शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २००९

सोबत

सात जन्मासाठी सोबत
मला तरी मान्य नाही
आठव्या जन्मी तुझ नसण
मला पटु शकत नाही

जन्मजन्माचे बंध बांध
बांधणारच असशील जर
सोबतीने वाट चाल
चालणारच असशील तर

मधेच हरवून गेले जरी
परत परत फ़िरुन येईन
आठवणींची सावली माझ्या
तुझ्यापाशीच ठेवुन जाईन

घड्याळ

दर सोमवारी मी
हाताला घड्याळ बांधतो
आठवडाभरासाठी मी
त्याच्याशी नाळ बांधतो

एकदा घड्याळ बांधले की
काट्यांचा मी गुलाम होतो
प्रियेशी बोलतानाही
मी काट्यांचे भान राखतो

वर्ष अशीच निघुन जातात
काट्याबरोबर पळत जातात
दिवसेंदिवस घड्याळाशी
नाते गडद करत जातात

एक दिवस अचानक
सेल संपतो घड्याळ थांबत
घड्याळाचा गुलाम मग
धडधडणही विसरुन जातो

हळू हळू सावरतो
काट्यांशिवाय जगु लागतो
घरात छोटा गुलाम मात्र
हाती घड्याळ बांधु लागतो

परत एकदा सोमवार येतो
परत एकदा घड्याळ येत
टिकटिक टिकटिक धडधड धडधड
पिढ्यान पिढ्या चालू रहात

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २००९

लग्न, सल्ले आणि मी

माझ लग्न ठरल आणि तुम्हाला सांगते एक एक कौन्सलर जाता येता फ़ुकटच कौन्सिलींग करु लागला. तुला सांगते निमे "ह्या पुरुषांना ना पहील्या पासुन असं (इथे माझ्या हतातली रद्दी दोर्‍याने बांधुन दाखवत) मुसक्या बांधुन ठेवल पाहीजे." इथ पासुन ते "संपल ग बाई तुझ स्वातंत्र्य, (एक दोन हुंदके देऊन) अगदी कसाया कडे बांधलेल्या बकरी कडे बघाव तस माझ्या कडे बघत, बाईचा जन्मच बाई असा" पर्यंत सगळ काही व्हायचं.

अहो बाकीचे जाऊदे, आमच्य़ा कामवालीने पण "ताई आत्ताच सांगुन ठेवतो तुमास्नी, बाप्या म्ह्टला की आलच हे!(इथे आचमन आणी नाकाकडे अंगुलीदर्शन करुन) मला घाबरवुन सोडल.

म्हंटल आता होणारच आहे लग्न तर कळेलच हळु हळु कोणता कौन्सलर खरा ते!

लग्ना नंतरची गोष्ट (लगेच असे डोळे मोठे करुन बघु नका माझ्याकडे) ह्याच्या एका मित्राने आम्हाला घरी बोलवून पार्टी दिली, नव्या नवरीला प्रथम घरी आल्यावर काहीतरी भेट देण्याची आपल्याकडे प्रथा आहे. त्याप्रमाणे त्या मित्राच्या आईने मला कुंकु लावुन एक भेट दिली कागदात गुंडाळलेली. म्हंटल असेल एखादा शोपीस किंवा तत्सम गोष्ट, त्याच्या लग्नात डबल आलेली !(नाही आत्ता पर्यंतचा अनुभव असाच होता म्हणुन आपल वाटल).

घरी येऊन बघते तो काय, ते होत एक पुस्तक "मेन आर फ़्रॉम मार्स एन्ड वुमन आर फ़्रॉम व्हिनस" पहील्या पानावर (सु) वाच्य अक्षरात लिहील होत "नव दांपत्यास सहजीवनाची वाटचाल सुरळीत होण्यास"

अरे कर्मा, इथे पण कौन्सलर? काही हरकत नाही, बघु तरी काय म्हंणतय हे पुस्तक म्हणत मी थोड झोपत- वाचत, थोड वाचत-झोपत बघत होते काय काय लिहीलय ते.

पुर्ण कसली वाचतेय. पण मग एक चाळाच लागला, त्यात वाचायच आणि ह्याच्या वागण्याकडे लक्ष द्यायच. तो टिव्ही बघायला लागला उशीरा पर्यंत तर मग म्हनायच "हम्म पुस्तकातल्या प्रमाणे तो त्याच्या कोषात गेला" मग पानं उलटायची "आपाण काय करायच अशावेळी ते बघायला"

वाचून झाल्यावर कळायच कप्पाळ "आज डे नाईट मॅच आहे, कसला कोष अन कसल काय, क्रिकेट म्हंटल्यावर सगळेच जातात क्रिकेट-कोषात" उग्गाच वाचायचा वेळ फ़ुक्कट गेला माझा. तरी पुढ्च्या वेळी तसच व्हायच, मी भिंग घेऊन त्याला पुस्तकाशी पडताळायला जायचे आणि न होणार भांडण व्हायच. अरे म्हंटलं भांडण टाळण्यासाठी हे पुस्तक, आणि त्यावरुनच भांडणं? शेवटी पुस्तक टाकल बांधुन नी ठेवलं माळ्यावर तेव्हा संपली भांडणं. म्हंटल तो "जॉन ग्रे" त्या पुस्तकाचा लेखक हो, तो पडला फ़ॉरेनर, त्याला काय कप्पाळ कळणार ईंडीयन नवरे?

असो तर आता आमचे लग्नाचे ६ महीने निर्धोक म्हणजे सल्ल्यांकडे दुर्लक्ष करुन पार पडले आणि मग काय झालं, सलग ४-५ दिवस आपलं नवरोबांच उशीरा घरी येण सुरु झालं. आधी प्रेमाने विचारुन मग थोड रुसून बघीतल पण छ्या पालथ्या घड्यावर पाणी, पुन्हा आपलं आहेच उशीर आणी उशीर वर मखलाशी काय तर म्हणे डेडलाईन आहे कामाची. असेलही तसच पण तो सल्ल्याचा भूंगा होता ना, तो कानात गुण्गुणायला लागला पहीले कामवालीच वाक्य आठवलं "ताई आत्ताच सांगून ठेवतो तुमास्नी, बाप्या म्हटल की "हे" आलच" .अरे बापरे आता काय करायच?

मी प्रथम वास येतोय का बघीतल तोंडाला. नाही तसा वास तर वाटत नव्हता. चला म्हणजे "हे आलच" मधली पहीली शंका तर फ़िटली म्हणायची. आता त्या "हे" आलच मधल्या दुसर्‍या शंकेच काय? ते कसं कळणार?

मग हळूच त्याचा खिसा, पाकीट तपासून बघीतलं. तर काय? त्यात एक बील होतं! तेही एका साडीचं. साडी? कोणासाठी? मला तर नाही दिली. दोन दिवस वाट बघीतली देईल म्हणून, आडून आडून विचारुन बघीतलं पण छ्या, काही ताकास तूर लागू देत नव्हती स्वारी.

मला तर रडूच आलं. लग्गेच दुसरा भूंगा कानात गुणगुणला "बाईचा जन्मच ग असा, अगदी अगदी कसायाकडच्या बकरी पर्यंत सगळ ऐकू आलं". तो आवाज जातो तोच दुसर्‍या कानात आवाज आला "ह्या पुरुषांना पहील्या पासूनच मुसक्या बांधून ठेवल पाहीजे"

हम्म तिनही कौन्सलर खरेच म्हणायचे!

आज आम्ही एकमेकांना भेटलो तो दिवस, म्हणजे चहा पोह्याचा तो दिवस, पण आजही हा उशीराच येणार होता, लक्षातही नव्हतं त्याला. मी हे आणि अशाच विचारात होते तेव्हढ्यात बेल वाजली. माझी मैत्रिण "सखी" (सखी तिच नाव आहे हो) होती दारात. आल्या आल्याच तिने जाहीर करुन टाकलं "आज मी तुला घेऊन जायला आले आहे, मस्त व्याख्यान आहे रिलेशनशिप वर आणि मुख्य म्हणजे फ़्रि पासेस आहेत नी आमचे हे बाहेरगावी गेलेत" अच्छा म्हणजे तिच्या ह्यांच्या रिक्त जागी सध्या माझी वर्णी आहे तर. काही हरकत नाही, नाहीतरी आमचेही नवरोबा आज लेटच येणार आहेत तर जाव म्हणते पैसे थोडीच पडणारेत मला असा विचार करुन आवरुन निघाले तिच्या बरोबर.

जाताना तिच्या हातातल्या त्या कार्यक्रमाच्या जाहीरातितलाच वरचा भाग कापून मागच्या कोर्‍या भागात निरोप लिहून ठेवला "मी बाहेर जातेय, यायला उशीर होईल, काळजी नसावी. तुझी निमा"

त्यातल्या तुझी वर सखीने टवाळकी केल्यावर ते खोडून टाकलं आणी कुलूप लाऊन आम्ही व्याख्यानाला पोहोचलो.

तिथे पोहोचलो तर सगळी कडे "सुखी संसाराचे सार" "दांपत्य जीवन" वगैरे जड जड शब्दातले सुविचार, तक्ते टांगलेले. मी म्हणाले पण सखीला, सखे सार वरुन आठवल आज ह्याच्यावर चिडून मी टोमॅटो सार चा बेत कॅन्सल केला बघ" तिने हातानेच दाबत कुठेपण काहीपण आठवत तुला अस म्हणत मला एका कौन्टरवर नेलं. तिथे पाहीलं तर काय जागात असतील नसतील तेव्हढी पुस्तक अगदी अगदी त्या तक्त्यांना शोभतील अशी विकण्यास उपलब्ध होती. मला मात्र आठवलं "मेन आर फ़्रॉम..., कोष.., भिंग आणि माळा".

तितक्यात भाषणाला सुरुवात झाली आणि मी आवरुन (म्हणजे माझे विचार आवरून) सावरून बसले ऐकायला.

पहीलच वाक्य "तुम्हाला असं वाटतं का, की तुमची जोडीदाराची निवड चुकली म्हणून?" आयला! सटकन तोंडातून शिवी सटकली, कॉलेजची खोड काय करणार. म्हंटलं खल्लास विकेट एकेदम! माझी नव्हे मला अजून अस वाटतय का हे समजायला पण वेळ नाही! तर बाकीच्यांची म्हंटल मी, सगळे माना डोलवत होते.

मग तो पुढे बरच काही सांगत होता, प्रेमाच्य़ा वेगवेगळ्या स्टेजेस का काहीस अबोध वगैरे. प्रथम काय तर म्हणे आपण प्रेमात पडतो "धप्प" म्हणजे "वुई लिटरली स्वेप्ट ऑफ़ .. वगैरे वगैरे"

अरे बापरे! एकदा ह्याच्याच बायकोला भेटून विचारल पाहीजे आत्ता ह्यांच प्रेम कोणत्या स्टेजला आहे ते! श्शी काय बोअर होतय सखे, चल सटकूया इथून ब्रेक संपायच्या आत. नाहीतरी हे सगळ इथुन तिथुन येतच असतं ग अंगावर कधी नेट मधून, कधी इमेल मधून. मी गळ घालताच दोघी निघालो बाहेर. बाहेर मस्त भेळ आणि मस्तानी आयस्क्रीमवर ताव मारुन व्याख्यानाचा "दि एन्ड" करुन घरी परतले सखीला कटवून. हो तिचा नवरा आहे सध्या बाहेरगावी, ये म्हणता येऊन ठोकेल मुक्काम माझ्याच घरी!

घरी येऊन बघते तो काय? माझ नवरा एव्हढासा चेहरा करून माझ्या निरोपाचा कागद उलट सुलट करुन बघत होता. मी गेल्या गेल्या माझा हात हातात घेऊन मला विचारतो "निमु खरच तुला अस वाटतं का ग?"

मला तर आधी काहीच कळेना, मग त्याच्या हातातला तो निरोपाचा कागद घेतला तेव्हा कळलं त्यावर व्याख्यानाच्या जाहीरातीच फ़क्त एकच वाक्य होत "तुमची निवड चुकली तर नाही ना? येऊन भेटा!"

अछ्छा! तर हे कारण आहे होय गोगलगाय होण्याच! बिच्चारा, सगळे कौन्सलर दाराच्या बाहेर घालवुन दिले अगदी त्या जाहीरातीलाही टोपली दाखवली, आणी हो त्याने नुकतीच सरप्राईज़ गिफ़्ट दिलेली "ती" साडी नेसुन बाहेर पडले त्याच्याबरोबर पुर्ण चंद्र बघायला.

खरतर माझी गोष्ट इथेच संपली पण म्हणतात ना, सल्ले घ्यायचे थांबवले तरी द्यायची खोड काही जात नाही. त्यातलाच प्रकार. आहो आता मी सुद्धा तेच करायला लागले. स्वातीचा लग्न ठरलं सांगायला फ़ोन आला तशी तिला म्हंटल मी" हे बघ स्वाते, तुला सगळे वेगवेगळे सल्ले देतील, पुस्तकं देतील, इमेल पण करतील. पण लक्षात ठेव ऐकावे जनाचे करावे मनाचे. शेवटी आपल मनच खर. अग माणूस कळायला पुस्तक, इमेल नाही तर माणूस वाचायची गरज आहे. तेव्हा वाचणारच असशील तर माणूस वाच बाकी काही नको"

(टीप: इथे इमेल पाठवणार्‍या, पुस्तकं लिहीणार्‍या सगळ्यांच्या सद-हेतु बद्दल मुळीच शंका नाही. फ़क्त कधी कधी माणूस ह्या सगळ्या टेक्निकच्या भानगडीत अडकून पडतो आणी मुळ टेक्निक कशासाठी हेच विसरतो. तर असो हा देखील एक सल्ला "ऐकावे जनाचे... पद्धतीने ऐकावा झाले)

बुधवार, १८ फेब्रुवारी, २००९

देवबाप्पाला पत्र

प्रिय देवबाप्पा उर्फ़ एक शक्ति,

काल सहस्त्रावर्तन होत घरी. खुप छान प्रसन्न वाटत होत. पण तरीही मनात काही प्रश्न उठतच होते. हे माझ नेहमीचच आहे म्हणा. मला धड ठरवता येतच नाही कधी, मी आस्तीक आहे की नास्तिक ते.

नस्तिक म्हणाव तर मला ही पुजा, पुजा म्हणण्यापेक्षा त्याबरोबर येणारी प्रसन्नता खुप आवडते. तुझ्या नामस्मरणाने मिळणारी शांती लोभावते.

पण तरीही प्रश्न पडतो, देवा तुझी इतकी वेगवेगळी नाव रुप पण तू नक्की कसा आणि कोण?

फ़क्त पुजा, नामस्मरण मनाला प्रसन्नता देत ह्या एका कारणासठी मी मला अस्तिक म्हणाव तर तुझ्या पुजेतले, कहाण्यांमधले सगळेच्या सगळे नाही पटत मनाला.

सगळ्या गोष्टींचा कर्ता करवीता तुच आहेस, तुझ्या ईच्छेशीवाय झाडाच एक पान देखील हलत नाही अस माझी एक काकू म्हणत होती त्या दिवशी. पुढे ती असही म्हणाली, की कालच्या आख्यानात बुवांनी सांगीतल तुमची पुण्य कर्म तुम्हाला चांगली फ़ळ देतात. तिला म्हंटल तुझी दोन्ही वाक्य परस्पर विरोधी नाहीत काय? जर तोच कर्ता करविता असेल तर आपली अशी काय राहीली कर्म, तोच करवुन घेणारा सगळे काही आणि मग जगात चांगल्या बरोबर जे जे वाईट घडत त्याचीपण जबाबदारी देवावरच टाकावी लागेल. आणि जर तुझा पुण्य कर्म वाला कन्सेप्ट खरा असेल तर "तो" सगळ्याचा कर्ता करविता कसा?

त्याबरोबर मला माझ्या नसलेल्या नस्तिक पणावरुन ऐकाव लागल. माझा इथेच तर गोंधळ होतो देवा! मला तुझ अस्तित्व एक शक्ति म्हणून मान्य, एकदम मान्य. पण सगळ करणारा तुच हे नाही पटत मला. सगळ पटत नाही म्हणून मी अस्तिक वाल्यांच्या गटात पण सामावत नाही. आणि तुझ अस्तित्व मन नाकारत नाही म्हणून नस्तिक वाले देखील मला त्यांच्यातली मानत नाहीत. मनाला प्रसन्नता मिळते म्हणून मी पुजा करते, हात जोडते. पण त्यापलीकडे जाऊन खुप वेळ देऊन काही करावस वाटत नाही, त्यापेक्षा गरजवंताला मदत केलेली जास्त पटते.

अधली मधली त्रिशंकू अवस्था झालेय माझी.

आता सानिका, माझी मुलगी पण मला प्रश्न विचारायला लागलेय तुझ्याबद्दल. काय सांगु तिला?

तुझ्या उत्तराची वाट बघतेय. पत्ता नाही ठावुक. पण तु सर्व व्यापी आहेस म्हणजे, तसही तुला मिळेलच माझ पत्र.

काही उण दुण झाल असेल तर क्षमस्व.


--

एक शंकेखोर आई.


त्यावर मला आलेल उत्तर


तुझ पत्र मिळाल. बाळा जरा विचार केलास तर कळेल त्याची उत्तरही तुझ्याकडेच आहेत. माझी वेग वेगळी रुप, त्या कहाण्या ह्या तुम्हीच तुमच्यासाठी रचलेल्या आहेत. त्या एक भाव आहेत बस इतकच. त्यापलीकडेही मी आहेच.

ह्या कहाण्या, ही रुप हा एक मार्ग झाला पण तो एकच मार्ग आहे अस नाही. प्रत्येकाने ज्याचा त्याचा मार्ग निवडला आणी प्रत्येक वेळी मला एक एक नवीन रुप मिळाले.

शेवटी मी म्हणजे तरी काय? एक सत्य. आणि सत्य हिच एक शक्ती होय. २+२ = ४ तसच ३+१ =४ आणी ५-१ देखील चारच. तू मार्ग कोणताही ठरव ऊत्तर एकच "सत्य" असेल.

बर झाल तू पत्र लिहिलस ते, मलाही तुला सांगायचच होत की माणसांनी मला वेगवेगळी रुप दिली ती एक त्यांची वाट होती सत्यापर्यंत पोहोचण्याची पण आता सगळे वाटेलाच मुक्काम समजू लागलेत आणि माझ्या नावाने भांडू लागलेत.

मी कसा दिसतो अस विचारलस म्हणून सांगतो तुझ्या बाळाच्या शांत झोपलेल्या चेहेर्‍यावरच्या भावासारखा दिसतो (आता तुझ्या सोई साठी मी सांगतो म्हंटल, तू जर कशी दिसतेस विचारल असतस तर मी सांगते म्हंटल असत. कारण सत्य निर्गूण निराकार असत, तसच सत्य पुलींग / स्त्रिलींग अस नसत)

तु फ़क्त एकदा स्वत:मधे बघ. आस्तिक - नास्तिक हे तुमच्या सोइसाठी,मला विचारशील तर तुझी कर्म माझ्या दॄष्टीने महत्वाची. शेवटी भाव महत्वाचा मग तो पुजेत असो किंवा एखाद्याला मदत करण्यात असो. तू तुझी वाट निवड, तुझी लेक आपोआपच तिची वाट निवडेल. तुमच्या सोबत मी आहेच.

तुझा
देवबाप्पा / एक शक्ति/ एक सत्य (नाव काहीही दे)

चक्र/ वर्तुळ - भाग २

भ्भोऽऽऽ! मी एकदम दचकलेच. कसला विचार करत होतीस ग आई, माझ्या गळ्यात पडत मनू म्हणाली. काही नाही ग, उद्या बाबांचा वाढदिवस आहे ना, अनायसे रविवार आहे तर विचारच करत होते जेवायला काय करु खास.

बाकी तू काही पण कर आई, मला खीर हवीच हा!

दरवेळी खीर म्हंटल की मला ६ महीन्यापुर्वी आई येऊन गेली तोच दिवस हटकून आठवतो. किती हलक वाटल होत तिच्याशी बोलून. मनूचा पण हट्टीपणा जरा कमीच झालाय तेव्हा पासुन, का माझा सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा चष्मा बदललाय म्हणुन मलाच अस वाटतय देव जाणे.

गेल्या महीन्यात हाताला फ़्रॅक्चर होऊन पडले, तर किती धावपळ केली पोरीनी. त्यातच परीक्षा जवळ आली होती. मलाच अपराधी वाटत होत तिला अभ्यास सोडून हे सगळ बघाव लागत होत म्हणुन.

शेखरनी लगेच बोलून दाखवलच, काम करत नव्हती तरी भूणभूणत होतीस आणि आता करतेय मनापासुन तर का रडतेयस? मी म्हंटलपण त्याला असुदे तुला नाही कळायच.तेव्हा पासुन किती जपते ती मला.

आऽऽऽई! अग कुठे हरवलीस? बर नाही वाटतय का तुला? दुध ऊतु जाणार होत आत्ता.

नाही ग ठीक आहे की, मी ओशाळवाण हसत म्हंटल.

बर, आई आज कोणती साडी नेसणार आहेस. तुला लक्षात आहे ना, आज माझ्या शाळेत बक्षीस समारंभ आहे ते.

आणि तुला वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस आहे, मी वाक्य पुर्ण केल. मनू, पण अजून पर्यंत तू मला म्हणून नाही दाखवलस ह तुझ भाषण, फ़क्त बाबाशी काय ते चालू होत गुलुगुलु, मी नाराजीच्या सुरात म्हंटल.

मॉम्स! काय ग, आज कळेलच ना, मला पाहुण्यांसमोर म्हणायला सांगितलय हेड बाईंनी. ते वेगळ ग, मी म्हंटल तर माझे दोन्ही गाल पकडून म्हणाली सरप्राऽऽऽऽईझ, ओ.के.

ओ.के तर ओ.के, बर चला आवरुन घेऊ पट पट मग ऊशीर नको. मला सगळ्यात पुढच्या रांगेतून बघायचय तुला. मी विषय संपवत म्हंटल.

आई तू ना ही साडी नेस, मस्त दिसते एकदम. आणि ते बाबांनी आणलेले कानातले घाल अमेरीकन डायमंडसचे. चल ग! काय मी चिफ़ गेस्ट आहे? आई प्लीऽऽऽज, ती मधाळ आवाजात म्हणाली.

हो नाही करता करता मी तिच्या सांगण्या प्रमाणे तयार झाले. वॉव मॉम्स! एकदम फ़टाका. मनू वात्रट पणा पुरे ह, तू आईशी बोलतेयस.

येस बॉस, आता निघूया ती म्हणाली.

शाळेत लवकरच पोहोचलो, अगदी स्टेजच्या समोरची जागा पकडुन बसले. मनू आत पळाली तिच्या ग्रुप बरोबर. नेहमी प्रमाणे ५ चा कार्यक्रम ५.३० पर्यंत सुरु झाला. माझ लक्ष सगळ तिच्या एन्ट्रीकडे होत, खरतर इतरांचे प्रोग्रॅम मी ऐकायला हवे होते, म्हणजे ऐकायचेच होते मला पण सगळा १४ वर्षांचा पट डोळ्यापुढून हलेल तर ना! माझ मन तिथेच रेंगाळत होत त्या १४ वर्षांमधे.

तेव्हढ्यात निवेदीकेने घोषीत केल, आता आपल्या पुढे इयत्ता ९ वी ची विद्यार्थीनी "मानसी गोखले"..........

निवेदीका त्यापुढे त्या स्पर्धेविषयी अस काही बाही ३-४ वाक्य बोलली, पण माझ्या कुठे कानात शिरायला. डोळे आधीच भरले होते, समोर माझ्या चिमुरडीला बघून. तुम्ही हसलात ना "चिमुरडी" शब्दाला! हसा, पण मला तर अजुनही बर्‍याचदा शाळेच्या पहील्या दिवशी माझ बोट धरुन जाणारी मनु आठवते.

हॅलो!हॅलो! माईक टेस्टींग झाल आणि भाषणाला सुरुवात झाली

आदरणीय गुरुजन, इथे जमलेले सर्वजण आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला माझ्या सर्वात जिवलग मैत्रिणी विषयी सांगणार आहे. सर्वात जवळची अस जरी मी म्हंटल असल ना तरी मला "तिची" अशी काहीच माहीती नाही. ना मी तिचा सर्वात आवडता रंग सांगू शकत, ना आवडता छंद. एव्हढच काय तिचा असा खास आवडीचा एखादा रंग, पदार्थ अस काही आहे का हे देखील मी नाही सांगू शकत.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, जर मला एव्हढे देखील माहीत नाही तिच्याविषयी, तर ती माझी जवळची मैत्रीण कशी काय?

तुमचा प्रश्न चुकीचा नाही पण खरच आहे तस. ती मला आवडते पण तिला काय आवडत ते नाही माहीत मला. कारण आत्ता पर्यंत आमच्या आवडीचे तेच तिच्याही हेच बघत आलेय मी. कोड्यात नाही ठेवत फ़ार, तर अशी आहे माझी मैत्रीण, माझी आई.

आमचे सगळ्य़ांचे सगळे कार्यक्रम लक्षात ठेवणारी. आमचे वाढदिवस, आमच्या परीक्षा, आमची आजारपण सगळ सगळ माहीत असलेली. मी न सांगताच मनातल ओळखणारी माझी मैत्रीण.

तिला माझ्या विषयी सगळ ठाऊक आहे. माझी आवड, माझी नावड, माझे छंद, माझ्या मैत्रीणी, सगळ सगळ माहीत आहे. पण मला काय काय माहीत आहे तिच्याविषयी? तिच नाव, शिक्षण, तिचा वाढदिवस, आणी हो तिला पुरण पोळी खूप छान येते हे की ती मेहंदी खूप छान काढते ते? बस एव्हढेच?

काय आवडत तिला? कधी विचारलच नाही. नवीन गाणी कशी ग लक्षात रहात नाहीत म्हणून खिल्ली उडवली तिची, पण तिला कोणती गाणी आवडतात कधी विचारलच नाही.

आमच्या साठी ती नवीन नवीन पदार्थ शिकली, पण तिच्या आवडीच्या एका पदर्थाच पण नाव नाही विचारल कधी.

आई सारखे दैवत सार्‍या जगतावर नाही सारख्या कविता आणि स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी सारखे आईची महती सांगणारे सुविचार खुप असतील, पण तिला एक "व्यक्ती" म्हणुन समजुन घेणारे लेख अगदीच हाताच्या बोटावर मोजणारे असतील.

माझी आई मला प्रिय आहेच, पण आता मला तिची खरी खुरी मैत्रीण व्हायचय. एक व्यक्ती म्हणुन तिला जाणून घ्यायचय. पुढच्यावेळी जेव्हा ह्या माझ्या मैत्रीणी विषयी सांगायची वेळ येईल तेव्हा मी खात्रीने तिच्याविषयी सांगू शकेन. तसा प्रयत्न तरी मी निश्चीत करेन. आणि मला खात्री आहे तुम्ही देखील असेच कराल.

एव्हढ बोलून मी आपली रजा घेते धन्यवाद.

भाषण संपल. टाळ्या वाजत होत्या. पण मला कुठे भान होत. माझे डोळे तर केव्हाच वहायला लागले होते. अगदी समोरच असलेली मनू पण मला धुरकट दिसत होती.

एव्हढ मोठ कधी झाल माझ बाळ? आई तू हवी होतीस ग इथे ऐकायला. तू म्हणाली होतीस "नमू, तिच्यात तुझ्यातली १४ वर्षाची निमा शोध"

नाही ग आई, ही निमा पण १४ व्या वर्षी एव्हढा विचार करत नव्हती.

चक्र / वर्तूळ (भाग-१)

चला निमाबाई उठायला हव आता. घड्याळानी ६.३० वाजल्याच जाहीर करताच मी मनाशीच म्हंटल. आज खरतर रविवार, मस्त लोळत पडाव अजुन थोडावेळ! एरव्ही ऑफ़िस म्हणुन असतेच सकाळची घाई. नुसती घड्याळ्याच्या काट्यांशी स्पर्धा. पण आज उठण भागच होत, एकतर आई येतेय रहायला आणि हो मनुचा म्हणजे आमच्या मानसीचा क्लास आहे डान्सचा. गुरुपोर्णिमा जवळ आलेय ना, त्याची तयारी चालु आहे.

क्लास आहे ९.३० चा म्हणजे त्या आधी सगळ आवरुन काहीतरी खायला करायला हव. मग बाईसाहेब ८ पर्यंत उठणार त्यापुढे नहाणार, तिच्या समोर म्हंटला ना हा शब्द नहाणार तर ओरडेलच अंगावर "श्शी आई नहाणार काय म्हणतेस ग कित्ती ऑर्थो वाटत, शॅम्पू करणार म्हण ना! शॅम्पू सो कूल ना मॉम्स!" मग मी म्हणणार बर बाई राणू शॅम्पू तर शॅम्पू चला आटपा लवकर. एकीकडे मनात हे सगळे संवाद चालु होते आणि हात भराभर काम करत होते. सगळ आटपुन अंघोळ करुन पुजा करुन किचन मधे आले तेव्हा ७.३० वाजुन गेले होते.

सासुबाई होत्या तेव्हा त्याच करायच्या पुजा. त्यांची पुजा म्हणजे बघत रहावी एकदम साग्रसंगीत. गंध वगैरे उगाळुन अगदी अर्धा अर्धा तास चालायची पुजा. बघा अस होत आजकाल, किचन मधे आले कशा साठी ब्रेकफ़ास्ट तयार करायला आणि हरवले पुजा आणि सासुबाईंच्या विचारात. ब्रेकफ़ास्ट काय करु? मोट्ठा गहन प्रश्नच जणू. रविवार एकच दिवस मिळतो व्यवस्थीत ब्रेकफ़ास्ट करायला. पण माझ गाड तिथपासूनच अडत. गेल्या वर्षी पर्यंत ठीक होत उपमा, पोहे कधी कधी इडली, डोसा असा बेत केला तरी गाडी खूश असायची मनुची पण आता "श्शी काय ग हे नेहमीचच तू पिझ्झा का नाही ग करत, नाहीतर समोसा, चाट आयटम एकदम फ़ंडू लागत" हे ऐकाव लागत. आता हे फ़ंडू काय ते तिलाच माहीत. आज तिच्या आवडीच सॅंडवीच करायच ठरवल आणि कमाला लागले. तयारी करुन तिला उठवे पर्यन्त ८ वाजुन गेले मधेच ह्याच मला चहा मिळेल का? म्हणुन पेपर वाचत वाचत पालुपद चालु होतच. त्यातच इस्त्रिवाला, कचरेवाला येवुन गेला.

मनु चल भरभर आवर बाळा आणि खावुन घे पटपट. ती ढीम्म . मग दुसर्‍यांदा तिसर्‍यांदा सांगतागणिक मझा स्वर टिपेला जात होता. ती मात्र शांतपणे केस सेट करण्यात मग्न. मग मझा पाराच चढला. मनु! मी ओरडलेच. तुला सांगितलना लवकर आटप आणि ते केस काय विंचरत बसलेयस चेंगटा सारखी चार तास.क्लास ह्यांचा आणि काळज्या आम्हालाच.

खायला काय आहे? इती शेखर माझा नवरोबा. मेन्युकार्ड ठेवलय महाराज आपण ऑर्डर करावी. माझा मूड लक्षात घेऊन तो हॉल मधे पसार झाला. ह्याच ठीक आहे. उठायच, पेपर वाचत चहापीत रविवार साजरा करायचा. मनूच्या वागण्या विषयी तक्रार केली की हसून माझीच समजूत काढायची.

मनु आवर लवकर, मॉम्स बघ ना तेल गेलच नाही केसाच आज. श्शी किती चिपकू वाटतायत केस. अग चांगले तर आहेत मी म्हंटल आणि उद्या पुन्हा शॅम्पू कर ह बिट्टो. मी लक्षात ठेवुन शॅम्पू शब्द युज केला नाहीतर पुन्हा नेहमीचि उजळणी झाली असती माझ्या ऑर्थो असण्याची. उद्या काय ग मॉम्स! तिच्या स्वरात दुखावले पण आणि ह्या आईला कहीएक कळत नाही असा भाव होता. आणि मला सारख सारख बिट्टो नको म्हणूस लहान आहे का मी आता, माझ्या मैत्रिणी पण चिडवतात मला मग.

बर बाई राहील मी समजुतीच्या सुरात म्हंटल. कारण आजकाल छोट्या छोट्या गोष्टीवरून मोठा वाद कधी सुरू होतो कळतच नाही मला. माझ्या प्रत्येक गोष्टी तिला ऑर्थो वाटतात आणि तिच्या तासनतास मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्याची, तिच्या स्वप्नाळू वयाची मला भिती वाटते. माझी भिती मग रागात व्यक्त होते आणि अशा प्रत्येक वादाबरोबर ती आणखी आणखी जिद्दी होते.

बर आता खाऊन तर घे मनू. आई तू पार्सल दे करुन, मी क्लास मधे खाईन. मी पुन्हा शॅम्पू करुन येते. पुन्हा शॅम्पु? मी जवळ जवळ किंचाळलेच तिच्यावर. काय वेड लागलय का तुला मनू? राहीना का एक दिवस तेल केसात. तू तरीपण गोडच दिसतेस. जाऊदे मॉम्स तुला सांगण्यात ना काहीच अर्थ नाही म्हणत ती बाथरुम मधे गेली पण. मग मनाप्रमाणे सगळ व्यवस्थित झाल्यावर धावत पळाली पार्सल घेवुन आणि जाताना ऑटोचे पैसे घेवुन कारण त्या शॅंपू प्रकरणात उशीरच झाला क्लास मधे निघायला.

ती गेली आणि माझी पुन्हा स्वयंपाकाची तयारी सुरु झाली. मस्त खीर आणि आईच्या आवडीचि मटकीची उसळ केली आणि आवरुन निवांत बसले तिची वाट बघत. दोघींनाही यायला उशीर होता म्हणुन पुस्तक घेतल लायब्ररीच हातात. नाहीतरी घरी वाचन होतच नाही माझ, जे काही होत ते गाडीत जाता येता. पण लक्षच लागेना वाचण्यात. सारखे विचार चालु होते. मुलगी आईची मैत्रिण असते म्हणतात मग आमच्यात संवादातला फ़क्त वादच का होतो बर्‍याच वेळा? लहान पणी सारखी मागे मागे करणारी मनु आता काय अस झाल की एकदम कोसो दूर वाटते?

दोघींनाही एकमेकींची ओढ आहे पण पुर्वी होती तशी गट्टी मात्र नाही. मी कुठे चुकतेय की...? पुस्तक डोळ्यावर मिटून शांत बसून राहीले. काहीच करावस वाटेना. ह्याच्याशी बोलाव का? मागे एकदा म्हंटल त्याला तर माझ नाक धरुन म्हणाला निमा काहीतरी विचार करत बसतेस तुझी ती पुस्तक वाचुन नी सिरिअल बघुन. आताही सोफ़्यावर बसुन मॅच बघण्यात गूंग झालाय. मॅच! म्हणजे आता जेवण पण इथेच आणि चहापण इथेच. हात धुवायला पण ब्रेक ची वेळ साधणार. बेल वाजली आणि विचारांची श्रुंखला तुटली. हा तर मॅच सोडून उठणारच नाही म्हणजे मलाच उठण भाग होत.

आईच होती. गाडीला गर्दी होती का ग? मेगा ब्लॉक असतोना आज, तिच्या हातातुन बॅग घेत तिला विचारल. छे ग उलटं यायच म्हणजे गर्दी नसते ना, मस्त बसून आले. मनु कुठे आहे ग?
येईलच इतक्यात तू फ़्रेश होइपर्यंत, क्लासला गेलेय. शेखर १२ वाजत आले, मनु यायला हवी होती रे ह्यावेळे पर्यंत. तशा रचना, स्वाती आहेत तिच्या बरोबर आपल्या बाजूला रहाणाऱ्या. अग गप्पा मारत बसली असेल येइल ग, ती काय लहान आहे का आता. ओह! शीट आऊट झाला, विकेट फ़ेकली नुसती. शेखर पुन्हा क्रिकेट मधे शिरला.अरे लहान नाही म्हणून तर काळजी वाटते ना हे माझ वाक्य त्याच्या आऊट्स दॅट मधे विरुन गेल. नॉनस्टॉप बेल वाजली तेव्हा म्हंटल ही मनुच! दार उघडायला गेले तो पर्यंत मागन ह्याने "आता आल्याआल्या उशीर का म्हणून नको विचारुस" म्हंटले आणि नकळत मला रागच आला. मी काय वैरी आहे का तिची सतत भांडायला. काळजी वाटते म्हणून बोलते. सॉरी! त्याने एका शब्दात माघार घेतली. जाऊदे नाहीतरी आईसमोर तमाशा नकोच होता मला.
मनु बेटा आजी आलेय लवकर हातपाय धू जेवायला वाढते. तुझ्या आवडीची खीर केलेय. सो स्वीट मॉम्स म्हणत गळ्यात पडत ती म्हणाली. जेवणं आटपली, मनुला म्हंटल जरा मदत कर ग मला आवरायला, आज बाई पण नही आली भांड्याना. तोंड वाकडं करत थोडी मदत करुन बया जी पळाली बेडरुम मधे फ़ोन वाजल्याच निमित्त करुन. "ओह! स्वाती मला वाटलच तुझा फोन येणार ते" कानावर पडलं तेव्हाच आईला म्हंटल बघ आता २०-२५ मिनिटांची निश्चिंती.

अग कौतुकाने काय बघतेयस तिच्याकडे, मी आईवरच चिडले. गेले २ तास दोघी एकत्रच होत्या क्लासमधे, बाय बाय करता करता गेटवर जातातच १०-१५ मिनिट, जेमतेम जेवणाचा वेळ गेला असेल मधे नी चिकटल्या दोघी फ़ोनवर. हळू हळू आवाजात ही.. ही.. नी हू.. हू.. सुरुच.
अग असू दे ग वयच आहे त्यांच. आई मलाच सांगत होती. असूदे? आम्ही अस वागलो असतो तर चालल असत का तुला? मला यायला १० मिनिट उशीर झाला तरी तुझे १० प्रश्न असायचे घरी आल्या आल्य़ा. मैत्रिणींबरोबर कुठे पाठवताना १०० प्रश्न विचारायचीस कोण कोण आहे बरोबर, कुठे जाणार, कधी येणार आणि आता हीचं असुदे?

हो मी ढीग चीडायचे तुझ्यावर, काळजी वाटायची ग मला, आणि मी भले प्रश्न विचारुन तुला भंडावुन सोडत असेन तू मनावर घ्यायचीस का ते? आईचा रोखठोक सवाल मला निरुत्तर करुन गेला. मला आई म्हणुन असणारी काळजी कळते तुझी. तुझ्या चिंता, तुझी काळजी मला समजते कारण मी त्यातुन गेलेय. काळा प्रमाणे थोड्याफ़ार कथा वेगळ्या असतील पण व्यथा त्याच होत्या ना? त्या कशा बदलतील?

म्हणजे? मी पण मझ्या आईला असाच त्रास दिलाय, कळजी करायला लवलेय? मला तर आठवतच नाही. दुपारी आईच्या बाजुला पडताना तिलाच विचारायच ठरवल. मनु तर कॉम्प्युटर वर बसुन ऑर्कुटींग करण्यात बिझी होती. हो आता ही एक नविन काळजी आहे मला. ती नेट वर काय सर्फ़ करते, ऑर्कुट वर कोणा तिऱ्हाईताशी तर मैत्री करत नाही ना? तिला कोणी फ़सवल तर? भितीने गोळाच उठतो पोटात. एक बर आहे. घरातच नेट असल्यामुळे द्रुष्टि समोर तरी आहे ती. नाहीतर बाहेर सायबर कॅफ़े मधे गेली असती तर कळल पण नसत काही. आईला म्हंटल पण मी बघ बाई होत्या का तुला अशा काळज्या आमच्या वेळी? आई फ़क्त हसली. हसतेस कय मी रागातच विचारल. हेच ते एव्हढी मोठी झालीस तरी राग नाकावर असतो तुझ्या काही फ़रक नाही. मि खरच त्रास दिलाय तुला आई? माझ्या माहीतीत तर आम्ही अगदी गुणी बाळ होतो, सगळेच म्हणायचे तस.

आहातच ग तुम्ही माझी गुणी बाळं. पण तरी आईच्या जिवाला काळजी का सुटलेय? माझ्या केसातुन हात फ़िरवत तिनं म्हंटल. तुझी आजी नऊवार नेसायची, बाहेरचं बसायची, खोपा घालायची, सोवळं ओवळं पाळायची. त्यामानाने आमची गोल पातळ आणि एक शेपटा तिला नविनच होता ना? मी बाहेर बसणार नाही म्हंटल्यावर तर तिला तो केव्हढा मोठा धक्का होता. तू केस कापायचे म्हणालीस तेव्हा आठवतं मी काय चिडले होते, मुळीच परवानगी दिली नव्हती तुला. पण तू सुद्धा खट होतीस ना, बाबांना लाडी गोडी लावुन आपल तेच खर केलस. अग पण आई तुझा पण न काहीतरी उगाचच विरोध होता. काय कोणी केस कापले नाहीत कधी. असतील ग पण मला ते नविनच होत न. विरोध तुझ्या केस कापण्याला नव्ह्ताच ग खर तर, ते एक निमित्त होत. खरी भिती होती तुझ्या बंडखोर स्वभावाची, तुझ्या वयाची. काल पर्यंत जी मुलगी मला विचारुन माझ्या मता प्रमाणे करत होती तिला वेगळी मत असू शकतील हे कळलच नाही. वाटायच आत्ता हे तर पुढे काय होइल. माझ्या हातातून निसटून तर जाणार नाही न सगळ? खरी भिती होती माझ्या हातुन निसटुन तर जाणार नाही ना ह्याची. म्हणजे सगळ कस आम्ही आखलेल्या मार्गावरुन व्हाव म्हणजे माझ्या द्रुष्टिने धोका नाही. पण मुळातच मी तेव्हा हे विसरले होते कि तू एक वेगळी व्यक्ती आहेस, तुला बांधून ठेवायला गेले तर उलट तू जास्त दुरावशील. ह्या प्रयत्नात अजुन घट्ट पकडायचा प्रयत्न केला बंधन घालुन. राग नव्ह्ता ग तेव्हाही तुझ्यावर, प्रेमच होत आणि काळजीपण. तुला आत्ता वाटतेना मनुची तेव्हढीच. पण त्या वयात नको असतात ग बंधन, थोडा खट्याळ अवखळ पणा असतो, थोडी बंडखोरी असते आणि जेव्हढ बांधुन ठेवु ना तेव्हढ हातातुन निसटुन जात बघ नातं. म्हणुन बघ तेव्हा आपले कधी कधी वाद पण व्हायचे. नात्यांची अदला बदल झाली की नात्याचा चश्मा आपोआप लागतो चाळीशी सारखा. म्हणुन तर तुझी काळजी मी समजु शकते आणि माझ त्यावेळच रागावण तू समजुन घेवु शकतेस.

पण मनु? ती लहान आहे ग. तिला ह्या गोष्टी समजायच वयच नाही आहे. म्हणुन तू समजुन घे. तिच्यात तुझ्यातली १४ वर्षाची निमा शोध. लक्ष ठेवायला हवच, काळजी पण वाटणारच पण अस प्रत्येक गोष्टीत नियमावली आणि चुका शोधण नको. लहान असताना गर्दीतुन जाताना मुलांचा हात पकडून जाता येत, मोठेपणी भिती वाटते ती हात पकडताही येत नाही आणि सोडून दिला तर हरवणार तर नाही ना ह्याची. आमचा वेग तुमच्या पुढे कमी पडतो आणि त्यातून ही भिती वाढते. मी पण तर तेव्हा विसरले होते आणि आपली गट्टी संपली म्हणून दुख: करत होते. आईच्या मांडीवर डोक ठेवुन केसातुन फ़िरणाऱ्या हाता बरोबर तिचा प्रत्येक शब्द मनात जावुन बसत होता, आणि डोळ्यातुन अलगद गालावर ओघळत होता. चल वेडी कुठली रडतेस काय अशी आईनी मला थोपटत म्हंटल. मी केलेली चूक तू करु नयेस म्हणून तर शेखरनी फोन करुन बोलावल तेव्हा मी धावत आले.

शेखरनी तुला बोलावल? कधी? मला तर काही बोलला पण नाही. तुमचे दोघींचे खटके उडायला लागले, तुझी चिडचिड व्हायला लागली, छोट्या छोट्या गोष्टी वरुन डोळ्यात पाणी यायला लागल, बिपी वाढल तसा त्यांनीच मला फोन केला म्हणाले आई माझ्या लेकीच्या आईला तिच्या आईची गरज आहे कधी येताय? मला नाही जमणार तुमच्या सारख समजवायला, तुम्ही एकदा याच तिच्याशी बोला बर वाटेल तिला. माझ्या आई बरोबर माझा नवरापण मला नव्यानेच कळला आज.

काय मायलेकींना डिस्टर्ब करायला येऊ का आत शेखर ने आत डोकावत म्हंटल. चला मॅच पण संपलेय मस्त आल घालून चहा केलाय सगळ्यांसाठी. आणि काही हव असल्यास हा शेफ़ आपल्या सेवेसी हाजीर आहे मॅडम. एक मित्र आणि दोन मैत्रिणी मिळाल्य़ात आज अजून काय हव मला?

व्यथा एका पोटाची

आजचा दिवसच खराब असावा. सकाळी सकाळी कोणाच तोंड बघीतल होत कोण जाणे? सकाळी सकाळी आधी हे म्हणाले "आशू जिम जॉईन कर आता, तुझं पोट केव्हढ सुटलय!" झाल निघता निघता काही टोमणा मारायची गरज होती? पण नाही, गप्प बसेल तर तो नवरा कसला? त्याच्या सल्ल्याकडे थोडस दुर्ल़क्ष करत त्याला त्याच्या जाणार्‍या केसांसाठी औषध आणायची आठवण करुन मी बाहेर पडले.

गाडीत हळदीकुंकु होत म्हणून मस्त काळी चंद्रकला नेसुन गेले होते. तेव्हढ्यात माझी एक मैत्रिण भेटली बर्‍याच दिवसांनी. काय छान आहे ग तुझी साडी, अय्या$$ सेट पण मस्तच आहे ग, आर्टीफ़िशिअल आहे का ग, नाही आजकाल नकली पण अगदी असली वाटत ना! आणि काय गं? काही गुड न्युज?? नाही ग छे, काहीतरीच तुझं पण. एक कार्ट सांभाळतानाच दमछाक होते बाई माझी.
नाही तुझ्या कडे बघुन अस वाटल मला, असुदे असुदे नसेल सांगायच तरी कळेलच आम्हाला, लपुन का रहाणार आहे?

हिला नुसत साडीच कौतुक करुन नाही थांबता आल? माझ सुटलेलं पोटच दिसल हिला? भोचक नुसती! ह्ह!.. अस म्हणुन मी गाडीला पळाले.

गाडीत तरी मला कोणी काही बोलल नाही "त्या" वरुन, सगळ्याच माझ्या सारख्या सुज्ञ म्हणुन साडीचीच स्तुती केली एकमेकींच्या.

आता तुम्हीच सांगा, माझा नवरा त्या कोण मेल्या फ़लाण्या आदिती गोवित्रिकर आणि मलायका अरोराची उदाहरण देतो, बघ बघ म्हणे मुलं होऊनही काय फ़िगर आहे ती. मी म्हणते नसायला काय जातय, त्यांना घासावी लागतात का भांडी, का गाठावी लागते ८.०७ लोकल सकाळची. या म्हणाव एकदा कर्जत लोकलला आणि पकडुन दाखवा सिट, उतरल्यावर आणा म्हणाव भाजी, दुध. घरी येऊन घ्या ग्रुहपाठ आणि मग सांगा फ़िगर च्या गप्पा.

पण आमच ऐकत कोण? असो तर एकंदरीत तो दिवस असाच पार पडला आणि मला संध्याकाळचे घरी जायचे वेध लागले. आज लवकरची गाडी पकडून जायच म्हणून नेहमीच्या गृपचे "काय होत ग १५-२० मिनिटांनी अगदी" हे शब्द कानाआड करुन मी गर्दीच्या ६.२० कर्जत मधे चढले पण. "जंप" (गाडी थांबायच्या आधीच चढून, बसायला जागा मिळवण्याला जंप करणे म्हणतात) नाही केली आणि ओळखीचही कुणी नाही म्हणजे बसायला तर मिळणारच नव्हतं, तेव्हा खिडकी जवळचा कोपरा पकडुन सेटल झाले. (गर्दीच्या लोकल च्या डिक्शनरी मधे सेटल होणे म्हणजे पाणी पिऊन, पुस्तक वगैरे काढुन, बॅग मोक्याच्या जवळच्या जागी ठेऊन त्यातल्यात्यात दादरच प्रेशर येणार नाही अस ऊभ रहाणे) तर त्या दृष्टीने सेटल झाल्यावर पुस्तक घेतलं वाचायला. पुस्तक होत "थ्री मिस्टेक्स ऑफ़ माय लाईफ़" आणि त्यातल्या जी. पटेलच्या गोष्टीत मी शिरतच होते, तेव्हढ्यात समोर बसलेल्या २ काकूंपैकी, खिडकी पासून दुसर्‍या क्रमांकावर बसलेल्या काकूंनी, काकू नंबर दोन म्हणू आपण त्यांना, त्यांनी एक दोनदा पुस्तकाच मुखपॄष्ट उगाचाच हातानी अस थोडसं पुढे करुन बघीतल.

पुस्तक वाचताना पण उगाचच त्यांच्या मधुन मधुन माझ्याकडे बघण्यानी मी अस्वस्थ होत होते.

लायब्ररीच का? त्यांनी शेवटी विचारलच. हो मी म्हंटल (एकतर भायखळ्याहुन बसुन आल्यात उलट्या, आता ह्यात त्यांचा काय दोष म्हणा बरीच जण येतात, पण माझ्या पुस्तकात डोकवत होत्याना म्हणुन उगाचच राग आला) बर लायब्ररीच का एव्हढ विचारुन थांबल्या नाहीत वर सगळी चौकशी करुन झाली, अगदी पत्त्या पासुन, वर्गणी पर्यंत सगळी. आणी मी पण बिनपगारी नोकरा सारखी दिली. (मनात म्हंटल करुन घ्या एकदा सगळ शंकानिरसन म्हणजे तरी मी वाचायला मोकळी)

एव्हढ होइपर्यंत दादर आलं. धाड धाड धाड धाड तोफ़ेसारख्या बायका आत चढल्या,डोंबिवली कल्याण, डोंबिवली कल्याण एकच गलका झाला (लोकल प्रवास त्यातुनही महीलांच्या डब्यातील माहीती नसणार्‍यांसाठी सांगते, बायका चढल्या चढ्ल्या अस सिट रिझर्व करतात म्हणजे कोण कुठे उतरणार विचारुन त्या उठल्यावर आपला नंबर लावुन ठेवतात, बहुतेक दादरला चढणारे जलद लोकल मधे डोंबिवली ,कल्याणच विचारतात कारण त्या आधी उतरणार कोणी नसतच, क्वचित कोणी ठाणा म्हणाल तर त्यादिवशी १ कोटीची लॉटरी लागल्याचा आनंद होतो.) ह्या दादरला चढणार्‍या बायकांना खरतर पदकच द्यायला पाहीजे, काय स्टॅमीना असतो त्यांचा!

असो तर विषयांतर बरच झाल, मी पुस्तक वाचत होते म्हणजे लायब्ररीच मार्केटींग करता करता मधे मधे जमेल तेव्हा वाचत होते.

मग त्यांच्यातल्या काकु नंबर एक ज्या खिडकी जवळ बसल्या होत्या त्या!, त्या उठल्या आणी काकु नंबर दोन ला खिडकी पाशी सरकायला सांगुन मला दोन नंबर काकुंच्या जागेवर "थोडावेळ बस" म्हणाल्या. (गंमत नाही, "थोडावेळ बस" अस आपल नेहमीच कोणी ओळखीच नसेल तर त्याला बसायला देताना सांगायची पद्धत आहे, नाहीतर तुमचा "खडा पारशी" होतो आणि बसणारा मजेत बसुन रहातो.)

मी म्हंटल पण त्यांना, अहो काकु नको, तुम्ही बसा बसा दादरच येतय आत्ताशी. (दादरलाच दया सिट किंवा भाड्याची सिट मिळण म्हणजे पुर्व जन्मीच पुण्यच किंवा गंगेत नहाणच) नाही नको करत करत मी बसलेच, खोट का बोला माझेही पाय़ दिवस भराच्या मिटींगच्या तयारीने दुखतच होते, चला म्हणजे बिनपगारी दिलेली माहीति एन्कॅश झाली म्हणायचे)

नेहमी नसतेसना ह्या गाडीला, कुठे उतरायचय, सिट सांगितलीस का? वगैरे वगैरे विचारुन झाल. मी "नाही आज जरा लवकर जायच होत घरी" म्हणत सिटले.

अशावेळी ग्रुप असल्या शिवाय येउच नये फ़ास्ट लोकलला, सरळ स्लो नी जाव ह्याच्या मागेच कल्य़ाण सेमिफ़ास्ट पण आहे असा सगळा फ़ुकटचा सल्ला देऊन झाला. त्यांच्या जागेवर बसले होते म्हणून ऐकण भाग होत. तरीपण "अशावेळी" म्हणजे काय? असो मी खांदे उडवुन वाचण्यात लक्ष घालायच ठरवल. आता काकू १ संभाषणात उतरल्या. चांगली सवय आहे, वाचनाची. देवा धर्माच पण वाचाव अशावेळी चांगले संस्कार होतात.

मी शेवटी पुस्तक मिटुन ठेवल. चांगली सवय काय, चांगले संस्कार काय? हे नक्की माझ्याविषयी नाही चाललय, म्हणत बाहेर बघायला सुरुवात केली.

आता काकू नंबर २ ची पाळी होती. थोडस माझ्याकडे थोडस नंबर एक काकूंकडे बघत त्या म्हणाल्या "मी आमच्या शिल्पाला पण सांगितल बास आता तुमच प्लॅनिंग, आमची करण्याची उमेद आहे तोपर्यंत होऊदे बाई तुझ बाळंतपण"

आता उरली सुरली शंकाही फ़िटली माझी, मला दादरला बसायला देण, माझ्या वाचनाच्या सवयीच कौतुक, स्लो ट्रेनने जायचा दिलेला सल्ला हे माझ्या सुटलेल्या पोटाचेच प्रताप होते तर.

असो, ठेविले अनंते तैसेची रहावे मानणार माझ मन का अस नाराज होणारे हे कळुन. हे तेव्ह्ढ नवरोबाला सांगता उपयोगाच नाही, तेव्हढाच चेष्टेला विषय पुरेल महीनाभर. पण पोटतही माईना म्हणतात ना म्हणून इथे लिहील, इथे काही तो वाचत नाही आणी चुकुन माकुन वाचलच तर गोष्ट आहे रे ती म्हणुन सावरता येईलच. काय खर ना?

माझ्या सहचरास

संसार म्हणजे दोन जीवांचा सारीपाट
अस माझ मत होत
तुझ्यामुळे कळल संसारात
द्वॆत अस काहीच नसत

आई

मी आई झाले तेव्हा
मला आई उमजली
आई समजायला वयाची
पंचवीशी यावी लागली

आठवणी

आठवणी ठेवाव्यात जपून
मनाच्या कोपर्‍यात दडवून
पहावे त्याकडे न्यहाळून
आपणच अलिप्त राहून

आठवणी ठेवाव्यात
स्मृतीछटेत रंगवून
अन सरते शेवटी
जावे विरून
आठवणींच्या गाभार्‍यात
आठवणी बनून

मन

मन खोल खोल डोह
त्याचा पडे मला मोह
जाते शोधाया मी थांग
मग आठवांच्या संग

आठवांचे कण सारे
जोडी काळाशी ग नाळ
जाता वेचाया म सारे
तिथे थांबे बघ काळ

काळ थांबतो ग जेव्हा
घेते लेऊन मी कण
मागे परत फ़िरता
रेंगाळतो क्षण क्षण

रेंगाळला जरी क्षण
यावे लागते फ़िरुन
वाट पाहे किनार्‍याला
माझ्यासाठी वर्तमान

जाते सामोरी मी त्याला
दोन हात पसरुन
घेते आठवांच्या कणा
मग डोळ्यात भरुन

येता भरुन ग डोळे
येतो आठवांचा पूर
वर्तमान माझा मला
मग नेतो पैलतीर

पैलतीरावर येता
दिसे समोरच डोह
माझ्या मनाला ग त्याचा
पडे सारखा हा मोह