चला निमाबाई उठायला हव आता. घड्याळानी ६.३० वाजल्याच जाहीर करताच मी मनाशीच म्हंटल. आज खरतर रविवार, मस्त लोळत पडाव अजुन थोडावेळ! एरव्ही ऑफ़िस म्हणुन असतेच सकाळची घाई. नुसती घड्याळ्याच्या काट्यांशी स्पर्धा. पण आज उठण भागच होत, एकतर आई येतेय रहायला आणि हो मनुचा म्हणजे आमच्या मानसीचा क्लास आहे डान्सचा. गुरुपोर्णिमा जवळ आलेय ना, त्याची तयारी चालु आहे.
क्लास आहे ९.३० चा म्हणजे त्या आधी सगळ आवरुन काहीतरी खायला करायला हव. मग बाईसाहेब ८ पर्यंत उठणार त्यापुढे नहाणार, तिच्या समोर म्हंटला ना हा शब्द नहाणार तर ओरडेलच अंगावर "श्शी आई नहाणार काय म्हणतेस ग कित्ती ऑर्थो वाटत, शॅम्पू करणार म्हण ना! शॅम्पू सो कूल ना मॉम्स!" मग मी म्हणणार बर बाई राणू शॅम्पू तर शॅम्पू चला आटपा लवकर. एकीकडे मनात हे सगळे संवाद चालु होते आणि हात भराभर काम करत होते. सगळ आटपुन अंघोळ करुन पुजा करुन किचन मधे आले तेव्हा ७.३० वाजुन गेले होते.
सासुबाई होत्या तेव्हा त्याच करायच्या पुजा. त्यांची पुजा म्हणजे बघत रहावी एकदम साग्रसंगीत. गंध वगैरे उगाळुन अगदी अर्धा अर्धा तास चालायची पुजा. बघा अस होत आजकाल, किचन मधे आले कशा साठी ब्रेकफ़ास्ट तयार करायला आणि हरवले पुजा आणि सासुबाईंच्या विचारात. ब्रेकफ़ास्ट काय करु? मोट्ठा गहन प्रश्नच जणू. रविवार एकच दिवस मिळतो व्यवस्थीत ब्रेकफ़ास्ट करायला. पण माझ गाड तिथपासूनच अडत. गेल्या वर्षी पर्यंत ठीक होत उपमा, पोहे कधी कधी इडली, डोसा असा बेत केला तरी गाडी खूश असायची मनुची पण आता "श्शी काय ग हे नेहमीचच तू पिझ्झा का नाही ग करत, नाहीतर समोसा, चाट आयटम एकदम फ़ंडू लागत" हे ऐकाव लागत. आता हे फ़ंडू काय ते तिलाच माहीत. आज तिच्या आवडीच सॅंडवीच करायच ठरवल आणि कमाला लागले. तयारी करुन तिला उठवे पर्यन्त ८ वाजुन गेले मधेच ह्याच मला चहा मिळेल का? म्हणुन पेपर वाचत वाचत पालुपद चालु होतच. त्यातच इस्त्रिवाला, कचरेवाला येवुन गेला.
मनु चल भरभर आवर बाळा आणि खावुन घे पटपट. ती ढीम्म . मग दुसर्यांदा तिसर्यांदा सांगतागणिक मझा स्वर टिपेला जात होता. ती मात्र शांतपणे केस सेट करण्यात मग्न. मग मझा पाराच चढला. मनु! मी ओरडलेच. तुला सांगितलना लवकर आटप आणि ते केस काय विंचरत बसलेयस चेंगटा सारखी चार तास.क्लास ह्यांचा आणि काळज्या आम्हालाच.
खायला काय आहे? इती शेखर माझा नवरोबा. मेन्युकार्ड ठेवलय महाराज आपण ऑर्डर करावी. माझा मूड लक्षात घेऊन तो हॉल मधे पसार झाला. ह्याच ठीक आहे. उठायच, पेपर वाचत चहापीत रविवार साजरा करायचा. मनूच्या वागण्या विषयी तक्रार केली की हसून माझीच समजूत काढायची.
मनु आवर लवकर, मॉम्स बघ ना तेल गेलच नाही केसाच आज. श्शी किती चिपकू वाटतायत केस. अग चांगले तर आहेत मी म्हंटल आणि उद्या पुन्हा शॅम्पू कर ह बिट्टो. मी लक्षात ठेवुन शॅम्पू शब्द युज केला नाहीतर पुन्हा नेहमीचि उजळणी झाली असती माझ्या ऑर्थो असण्याची. उद्या काय ग मॉम्स! तिच्या स्वरात दुखावले पण आणि ह्या आईला कहीएक कळत नाही असा भाव होता. आणि मला सारख सारख बिट्टो नको म्हणूस लहान आहे का मी आता, माझ्या मैत्रिणी पण चिडवतात मला मग.
बर बाई राहील मी समजुतीच्या सुरात म्हंटल. कारण आजकाल छोट्या छोट्या गोष्टीवरून मोठा वाद कधी सुरू होतो कळतच नाही मला. माझ्या प्रत्येक गोष्टी तिला ऑर्थो वाटतात आणि तिच्या तासनतास मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्याची, तिच्या स्वप्नाळू वयाची मला भिती वाटते. माझी भिती मग रागात व्यक्त होते आणि अशा प्रत्येक वादाबरोबर ती आणखी आणखी जिद्दी होते.
बर आता खाऊन तर घे मनू. आई तू पार्सल दे करुन, मी क्लास मधे खाईन. मी पुन्हा शॅम्पू करुन येते. पुन्हा शॅम्पु? मी जवळ जवळ किंचाळलेच तिच्यावर. काय वेड लागलय का तुला मनू? राहीना का एक दिवस तेल केसात. तू तरीपण गोडच दिसतेस. जाऊदे मॉम्स तुला सांगण्यात ना काहीच अर्थ नाही म्हणत ती बाथरुम मधे गेली पण. मग मनाप्रमाणे सगळ व्यवस्थित झाल्यावर धावत पळाली पार्सल घेवुन आणि जाताना ऑटोचे पैसे घेवुन कारण त्या शॅंपू प्रकरणात उशीरच झाला क्लास मधे निघायला.
ती गेली आणि माझी पुन्हा स्वयंपाकाची तयारी सुरु झाली. मस्त खीर आणि आईच्या आवडीचि मटकीची उसळ केली आणि आवरुन निवांत बसले तिची वाट बघत. दोघींनाही यायला उशीर होता म्हणुन पुस्तक घेतल लायब्ररीच हातात. नाहीतरी घरी वाचन होतच नाही माझ, जे काही होत ते गाडीत जाता येता. पण लक्षच लागेना वाचण्यात. सारखे विचार चालु होते. मुलगी आईची मैत्रिण असते म्हणतात मग आमच्यात संवादातला फ़क्त वादच का होतो बर्याच वेळा? लहान पणी सारखी मागे मागे करणारी मनु आता काय अस झाल की एकदम कोसो दूर वाटते?
दोघींनाही एकमेकींची ओढ आहे पण पुर्वी होती तशी गट्टी मात्र नाही. मी कुठे चुकतेय की...? पुस्तक डोळ्यावर मिटून शांत बसून राहीले. काहीच करावस वाटेना. ह्याच्याशी बोलाव का? मागे एकदा म्हंटल त्याला तर माझ नाक धरुन म्हणाला निमा काहीतरी विचार करत बसतेस तुझी ती पुस्तक वाचुन नी सिरिअल बघुन. आताही सोफ़्यावर बसुन मॅच बघण्यात गूंग झालाय. मॅच! म्हणजे आता जेवण पण इथेच आणि चहापण इथेच. हात धुवायला पण ब्रेक ची वेळ साधणार. बेल वाजली आणि विचारांची श्रुंखला तुटली. हा तर मॅच सोडून उठणारच नाही म्हणजे मलाच उठण भाग होत.
आईच होती. गाडीला गर्दी होती का ग? मेगा ब्लॉक असतोना आज, तिच्या हातातुन बॅग घेत तिला विचारल. छे ग उलटं यायच म्हणजे गर्दी नसते ना, मस्त बसून आले. मनु कुठे आहे ग?
येईलच इतक्यात तू फ़्रेश होइपर्यंत, क्लासला गेलेय. शेखर १२ वाजत आले, मनु यायला हवी होती रे ह्यावेळे पर्यंत. तशा रचना, स्वाती आहेत तिच्या बरोबर आपल्या बाजूला रहाणाऱ्या. अग गप्पा मारत बसली असेल येइल ग, ती काय लहान आहे का आता. ओह! शीट आऊट झाला, विकेट फ़ेकली नुसती. शेखर पुन्हा क्रिकेट मधे शिरला.अरे लहान नाही म्हणून तर काळजी वाटते ना हे माझ वाक्य त्याच्या आऊट्स दॅट मधे विरुन गेल. नॉनस्टॉप बेल वाजली तेव्हा म्हंटल ही मनुच! दार उघडायला गेले तो पर्यंत मागन ह्याने "आता आल्याआल्या उशीर का म्हणून नको विचारुस" म्हंटले आणि नकळत मला रागच आला. मी काय वैरी आहे का तिची सतत भांडायला. काळजी वाटते म्हणून बोलते. सॉरी! त्याने एका शब्दात माघार घेतली. जाऊदे नाहीतरी आईसमोर तमाशा नकोच होता मला.
मनु बेटा आजी आलेय लवकर हातपाय धू जेवायला वाढते. तुझ्या आवडीची खीर केलेय. सो स्वीट मॉम्स म्हणत गळ्यात पडत ती म्हणाली. जेवणं आटपली, मनुला म्हंटल जरा मदत कर ग मला आवरायला, आज बाई पण नही आली भांड्याना. तोंड वाकडं करत थोडी मदत करुन बया जी पळाली बेडरुम मधे फ़ोन वाजल्याच निमित्त करुन. "ओह! स्वाती मला वाटलच तुझा फोन येणार ते" कानावर पडलं तेव्हाच आईला म्हंटल बघ आता २०-२५ मिनिटांची निश्चिंती.
अग कौतुकाने काय बघतेयस तिच्याकडे, मी आईवरच चिडले. गेले २ तास दोघी एकत्रच होत्या क्लासमधे, बाय बाय करता करता गेटवर जातातच १०-१५ मिनिट, जेमतेम जेवणाचा वेळ गेला असेल मधे नी चिकटल्या दोघी फ़ोनवर. हळू हळू आवाजात ही.. ही.. नी हू.. हू.. सुरुच.
अग असू दे ग वयच आहे त्यांच. आई मलाच सांगत होती. असूदे? आम्ही अस वागलो असतो तर चालल असत का तुला? मला यायला १० मिनिट उशीर झाला तरी तुझे १० प्रश्न असायचे घरी आल्या आल्य़ा. मैत्रिणींबरोबर कुठे पाठवताना १०० प्रश्न विचारायचीस कोण कोण आहे बरोबर, कुठे जाणार, कधी येणार आणि आता हीचं असुदे?
हो मी ढीग चीडायचे तुझ्यावर, काळजी वाटायची ग मला, आणि मी भले प्रश्न विचारुन तुला भंडावुन सोडत असेन तू मनावर घ्यायचीस का ते? आईचा रोखठोक सवाल मला निरुत्तर करुन गेला. मला आई म्हणुन असणारी काळजी कळते तुझी. तुझ्या चिंता, तुझी काळजी मला समजते कारण मी त्यातुन गेलेय. काळा प्रमाणे थोड्याफ़ार कथा वेगळ्या असतील पण व्यथा त्याच होत्या ना? त्या कशा बदलतील?
म्हणजे? मी पण मझ्या आईला असाच त्रास दिलाय, कळजी करायला लवलेय? मला तर आठवतच नाही. दुपारी आईच्या बाजुला पडताना तिलाच विचारायच ठरवल. मनु तर कॉम्प्युटर वर बसुन ऑर्कुटींग करण्यात बिझी होती. हो आता ही एक नविन काळजी आहे मला. ती नेट वर काय सर्फ़ करते, ऑर्कुट वर कोणा तिऱ्हाईताशी तर मैत्री करत नाही ना? तिला कोणी फ़सवल तर? भितीने गोळाच उठतो पोटात. एक बर आहे. घरातच नेट असल्यामुळे द्रुष्टि समोर तरी आहे ती. नाहीतर बाहेर सायबर कॅफ़े मधे गेली असती तर कळल पण नसत काही. आईला म्हंटल पण मी बघ बाई होत्या का तुला अशा काळज्या आमच्या वेळी? आई फ़क्त हसली. हसतेस कय मी रागातच विचारल. हेच ते एव्हढी मोठी झालीस तरी राग नाकावर असतो तुझ्या काही फ़रक नाही. मि खरच त्रास दिलाय तुला आई? माझ्या माहीतीत तर आम्ही अगदी गुणी बाळ होतो, सगळेच म्हणायचे तस.
आहातच ग तुम्ही माझी गुणी बाळं. पण तरी आईच्या जिवाला काळजी का सुटलेय? माझ्या केसातुन हात फ़िरवत तिनं म्हंटल. तुझी आजी नऊवार नेसायची, बाहेरचं बसायची, खोपा घालायची, सोवळं ओवळं पाळायची. त्यामानाने आमची गोल पातळ आणि एक शेपटा तिला नविनच होता ना? मी बाहेर बसणार नाही म्हंटल्यावर तर तिला तो केव्हढा मोठा धक्का होता. तू केस कापायचे म्हणालीस तेव्हा आठवतं मी काय चिडले होते, मुळीच परवानगी दिली नव्हती तुला. पण तू सुद्धा खट होतीस ना, बाबांना लाडी गोडी लावुन आपल तेच खर केलस. अग पण आई तुझा पण न काहीतरी उगाचच विरोध होता. काय कोणी केस कापले नाहीत कधी. असतील ग पण मला ते नविनच होत न. विरोध तुझ्या केस कापण्याला नव्ह्ताच ग खर तर, ते एक निमित्त होत. खरी भिती होती तुझ्या बंडखोर स्वभावाची, तुझ्या वयाची. काल पर्यंत जी मुलगी मला विचारुन माझ्या मता प्रमाणे करत होती तिला वेगळी मत असू शकतील हे कळलच नाही. वाटायच आत्ता हे तर पुढे काय होइल. माझ्या हातातून निसटून तर जाणार नाही न सगळ? खरी भिती होती माझ्या हातुन निसटुन तर जाणार नाही ना ह्याची. म्हणजे सगळ कस आम्ही आखलेल्या मार्गावरुन व्हाव म्हणजे माझ्या द्रुष्टिने धोका नाही. पण मुळातच मी तेव्हा हे विसरले होते कि तू एक वेगळी व्यक्ती आहेस, तुला बांधून ठेवायला गेले तर उलट तू जास्त दुरावशील. ह्या प्रयत्नात अजुन घट्ट पकडायचा प्रयत्न केला बंधन घालुन. राग नव्ह्ता ग तेव्हाही तुझ्यावर, प्रेमच होत आणि काळजीपण. तुला आत्ता वाटतेना मनुची तेव्हढीच. पण त्या वयात नको असतात ग बंधन, थोडा खट्याळ अवखळ पणा असतो, थोडी बंडखोरी असते आणि जेव्हढ बांधुन ठेवु ना तेव्हढ हातातुन निसटुन जात बघ नातं. म्हणुन बघ तेव्हा आपले कधी कधी वाद पण व्हायचे. नात्यांची अदला बदल झाली की नात्याचा चश्मा आपोआप लागतो चाळीशी सारखा. म्हणुन तर तुझी काळजी मी समजु शकते आणि माझ त्यावेळच रागावण तू समजुन घेवु शकतेस.
पण मनु? ती लहान आहे ग. तिला ह्या गोष्टी समजायच वयच नाही आहे. म्हणुन तू समजुन घे. तिच्यात तुझ्यातली १४ वर्षाची निमा शोध. लक्ष ठेवायला हवच, काळजी पण वाटणारच पण अस प्रत्येक गोष्टीत नियमावली आणि चुका शोधण नको. लहान असताना गर्दीतुन जाताना मुलांचा हात पकडून जाता येत, मोठेपणी भिती वाटते ती हात पकडताही येत नाही आणि सोडून दिला तर हरवणार तर नाही ना ह्याची. आमचा वेग तुमच्या पुढे कमी पडतो आणि त्यातून ही भिती वाढते. मी पण तर तेव्हा विसरले होते आणि आपली गट्टी संपली म्हणून दुख: करत होते. आईच्या मांडीवर डोक ठेवुन केसातुन फ़िरणाऱ्या हाता बरोबर तिचा प्रत्येक शब्द मनात जावुन बसत होता, आणि डोळ्यातुन अलगद गालावर ओघळत होता. चल वेडी कुठली रडतेस काय अशी आईनी मला थोपटत म्हंटल. मी केलेली चूक तू करु नयेस म्हणून तर शेखरनी फोन करुन बोलावल तेव्हा मी धावत आले.
शेखरनी तुला बोलावल? कधी? मला तर काही बोलला पण नाही. तुमचे दोघींचे खटके उडायला लागले, तुझी चिडचिड व्हायला लागली, छोट्या छोट्या गोष्टी वरुन डोळ्यात पाणी यायला लागल, बिपी वाढल तसा त्यांनीच मला फोन केला म्हणाले आई माझ्या लेकीच्या आईला तिच्या आईची गरज आहे कधी येताय? मला नाही जमणार तुमच्या सारख समजवायला, तुम्ही एकदा याच तिच्याशी बोला बर वाटेल तिला. माझ्या आई बरोबर माझा नवरापण मला नव्यानेच कळला आज.
काय मायलेकींना डिस्टर्ब करायला येऊ का आत शेखर ने आत डोकावत म्हंटल. चला मॅच पण संपलेय मस्त आल घालून चहा केलाय सगळ्यांसाठी. आणि काही हव असल्यास हा शेफ़ आपल्या सेवेसी हाजीर आहे मॅडम. एक मित्र आणि दोन मैत्रिणी मिळाल्य़ात आज अजून काय हव मला?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा