आजचा दिवसच खराब असावा. सकाळी सकाळी कोणाच तोंड बघीतल होत कोण जाणे? सकाळी सकाळी आधी हे म्हणाले "आशू जिम जॉईन कर आता, तुझं पोट केव्हढ सुटलय!" झाल निघता निघता काही टोमणा मारायची गरज होती? पण नाही, गप्प बसेल तर तो नवरा कसला? त्याच्या सल्ल्याकडे थोडस दुर्ल़क्ष करत त्याला त्याच्या जाणार्या केसांसाठी औषध आणायची आठवण करुन मी बाहेर पडले.
गाडीत हळदीकुंकु होत म्हणून मस्त काळी चंद्रकला नेसुन गेले होते. तेव्हढ्यात माझी एक मैत्रिण भेटली बर्याच दिवसांनी. काय छान आहे ग तुझी साडी, अय्या$$ सेट पण मस्तच आहे ग, आर्टीफ़िशिअल आहे का ग, नाही आजकाल नकली पण अगदी असली वाटत ना! आणि काय गं? काही गुड न्युज?? नाही ग छे, काहीतरीच तुझं पण. एक कार्ट सांभाळतानाच दमछाक होते बाई माझी.
नाही तुझ्या कडे बघुन अस वाटल मला, असुदे असुदे नसेल सांगायच तरी कळेलच आम्हाला, लपुन का रहाणार आहे?
हिला नुसत साडीच कौतुक करुन नाही थांबता आल? माझ सुटलेलं पोटच दिसल हिला? भोचक नुसती! ह्ह!.. अस म्हणुन मी गाडीला पळाले.
गाडीत तरी मला कोणी काही बोलल नाही "त्या" वरुन, सगळ्याच माझ्या सारख्या सुज्ञ म्हणुन साडीचीच स्तुती केली एकमेकींच्या.
आता तुम्हीच सांगा, माझा नवरा त्या कोण मेल्या फ़लाण्या आदिती गोवित्रिकर आणि मलायका अरोराची उदाहरण देतो, बघ बघ म्हणे मुलं होऊनही काय फ़िगर आहे ती. मी म्हणते नसायला काय जातय, त्यांना घासावी लागतात का भांडी, का गाठावी लागते ८.०७ लोकल सकाळची. या म्हणाव एकदा कर्जत लोकलला आणि पकडुन दाखवा सिट, उतरल्यावर आणा म्हणाव भाजी, दुध. घरी येऊन घ्या ग्रुहपाठ आणि मग सांगा फ़िगर च्या गप्पा.
पण आमच ऐकत कोण? असो तर एकंदरीत तो दिवस असाच पार पडला आणि मला संध्याकाळचे घरी जायचे वेध लागले. आज लवकरची गाडी पकडून जायच म्हणून नेहमीच्या गृपचे "काय होत ग १५-२० मिनिटांनी अगदी" हे शब्द कानाआड करुन मी गर्दीच्या ६.२० कर्जत मधे चढले पण. "जंप" (गाडी थांबायच्या आधीच चढून, बसायला जागा मिळवण्याला जंप करणे म्हणतात) नाही केली आणि ओळखीचही कुणी नाही म्हणजे बसायला तर मिळणारच नव्हतं, तेव्हा खिडकी जवळचा कोपरा पकडुन सेटल झाले. (गर्दीच्या लोकल च्या डिक्शनरी मधे सेटल होणे म्हणजे पाणी पिऊन, पुस्तक वगैरे काढुन, बॅग मोक्याच्या जवळच्या जागी ठेऊन त्यातल्यात्यात दादरच प्रेशर येणार नाही अस ऊभ रहाणे) तर त्या दृष्टीने सेटल झाल्यावर पुस्तक घेतलं वाचायला. पुस्तक होत "थ्री मिस्टेक्स ऑफ़ माय लाईफ़" आणि त्यातल्या जी. पटेलच्या गोष्टीत मी शिरतच होते, तेव्हढ्यात समोर बसलेल्या २ काकूंपैकी, खिडकी पासून दुसर्या क्रमांकावर बसलेल्या काकूंनी, काकू नंबर दोन म्हणू आपण त्यांना, त्यांनी एक दोनदा पुस्तकाच मुखपॄष्ट उगाचाच हातानी अस थोडसं पुढे करुन बघीतल.
पुस्तक वाचताना पण उगाचच त्यांच्या मधुन मधुन माझ्याकडे बघण्यानी मी अस्वस्थ होत होते.
लायब्ररीच का? त्यांनी शेवटी विचारलच. हो मी म्हंटल (एकतर भायखळ्याहुन बसुन आल्यात उलट्या, आता ह्यात त्यांचा काय दोष म्हणा बरीच जण येतात, पण माझ्या पुस्तकात डोकवत होत्याना म्हणुन उगाचच राग आला) बर लायब्ररीच का एव्हढ विचारुन थांबल्या नाहीत वर सगळी चौकशी करुन झाली, अगदी पत्त्या पासुन, वर्गणी पर्यंत सगळी. आणी मी पण बिनपगारी नोकरा सारखी दिली. (मनात म्हंटल करुन घ्या एकदा सगळ शंकानिरसन म्हणजे तरी मी वाचायला मोकळी)
एव्हढ होइपर्यंत दादर आलं. धाड धाड धाड धाड तोफ़ेसारख्या बायका आत चढल्या,डोंबिवली कल्याण, डोंबिवली कल्याण एकच गलका झाला (लोकल प्रवास त्यातुनही महीलांच्या डब्यातील माहीती नसणार्यांसाठी सांगते, बायका चढल्या चढ्ल्या अस सिट रिझर्व करतात म्हणजे कोण कुठे उतरणार विचारुन त्या उठल्यावर आपला नंबर लावुन ठेवतात, बहुतेक दादरला चढणारे जलद लोकल मधे डोंबिवली ,कल्याणच विचारतात कारण त्या आधी उतरणार कोणी नसतच, क्वचित कोणी ठाणा म्हणाल तर त्यादिवशी १ कोटीची लॉटरी लागल्याचा आनंद होतो.) ह्या दादरला चढणार्या बायकांना खरतर पदकच द्यायला पाहीजे, काय स्टॅमीना असतो त्यांचा!
असो तर विषयांतर बरच झाल, मी पुस्तक वाचत होते म्हणजे लायब्ररीच मार्केटींग करता करता मधे मधे जमेल तेव्हा वाचत होते.
मग त्यांच्यातल्या काकु नंबर एक ज्या खिडकी जवळ बसल्या होत्या त्या!, त्या उठल्या आणी काकु नंबर दोन ला खिडकी पाशी सरकायला सांगुन मला दोन नंबर काकुंच्या जागेवर "थोडावेळ बस" म्हणाल्या. (गंमत नाही, "थोडावेळ बस" अस आपल नेहमीच कोणी ओळखीच नसेल तर त्याला बसायला देताना सांगायची पद्धत आहे, नाहीतर तुमचा "खडा पारशी" होतो आणि बसणारा मजेत बसुन रहातो.)
मी म्हंटल पण त्यांना, अहो काकु नको, तुम्ही बसा बसा दादरच येतय आत्ताशी. (दादरलाच दया सिट किंवा भाड्याची सिट मिळण म्हणजे पुर्व जन्मीच पुण्यच किंवा गंगेत नहाणच) नाही नको करत करत मी बसलेच, खोट का बोला माझेही पाय़ दिवस भराच्या मिटींगच्या तयारीने दुखतच होते, चला म्हणजे बिनपगारी दिलेली माहीति एन्कॅश झाली म्हणायचे)
नेहमी नसतेसना ह्या गाडीला, कुठे उतरायचय, सिट सांगितलीस का? वगैरे वगैरे विचारुन झाल. मी "नाही आज जरा लवकर जायच होत घरी" म्हणत सिटले.
अशावेळी ग्रुप असल्या शिवाय येउच नये फ़ास्ट लोकलला, सरळ स्लो नी जाव ह्याच्या मागेच कल्य़ाण सेमिफ़ास्ट पण आहे असा सगळा फ़ुकटचा सल्ला देऊन झाला. त्यांच्या जागेवर बसले होते म्हणून ऐकण भाग होत. तरीपण "अशावेळी" म्हणजे काय? असो मी खांदे उडवुन वाचण्यात लक्ष घालायच ठरवल. आता काकू १ संभाषणात उतरल्या. चांगली सवय आहे, वाचनाची. देवा धर्माच पण वाचाव अशावेळी चांगले संस्कार होतात.
मी शेवटी पुस्तक मिटुन ठेवल. चांगली सवय काय, चांगले संस्कार काय? हे नक्की माझ्याविषयी नाही चाललय, म्हणत बाहेर बघायला सुरुवात केली.
आता काकू नंबर २ ची पाळी होती. थोडस माझ्याकडे थोडस नंबर एक काकूंकडे बघत त्या म्हणाल्या "मी आमच्या शिल्पाला पण सांगितल बास आता तुमच प्लॅनिंग, आमची करण्याची उमेद आहे तोपर्यंत होऊदे बाई तुझ बाळंतपण"
आता उरली सुरली शंकाही फ़िटली माझी, मला दादरला बसायला देण, माझ्या वाचनाच्या सवयीच कौतुक, स्लो ट्रेनने जायचा दिलेला सल्ला हे माझ्या सुटलेल्या पोटाचेच प्रताप होते तर.
असो, ठेविले अनंते तैसेची रहावे मानणार माझ मन का अस नाराज होणारे हे कळुन. हे तेव्ह्ढ नवरोबाला सांगता उपयोगाच नाही, तेव्हढाच चेष्टेला विषय पुरेल महीनाभर. पण पोटतही माईना म्हणतात ना म्हणून इथे लिहील, इथे काही तो वाचत नाही आणी चुकुन माकुन वाचलच तर गोष्ट आहे रे ती म्हणुन सावरता येईलच. काय खर ना?
I dont know you ..but came across your blog. Atleast I had nice reading for half an hour. I will keep reading and I hope you will keep writing.
उत्तर द्याहटवाThanks a lot.