रविवार, ११ सप्टेंबर, २०११

आठवणीची रिळं

आठवणीची रिळं भाग १ - काळ क्युएस्क्युटीचा

तुम्ही क्यु एस क्यु टी, एम पि के, एच ए एच के (हे जरा हिचकी दिल्यासारखं वाटतं ना?) डि डी एल जे च्या काळातले आहात? असाल तर "ये एच ए एच के क्या है भाई?" असा प्रश्न तुम्हाला पडणारच नाही आणि असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही नक्की त्या काळातले नाही किंवा तुमचा गजनी तरी झालाय असं समजायला हरकत नाही.

"फ्रेन्डशीपका एक उसुल होता है. फ्रेन्डशीप मे नो सॉरी नो थॅन्क्स" आणि ती टोपी. काय करिष्मा होता त्या गोष्टींचा तेव्हा सगळ्या गॄपवर. इतका की वाढदिवसाची गिफ्ट म्हणून सलमान, भाग्यश्री, माधुरी, अमीर ह्या लोकांचे पोस्टकार्ड साईझ फोटोग्राफ एकमेकींना दिल्याचं आठवतय मला. एका मैत्रिणीने माधुरीला पत्र का कायतरी पाठवलेलं आणि तिला माधुरीकडून सही असलेला फोटो आला तेव्हा तिने दिलेली रगडा पॅटिसची पार्टी पण आठवतेय.

ती येव्हढी जबरी पंखी माधुरीची की तिच्या घराच्या हॉलमधे तिने आई बाबांशी भांडून भांडून माधुरीचं एच ए एच के वालं, एका हातात आयस्क्रीमचा कोन धरलाय अशा पोझवालं भलं मोठ्ठं पोस्टर लावलं होतं. त्याकरता तिच्या बाबांना त्यांच्या आवडीचं ब्लॅक ऍण्ड व्हाईट जमान्यातलं मधुबालाचं पोस्टर काढावं लागलं होतं. पण ते ट्रान्झिशन सोप्प झालं तिला. आमच्याकडे "बजरंग बली की जय" वाली फ्रेम भिंतीवर होती. ती काढून त्या जागी माधुरीचं पोस्टर लावू का? हे विचारायची पण हिम्मत आमच्यात नव्हती.

एम पी के थिएटरला किमान ५ वेळा आणि कोणाच्या ना कोणाच्या व्हिडीओ प्लेअर वर भाड्याने आणून अजून १० एक वेळा वेड्यासारखा बघितलाय. एच ए एच के आणि त्यातल्या "अहाऽऽ" चीही तीच तर्‍हा. आता टिव्हीवर फुकटात लागला कोणत्याही चॅनलला तरी पहिली पाच मिनिटं - तेही जुन्या दिवसांखातर बघायचं - धारिष्ट्य दाखवता येतं. त्या उप्पर नाSय रेS बाबाSS. एम पी के तल्या भाग्यश्रीचं ते लाडिक बोलणं डोक्यात जातं आता आणि त्या सलमानचे डोळे मोठे करुन बघणं पण बघवत नाही. सलमान फॅन्स लई लई सॉरी, पण काय करणार काळाप्रमाणे क्रश पण बदललेत ना आता.

आम्हीही कोणे एके काळी सलमानचे पंखे होतो. त्या जोरावरच तर त्याच्या "कुर्बान" सारख्या तद्दन सिनेमाचा गल्ला भरला गेलाय. नाहितर पंख्यांशिवाय उगाच कोण त्या "आओ मै पढाऊ तुम्हे ए बी सी. चलो हटो जाओ मुझे छोडो जी नही पढनी मुझे ए बी सी. अच्छा बाबा अच्छा मुझे माऽफ करो.. रुक जाऽऽऽओ हमे ना सताऽऽओ करीऽब तो आऽऽओ आणि त्या आरे मिल्कची ऍड वाटाव असं ते (आऽऽरे आऽऽरे). "तू जब जब मुझको पुकारेऽ मै दौडी आऊ नदिया किनारे" ही असली गाणी अख्खीच्या अख्खी पाठ.

"ह्या गाण्याची एक गंमत आहे" हे पंडीतजी कसं सांगतात तस्सच अगदी सलमानच्या "लव" नावाच्या शिणूमाची पण एक गंमत आहे बरं का. तो शिणूमा मैत्रिणीकडे व्हिसिआरवर बघितलेला. ती बोलवायला आली आम्हाला तेव्हा मी मस्तपैकी डाराडूर पंढरपूर झालेले (आता हे र्‍हाईम कोणी, कधी, का जुळवलं ते नाय बॉ आपल्याला माहित पण आवडलं म्हणून वापरलं झालं) तर त्यावेळी तिने "चल उठ लव आणलाय" सांगितलं आणि मी घाईघाईने उठून तोंड धुवून चूळ भरुन निघाले खरी पण सिनेमा बघायच्या एक्साइटमेंट मधे मी चूळ बेसीन मधे टाकायच्या ऐवजी चुकून बेसीनच्या बाहेरच टाकली आणि आईचा ओरडा तर खाल्लाच शिवाय सगळं पुन्हा पुसापुसी करुन निघावं लागलं. तिकडे माझ्यामुळे उशीर झाला म्हणून मैत्रिण वैतागली. तिने भाड्याने ती व्हिसिडी आणलेली.

सलमान फॅन होतो तेव्हा, तरिही "लव" मधल्या रेवतीच्या त्या पेनातली शाई निळी आहे की नाही हे चेक करण्याकरता सलमानच्या शर्टवर प्रयोग करण्याच्या सीनची पारायणं केल्येत ते फक्त त्याचा कधी काळी वापर करता यावा ह्या शिकावू वृत्तीनेच. आईने महिला बचत योजनेची, एन एस सीची एजन्सी घेतलेली. "तो" सीन करायची कधीतरी संधी चालून येईल ह्या आशेने आईची पोस्टाची कितीतरी कामं गुणी बाळासारखी केलेत तेव्हा. पण हमारा नंबर कभी आयाईच नही.

फावल्या वेळात ह्या सगळ्या सिनेमांचे रिमेक करुन सुट्टीचा वेळ सत्कारणी लावायचा ह्या शिवाय दुसरं काम तरी काय होतं आम्हाला. मी आणि अजून एक मैत्रिण जिने माधुरीचा सहीवाला फोटो मिळाला म्हणून पार्टी दिली ती, आम्ही दोघीही कधी कधी अंताक्षरी खेळून कंटाळा आला की 'सिनेमा' नावाचा खेळ खेळायचो. हा खेळ खेळताना एम पी के आणि एच ए एच के नावाच्या दोन सिनुमांची ओळ अन ओळ (फक्त हिरो आणी हिरविणीचे डायलॉग्ज अर्थात) घडाघडा म्हणायचो, मधल्या गाण्यांसकट आणि त्यांच्या आधीच्या त्या वाजणार्‍या म्युझिकल पीससकट. नुसताच शाब्दिक सिनेमा करायचो अर्थात.

माधुरी क्रेझ तर तेव्हा जबरदस्तच होती. आठवतंय का त्या एच ए एच के मधल्या तिच्या सगळ्याच ड्रेसची झालेली नक्कल? नशिबाने मी तितकी क्रेझी नव्हते आणि समजा असते तेव्हढी क्रेझी तरीही आईने असला काही ड्रेस शिवायची परमिशन स्वप्नात पण दिली नसती. खरंतर आधी मला ती खूप प्रचंड आवडायची असं नव्हतं पण दुसर्‍या एका मैत्रिणीला फ्रीदेवी भन्नाट आवडायची, आणि ती माधुरी आणि पर्यायी, माधुरी फॅन्सना उगाचच हिणवायची. श्रीदेवीला नावं ठेवली आणि माधुरीचं स्तुतिगायन केलं की ती हमखास भडकायची. की मग पुढचे तास दोन तास मजेत जायचे आमचे, फक्त अधून मधून "लड बाप्पूऽऽ" म्हणत तेल ओतायचं बास. तर तिला भडकवण्याकरता मी माधुरी माधुरी जप करायला लागले आणि एका क्षणी ती आवडायलाही लागली.

प्रचंड क्रेझी नसले नक्कल करण्या इतकी तरी मी तिचा तद्दनातला तद्दन पिक्चर पैसे घालवून थिएटरला बघितलाय तेव्हा. "राजा" नावाचा सिनेमा आठवतोय? आहे काही त्यात पैसे घालवून बघण्यासारख? ते देखील स्वत:चे पैसे घालवून? "अखियाँ मिलाऊ, कभी अखियाँ चुराऊ" ह्या एका गाण्यासाठी अख्खा सिनेमा त्या अनिल कपूरच्या भावाला हिरो म्हणून सहन करायच? पण सच्चे भक्त को भक्ती से कोई नही रोक सकता स्टाईल आम्ही गेलो तिकिटं काढून सिनेमा बघायला. आयत्यावेळी ठरवलेला कार्यक्रम म्हणून ३ ते ६ च्या शो ला धावत पळत पोहोचून तिकिटं काढून आत गेलो. आयत्या वेळी गेलो तरी बर्‍यापैकी मागची तिकिटं मिळाली म्हणजे तो किती महाऽऽन सिनेमा असेल हे कळत होतं पण वळत नव्हतं.

या सिनेमाची पण एक गंमत आहे. झालं असं की आम्ही तिकिटं काढून आत गेलो तेव्हा नुकताच सिनेमा

सुरु झालेला. आत मधे अंधार होता आणि त्या टॉर्च धारी सीट सहाय्यकाने सांगितल्या प्रमाणे आम्ही लोकांचे "ओऽऽ बाजूऽऽ" "शुऽऽक शुऽऽक बाजु हटो" हे उद्गार झेलत आमच्या सीटकडे चाललो होतो. माझ्याबरोबर माझे दोन भाऊ होते. ते "ताई, पुढे होऽ पुढेऽ होऽऽ" चा गजर करत होते. तितक्यात पडद्यावर माधुरीची एण्ट्री झाली आणि मी पडद्याकडे बघत बघत "ताई, पुढे होऽऽ" चा मान ठेवत पुढे जात जात एका क्षणी जागेवर बसले. आणि धाऽऽडकन आवाज झाला. खुर्च्यांची रांग संपून त्यापुढे असलेल्या मोकळ्या जागेत मी माझं बुड टेकवायला गेलेले आणि .... आणि काय? पडद्यावर घायाळ करणारी माधुरी होती तरीही तो सीन मी अख्खाच्या अख्खा खाल्ला होता लोक्स. सगळं पब्लिक तिचा प्लेजंट प्रेझेन्स विसरुन माझ्या एण्ट्रीकडेच बघत होतं. भाऊ एकीकडे खोऽ खोऽ हसत होते पण दुसरीकडे कोणी ओळखीचं तर नाही ना आजुबाजुला हे बघण्याचा प्रयत्न करत होते.

हे माधुरी प्रेम पाऽऽर त्या दिल तो पागल है मधल्या त्या खुळ खुळ वाजणार्‍या कड्या पर्यंत टिकलं. त्याच सिनेमाने तर माझ्या ज्ञानात "व्हॅलेंटाईन डे" नावाच्या गोष्टीची भर घातली. आमच्या कॉलेजमधे त्याच वर्षीपासून अनऑफिशिअली तो डे साजरा व्हायला सुरुवात झाली. मोठ्या शहरांमधे कदाचित ते त्या आधीच झालं असणार पण आमच्या पर्यंत पोहोचायला "दिल तो पागल है" पडद्यावर झळकावा लागला. तो पर्यंत माझ्या कॉलेजमधले रोमिओ ज्युलिएट्स रोझ डे चाच आधार घ्यायचे.

ह्या सगळ्या त्यावेळच्या वीक पॉईंटस मधे अजून एक नाव अ‍ॅड करावच लागेल, ते म्हणजे टिव्हिएस सारेगामाचा सोनू निगम. त्याच्या करता तो प्रोग्रॅम न चुकता बघितला जायचा, बाकी मी ना तानसेन ना कानसेन.

हे वीक पॉईंटस काही माझ्या एकटीचे नव्हते. हे तर आमच्या गृपचे कॉमन वीक पॉईंटस होते. मला आठवतय ही जी मैत्रिण मी म्हणतेय माधुरी भक्त, तिच्या कुठल्याश्या क्लासमधे "एक दुजे के लिये" स्पर्धा होती. कोणाही मित्र मैत्रिणीला घेऊन खेळली तरी चालणार होती. तेव्हा आम्ही दोघींनी ह्या सगळ्या कॉमन क्रेझ नी क्रशेस च्या जोरावर तर पहिलं बक्षिस मिळवलं होतं. कारण सगळे प्रश्न आवडी निवडीशी निगडीत आणि आम्हा सगळ्यांच्या आवडी नी निवडी पण एकच. म्हणून झालो विनर "एक दुजे के लिये" चे. तेव्हा सगळे म्हणायचे ह्या म्हातार्‍या झाल्या तरी अशाच काही ना काही मॅडचॅप पणा करताना दिसतील एकत्र. पण तसं काहीच झालं नाही. शाळा, कॉलेज संपेपर्यंत असलेली आमची "एक दुजे के लिये" जोडी लग्नानंतर "नो नेटवर्क झोन" मधे गेली.

कधी कधी विनाकारण काही गाठी बसतात, त्या घट्ट होतात आणि मुद्दाम त्या सोडवायचा प्रयत्नही करावासा वाटत नाही. त्या त्या वयातला सिनेमा त्या त्या वयात जेव्हढा आवडतो तेव्हढा तो आता लुभावेलच असं नाही तसं पण झालं असावं.

तो काळ, त्या काळातल्या आठवणी मग त्या मैत्रीच्या असोत किंवा सिनेमाच्या वा एखाद्या गोष्टीच्या क्रेझच्या त्या काळाला सोनेरी करुन जातात येव्हढं मात्र नक्की. वयाच्या प्रत्येक टप्प्यातल्या मजा मस्तीच्या कल्पना वेगळ्या असू शकतात त्यामुळे तेव्हा प्रचंऽड आवडलेली एखादी गोष्ट आता वयाच्या ह्या टप्यावर "कशी काय बॉ आवडली होती तेव्हा?" असं वाटावं इतपत मतं बदलू शकतात, हे खरंय. पण तसा विचार कराच का? प्रत्येक गोष्टीला आत्ताची फुटपट्टी लावाच का? फारतर 'तेव्हा आवडलं होतं. येस्स, क्रेझ वाटावी इतपत आवडलं होतं आता नाही वाटत..' असं म्हणून पुढे जावं. ह्या आवडण्या विषयी खेद नाही की आता आवडत कसं नाही असं वाटून खंतही नाहीये.

हे काही "जाने कहा गये वो दिन..." म्हणत "लौटादे बचपन की यादे... " म्हणत गेल्या काळाविषयीचं

रडणं नाही. हे फक्त जुना अल्बम पुन्हा एकदा तुमच्या बरोबर बघणं आहे इतकच. ते ही काल मैत्रिणीशी बोलताना गप्पांच्या ओघात आजकालच्या चॅनल्सचा विषय निघाला , "कसला तो वैताग सिएन नी पोगोचा" ह्यावर जेव्हा एकवाक्यता झाली आणि "काय तल्लीन होऊन बघतात झालं तेच तेच, देवजाणे ही मुलं" ह्या वाक्याने गाडी आपोआप रुळ बदलत १०-१२ वेळा एम पी के कसा बघितला होता, त्यातले डायलॉग्ज कसे पाठ झालेले वर घसरली तेव्हा आठवणींची लडी उसवली, इतकच. बाकी काहीच नाही.


आठवणींची रिळं - भाग २ : प्लॅन्चेटचं खुळ

काल लंच टाईम मधे माझ्या ऑफिस कलीगने विचारलं "तुला प्लॅन्चेट म्हणजे माहितेय?"

माझा घास तसाच हातात राहिला. आईंSग ह्याला हे कुठे मधेच आठवलं?

एखादं जुनं खेळणं किंवा तत्सम एखादी गाठोड्यात बांधून ठेवलेली जुनी गोष्ट माळ्यावरुन कोणीतरी
काढून समोर ठेवली तर कसं वाटेल? तस्सच अगदी त्या "प्लॅन्चेट" ह्या शब्दाने झालं.

माझ्या डोळ्यापुढे सगळा प्लॅन्चेट पट उभा राहिला.

बहुतेक माझ्या १० वीच्या आसपास हे खुळ कोणीतरी आमच्या डोक्यात घातलं. करके देखा जाये क्या? ह्या प्रश्नावर आधी "छ्छे ग बाई, अजिबाऽऽत नको हा कायतरी" पासून सुरु होऊन हळूच "एकदा करुन बघुयात? एकदाच हं पण" वर गाडी आली.

मग कोणाच्या घरी करायचं? कधी आणि कोण कोण भाग घेणार? ह्यावर कार्यानुभवाच्या तासाला वहीच्या मागच्या पानावर पेन्सिलने लिहून हे निरोप हळुच एकमेकींकडे पास करुन गुप्त खलबतं करुन झाली. शेवटी जिचे आई बाबा घरी नसतात म्हणजे पर्यायी "काय चाल्लंय?" हे डोकवून बघणार जिच्या घरी कोणी नाही अशा मैत्रिणीकडे हा उपद्व्याप करुन बघायचं ठरलं. कॉलेजात जाणार्‍या ताई कृपेने जिला ह्या विषयातले ज्ञान पहिल्यांदा झाले ती आपोआपच आमची लिडर झाली. पण ती तितकीशी निडर नसल्याने तिने "हजर राहून कसं करायचं सांगेSन पण मी वाSटीवर बोSट ठेवणार नाही" अशी भुमिका घेतली.

एका शनिवारी शाळा सुटल्यावर आम्ही बॅगा घरी टाकून तिच्या कडे "नोटस काढायला" जमायचं ठरवलं आणि ठरवल्या प्रमाणे जमलो. आमच्या लिडरच्या सल्लाबरहुकूम पाटावर ए ते झेड अक्षरं वरच्या बाजुला, खाली ० ते ९ आकडे आणि मधे तीन गोल काढले. मधला गोल म्हणे न्युट्रल झोन. बाजुच्या दोन्ही गोलांमधे एकात "यस" आणि दुसर्‍यात "नो" असं लिहून आम्ही सज्ज झालो.

"आता करुयात सुरु?" असं जेव्हा तिने विचारलं तेव्हा पहिल्यांदा भिती, उत्सुकता असं काय काय दाटून आलेलं.

"ए थांब थांब. आधी आत्म्याची साईझ ठरवावी लागेल" एकीने शंका काढली.

"का?" आम्ही

"का काय का? कळायला नको ननैवेद्याची वाटी ठेवायची की नेहमीची आमटी भाजीची ते?" तिने आम्हाला "बुद्दू कहिके" ठरवत उत्तर दिलं आणि तिच्या हुशारीवर आम्हीही तिची पाठ थोपटली.

"हे बघ आत्मा कद्रु व्यक्तीचा असेल तर नैवेद्याची वाटी आणि एखाद्या दानशूर कर्णाचा असेल तर वाडगा ठेवावा लागेल" असा पीजे मारुन आम्ही त्या हुश्शार मैत्रिणीची हवा कमी केली.

"कोण तिघी बोट ठेवणार वाटीवर?" ह्या प्रश्नावर सगळ्यांची बोट मागे. मग मी आणि अजून दोघी तयार झालो एकदाच्या आणि गाडं पुढे सरकलं.

जिने माहिती दिली तिच्या विकिपेडीयावर विसंबून ती सांगेल त्या बरहुकूम "आवाहन केलं" ते करण्यापुर्वी बराच खल झाला कोणाला बोलवायचं ह्या गोष्टीवर.

"ए कोणा नातेवाईक आत्म्याला अजिबात नको हाऽऽ. गेला नाही इथून तर मला एकटीला तिकडे (करंगळी दाखवत) जाता नाही येणार रात्रीची" जिच्या घरात करत होतो ती सगळ्यात जास्त घाबरली होती.

"काही होत नाही ग. भूत बीत काही नसतं" मी म्हंटलं.

"ऑSS भूत नसतं? मग येणार कोSण प्लॅन्चेट वर?" तिने मलाच झापत विचारलं.

"आयला, हे पण बरोबर आहे. तेच तर चेक करायचय मला. हे खरं निघतं का?" मी तिला चिडवत म्हटलं खरं पण मनात जरा धाकधुक होतच होती.

मग शेवटी हा नको, ही नको असं करत करत "राजीव गांधी" ह्या नावावर एकमत होऊन त्याच्याच आत्म्याला बोलवायचं ठरलं. त्याचा अपमृत्यु झाला म्हणजे तो नक्कीच "भटकती आत्मा" असणार आणि त्याला जाऊन फार काळ लोटला नव्हता तेव्हा म्हणजे पुनर्जन्माच्या लाईन मधे त्याचा अर्ज पुढे सरकला नसणार. असं खासं लॉजिक लावून आम्ही त्या नावावर शिक्का मारला आणि तयारीला लागलो.

"आवाहन" आणि "प्रश्न" हे हिंदीत विचारायचे की मराठीत? ह्यावर पण बराच खल झाला. गाडी शेवटी आमच्या अत्यंत उच्चं हिंदी मुळे मराठीवरच आली. "आत्म्याला सगळ्याच भाषांचं ज्ञान असणार" असं जिने माहिती आणली त्या मैत्रिणीचं मौलिक मत होतं आणि आम्हाला काहीच माहिती नव्हती म्हणून ती म्हणेल ते खरं असं मानून चालण्यावाचून गत्यंतर नव्हतं.

आवाहन केलं. "आला असाल तर वाटी यस वर सरकवाल का?" हा प्रश्न विचारला आणि वातावरणात एकदम सन्नाटा छा गया. वाटी हळू हळू "यस" कडे सरकली. आमच्या तिघींचे ठोके समोरचीला पण ऐकू येतील इतपत मोठ्या मोठ्याने धकधकत होते. वाटीवर जे बोट ठेवलेलं त्याला चांगलाच घाम फुटला.

आपलं बोट ज्या वाटीवर आहे त्या वाटीखालील पोकळ भागात राजीव गांधींचा आत्मा येऊन बसलाय ह्या कल्पनेनेच घाम फुटला.

"प्रश्न विचार, प्रश्न विचार" जी मैत्रिण नुसतीच बघ्याच्या भुमिकेत होती तिने शांतता भंग करत पण तरिही दबक्या आवाजात म्हंटलं आणि पहिला प्रश्न आला "दहावीला किती टक्के मिळतील मला?"

हिने एखाद्या "पेपर तपासनीसाच्या आत्म्याला का नाही बोलावला?" असं त्या ही परिस्थीतीत वाटलं पण मी ते बोलून दाखवायची उर्मी मनातच दाबली. न जाणो वाटीखालच्या आत्म्याला राग यायचा मग.

तिला काय उत्तर मिळालं ते नाही आठवत. पण मग त्या नंतर प्रश्न विचारायला जरा धीटपणा आला. नेमके प्रश्न आठवत नाहित पण ते काहिसे त्या काळातल्या क्रशेस वर होते खरे.

नंतर मग आल्याबद्दल मंडळ आपलं आभारी आहे टाईपचं काहीतरी आभार प्रदर्शन करुन त्या आत्म्याला वाटीतून मुक्त केला.

"ए गेला असेल ना आत्मा परत? इथे माझ्या घरात नाही ना आता तो?" जिच्या घरात आम्ही हा उपद्व्याप केला तिची जाम म्हणजे जामच टरकीफाय झालेली.

"नाही गं, त्याला सवय महालाची तुझ्या वन रुम किचन मधे अडकून पडायला त्या आत्म्याला काय येड लागलय का?" आम्ही पुन्हा खास लॉजिक लावत तिची समजूत घातली.

"ए पण हे आपल्या पैकीच एकीने हलवलं नाही कशावरुन?" ह्या शंकेच्या निरसना करता पुन्हा एकदा आवाहन सांगता पार पाडली गेली.

अंदाज धपक्याने काही उत्तरं बरोबर आली काही नाही. कोणाचा त्यावर विश्वास बसत नव्हता पण जी आपल्या बाजूची उत्तर होती तिच्या करता त्यावर अविश्वास दाखवावा असंही वाटत नव्हतं.

आता पुन्हा त्यावर गप्पा मारताना, तो सगळा प्लॅन्चेट पट आठवताना फारसं काहीच वाटत नव्हतं. ना भिती, ना उत्सुकता, ना खरेखोटेपणा पडताळावा अशी इच्छा... काहीच नाही.

त्यावेळी ह्या प्लॅन्चेट खुळाच्या बरोबर जापनीज का चायनीज का कायशीशी प्रश्नावली पण फेमस होती. मनात प्रश्न धरुन काही टिंब काढायची का असंच काहीतरी होतं त्यात. नेमकं आठवत नाही पण मग आतल्या पानांवर अमुक कॉलम खाली तमुक रो मधलं उत्तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं काहीसं तिचं स्वरुप होतं. आणि हो दिवसाला एका प्रकारचा प्रश्न एकदाच विचारता येईल. तोच प्रश्न पुन्हा नाही विचारायचा. हा नियम पण भारी होता त्यातला.

नविन खेळण्याचा कंटाळा येईपर्यंत त्याच्याशी लहान मुलं खेळतं मग ते खेळणं माळ्यावर पडतं तितपतच त्यावर विश्वास बसला होता. आता आठवतही नाही फारसं काही पण अशा काही काही मजेशीर गोष्टींनी आठवणींचा एक कप्पा भरुन गेलाय हे त्याच्या प्रश्नामुळे जाणवलं इतकच, बाकी काहीच नाही.



आठवणींची रिळं - भाग ३ : प्रार्थना

मन खोल खोल डोह
त्याचा पडे मला मोह
जाते शोधाया मी थांग
मग आठवांच्या संग

ह्या डोहात डुबकी मारल्यावर जसे हलके फुलके, आनंदी थेंब हाती लागले तसेच काही वेगळे थेंबही ओंजळ भरुन गेले. आजचा हा प्रवास अशाच काही वेगळ्या क्षणांसोबत आईच्या शाळेपासून सुरु होणारा.

शांतीनगर झोपडपट्टीत आईची शाळा सुरु झाली आणि पहिल्या प्रथम समस्या उद्भवली ती जन्मदाखल्यांची. सगळ्याचीच बाळंतपणं घरी झालेली. कोणालाही नेमकी वेळ सोडा पण नेमका दिवस, तारिख वार ह्याचीही माहिती नाही. सगळ्यांची उत्तरं आपली "मोऽप पाऊस व्हता बगा" किंवा "लई थंडी व्हती", "आमोशा होती" अशा स्वरुपाची.

ह्या माहितीच्या आधारावर कोण ह्यांना जन्मदाखला देणार?

बरं जन्मदाखला नाही म्हणजे मग ह्यांना शिकवून म्युनसिपल स्कूल मधे भरती करण्याइतपत तयार जरी केले तरी तिथे अ‍ॅडमिशन कोण देणार?

बर्‍याच ठिकाणी चौकशी केल्यावर मग कळलं की वकिलाकडून रुपये २०० च्या स्टॅम्प पेपरवर अ‍ॅफिडेविट करुन घेतलं तर काम होण्यासारखं आहे. (चुकभुल द्यावी घ्यावी, मी ह्या विषयातली तज्ञ नाही आणि बरीच वर्ष मधे गेल्याने नोंदींच्या इमेज पण ब्लर झाल्यात. १९९१-९२ च्या आसपासची ही घटना आहे पण त्यावेळी तरी असं अ‍ॅफिडेविट करुन काम झाल्याचं पुसटसं स्मरतय)

पाऊलवाटेवर काटे असतात, वर चढणार्‍या किंवा चढू पहाणार्‍याला खाली खेचणारे खेकड्याच्या वृत्तीचे लोकही असतात. पण त्याच बरोबर मदतीचे हातही असतात. जरा शोध घ्यावा लागतो इतकच याचीही प्रचिती आली, जेव्हा असाच एक मदतीचा हात एका वकिलाच्या रुपाने मिळून त्या दाखल्यांचं काम मार्गी लागलं.

कामाचा हुरुप वाढला. हळू हळू सरकारच्या इतर काही योजनांचा लाभ तिथे देता यावा ह्या दृष्टिने प्रयत्न सुरु झाले.

मधे राजकीय उलथा पालथी झाल्या, काही वेदना देणाऱ्या घटना घडल्या. त्यातून बाहेर पडायला थोडा काळ जावा लागला. पण पुन्हा एकदा रोप लावलं गेलं.

सरकारकडून कमी दरात शिवण यंत्र मिळाली. त्यातून बायकांना ते तंत्र शिकवून स्वावलंबी बनवायचा प्रयत्न केला गेला. कुठे यश तर कुठे अपयश असं करत वाटचाल पुढे चालू राहिली.

सरकारी अधिकार्‍यांच्या "टेबला खालून" वृत्तीचा तिथल्या अपंग मुलांना "अपंगत्वाचा दाखला", "तीन चाकी सायकल" वगैरे मिळवून देताना इतका त्रास झाला की वाटलं ह्या भ्रष्टाचाराच्या चिखलात काहीही होऊ शकणार नाही.

आणि नेमकं असं हताश वाटताना त्या चिखलातच उगवलेल्या कमळांनी उभारी दिली.

सरकारच्या खिचडी योजनेसाठी मिळालेल्या तांदूळाच्या पोत्यांना शांतीनगरच्या शाळेत पाऊस लागून किड लागेल म्हणून घरी आणून ठेवल्यावर जेव्हा "बाईंनी तांदूळ पळवला." अशा स्वरुपाची तक्रार गेली तेव्हा ह्याच चिखलातल्या काही कमळांनी "बाई असं करुच शकत नाहीत. आम्ही प्रमाणपत्र द्यायला तयार आहोत" म्हणत बाजू राखली आणि काट्यां बरोबर ह्या फुलांचाही सहवास मिळण्याचं भाग्य लाभलं.

पुढे नेहमीप्रमाणे आईने तिच्या सवयीने, ती शाळा कोणा दुसर्‍या हातात सोपवली.

आजही तिथली परिस्थिती फारशी वेगळी आहे अशातला भाग नाही. आजही काही प्रमाणात "होल वावर इज अवर" ही मेंट्यालिटी दिसते. शाळेत आलेल्या आणि शिकलेल्या सगळ्याच मुलांमधे बदल घडलाय असंही नाही.

पण त्यांच्यातलीच एक "आशा" आज स्वतःच्या गुणवत्तेच्या जोरावर नर्सिंगचा कोर्स करुन स्वतःच्या पायावर उभी राहिलेय. तिची मुलं तर नक्कीच अजून एक पाऊल पुढे जातील.

अपंग अनिसला अपंगत्वाचा दाखला नोकरी मिळवून द्यायला किंवा बुथ उभारायला पुरेसा ठरला नसला तरी तीन चाकी सायकलने त्याचं परावलंबित्व तरी कमी केलय.

आजही राजकारण, दारु, इतर नशा ह्यांचा वावर तिथे जाणवतो पण ज्यांना ह्यातून बाहेर पडायचय त्यांना त्या पहिल्या पावलाने निश्चितच मदत झालेय.

आत्ता हे आठवायचं कारण म्हणजे हळू हळू करत आईने पसारा आवरायला घेतलाय. झेपत होतं तोपर्यंत जवळ्च्या म्युनिसिपल शाळेतल्या मुलींना जादाची शिकवणी सेवा विनामुल्य देवून झाली. आता मात्र आई थकलेय, मनाने नाही तरी शरीराने. पण मला काही हा हात पुर्णपणे माझ्या हातात घेणं शक्य नाही. परिस्थिती मुळे नव्हे, तर स्वभावामुळे. माझ्यात तिच्यासारखा "त्या" क्षेत्रात झोकून देणारा जीन आलेला नाही.

म्हणजे आत्ता आत्ता पर्यंत तर मला वाटत होतं की "लष्कराच्या भाकऱ्या" वाले जेनेटीक ट्रेट्स माझ्यात अजिबातच आलेले नाहीत.

माझं पोट भरलं, माझ्या घरच्यांचही भरलं मग उरलेल्या भाकरीचं करायचं काय? हा प्रश्न एक दिवस पडला. तो सोडवायला "देऊ की कोणा गरजूला" हा विचार हळुच डोकं काढून वर आला.

त्यातून मग डोनेशन देणं, कुणाच्या शाळेची फी भरणं, कुठे अंध अपंगांच्या ट्रेककरता स्वयंसेवक जमव, अनाथालयात जाऊन वाढदिवस साजरा कर इतपत प्रवास सुरु झाला.

पण त्यात आईसारखं झोकून देणं नव्हतं. माझा परीघ सुरक्षीत ठेवून मग केलेली ती मदत होती.

ती शेवटी मदत होती, तिच्यासारखं त्यात मिसळून जाणं नव्हतं.

त्याची टोचणी मनाला लागली, तरी प्रत्येकालाच ते जमेल असं नाही हे ही उमगत गेलं. प्रत्येकाचे मार्ग वेगळे हे समजून घेता घेता हे देखील कळलं की प्रत्येकाच्या कक्षाही वेगळ्या. ज्याच्या त्याच्या कक्षेत केला गेलेला "लष्कराच्या भाकऱ्या” थापायचा आनंद बाकी सेमच तो ही अर्थातच ज्याच्या त्याच्या पुरताच.

तिने व्यवहार महत्वाचा मानला नाही. पण आज मला जर व्यवहार देखील त्याच्या त्याच्या जागी योग्य वाटतो तर त्यात ना ती चूक ठरत ना मी. स्वत:शी प्रामाणिक राहून बॅलन्स साधायला जमलं किंवा तसं वाटलं जरी तरी झालं अजून काय हवंय.

माणुस मुळातच स्वार्थी प्राणी. तिने जे केलं ते "तिचं समाधान" ह्या स्वार्था साठी आणि मी जे करतेय किंवा करु पहातेय ते ही माझ्या स्वार्थासाठी "माझ्या आतल्या त्या जीनच्या टोचणी" साठी.

मागे वळून पहाताना आज ती समाधानी आहे. तिला तिचा मार्ग मिळाला आणि समाधानही, तसाच माझा मार्ग मला मिळो हीच बाप्पाकडे प्रार्थना .....

एक विनवणी करिते मी देवा
सोहळा जन्माचा सार्थ होवो



हेच मागणे त्याच्याकडे. बाकी काहीच नाही


३ टिप्पण्या: