गुरुवार, १९ फेब्रुवारी, २००९

लग्न, सल्ले आणि मी

माझ लग्न ठरल आणि तुम्हाला सांगते एक एक कौन्सलर जाता येता फ़ुकटच कौन्सिलींग करु लागला. तुला सांगते निमे "ह्या पुरुषांना ना पहील्या पासुन असं (इथे माझ्या हतातली रद्दी दोर्‍याने बांधुन दाखवत) मुसक्या बांधुन ठेवल पाहीजे." इथ पासुन ते "संपल ग बाई तुझ स्वातंत्र्य, (एक दोन हुंदके देऊन) अगदी कसाया कडे बांधलेल्या बकरी कडे बघाव तस माझ्या कडे बघत, बाईचा जन्मच बाई असा" पर्यंत सगळ काही व्हायचं.

अहो बाकीचे जाऊदे, आमच्य़ा कामवालीने पण "ताई आत्ताच सांगुन ठेवतो तुमास्नी, बाप्या म्ह्टला की आलच हे!(इथे आचमन आणी नाकाकडे अंगुलीदर्शन करुन) मला घाबरवुन सोडल.

म्हंटल आता होणारच आहे लग्न तर कळेलच हळु हळु कोणता कौन्सलर खरा ते!

लग्ना नंतरची गोष्ट (लगेच असे डोळे मोठे करुन बघु नका माझ्याकडे) ह्याच्या एका मित्राने आम्हाला घरी बोलवून पार्टी दिली, नव्या नवरीला प्रथम घरी आल्यावर काहीतरी भेट देण्याची आपल्याकडे प्रथा आहे. त्याप्रमाणे त्या मित्राच्या आईने मला कुंकु लावुन एक भेट दिली कागदात गुंडाळलेली. म्हंटल असेल एखादा शोपीस किंवा तत्सम गोष्ट, त्याच्या लग्नात डबल आलेली !(नाही आत्ता पर्यंतचा अनुभव असाच होता म्हणुन आपल वाटल).

घरी येऊन बघते तो काय, ते होत एक पुस्तक "मेन आर फ़्रॉम मार्स एन्ड वुमन आर फ़्रॉम व्हिनस" पहील्या पानावर (सु) वाच्य अक्षरात लिहील होत "नव दांपत्यास सहजीवनाची वाटचाल सुरळीत होण्यास"

अरे कर्मा, इथे पण कौन्सलर? काही हरकत नाही, बघु तरी काय म्हंणतय हे पुस्तक म्हणत मी थोड झोपत- वाचत, थोड वाचत-झोपत बघत होते काय काय लिहीलय ते.

पुर्ण कसली वाचतेय. पण मग एक चाळाच लागला, त्यात वाचायच आणि ह्याच्या वागण्याकडे लक्ष द्यायच. तो टिव्ही बघायला लागला उशीरा पर्यंत तर मग म्हनायच "हम्म पुस्तकातल्या प्रमाणे तो त्याच्या कोषात गेला" मग पानं उलटायची "आपाण काय करायच अशावेळी ते बघायला"

वाचून झाल्यावर कळायच कप्पाळ "आज डे नाईट मॅच आहे, कसला कोष अन कसल काय, क्रिकेट म्हंटल्यावर सगळेच जातात क्रिकेट-कोषात" उग्गाच वाचायचा वेळ फ़ुक्कट गेला माझा. तरी पुढ्च्या वेळी तसच व्हायच, मी भिंग घेऊन त्याला पुस्तकाशी पडताळायला जायचे आणि न होणार भांडण व्हायच. अरे म्हंटलं भांडण टाळण्यासाठी हे पुस्तक, आणि त्यावरुनच भांडणं? शेवटी पुस्तक टाकल बांधुन नी ठेवलं माळ्यावर तेव्हा संपली भांडणं. म्हंटल तो "जॉन ग्रे" त्या पुस्तकाचा लेखक हो, तो पडला फ़ॉरेनर, त्याला काय कप्पाळ कळणार ईंडीयन नवरे?

असो तर आता आमचे लग्नाचे ६ महीने निर्धोक म्हणजे सल्ल्यांकडे दुर्लक्ष करुन पार पडले आणि मग काय झालं, सलग ४-५ दिवस आपलं नवरोबांच उशीरा घरी येण सुरु झालं. आधी प्रेमाने विचारुन मग थोड रुसून बघीतल पण छ्या पालथ्या घड्यावर पाणी, पुन्हा आपलं आहेच उशीर आणी उशीर वर मखलाशी काय तर म्हणे डेडलाईन आहे कामाची. असेलही तसच पण तो सल्ल्याचा भूंगा होता ना, तो कानात गुण्गुणायला लागला पहीले कामवालीच वाक्य आठवलं "ताई आत्ताच सांगून ठेवतो तुमास्नी, बाप्या म्हटल की "हे" आलच" .अरे बापरे आता काय करायच?

मी प्रथम वास येतोय का बघीतल तोंडाला. नाही तसा वास तर वाटत नव्हता. चला म्हणजे "हे आलच" मधली पहीली शंका तर फ़िटली म्हणायची. आता त्या "हे" आलच मधल्या दुसर्‍या शंकेच काय? ते कसं कळणार?

मग हळूच त्याचा खिसा, पाकीट तपासून बघीतलं. तर काय? त्यात एक बील होतं! तेही एका साडीचं. साडी? कोणासाठी? मला तर नाही दिली. दोन दिवस वाट बघीतली देईल म्हणून, आडून आडून विचारुन बघीतलं पण छ्या, काही ताकास तूर लागू देत नव्हती स्वारी.

मला तर रडूच आलं. लग्गेच दुसरा भूंगा कानात गुणगुणला "बाईचा जन्मच ग असा, अगदी अगदी कसायाकडच्या बकरी पर्यंत सगळ ऐकू आलं". तो आवाज जातो तोच दुसर्‍या कानात आवाज आला "ह्या पुरुषांना पहील्या पासूनच मुसक्या बांधून ठेवल पाहीजे"

हम्म तिनही कौन्सलर खरेच म्हणायचे!

आज आम्ही एकमेकांना भेटलो तो दिवस, म्हणजे चहा पोह्याचा तो दिवस, पण आजही हा उशीराच येणार होता, लक्षातही नव्हतं त्याला. मी हे आणि अशाच विचारात होते तेव्हढ्यात बेल वाजली. माझी मैत्रिण "सखी" (सखी तिच नाव आहे हो) होती दारात. आल्या आल्याच तिने जाहीर करुन टाकलं "आज मी तुला घेऊन जायला आले आहे, मस्त व्याख्यान आहे रिलेशनशिप वर आणि मुख्य म्हणजे फ़्रि पासेस आहेत नी आमचे हे बाहेरगावी गेलेत" अच्छा म्हणजे तिच्या ह्यांच्या रिक्त जागी सध्या माझी वर्णी आहे तर. काही हरकत नाही, नाहीतरी आमचेही नवरोबा आज लेटच येणार आहेत तर जाव म्हणते पैसे थोडीच पडणारेत मला असा विचार करुन आवरुन निघाले तिच्या बरोबर.

जाताना तिच्या हातातल्या त्या कार्यक्रमाच्या जाहीरातितलाच वरचा भाग कापून मागच्या कोर्‍या भागात निरोप लिहून ठेवला "मी बाहेर जातेय, यायला उशीर होईल, काळजी नसावी. तुझी निमा"

त्यातल्या तुझी वर सखीने टवाळकी केल्यावर ते खोडून टाकलं आणी कुलूप लाऊन आम्ही व्याख्यानाला पोहोचलो.

तिथे पोहोचलो तर सगळी कडे "सुखी संसाराचे सार" "दांपत्य जीवन" वगैरे जड जड शब्दातले सुविचार, तक्ते टांगलेले. मी म्हणाले पण सखीला, सखे सार वरुन आठवल आज ह्याच्यावर चिडून मी टोमॅटो सार चा बेत कॅन्सल केला बघ" तिने हातानेच दाबत कुठेपण काहीपण आठवत तुला अस म्हणत मला एका कौन्टरवर नेलं. तिथे पाहीलं तर काय जागात असतील नसतील तेव्हढी पुस्तक अगदी अगदी त्या तक्त्यांना शोभतील अशी विकण्यास उपलब्ध होती. मला मात्र आठवलं "मेन आर फ़्रॉम..., कोष.., भिंग आणि माळा".

तितक्यात भाषणाला सुरुवात झाली आणि मी आवरुन (म्हणजे माझे विचार आवरून) सावरून बसले ऐकायला.

पहीलच वाक्य "तुम्हाला असं वाटतं का, की तुमची जोडीदाराची निवड चुकली म्हणून?" आयला! सटकन तोंडातून शिवी सटकली, कॉलेजची खोड काय करणार. म्हंटलं खल्लास विकेट एकेदम! माझी नव्हे मला अजून अस वाटतय का हे समजायला पण वेळ नाही! तर बाकीच्यांची म्हंटल मी, सगळे माना डोलवत होते.

मग तो पुढे बरच काही सांगत होता, प्रेमाच्य़ा वेगवेगळ्या स्टेजेस का काहीस अबोध वगैरे. प्रथम काय तर म्हणे आपण प्रेमात पडतो "धप्प" म्हणजे "वुई लिटरली स्वेप्ट ऑफ़ .. वगैरे वगैरे"

अरे बापरे! एकदा ह्याच्याच बायकोला भेटून विचारल पाहीजे आत्ता ह्यांच प्रेम कोणत्या स्टेजला आहे ते! श्शी काय बोअर होतय सखे, चल सटकूया इथून ब्रेक संपायच्या आत. नाहीतरी हे सगळ इथुन तिथुन येतच असतं ग अंगावर कधी नेट मधून, कधी इमेल मधून. मी गळ घालताच दोघी निघालो बाहेर. बाहेर मस्त भेळ आणि मस्तानी आयस्क्रीमवर ताव मारुन व्याख्यानाचा "दि एन्ड" करुन घरी परतले सखीला कटवून. हो तिचा नवरा आहे सध्या बाहेरगावी, ये म्हणता येऊन ठोकेल मुक्काम माझ्याच घरी!

घरी येऊन बघते तो काय? माझ नवरा एव्हढासा चेहरा करून माझ्या निरोपाचा कागद उलट सुलट करुन बघत होता. मी गेल्या गेल्या माझा हात हातात घेऊन मला विचारतो "निमु खरच तुला अस वाटतं का ग?"

मला तर आधी काहीच कळेना, मग त्याच्या हातातला तो निरोपाचा कागद घेतला तेव्हा कळलं त्यावर व्याख्यानाच्या जाहीरातीच फ़क्त एकच वाक्य होत "तुमची निवड चुकली तर नाही ना? येऊन भेटा!"

अछ्छा! तर हे कारण आहे होय गोगलगाय होण्याच! बिच्चारा, सगळे कौन्सलर दाराच्या बाहेर घालवुन दिले अगदी त्या जाहीरातीलाही टोपली दाखवली, आणी हो त्याने नुकतीच सरप्राईज़ गिफ़्ट दिलेली "ती" साडी नेसुन बाहेर पडले त्याच्याबरोबर पुर्ण चंद्र बघायला.

खरतर माझी गोष्ट इथेच संपली पण म्हणतात ना, सल्ले घ्यायचे थांबवले तरी द्यायची खोड काही जात नाही. त्यातलाच प्रकार. आहो आता मी सुद्धा तेच करायला लागले. स्वातीचा लग्न ठरलं सांगायला फ़ोन आला तशी तिला म्हंटल मी" हे बघ स्वाते, तुला सगळे वेगवेगळे सल्ले देतील, पुस्तकं देतील, इमेल पण करतील. पण लक्षात ठेव ऐकावे जनाचे करावे मनाचे. शेवटी आपल मनच खर. अग माणूस कळायला पुस्तक, इमेल नाही तर माणूस वाचायची गरज आहे. तेव्हा वाचणारच असशील तर माणूस वाच बाकी काही नको"

(टीप: इथे इमेल पाठवणार्‍या, पुस्तकं लिहीणार्‍या सगळ्यांच्या सद-हेतु बद्दल मुळीच शंका नाही. फ़क्त कधी कधी माणूस ह्या सगळ्या टेक्निकच्या भानगडीत अडकून पडतो आणी मुळ टेक्निक कशासाठी हेच विसरतो. तर असो हा देखील एक सल्ला "ऐकावे जनाचे... पद्धतीने ऐकावा झाले)

३ टिप्पण्या:

  1. Tumacha aajacha lekh......
    Lagn, salle ani me.......pharach chan hota....

    Maala prashn padatoy tumhala yevadha vel kadhi milato sagal suchalel lihayala........

    Keep it up......

    with best wishes..

    Yogesh Patil

    उत्तर द्याहटवा
  2. थॅन्क्स योगेश, वेळ कसा मिळतो? अरे ट्रेन कशासाठी असते मग? एक तास काढायचा कसा? त्यावर ह उपाय आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. good boss !!!!

    six marun end keli match
    i mean
    shevtee eikave janeche karave manache(u have to firm on your decisions, n if in case decisions goes wrong ahead, then lets face it yaar, nobody knows what is going to happened in future.

    Shashank

    उत्तर द्याहटवा