शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०११


http://deepjyoti2011.blogspot.com/2011/10/blog-post_3728.html

काय कळेना पण गाण्याचे नी आमचे चांगलेच लागेबांधे आहेत. आता हेच बघाना आमची अप्सरा सॉरी सॉरी आमची ऍक्टिव्हा आली त्याच्या आदल्याच दिवशी सोसायटीच्या पुजेमधे अप्सराऽऽ आऽऽऽली ह्या गाण्याने कान किटेस्तोवर पछाडलं होतं




नेमका आम्हाला तेव्हाच होणाऽऽर होणाऽऽर डिलिव्हरी होणार असा फ़ोनवा आला आणि आम्हाला चक्क तेव्हा ते अप्सरा आली च्या जागी ऍक्टिव्हाऽऽ आऽलीऽऽ ऐकू यायला लागलं



ऍक्टिव्हाऽऽ आऽऽली होऽऽऽ अंगणी



होऽऽ होऽऽ "ऍक्टिव्हाऽऽ आऽऽली होऽऽऽ अंगणी" असा जयघोष करत आऽऽली एकदाची आमची दुचाकी, बरोब्बर ९ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर.



ज्यांना ज्यांना माहित होतं ते मुद्दाम येता जाता "काय कधी डिलिव्हरी? ९ महिने झाले ना आता? असले पाणचट फडतूस विनोद करुन हैराण करायचे त्या सगळ्यांना जमेल तिथे जमेल तेव्हा गाठून "झाली हो सुखरुप डिलिव्हरी. बाऽळ बाळंतिण सुखरुप एकदम" अशा थाटात उत्तर देऊन ह्या "डिलिव्हरीची खबर" देऊन झाली.



ती आठवड्याभरात येणार ही बातमी पक्की होताच मी माझं लर्निंग लायसन्स काढून घेतलं.



लेकीचं मला बजावून झालं "आई, तू पटकन शिकून घे हा, मला तुझ्याच मागे बसुन जायचय सगळीकडे. बाबाच्या नाही."



सासुबाईंचं पण कमेंटून झालं "तू आपली शिकून घेच लवकर, मला तुझ्यामागे बसुन मंडळात जाता येईल. ह्याला नको मस्का मारायला दरवेळी. रिक्षाचापण खर्च वाचेल कितीतरी"



"होऽऽ होऽऽ मी शिकणारच" म्हणत त्यांना दिवा स्वप्न बघत तसच ठेवून मी मला शिकवणार कोण पण? ह्याच्यावर विचार करायला लागले.



"मला शिकवायला जमेल तुला?" मी ह्याला विचारताच. सोप्प आहे गं ही काय गिअर्ड व्हेईकल नाही. सायकल येते ना? मग जमेल तुला.



आता आली का पंचईत. सायकल येते ना ला हो उत्तर द्यावं तरी चूक आणि कधीकाळी चालवली होती की हे आठवून नाही तरी कसं म्हणणार? शेवटी "येते रे म्हणजे येत होती लहानपणी तरी. आता सवय सुटलेय म्हणून माहीत नाही" असं उत्तर देऊन मोकळी झाले.



त्यावर "सायकल आणि पोहणं ह्या बाबतीत तेव्हा येत होतं आता विसरले बिसरले असा प्रकार नसतो बाईसाहेब. एकतर येते तरी नाहीतर नाही तरी" असा प्रतिटोला ऐकावा लागला नवरोबाकडुन



तेव्हढ्यात धाकटे बंधुराज नेमके कोणत्या तरी कामानिमित्त आमच्या घरी हजर झाले आणि भाचीकडून "आई टुव्हिलर शिकऽणारेऽऽ" ही बातमी कळल्यावर "तुझ्या आईला, आधी माझी सायकल चालवून बघायला सांग" अशी मुक्ताफळे उधळून मोकळे झाले.



"ही धाकटी भावंडं टपूनच बसलेली असतात नेहमी, मौका मिळताच चौका मारायला" मी मनातल्या मनात धुसपुसत मनातच म्हंटलं कारण तेव्हा नवरा आणि भाऊ अशी युती झालेली होती.



"काय रे हिने सायकल चालवलेय म्हणतेय लहानपणी. हे खरय ना?" ह्याने आता भावालाच साक्षिदार करत विचारलं.



"बहुतेक." त्याने खांदे उडवत उत्तर दिलं आणि मी त्याच्या पुढ्यात ठेवलेल्या चिवड्यावर लक्ष केंद्रित केलं.



इकडे ह्याला शंका यायला लागली त्याच्या उत्तराने. सख्या धाकट्या भावाला नीट आठवत नाही, बहुतेक असं उत्तर येतय म्हणजे नक्कीच दालमे काला है कुछ.

त्याने परत एकदा "बहुतेक म्हणजे?" असं भुवया उडवत विचारलं



"बहुतेक म्हणजे... हे आपलं तशी चालवायची ती. म्हणजे आम्ही दोघेही चालवायचो भाड्याने सायकल आणुन. पण ही आणि हिच्या मैत्रिणी ताईगिरी करायच्या नी मला द्यायच्याच नाहीत जास्त वेळ म्हणून मी आईकडून वेगळे पैसे घेऊन दुसरी सायकल भाड्याने घेऊन यायचो. ह्यांच्या मधे कोण पडेल? पण चालवलेय ताईने तेव्हा. पण घरासमोरच्या रोडवर. गर्दीत कधीच नाही" भावाने साक्ष तर दिली मी चालवलेली ह्याची पण त्यात आणिक स्वत:चं टुमणं पण जोडलं गरज नसताना. म्हणजे लहानपणीच्या ताईगिरीचा सुड तर घेतला पण चिवड्याचीही बूज राखायची म्हणून बाजूही घेतली.



"बरं बरं पण चालवलेय हे तर सिद्ध होतय ना ह्यातून. गर्दीत चालवायला लागलीच नाही कधी तर कशाला जाईन मी गर्दीत" मी माझा राग पुरेसा व्यक्त करत म्हंटलं.



"आणि एकदा समोरुन रिक्षा आल्यावर सायकलला ब्रेक लावायचं सोडून सायकल टाकून देऊन बाजुच्या गटाराच्या पलिकडे लॉंग जंप मारलेलीस. ते आठवतय का ताई?"



ह्या भावांना पण ना नको तेव्हा नको त्या गोष्टी बरोब्बर आठवत असतात.



"असं असेल तर तू आधी सायकलच चालवून बघ. मी नवीन गाडी नाही देणार हातात तुझ्या शिकायला." ह्याने मी नवीन गाडी अशी टाकून उडी मारुन बाजुला होतेय हे इमॅजीन करुन आधीच घाबरुन निर्वाणीचं सांगून टाकलं.



"बरं मग सायकल भाड्याने आणुयात की नवीन?" मी आपलं माझं घोडं जमेल तेव्हढं दामटवत म्हंटलं.



बाजुला लेक उभी होती. तिच्या चेहऱ्यावर "आई शिकणार कधी नी मी तिच्यामागे बसणार कधी?" हे प्रश्नचिन्ह सहज वाचता येत होतं. शेवटी तिच्या परिने तिने "आई मी शिकवते तुला सायकल. सोप्पी असते. माझी सायकल चालवून बघतेस का? त्याला दोन सायडींग व्हील पण आहेत म्हणजे पडणार नाहीस" म्हणत तोडगा सुचवला.



तिच्या सुचनेवर नवरा आणि भाऊ दोघांनाही खुदखुदायला निमित्त मिळालं.



"होऽऽ होऽऽ तसच करावं लागणारसं दिसतय तुझ्या आईला" भावाने पुन्हा एकदा मला चिडवायची संधी साधत म्हंटलं.



"काही गरज नाही तुम्हा दोघांच्याही सल्ल्याची नी मदतीची. आणि होऽऽ नव्यीन ग्याऽडी नव्यीन गाऽऽडी लावू नकोस टुमणं सारखं ठेव तुझी गाडी तुझ्याच कडे. मी शिकेन तिच्याशिवाय." मी म्हंटलं खरं तोऱ्यात पण गाडीशिवाय शिकणार कशी? हा प्रश्न मनात डोकवतच होता.



गणेश मंदीरात निर्माल्य द्यायला गेले तेव्हा समोरच्या दुकानाबाहेर पाटी वाचली "टु व्हिलर ट्रेनिंग... महिलांसाठी खास महिला शिक्षिका. सायकल येत नाही? नो टेंशन."



जे बात्ते! माझ्यासारखीच सायकल न येणारी तरिही टुव्हिलर शिकू पहाणारी जमात ह्या भुतलावावर नव्हे ह्या माझ्या गावामधेच आहे. व्वा व्वा! बरी सोय झाली. आता मी टेचात सांगू शकते दोघांनाही - नही चाहिये तुम दोनोकी मेहेरबानी" असं मनात म्हणत मी त्या दुकानात शिरले.



त्यांचे नियम, फी इत्यादी माहिती करुन घेऊन मी ऍडव्हान्स मनी भरुन तिथून बाहेर पडले ती मनातल्या मनात त्या टुव्हिलवर सवार होऊनच.



तिथे महिलांसाठी खास महिला प्रशिक्षक लिहिलं होतं तरी बाजुला एक स्टार पण काढलेला होता कंडीशन्स अप्लाय सारखा, जो मला इनिशिअल मनी भरल्यावर मग कळला. म्हणजे मीच त्या दिवास्वप्नातून जागं झाल्यावर मग झालेल्या प्रश्नोत्तरांच्या क्लासात कळला. महिला प्रशिक्षिका फक्त फ़ोर व्हिलर साठी आहेत, टु व्हिलर साठी नाहीत.



आता बोंबला मला प्रशिक्षिकाच हवी होती, प्रशिक्षक नको होता. पैसे नॉन रिफंडेबल होते मग म्हंटलं काय फ़रक पडतोय, ट्रेनिंगचं एक सेशन करुन बघुयात झालं.



मनातल्या मनात गाडी चालवतच घरी आले. आल्या आल्या लेकीला नी साबाईंना ट्रेनिंगचं सांगून झालं. दोघींनीही पुन्हा एकदा गाडीवर माझ्यामागे बसून इथे तिथे जायची स्वप्न बघायला सुरुवात केली.



आधी ह्याला सांगणारच नव्हते, म्हंटलं फायनल शिकून झालं की मगच "ल्ले अब बोल" स्टाईल मधे सांगूयात. पण पोटात माईना म्हणत त्यालाच काय पण भावालाही सांगून झालं.



"क्काय? टुव्हिलर साठी शिक्षक? पैसे वर आलेत तर मला दे" दोघांचीही रिऍक्शन एकच म्हणे आम्ही शिकवलं नसतं का?



"अरे मग त्या दिवशी का खदा खदा हसत मला कोपरखळ्या मारत होतात. म्हणे सायकल शीक आधी. म्हणे नव्यीन ग्याडी नाही देणार पाडायला"



"किती भरलेस पैसे?"



"१०० रुपये" मी म्हंटलं



"नशीब, आता काहीतरी कारण सांगून पुढे ढकल ट्रेनिंग नी बाकीचे पैसे नंतर देऊ म्हणून टाळ. मी शिकवतो तुला" इती नवरोबा.



ट्रेनिंग सुरु व्हायला तसही आठवडा होता म्हंटलं बघुयात आठवडाभरात काय दिवे लागतायत म्हणत मी पण तयार झाले.





दिवस पहिला, आम्ही गाडी घेऊन त्यातल्या त्यात कमी गजबज असलेल्या रस्त्यावर श्रीगणेशा करायला गेलो. बेसिक माहिती घेऊन मी अटेंशन मधे बसले पुढे, हा पिलीयन रायडर झाला. मी ऍक्सलेटर रेझ केला आणि झुऽप्प गाडीने जो पिक अप घेतला त्याने मी जी तंतरले त्यामुळे ह्याच्या अग स्पीड कमी कर ह्या सांगण्यावर मी ऍक्सलेटर चुकून उलट्या दिशेने फिरवून स्पीड वाढवला. त्याने पटकन ब्रेक दाबून कंट्रोलमधे आणायचा प्रयत्न केला पण तोपर्यंत आमचा गाडीसकट दुबुच्चा झालेला होता. आम्हाला आणि गाडीला तीट लागली होती. मग एकदा कोणाचा तरी सल्ला आठवून बॅलन्स जमे पर्यंत ह्याने नुसतीच गाडी ढकलायची मागून नी तो लेकीला सायकल शिकवताना कसं मागे मागे पळतो सायकल धरुन तसं करुन बघितलं.



आजुबाजुला हा फुकटातला सिनेमा बघायला प्रेक्षक जमू लागले तसं आम्ही घरचा रस्ता धरला. ह्याने पुन्हा एकदा "सायकल आणायची का खरच" असं काकुळतीला येऊन विचारलं.



पुढचे दोन दिवस हातापायाला लागलेल्या तीटीवर औषध लावण्यात गेले.



मग बंधुराजांना ताईचा पुळका आला.



"ताई, एमायडीसीमधे जाऊ, मी शिकवतो तुला. जमेल जमेल" असा धीर दिला त्याने आणि मला अगदी अगदी उचंबळून आलं लग्गेच कानात "ओवाळिते मी लाडक्या भाऊराया.. वेड्या बहिणीची रे वेडी माया" अशी प्रेमळ प्रेमळ गाणी वाजायला लागली.



एमायडीसीतला पहिला दिवस हाताला धरुन मुळाक्षर गिरवण्यात गेला. तिथे कोणी ओळखीचं नव्हतं म्हणून फुकट्या प्रेक्षकांना तुच्छं कटाक्ष टाकून हुडुत करणं शक्य होतं.



दोन दिवस बरे गेले मग कधी त्याला काही काम आलं कधी मी वेळ नाही च्या फेऱ्यात अडकले मग पहिले पाढे पंचावन सारखी गत झाली.



मध्यंतरी सुटलेल्या पोटाकरता व्यायाम करण्याचा सल्ला बऱ्याच ठिकाणाहून आला. पोहायला येत नाही, जीममधे जायला वेळ नाही ह्या आणि अशाच सबबीं मुळे एक एक करुन दिलेले सल्ले फोल ठरवले गेले.



त्यातल्या त्यात "चालणे" हा सर्वात स्वस्त आणि मस्त व्यायाम असल्याचा सल्ला बऱ्याच मंडळींनी दिल्याने आणि अर्थातच त्याकरता मला मुद्दाम स्कील्ड एफर्टस घ्यावे लागणार नसल्याने मी त्यांच्या सल्ल्याला मान देण्याकरता सगळीकडे शक्यतो चालत जायचा निश्चय केला. तसही दसऱ्याला काही नवा निश्चय करावा म्हणतात. पण आता आली का पंचाईत, गाडी शिकणार कशी? कारण जर गाडी चालवायला शिकले तर चालवायचा मोह होणार. चालवायचा मोह झाला की मग चालण्याच्या निश्चयाला सुरुंग लागणार. चालण्याचा निश्चय मोडला की मग पोट कमी कसं होणार?



तसही सध्या आमच्या घरात पहावं तेव्हा "चाऽलं बाऽऽई चाऽऽल राधे चाऽऽल" हे गाणं वाजत असतं. आणि मी मगाशीच नाही का सांगितलं गाण्याचे आमच्याशी असलेले लागेबांधे वगैरेऽऽऽ. म्हणून सध्या ही "राधा" चालतेय चालतेय.



तेव्हढ्याकरता केवळ मी माझ्या गाडी शिकण्याच्या इच्छेला ब्रेक लावायचं ठरवलय सध्या. अहो! गाडी काय कधीही शिकता येईल, व्यायाम महत्वाचा. काय बरोबर ना?

(purva prasiddhi: deepajyoti diwali 2011)

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०११

कानगोष्टी


लाईफ मे थ्रील होना मंगताय? काSय खरंS की नाही? काय आपलं तेच तेच अळणी अनुभव घेत घेत जगायचं? तर आमच्याही लाईफमधे हे थ्रील थ्रील म्हणतात ते नक्की काय असतं ह्याचा अनुभव द्यायला आणि आमच्या अळणी अनुभवांना स्पायसी बनवायला एका सापाने "सारे समय केवल महिलाओंके लिये" असं लिहिलेल्या लोकलच्या डब्यामधे शानदार एन्ट्री मारली.


झालं असं की पारसिकचा बोगदा पार होत होता.कानात बसलेले दडे नुकते कुठे सुटत होते.
काही बाया, माता, भगिनींची "मिठे सपनोंकी गुड नाईट दोस्त" मोड मधून "जागो ग्राहक जागो" मोड मधे बदली होत होती. काही जणी रिझर्व्ह केलेल्या सिट वर हुश्श करत टेकत होत्या. काहींचं हॅ हॅ नी हु हु संपत नव्हतं तर अजून काहींचा कोजागिरी स्पेशल भेळ हादडण्याचा कार्यक्रम यथास्थित चालू होता. आणि अस्मादिक लवकर उतरता यावं म्हणून पॅसेज मधून बाहेर पडून दाराकडे यायला कुच करत होते.
तेव्हढ्याऽत ह्या हिरोची एन्ट्री झाली. एन्ट्री झाली पहिल्या किचन मधे (किचन नावाचा फन्डा लक्षात नसेल तर ह्याच्या आधीचा "सारे प्रवासी गाडीचे" हा लेख वाचा लोक्स)


तर मुद्दा किचन नसून मुद्दा आहे "साप" नामक हिरोची वादळी एन्ट्री. ती ही खच्चून भरलेल्या गाडीमधे.
इकडे त्याने प्रवेश केला नी तिकडे सगळ्या साळकाया माळकाया "आऽऽऽई गSSSS, ईईईईSSS, बाऽऽऽप रे वाचवाऽऽ, हिऽऽहीऽऽहि, आऽऽऽऽ" असे वेगवेगळे आवाज काढून आपला सहभाग नोंदवत होत्या.
अर्थात आम्ही तिसर्‍या दरवाजातल्या किचन मधे असल्याने आधी हे चित्कार कशासाठी तेच कळत नव्हतं. कळेकळेपर्यंत गाडीने दिवा सोडलं होतं आणि अवघ्या ५ मिनिटात गाडी डोंबिवली स्थानकात शिरणार होती.
तर कळलं असं होतं ते ही कानगोष्टी करत यावं तसं, की साप नामक जीव पहिल्या किचन मधे आलेला आहे. सर्वात आधी आरोळ्या आल्या, मग सगळ्या बायका बाकावर उभ्या राहिलेल्या दिसल्या. मग कन्फर्म्ड चा शिक्का कोणीसा मारला त्याच्या अस्तित्वावर.

हळू हळू तो साप पहिल्या किचन मधून "एक्स्क्युज मी" म्हणत मार्ग काढत मधल्या दरवाजापर्यंत पोहोचला असावा. कारण तोपर्यंत मधल्या कंपार्टमेंट मधून नानाविध चित्कार ऐकू यायला लागले.

कम्माल आहे ह्या सापाची. रिअल हिरो आहे की हा. मला ज्या गर्दीच्या ट्रेनमधे एका किचन मधून दुसर्‍या किचन पर्यंत जायला सिएस्टी ते ठाणा इतका काळ धडपडावं लागतं तिथे ह्या सापाने निव्वळ दोन मिनिटात हे अंतर पार केलं? मान गये बॉ, साप को और "उसकी" पारखी नजर को. उसकी म्हणजे ज्या बाई/माता/भगिनी/मुलीने त्या सापाला स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं तिच्या पारखी नजर बद्दल लिहिलय मी.

साप अशाच वेगाने पुढे पुढे येत राहिला तर डोंबिवली येईपर्यंत तो आमच्या किचन पर्यंत नक्कीच येणार म्हणत आमच्या किचन मधेही नानाविविध चित्कार काढून बघितले भगिनी माता वर्गाने.

नुसते चित्कार नाही त्या जोडीला आईंग उईंग करत आपल्या अंगावर सापच पडलाय असा अभिनय करत त्यांचं जे मागे मागे येणं होतं ना त्याने माझ्या सारख्या बुटक्या वांग्याचे पार हाल झाले. घामट्ट वेण्यांच्या नी अंगाच्या वासात मी पार दाबली गेले. शेवटी मी ही इतरां प्रमाणे बाकड्याचा आधार घेत वरती उभं रहाणं पसंत केलं आणि मोठ्ठा श्वास घेऊन माझ्या गुदमरलेल्या जीवाला सावरलं.

"अरे इस आईंग उईंग से साप क्या चित्ता भी भाग पडेगा डर के मारे" वर उभ्या राहून आम्ही खाली उभ्या असणार्‍यांना बोलून घेत होतो.

त्याही "निच्चे खडे हो जाओ ना डर नही लग रहा है तो" असं आम्हाला चिडवून घेत होत्या.

"च्यायला जागा ठेवाल तर ना उभं रहायला. पार चेंगरुन टाकता आम्हाला." माझ्या सारखं एक बुटकं वांग करवादलं.

इतक्या सार्‍या उलाढालीत तो साप अधून मधून बायांच्या किंचाळण्याने आपलं अस्तित्व दाखवत होता.

माझ्या शेजारी उभी असलेलीची एक मैत्रिण होती पहिल्या किचनवाली. तिला थेट भेट सारखा आखो देखा हाल विचारायला फोन लावला तिने. तर तिच्या कडून कळलं साप दिड दोन वीत आहे म्हणे..

लग्गेच ही ब्रेकिंक न्युज ब्रॉडकास्ट करे पर्यंत दुसर्‍या कंपार्टमेंट मधे असलेल्या मैत्रिणीकडून तिच्या सखीला फोन आला त्यात कळलं "साप म्हणे ६-७ फ़ुट लांब आहे"

बोंबला आता सगळेच बाकधारी झाले. गाडीने कोपर पार केलं नी दोन एक मिनिटात गाडी डोंबिवलीला पोहोचली. एकदाची गाडी ठेशनात आली. उतरताना पुसटसं ऐकू आलं "साऽऽप नाय काय उंदीर आहे उंदीर.."

ह्या सर्व प्रकाराने कानगोष्टींचा खेळ आठवला. ह्या प्रकारच्या झालेल्या कानगोष्टींमुळे अफवा कशा पसरतात वेगाने त्याचा मात्र अनुभव आला. नशिबाने ह्या आरड्या ओरड्याने कोणी घाबरुन उडी मारली नाही गाडीबाहेर. जीव प्यारा तर सगळ्यांनाच असतो. ट्रेन मधे जंप करुन सीट कशी पकडायची हे कोणालाच शिकवावं लागत नाही. पण अफवा कशा पसरवू नयेत किंवा अफवांना कसं बळी पडू नये हे मात्र शिकायलाच हवं हे समजलं.

आणि म्हणूनच ह्या कानगोष्टीमुळे उतरता उतरता मनात आलं आधी साप होता डोंबिवली पर्यंत त्याचा उंदीर झाला आता "हेऽऽ राम कल्याणला जाईपर्यंत त्या जादुगाराने झुरळाचं रुप नाही घेतलं म्हणजे मिळवलं."

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०११

सजले रे क्षण माझे.....

"Passengers your attention please....."

"यात्रीओंसे निवेदन है.."

"प्रवाशांनी कृपया इथे ..."

अस तीन भाषांतुन ओरडत निवेदिका, बहुतेक रोजच लेट येणाऱ्या लोकल ट्रेन्स बद्दल "असुविधाके लिये खेद है" चं तुणतुणं वाजवत असते.

लोकं प्लॅटफॉर्म वर उभं राहून रेल्वे व्यवस्थापनाच्या नावाने खडे फोडत असतात.

पावसात काऽय तर म्हणे पाणी तुंबून ट्रेन्स बंद
हिवाळ्यात काऽऽय तर म्हणे धुक्यामुळे पुढचं काही दिसत नाही म्हणून ट्रेन लेऽट

ते गाणं लहानपणी म्हणायचो ना ..

"घड्याळात वाजला एक
आईने केऽला केक
केऽक खाण्यात एक तास गेलाऽ
मी नाही अभ्यास केऽलाऽऽ"

असं प्रत्येक तासा तासाचं कारण वेगळं असायचं.. तस कारणं नसतील नेहमीची त्यावेळीही हे रेल्वे कर्मचारी गाडी लेट करायला

"कारणं शोधण्यात एक तास गेला
म्हणूनच आज लेऽट झालाऽऽ"

असं म्हणत असावेत.

त्यांची कारणं, आमचं त्यांच्या नावाने खडी फोडणं इतकं अंगवळणी पडलय आता की ह्यापेक्षा वेगळं काही चांगलं घडलं तर आनंदाने हर्षवायु वगैरे होईल की काय एखाद्या प्रवाश्याला असं वाटतं.

मुंबईची लाईफलाईन म्हणतात हिला. इथल्या चाकरमान्याची रोजची सकाळ आणि संध्याकाळ घड्याळाच्या काट्या बरोबरच हिच्याही बरोबर बांधलेली असते. कट्टर प्रवाश्याकरता इथली ७.३९ ची लोकल म्हणजे ३९ चीच तिचा उच्चार चुकुनही तो ७.३५ किंव ७.४० असा करणार नाही, राऊंड फिगरचा नियम इथे लागत नाही. सेकंदभराचा फरकही डोक्याला चालत नाही, मग भलेही ट्रेन स्वत:चं वेळापत्रक कोलमडवू दे. आम्ही कधी आमचं वेळापत्रक कोलमडू देत नाही (निदान ट्रेनची कागदावरची वेळ कोणती? हे लक्षात ठेवण्याच्या बाबतीतलं तरी)

तर अशी ही आमची लाईफ लाईन आमच्या लाईफ मधले आमचे आनंद, दु:ख, राग सारं काही आमच्या सकट आपल्या पोटात घेऊन धावणारी.

केळवण ते डोहाळजेवण आणि नोकरीतल्या बढतीच्या पार्टी पासून ते सेवानिवृत्तीच्या सेन्डॉफ पर्यंत सगळ्या सोहळ्यात आमच्या बरोबरीने मिरवणारी.

"आऽऽऽज विसरु नकोस हऽ संध्याकाळी ६.३६ नेहमीचा डबा." सखीला आठवण करुन देताना ती ही धावता धावता नोंदवून घेत असते हे सारं.

गणपतीत ती ही आमच्या बरोबरीने बाप्पाच्या आरत्यांमधे रमते. नवरात्रातले नऊ दिवस वेगवेगळ्या रंगांमधे ती ही रंगुन जाते, आमच्या सोबत अंबेचा गजर करते. भोंडल्याची गाणी म्हणते. खिरापतीला काऽऽय ग? च्या खेळात ती ही आमच्या बरोबरीने सहभागी होते.

नावरात्रातले अष्टमी पर्यंतचे दिवस असेच जातात देवीच्या गजरात आणि नवमी उजाडते ती एका वेगळ्या ढंगात.

नवमीला ट्रेन लेट झालीच जरी ५-१० मिनिटांनी तरी नेहमीचा प्रवासी शिव्यांची लाखोली वहात नाही.
की असुविधाके लिये खेद है... ह्या निवेदनाची वाट बघत नाही.

कारण आजचा दिवस ह्या "लाईफ लाईनच्या" लाईफ मधला ही खास असतो. आजच्या दिवशी नेहमीची चीडचीड, घड्याळाची मिनिटा मिनिटाची बांधिलकी, लेट मार्क सारं सारं थोड्यावेळासाठी बाजूला ठेवून चाकरमानी ह्या लाईफ लाईनला सजवण्यात गर्क असतो. दसरा सण हसरा म्हणत दुसऱ्या दिवशी येणारा दसरा लोकल करताही हसरा क्षण घेऊन आलेला असतो.

ह्या दिवशी ती तोरणं बांधून दिमाखात प्रवास करते. प्रवासाच्या आधी मोटरमनच्या हस्ते नारळ फोडला जातो. एरव्ही तावातावाने "ह्या रेल्व्हेवाल्यांना आपल्या हातचा प्रसादच द्यायला हवा" म्हणणारी जनता आज त्यांना खरोखरीचा खोबरं पेढे असा प्रसाद वाटत असते.

हे सारच त्या लाईफ लाईनचं आपल्या आयुष्यात असलेलं महत्व आधोरेखीत करणं असतं की कधी तरी दगडफेक वगैरे करुन, तिच्या अंगावर स्वत:चं नाव कोरुन, प्रेमाचे बाण गोंदवून, घाण करुन तिला विदृप केल्याचा तो पश्चात्ताप असतो कोण जाणे!

ती मात्र सारं काही नेहमीसारखच पोटात घेऊन धावत रहाते.

माझ्या दिवसाची सुरवात मात्र एकदम प्रसन्न होऊन जाते तिचं असं सजलेलं रुपडं बघून.







मंगळवार, २७ सप्टेंबर, २०११

सारे प्रवासी गाडीचे

धक्का मारणार्‍या पब्लीकला चुकवण्यासाठी बॅगेची ढाल करत, दुर्बुद्धी होऊन नेसलेल्या साडीमुळे होऊ घातलेलं लोटांगण टाळत, नी पावसाच्या मार्‍याने दशा झालेली छत्री सांभाळत आणि पुन्हा पुन्हा बॅगेतून बोंबलणार्‍या मोबाईलकडे दुर्लक्ष करत... प्लॅटफॉर्म वरच्या घड्याळाचा काटा १८:२३:५४ असा दाखवत असताना, मी पिटी उषागिरी दाखवत प्लॅटफॉर्म नंबर १ ते ७ चा पल्ला यशस्वीपणे पणे पार करत ६.२४ च्या कर्जत लोकल मधे पहिला दरवाजा गाठून हुश्श झाले.


मी येव्हढीSS कसरत करुन गाडी गाठली खरी, पण दरवाजा अडवून उभ्या असलेल्या कजाग बायका मेSल्याS... जळकट कुठच्या, एक जण प्रेमाचा हात पुढे करुन सॉरी सॉरी प्रेमाने जागा देऊ करुन "ये येऽ ह्या बाजूला उभी रहा" म्हणत साईड देईल तर शप्पथ! उग्गाच आपलं जर्रासा धक्का काय लागला माझा चढताना आणि छत्री काय इलुशी टोचली तर त्यावरुनच भांडायला निघाल्या माझ्याशी.

काय तर म्हणे "आँख फुट गया है क्या तेरा!"

"अरे गर्दी है तर धक्का लागणारच ना!. दारात उभं रहाणार आणि शहाणपणा शिकवणार दुसर्‍याला" म्हणत हम किसीसे कम नहीऽऽ कम नही.. बाणा जपत तिला म्हंटलं तोपर्यंत पुन्हा एकदा बॅगेतून फोन कुरकुरला.

पहिले त्या छत्री भोवती तिचा तो बंद आवळला. मग गर्दीला सरावत आणि साडी सावरत बॅगेत प्लॅस्टिक बॅग शोधायला हात घातला. त्या लाकुडतोड्याच्या गोष्टीसारखं आधी भाजीची पिशवी हाताला लागली, ती ठेवली तर लायब्ररीच्या पुस्तकाची पिशवी हातात आली. पुन्हा एकदा हाताने बॅगेत डुबकी मारली तेव्हा कुठे नेमकी हवी ती पिशवी हातात आली. तोपर्यंत मी दोन तीन वेळा धक्के खाऊन गोल गोल घुमले. पण एकदाची छत्री त्या हाताला लागलेल्या पिशवीत आणि मग पिशवी बॅगेत कोंबण्यात यशस्वी झाले.

तोपर्यंत फोनने ४ मिस्ड कॉल नोंदवलेले कळले. मग काय प्रायश्चित्त म्हणून मला माझा बंदा रुपया खर्च करुन फोन लावणं भाग होतं.

फोन लागल्या लागल्या पलिकडून "क्कॉऽऽय हे, चढलीस का नाही गाडीत? लवकर ये समोसे आणलेत, किचन मधे वाट बघतेय. आणि टिशर्ट...." पुढचं बोलणं फोनमधून भांडी पडल्यासारखा आवाज येत होता त्यात विरुन गेलं.

हज्जारदा सांगितलं तिला डॉल्फिनच्या नेटवर्कला असा मधेच भांडी पडल्याचा आवाज येतो, बदऽल बदऽल ते नेटवर्क पण ऐकेल तर ना! मी मनाशीच वैताग व्यक्त केला.

मी परत फोन लावायला गेले तर माझ्या डोकोमोच्या नेटवर्कने "हे राम" म्हंटलेलं. त्यावरुनच गाडीने मस्जीद पार केल्याचं मला कळलं. आता भायखळा येईपर्यंत नेटवर्क खो खो खेळत रहाणार हे ठरलेलच होतं.

त्यातल्या त्यात "ती" किचन मधेच आहे हे ऐकून खासा आनंद झालेला. म्हणजे फार कसरत न करता फक्त आतमधे जाऊन तिच्या पर्यंत पोहोचायचय तर...

हसूऽ नकाऽ किचन शब्दाला. "सारे समय केवल महिलाओंके लिये" असं लिहिलेल्या, गार्डच्या आधीच्या डब्याला तीन दरवाजे असतात. त्यातल्या पहिल्या आणि शेवटच्या दरवाजाच्या एका बाजूला असलेली छोटेखानी जागा म्हणजे ज्यात जास्तीत जास्त समोरच्या लांब लचक बाकड्यावर ८ जणी (माझ्यासारख्या सडपातळ बाया असतील तर आरामात ९ जणी) आणि आत शिरता शिरता दोन्ही हाताला असणार्‍या बाकड्यावर प्रत्येकी ४ जणी बसतात अशी जागा. (तीन आरामात आणि चवथी सीट म्हणजे काळापाण्याची सजा. हे ही वर लिहिल्या प्रमाणे माझ्यासारख्या सडपातळ.... आरामात ४ जणी असं वाचावं) तर अशा ह्या जागेला बायकांच्यात पडलेलं नाव आहे किचन. ते का पडलं? त्याची नोंद माझ्याकडे तरी नाही पण इथे पण मेली किचनपासून मुक्ती काय ती नाहीच. स्त्री मुक्तीवाल्यापण काही बोलत नाहीत ह्यावर. तो एक वेगळाच विषय आहे तर असो.. आता ट्रेनच्या डिक्शनरी मधलं किचन हे नीट समजलय असं मानून मी पुढे पाऊल टाकते.

टाकते म्हंटलं, पण पाऊल नुसतच वर उचललं. टाकू कुठे? त्या जागेवर एका बाईने तिची पाटी पसरुन ठेवलेय.

"ओ मावशीऽ... ओऽ ओऽऽ बाईऽऽ" मी तिच्या ढिम्मपणाने वैतागून माझा राग "मावशी ते बाई" ह्या बदलातून व्यक्त करायचा फालतू आणि निष्फळ प्रयत्न करत तिला हाक मारली. ती हु नाही की चु नाही, काडीने दात कोरत तशीच बसून.

इकडे पुन्हा रिंग टोनने मला धमकावलं तसं मी पुन्हा एकदा टिपेचा आवाज देत "ओऽऽऽ ओऽऽ ओऽऽ बाईऽऽ ही तुमची पाटी बाजूला घ्या, बाकिच्यांनी आत कसं जायचं? लगेजच्या डब्यात जायचं ना येव्हढी मोठ्ठी पाटी पसरुन बसायचं होतं तर." असं चक्क सुनावलं आणि तिने थोडी काचकूच करत का होईना पण माझं म्हणणं चक्क पैकी ऐकलं. मलाही धक्काच बसला माझा हा झाशीची राणी अवतार बघून. एरव्ही असं कोणीच ऐकत नाही कधी येव्हढ्या पटकन. म्हणजे एकतर मी ट्रेनमधलं मुरलेलं लोणचं झालेय नाहीतर ती तरी नवखी आहे. पण आत जाता जाता थोडुश्शी अडचण झाली. तिच्या पाटी बाजुला घेण्याच्या आणि माझ्या आत जाण्याच्या वेळेने थोऽडक्या करता एकमेकिंना छेडल्याने माझ्या साडीच्या फॉलचं टोक जऽरासं उसवलं. त्या जऽराश्या उसवलेल्या टोकावर माझाच मेलीचा पाय पडल्याने त्याने प्रताप दाखवत मला उजव्या हाताच्या चवथ्या सीटवालीवर आपटवलं. मग तिने ती कित्ती मुरलेय हे दाखवत माझ्यावर तोफ डागली. तिच्या कडे बघुनच मी "समजत नाही काय? गर्दी आहे, कोण काय मुद्दाम करतं काय?" ही सगळीच्या सगळी वाक्य पटकन गिळून टाकली आणि "सॉरी हऽ" असं नवखेपणाचा आव आणत पुट्पुटले.

येव्हढसं तर किचन त्यात आणि फोन लावून काय विचारायचं "कुठे बसल्येस म्हणून!" असं स्वत:शीच म्हणत मी "तिला" शोधायला सुरुवात केली. समोरची ८ आणि दोन्ही बाजुची प्रत्येकी ४ डोकी बघून झाली पण "तिचा" काही पत्ता लागला नाही. म्हंटलं "कायापालट झाला की काय इतक्यातल्या इतक्यात?"

नशीब तेव्हढ्यात "तिचाच" फोन खणाणला. बरोब्बर भायखळा जवळ आलय म्हणून फोनवा लागलाय तिला.

"अगं कुठे आहेस? समोसा पाऽर गाऽर झाला आता. किचन मधे ये म्हंटलं तर कुठे गायबलीस?"

"अगं मी किचन मधेच आहे? तू दिसत नाहीयेस पण" मी शोधक नजरेने इकडे तिकडे बघत म्हंटलं

"मी नीळा ड्रेस घातलाय बघ" इती "ती"

कप्पाळ इथे ४ टाळकी तरी होती निळ्या शेडस मधली. आणि त्यातली एकही "ती" नव्हती.

"अगं निळ्या ड्रेसवाल्या आहेत इथे पण त्यात तू नाहियेस. तू नक्की ६.२४ कर्जतलाच सीट पकडल्येस ना?" मी बेसिक मधेच लोचा नाही ना झाला हे चाचपत विचारलं.

"हो ग, कर्जतलाच आहे मी. किचन मधे. किचन लेफ़्ट टर्न रॉन्ग साईड सेकंड सीट" तिने तिच्या परीने मला व्यवस्थित दिशा समजावली.

फोन ठेवला आणि....आणि.... युरेका... होऽ होऽऽ युरेका मी मनातल्या मनात टिचकी वाजवत गिरकी घेत म्हंटलं. होS होS मनातल्या मनातच कारण इथे पाय ठेवायला नाही जागा. माझा पदर पुढे खोचायला म्हणून घेतला तर दुसरीचीच ओढणी हातात येते अशी अवस्था इथली. म्हणून टिचक्या... गिरक्या सगळं मनातल्या मनातच. आता युरेका काय? तर लोकहो मगाशी नाही का सांगितलं गार्डच्या आधीच्या सारे समय केवल महिलाओंके लीये वाल्या डब्याला तीन दरवाजे असतात. त्यातल्या पहिल्या आणि शेवटच्या दरवाजाच्या एका बाजूच्या छोटेखानी जागेला किचन म्हणतात. म्हणजेच किचन पण दोन असतात. आता जागा १ बी एच के अशी असताना एक किचन तर एक बेडरुम का नाही ते नका विचारु मला. दोन्ही किचनच असतात.

पण आता महा संकट कारण ही युरेका मोमेंट फार तापदायक प्रकार. आता मला पुन्हा एकदा चवथ्या सीट वाल्यांना धक्के देत, ओऽऽ बाईऽऽ वाल्या मावशींना पाटी हलवायला सांगून आणि "काय आत बाहेर खो खो खेळताय काय? पहिल्यांदाच आलायत का? एकदा काय ते ठरवा ना कुठे जायचं ते" हे असले सारे शेलके शेरे कानाआड करत पहिल्या किचन मधून बाहेर पडावं लागणार होतं. मग परत इकडे दादर साईड आणि तिकडे कुर्ला साईड ब्लॉक करुन ठेवलेल्या बायांना "मला जाऊद्याना पुढे..." च तुणतुण वाजवत मधला दरवाजा गाठावा लागणार होता.

पहिलं दिव्य पार पाडे पर्यंत दादर जवळ आलं.

आता घाई नाही केली तर "ती" ठाण्याला उतरे पर्यंत मी मधल्याच कंपार्टमेंट मधे रहाणार हे त्रिकाला बाधीत सत्य होतं.

त्यातून माझा सिक्स्थ सेन्स मला सांगत होताच "सावधान! वाट वैर्‍याची आहे..." आधी दारात "अंधी है क्या?" ऐकून "इजा" झाला मग चवथ्या सीट वालीच्या शिव्या झेलून "बीजा" झाला आता तीजा नक्की होणार.

होणार होणार काय! समोर चाल्लाच आहे तीजाचा फेरा. चवथ्या सीट वालीचं प्रेशर तिसर्‍या सीट वाली वर येतय. चवथी म्हणतेय बाकीच्या जागा सोडून बसल्यात... हे ह्यांचं नेहमीचच आहे चवथ्या सीटला गृपवाली असेल तर बरोबर जागा होते.

आता ह्या वाक्याने तिसर्‍या सीटवालीच्या जोडीने सेकंड आणि विंडोवाली पण युद्धात उतरल्यात.

कचाकचा शिव्या देऊन झाल्यात. सगळ्यांच्या लोकोत्तर घराण्याचा उद्धार करुन झालाय, काचेच्या बांगड्या फुटल्यात. नखाने ओरखाडायचं काम पार पाडलय. झिंज्या ओढल्या जाऊन सगळ्यांच्या झिपर्‍या सुटल्यात.

आजूबाजूच्या काही बाया ह्या बायांना आवरतायत, काही त्याची मजा लुटतायत. तर उरलेल्यांचं ह्याकडे लक्षच नाहीये. त्या त्यांच्या अंताक्षरीत गुंतल्यात आणि ह्या सगळ्यात मी साडी सावरत पलिकडच्या कीचन कडे निघालेय.

परिस्थिती आणिबाणीची असताना, समोर युद्ध धगधगत असताना शहाण्या बाईने त्यांना "एस्क्युज मी प्लीज" असं म्हणणं पण फुकट असतं हे असा प्रवास अनुभवलेली कोणीही सांगेल.

पण उपेग नाही. काहीतरी करायलाच हवं इथे फोन वर समस, मिस्ड कॉल जमा होतायत. समोसा केव्हाचाच गार झालाय. आता समोसा जाऊदे पण निदान ज्या कामासाठी तिला ह्या गाडीला यायचं कबूल केलं ते टिशर्ट ताब्यात घेण्यासाठी तरी तिथपर्यंत जायलाच हवं.

एकवेळ कठीणातला कठीण ट्रेक पण पुर्ण होईल आरामात पण हे दोन डबे पार करणं म्हणजे....

"अरे आत जा ना, काय मधे उभी राहील्येस. च्यायला कधी तरी येतात आणि कुठेही उभे रहातात लोकं?" इती एक दादरकरीण हिरकणी मला म्हणतेय.

"तुम्हाला जागा दिलेय ना जायला. मग बोलायचं काम नाही उगाचच. मला त्या किचनला जायचय म्हणुन उभी आहे. काही हौस नाहीये मलाही धक्के खायची" मी बाण परतवत आणि पुन्हा एकदा बॅगेची ढाल करत म्हंटलं खरं पण त्या कुर्ला घाटकोपरच्या गर्दीत अशी काही चेपून निघाले की क्या बताऊ..

तिकडे ती फोन करुन थकली. शेवटी उतरायच्या आधी भेटूयात असा तोडगा काढून फोन ठेवला.

आता मिशन ए किचन चा जोर लावायलाच लागणार.

"इथे कुठे जागा दिसतेय सरकायला?"

"ठाणा गेल्यावर जा"

"फेरीवाले आणि हे असे इथून तिथे खो खो खेळणारे लोकं, सगळ्यांवर बंदी घातली पाहिजे"

ही सगळी मुक्ताफळं एरव्ही मी उधळते पण आज माझ्यावर उधळून घेत घेत इंच इंच नव्हे सेंटी मिटर सेंटीमिटर लढवत मी गड सर करायला निघाले.

घाटकोपर जाईपर्यंत मी दुसर्‍या दरवाज्यातून तिसर्‍या दरवाजा पर्यंत पोहोचले.

किचन... लेफ़्ट टर्न.. रॉन्ग साईड सेकंड सीट... मी रोबो सारखी तिथपर्यंत पोहोचले तोपर्यंत माझ्या साडीच्या इस्त्रीचे पार बारा वाजले होते. समोसा खायची इच्छा अजिबात राहिली नव्हती. फक्त ते टिशर्ट ताब्यात घ्यायचे आणि पुन्हा ठाण्याची गर्दी झेलत डोंबिवलीसाठी डटके उभं रहायचं येव्हढच एक मिशन राहिलं होतं.

तिने तरिही समोश्यांची कागदी पिशवी हातात देत "क्कॉऽय हेऽ मला वाटलं किचन म्हंटल्यावर तू येशील बरोबर इथेच" असं म्हंटलं आणि पटकन पॅसेज मधून बाहेर पडत ठाण्याची साईड गाठली.

पण आता मझ्यात "अग बयेऽ दोन किचन असताऽऽत नाऽऽ!" असं म्हणत बचाव करावा इतकाही त्राण नव्हता.

मी फक्त "ती टि शर्टची पिशवी दे पटकन, म्हणजे मी ठाणा यायच्या आधी डोंबिवलीची साईड गाठते" असं म्हंटलं तिला.

"अगं अशी काय तू?" तिने मलाच प्रतिप्रश्न केला.

"अगंऽ आशु, सुमी, सायो, आणि मंडळींचे टिशर्ट देत्येस ना माझ्याकडे? सायो आलेय इथे तर माझ्याकडून कलेक्ट करणार आहे ना ती?" मी माझा होमवर्क पुरेसा असल्याचा पुरावा देत म्हंटलं

"नाऽही. मगाशीच नाही का मी तुला फोनवर सांगितलं मी टिशर्ट आणले नाहीयेत आज म्हणुन?"

"तुझं डॉल्फीन खरच बदलून टाक. भांडी पडल्याच्या आवाजात कळलच नाही मला तू टिशर्ट बद्दल काय म्हणालीस ते" मी थोडसं चिडून, थोडसं रडकुंडीला येत म्हंटलं.

"तुझा डोकोमो बदल आधी. कधीच लागत नाही पटकन" तिने आता बॉल माझ्या कोर्टात टाकला.

"तुझी नगर ट्रिप कशी झाली?" मला असा प्रश्न करुन पुढच्यांना "ठाणा?" "ठाणा?" असा विचारत ती पुढच्या गर्दीशी एकरुप पण झाली.

फार पुर्वी मला गोव्याला जाताना ट्रेन मधे भेटलेल्या कॉफी विक्रेत्याची आठवण झाली. तो असाच "कॉफीऽ कॉफी? कॉऽफी" ह्या एकाच शब्दात समोरच्याला "ही कॉफी आहे, कॉफी देऊ? किती? " हे येव्हढं सगळं विचारायचा फक्त शब्दांचे हेल बदलून. तसच ट्रेन मधल्या बायका समोरच्या गर्दीला विचारतात "ठाणा?" म्हणजे "मी ठाण्याला उतरणारे, तुम्ही ठाण्याला उतरणार आहात का? सगळी लाईन ठाणावाली आहे का?" आणि हे सगळ्या स्टेशनांबाबत सेम असतं फक्त स्टेशनाचं नाव बदलतं इतकच.

"नगर ट्रिप ना? चांगली झाली. शनिवारी सकाळच्या एस्टीने गेलो नी रविवारी एस्टीनेच परत आलो" एका वाक्यात वृत्तांत संपला सुद्धा.

"ओके! ठीक मग उद्या भेटू. टिशर्ट घेऊन मी उद्या येते ह्या गाडीला." गर्दी पुढे ढकलत होती तरी मान मागे वळवून ती म्हणाली

मी "उद्या पुन्हाऽऽ? नहीऽऽऽऽऽऽऽऽऽ" असं म्हणावसं वाटून सुद्धा दोस्तीके खातीर म्हंटलं "व्हय महाराजाऽऽ!"






















































रविवार, ११ सप्टेंबर, २०११

आठवणीची रिळं

आठवणीची रिळं भाग १ - काळ क्युएस्क्युटीचा

तुम्ही क्यु एस क्यु टी, एम पि के, एच ए एच के (हे जरा हिचकी दिल्यासारखं वाटतं ना?) डि डी एल जे च्या काळातले आहात? असाल तर "ये एच ए एच के क्या है भाई?" असा प्रश्न तुम्हाला पडणारच नाही आणि असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही नक्की त्या काळातले नाही किंवा तुमचा गजनी तरी झालाय असं समजायला हरकत नाही.

"फ्रेन्डशीपका एक उसुल होता है. फ्रेन्डशीप मे नो सॉरी नो थॅन्क्स" आणि ती टोपी. काय करिष्मा होता त्या गोष्टींचा तेव्हा सगळ्या गॄपवर. इतका की वाढदिवसाची गिफ्ट म्हणून सलमान, भाग्यश्री, माधुरी, अमीर ह्या लोकांचे पोस्टकार्ड साईझ फोटोग्राफ एकमेकींना दिल्याचं आठवतय मला. एका मैत्रिणीने माधुरीला पत्र का कायतरी पाठवलेलं आणि तिला माधुरीकडून सही असलेला फोटो आला तेव्हा तिने दिलेली रगडा पॅटिसची पार्टी पण आठवतेय.

ती येव्हढी जबरी पंखी माधुरीची की तिच्या घराच्या हॉलमधे तिने आई बाबांशी भांडून भांडून माधुरीचं एच ए एच के वालं, एका हातात आयस्क्रीमचा कोन धरलाय अशा पोझवालं भलं मोठ्ठं पोस्टर लावलं होतं. त्याकरता तिच्या बाबांना त्यांच्या आवडीचं ब्लॅक ऍण्ड व्हाईट जमान्यातलं मधुबालाचं पोस्टर काढावं लागलं होतं. पण ते ट्रान्झिशन सोप्प झालं तिला. आमच्याकडे "बजरंग बली की जय" वाली फ्रेम भिंतीवर होती. ती काढून त्या जागी माधुरीचं पोस्टर लावू का? हे विचारायची पण हिम्मत आमच्यात नव्हती.

एम पी के थिएटरला किमान ५ वेळा आणि कोणाच्या ना कोणाच्या व्हिडीओ प्लेअर वर भाड्याने आणून अजून १० एक वेळा वेड्यासारखा बघितलाय. एच ए एच के आणि त्यातल्या "अहाऽऽ" चीही तीच तर्‍हा. आता टिव्हीवर फुकटात लागला कोणत्याही चॅनलला तरी पहिली पाच मिनिटं - तेही जुन्या दिवसांखातर बघायचं - धारिष्ट्य दाखवता येतं. त्या उप्पर नाSय रेS बाबाSS. एम पी के तल्या भाग्यश्रीचं ते लाडिक बोलणं डोक्यात जातं आता आणि त्या सलमानचे डोळे मोठे करुन बघणं पण बघवत नाही. सलमान फॅन्स लई लई सॉरी, पण काय करणार काळाप्रमाणे क्रश पण बदललेत ना आता.

आम्हीही कोणे एके काळी सलमानचे पंखे होतो. त्या जोरावरच तर त्याच्या "कुर्बान" सारख्या तद्दन सिनेमाचा गल्ला भरला गेलाय. नाहितर पंख्यांशिवाय उगाच कोण त्या "आओ मै पढाऊ तुम्हे ए बी सी. चलो हटो जाओ मुझे छोडो जी नही पढनी मुझे ए बी सी. अच्छा बाबा अच्छा मुझे माऽफ करो.. रुक जाऽऽऽओ हमे ना सताऽऽओ करीऽब तो आऽऽओ आणि त्या आरे मिल्कची ऍड वाटाव असं ते (आऽऽरे आऽऽरे). "तू जब जब मुझको पुकारेऽ मै दौडी आऊ नदिया किनारे" ही असली गाणी अख्खीच्या अख्खी पाठ.

"ह्या गाण्याची एक गंमत आहे" हे पंडीतजी कसं सांगतात तस्सच अगदी सलमानच्या "लव" नावाच्या शिणूमाची पण एक गंमत आहे बरं का. तो शिणूमा मैत्रिणीकडे व्हिसिआरवर बघितलेला. ती बोलवायला आली आम्हाला तेव्हा मी मस्तपैकी डाराडूर पंढरपूर झालेले (आता हे र्‍हाईम कोणी, कधी, का जुळवलं ते नाय बॉ आपल्याला माहित पण आवडलं म्हणून वापरलं झालं) तर त्यावेळी तिने "चल उठ लव आणलाय" सांगितलं आणि मी घाईघाईने उठून तोंड धुवून चूळ भरुन निघाले खरी पण सिनेमा बघायच्या एक्साइटमेंट मधे मी चूळ बेसीन मधे टाकायच्या ऐवजी चुकून बेसीनच्या बाहेरच टाकली आणि आईचा ओरडा तर खाल्लाच शिवाय सगळं पुन्हा पुसापुसी करुन निघावं लागलं. तिकडे माझ्यामुळे उशीर झाला म्हणून मैत्रिण वैतागली. तिने भाड्याने ती व्हिसिडी आणलेली.

सलमान फॅन होतो तेव्हा, तरिही "लव" मधल्या रेवतीच्या त्या पेनातली शाई निळी आहे की नाही हे चेक करण्याकरता सलमानच्या शर्टवर प्रयोग करण्याच्या सीनची पारायणं केल्येत ते फक्त त्याचा कधी काळी वापर करता यावा ह्या शिकावू वृत्तीनेच. आईने महिला बचत योजनेची, एन एस सीची एजन्सी घेतलेली. "तो" सीन करायची कधीतरी संधी चालून येईल ह्या आशेने आईची पोस्टाची कितीतरी कामं गुणी बाळासारखी केलेत तेव्हा. पण हमारा नंबर कभी आयाईच नही.

फावल्या वेळात ह्या सगळ्या सिनेमांचे रिमेक करुन सुट्टीचा वेळ सत्कारणी लावायचा ह्या शिवाय दुसरं काम तरी काय होतं आम्हाला. मी आणि अजून एक मैत्रिण जिने माधुरीचा सहीवाला फोटो मिळाला म्हणून पार्टी दिली ती, आम्ही दोघीही कधी कधी अंताक्षरी खेळून कंटाळा आला की 'सिनेमा' नावाचा खेळ खेळायचो. हा खेळ खेळताना एम पी के आणि एच ए एच के नावाच्या दोन सिनुमांची ओळ अन ओळ (फक्त हिरो आणी हिरविणीचे डायलॉग्ज अर्थात) घडाघडा म्हणायचो, मधल्या गाण्यांसकट आणि त्यांच्या आधीच्या त्या वाजणार्‍या म्युझिकल पीससकट. नुसताच शाब्दिक सिनेमा करायचो अर्थात.

माधुरी क्रेझ तर तेव्हा जबरदस्तच होती. आठवतंय का त्या एच ए एच के मधल्या तिच्या सगळ्याच ड्रेसची झालेली नक्कल? नशिबाने मी तितकी क्रेझी नव्हते आणि समजा असते तेव्हढी क्रेझी तरीही आईने असला काही ड्रेस शिवायची परमिशन स्वप्नात पण दिली नसती. खरंतर आधी मला ती खूप प्रचंड आवडायची असं नव्हतं पण दुसर्‍या एका मैत्रिणीला फ्रीदेवी भन्नाट आवडायची, आणि ती माधुरी आणि पर्यायी, माधुरी फॅन्सना उगाचच हिणवायची. श्रीदेवीला नावं ठेवली आणि माधुरीचं स्तुतिगायन केलं की ती हमखास भडकायची. की मग पुढचे तास दोन तास मजेत जायचे आमचे, फक्त अधून मधून "लड बाप्पूऽऽ" म्हणत तेल ओतायचं बास. तर तिला भडकवण्याकरता मी माधुरी माधुरी जप करायला लागले आणि एका क्षणी ती आवडायलाही लागली.

प्रचंड क्रेझी नसले नक्कल करण्या इतकी तरी मी तिचा तद्दनातला तद्दन पिक्चर पैसे घालवून थिएटरला बघितलाय तेव्हा. "राजा" नावाचा सिनेमा आठवतोय? आहे काही त्यात पैसे घालवून बघण्यासारख? ते देखील स्वत:चे पैसे घालवून? "अखियाँ मिलाऊ, कभी अखियाँ चुराऊ" ह्या एका गाण्यासाठी अख्खा सिनेमा त्या अनिल कपूरच्या भावाला हिरो म्हणून सहन करायच? पण सच्चे भक्त को भक्ती से कोई नही रोक सकता स्टाईल आम्ही गेलो तिकिटं काढून सिनेमा बघायला. आयत्यावेळी ठरवलेला कार्यक्रम म्हणून ३ ते ६ च्या शो ला धावत पळत पोहोचून तिकिटं काढून आत गेलो. आयत्या वेळी गेलो तरी बर्‍यापैकी मागची तिकिटं मिळाली म्हणजे तो किती महाऽऽन सिनेमा असेल हे कळत होतं पण वळत नव्हतं.

या सिनेमाची पण एक गंमत आहे. झालं असं की आम्ही तिकिटं काढून आत गेलो तेव्हा नुकताच सिनेमा

सुरु झालेला. आत मधे अंधार होता आणि त्या टॉर्च धारी सीट सहाय्यकाने सांगितल्या प्रमाणे आम्ही लोकांचे "ओऽऽ बाजूऽऽ" "शुऽऽक शुऽऽक बाजु हटो" हे उद्गार झेलत आमच्या सीटकडे चाललो होतो. माझ्याबरोबर माझे दोन भाऊ होते. ते "ताई, पुढे होऽ पुढेऽ होऽऽ" चा गजर करत होते. तितक्यात पडद्यावर माधुरीची एण्ट्री झाली आणि मी पडद्याकडे बघत बघत "ताई, पुढे होऽऽ" चा मान ठेवत पुढे जात जात एका क्षणी जागेवर बसले. आणि धाऽऽडकन आवाज झाला. खुर्च्यांची रांग संपून त्यापुढे असलेल्या मोकळ्या जागेत मी माझं बुड टेकवायला गेलेले आणि .... आणि काय? पडद्यावर घायाळ करणारी माधुरी होती तरीही तो सीन मी अख्खाच्या अख्खा खाल्ला होता लोक्स. सगळं पब्लिक तिचा प्लेजंट प्रेझेन्स विसरुन माझ्या एण्ट्रीकडेच बघत होतं. भाऊ एकीकडे खोऽ खोऽ हसत होते पण दुसरीकडे कोणी ओळखीचं तर नाही ना आजुबाजुला हे बघण्याचा प्रयत्न करत होते.

हे माधुरी प्रेम पाऽऽर त्या दिल तो पागल है मधल्या त्या खुळ खुळ वाजणार्‍या कड्या पर्यंत टिकलं. त्याच सिनेमाने तर माझ्या ज्ञानात "व्हॅलेंटाईन डे" नावाच्या गोष्टीची भर घातली. आमच्या कॉलेजमधे त्याच वर्षीपासून अनऑफिशिअली तो डे साजरा व्हायला सुरुवात झाली. मोठ्या शहरांमधे कदाचित ते त्या आधीच झालं असणार पण आमच्या पर्यंत पोहोचायला "दिल तो पागल है" पडद्यावर झळकावा लागला. तो पर्यंत माझ्या कॉलेजमधले रोमिओ ज्युलिएट्स रोझ डे चाच आधार घ्यायचे.

ह्या सगळ्या त्यावेळच्या वीक पॉईंटस मधे अजून एक नाव अ‍ॅड करावच लागेल, ते म्हणजे टिव्हिएस सारेगामाचा सोनू निगम. त्याच्या करता तो प्रोग्रॅम न चुकता बघितला जायचा, बाकी मी ना तानसेन ना कानसेन.

हे वीक पॉईंटस काही माझ्या एकटीचे नव्हते. हे तर आमच्या गृपचे कॉमन वीक पॉईंटस होते. मला आठवतय ही जी मैत्रिण मी म्हणतेय माधुरी भक्त, तिच्या कुठल्याश्या क्लासमधे "एक दुजे के लिये" स्पर्धा होती. कोणाही मित्र मैत्रिणीला घेऊन खेळली तरी चालणार होती. तेव्हा आम्ही दोघींनी ह्या सगळ्या कॉमन क्रेझ नी क्रशेस च्या जोरावर तर पहिलं बक्षिस मिळवलं होतं. कारण सगळे प्रश्न आवडी निवडीशी निगडीत आणि आम्हा सगळ्यांच्या आवडी नी निवडी पण एकच. म्हणून झालो विनर "एक दुजे के लिये" चे. तेव्हा सगळे म्हणायचे ह्या म्हातार्‍या झाल्या तरी अशाच काही ना काही मॅडचॅप पणा करताना दिसतील एकत्र. पण तसं काहीच झालं नाही. शाळा, कॉलेज संपेपर्यंत असलेली आमची "एक दुजे के लिये" जोडी लग्नानंतर "नो नेटवर्क झोन" मधे गेली.

कधी कधी विनाकारण काही गाठी बसतात, त्या घट्ट होतात आणि मुद्दाम त्या सोडवायचा प्रयत्नही करावासा वाटत नाही. त्या त्या वयातला सिनेमा त्या त्या वयात जेव्हढा आवडतो तेव्हढा तो आता लुभावेलच असं नाही तसं पण झालं असावं.

तो काळ, त्या काळातल्या आठवणी मग त्या मैत्रीच्या असोत किंवा सिनेमाच्या वा एखाद्या गोष्टीच्या क्रेझच्या त्या काळाला सोनेरी करुन जातात येव्हढं मात्र नक्की. वयाच्या प्रत्येक टप्प्यातल्या मजा मस्तीच्या कल्पना वेगळ्या असू शकतात त्यामुळे तेव्हा प्रचंऽड आवडलेली एखादी गोष्ट आता वयाच्या ह्या टप्यावर "कशी काय बॉ आवडली होती तेव्हा?" असं वाटावं इतपत मतं बदलू शकतात, हे खरंय. पण तसा विचार कराच का? प्रत्येक गोष्टीला आत्ताची फुटपट्टी लावाच का? फारतर 'तेव्हा आवडलं होतं. येस्स, क्रेझ वाटावी इतपत आवडलं होतं आता नाही वाटत..' असं म्हणून पुढे जावं. ह्या आवडण्या विषयी खेद नाही की आता आवडत कसं नाही असं वाटून खंतही नाहीये.

हे काही "जाने कहा गये वो दिन..." म्हणत "लौटादे बचपन की यादे... " म्हणत गेल्या काळाविषयीचं

रडणं नाही. हे फक्त जुना अल्बम पुन्हा एकदा तुमच्या बरोबर बघणं आहे इतकच. ते ही काल मैत्रिणीशी बोलताना गप्पांच्या ओघात आजकालच्या चॅनल्सचा विषय निघाला , "कसला तो वैताग सिएन नी पोगोचा" ह्यावर जेव्हा एकवाक्यता झाली आणि "काय तल्लीन होऊन बघतात झालं तेच तेच, देवजाणे ही मुलं" ह्या वाक्याने गाडी आपोआप रुळ बदलत १०-१२ वेळा एम पी के कसा बघितला होता, त्यातले डायलॉग्ज कसे पाठ झालेले वर घसरली तेव्हा आठवणींची लडी उसवली, इतकच. बाकी काहीच नाही.


आठवणींची रिळं - भाग २ : प्लॅन्चेटचं खुळ

काल लंच टाईम मधे माझ्या ऑफिस कलीगने विचारलं "तुला प्लॅन्चेट म्हणजे माहितेय?"

माझा घास तसाच हातात राहिला. आईंSग ह्याला हे कुठे मधेच आठवलं?

एखादं जुनं खेळणं किंवा तत्सम एखादी गाठोड्यात बांधून ठेवलेली जुनी गोष्ट माळ्यावरुन कोणीतरी
काढून समोर ठेवली तर कसं वाटेल? तस्सच अगदी त्या "प्लॅन्चेट" ह्या शब्दाने झालं.

माझ्या डोळ्यापुढे सगळा प्लॅन्चेट पट उभा राहिला.

बहुतेक माझ्या १० वीच्या आसपास हे खुळ कोणीतरी आमच्या डोक्यात घातलं. करके देखा जाये क्या? ह्या प्रश्नावर आधी "छ्छे ग बाई, अजिबाऽऽत नको हा कायतरी" पासून सुरु होऊन हळूच "एकदा करुन बघुयात? एकदाच हं पण" वर गाडी आली.

मग कोणाच्या घरी करायचं? कधी आणि कोण कोण भाग घेणार? ह्यावर कार्यानुभवाच्या तासाला वहीच्या मागच्या पानावर पेन्सिलने लिहून हे निरोप हळुच एकमेकींकडे पास करुन गुप्त खलबतं करुन झाली. शेवटी जिचे आई बाबा घरी नसतात म्हणजे पर्यायी "काय चाल्लंय?" हे डोकवून बघणार जिच्या घरी कोणी नाही अशा मैत्रिणीकडे हा उपद्व्याप करुन बघायचं ठरलं. कॉलेजात जाणार्‍या ताई कृपेने जिला ह्या विषयातले ज्ञान पहिल्यांदा झाले ती आपोआपच आमची लिडर झाली. पण ती तितकीशी निडर नसल्याने तिने "हजर राहून कसं करायचं सांगेSन पण मी वाSटीवर बोSट ठेवणार नाही" अशी भुमिका घेतली.

एका शनिवारी शाळा सुटल्यावर आम्ही बॅगा घरी टाकून तिच्या कडे "नोटस काढायला" जमायचं ठरवलं आणि ठरवल्या प्रमाणे जमलो. आमच्या लिडरच्या सल्लाबरहुकूम पाटावर ए ते झेड अक्षरं वरच्या बाजुला, खाली ० ते ९ आकडे आणि मधे तीन गोल काढले. मधला गोल म्हणे न्युट्रल झोन. बाजुच्या दोन्ही गोलांमधे एकात "यस" आणि दुसर्‍यात "नो" असं लिहून आम्ही सज्ज झालो.

"आता करुयात सुरु?" असं जेव्हा तिने विचारलं तेव्हा पहिल्यांदा भिती, उत्सुकता असं काय काय दाटून आलेलं.

"ए थांब थांब. आधी आत्म्याची साईझ ठरवावी लागेल" एकीने शंका काढली.

"का?" आम्ही

"का काय का? कळायला नको ननैवेद्याची वाटी ठेवायची की नेहमीची आमटी भाजीची ते?" तिने आम्हाला "बुद्दू कहिके" ठरवत उत्तर दिलं आणि तिच्या हुशारीवर आम्हीही तिची पाठ थोपटली.

"हे बघ आत्मा कद्रु व्यक्तीचा असेल तर नैवेद्याची वाटी आणि एखाद्या दानशूर कर्णाचा असेल तर वाडगा ठेवावा लागेल" असा पीजे मारुन आम्ही त्या हुश्शार मैत्रिणीची हवा कमी केली.

"कोण तिघी बोट ठेवणार वाटीवर?" ह्या प्रश्नावर सगळ्यांची बोट मागे. मग मी आणि अजून दोघी तयार झालो एकदाच्या आणि गाडं पुढे सरकलं.

जिने माहिती दिली तिच्या विकिपेडीयावर विसंबून ती सांगेल त्या बरहुकूम "आवाहन केलं" ते करण्यापुर्वी बराच खल झाला कोणाला बोलवायचं ह्या गोष्टीवर.

"ए कोणा नातेवाईक आत्म्याला अजिबात नको हाऽऽ. गेला नाही इथून तर मला एकटीला तिकडे (करंगळी दाखवत) जाता नाही येणार रात्रीची" जिच्या घरात करत होतो ती सगळ्यात जास्त घाबरली होती.

"काही होत नाही ग. भूत बीत काही नसतं" मी म्हंटलं.

"ऑSS भूत नसतं? मग येणार कोSण प्लॅन्चेट वर?" तिने मलाच झापत विचारलं.

"आयला, हे पण बरोबर आहे. तेच तर चेक करायचय मला. हे खरं निघतं का?" मी तिला चिडवत म्हटलं खरं पण मनात जरा धाकधुक होतच होती.

मग शेवटी हा नको, ही नको असं करत करत "राजीव गांधी" ह्या नावावर एकमत होऊन त्याच्याच आत्म्याला बोलवायचं ठरलं. त्याचा अपमृत्यु झाला म्हणजे तो नक्कीच "भटकती आत्मा" असणार आणि त्याला जाऊन फार काळ लोटला नव्हता तेव्हा म्हणजे पुनर्जन्माच्या लाईन मधे त्याचा अर्ज पुढे सरकला नसणार. असं खासं लॉजिक लावून आम्ही त्या नावावर शिक्का मारला आणि तयारीला लागलो.

"आवाहन" आणि "प्रश्न" हे हिंदीत विचारायचे की मराठीत? ह्यावर पण बराच खल झाला. गाडी शेवटी आमच्या अत्यंत उच्चं हिंदी मुळे मराठीवरच आली. "आत्म्याला सगळ्याच भाषांचं ज्ञान असणार" असं जिने माहिती आणली त्या मैत्रिणीचं मौलिक मत होतं आणि आम्हाला काहीच माहिती नव्हती म्हणून ती म्हणेल ते खरं असं मानून चालण्यावाचून गत्यंतर नव्हतं.

आवाहन केलं. "आला असाल तर वाटी यस वर सरकवाल का?" हा प्रश्न विचारला आणि वातावरणात एकदम सन्नाटा छा गया. वाटी हळू हळू "यस" कडे सरकली. आमच्या तिघींचे ठोके समोरचीला पण ऐकू येतील इतपत मोठ्या मोठ्याने धकधकत होते. वाटीवर जे बोट ठेवलेलं त्याला चांगलाच घाम फुटला.

आपलं बोट ज्या वाटीवर आहे त्या वाटीखालील पोकळ भागात राजीव गांधींचा आत्मा येऊन बसलाय ह्या कल्पनेनेच घाम फुटला.

"प्रश्न विचार, प्रश्न विचार" जी मैत्रिण नुसतीच बघ्याच्या भुमिकेत होती तिने शांतता भंग करत पण तरिही दबक्या आवाजात म्हंटलं आणि पहिला प्रश्न आला "दहावीला किती टक्के मिळतील मला?"

हिने एखाद्या "पेपर तपासनीसाच्या आत्म्याला का नाही बोलावला?" असं त्या ही परिस्थीतीत वाटलं पण मी ते बोलून दाखवायची उर्मी मनातच दाबली. न जाणो वाटीखालच्या आत्म्याला राग यायचा मग.

तिला काय उत्तर मिळालं ते नाही आठवत. पण मग त्या नंतर प्रश्न विचारायला जरा धीटपणा आला. नेमके प्रश्न आठवत नाहित पण ते काहिसे त्या काळातल्या क्रशेस वर होते खरे.

नंतर मग आल्याबद्दल मंडळ आपलं आभारी आहे टाईपचं काहीतरी आभार प्रदर्शन करुन त्या आत्म्याला वाटीतून मुक्त केला.

"ए गेला असेल ना आत्मा परत? इथे माझ्या घरात नाही ना आता तो?" जिच्या घरात आम्ही हा उपद्व्याप केला तिची जाम म्हणजे जामच टरकीफाय झालेली.

"नाही गं, त्याला सवय महालाची तुझ्या वन रुम किचन मधे अडकून पडायला त्या आत्म्याला काय येड लागलय का?" आम्ही पुन्हा खास लॉजिक लावत तिची समजूत घातली.

"ए पण हे आपल्या पैकीच एकीने हलवलं नाही कशावरुन?" ह्या शंकेच्या निरसना करता पुन्हा एकदा आवाहन सांगता पार पाडली गेली.

अंदाज धपक्याने काही उत्तरं बरोबर आली काही नाही. कोणाचा त्यावर विश्वास बसत नव्हता पण जी आपल्या बाजूची उत्तर होती तिच्या करता त्यावर अविश्वास दाखवावा असंही वाटत नव्हतं.

आता पुन्हा त्यावर गप्पा मारताना, तो सगळा प्लॅन्चेट पट आठवताना फारसं काहीच वाटत नव्हतं. ना भिती, ना उत्सुकता, ना खरेखोटेपणा पडताळावा अशी इच्छा... काहीच नाही.

त्यावेळी ह्या प्लॅन्चेट खुळाच्या बरोबर जापनीज का चायनीज का कायशीशी प्रश्नावली पण फेमस होती. मनात प्रश्न धरुन काही टिंब काढायची का असंच काहीतरी होतं त्यात. नेमकं आठवत नाही पण मग आतल्या पानांवर अमुक कॉलम खाली तमुक रो मधलं उत्तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं काहीसं तिचं स्वरुप होतं. आणि हो दिवसाला एका प्रकारचा प्रश्न एकदाच विचारता येईल. तोच प्रश्न पुन्हा नाही विचारायचा. हा नियम पण भारी होता त्यातला.

नविन खेळण्याचा कंटाळा येईपर्यंत त्याच्याशी लहान मुलं खेळतं मग ते खेळणं माळ्यावर पडतं तितपतच त्यावर विश्वास बसला होता. आता आठवतही नाही फारसं काही पण अशा काही काही मजेशीर गोष्टींनी आठवणींचा एक कप्पा भरुन गेलाय हे त्याच्या प्रश्नामुळे जाणवलं इतकच, बाकी काहीच नाही.



आठवणींची रिळं - भाग ३ : प्रार्थना

मन खोल खोल डोह
त्याचा पडे मला मोह
जाते शोधाया मी थांग
मग आठवांच्या संग

ह्या डोहात डुबकी मारल्यावर जसे हलके फुलके, आनंदी थेंब हाती लागले तसेच काही वेगळे थेंबही ओंजळ भरुन गेले. आजचा हा प्रवास अशाच काही वेगळ्या क्षणांसोबत आईच्या शाळेपासून सुरु होणारा.

शांतीनगर झोपडपट्टीत आईची शाळा सुरु झाली आणि पहिल्या प्रथम समस्या उद्भवली ती जन्मदाखल्यांची. सगळ्याचीच बाळंतपणं घरी झालेली. कोणालाही नेमकी वेळ सोडा पण नेमका दिवस, तारिख वार ह्याचीही माहिती नाही. सगळ्यांची उत्तरं आपली "मोऽप पाऊस व्हता बगा" किंवा "लई थंडी व्हती", "आमोशा होती" अशा स्वरुपाची.

ह्या माहितीच्या आधारावर कोण ह्यांना जन्मदाखला देणार?

बरं जन्मदाखला नाही म्हणजे मग ह्यांना शिकवून म्युनसिपल स्कूल मधे भरती करण्याइतपत तयार जरी केले तरी तिथे अ‍ॅडमिशन कोण देणार?

बर्‍याच ठिकाणी चौकशी केल्यावर मग कळलं की वकिलाकडून रुपये २०० च्या स्टॅम्प पेपरवर अ‍ॅफिडेविट करुन घेतलं तर काम होण्यासारखं आहे. (चुकभुल द्यावी घ्यावी, मी ह्या विषयातली तज्ञ नाही आणि बरीच वर्ष मधे गेल्याने नोंदींच्या इमेज पण ब्लर झाल्यात. १९९१-९२ च्या आसपासची ही घटना आहे पण त्यावेळी तरी असं अ‍ॅफिडेविट करुन काम झाल्याचं पुसटसं स्मरतय)

पाऊलवाटेवर काटे असतात, वर चढणार्‍या किंवा चढू पहाणार्‍याला खाली खेचणारे खेकड्याच्या वृत्तीचे लोकही असतात. पण त्याच बरोबर मदतीचे हातही असतात. जरा शोध घ्यावा लागतो इतकच याचीही प्रचिती आली, जेव्हा असाच एक मदतीचा हात एका वकिलाच्या रुपाने मिळून त्या दाखल्यांचं काम मार्गी लागलं.

कामाचा हुरुप वाढला. हळू हळू सरकारच्या इतर काही योजनांचा लाभ तिथे देता यावा ह्या दृष्टिने प्रयत्न सुरु झाले.

मधे राजकीय उलथा पालथी झाल्या, काही वेदना देणाऱ्या घटना घडल्या. त्यातून बाहेर पडायला थोडा काळ जावा लागला. पण पुन्हा एकदा रोप लावलं गेलं.

सरकारकडून कमी दरात शिवण यंत्र मिळाली. त्यातून बायकांना ते तंत्र शिकवून स्वावलंबी बनवायचा प्रयत्न केला गेला. कुठे यश तर कुठे अपयश असं करत वाटचाल पुढे चालू राहिली.

सरकारी अधिकार्‍यांच्या "टेबला खालून" वृत्तीचा तिथल्या अपंग मुलांना "अपंगत्वाचा दाखला", "तीन चाकी सायकल" वगैरे मिळवून देताना इतका त्रास झाला की वाटलं ह्या भ्रष्टाचाराच्या चिखलात काहीही होऊ शकणार नाही.

आणि नेमकं असं हताश वाटताना त्या चिखलातच उगवलेल्या कमळांनी उभारी दिली.

सरकारच्या खिचडी योजनेसाठी मिळालेल्या तांदूळाच्या पोत्यांना शांतीनगरच्या शाळेत पाऊस लागून किड लागेल म्हणून घरी आणून ठेवल्यावर जेव्हा "बाईंनी तांदूळ पळवला." अशा स्वरुपाची तक्रार गेली तेव्हा ह्याच चिखलातल्या काही कमळांनी "बाई असं करुच शकत नाहीत. आम्ही प्रमाणपत्र द्यायला तयार आहोत" म्हणत बाजू राखली आणि काट्यां बरोबर ह्या फुलांचाही सहवास मिळण्याचं भाग्य लाभलं.

पुढे नेहमीप्रमाणे आईने तिच्या सवयीने, ती शाळा कोणा दुसर्‍या हातात सोपवली.

आजही तिथली परिस्थिती फारशी वेगळी आहे अशातला भाग नाही. आजही काही प्रमाणात "होल वावर इज अवर" ही मेंट्यालिटी दिसते. शाळेत आलेल्या आणि शिकलेल्या सगळ्याच मुलांमधे बदल घडलाय असंही नाही.

पण त्यांच्यातलीच एक "आशा" आज स्वतःच्या गुणवत्तेच्या जोरावर नर्सिंगचा कोर्स करुन स्वतःच्या पायावर उभी राहिलेय. तिची मुलं तर नक्कीच अजून एक पाऊल पुढे जातील.

अपंग अनिसला अपंगत्वाचा दाखला नोकरी मिळवून द्यायला किंवा बुथ उभारायला पुरेसा ठरला नसला तरी तीन चाकी सायकलने त्याचं परावलंबित्व तरी कमी केलय.

आजही राजकारण, दारु, इतर नशा ह्यांचा वावर तिथे जाणवतो पण ज्यांना ह्यातून बाहेर पडायचय त्यांना त्या पहिल्या पावलाने निश्चितच मदत झालेय.

आत्ता हे आठवायचं कारण म्हणजे हळू हळू करत आईने पसारा आवरायला घेतलाय. झेपत होतं तोपर्यंत जवळ्च्या म्युनिसिपल शाळेतल्या मुलींना जादाची शिकवणी सेवा विनामुल्य देवून झाली. आता मात्र आई थकलेय, मनाने नाही तरी शरीराने. पण मला काही हा हात पुर्णपणे माझ्या हातात घेणं शक्य नाही. परिस्थिती मुळे नव्हे, तर स्वभावामुळे. माझ्यात तिच्यासारखा "त्या" क्षेत्रात झोकून देणारा जीन आलेला नाही.

म्हणजे आत्ता आत्ता पर्यंत तर मला वाटत होतं की "लष्कराच्या भाकऱ्या" वाले जेनेटीक ट्रेट्स माझ्यात अजिबातच आलेले नाहीत.

माझं पोट भरलं, माझ्या घरच्यांचही भरलं मग उरलेल्या भाकरीचं करायचं काय? हा प्रश्न एक दिवस पडला. तो सोडवायला "देऊ की कोणा गरजूला" हा विचार हळुच डोकं काढून वर आला.

त्यातून मग डोनेशन देणं, कुणाच्या शाळेची फी भरणं, कुठे अंध अपंगांच्या ट्रेककरता स्वयंसेवक जमव, अनाथालयात जाऊन वाढदिवस साजरा कर इतपत प्रवास सुरु झाला.

पण त्यात आईसारखं झोकून देणं नव्हतं. माझा परीघ सुरक्षीत ठेवून मग केलेली ती मदत होती.

ती शेवटी मदत होती, तिच्यासारखं त्यात मिसळून जाणं नव्हतं.

त्याची टोचणी मनाला लागली, तरी प्रत्येकालाच ते जमेल असं नाही हे ही उमगत गेलं. प्रत्येकाचे मार्ग वेगळे हे समजून घेता घेता हे देखील कळलं की प्रत्येकाच्या कक्षाही वेगळ्या. ज्याच्या त्याच्या कक्षेत केला गेलेला "लष्कराच्या भाकऱ्या” थापायचा आनंद बाकी सेमच तो ही अर्थातच ज्याच्या त्याच्या पुरताच.

तिने व्यवहार महत्वाचा मानला नाही. पण आज मला जर व्यवहार देखील त्याच्या त्याच्या जागी योग्य वाटतो तर त्यात ना ती चूक ठरत ना मी. स्वत:शी प्रामाणिक राहून बॅलन्स साधायला जमलं किंवा तसं वाटलं जरी तरी झालं अजून काय हवंय.

माणुस मुळातच स्वार्थी प्राणी. तिने जे केलं ते "तिचं समाधान" ह्या स्वार्था साठी आणि मी जे करतेय किंवा करु पहातेय ते ही माझ्या स्वार्थासाठी "माझ्या आतल्या त्या जीनच्या टोचणी" साठी.

मागे वळून पहाताना आज ती समाधानी आहे. तिला तिचा मार्ग मिळाला आणि समाधानही, तसाच माझा मार्ग मला मिळो हीच बाप्पाकडे प्रार्थना .....

एक विनवणी करिते मी देवा
सोहळा जन्माचा सार्थ होवो



हेच मागणे त्याच्याकडे. बाकी काहीच नाही


रविवार, २८ ऑगस्ट, २०११

प्रवास

"रोज केर काऽढूनच मग पोतेरं घ्यायचं. बाकिच्यांकडे चालतं तसलं एक दिवस केर आणि एक दिवस पोतेरं असला प्रकार माझ्याकडे नकोऽ. उशीऽर चालणाऽऽर नाही. आणि सारख्या दांड्या पण मारायच्या नाहीत. एखादवेळी लागलीच रजा घ्यायला तर आधी सांगून घेतली तर चालेल, अचानक घ्यावी लागली तर फोन नंबर दिलाय तुला, त्यावर एक फोन करुन तरी सांगायला हवं" मी आधीच्या सगळ्या कार्यानुभवातून शिकलेलं ग्यान पणाला लावत तिला ऐकवलं.

सगळ्या कामवाल्या बाया काम मिळेपर्यंत ज्या खालमानेने सगळ्या सुचनांना होकाराची मान हलवतात तसच तिनेही केलं.

"नाव काय म्हणालीस तुझं?"

"प्रगती" तिने माझ्याकडे न बघताच उत्तर दिलं.

"अरे बापरे! प्रगती?" मी मनातल्या मनात वैतागून म्हंटलं. माझं नाव लग्नात बदलू दिलं नाही आणि आता कामवालीचं नाव मालकिणीच्या नावाशी साधर्म्य साधतं ह्या कारणाकरता बदलायची प्रथा नाही.

पण करणार काय? गरज.. "तिला कामाची" आणि "मला कामवालीची" ह्या एका गोष्टीने आम्ही एकमेकींशी जोडून घ्यायचं ठरवलं आणि ती आमच्या घरात प्रवेशकर्ती झाली.

"प्रगतीऽऽ, अगं वाजले किती? आटप लवकर. दप्तर कुठेय मनुचं?" ह्याच्या प्रश्नावर आम्ही दोघींनीही एकाचवेळी चमकून बघितलं.

सुरवातीचा हा महिना "कोण, कोणासाठी, काय म्हणाले" ह्यावर गोंधळ उडण्यात खर्ची पडण्याची सुरवात झाली होती. त्यातून ह्याने "प्रगती" अशी मला जरी हाक मारली तरी ती बिचारी लाजून गोरी मोरी व्हायची. मग आम्ही एक पॅक्ट केला. ह्याने निदान ती काम करत असताना मला "आई" म्हणायचं आणि तिला "ओऽ बाई" म्हणून हाक मारायची.

पहिला महिना बरा गेला. म्हणजे तिने सबंध महिन्यात एकही खाडा केला नाही की उशीर केला नाही. बाई कामालाही तशी बरी होती. कोणी एकलं तर नजर लागायची नेमकी पण होती खरी चटचटीत. आमच्या घरापासून १० मिनिटावर असलेल्या झोपडपट्टीत रहायची. रोज अंघोळ करुन स्वच्छ साडी नेसून यायची. त्यामुळे बरं वाटायचं. नाहीतर आधीची बाई. माझ्या घरातले कपडे धुवायचे साबण दिले तिला तरिही एक विशिष्ठ दर्प यायचा तिच्या कपड्यांना. आणि त्या वासाने सगळच ढवळून निघायचं... आतपासून.

तो वाऽऽस.. पुन्हा एकदा "टाईम मशीन" ने मागे नेत नेत मला ह्या सार्‍या प्रवासातल्या काही अप्रिय घटनांची नेमकी आठवण करुन द्यायचा. माझ्यापाशी सोयीने नोंदी आठवायचं टुल असायला हवं होतं असं मला नेहमीच वाटयचं.

आधीची बाई गेली आणि तिच्या बरोबर तो चिरपरिचीत वासही गेला. त्याबरोबर त्या आठवणीही पुसट झाल्या. आता ही प्रगती बाई बरी आहे.

घड्याळात बघितलं तर तिची यायची वेळ उलटून तब्बल २० मिनिटं झाली होती.

"काल पगार घेऊन गेलेय.. आज आता येते की नाही ही बया? संपले की काय नव्याचे नऊ दिवस हिचे?" असे अशुभं विचार मनात येतच होते तोच ती गेट उघडून आत येताना दिसली.

"पोरीच्या शालत गेल्ते म्हनुन उशीर झाला" तिने आल्या आल्या स्पष्टीकरण देऊन टाकलं.

"बरं" असं नुसतं मानेनेच दर्शवून मी तिला आधी देवघराचा केर काढून घ्यायला सांगितलं.

ती व्हय म्हणून पण तिथेच घुटमळली तसं तिला मुद्दामच कपाळाल्या पुरेशा आठ्या घालून विचारलं "काय?"

"ताई, जुनी छत्री असल तर द्याल का मला. पोरांच्या शालच्या फिया, बुकं नी रेनकोट घेन्यातच पैशे संपले बगा. राशन पण भरलं कालच" तिने मान खाली घालूनच माझ्या "काय" ला उत्तर दिलं.

"बघते" असं मोघम उत्तर देऊन मी संभाषण तोडलं.

खरतर मी देऊ शकते माझी जुनी छत्री तिला. मी काढून पण ठेवलेय आधीच एक छत्री तिला द्यायची म्हणून, तिने सांगायच्याही आधीच. पण काय होतं माहित्ये का, एकाच वेळी ह्यांच्या अशा परिस्थितीची दया येते आणि बोट दिलं तर हात तर घेणार नाहीत ना आपला अशी शंकाही मनात उठते.

झोकून देऊन तळागाळातल्याशी समरस होऊन समाजसेवा वगैरे पुस्तकात वाचताना, थोरा मोठ्यांची उदाहरणं ऐकताना भारावून जायला होतं पण प्रत्यक्ष आचरणात आणणं जमत नाही. दरी रहातेच किंवा राखली जाते आणि अंतर राखून होईल तेव्हढी मदत केली जाते.

"ही घे छत्री. ह्यावेळी नेमकी आहे म्हणून देतेय हं मी" मी मुद्दाम सावधपणा अंगात बाणवत तिला म्हंटलं.

"आणि ही थोडी जिलबी बांधून ठेवलेय ती पण घेऊन जा मुलांसाठी. आज रक्षाबंधन म्हणून आणलेय घरी. तू पण इथेच घे एखादी खाऊन. घरी काहीच उरणार नाही तुला" मी तिला म्हंटलं, तसं तिच्या डोळयात पाणी तरळलं.

"काय झालं ग?" म्हंटलं हिला आवडलं नाही की काय असं जिलबी घेऊन जा सांगितलं ते असं वाटून घाबरतच विचारलं.

"ताई, माझा उपास हाय आज."

"माजा भाव मी लहान अस्ताना गेला ह्याच दिशी. म्हनून मी गोडाचं कायबी खात नाय आजच्याला. मला तर त्यो आटवत पन नाय पन आय साटी करते मी उपास"

"अरे बापरे! गेला म्हणजे? काय झालं होतं त्याला?"

"मारला त्याला. आमच्या झोपडपट्टीत भांडाण झालं त्यात मारामारी होऊन ग्येला त्यो."

"मऽग! ज्यांनी मारलं त्यांना शिक्षा नाही झाली?" माझं मध्यमवर्गिय कायदेकानुन पाळणारं मन लग्गेच म्हणालं.

"नाही ताई, बाप नव्हता आधीच. आई शाळेच्या बाईंना मदत करायची. लोकांच्या घरची कापडं धुवायची आन भांडी घासायची. मी लहान व्हती. मोठी जाल्यावर आयला इचारलं तर म्हनली जायचा त्यो ग्येला. आपून काही केलं असतं तर त्या लोकान्नी तुलाबी ठेवलं नसतं नी मलाबी. त्यापरीस शांतीने जिंदगी घालवू इथ."

"अग पण असं कसं? तो खून होता ना!" खून शब्द उच्चारतानाही मला घाम फुटलेला.

"कसला खून नी कसलं काय ताई. आय म्हनायची त्यो आधी दारु पियाचा बापा सारखाच. बाईंनी बोलून त्याची दारु कमी केली. त्याला कामाला लावला. पण डोस्क फिरलं शालेवरनं आनि पुन्ना पिऊन आला. मंग मारामारी झाली नी त्यात ग्येला त्यो. त्यो गेला तवा मी पाच सा वर्साची असन"

"दारू प्यायचा? अगं पण लहानच असेल ना तेव्हा तो वयाने?"

"आमच्या इथं १२ वर्षाचं पोरगं पन पितय, ताई."

"बाऽपरे! बरं कुठे रहायचात तुम्ही प्रगती?"

"लायनी पल्याडला."

"लायनी पलिकडे कुठे?" मी श्वास रोखून विचारलं. पुन्हा एकदा तो वास मेंदूला त्रास द्यायला लागला होता. "ही तिच तर नसेल?" हा विचार झटकून वर्तमान काळात परत यायला खुप प्रयास करावा लागला.

"काय नीट आठवत नाय आता. आमी दोगीबी ती जागा सोडून मामाकडे जाऊन ऱ्हायलो मंग. भावाच्या जल्मा नंतर झालेली समदी पोरं जगत नवती. मीच तेवढी जगले. त्यात त्यो पन ग्येला असा, मंग आमी दोगीच ऱ्हायलो. माज्या आयला मला शिकवायची हुती पन मामा झाला तरी परक्याचच घर ना! मंग काय ती मला शालत घालनार. पन मी आता माझ्या मुलांना शिकीवनार. माज्या सारकं माज्या लेकीचं लगीन लवकर नाय करनार" ती बोलतच होती.

"ताई, उद्याच्याला मी काम करुन जाईन. पन परवाच्याला मला एक दिस सुट्टी मिलाली तर....."

"माज्या घराशेजारचीच झोपडी घेतली धा हज्जारला आनी आता आयला मामाकडनं घेऊन ईन इथे र्‍हायला. म्हन्जे तिची कालजी नाय लागून र्‍हानार मला"

"तुझ्या नवर्‍याला चालेल का तू असं तुझ्या आईसाठी खर्च केलेलं?" माझ्या मनात उगाचच एक शंका चुटपुटली.

"न्हाय, आदी नवता तयार. पन त्येला आय बा कोनच नाय. मंग आय र्‍हायली शेजारलाच की मंग पोरांची बी कालजी नाय ना मला. तिच्या माग ती झोपडी माजीच तर हाय. ह्ये सांगितलं तवा जाला तय्यार"

मला तिच्या रडत न बसता मार्ग काढणार्‍या ‍आवृत्तीच खरच कौतूक वाटलं.

"परवा म्हणजे १५ तारखेला ना? मग ठिक आहे. पण १६ ला कामावर पाहिजेस ह मला तू" मी उदार मनाने तिला एक दिवसाची सुट्टी देऊन टाकली.

"ताई, तुमी किती मायेने इचारता. बाकी कोन बी असं बोलत नाय बगा" ती म्हणाली खरी पण माझी आतली "अंतर राखणारी नजर" मलाच हसल्यासारखी भासली.

"प्रगती, ह्या बायकांचं लाईफ वेगळं आपलं वेगळं. जास्त खोलात शिरायचं नाही आणि जास्त जवळिक दाखवायची नाही." आतल्या मध्यममार्गी विचाराने थोड्याश्या खळबळ माजलेल्या मनाला झापत म्हंटलं आणि मी पुन्हा एकदा त्या वासाला आणि त्यामुळे दरवेळी वर येणार्‍या कटू आठवणींना हद्दपार करत कामाला लागले.

तिच्या आईची भेट घेऊयात एकदा कधीतरी हे मनात आलं खरं पण हे सगळं आईला सांगावं का नाही ह्या विषयी मात्र पटकन निर्णय होईना. शेखरच्या हाक मारण्याने विचारांची साखळी तुटून मी पुन्हा वर्तमान काळात आले.

"शेखर तुला लक्षात आहे ना मी आपली जेवणं झाली की आईकडे जाऊन येणार आहे ते? पिल्लूला घेऊन जाणारे आणि रात्री परस्पर जेवून येणार मग मी. तुझं जेवण केलेलं आहे ते घे गरम करुन" मी जाण्याची तयारी करत करतच त्याला आठवण करुन दिली.

अंगावर येणारं नारळीभाताचं जेवण जेवून आईकडून पुन्हा निघायची वेळ झाली तेव्हा पिल्लू पार पेंगुळलेलं.

"प्रगती, आता विनयची बॅंगलोरची नोकरी पक्की झाली तो येत्या आठवड्याभरात जाईल तिथे. मग पुन्हा घरात मी आणि तुझे बाबा दोघेच असू. झेपतय तो पर्यंत तरी तुम्हा दोघांपैकी कोणाकडेही येऊन रहणार नाही आहोत आम्ही. लागलं सवरलं तर तुम्ही आहातच पण झेपतय तोपर्यंत राहू आम्ही ह्याच मठीत."

"अग! पण..."

माझं वाक्य अर्ध्यावर तोडत ती म्हणाली "प्रगतीऽऽ ऐकून तर घे आधी. तू रहातेस पलिकडे. हा जाणार बॅन्गलोरला. माझ्याकडे आता रिकामा वेळ भरपूर आहे. त्या साठे बाई भेटलेल्या परवा. त्याच म्हणाल्या "आता मोकळ्या आहात तर करा की परत सुरु शाळा"

"पुन्हाऽऽ शाळा?" मला पुन्हा एकदा त्या वासाने गुदमरायला लागलं.

पुन्हा एकदा टाईम मशीन टिकटिकायला लागलं... तेव्हा मी असेन ७ वी ८ वीत. आईची घरातली शाळा बंद होऊन बराच काळ लोटलेला. आम्ही दोघेही आता तसे आपलं आपलं करण्या इतपत मोठे झालेलो, म्हणून मग आईने काही समविचारी बायकांना बरोबर घेऊन घराजवळच्या झोपडपट्टीत शाळा सुरु करायचं ठरवलं.

"प्रामाणिक पणे काम केलं की सगळं मार्गी लागतं ग" आई भाबड्या विश्वासाने आणि कामावरच्या श्रद्धेवर विसंबून म्हणाली.

आणि त्याच भाबड्या विश्वासावर विसंबून संस्था रजिस्टर करणं, तिथल्या लोकांना समजावून एका एका गोष्टीला तयार करणं सगळं एका लयीत चालू झालं.

"आईऽ हे काऽय आज पण नुसतीच शिकरण पोळी?"

"आजच्या दिवस..., काल संस्थेच्या रजिस्ट्रेशन संबंधी ठाण्याला चकरा मारुन पाय नुसते तुटले माझे. एकदा हे काम मार्गी लागलं ना की मग मी मोकळी होईन बघ. मग फक्त शाळा आणि घर. बाकीचं काऽऽही बघावं नाही लागणार जास्त"

"तुझ्या संस्थेत तू एकटीच आहेस का? तुच का दरवेळी पुलंचा नारायण व्हायचस? मग खजिनदार, सेक्रेटरी मंडळी काय करणार?" मी माझा राग व्यक्त करत विचारलं.

"होत्या की ग सप्रे बाई काल माझ्यासोबत" तिने गुळमुळीत उत्तर दिले.

"होत्या पण तुझ्या ४ खेपा एकटीने झाल्यावर एक खेप घालतात त्या तुझ्यासोबत." पुन्हा एकदा माझी धुसफुस अशी बाहेर पडली.

"तुला पिठलं देऊ का टाकून पटकन?" आईला वाटलं ह्या नादात आमच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं म्हणून फक्त मला राग येतोय.

"काही नक्को, मी लावलाय कुकर." मी कुरकुरतच तिला म्हंटलं.

आईची शाळा काय अशी लगेच सुरु होण्यातली नव्हतीच, पण नेमका एका राजकीय पक्षाने मतांसाठी का होईना पुढाकार घ्यायचं ठरवलं आणि एका शुभमुहुर्तावर एका रिकाम्या झोपडीत आईची शाळा सुरु झाली.

सुरुवातीला आई घरी आली की एक विशिष्ठ वास यायचा तिच्या कपड्यांना. मग आम्ही तिला "ए तुझ्या शाळेच्या साड्या डेटॉल मधे धू ग बाई" असं म्हणायचो.

"शाळेत जाऊन आलीस की मगच कपड्यांना हा वास येतो. ईऽऽ ग बाई कशी जातेस तिथे तू?" आम्ही अगदीच दुसऱ्या दुनिये विषयी बोलावं तसं बोलायचो.

तिथल्या मुलांचे शेंबडाने भरलेले नाक पुसण्या पासून ते मुलींच्या डोक्यातील उवा काढून तेल लावून वेणी घालून देण्यापर्यंत त्यांना नागरी बनवण्याचे हरएक प्रयत्न तिने केले.

"आई, चल जेवून घेवुयात आता. पुरे ना तुझं ते काम"

"येव्हढी यादी करते पुर्ण मग बसते. तू घे जेवून"

"अनौपचारिक शिक्षण योजना आहे ना सरकारची त्याकरता ह्या याद्या द्याव्या लागतील तिथे"

"कशाला? गेल्यावेळसारखच काम झालं... मानधन सुरु झालं की तू कोणा तरी गरजूला तिकडे लावणार आणि पुन्हा दुसऱ्या कामाला जुंपून घेणार. आपण पण काय टाटा बिर्ला आहोत काय? पैसे नको घेउस एकवेळ पण केल्या मेहनतीचं क्रेडीट तर घे"

"कोणी तरी नाही गं ती शेवंता बाई आहे. तिथेच रहाणारी. दहावी नंतर लगेचच लग्न करुन दिलं आणि शिक्षण थांबलं तिचं. तरी तिथे तिच एक शिकलेली आहे. माझ्या सांगण्यावरुन तिने मॉंटेसरीचा कोर्स पण पुर्ण केलाय. मग नको का तिला संधी द्यायला?"

"आणि हे अनौपचारीक योजनेचं काम करतेय की मी. ती लहान मुलांचे वर्ग घेते मी मोठ्या वयाच्या मुलांना शिकवून म्युनसिपल स्कूल मधे जाण्या इतपत तयार करेन. जमलं तर पुढे मागे प्रौढ शिक्षण आणि महिलांसाठी शिवणकाम पण सुरु करायचय" तिने एकामागोमाग एक कामांची जंत्री सांगायला सुरुवात केली आणि मी तिला कोपरापासून हात जोडत ताटं घ्यायला सुरवात केली.

"आजची तुमची मिटिंग त्या सप्रे बाईंच्याच घरी घे ना. माझी परिक्षा सुरु होतेय उद्या पासून."

"अगं ह्या मिटींगला "तिथली" पण दोन चार माणसं येतात. सप्रे बाईंच्या घरी नाही चालत बाई..." तिने तिचा नाईलाज माझ्यापुढे मांडला

"अगं पण आपली एकच खोली आहे. मी अभ्यास कुठे करु मग?" मी देखील माझी कुरकुर पुरेशी व्यक्त केली.

"बरं मिटींग शाळेतच ठेवते, तू कर अभ्यास" तिने तिच्या परिने तोडगा काढला.

एकीकडे आई करत असलेल्या कामा विषयी अभिमान आणि आदर तर दुसरी कडे आम्हाला कराव्या लागणाऱ्या तडजोडींमुळे आणि नासमज वयामुळे झालेली धुसफुस. इतरांनी नुसतच क्रेडीट घ्यायला येणं आणि हिने नुसत्याच लष्कराच्या भाकर्‍या भाजत रहाणं हे सगळं जसच्या तसं आठवलं आज पुन्हा.

हे आठवलं तसच मी पहिल्यांदा तिच्या बरोबर तिच्या शाळेत गेले तो दिवसही डोळ्यासमोर स्पष्ट उभा राहिला.

"मला तुझी शाळा बघायचेय". मी तिला म्हंटलं आणि ती प्रचंड खुष झाली

पण तिथे त्या तिच्या शाळेच्या परिसरात पाय ठेवला आणि पहिल्या प्रथम तो वास भस्सकन नाकात घुसला आणि तेव्हापासून तो वास आणि ती जागा ह्यांचा एक घट्ट संबंध डोक्यात पक्का झाला.

"हि बघ ही पण एक प्रगती" आईने एका तान्ह्या बाळाला माझ्यापुढे धरत म्हंटलं.

"तिने तुझ्यासारखं शाळेत जावं मोठ्ठं व्हावं म्हणत ह्या काळुबाईने हिचं नाव पण प्रगती ठेवलं." माझी आई कौतूकाने म्हणाली आणि तिच्या आईने भक्ताने देवाकडे बघावं तसं बघत मान डोलावली.

तिची आई माझ्या आईची मदतनीस. स्वत: अंगुठे बहाद्दर आणि दारुड्या नवऱ्याचा त्रास सहन करणारी सोशीक सिंधू. पण मुलांनी शिकून मोठं व्हावं असं मनापासून वाटणारी तुमच्या आमच्या सारखीच एक आई. नवर्‍याच्या बरोबर १२ वर्षाच्या मुलालाही दारुची सवय लागली म्हणून कळवळणारी आई. ह्या उप्पर माझ्या मेंदूत तिची अशी वेगळी ओळख असण्याचं काही कारणच नव्हतं.

बाईंची मुलगी म्हणून लोकं माझ्याकडे वेगळ्या आदराने बघत होते. त्यानंतरही एक दोन वेळा तिच्या शाळेत जायचा योग आला. दरवेळी तो वास मात्र नकळत नोंदवला जायचा मेंदूकडून.

"राजकारणाशी आपलं काही देणं नाही नी घेणं नाही. आपण आपलं काम करावं" असं आई म्हणायची नेहमी.

"माझी मुलं आता बरीच सुधारल्येत. शिकून बाहेर पडतील बघ ती ह्यातनं एकदिवस." ती त्या मुलां विषयी बोलताना नेहमी म्हणायची.

आपण राजकारणात पडायचं नाही हे ठिकच आहे पण राजकारणात कोणी कोणाचा नसतो हे त्या बदलाची झळ लागेपर्यंत तिला कळलच नाही.

जागा वाटपाच्या मुद्यावरुन ताणाताणी झाली आणि एका रात्री दुसऱ्या एका पार्टीने तिथल्या नेत्याला तिकिट देऊन आपलसं केलं. तिथल्या तिथे दोन गट पडले. दोन वेगवेगळ्या रंगांच्या झेंड्यांनी हद्द आखली गेली. "पार्टी" देऊन माणसं राखली गेली तसच "पार्टी" देऊन ती फोडलीही गेली.

ह्यासगळ्यात "शाळा" हा मुद्दा गौण ठरला आणि शाळा कोणाची हाच मुद्दा ऐरणीवर आला. आधीच "पार्टी" मुळे तर्र झालेल्या मंडळींची बाचाबाची झाली आणि "मी बगतो कोन नाय शाला उघडू देत त्ये" असं म्हणून शाळेचं कुलुप काढायला निघालेल्या काळुबाई गुंजाळच्या गणेशचा हकनाक बळी गेला.

काळूबाई लहानग्या प्रगतीला घेऊन उर फुटेस्तोवर रडली.

पण "नग बाई पोलीस कंप्लेट. ग्येला त्यो ग्येला. आहोत त्येस्नी जगाया पायजेल" असं म्हणून तिचा मार्ग निवडून मोकळी झाली.

आईला मात्र "शाळा ती चालवायची म्हणजे कळत नकळत तिच्या मुळे झालं हे सगळं" असा सल टोचत राहिला तसा काहीएक संबंध नसताना.

ज्याने मारलं तो ही आईच्याच हाताखाली शिकलेला आणि जो गेला तो ही तिचाच एक विद्यार्थी. हा धक्का तिच्यासाठी फार मोठा होता.

त्यानंतर किती तरी दिवस... महिने... वर्ष गेली आईलाही ह्यातून बाहेर पडायला. शाळा तर बंदच झाली कधीचीच पण त्या शाळेची आठवण देखील तिच्यासाठी त्या दिवसाची आठवण घेऊन यायची. आमच्या साठीही तो सगळा काळ फारच कठीण गेला.

तिचं आमच्याकडे थोडं फार दुर्लक्ष झालं तिच्या कामामुळे तरी चालेल, तिने पायाला भिंगरी लावून लष्काराच्या भाकऱ्या भाजल्या ते ही अजिबात क्रेडिट न घेता तरिही चालेल एकवेळ. अगदी पुलंचा नारायण व्हायचं ठरवलं तरिही चालेल पण अशी आत्मविश्वास हरवलेली स्वत:लाच मनातल्या मनात कोसत रहाणारी आई पहाणं... ह्यासारखं दुर्दैवं नाही. १५-१६ च्या वयात आईची आई व्हाव लागणं म्हणजे काय हे जो त्यातून जातो तोच समजू शकतो.

म्हणूनच दरवेळी ती शाळा म्हंटली की ती आठवण आणि तो वास म्हंटलं की ती शाळा हे समिकरण डोक्यात इतकं घट्ट रुजलं की मग कुठुनही तो वास आला की डोक्यात "आईच्या शाळा कालखंडातल्या" नको त्या आठवणी पिंगा घालायला लागायच्या.....

आणि आता आई म्हणतेय "साठे बाई भेटल्या आणि पुन्हा शाळा सुरु कर म्हणाल्या..."

"पुन्हा शाळाऽऽ...?" मी माझ्याही नकळत अस्वस्थ होत तिला विचारलं.

"नाही ग, आता काय वय आहे का इथून तिथून धावपळ करायचं? शाळा नाही पण मी शिकवण्या घ्यायचं ठरवलय. म्हणजे झेपतील तितक्याच घेणार आहे मी. पण फि नाही घेणार, जे गरिब आहेत ज्यांना बाहेरचे क्लास परवडत नाहीत अशांच्या मुलांच्या शिकवण्या घेईन म्हणते."

"साठे बाई म्हणत होत्या, की "...." पक्षाची जागा देते तुम्हाला शिकवण्यांसाठी हव तर आपल्या इथल्या नगरसेवकाला सांगून"

"मग तू काय म्हणालीस?" मी पुन्हा अस्वस्थ..

मी म्हंटलं त्यांना "नको ते राजकारण, आणि नको तो पक्ष बिक्ष. माझ्याच घरात जमेल तेव्हढं करेन मी"

"खरय..पक्ष आला की राजकारण आलं आणि राजकारण आलं की राजकारणी मंडळी पण आली. त्यांची असेल कातडी गेंड्याची पण आपल्याला..." माझा श्वास त्या घटनेच्या आठवणीने असा काही अडकला की मला पुढे बोलवेचना.

"खरय तुझं.." तिने माझ्या हातावर थोपटत म्हंटलं.

"आई, तुला काळूबाई गुंजाळ आठवतेय का ग?"

"कशी नाही आठवणार? बिचारी तिच्या बाबतीत फारच वाईट झालं पण. आज का आठवली तुला ती अचानक?"

"नाही गं.. काही नाही असच, कुठे असते ग आता ती? काही कल्पना?" मी माझ्या नव्या कामवाली बद्दल जे वाटतय ते बोलावं का बोलू नये ह्या संभ्रमात तिला विचारलं.

"तिच्या मुलाचं तसं झालं आणि ती मुलीला घेऊन तिच्या भावाकडे निघून गेली. नंतर माझही मन उडालं त्या शाळेतून. काहीच ठिक वाटेना. दोन्ही माझीच मुलं गं. माझ्याच हाताखाली शिकलेली. अशी कशी...." आईला पण कढ आवरेना.

खपलीच्या आतली जखम अजुनही थोडी ओलीच आहे तर. फार मेहनतीने प्रयत्न पुर्वक तिला बाहेर काढलय आम्ही सगळ्यांनी ह्यातून आणि आता नुसत्या आठवणींनीही तिला त्रास होणार असेल तर आत्तातरी "प्रगती" विषय नको नंतर कधी तरी बघू असं मी माझ्याच मनाशी ठरवून टाकलं.

"म्हणून मी नको म्हणते गं आता पुन्हा तो पसारा.." मी आईच्या हातावर हात ठेवत तिला म्हंटलं.

"आता काय पसारा घालतेय मी नव्याने? आता आवरायचे दिवस सुरु झालेत. हे आपलं जमेल तेव्हढं घरात बसून होण्यासारखं वाटलं म्हणून करुन बघावं म्हंटलं"

"असं का बोलतेस अगदी? तुझी काळजी वाटते म्हणून बोलते ना मी? कर बाई कर काय करायचं ते पण जरा स्वत:ला सांभाळून कर म्हणजे झालं" मी तिच्यापुढे हात टेकत म्हंटलं.

मधली पाच दहा मिनिटं नुसतीच चुळबुळ करण्यात गेली.

"चल जरा बागेत" शांततेचा भंग करत मला पुन्हा एकदा मुड मधे आणत विषय बदलायचा म्हणून तिने मला बागेत नेलं.

"बरीच नविन रोपं लावलेली दिसतायत ह्यावेळी." मी पण ठरवून विषय बदलत म्हंटलं

"अरेच्चा! इथला मनी प्लॅंट काय झाला गं?" मीच आणुन लावलेला म्हणून मला बरोबर आठवत होता तो.

"आणि हे जाईचं रोप ना गं, गेल्या पावसात लावलेलं. इतके दिवस मला वाटलेलं गेलच ते. मस्त पालवी आलेय ग त्याला पुन्हा."

"मनी प्लॅन्ट ना काढून टाकला मी, वाढतच नव्हता."

"कुठेही वाढतो ना पण तो?"

"हो गं पण नाही वाढला खरा. मग काढून टाकला. ही बघ त्याच जागी ही तुळस लावलेय. तुझं जाईचं रोप जातं जातं वाटलं तरी तगलं. आता पालवी फुटलेय त्याला. पुढच्या वेळी येशील तेव्हा गजरा पण घालशील.."

"काय केलस? खत बीत घातलस काय त्याला वेगळं?"

"मी काय करणार अजून वेगळ? बाकीच्या झाडांना घालते तसच ह्यालाही पाणी.. खत घातलं. ते नाही जगलं हे जगलं.... " तिने माझ्यासाठी बाजूला काढून ठेवलेलं कृष्ण तुळशीच रोप माझ्या हातात देत म्हंटलं

"तू देत्येस खरी ही तुळस. पण जगेल का माझ्याकडे? गेल्यावेळची जळून गेली नुसती.."

"ही घेऊन जा. मग बघू. नाही तगली तर परत लावू" ती म्हणाली

"ह्म्म! खरय..." रोप लावायचं सोडायचं नाही... एका क्षणात हा विचार चमकून गेला आणि इतका काळ अडकलेला श्वास अचानक मोकळा झाल्यासारखा वाटला.

























































बुधवार, ६ जुलै, २०११

अडाण्याचा गाडा (आधार कडून साभार)

आमच्या तात्याने (तात्या म्हणजे आमच्या ऑफिसचा हेड माणूस) "सोशल रिस्पॉन्सिबिलिटी" ह्या नावाच्या विषयावर आम्हाला आमचा चहा थंडं होऊन त्याचं कोल्ड ड्रिंक मधे रुपांतर होईपर्यंत (ह्यात अजिब्बात अतिषयोक्ती अलंकार वापरलेला नसून ते एक दुर्दैवी सत्यवचन आहे) व्याख्यान दिल्याने आमच्या समोर पाण्यात उडी मारण्यावाचून गत्यंतरच नव्हतं. तसं केलं नसतं तर विकांता नंतरचा सोमवार पुन्हा एकदा अमृत तुल्य चहा नावाचं शीतपेयं पिण्यात घालवावा लागला असता शिवाय आमचा पुन्हा एकदा तास दोन तास खडा पारशी झाला असता ते वेगळच.

गेल्या वेळी त्याने "मतदान केलच पाहिजे" ह्या विषयावर बौद्धिक घेतलं होतं पण एकाच वेळी साईट विझिट ती ही परगावची आणि आमच्या गावातलं मतदान कसं करायचं हे मात्र सांगायचं शिताफीने टाळलं होतं. नाही मतदान हे केलच पाहिजे हे आम्हालाही मान्य आहेच आणि ते आम्ही करतोच करतो पण त्यात्याचं व्याख्यान इतकं कशाने तरी भारलेलं असतं ना की आम्हाला नेहमी वाटतं वोटर्स कार्डची योजना राबवणार्‍या आणि आमच्या सारख्या सामान्य माणसांचे कार्ड चुकीचे छापणार्‍यांना एकदिवस तरी तात्याचं व्याख्यान ऐकायला लावलं पाहिजे.

ह्यावेळी त्याला व्याख्यान द्यायला "आधार कार्ड" चा आधार मिळाला होता. त्यापायी आमच्या शुक्रवारचा त्याने बट्ट्याबोळ केला होता. त्याच्या समोर "नो आर्ग्युमेंटस" त्यामुळे आम्ही "होयबा होयबा" चा गजर करत होतो आणि तो "टाईम्स ऑफ इंडीया" मधली जाहिरात दाखवून आम्हाला "सी हाऊ इझी थिस ऑल प्रोसिजर इज. डाऊनलोड द फॉर्म, टेक प्रिंट आऊट्स एन्ड गेSट इSट डSन - धीSस विकेंड. आय विल आस्क अबाउट धिस इन अवर मन्डे मिटिंग. टेक प्रिंट आऊटस फॉर मी अल्सो" असं एकेका शब्दावर जोर देऊन बोलत होता

"तुम्ही हे आत्ता पर्यंत केलेलं असेल अस मी समजत होतो. विकेंडस फक्त मजा मस्ती करण्यासाठी नाही देत कंपनी तुम्हाला. ही असली सामाजिक जबाबदारीची कामं पण करायची असतात वेळ काढून" वगैरे वगैरे चाऊन चोथा झालेलं वाक्य ऐकवून "नाऊ गो टू योर टेबल" म्हणत दम भरत आम्हाला गारढोण चहा प्यायला आमच्या डेस्कांवर पिटाळण्यात आलं.

वास्तविक गेले दोन्ही तिन्ही विकांतं तो त्याची कौटुंबिक जबाबदारी पार पाडत कुठेशी दूर देशी कडमडलेला आणि जाताना डेडलाईनची धमकी आम्हाला देऊन आमच्या प्रत्येक विकांतावर घाला घालून आम्हाला मात्र घाण्याला जुंपून गेलेला. जळ्ळा ही जाहिरात त्याच्याच कृपेने हाफिसात येणार्‍या पेपरात गेल्या आठवड्यातच वाचलेली आम्ही. ते फॉर्म पण डाऊनलोड करुन प्रिंट काढून रेडी होते. पण सायबाला कधी आपण त्याच्या आधी केलेली हुषारी दाखवून दुखवू नये हे तत्व वेळीच जाणल्याने आम्ही आपले "होयबा तुचबा खराबा" असं म्हणत बुगुबुगु करत पुढचा अर्धा तास गेल्या विकांतालाच डाऊनलोड केलेला फॉर्म तुमच्या सांगण्या बरहुकूम डाऊनलोड करतोय असं दाखवण्यात खर्ची घातला. आणि प्रॉम्प्ट्पणाची शाबासकीची थाप पाठीवर पाडून घेतली.

सोमवारला पुन्हा एकदा तो हा विषय छेडणार म्हणून विकांताला अगदी ठरवून ते काम करायचं पक्क केलं. त्याप्रमाणे भल्यापहाटे उठून सगळे डॉक्युमेंटस घेऊन एक सेंटर गाठलं. घड्याळात वाजले होते सकाळचे ९.३० म्हणजे आता युं युं म्हणत चुटकी सरशी काम करुन आपण मोकळे होऊ असं वाटून रांगेतल्या लोकांच्या "एऽ एऽऽ लाईन दिसत नाही का रे" म्हणणार्‍या गर्दीला न जुमानता चौकशी खिडकी शोधायचा प्रयत्न केला.

फॉर्म घेण्यासाठी असलेल्या रांगेकडे तु.क. टाकत आणि माझ्या हातातले आधीच भरलेले फॉर्म नाचवत गर्दीतून वाट काढत एकदाची खिडकी शोधण्यात यशस्वी झालो. चला म्हंटलं संघर्ष संपला. विकांत साजरा करायला आपण १०-१५ मिनिटात मोकळे. पण कसचं काय त्या खिडकीतल्या माणसाने माझे फॉर्म बघायचेही कष्ट न घेता तोंडातला गुटखा चघळत चघळत आणि त्याच्या त्या स्पेशल वासाने आम्हाला वांतीची उबळ आणत "हे इथे नाही चालायचे. आम्ही फक्त ह्याच सेंटर वरुन दिलेले फॉर्म ऍक्सेप्ट करतो" म्हणत मला फॉर्म सकट तु.क. टाकून बाजुला केलं.

"अहोSS पSण पेपर मधे तर पानभर जाहिरात आलेय छापून, चालेल म्हणालेत पेपरवाले नेट वरुन डाऊनलोड केलेला फॉर्म" असं म्हणायचा एक निष्फळ प्रयत्न करुन बघितला.

"पेपर मधे चालेल म्हनलय तर तुम्ही पेपरवाल्यांनाच विच्चारा. माझा टाईम नका वेस्ट करु. नेक्स्ट" असं म्हणत मला चक्क हाकलून लावलं.

"उद्या कधी येऊ मग साहेब?" असं जरा त्याला साहेब म्हणून हरभर्‍याच्या झाडावर चढवून विचारलं तर म्हणे "या ९ वाजता. ९.३० पर्यंत आम्ही काम सुरु करतो. ५० फॉर्म देतो एका दिवशी. रेशन कार्ड घेऊन या. तुम्हाला एक फॉर्म मिलेल मग तुम्ही फॅमिलीसाठी झेराक्स घ्या करुन"

"अहो पण झेरॉक्स चालत नाहीत ना?" मी उगाचच माझं तुटपुंजं ज्ञान पाजळत विचारलं.

"कोण म्हऽन्तं, आमच्या इथे चाल्तं" त्याने एका वाक्यात माझ्या ज्ञानाला मोडीत काढत मलाही मोडीत काढलं.

ठिक आहे ठिक आहे तू नही तो और सही असं मनात म्हणत आम्ही मोर्चा दुसर्‍या सेंटर पाशी वळवला. तिथेही नेटवाले फॉर्म चालणारच नव्हते. शेवटी "उद्या सकाळी नवालाच या आणि फॉर्म घ्या" असं म्हणून आमची बोळवण करण्यात आली.

दुसर्‍या दिवशी रविवारचा "बाजार" सोडून मोर्चा त्या सेंटर पाशी न्यावा लागणार ह्या विचारानेच मी हैराण झालो. करतो काय जावं तर लागणारच होतं नाहीतर पुन्हा एकदा सोमवारच्या मिटींग मधे आमचा उद्धार झाला असता.

रविवारची झोपमोड सहन करुन गेलो त्या "नवालाच या" म्हणणाऱ्या ठिकाणी. चुकून सिद्धिविनायकाला तर आलो नाही ना असं वाटून गेलं ती रांग बघून. पण नाही ती रांग त्या दिव्य आधारासाठीच होती हे लक्षात घेऊन आम्हीही रांगेत उभे राहिलो. उगाच काही रहायला नको आपल्या कडून म्हणून बरोबर ओरिजिनल रेशन कार्ड, पॅनकार्ड, इलेक्ट्रिकचं बील, टेलिफोनचं बील, कंपनी ओळख पत्र अशी यादीत लिहीलेली यच्चयावत कागदपत्र आणि त्या प्रत्येकाची अटेस्टेड फोटोकॉपी घेऊन गेलो जाताना. आता वास्तविक अटेस्टेड कॉपी न्यायची गरज नव्हती पण न जाणो ह्या सेंटरचा नियम असायचा तसा आणि घोडं त्यामुळे पेंड घायला नको म्हणून नेलं झालं. पण येव्हढा वेळ त्या रांगेत तिष्ठत उभं राहून जेव्हा नंबर आला तेव्हा कळलं "आज फॉर्म मिळणार नाहीत. आज फक्त नाव नोंदवून घेणार रेशन कार्ड बघून. फॉर्म घ्यायला दोन दिवसांनी यायचं" आता आली का पंचाईत. म्हणजे आता परवा त्या फॉर्म घेण्यासाठी एक सुट्टी टाकायची. मग पुन्हा एकदा तो भरलेला फॉर्म देण्यासाठी सुट्टी घ्यायची नाहीतर अजून एक विकांतं खर्ची घालायचा आणि हे सगळं होईपर्यंतं तात्याचं व्याख्यान ऐकायचं.

सोमवारी तात्याला हे सगळं ऐकवलं आणि सुट्टीचा अर्जही सोबत जोडून दिला तेव्हा वाटलं समदु:खी माणसा प्रमाणे त्याचा खांदा मिळेल रडायला आम्हाला पण कसचं काय सालं नशिब पण ना आम आदमी बघूनच रुसायचं धारिष्ठ दाखवतं. त्या तात्याचे नेटवाले फॉर्म ऍक्सेप्ट होऊन त्याला आधारवाली रिसिट पण मिळाली आणि आता घरपोच कार्ड पण मिळेल काही महिन्यांनी.

"तुम्हा लोकांना डिसिप्लीन माहीत नाही. एकाला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय असते ते कळत नाही. फायदा कळतो पण कायदा नाही" अशी जी तात्याच्या तोंडाची तोफ सुरु झाली ती आम्हाला खडा पारशी करुन आणि आमच्या वाफाळत्या चहाचे शीतपेयात रुपांतर करुनच शमली.

"जळ्ळा हा सगळा अडाण्याचा गाडा. ह्याचा नियम वेगळा नी त्याचा नियम वेगळा. उद्या अजून काही एक टूम निघाली की पहिला धडा पुसायचा नी नविन गिरवायचा. अजून पर्यंत वोटर्स कार्ड करेक्शन होऊन हातात मिळालेलं नाही. आधार कार्ड म्हणे प्रत्येकाला युनिक नंबर सकट मिळणार पण ते मिळवण्यासाठीची नियमावली युनिक नाही. ती मात्र राबवणार्‍या सेंटरगणिक वेगळी. एक म्हणतं फोटोकॉपी केलेले फॉर्म चालतात दुसरा म्हणतो चालत नाही. एक नेटवरुन डाऊनलोड केलेले फॉर्म ऍक्सेप्ट करतो तर दुसरा त्याकडे तु.क. टाकतो. येव्हढच काय चिडून जाऊन त्या युआयडी वाल्या वेबसाईटवर दिलेल्या कंप्लेट ऍट द रेट वाल्या इमेल आयडीवर पाठवलेलं कंप्लेंटचं इमेल देखील बाउंस होऊन आधार कडून साभार परत येतं." आमचा प्रोफेसर तावातावाने बोलत होता. (तो ही त्यात्यासारखा कधी कधी सुटतो आणि लेक्चर देतो म्हणून त्याला आम्ही प्रोफेसर म्हणतो)

आम्ही मग "आम आदमीच आम आदमीला आधार देगा" असा डायलॉग मारत त्याला आमचा खांदा रडायला दिला आणि त्याच्या "अडाण्याचा गाडा" आणि "आधार कडून साभार" शब्दांवर खुष होऊन त्याला कॅन्टीन मधला वाफाळता चहा स्वखर्चाने पाजून थंडं केला.



बुधवार, २२ जून, २०११

डोंबिवली स्पेशल : डोंबिवली पुणेरी बाणा



अफव‌ओंपे विश्वास मत रखो! हे मनाला माहीत असतं हो नाही कोण म्हणतय पण बातम्या जेव्हा खासम खाऽस अशा जवळच्या, आतल्या गोटातल्या इसमाकडून येतात तेव्हा विश्वास ठेवावाच लागतो काय करणार.

तर अशीच एक बातमी, मला गेल्याच आठवड्यात समजली. एरव्ही मी तिला "अफवा" असं म्हणून भिरकावून लावली असती. पण ती नेमकी दिली, ती आतल्या गोटातल्या व्यक्तिने. मग काय? मति गहाण ठेवून विश्वास ठेवणं भागच होतं.

खातरजमा करायला ऐकल्याबरोबर तिथे जाणं तर शक्य नव्हतं आमंत्रण मिळालं असतं, अगदी "आगत्याने येणे करावे" टा‌ईपचं आमंत्रण मिळालं असतं तरीही. (आमंत्रण मिळायची शक्यता तशीही कमीच म्हणा. आता हेच बघाना "लेकीला घे‌ऊन जा हो आयुकात" असं नुसतं सांगायचं. पण बा‌ई आयुका लांब पडेल तुला. माझ्याकडे सोय करेन तुझी एखाद दिवस असं कोणी तोंड भरुन म्हणेल तर शप्पथ!)

तर असो मुळ विषय होता ती बातमी... जी आतल्या गोटातून आलेली. बातमी काहीशी अशी होती "पुणं म्हणे बदलतय, पुण्याने म्हणे कात टाकलेय" ह्या टाकलेय शब्दापुढे तिच्या स्वरातून जाणवत होतं आश्चर्य आणि माझ्या मनात ते ऐकताना उमटत होतं प्रश्नचिन्हं.

"म्हणे आजकाल बरीच दुकानं १-४ बंद नसतात." इती माझी बातमीदार.

"नक्की लोंढेकरांची दुकानं असणार ती. जातिवंत पुणेकराची नसणारच." मी बातमीदाराचं म्हणणं एकदम तिच्याच समोर मान्य करायचं नाही म्हणून केवळ हे वाक्य फेकलं.

पण मनातून मी तिच्या बातमीवर कधीचाच विश्वास ठेवलेला कारण पुन्हा तेच ती माझी आतल्या गोटातली खासम खास बातमीदार होती ना. विश्वास न ठेवून सांगते कोणालां. त्यात पुन्हा एका नातेवा‌ईकाचं दुकान त्याचा मुलगा सांभाळायला लागल्यापासून दिवसभर चालु असतं असं एका लग्नाच्या निमित्ताने भेट झाली तेव्हा कळलेलं सत्यवचन होतच जमा, डोकं नावाच्या कपाटात त्यामुळेही ठेवला पटकन विश्वास.

बातमी संपली, बोलणही संपलं, तसा तिने फोनही कट केला. आवांतर बोलून कॉलचं मीटर वाढवायला तो फोन मी थोडीच केलेला!

पुण्याने कात टाकली ठिक आहे. पण मग तिथल्या "पुणेरी बाण्याचं" काय? तो कुणीतरी जपायला नको?

आSहेS आSSहे, हे पुणेपण जपणार ह्या जगात पुण्याबाहेरही कोणी आहे. मी युरेका च्या चालीवर ते आहे आहे म्हणुन गिरकी घेत स्वत:शीच म्हंटलं. त्यांचीच माहिती द्यायला हा लेखप्रपंच आहे ना.

तर लोकहो हे पुणेपण आपल्या परीने जपायचं काम एक मिशन म्हणून गेली बरीच वर्ष काही डोंबिवलीकर्स करत आहेत. पुढे कधीतरी पुणं कात टाकेल ह्याची चाहूल त्या द्रष्ट्या डोंबिवलीकरांना फार पुर्वीच लागली असणार, म्हणून तर ते तो ठेवा पुण्यापासून म्हंटलं तर लांब, म्हंटलं तर ३-४ तासाच्या अंतरावर असलेल्या डोंबिवलीत एक मिशन असल्याप्रमाणे जपत आहेत.

आत्ता त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या‌इतपत असेलही कदाचित पण लवकरच ती वाढीला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मला अत्यंत अभिमान वाटतो हे सांगताना की हे "पुणेपण" जपण्याचं काम करणार्‍यांमधे महिलावर्ग आघाडीवर आहे. मी जेव्हा जेव्हा त्यांच्या समोर जाते तेव्हा अगदी दरवेळी त्याच विस्मयचकीत/ भारीत नजरेने त्यांच पुणेपण टिपून घेते.

आज त्यांच्या उदात्त मिशनचा परीचय तुम्हाला व्हावा आणि पुढे मागे डोंबिवलीने पुर्णपणे "पुणेरी बाणा" अंगिकारला तर त्याचं क्रेडीट हे ह्याच दोघींना जावं ह्या निर्मळ उद्देशाने मी हा लेख लिहीत आहे. म्या पामराच्या अल्पमतिने अजून काही जणांची नोंद राहून गेली असेल तर माझा डेटाबेस जरुर अपडेट करावा डोंबिवलीकर्स.

तर ह्या महान कार्यातल्या अग्रणी काकू म्हणजे आमच्या "मुनमुन मिसळ" फेम वाल्या मुनमुन काकू. त्यांच्याच परिचयाने ह्या परिचय कार्याची सुरुवात न झाल्यास त्या स्वत: ये‌ऊन मला खडे बोल लावतील. (सच्च्या डोंबिवलीकराच्या कानात आत्तापर्यंत ते बोल फारसं इमॅजिन न करता देखील त्यातल्या हेल सकट वाजले असतीलच)

"मुनमुनची मिसळ" ह्या अख्यायिके विषयी ऐकतच मी मोठी झालेय. लहानपणापासून मला ह्या नावा विषयी फार कुतुहल होतं आणि हे असं नाव मिसळीच्या दुकानाला देणार्‍या अफलातून व्यक्तीमत्वाला बघायची प्रचंड उत्सुकता होती.

खरतर तेव्हा "मुनमुन" हे नाव "मुनमुन सेन" मुळे डोक्यात फिट्ट होतं आणि "मुनमुन सेन" च्या प्रतिमेमुळेच केवळ मला मिसळवाल्या दुकानाला ते नाव का बॉ दिलय अशी उगाचच उत्सुकता होती.

जेव्हा प्रत्यक्ष तिथे जायची संधी साधली तेव्हा "मुनमुन" हे नाव, ते दुकान चालवणार्‍या काकू आणि तिथे मिळणारी मिसळ ह्या तिन्ही गोष्टींचा मेळ मी काही केल्या घालू शकले नव्हते.

पहिल्यांदा गेले ते मैत्रिणींबरोबर. आम्ही तिघी जणींनी तिथे जायचं ठरवलं. त्याप्रमाणे गेलो देखील तिथे.

गेलो देखील असं लिहायचं कारण, त्यावेळी पॉकेटमनी मिळण्याची चंगळ कॉलेजमधे जायला लागलो तरीही नव्हती. ट्रेनचा पास असायचा, घरुन डबा मिळायचा, रिक्शा वगैरेला लागलेव पैसे तर रोज जाताना मागून घ्यायचे. फारतर दळण आणलं, भाजी आणली तर वरचा एखाद सुट्टा रुपया उदारमनाने आ‌ई ठेवू द्यायची. पार्टी बिर्टी काय ते घरी करायची. हवेच तर मागून घ्यायचे कारण सांगून. अशी पद्धत असताना, नेमके आम्ही "मुनमुनची मिसळ" खायचेय असच सांगून पैसे मागितले. कधी नव्हे ते खरं कारण पटून ते दिले गेले. आणि आम्ही तिघी तिथे जा‌ऊन पोहोचलो.

ह्या तात्काळ परमिशन मिळण्यातच "मुनमुन मिसळ = डोंबिवली चा अभिमान" ह्याची पार्श्वभुमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही नाहीतर "बाहेरचं खा‌ऊन काय पोटं बिघडवायचेत? की घरातलं अन्न गोड लागेनासं झालय आजकाल?" असं ऐकावं लागायचं इतरवेळी.

तिथे गेलो खर्‍या पण हीऽऽ मोऽठी प्रतिक्षा यादी बघून मागच्या मागे जायची इच्छा झाली. पण समोर का‌उंटर वर बसलेल्या काकुंनी तितक्यात मोठ्या जरब बसवणार्‍या आवाजात विचारलं "किती S? तिघी लेडीज काS?" आणि आम्ही घाबरुन कसबसं, जणू काही तीन लेडीजनी ये‌ऊन काही गुन्हा केलाय ह्या थाटात तोंडातल्या तोंडात पुटपुटत "हो" म्हंटलं.

दुसर्‍या क्षणी त्यांनी एका टेबलावर बसलेल्या जोडप्या पैकी पुरुषाला चक्क ऑर्डर वजा शब्दात सांगितलं "तुम्ही आतल्या बाजूला बसा, मिसेसला बाहेरच्या बाजूला बसुद्या."

गिर्‍हा‌ईकाशी अशा शब्दात कोणी बाहेरच्या हॉटेलमधे बोलतं तर ते गिर्‍हा‌ईक तिथली पायरी पुन्हा कधी न चढतं.

पण काकुंचा शाब्दिक वचक काय सांगावा महाराज. ते जोडपं त्यांनी सांगितल्या प्रमाणेच बसलं. इतकच नव्हे तर नंतर आत जाणार्‍या एका गृहस्थाला काकुंनी चक्क "तुम्ही थांबा, ह्या तिघी आधी आल्यात" असं सांगून चक्क पुन्हा प्रतिक्षा यादीत पाठवलं आणि आमचा नंबर त्या जोडप्याच्या समोरच्या बाकड्यावर लावला.

"एक जण त्या बा‌ईशेजारी बसा, दोघी समोर बसा" अशी सुचना दे‌ऊन जागावाटपाचं काम संपलं.

आम्ही हुश्श हो‌ऊन घाम पुसत ऑर्डर काय द्यायची (म्हणजे तिखट, मिडीयम की साधी मिसळ सांगायची)ह्याचा खल करत होतो. तेव्हढ्यात काकुंचा मुलगा समोर ऑर्डर घ्यायला आला. आमचा नवखेपणा पाहून आणि डिस्कशन ऐकून त्यानेच "मिडीयम घ्या" असा फ़ु.स. (फुकट सल्ला) दिला.

"हा कोण आला टिकोजीराव आम्हाला सांगणारा" असं वाटून माझ्या मैत्रिणिने एक तिखटची ऑर्डर दिली, आम्ही दोघींनी "सेफ प्ले" च्या न्यायाने दोघीमधे एक मिडियम मिसळीची ऑर्डर दिली.

मिसळ आली. येवह्ढही तिखट खायची आमच्या "भाजी आमटीत सुद्धा गुळ" लागणार्‍या पिंडाला सवय नसल्याने, नाक डोळे फुसफुसायला लागले. जा‌ईल तेव्हढ संपवून आम्ही हात धुवायला बाहेर निघतच होतो तेव्हढ्यात काकुंनी आम्हाला ऐकवलच "पुढच्या वेळी साधीच मिसळ घ्या" म्हणून.

काकुंचा मुलगाही सवा‌ई. काकुंच्याच तालमीत तय्यार झालेला.

"मिडियम सांगू की तिखट ए XXXच्या नीट नेता येत नाहीत का प्लेट तुला XXX रस्सा ओत त्या तिखट मधे अजून लक्ष कुठाय XXX" असं एकाच वेळी गिर्‍हा‌ईक, कामाला असणारा पोर्‍या ह्यांच्याशी संवाद साधत बोलतो तेव्हा नवख्या माणसाला थोडं बिचकायला होतच मनातल्या मनात भलतीकडे स्वल्पविराम दिल्याने.

पण तो चेहर्‍यावरची रेषही हलू न देता हे म्हणत असतो. नंतर ऐकून ऐकून आपल्यालाही सवय होते कुठे स्वल्पविराम द्यायचा ह्याची.

(जाणकारांनी फुल्यांमधले संवाद समजून जावेत. अजाण लोकांनी त्यांच्या माहितीतल्या जाणकाराची डिक्शनरी मागवावी, मी जाणून असले तरी ज्या‌अर्थी मी फुल्या वापरल्यात त्या अर्थी मी जाहीर लिहिणार नाही सबब मला विचारु नये ही नम्र विनंती त्या काकु स्टा‌ईल मधे वाचावी. ही विनंती वाचताना जे मला ओळखतात त्यांनी माझा चेहरा डोळ्यासमोर न आणता त्या काकुंचाच चेहरा किंवा तत्वद तुम्हाला जे कोण डॉणीन स्टा‌ईल वाटत असेल तिचा चेहरा डोळ्यासमोर आणावा)

नंतर बर्‍याच वेळा तिथे जायचा योग आला. नंतर कधी तरी तिथे पाटी लागलेली पाहीली "पार्सल मिळणार नाही" अगदी डबा घे‌ऊन गेलात तरी पार्सल मिळणार नाही असं उत्तर मी ऐकलय तिथे.

इतर लोकांन्ना म्हणजे खरतर डोंबिवलीबाहेरच्या लोकांना त्या "मामिच्या मिसळीचे" कोण कौतुक. आता तर म्हणे आमंत्रण मधे स्टा‌ईलीश रित्या ती पेश होते वगैरे वगैरे कोण ते कौतुक. पण आमच्या काकुंच्या प्रेमळ विचारपुशी शिवायची मिसळ म्हणजे बातमे कुछ दम नही लोकहो. खाण्या बरोबर ह्या शाब्दिक फटकेबाजीची जोड हवीच हवी तरच खरी मजा.

अर्थात हे बाहेरच्यांना नाही पटणार म्हणा. त्यांना हा काकंचा मुजोर पणा/उद्धट पणा वाटतो, त्यामुळे केवळ "कोल्ह्याला द्राक्षे आंबट" न्यायाने त्यांना तिथली मिसळदेखील आवडत नाही. पण तरिही सच्चा डोंबिवलीकर अजूनही त्यांच्या फु.स. सकट त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्या दुकाना बाहेरची प्रतिक्षा यादी अजूनही हेच सांगते आमचं "ह्या बाण्यावरही" प्रेम आहे. अस्सल पुणेकर कसा तिथल्या दुकानदारांचे किस्से "कॉय शांगू बा‌ई आमच्या इथली दुकानं ना बंदच असतात १-४" असं लाडीक तक्रार करत सांगतो तसच आम्ही डोंबिवलीकर आमच्या ह्या "मुनमुन मिसळ" वाल्या काकुंबद्दल बोलतो.

मिसळीच्या खालोखाल मराठमोळा पदार्थ म्हणून नंबर लागतो बटाटवड्याचा. तर लोकहो आमच्या इथल्या एक काकू गेली कित्येक वर्ष त्यांचा "पुणेरी बाणा" जपत बटाटेवडे, साबुदाणा वडे विकण्याचा व्यवसाय करतायत. त्यांच्या दुकाना बाहेर "पार्सल मिळणार नाही" अशी पाटी जरी नसली तरी तिथेही एक अनोखी पाटी लक्ष वेधून घेतेच. आणि आपलं लक्ष गेलं नाही चुकुन माकुन तर ते लक्षात आणुन द्यायचं काम त्या काकू अगदी आवडीने करतात.

"नाही नाही नाही, इथे पाव मिळणार नाही"

"पैसे सुट्टे द्यावे"

"आधी पैसे द्या"

अशी वाक्य असलेल्या पाट्या त्यांचा "बाणा" दाखवल्या शिवाय रहातच नाहीत.

प्लीज नोट इथे कृपया, प्लीज अशा शब्दांना जागाच नाहीये कुठेही.

तसही त्या काकुंकडे बघितल्यावर कोणीही त्या सुचनांचं उल्लंघन करण्याच स्वप्नात पण योजणार नाही हा भाग वेगळा.

मला साधं मोठं मं.सु. घालून प्रवास करायची भिती वाटते, इथे ह्या काकू ठसठशीत सोन्याचे दागिने (एखादा दागिना नव्हे, तर शब्दश: दागिने) घालून बटाटे वडे तळत उभ्या असतात. त्यांचेही दुकान संध्याकाळी ६ शिवाय चालूच होत नाही बर्‍याचदा.

आजकालच्या मुलामुलीबद्दल फारच स्वच्छ आणि स्पष्ट मतं त्या त्यांच्याच तोंडावर ऐकवतात. आणि तरिही त्यांच्या दुकानातले बटाटे वडे घेण्यासाठी डोंबिवलीकर प्रेमाने गर्दी करतात.

डोंबिवली करांना देखील डोंबिवलीच्या बर्‍याच अशा गोष्टींचा "जाज्वल्य का कायसासा अभिमान" वाटायला लागलाय. म्हणून तर म्हंटलं पुणं बदलतय, पुणं कात टाकतय असं ऐकलं आणि लक्षात आलं पुणेरी बाणा म्हणून डोक्यात असलेला "जाज्वल्य अभिमान" "गिर्‍हा‌ईक ह्या व्यक्तीला उपर्‍या लोकांनी उगाचच जोडलेली अदब द्यायची पद्धत ह्याविषयी जातिवंत पुणेरी दुकानदारांची असलेली नाराजी" हे सगळे हळू हळू पुण्यातून स्मगल हो‌ऊन डेक्कन क्वीन नाहीतर इंद्रायणी मार्फत डोंबिवलीत ये‌ऊन रुजतय, वाढतय आणि त्याचा आम्हाला चक्क जाज्वल्य का कायसासा अभिमानही वाटतोय.

ती आतल्या गोटातली बातमी अगदीच अफवा नसेल तर पुणेकरंनो सावधान !लवकरच पेटंट घ्या तुमच्या बाण्याचं नाहीतर अजून काही हजारो वर्षांनी "जाज्वल्य अभिमान" "आमच्या वेळी असं नव्हतं" वगैरे कॉपिरा‌ईट टा‌ईपची वाक्य डोंबिवली स्पेशल म्हणून ओळखली जातील ह्यात शंकाच नाही.

जाता जाता: नुकतेच डोंबिवलीच्या भोपर नामक विभागात एका फार जुन्या काळपासून असलेल्या मंदीरात जायचा योग आला. तेव्हा मंदीराच्या बाहेर लावलेल्या फलकाने "हा डोंबिवली बाणा" कुठपर्यंत पोहोचलाय ह्याची झलकच मिळाली. तुम्ही स्वत:च बघा खालच्या प्रचि मधे काय लिहिलय त्या फलकावर ते.



मंगळवार, २६ एप्रिल, २०११

मी, माझी मैत्रिण आणि सिंडरेला बूट



जनरली मला दहा काय पण चार दुकानही फिरायचा कंटाळा येतो खरेदीला गेल्यावर, त्यातून चप्पल खरेदी म्हणजे तर काय बघायलाच नको. चप्पलेचं आणि माझं एकमत कधीच होत नाही. जी चप्पल मला आवडते ती माझ्या पायाच्या मापाची नसते. एखादी चप्पल आवडलीच आणि मापाचीही निघाली तर ती रोजच्या ट्रेन प्रवासात टिकाव धरेल इतपत भक्कम नसते. जी भक्कम असते ती दिसायला तितकिशी आकर्षक नसते. एक ना दोन नाना तर्‍हा....आणि येव्हढाऽऽ चोखंदळ पणा करुन चप्पल घेऊन बाहेर पडावं, तरिही दरवेळी दुसऱ्या कुणाच्या चपला बघितल्या की वाटतं "आयला ह्यांना कशी बहुदुधी आखूड शिंगी गाय" मिळते?

तर त्या दिवशीही नेहमी प्रमाणेच अगदी तस्सच झालं. आधीच मला "तिच्या" प्रत्येक गोष्टीचं अपाऽऽर कौतूक आहे. तिच्या दिसण्याचं.. तिच्या रहाण्याचं.. तिच्या लिखाणाचं आणि तिच्या छंद जोपासण्याचं सुद्धा.

त्याचं काय आहे ना...तिचं एक मस्त छानसं, छोटसं घर आहे...तिच्या चौकोनी कुटूंबाभोवती फिरणार त्यांचं एक वर्तुळ आणि त्या वर्तुळाच्या जोडीने तिची तिची अशी जपलेली छोटी मोठी वर्तुळं... मला सगळयाचच अपाऽऽर कौतुक आहे, अगदी पहिल्या भेटीपासूनच. (प्लीज नोट वर्तुळं म्हणजे विबासं नव्हे )


तर त्या दिवशी आम्ही भेटलो तेव्हा तिच्या पायात एकदम "आखुड शिंगी बहुदुधी गाय" टाईपच्या म्हणजे दिखाऊ+टिकाऊ टाईपच्या चप्पला होत्या. त्या तिने "अमक्या ढमक्या दुकानात सेल मधे घेतल्या म्हणे दोनच दिवसा पुर्वी" मी देखील नेमके दोनच दिवसा पुर्वी बरीऽऽऽच दुकानं फिरुन शेवटी एका चप्पलेवर शिक्कामोर्तब करुन माझ्याकरता नविन जोडे घेऊन आलेले. माझ्या नविन जोड्यांचं नवखेपण जागोजागी लावाव्या लागलेल्या बॅंडेड मधुन जाणवत होत. माझ्या पायाची आणि त्यांची अजून म्हणावी तशी युती काही होत नव्हती.

पण ती मात्र सिंडरेलाच्या गोष्टीतली सिंडरेला असावी तसे तिचे जोडे तिला फिट्ट बसलेले. ना कुठे सोलवटण्याचे व्रण होते ना कुठे बॅंडेड चे ठिगळ.

मग का नाही मनातल्या मनात तिचा हेवा वाटणार, सांगा बर? उगाचच आपलं मनात आलं तिचे "हे" बुट तरी एखाद दिवस मला मिळाले घालायला तर...!


हे असं वाटणं म्हणजे ते शाळेत निबंधाला विषय असतो तसं झालं पण आता तसं वाटलं खरं त्याला काय करणार!


पण कधी कधी(च) तुमची प्रार्थना इंन्स्टंट फळाला येते आणि तुमचं नशिब तुम्हाला "छप्पर फाडके" देतं (निदान तसं भासवतं तरी), तर तो दिवस देखील त्या "कधी कधी" पैकीच एक असावा , कारण त्या दिवशी गप्पांच्या नादात माझ्या घरुन निघताना ती नेमकी चुकून माझे बुट घालून घरी गेली आणि तिच्या त्या "सिंडरेला बुटांना" माझ्याच घरी विसरुन गेली.


सिंडरेलाला तिचा तो एक हरवलेला बुट आणि त्या जोडीने भाग्य परत मिळाल्यावर जेव्हढा आनंद झाला असेल त्याच्या कैकपटीने अधिक आनंद मला त्या दिवशी तिचे बुट मिळाल्यावर झाला.

हळूच पाय त्या बुटात घालून बघितला. मस्त वाटलं एकदम. मग चालून बघण्याचा मोह झाला. चार पावलं चालताना एकदम भाऽऽरी फिलिंग आलं. मग दिवसभर तिच्याच बुटात पायाला अडकवून पायाला भिंगरी लावून निघाले फिरस्तीला, औटघटकेचं म्हणतात तसलं राज्य अनुभवायला. एकिकडे कॉन्शस का काय म्हणतात तो म्हणत होता "तिचे बूट परत करुन ये, दुसऱ्याच्या वस्तू वापरु नयेत" इत्यादी इत्यादी. पण मनातल्या हेव्याने त्यावेळी तरी त्या कॉन्शसला गप्प बसवलं.

टेलिफोनचं बील भरायला रांगेत उभी राहीले तेव्हा उगाचच वाटत होतं रांगेतल्या एकूण एक बायका माझ्या बुटांकडेच बघतायत म्हणून. समोरची प्रत्येक व्यक्ती माझ्या त्या सिंडरेला वाल्या बुटांचा हेवा करतेय असं वाटून गेलं.. उगाचच. आणि त्याचीही गंमत वाटली.


बीलं झाली भरुन... बाजारहाटही करुन झाला. आठवून आठवून कामं काढून जास्तीत जास्त वेळ त्या बुटाचा सहवास मिळवायचा प्रत्येक ठराव मनाने पास केला.


थोडावेळ बरा गेला, पण कधी कोण जाणे हळूच त्रासाने डोकं वर काढलं, पायांना जरा जरा त्रास जाणवायला लागला. कधी त्या बुटांच्या हिल्स मुळे पाय पटकन मुडपला जाऊन दुखायला सुरुवात झाली तर कधी त्या बंद बुटांमुळे पायाला चांगलाच घाम फुटायची वेळ आली. पायाचा अंगठाही जरासा का होईना सोलवटला, मग वाटेत थांबून दुखावलेल्या अंगठ्याला बँडेड लावून झाली. समोरुन बघणार्‍याला बंद बुटाआड लावलेली बँडेड दिसत नव्हती खरी आणि त्यामुळेच बुटांकडे वळणार्‍या नजरांमधला भाव अजुनही तोच होता फक्त त्याची आता मला गंमत वाटत नव्हती . त्या दुखण्याने एकंदरीतच माझ्या चालण्याचा स्पीड चांगलाच मंदावला होता आणि मंदावणाऱ्या स्पिड बरोबर ते सिंडरेलाचे बुट घालण्याचा उत्साह पण मावळला होता.


दुखर्‍या पायावर आणि हिरमुसल्या मनावर फुंकर मारत मी मग ऑटोने घरी येणच पसंत केलं. घरी येऊन टेकते नाही तोच बेलच्या हाकेला ओऽऽ देत मला दार गाठावं लागलं.


दारात माझी तिच ती "सिंडरेला बूऽट" वाली सखी, जिचं मला अपार कौतुक आहे..उभी होती... तिच्या स्वत:च्या दुखर्‍या पायावर फुंकर मारत आणि एका हातात माझे बूट सांभाळत.


हेच खरे!


लहानपणी वीज गेली
की मेणबत्तीच्या प्रकाशात
सावल्यांचा खेळ रंगायचा
हरिण, ससा, पक्षी, मासा
वेगवेगळा आकार त्या
सावल्यांमधून तयार व्हायचा

घामाच्या धारा आणि गुणगुणणारे डास
कासवछापचा चुरचुरणारा उग्रसा वास
सगळ्या सगळ्याचा विसर पडायचा,
सावल्यांच्या त्या भासमय खेळात
जीव असा रंगून जायचा

शेवटी छोटे काय नि मोठे काय?
नको असलेला वर्तमान विसरायला
आभासी दुनियाच लागते
तात्पुरती का होईना

हेच खरे!



शनिवार, १२ फेब्रुवारी, २०११

चक्र /वर्तुळ भाग ४

"आईSS, आता लहान आहे का मी? लग्न होऊन मला एक मुलगी पण झालेय ..! मी बघेन ग काय नी कसं मॅनेज करायचं सगळं ते. तू कशाला पण आईंना असं बोललीस..."

"अगंSS.. पSण..."

"पSSण काय पण, तू नको मधे पडूस ह्यात, मला करुदे ना हॅन्डल माझ्या पद्धतीने. तू पडतेसच कशाला ह्या घरातल्या गोष्टींमधे?"

"अगं.. पण सहज बोलले मी. कुणी काही बोललं का तुला त्यावरुन?"

"रामायण झाल्यावर मगच तुला पटणार का माझं म्हणणं? आणि मी फोन ठेवतेय आता, अख्या बिल्डींगला कळेल ह्या आवाजात अजून बोलले तर ..कोण कोणास काय म्हणाले ते"

फोन कट केला नी अभिची एंट्री झाली. शेवटची तारसप्तकातली वाक्य कानावर पडली त्यावरुन त्याला कल्पना आलीच काय झालं असेल त्याची.

"फोन मधुन धूर येतोय मनु" त्याने तरिही विनोदाचा क्षीण प्रयत्न केला आणि चुकीच्या वेळी चुकीचा विनोद केल्याची शिक्षा म्हणून एक जळजळीत कटाक्ष त्याच्याकडे फेकला गेला.

"तू ना तुझ्या आईवरच गेल्येस बहुतेक. काय कुठे बोलावं ते कळतच नाही तुला" मुद्दाम खवट बोलणं होतं की अजून एक विनोदाचा फुटकळ प्रयत्न ह्यात न पडता तिने..."होSS ना! तुम्हाला कळतं नाSS???" म्हणत वार परतवला त्याचा.

ह्यातलं तुम्हाला हे "आदरार्थी एकवचन" नसून "अनेकवचन" होतं हे लक्षात येऊन विषय बदलला नाही तर आज तिसरं महायुद्ध नक्की घडणार ह्याची जाणिव होऊन तो शहाण्या नवर्‍याची भुमिका पार पाडण्यासाठी गप्प बसून तिला कामात मदत करत राहिला.

तिने पुन्हा फोन लावायला घेतला तेव्हा गोंधळून त्याने "आता पुन्हा काय..?" असा चेहरा केला त्यावर "तुम नही समझोगे, लडकीया होती ही ऐसी है" असा डायलॉग, त्याला तिने न बोलताच ऐकू आला

-------

"म्हणे ह्या घरातल्या गोष्टींमधे कशाला पडतेस?" " हे घर... म्हणजे?" "काल परवा पर्यंत माझी लेक होती ना ही शेखर?" "आता एकदम परक्यासारखी तोडून बोलली? का? काय केलं मी इतकं? तिची काळजी वाटून सहज बोलले ना मी?"

"हो पण निमाबाई ती आहे की समर्थ. ठेवा की तिच्यावर विश्वास. आता लेक सासरी गेलेय आपली. तिला तिचा संसार तिच्या चुक बरोबर सकट करुद्यात की. काळजी ठिक आहे पण… इतकंही गुंतणं योग्य नाही"

"तुला काय जातय बोलायला? म्हणे गुंतणं योग्य नाही. जीवाला घोर लागतो तो जाणायला आईच व्हायला हवं"

"आता गेली का गाडी पुन्हा त्याच ट्रॅक वर...! चला विषय बदला..."

"असं म्हंटलं की झालं तुझं, तरी पण चूक नाहीये म्हणणं तुझं. कळतय पण नाही वळत असं काहीसं होतय"

"फोन वाजला निमाबाई, घ्या लेकीचाच असणार.. बोला जरा ते डोळे पुसून.."

"हम्म! बोल... नाही ग रागावले नाही मी..बSरं.... होS अगं SS...... चल बाळा काळजी घे. फोन ठेवते आता"

------------

"बरं राणिसरकार, तुमचा क्राईंग एपिसोड संपला असेल तर आपण जेवून घेवुयात का आता? आई बाबा पण आलेत आत्ताच"

"मला नव्हतं रे दुखवायचं तिला असं, मी आधी तेच व्यवस्थित सांगायचा प्रयत्न करत होते तिला. पण.. तिच्यापर्यंत ते पोहोचतच नव्हतं आणि मग गेलं माझ्या तोंडून निघून तसं... पण वाक्य बोचरं असलं तरी फॅक्ट आहे ना ती..?

सल्ला देणं एखादवेळेस ठिक आहे पण उठसुट अशी काळजी वाटून ‘मी खाते किती, झोपते किती, काम किती करते’ असं प्रत्येक बाबतीत विचारत राहिली ... बर विचारणं पण ठिक म्हणते मी, पण मला विचार ना काय विचारायचं ते.

"कित्ती काम पडतं ना मनुला" टाईप वाक्य डायरेक्ट आईंना ऐकवायचं म्हणजे...! वादाला कारण नाही होणार? मSग, तेच सांगत होते तिला. मी आहे ना समर्थ माझ्या स्वत:साठी बोलायला! एकतर कानाला यंत्र लावत नाही, इथुन घसा फ़ोडून सांगावं लागतं त्यातही भेटल्यावर बोलू म्हंटलं तरी तिलाच रहावत नाही मग विषय जातो वाढत आणि फट्ट दिशी तुटतो.. रबर ताणलेला"

"तू बघशील अभी, मी खूप चांगली आई होईन. म्हणजे माझी आई खूप चांगली, प्रेमळ आहेच रे पण मी ना पिल्लूला एकदम वेगळं वाढवेन, पुर्ण मोकळेपणा देईन, तिची मैत्रिण होईन. तिच्या बाबतीत बिलकूल पझेसिव्ह रहाणार नाही...."

"मातोश्री आता सध्या जेवायची कृपा कराल का? तुमचं पिल्लू सध्या तुमच्या करता थांबलय जेवायचं"

"तू हो पुढे मी आलेच.."

----------

पिल्लू - वय वर्ष २/३ - "आई...आऽई आऽऽई आऽऽऽई आणि फक्त आई"

पिल्लू - वय वर्ष ४ "आई... आमच्या बाईऽऽ किनई..... बाईं म्हणतात... बाई अशा नी बाई तशा" आणि तरिही ऍट द एण्ड ऑफ़ द डे "आऽई तू कोणाची आहेस? फक्त माझी आहेस ना?" "माऽऽझी आई..मी तुला कध्धी कध्धीच सोडून जाणार नाही"

- वय वर्ष ५ "आई, मी तनु कडे जाऊ आज पुर्ण दिवस रहायला? तनू माझी बेस्ट फ्रेंड आहे तुला माहितेय!...... प्लीऽऽज"

- वय वर्ष ७ "आई, मला ना तुझ्यापेक्षा निशूताई जास्त आवडते समोरची..."

- वय वर्ष …. - ब्लाऽऽऽऽब्लाऽऽऽऽ ब्लाऽऽऽह ……

- वय वर्ष …. - "........................"?????

----------------

खोटं का बोलू आधीची सगळी वाक्य मनाला कुठे तरी सुखावून जायची. मी पझेसिव्ह नाही असं म्हंटलं तरिही मला सुखवायची. आणि तिच्याकडून मी कसलीच अपेक्षा ठेवणार नाहीये हे स्वत:ला आणि इतरांना ठासून सांगितलं वेळोवेळी तरी देखील .."आई, मला ना तुझ्यापेक्षा निशूताई जास्त आवडते समोरची..." हे वाक्य कुठेतरी सुक्ष्मसी कळ देऊन गेलं....एका क्षणापुरतं का होईना, गेलं काहीतरी दुखावून.

का? माहित नाही. कदाचित माझा पदर सोडून पिल्लू आता वेगळं वर्तुळ तयार करतय ह्याची जाणिव एकाच वेळी सुखावणारी आणि आता असा आणि इतका फक्त आमचा आमचा असा सहवास रहाणार नाही ह्या जाणीवेने दुखावणारी ... त्यातूनच आलं असेल ते खट्टूपण.

गोष्ट खरं तर तीळा येव्हढी छोटीशी... अजून पुढे जाऊन ह्या गोष्टीचं काही वाटणार नाहीच, तसच कशाला ते खट्टुपण देखील फ्रॅक्शन ऑफ़ सेकंद म्हणतो तसं तरळलेलं. ह्यालाच पझेसिव्ह नेस म्हणतात का? पण मी अजिबात पझेसिव्ह होणार नाहीये हे मी किती तरी वेळा घोकलय की मनाशीच माझ्या.

अजून "दिल्ली बहोत दूर है …" बरच काही घडणारे ह्यापुढेही, टिन एज जसं येईल तसं बर्‍याच उलथापालथी होतीलच म्हणा. आणि मग वय वर्ष अमुक तमुक - च्या पुढे ते ब्लाऽऽह ब्लाऽऽह ब्लाऽऽह वाले रिकामे रकानेही भरले जातील.

"चिंगी महिन्याची झाली नाही तोच" चा अंक प्रक्षेपीत करत मी...." मग मी पण एकदिवस काळजी वाटून तिला असाच फोन करेन का? आणि मग काय म्हणेल ती "माझ्या घरामधे तू लक्ष नको देऊस ग ममा?" असच म्हणेल का? काय असेल माझी तेव्हा रिअ‍ॅक्शन?"… हा सगळा विचार करत नाहीये आणि तसही हे वर्तुळ असलं तरिही असच ह्याच क्रमाने होणार नाही काही सगळं. पण प्रत्येक वेळी त्या त्या फेज मधून जाताना कुठेतरी मनामधे ह्या वर्तुळाकार नात्यातल्या जुन्या गोष्टी एक क्षण डोळ्यापुढून जातील.

शेवटी काहीही म्हणा, पटकन मान्य करा किंवा करु नका, नाती आपापली फ्रेम घेऊन येतात. काळाप्रमाणे आणि ज्याच्या त्याच्या स्वभावा प्रमाणे ह्या फ्रेमचं रंगरुप थोडं थोडं बदलतं इतकच.

माझी आई आणि आजी, मी आणि आई आणि आता पिल्लू आणि मी चक्र तर चालूच रहाणार. काही गोष्टी बदलतील, काही बदलल्यात असं वरुन तरी भासेल पण शेवटी चक्र ते चक्रच, काही गोष्टी ह्या कालातीत असतात. नात्यांमधल्या व्यक्तींच्या जागा बदलतात पण नातं तसच असतं वर्तुळासारखं हेच खरं.