच्या जिवाभावाच्या सख्या आहेत मन हलकं करायला. मी कुठे जाऊ??

इतके महिने तिला रोज बघतेय गाडीतून. आता हा जाणारे दिल्लीला, तेव्हा द्यावी का तिला लिफ्ट? वाढवावी का ओळख तिच्याशी? आणि सांगावं का तिला, बाई गं तुला ठाऊकही नसेल, की तू कित्ती कित्ती भाग्यवान आहेस, नि हो माझ्या स्वप्नांतली परी आहेस म्हणून?

***

उद्या नाही असा उशीर करायचा. रोजची गाडी नि रोजचा ग्रूप अजिबात चुकवायचा नाही. आपल्याला काय येणार आहे का तिच्यासारखी गाडी सोडायला नि आणायला? मग उगाच का त्रास? मनोज म्हणतोय तेच खरं, सध्या आपल्याला गाडीची तशी गरज नाहीये. मनूसाठी कपाट करून घ्यायचंय, नवीन वॉशिंग मशीन घ्यायचंय, बोअरवेलचं एक कनेक्शन बाथरूममधून फिरवून किचनमध्ये घ्यायचंय. गाडी काय घेऊ पुढेमागे जमलं तर. तोपर्यंत आहेच आपली 'राष्ट्रीय संपत्ती!' तिचं जग वेगळं, आपलं वेगळं. आपण आपली झेपतील, ती स्वप्नं बघावीत हे बरं.

पण खरंच कधी चुकूनमाकून ओळख दिलीच तिने... अर्थात ती कशाला देईल म्हणा ओळख... तरीही.. दिलीच ओळख, तर सांगणार आहे तिला, 'तू खूऽऽप खूऽऽप भाग्यवान आहेस.. अगदी माझ्या स्वप्नांतली परी आहेस' म्हणून.

(पुर्व प्रकाशित मायबोली दिवाळी अंक २००९)

मंगळवार, ८ सप्टेंबर, २००९

दृष्टीभ्रम

आज आमच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस.... घराचं गोकुळ झालंय अगदी! मला तर चहाचा साधा कपदेखील कोणी उचलू देत नाहीये! प्रत्यक्ष लग्नातदेखील येव्हढा उत्साह नव्हता आमच्या! एकतर माझे आई बाबा वेगळे झालेले, त्यांच्या काळात ही गोष्ट थोडी जडच होती समाजात पचायला.... आज काल सहा महिन्यात काडीमोड झाल्याच्या घटना ऐकू येतात!
मग माझी रवानगी आई बरोबर मामाच्या घरी. आई नोकरी करायची, आम्ही थोड्याच दिवसात सिंगल रुम का होईना, पण स्वत:च्या जागेत गेलो होतो रहायला... पण शेवटी सगळ्यांचे बाबा संध्याकाळी घरी आले की एकटं एकटं वाटायचं. मग बसायचे माझी मीच एकटी डायरी लिहीत. ...
ही डायरी मला बाबांनी दिलेली वाढदिवसाची भेट म्हणून. तो शेवटचा एकत्र वाढदिवस. मग पुन्हा कधीच बाबा आमच्यात आले नाहीत. आईला आवडायचं पण नाही ते आलेले, म्हणून मग यायचेच नाहीत कधी भेटायला. आम्ही घरातून निघताना मात्र मला जवळ घेऊन रडले, म्हणाले, "तुझं लग्न बघायचं भाग्य आहे की नाही, नाही ठाऊक! पण बाळा, पाठवणीचं दु:ख अनुभवतोय..." अर्थ कळायचं वय नव्हतं तेव्हा, पण वाक्य लक्षात राहण्याइतपत मोठी होते मी. अर्थात माझ्या समोर रडणारे बाबा, मी प्रथमच पहात होते.
मी आणि आई बाहेर पडलो, तेव्हा ही डायरी मी हळूच ठेवली माझ्या पिशवीत.
आईपण छानच होती माझी! दोघेही छान होते, पण हा मधे कोणता "पण" आला ते कळलंच नाही कधी. मोठेपणी आईला विचारलं एक दोनदा पण "तो विषय संपला" अस म्हणून गप्प बसायची. मग जेवायची देखील नाही त्या दिवशी, म्हणून मीच विचारणं सोडून दिलं....
माझी आजी कधी कधी आईला म्हणायची, "नातं अस तोडू नये, एक चूक किती काळ धरुन ठेवायची?"
आईचे डोळे पाण्याने भरायचे, पण ती बोलायची काहीच नाही, नुसतीच मला जवळ घेऊन बसायची मग.
आई छान होती, आवडत होती तरीदेखील थोडा राग यायचा तिचा. तिच्यामुळे मला असं बाबांशिवाय रहावं लागतं म्हणून. कॉलेजमधे गेले तेव्हा अजूनच बंडखोर झाले मी. आईशी भांडून बाबांकडे जाऊन राहिले काही दिवस! पण त्यांनी मधल्या काळात दुसरं लग्न केलं होतं. मला नाही जमलं तिला आई म्हणणं. कितीही भांडून, बंड करुन आले असले बाबांकडे तरीही! जुने बाबा थोडे हरवलेच होते! की मलाच तसं वाटलं देव जाणे... मग परत एकदा आईकडे आले.
तिने एका शब्दानेही विचारल नाही "तिथे काय झालं? परत का आलीस?" म्हणून. बरंच झालं म्हणा! आमचं परत एकदा जुनं रुटीन सुरु झालं. मी शेवटच्या वर्षाला असताना आई गेली आणि तिची बाजू नीटपणे माझ्या समोर येण्याआधीच त्याला पूर्णविराम मिळाला.
कॉलेज संपल्या संपल्या माझ्या लग्नाचं बघायला सुरुवात झाली. माझ्या लग्नात मामाने कन्यादान केलं. "ह्यांच" स्थळ शेजारच्या काकूंच्या माहितीतलं म्हणून फ़ारशी चौकशी न करता झटपट लग्न झालं आमचं. "हे" दिसायला सुंदर, शिक्षण नोकरी पैसा-अडका ह्या सर्वच बाबतीत उजवी बाजू. माझं रूप ह्या एका गुणा(?)मुळे आमच लग्न जुळलेलं.
"लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतो हो" असं कौतुक झेलत माप ओलांडलं तरीही "आई वडील नाहीत तर कसले मानपान हो, आता वर्षसणही असेच .." हे कळ आणणारं वाक्य कोणीतरी बोललेलं ऐकू आलंच! दुधात मिठाचा खडा पडावा तसं. लहानपणापासूनच अशा काही वाक्यांची सवय झाल्याने मनाला ते टोचणं सवयीचं झालेलं इतकंच.
ह्यांनी कधी तसं जाणवू दिलं नाही, पण काही बाबतींत फारच विचित्र वागायचे. साधी पावडर लावली तरी "कुणासाठी नटत्येस?" असं विचारुन संशय घ्यायचे. बाहेर जाताना "कधी जाणार? कुठे जाणार? कोण बरोबर आहे? किती वाजता येणार परत?" सगळा सेकंदा-सेकंदाचा हिशोब द्यावा लागायचा. हे काळजीपेक्षा अधिक काही आहे हे जाणवायचं. कोणी माझं कौतुक केलेलं चालायचं नाही, कोणत्याही बाबतीत मी वरचढ ठरलेलं खपायचं नाही.... येव्हढं सोडता, बाकी चांगलेच होते. मी आजारी पडले की रात्र रात्र उशाशी बसून रहायचे. स्वत:च्या हाताने भरवायचे. कामं देखील करु द्यायचे नाहीत!
माधवीच्या वेळेस डोहाळे कडक लागले होते, तर फुलासारखं जपलं होतं त्यांनी. घरात मोठं माणूस नव्हतं काळजी घ्यायला, पण मामाकडे न पाठवता स्वत:च सगळी देखभाल केली. पण ते सगळं त्यांच्या पद्धतीने, ते ठरवतील तसंच. ते म्हणतील ती पूर्व म्हटलं की सगळंच आलबेल.
मधल्या काळात मी नोकरी करत नव्हते. मन हलकं करायला मग पुन्हा लिखाणाकडे वळले. माझ्या लिखाणाचं कौतुक करायचे, तरीही जाणवायचं, "ते कौतुक करतात माझ्या लिखाणाचं, पण दुसर्‍या कोणी तसं कौतुक केलेल नाही खपायचं!". तिथे कबूल करायचे नाहीत "इगो" दुखावतो ते, पण काहीतरी कारणं काढून धुसफ़ुसत रहायचे....
सुरुवातीला गोड बोलून बघितलं, पण मुळात असं काही आहे असं मानायचेच नाहीत. सगळे आले की मात्र मुद्दाम बोलवायचे बाहेर आणि सांगायचे, त्यांना किती कौतुक आहे ते. आत कुठेतरी सलायचा हा देखावा. पण जगाला दाखवता येणारं अस दु:ख नव्हतंच काही, मग काय सांगायचं कुणाला?
माहेर असं नव्हतंच, म्हणून कोणाशी बोलणार हे सल? आतल्या आत दाबत गेले इतकंच. किती वेळा विचार यायचा, असला कसला हा संसार? पण डोळ्यासमोर छोटी मी यायचे, हातात डायरी घेऊन बसलेली. माधवी आणि मधुकरवर ती वेळ येऊ नये, म्हणून पायात बेड्या पडल्यासारखी दचकून मागे व्हायचे!
मुलं मोठी होत गेली तसं त्यांनाही जाणवायला लागला स्वभावातला हा फ़रक.
"आई तू का झुकतेस नेहमीच?" १४ वर्षाच्या बंडखोर मधूने मला विचारल होतं.
"मग काय करायला हवं होतं?" ह्या माझ्या प्रश्नावर "वेगळं व्हायचंस", नाहीतर "अरे ला कारे तरी करायचस कधीतरी..." असं उत्तर देऊन मोकळी झाली होती.
"सोप्पं होतं का गं ते, एकदा आईवडिलांच्या संसाराची फरफट बघितल्यावर?" माझी लहानपणी झालेली कोंडी अनुभवल्यावर असं विचारावसं वाटूनही मी गप्प राहिले.
आताशा गप्प रहाण्याची सवयच झालेय म्हणा.... "मला भांडण तंटा नकोय आणि तुम्हीही माझ्यासाठी, माझ्यावरुन वाद नका घालू पिल्लांनो..." येव्हढंच कसबसं म्हणू शकले मी तिला.
माधवी लग्न होऊन सासरी गेली. माधवी, मधुकर दोघांची आयुष्यं मार्गी लागली. ह्यांच्या कर्तव्यपूर्तीत अजून एक शिरपेच खोचला गेला. मी तशीच "लक्ष्मी नारायणासारखा जोडा आहे हो..." ह्या शब्दाला धरुन राहिले.
आज आमच्या लग्नाचा वाढदिवस, ५० वा. किती वर्ष गेली नाही अशीच! आता हेदेखील पूर्वीचे "हे" राहिलेले नाहियेत. कान - डोळे साथ सोडून चाललेत. मग ही म्हातारी, काठी म्हणून लागते सोबत. स्वभावासकट सोबतही सवयीची झालेय माझ्या.
बाहेर तो नातवाने फ़ोटोंचा स्लाईड शो का काहीतरी लावलाय, तसाच एक आत मनात उमटतोय इतकच.
आता इतक्या वर्षांनंतर कसला आलाय खेद आणि खंत? पार पलिकडे गेलंय मन त्याच्या. वेगळी होऊनही आई कुठे सुखी झाली? नी एकत्र राहूनही मी असं काय साधलं मोठं? काहीच नाही म्हणा, किंवा सगळं भरुन पावलं म्हणा. सगळा दृष्टीचा भ्रम, झालं.....
"आS ई! अण्णा..SS ! इकडे बसा.." लेकाने हाताला धरुन मुद्दाम सजवलेल्या खुर्चीवर बसवलं. सुनेने आग्रह करुन करुन खास ह्या समारंभासाठी घेतलेल्या पैठणीची घडी मोडायला लावलेय आज. मोत्याचा सेट पण घालायला लावलाय. "तू मुद्दाम जगाला दाखवायला नटतेस" अस म्हटल्यामुळे कपाटाचं धन झालेला हाच तो मोत्याचा सेट. माझी जुनी पैठणी तर कधीचीच विरली तशीच. मी धूसर दिसणार्‍या डोळ्यांनी आजुबाजुला बघितलं.
"आSS जी! इकडे बघ! से चीSSSज...!"
"ए आजी ! तो क्यूटसा मोत्याचा सेट जरा बाहेर काढ ना... फ़ोटोत झाकला जातोय पदराने..."
"आजी आजोबा थोडं क्लोज बसाना, नी थोडं अजून स्माईल द्या..... "
"आई नाव घ्या!"
"छे गं! नाव बिव काय आता घ्यायच?" मी ह्यांच्याकडे हळूच बघत म्हटलं...
तेव्हा ह्यांनी मधुकरला जवळ बोलवून काहीतरी सांगितलं. नातवंडांच्या ह्या गलक्यात मग मधुकरने घोषणा केली, "आता अण्णांना काही बोलायचंय..."
सगळे शांत बसले. ह्यांनी बोलायला सुरुवात केली....
सुरुवातीची औपचारिकता संपवून ह्यांनी आमच्या सुखी संसारावर एक कविता म्हटली, नी त्यात चक्क माझेही आभार मानले! म्हटलं, चला! भरुन पावल! सगळेच भ्रम नसतात म्हणायचे!
रात्री निजताना ह्यांनी विचारलं, "काय. कसं वाटलं आजचं आभार प्रदर्शन?" दोन दिवस पाठ करत होतो! त्या जेष्ठ सेवा संघातल्या नान्याकडून लिहून घेतलेलं.... झाल की नाही फ़र्मास?"
"हो छान झालं." मी सवयीने म्हटलं.
"आराम कर आता. उद्या तुझे डोळे तपासायला जायचंय मोतिबिंदूसाठी..." हे म्हणाले नी घोरायला देखील लागले!
"खरंय! माझी दृष्टी दगा देते खरी... " मी त्यांच्या अंगावरचे पांघरुण नीट करत म्हटले,नी पुन्हा एकदा डोळे मिटून घेतले.....

गुरुवार, ६ ऑगस्ट, २००९

मुखवटा

बरा असतो नाही कधी कधी
मुखवटा, सोयीचा नी सवयीचा
अगदी आरशाच्याही ओळखीचा

नाहितरी तो काढल्यावर
चेहरा ही दचकुन मागे बघतो
स्वतःची ओळख शोधायला

तेव्हा मुखवटाच मागे हसत असतो
कारण चेहर्‍याची ओळख जाणणारा
जगात तोच एकटा असतो

आरसाही फसु शकतो तर माणसाच काय?
-------------------------------------

मुखवटा आहे म्हणुन तर;
चेहर्‍याला मनसोक्त रडता येते
जग काय म्हणेलची पर्वा न करता;
मुखवट्या आड का होईना, व्यक्त होता येते

मुखवटा आहे म्हणुन तर;
तो आरश्यालाही फसवु शकतो
भाव असतात लपवायचे
म्हणुन तर मुखवटा असतो

त्याच्या एकलेपणाला
मुखवटाच तर साथी असतो
कधी तो, तर कधी; मुखवटा
त्याला समजावतो
दुखवटा साजरा करायलाही
त्याला मुखवटाच जवळचा वाटतो

(माझ्या दोन मित्रांच्या कविता वाचुन सुचलेल्या काही ओळी)

बुधवार, ५ ऑगस्ट, २००९

कथा फॉर्म्युल्याची

"वाकडे गावच्या सुजाण नागरिकांनो ऽऽऽऽ... खुषखबर! खुषखबर!! खुषखबर!!! उद्या दिनांक १ एप्रिल रोजी समस्त वाकडेवासीयांसाठी एक आगळी वेगळी भव्य जत्रा शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आली आहे...ऽऽऽ"
‘पीऽऽऽऽ... मा‌ईक टेस्ट टेस्ट’ मधेच असले आवाज काढत ह्या जेमतेम १००० डोकी असलेल्या गावची भव्य(?) जत्रा गावातल्या एकुलत्या एका शाळेच्या पटांगणावर (म्हणजे वर्गांसमोरच्या जागेवर) असल्याचं सांगत एक रिक्षा गावभर म्हणजे ४ गल्ल्यांतुन २० वेळा फिरत होती. मी माझ्या रद्दीच्या दुकानात बसून ही सगळी मिरवणुक म्हणजे ती फिरणारी रिक्षा, त्याच्यामागे पळणारी मुलं बघत होतो. रविवार असला तरी बायको अजुन तिच्या माहेरुन आली नसल्याने मी निवांत होतो. बाहेरगावचे एक पाव्हणे एसटीची वाट बघत माझ्या दुकानात बसलेले तेव्हा.

तेव्हढ्यात समोरुन शिरपा आला नी मला म्हणला "गणप्या, जायचं का मग जत्रेला?"

"जा‌उयात की..." मी म्हटलं त्याला, "नाहीतरी घरी कोण आहे वाट बघायला..."

"पाव्हणं, हा शिरपा बर का. माझा जानी दोस्त. पूर्वी मेंढ्या चारायला जायचा. गावातली हवा बदलली तसा थोडाफार शिकून त्याने स्टेशनरीच्या धंद्यात उडी घेतली. वह्या, पेनं विकता विकता पांढऱ्यावर काळं करायचा नाद लागला त्याला नी आमची दोस्ती आवडीच्या ह्या एकाच रुळावरुन धावू लागली."

"गणप्या, तुला सांगतो ही सगळी वाकडे गुरुजींची पुण्या‌ई बाबा! गेल्या वर्षी कथा स्पर्धा काय, आता ही जत्रा काय, काही वर्षांपूर्वी हेच गाव अंगुठा छाप होतं वाटेल काय कोणा नवख्याला?" शिरप्याचा पॉ‌ईंट बरोबर होता.

"होय रे होय, शिरप्या. माझ्या धंद्याला पण बरकत आलेय त्यामुळे. पाव्हणं, शिरपा म्हणतोय ते अगदी खरं, बरं का. आमच गाव तस छोट असलं तरी १००% साक्षर आहे बर का. त्यातून लिखाणाची सगळ्या गावाला आवड! च्यामारी, बिगरीतला पोर पण लिहीतोय नी ६० वर्षाचा आजा पण लिहीतोय! वाचायलाच कोण नाही अशी परिस्थिती."
"काही वर्षांपूर्वी हे गाव वाकडे नावाच्या गुरुजींनी शाळेच्या प्रेमाखातर जवळ केलं, त्याच्या आधी अंगुठा छाप असलेल्या गावाला मास्तरांनी लिहायला वाचायला (म्हणजे लिहीलेल वाचायला) शिकवल. म्हणुन गावाच नाव बदलुन वाकडे अस झालं. त्यांचा जन्मदिवस १ एप्रिल म्हणुन त्या दिवशी शाळेत असे काही ना काही कार्यक्रम होतात."

"कसली असेल रे ही जत्रा, शिरप्या?" माझ्या मनातली शंका वर आलीच.

"मला तरी काय माहीत मित्रा. कळेलच की गेल्यावर तिथे. शाळेच्या पटांगणावर आहे म्हणे."

"हो रे हो. चल आता भेटू तिथेच संध्याकाळी बरोब्बर पाच वाजता."

"गेल्या वर्षी कथा स्पर्धेत मी आणि शिरपा, आम्ही दोघांनी भाग घेतलेला. तेव्हा एक साचा आणलेला त्याने, म्हणे त्यात फिट बसवायची कथा. स्टेशनरीच सामान घ्यायला घावुक बाजारात जातो, तिथुन काही ना काही अस आणत बसतो. मग पहिला उद्घाटनाचा मान माझाच. पण तो साचा गेला तुटुन नी कथा पडली मोडुन... असो! पुरे झालं माझं गुऱ्हाळ. तुमची पण एसटी आली पाव्हणं समोर. आता मीही झोपतो थोडावेळ की गाठतो शाळा."

-------------------------------------------------

"शिरपा, आत जायला वर्गणी दिसतेय गड्या."

"हे नविन खुळ म्हणायचं!"

"शिरपा, सुट्टे पैसे आहेत का? मग माझ पण तिकिट काढ जरा मी पाकिट घरीच विसरलो."

"गणप्या, ही घे तिकिटं आणि खिशात ठेव सांभाळून. उगाच हातातून गळून पडली आणि इथे एखादा मॉरल पोलिस असेल तर फुकाचा दंड बसेल!"

"हे बाकी खर बोललास, गड्या." त्याने पुढे केलेल्या हातावर मी टाळी देत म्हटलं.

"हि कसली जत्रा म्हणायची, गड्या? आकाश पाळणे नाहीत, नेम धरुन फुगे फोडायचा खेळ नाही, खाजा नाही. काय रे हे गणप्या?"

"हो रे! सगळे नुसते स्टॉल दिसतायत कसले कसले. अबब! इकडे बघ स्वागत फलक काय लिहिलाय तो, शिरपा. साहित्य रसरंजन जत्रा".

"हि कुठली नविन जत्रा?"

"अरे, ते बघ तिकडे, उजव्या हाताला... ओळीत सगळे स्टॉल प्रकाशन मंडळाचे दिसतायत."

"त्याच्या आधी हा कसला स्टॉल आहे? नाव वाचता येतय का रे तुला? काय बरं?"

"अं...अं... हम्म! दिसलं नाव... ‘नवरस स्टॉल’! काय सरबत-बिरबत विकतायत कि काय येव्हढी गर्दी दिसतेय तिथे तर?"

"गणप्या, हे बघ. डावीकडे अजिबात गर्दी नसलेला स्टॉल. तुझ्या दुकानासारखी सगळी रद्दी लावलेली दिसतेय तिथे."

"शिरप्या, येड्या, तो पुस्तकांचा स्टॉल आहे! रद्दीचा नाही..."

"सगळे लिहिणारे वीर असलेल्या गावाच हे अस होत, शिरपा! सगळेच लिहिणारे, वाचणार कोणीच नाही... म्हणुन इथे गर्दी नाही!"

"तहान लागली रे मित्रा. तिथली त्या सरबत वाल्या स्टॉलवरची गर्दी पण कमी झालेय. जा‌उयात का तिथे?"

"चल की मग, शिरप्या... विचारतोस काय असा"

"अहो स्टॉलवाले, दोन लिमका द्या."

"साहेब, इथे लिमका नाही." इति स्टॉलवाला.

"काय म्हणता! लिमका नाही? मग काय आहे दुसरं?"

"साहेब, हि प्यायची सरबतं नाहीत, हि भावनांची सरबतं आहेत! ह्या बाटल्यांमधे साहित्याचे नवरस आहेत." पुन्हा त्या स्टॉलवाल्याने तोंड उघडले.

"म्हणजे कथेत असतात तेच?" मी त्याला टोकत विचारले.

"होय साहेब, तेच आहेत हे." पुन्हा तोच स्टॉलवाला उत्तरला.

"हा!हा!! शिरप्या, ऐकलस का हे काय म्हणतायत ते? हे साहित्याचे नवरस आहेत. तू जागा चुकलास गड्या. हि घशाची तहान भागवायची सरबतं नाहीत, ही तर लिहायची हौस भागवायची सरबतं आहेत!"

"नाही, नाही. स्टॉलवाले, मी तुम्हाला नाही हसत आहे... पण हे काही पटत नाही बॉ मला."

"तस नाही सर, हे आमच्या प्रकाशन कंपनीच नविन प्रॉडक्ट आहे. ह्या ९ रसांच्या ९० च्या वर बाटल्या आहेत. साध्या करुण रसात पण स्वदेशी, विदेशी, घरघरकी कहानी छाप, माहेरची साडी फ़ेम, आ‌ई तुझी आठवण येते टा‌ईप, आर्थिक, सामाजिक असे बऱ्याच प्रकारचे कारुण्य मिळेल तुम्हाला इथे...! इतकच नाही, हास्यरसात पण दादांपासुन आबांपर्यंत सगळ काही आहे. अशा प्रत्येक रसाच्या बाटल्या भरलेल्या आहेत साहेब. प्रेमरस, करुण रस, हास्य रस, गुढ- चमत्कार, वीर रस सगळं सगळं आहे इथे!आता बोला! काय दे‌ऊ?"

"अरे अरे! हो कळलं हे नवरस आहेत ते. पण करु काय मी हे घे‌ऊन? काय रे शिरप्या, तुला तरी माहीत आहे का ह्याच काय करायच ते?"

शिरप्याही अजुबा बघितल्या सारखा त्याच्याकडे बघत होता... मानेने मला ‘नाही नाही’ असं काहीतरी सांगत होता.

"काय विचारता, साहेब तुम्ही, ह्याच करायचं काय म्हणुन! अहो गोष्ट लिहितात हे वापरुन. आजकाल अशीच लिहितात गोष्ट. ह्यातल्या हव्या त्या रसाच्या बाटल्यांमधले चमचा चमचा मिश्रण एकत्र करायच नी कागदावर ओतायच, कि झाली तयार गोष्ट!!"

"स्टॉलवाले, अशी होते गोष्ट तयार? इतकं सोपं असतं होय? गेल्यावर्षीचा शिरप्याने आणलेला नी आता मोडलेला साचा अजुन पडलाय माळ्यावर. त्यात अजुन ह्याने जागा अडवू म्हणतोस? मग बायको मलाच दे‌ईल अडगळीत टाकुन."

"हे!हे! साहेब. विनोद करता काय? अहो ह्या बाटल्यांबरोबर मिश्रण करायचा एक फ़ॉर्म्युला पण देतो की, तो वापरला कि सगळ सोप्प!"

"खोट वाटतय तुम्हाला?" माझ्या चेहर्‍यावरचा अविश्वास बघुन त्याने विचारले. "तुम्हाला प्रात्यक्षिकच करुन दाखवतो. पण आता स्टॉक संपत आलाय, तुफ़ान विक्री झालेय. तरी या इथे. दाखवतो तुम्हाला आहे त्याच्यातच." ...

"हं! तर हे आपल मिश्रण. १ चमचा प्रेम, १ चमचा कारुण्य, १ चमचा गुढ/चमत्कार, १ चमचा विनोद. आता ओतुयात कागदावर. तय्यार?... साहेब, बघा इथे ह्या कागदावर. झाली तयार गोष्ट. वाचा आता."

"इतक्यात झाली तयार? काही विचार नाही, मंथन नाही... हे म्हणजे रेडी टू इट फुडस सारख झालं... झटपट दो मिनिट मे तय्यार!" मी अवाक होत म्हटलं.

"गणप्या, तू वाच रे. माझा चष्मा राहिलाय घरी..." म्हणत शिरप्याने मला पुढे केलं.

"बघु हो स्टॉलवाले. द्या. मी वाचतो मोठ्याने. ऐक रे, शिरपा, तू पण..."

"किर्रऽऽऽर! दिवेलागणीची वेळ, पिंपळाच्या पाराच्या दिशेने कोणीतरी येतय. वाचवा.........! हि कोणाची किंकाळी? थांबा तिच्या मागे जा‌ऊ नका. धोका आहे तिथे. तो पिंपळाचा पार चकवा लावण्यासाठी प्रसिद्ध आहे, ती नक्कीच गंगी आहे...

गेल्यावर्षी इथेच भेटायची दोघं; पिंपळ साक्षी आहे त्यांच्या प्रेमकहाणिला. पिंपळाचा पार भेटायला सर्वात सुरक्षित कारण भुताच्या भितीने गावकरी फिरकत नाहीत तिथे. त्याचाच फायदा घे‌ऊन ‘युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असत’ म्हणत ते इथे भेटत. ह्याच पिंपळाला साक्षी ठेवुन त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या नी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता लग्न केलं. पण फसली बिचारी. वर्षभरातच प्रेम आटल नी गंगीने विहीर जवळ केली...

पळा पळा ती इथेच येतेय. आपल्या दिशेने. तिने गाठलं आपल्याला की संपलो आपण. जिवाच्या आकांताने पळा. रामनाम घेत रहा. वेग वाढवा. तिच्या तावडीत सापडालो तर सुटका नाही आपली. त्या विहीरितुन सुखरुप बाहेर काढल्या पासुन भ्रमिष्ट झालेय ती. एकच नाद उरलाय तिला. ती कथा लिहित फिरते. त्याही भुतांच्या. त्यांचा शोध घेत इथे येते पारावर. भुत भेटतात की नाही माहीत नाही पण भेटणार्‍या प्रत्येकाला भूत समजुन ती तिच्या हातातली प्रश्नपत्रिका वाचायला देते. तिला म्हणे भुतांवर रियालिस्टीक लिहायचय. पुन्हा किंकाळी, वाचवा...! गंगी आलेय"...

"ओ स्टॉलवाले, हि काय गोष्ट झाली?"

"का हो सर, ह्यात सगळं काही आहे की. बघा ना. प्रेम आहे, कारुण्य आहे, विनोद आहे, गुढ आहे. आपलं मिश्रण बरोब्बर आहे की प्रत्येकी एक चमचा. मग दे‌ऊ का बांधुन ५० रुपयाच मिश्रण? गंडलेय म्हणता कथा? अहो हे राहिलेलं मिश्रण होतं म्हणुन असं वाटलं असेल तुम्हाला. ९ रसांच्या फ़ुल्ल भरलेल्या बाटल्या देतो तुम्हाला आणुन गोडा‌ऊन मधुन. मग तर झाल?"

"शिरप्या, चल लेका, हे आपलं काम नाही. आपण आपलं रद्दीच दुकान सांभाळाव हेच खरं. शिरपा, तुला माहितच आहे आपल्या तुटलेल्या साच्याचा नी त्यापायी मोडुन पडलेल्या कथेचा इतिहास. आता विचार करता लक्षात येतय, हातात मिश्रण असलं, फॉर्म्युला लिहिलेला असला तरी शेवटी आत मनाच्या कागदावर उमटत नसेल तर सगळ फुकट आहे बघ वरच्या धुरकट कथेसारख...!"

"काय आहे ना, आपल्या गाववाल्यांची पण काही चुक नाही ह्यात. आत्ता कुठे ह्या नवरसाच्या बाटल्या हाती लागल्यात त्यांच्या. खेळणं म्हणुन वापरत असले ना ते आत्ता, तरी त्यांच तेच शिकत जातील हळु हळु आणि खात्री आहे मला मग ह्या बाटल्या बरोबरच्या फॉर्म्युल्याशिवाय फक्कडशी कथा लिहितील!"

"आणि बर का, स्टॉलवाले, तुमच्या फॉर्म्युलाचा आधार नका दे‌ऊ एकवेळ. पण चुकत माकत लिहिताना पडलोच जर, तर वेळ तेव्हढा द्या सावरायला नी शिकायला. फॉर्म्युल्याशिवाय मनाच्या कागदावर उमटेलच की एकदिवस..."

गुरुवार, ३० जुलै, २००९

संवादाचा तुटता धागा;
वाद घेतसे त्याची जागा
दुखावलेले हळवे मन;
सांधत बसते वेडे क्षण
गेला क्षण हा काल असे;
उद्या न वेड्या येत असे
नव्या उषेचे गाणे गात;
आज आजची करुया बात

बुधवार, २९ जुलै, २००९

शनिवारची एक दुपार

शनिवारची दुपारची वेळ. नुकतच पोटभर जेवुन मागचं आवरुन झालेलं. डोळ्यावर त्या जेवणाची सुरेख अशी सुस्ती आलेली. आता एरव्ही कसं एसीत बसुन डब्यात थंड झालेल्या भाजी पोळीवर भागवावं लागतं, तर मग शनिवार रविवार मस्त गरम गरम जेवण जेवताना जातात दोन घास जास्त, नी येतेच सुस्ती.

अहाहा! आता मस्त दोन तास झोप काढता येणार कारण लेक पण झोपलेय ह्या खुशीत आडवी झाले. फार फार तर १०-१५ मिनिटं गेली असतील नसतील तोच माझा मोबाईल जागा झाला. त्याच्या एकेकाळी, एकेकाळीच का? सकाळ पर्यंत सुरेल वाटणाया रिंग टोनने कर्कश्य स्वरात गायला सुरुवात केली. रडणारं मुल कसं उचलुन घेतल्या शिवाय थांबत नाही तसे हे फ़ोन नी त्याचे रिंगटोन्स. फार फार तर थोडा वेळ थांबतील, पुन्हा समोरचा त्याच्या/तिच्या फ़ोनवर खाडखुड करतो की हे इथे गळे काढणार.

लेक जागी होण्याच्या भितीने (हि भिती तेव्हा जास्त महत्वाची होती फ़ोन महत्वाचा असता नसता तरिही) मी येणार्‍या झोपेला थोडं बाजुला सारुन कडमडत जाऊन फ़ोन घेतला. आवाजातुन जास्तीत जास्त वैताग कळावा असा "हॅलो" चा उच्चार करतच मी सुरुवात केली. पलिकडुन एक बया मला "पर्सनल लोन" हवय का अस प्रेमाने विचारत होती. त्यासाठी कुठच्याही कागद पत्रांची गरज नाही अशी भलावण करत ते लोन माझ्या गळी उतरवु पहात होती.

बाई ग मला सध्या फ़क्त अडथळा फ़्री झोप हवेय, तेव्हढी एकच सध्या महत्वाची नी तातडीची गरज आहे माझी. लोन बीन अशा बिनमहत्वाच्या गोष्टींसाठी मी आठवडाभर मनाशी ठरवलेली झोप सोडू म्हणतेस? पण असल्या कोट्यांनी विचलीत न होता लक्ष साधायचं ट्रेनिंग तिला मिळालं असावं बहुतेक, कारण तिने तरिही लोनच घोडं पुढे दामटायला सुरुवात केली. आवाजातलं मार्दव (?) शक्यतो कायम ठेवत बाई मी "अंथरुण पाहुन पाय पसरावेत" हे शिकलेय हे सांगितलं. समोर अंथरुण होतं म्हणुन पण मला हि म्हण सुचली असावी. नाहितर हे म्हणी बिणी नेमक्या वेळी कुठल्या आठवायला. तिच्या ट्रेनिंग मधे म्हणी येत नसाव्यात, कारण हे वाक्यच्या वाक्य तिला बाउन्सर गेलं. तिला तसच संभ्रमात ठेवत मी तिला म्हंटलं बर देतेच आहेस तर घेते बापडी लोन. ती हुरळुन पुढची माहीती सांगण्य़ाआधीच ह्यात पण कर्जमाफ़ी वगैरे होते का? अस विचारल्यावर तिने माझी पत ओळखुन स्वत:च फ़ोन कट केला.

बरी टळली बला म्हणत मी पुन्हा अंथरुण पाहुन माझे पाय पसरले नी डोळे मिटले. पण नशिबात योगच नसेल तर काहीही होतं. पुढच्या १० मिनिटात लँड लाईन ट्रींग ट्रिंग करु लागला. कॉर्डलेस फोन मी दुरुस्त न करण्याचा आळशीपणा का केला? आता उठा कविताबाई, पळा हॉलमधे आणि घ्या तो फोन म्हणत स्वत:वरच चरफडत फोनपर्यंत जाते नाही तोच, तो नरडं आवळल्यासारखा बंद झाला. मला पलिकडची/चा खदाखदा हसतोय असा भास झाला एक क्षण. मागे वळले तर पुन्हा तेच ट्रिंग ट्रिंग. ह्यावेळी रॉंग नंबर होता. एक तर झोपेचं खोबरं होत होतं, त्यात असे बिनकामाचे नी भलत्याच कुणासाठीचे फोन उचलायचे म्हणजे काय असतं, ते फ़क्त आठवडाभर ह्या दुपारच्या झोपेची स्वप्न बघितल्यावर नेमक्या वेळी ज्याच्या स्वप्नांवर अस विरजण पडलय ना तेच जाणु शकतात.

चला यायचे तेव्हढे अडथळे येऊन गेलेत म्हणत परत झोपेच्या स्वाधीन झाले. तसही पडल्या पडल्या पाच मिनिटात झोप लागण्याच भाग्य नशिबात असल्यामुळे मी पुढच्या ५ मिनिटात झोपु शकले.

पण हाय रे दैवा! झोप लागण्याच भाग्य असलं तरी विनाखंड मिळण्याचं पण भाग्य नशिबात असावं लागतं त्याच काय? पुन्हा तेच कर्कश्य वाजणं नशिबात होतं. पण ह्यावेळी त्रास देणार साधन बदलेलं. फ़ोनच्या ऐवजी फॉर अ चेंज म्हणुन घराची बेल वाजत होती. आता कोण? तर कुरियरवाला! ह्यांना बरी दुपारची वेळ मिळते लोकांची घर ठोठवायला? चरफडत टपाल घेऊन सहीचा कागद परत दिला. हे कुरियरवाले पेन बरोबर घेऊन हिंडतात ते एक बर आहे. नाहितर ते शोधण्यात पुन्हा ५-१० मि. गेली असती फ़ुकट.

हि सगळी अडथळ्यांची शर्यत पार करेतो तीन वाजले. माझ लक्षं घड्याळा बरोबर लेकीकडेपण होतं. कारण ती दोन वाजता झोपल्ये म्हणजे चारच्या ठोक्याला उठणार. मी आत्ता झोपु शकले तर मला कमीत कमी एक तासभर झोप मिळणार. ती उठली की मग कसली झोपु देतेय मला.

पण! हो हो आहेच मधे पण. त्याच काय आहे ना, सुखासुखी झोप पण नशिबात असावी लागते. तर आज माझ्या रुसलेल्या नशिबाने पुन्हा एकदा कोणाच्या तरी रुपात दाराची बेल वाजवली. मी परत एकदा माझा मोर्चा दरवाजा कडे वळवला. आता कोण कुरियरवाला आलाय असा विचार करत दार उघडलं. आमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर एक छोटा पॅसेज आहे जो आम्ही ग्रिल लावुन सेफ़्टी दरवाजा लावुन बंद केलाय. शक्यतो कुरियर वगैरे गोष्टी हा सेफ़्टी दरवाजा न उघडता त्याच्या ग्रीलमधुनच घेतो. तर मी मुख्य दरवाजा उघडुन त्या पॅसेजमधे पोहोचले कोण आलय बघायला. समोर म्हणजे सेफ़्टी दरवाज्याच्या बाहेरच्या बाजुला एक तरुण मुलगी उभी होती. आधी वाटल चुकलेला पत्ता विचारायला किंवा समोर बस थांबा आहे तेव्हा पाणि मागायला किंवा पावसाळ्याचे दिवस आहेत तेव्हा मोकळी व्हायला आली असेल. तळमजल्याला रहाण्याचे हे तोटे आहेत. मदत न करावी तरी पंचाईत आणि करावी तरी पंचाईत, कारण आजकाल कोण खरा गरजु, कोण फुकटा, कोण ते निमित्त साधुन गंडा घालायच्या तयारीत आहे हे कळतच नाही.

पण तिने अशी पंचाईत केली नाही निदान असलं काही मला मदत करु की नको अस संभ्रमात टाकणार काम सांगितलं नाही. मग कोण हि बया चांदण्यात लोकांच्या घराची बेल वाजवतेय असा विचार येतो न येतो तोच,तिने "रेणुका शहाणे" हास्य फ़ेकुन ताई, मी तुमची दोन मिनिट घेऊ शकते का? असा टिपिकल छापील प्रश्न केला. त्या बरोब्बर माझ्या डोक्यात दिवा पेटला. अरेच्च्या! ही तर विक्रेती.

सॉरी, मला सध्या काहीही नकोय झोप सोडुन म्हणत मी दार लावायला मागे वळणार तोच पुन्हा एकदा तो कमावलेला आवाज आला.

ताई, बघुन तर घ्या. मी "अबक" कंपनी कडुन आलेय. आमच्या कंपनीने हे नविन प्रॉडक्ट लॉंच केलय. त्याची मार्केट व्हॅल्यु आहे रुपये ३० प्रत्येक १०० ग्रॅम साठी. आजच्या स्पेशल डिस्काउंट ऑफरमधे तुम्ही एक ३० रुपयाच पाकिट घेतलत तर त्यावर एक पाकिट तुम्हाला फ़्री मिळणार आहे. त्याबरोबर हा लकी ड्रॉ चा फ़ॉर्म भरुन द्यायचाय. तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ५ किलोच पॅकेट फ़्री मिळेल शिवाय फ़ॅमिली सह गोव्याला ३ दिवस २ रात्रीची सहल फ़्री.

लक बिक गोष्टी माझ्या पारड्यात असत्या तर दुपारी दोन पासुन अशी उठाबशी करावी लागली असती का? हे आपलं मनात. आम्ही मनातच म्हणणार, मग घ्या भोगा आता दोन मिनिट समोर उभं राहिल्याचे परिणाम.

मला काहिही नकोय च्या पुढे माझी गाडी काही जात नव्हती, तरीही ती चिवटपणे माझा इंटरव्ह्यु घेत होती. मी देखील वेड्यासारखी तिला खरी खुरी उत्तर देत होते. कोणती पावडर कपड्यांना वापरता पासुन सगळा कपडेपट तिने विचारुन घेतला. एकवेळ शाळेचा इंटरव्ह्यु देणं सोप असेल पण हा अनुभव नकोसा होता. नाही नाही मी चुकुन शाळेचा इंटरव्ह्यु अस नाही लिहीलेलं. आजकाल नोकरीचा इंटरव्ह्यु सोपा असेल असा शाळ प्रवेशाच्या इंटरव्ह्युचा मामला असतो.

तिच्या सगळ्या प्रयत्नांना फ़ोल ठरवत मी निग्रहाने मागे वळले. तेव्हढ्यात ताई, पाणी मिळेल का? अशी आर्जवी विचारणा झाली. होणारच! येव्हढ्या चांदण्यात पायपिट केली, येव्हढी घसाफ़ोड केल्यावर घशाला कोरड पडणारच ना? आता पाण्याला का कोणी नाही म्हणतं? मग तिला तसच सेफ़्टी डोअरच्या बाहेर तिष्ठत ठेवत मी पाणि आणायला गेले. हो आजकाल दार उघडुन आत घेण्याइतका भरवसा चांगल्या घरातली असावी असं दिसणार्‍या मुलीवरही ठेवता येत नाही.

ती पाणी पीत असताना तिचच निरिक्षण करत होते. दिसायला नीटनेटकी, २३-२४ वर्षाची हि तरुणी शिकलेली वाटत होती. पेहेरावा वरुन परिस्थिती आमच्या सारखीच म्हणजे खाऊन पिऊन (इथे पाणी अपेक्षीत आहे) सुखी अशी मध्यमवर्गीय वाटत होती. मग तिची ती डबोलवाली बॅग बघून थोडी दया आली. कोणा कोणाला काय काय करावं लागतं पोटासाठी. बिच्चारी! माझ्या मनात तिचं बारसं तोपर्यंतं बिच्चारी झालं होतं.

तिच्या ट्रेनिंग मधे मुरलेल्या अनुभवी मनाने माझ्या चेहर्‍या वरचा बिच्चारी पर्यंत झालेला अबोल प्रवास टिपला असावा. कारण पाणि पिऊन तिने एक सह्या केलेला, माहिती भरलेला कसलासा कागद माझ्यापुढे धरला. ताई, हे बघा तुमच्याच बिल्डींग मधे ४ थ्या मजल्या पासुन सगळ्यांनी घेतलय. त्या शेजारच्या काकुंनी अशी तीन पाकिटं घेतली ताई.

माझं मन थोडं द्रवलं, एकतर तिने शेजारचीला काकु आणि त्याच वेळी मला ताई म्हणुन माझ्या संतुर साबणाला दाद दिली होती. तिथेच ती अर्ध ह्रुदय जिंकुन बसली. पुन्हा ती हे सगळं मॅनेजमेंटच्या कोर्सचा भाग म्हणुन पॉईंटस मिळवण्यासाठी करतेय म्हंटल्यावर तर मला भरुनच आलं. गरज नसतानाही मी दोनावर दोन फ़्री अशी साठ रुपयांना फ़ोडणी घालुन घेतली. ती पुन्हा रेणुका शहाणे हास्य फ़ेकुन निघुन गेली.

ह्या सगळ्या प्रकारात झोपेचं खोबरं झालच होतं पण चला त्यातल्या त्यात एका अभ्यासु मुलीला मी दोन पॉईंट मिळवुन दिल्याच समाधान होतं. हा त्या ताईचा इफ़ेक्ट नसुन तिच्या चिकाटीचा होता हे मी इथे विशेष नमुद करु इच्छीते.

त्या नादात मी नविन पावडरचं उद्घाटन करायचं ठरवलं. सकाळी कपडे धुवुन झालेले होते तरीही कुठुन कुठुन शोधुन ४-५ कपडे मी त्या पावडर मिश्रित पाण्यात भिजवले. अजीबात बुळबुळीत पणा नसलेल्या ह्या पावडरला चुना म्हणावं की तिने मला ताई म्हणत चुना लावला म्हणाव न कळुन मी तो नादच सोडुन दिला. त्यापेक्षा पुर्वी मिळायचा तो सोडा परवडला असं सासु बाईंच मत पडलं.

झोपेपरी झोप गेली वर आणि शिकलेल्या नोकरी करणार्‍या बाहेरच्या जगात ववरणार्‍या मुली तुम्ही, तुम्ही तरी अशा गोष्टींना भुलणार नाही हे शालजोडीतले ऐकावे लागले बुजुर्गांकडुन. ते ऐकताना नवरा पेपर मागे तोंड लपवुन हसतोय असा भास झाला.

ह्या माझ्या किश्श्यावरुन मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. मी ५ वी ६ वीत असेन तेव्हा. घरात मी, भाऊ आणि आई असे तिघेच होतो. एक साधु (म्हणजे त्यांचा वेश तसाच होता कफ़नी वाला) आजोबा आमच्या दारात "माई भिक्षा वाढा" म्हणत उभे राहिले. त्यावेळी सेफ़्टी दार कल्पना अस्तीत्वात नव्हती निदान आमच्या चाळीत तरी नव्हती. एक तर सगळ्यांचे दरवाजे रात्री झोपे पर्यंत उघडे असायचे. एकाच्या घरी कोणी आलं तरी आजुबाजुची चार डोकी घरात डोकवायची चाळसुलभ उत्सुकतेने कोण आलय बघायला, आणि हो गरज पडली तर मदतीलाही.

आईने तांदुळ दिले. तिला आशिर्वाद देत ते म्हणाले, "माई तुमचा वर्तमान थोडा खडतर आहे. आता हे सांगायला ते कशाला हवे होते. समोर दिसणार्‍या गोष्टींवरुन कोणीही हे सांगु शकलं असतं. पण तेव्हा मोठी गम्मत वाटली होती मला. त्यात त्याने तुमची मुलं गुणी बाळं आहेत. लाखात एक त्यांच नशीब आहे माई, तुमचे यजमान तापट आहेत आईने लग्गेच मान डोलावली. पण भोळा सांब आहेत. तू पार्वती माय आहेस माई. तुझी मुलं तुला सोन्याचा दिवस दाखवणार.

अस म्हणताच आईने त्याला दहा रुपये दिले. खायला ताजी (शिळी नव्हे) पोळी भाजी दिली. कोणत्याही बाईला तू सोशीक, तू म्हणून टिकलीस अस म्हंटल की बर वाटतं. तिच्या मुलांच कौतुक केलं, त्यांचा भविष्यकाळ चांगला आहे म्हंटलं की आस्मान ठेंगणं होतं त्यात नवल ते काय? आत्ता आठवण्याच कारण म्हणजे मला १००% असं वाटतं की हे मानसशास्त्र जाणणारे त्या साधुच्या वंशातले लोकच आताच्या काळात ह्या मार्केटींग करणार्‍या मुला मुलिंच ट्रेनिंग घेत असावेत.

तर असो, असा एक शनिवार धडा घेण्यात गेल्यावर आता मी एक उपाय योजना केलेय. दुपारी दोन ते चार घराची बेल बंद ठेवणे, मोबाईल स्वीच ऑफ़ किंवा सायलेंट वर टाकणे, लॅंड लाईनची रिंग लो टोन वर करुन ठेवणे जेणेकरुन फ़ोन वाजलाच तरी हॉलमधे सुरु झालेली रिंग पॅसेजमधेच विरुन जाईल नी मी निवांत झोपेन बेडरुममधे.

(ता.क. : ह्यातला दुपारी २-४ प्रवेश बंद चा प्रयोग फ़क्त उपद्रव देणार्‍या लोकांसाठी असुन तो तुमच्या सारख्या सुह्रुदांसाठी लागु नाही. तरीही तुम्ही अगत्याने आमच्या घरी येणे करावे हि विनंती. फ़क्त येण्यापुर्वी दुपारी दोनच्या आधी फ़ोन करुन कळवल्यास त्या दिवशी बेल चालु ठेवणे, फ़ोन स्वीच ऑफ़ न करणे मला सोयीचे होईल आणि तुमची खेप फ़ुकट जाणार नाही.)