सोमवार, ३० मार्च, २००९

देवाघरची फुलं

रिसेशन, बदलते आर्थिक वारे, अस्थिरता ह्या सगळ्या पार्श्वभुमीवर रविवारची ही "देवाघरच्या फुलांची" भेट खुप काही देऊन गेली.


(ह्या फोटोत पाळण्यात आहेत तिच ती "देवाघरची फुलं". मोठ्या मुलांचे चेहरे ओळखु येतील असे फोटो काढायला कायद्याने बंदी असल्या मुळे त्यांना फक्त माझ्या मनाच्या कॅमेर्‍यात बंद केलय)

अर्थात मी इथेही निमित्त मात्रच होते. माझ्या छोट्या दोस्त कंपुने मलाही सामील करुन घ्यायच ठरवल म्हणुन हे आनंदाचे तुषार मी अनुभवु शकले. त्यांच्या विषयी सांगेनच मी तुम्हाला. आधी थोड ह्या "देवाघरच्या फ़ुलांविषयी" सांगते.

"जननी आशिष" नावाच एक कुटूंब आहे. हो मी कुटूंबच म्हणण पसंत करेन अनाथाश्रम म्हणण्या पेक्षा. तर ह्या कुटूंबा सोबत, त्यातील छोट्या कुटूंबियां सोबत घालवलेले दोन अडीच तास आम्हाला बरेच काही देऊन गेले.

काय केल तिथे जाऊन आम्ही? तर एक छोटासा वाढदिवस सगळ्या मुलांचा. त्यात होता त्यांच्या आवडीचा चॉकलेट केक, फ़ुगे, कागदी टोप्या नी मास्क. पण जाता जाता ह्या मुलांनी माझाच मास्क काढुन टाकला. माझ मन मलाच म्हणाल बाई ग! नीट डोळे उघडे ठेउन बघ. परिस्थीती परिस्थीतीच रडगाण आपण गातो. कधी दैवाला, कधी नशिबाला बोल लाऊन मोकळे होतो. ह्या मुलांनी काय म्हणायच मग? तिथे ह्यातल काहीच नव्हतं. होता फ़क्त निरागस पणा, आणि होत अपार प्रेम. तुम्ही द्याल त्याच्या कितीतरी पटीत तुम्हाला भरभरुन मिळेल इतक, अगदी तुमची दुबळी झोळी भरुन वाहील इतक प्रेम.

त्या मुलांबरोबर अर्थात त्यांच्या आजीही होत्या (ज्यांना आपला बाहेरचा समाज केअर टेकर अस नाव देतो) ते आजी नातवंडांच नात बघताना मनात माझी तुलना होत होती, माझी लेक आणि मी किंवा तिची आजी ह्या नात्याशी. एक उदाहरण देते, मुलांना आम्ही केक दिला होता. चॉकलेट केक, वेफ़र्स, चॉकलेट हे सगळ्या लहान मुलांचे वीक पॉईंट, समोर दिसतोय तो पर्यंत ते त्यावर ताव मारणारच. पहिल्या दोन राऊंड झाल्यावर माझ्यातली आई अस्वस्थ झाली, जेवणाची वेळ जवळ आलेय त्यावेळी असले पदार्थ खाल्ले तर मुलं जेवत नाहीत नीट. मी सानुला म्हणजे माझ्या लेकीला नसत दिलं दोन पिसेसच्या पेक्षा जास्त एकावेळी. आमच्यातल्या एकीला मी तेच सांगत होते तेव्हढ्यात आजी आमच्या कडे आल्या आणि तिच रिक्वेस्ट आम्हाला करुन गेल्या. हेच ते प्रेम आपलेपण, खरी कळकळ, ज्यामुळे मी त्या आश्रमाला एक कुटूंब म्हंटल मघाशी.

मी सानुच्या बबतीत असा विचार करण एक सहज भाव झाला, तिनेच तर मला आई होण म्हणजे काय ते शिकवल ना! पण दुसर्‍यांच्या मुलांना आपल म्हणुन प्रसंगी वाईटपणा घेऊन त्यांना घडवण खुप कठीण काम आहे. अर्थात त्या आजींनाही सलाम कारण ती "दुसर्‍याची मुलं" हे माझ्या मनात आलेल त्यांना वाटलही नसेल तस. मी सानुला दटावाव आणि दुसर्‍या क्षणी तिने माझ्याच पोटाला मिठी मारावी इतक्या सहज होत्या त्या गोष्टी.

ह्या संस्थेशी ह्या पुर्वी गेल्या दिवाळीत माझ्या लेकीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संबंध आला होता. मला खरोखर भावलेली गोष्ट अशी की तेव्हाही त्यांनी कशाचाही आग्रह धरला नव्हता. त्यांना कशाची निकड आहे सध्याच्या घडीला असे विचारले तेव्हा त्यांनी डेटॉल, साबण तत्सम वस्तु सांगितल्या पण पुन्हा हे देखील सांगितलं "तुम्ही अमुक एकाच किंमतीच्या वस्तु द्याव्यात असा आग्रह नाही, अगदी एक छोटी डेटॉलची बाटली द्यावी अस वाटत असेल तरी देखील स्वागत आहे". हे त्यांचा प्रचार करण्यासाठी नव्हे पण एखादा गुण आवडला तर मराठी माणुस त्याच तोंड फ़ाटे पर्यंत जाऊदे पण खाजगीत देखील कौतुक करत नाही अस म्हणतात म्हणुन जे भावल ते प्रामाणिक पणे लिहायचा प्रयत्न केलाय.

अर्थात उडदा माजी काळे गोरे असणारच तत्प्रद सगळ्याच संस्थांचा सगळ्यांना चांगलाच अनुभव आला असेल अस नाही म्हणुनच जे चांगल आहे त्याला त्याच्या चांगुलपणाच माप द्याव म्हणुन हा लेख प्रपंच. तो लिहीत असताना मला माझ्या दोस्त कंपुला विसरुन कस चालेल! मघाशी म्हंटल्या प्रमाणे मी त्यांच्याशी तुमची ओळख करुन देणार आहे.

हा गृप आहे तरुण मंडळींचा. ऑर्कुट वर गप्पा मारता मारता काही समविचारी मुल मुली एकत्र आले आणि एक नेटिझन्स चा खुप छान गृप झाला. ह्या गृप मधे एम.बि.बि.एस होऊन इन्टर्न करणारी राजलक्ष्मी आहे, सिव्हील इंजिनिअर हर्षु आहे, एम.बि.ए. करणारा प्रदीप आहे आणखीही असेच बरेच जण आहेत. गेल्या दिड वर्षा पासुन वेगवेगळ्या अनाथालयांमधे हे "गेट टुगेदर" करतायत. जमेल तशी देणगी किंवा वस्तु देणं, तिथल्या मुलांसाठी चित्रकला, हस्तकला सारख्या विविध स्पर्धा आयोजीत करणं, सगळ्या मुलांचा मिळुन वाढदिवस साजरा करणं, त्या मुलांना बरोबर घेउन नाचणं गाणं थोडक्यात काय आनंद नी प्रेम देणं आणि घेणं. हे आनंदाच लेणं काय असत ह्याचा अनुभव मी ह्या रविवारी पुरेपुर घेतलाय.


(ह्या फोटोत आहेत "जननी आशिष" कुटुंबातील प्रेमळ आज्या आणि ओर्कुट गृप ज्यांच्या मुळे मी हा आनंद सोहळा अनुभवू शकले)

कोणी म्हणेल एक दिवस असा आनंद देऊन निघुन जाल, त्यामुळे मुलांचे बाकीचे ३६४ दिवस का आनंदात जाणारेत? पण ते काही खर नाही, खारीचा वाटा किती मोलाचा असतो हे आपल्याला ठाऊक आहेच. आणि ही सुरुवात आहे. त्यांच पहील पाऊल तर त्यांनी टाकलय पुढे!

तरुण पिढी बहकतेय, चंगळ वादाच्या आहारी जातेय असा घोषा लावणाऱ्यांसाठी (जो पुर्ण पणे चुकीचा नाही पण हे प्रत्येक पिढी म्हणत असते म्हणजे प्रत्येक पिढीत अशी एक फ़ळी असते प्रमाण कमी अधीक असेल) त्यांनी त्यांच्या वागणुकीने उत्तम आदर्श दिलाय. जरी आत्ता त्यांच्यावर ग्रुहस्थाश्रमाच्या जबाबदारींचे ओझे पडलेले नसले तरी पैशाचा अशा प्रकारे विनियोग करावा हे ज्यांच्या मनात येते आणि नुसतेच येत नाही तर त्याला कृतीची जोड मिळते तिथे कौतुक करायलाच हवे.

मी आधी लिहील्या प्रमाणे "देवाघरच्या फ़ुलांची" भेट, त्यातुन मला मिळालेला आनंद हा सर्वस्वी ह्या माझ्या दोस्त कंपु मुळे. हेच जर "बी"घडण असेल मित्रांनो तर "तुम्ही बि-घडाना आणि आम्हाला बी-घडवा"

थोडस ह्या संस्थे विषयी
ही संस्था डोंबिवली च्या एम आय डि सी भागात आहे. ठाणे डोंबिवली करांच्या माहीती साठी सांगते डोंबिवली जिम्खान्याच्या बरोबर समोर त्यांची इमारत आहे. ही संस्था पुर्ण पणे महिलांनी चालवलेली आहे (अर्थात त्यात पुरुष मंडळींची मदत नाही अस नाही मी म्हणणार पण संपुर्ण कमिटी, रोजचे कामकाज बघणारे सगळा महीला वर्ग आहे) ह्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर त्यांच्या २५० व्या बाळाला आई वडीलांची कुशी आणि पर्यायाने त्या आई वडीलांना निर्मळ आनंदाचा झरा मिळवुन द्यायच काम त्यांनी पुर्ण केलंय.




&

गुरुवार, २६ मार्च, २००९

राग लोभ, अन खेद खंत हे
दिले घेतले इथेच ठेऊ
"तिथे" न लागे ह्यातील काही
आलो तैसे निघुन जाऊ

बुधवार, २५ मार्च, २००९

तेरा चेहरा

हर शक्स मे तेरा
चेहरा नजर आता है
बंद आखो मे तेरा
सपना झलक जाता है

मेघा बरसे तो वो
तेरा पयाम लाता है
पलक से उतरके फिर
दिलमे समा जाता है

हर शक्स मे तेरा
चेहरा नजर आता है

खयाल आता है तो
मन बिखर जाता है
सिमट लू मन को मै
तो वो धोखा दे जाता है

हर शक्स मे तेरा
चेहरा नजर आता है

बावरा मन मेरा जो
बात ये ना समझा है
जख्म ये ना दिखे पर
घाव उसका गहरा है

हर शक्स मे तेरा
चेहरा नजर आता है

जख्म मेरा और भी
गहरा होता जाता है
खयाल तेरा ना उसे
भरने देता है

हर शक्स मे तेरा
चेहरा नजर आता है

न करु याद तुझे तो
बाकी कुछ न रह्ता है
साँस रोकलु तो भी
सारा आलम यु मेहेक जाता है

हर शक्स मे तेरा
चेहरा नजर आता है



(This is my first try in Hindi)

गुरुवार, १२ मार्च, २००९

सल

समीऽर, ऐकतोयस ना, मी दोन तिन हाका मारल्यावर त्याने बघीतल

ह्म्म बोला, नवरा सुखाने पेपर वाचताना बघवत नाही तुम्हा बायकांना.

सोहम,सोहमची मी शब्द जुळवत म्हंटल, सोहमची काळजी वाटते रे. काल पण झोपेत रडत उठला. थोपटुन थोपटुन झोपवला त्याला अगदी लहान मुला सारखा. तू बघितलस ना?

बरं त्याचं काय? इति नवरोबा

त्याच काय काय? नेहमी सारखी मस्ती पण नसते त्याची, सतत काहीतरी विचार करत बसतो. दोन दिवस सांगतोय खाली xxxxजागी दुखतय म्हणुन. दाखवुया का डॉक्टर ना?

झालं तुझ? अग माझे आई किती पाठी लागशील त्याच्या. एकतर शाळांना सुट्टी लागलेय. त्याची दोस्त कंपनी कुठे कुठे गेलेय. त्यात मुंज झाल्यामुळे डोक्याची घेरी बिरी जरा वेगळाच दिसतोय. येणारा जाणारा चिडवतो म्हणुन बसत असेल घरात. मला आठवत माझी मुंज झाली तेव्हा सगळ्य़ांनी मला डोक्यावर वडा वडा म्हणुन टपली मारुन हैराण केल होत. त्याची पण सवय होईल मग येईल पुन्हा मुळ पदावर. नेहमी मस्ती करतो म्हणुन तक्रार करतेस आज नाही करत म्हणून तक्रार. माते धन्य आहेस तू!

आणि उन्हाळी त्रास होत असेल, ते तू आणलयस ना लेमन बार्ली वॉटर ते दे ना त्याला भरपुर. नाही वाटल बर तर जाऊयात डॉक्टर प्रधानांकडे. ठिक आहे? घरगुती उपाय करतेच आहे रे पण ... जाऊदे तू म्हणतोस तसच असेल. मी पण काय वेडी, काही बाही विचार करत बसते. काही दिवस असेच पार पडले आणी एक दिवस चिरंजीव एक प्रश्न घेऊन आले माझ्या कडे

आई, मुंजीत खरा बेडुक भरतात मांडीत?

कुणी सांगितल तुला?

सांग ना पण आई, माझ्या पण भरलाय का?

नाही रे बाळा, कुणी सांगितल तुला? नक्कीच गंमत केली तुझी!

आयुष दादा तर म्हणतो.... नाही खरच त्याने दाखवला पण मला बेडुक.

मग कसा दिसतो तो? मी चेष्टेच्या सुरात विचारलं. बेल वाजली नी विषय तिथेच संपला.

सायले मी सोहमला घेऊन डॉक्टर प्रधानांकडे जाणारे आत्ता तू येणार आहेस का आमच्या बरोबर, ६ ची आहे अपॉईंट्मेंट?

नको आई माझा क्लासच असेल ७.३० पर्यंत तो पर्यंत तुम्ही यालच ना?

बर ठिक आहे पण लवकर घरी आलीस, बाबा आले नसतील तर कुणालाही दार उघडायच नाही शोन्या.

आता पुरे ह आई मी काय सोहम आहे का? चांगली १२ वर्षाची आहे मी. तरी पण ठीक आहे. नाही उघडणार कोणाला दार. कुरियर पण सेफ़्टी डोअर मधुन घेइन. मला पाठ झालय सगळ!

अ‍ॅ$ता पु$ले ह आई मी काय सोहम आहे? माझ का नाव घेतेस ग ताईटले? असा नेहमीचा संवाद होणार म्हणुन मी सोहम कडे बघीतल तर त्याच्या कानावर पण पडल नव्हत जणु तिच वाक्य असा तंद्री लावुन बसला होता कुठेतरी.

काळजात चर्र झाल. मस्तीचा त्रास होतो त्याच्या पण त्याही पेक्षा ह्या वागण्याचा होतोय सध्या. मधेच तंद्री लागते, मधेच दचकतो काय? पोटातच काय दुखत, खाली xxxxच्या जागी तर दुखतच आहे, काल ताप पण होता. माझ्या बाळांची दुखणी तू मला दे रे गणेशा म्हणून हात जोडुन गणेशाला साकड घालुन तिघेही निघालो. सायली क्लासला गेली नी आम्ही डॉक्टरांकडे.

सुदैवाने डॉक्टर वेळेवर आले नी नंबर लगेच लागला.

काय सोहम? कुठे दुखतय बघू? आणि आम्हाला नाही ना बोलावलस मुंजीला? एकीकडे अस म्हणत त्यांच तपासण चालु होतं. थोडा सिरीयस चेहरा झाला त्यांचा, पण एक क्षणच. मग सोहमला बाहेरच्या प्लेरुम मधे खेळायला सांगुन त्यांनी मला समोर बसायला सांगितल.

डॉक्टर काही काळजी करण्यासारख...

माझ वाक्य मधेच तोडत ते म्हणाले, मिसेस जोशी तुम्ही कुठे रहाता? म्हणजे कोण कोण असत घरी?

का हो काय झाल? माझ्या काळजाच पाणि पाणि होत होतं आणि ते थेट न सांगता, घरण्याचा इतिहास विचारत बसलेले.

मी सरला जोशी, समिर म्हणजे सोहमचे बाबा बिइएसटीत क्लेरिकल पोस्ट्वर आहेत. मी घरीच असते. आम्हाला दोन मुलं. मोठी सायली १२ वर्षाची आणि हा सोहम ८ वर्षांचा. आम्ही शास्त्रिनगर भागात रहातो.

बर बर किती दिवसांपासुन तक्रार करतोय सोहम? मला मधेच तोडत त्यांनी विचारलं. झाले असतील ५-६ दिवस आधी वाटल उन्हाळा आहे, पण...

बर ठीक आहे. तुम्हाला माहीत आहे का सोहमची आई त्याला दुखापत झालेय कुणीतरी केल्यासारखी, पडुन लागल्या सारखी नव्हे. येतय का लक्षात?
"It’s a case of sexual abuse. Someone has tried to harm his genitals. that’s why there is swelling and other marks." डॉक्टर प्रोफेशनल भाषेत सांगतात.

भाषा अंगावर येते त्यांची. मी पुतळ्या सारखी निशब्द. अरे कर्मा. काय म्हणायचं हे? इतके दिवस समजत होते सायलीला जपल पाहिजे, मुलगी आहे आता मोठी होत चाललेय. पण हे काय?

माझी अवस्था ओळखुन डॉक्टर बेल वाजवुन पाणि मागवतात. घ्या मिसेस जोशी, शांत व्हा.

शांत व्हा. हा माणुस मला सांगतोय तुमच्या मुलावर काहीतरी शारिरीक अत्याचार झालाय. आणि मी मला शांत व्हायला सांगतोय?

असं होतं कधी कधी मिसेस जोशी. फ़क्त मुलीच नाही मुलगे देखील "sexal abuse" चे बळी ठरतात. सुदैवाने त्याला झालेली शारीरीक दुखापत औषधाने भरुन येण्यासारखी आहे, पण त्याच्या मनाला जी भिती बसलेय, दडपण आहे ते फ़क्त तुम्ही घरचे लोकच प्रेमाने बोलुन, जवळ घेऊन दुर करु शकता.

माझ डोकच सुन्न झाल होत. कस बस रिक्षाने घरी आलो. ७.३० वाजत आले तरी देवापुढे दिवा लावायचं देखील भान राहील नव्हत, की असा छळ मांडल्या बद्दल देवाशीच दावा लावत होते कुणास ठावुक.

समिर साठीही हा मोठा धक्काच होता. पण सोहमला सावरायच तर आम्हाला अजुन विस्कटुन चालणार नव्हत.

हळु हळु रोज थोड थोड गप्पा मारत, त्याच्या मनात शिरलो तेव्हा "बेडुक दाखवतो" प्रकरणा पासुन सगळीच कहाणी बाहेर आली.

अंदाज होताच त्याप्रमाणे आधी आयुषच्या वडीलांनी आम्हाला त्यांचा उत्कर्ष बघवत नाही म्हणुन आम्ही खोट बालंट आणतोय अस म्हंटल. पुढे पोलिस केसची धमकी दिल्यावर तो माणुस घरी येऊन रडला. पोलिसात तक्रार करु नका नाहीतर सोसायटीत तोंड दाखवणं मुश्किल होईल म्हणाले. आमच्या म्हणण्या खातर म्हणा किंवा बदनामीच्या भितीने म्हणा पण ते एकदा डॉक्टर प्रधानांना भेटायला तयार झाले. पुढे प्रधानांच्या सांगण्यावरुन त्यांनी एका मानसोपचार तज्ञांची मदत घ्यायच ठरवल पण ६ महीन्यात ते जागा सोडुन नवीन ठिकाणी रहायला गेले.

आता त्यांच पुढे काय झाल माहीत नाही. पण सोहम मधे औषध, कौन्सिलींग, आणि आमचा संवाद ह्या तिन्ही गोष्टींमुळे खुप चांगला फ़रक पडलाय.

बदललोय ते आम्ही दोघे. कुणावर विश्वास ठेवायचा, कुणावर नाही तेच ठरवू शकत नाही आहोत. माणसं देखील कांगांरुं सारख बाळ सतत जवळ ठेवुन फ़िरु शकली असती तर किती बर अस वाटतय मला.

खर सांगते. इतके दिवस वाटायचं सायली मुलगी आहे, तिला जपल पाहीजे, तिला थोड थोड सांगितल पाहीजे. स्पर्शा स्पर्शातला फ़रक ओळखायला शिकवल पाहीजे. पण सोहम काय मुलगा आहे. तो कुठेही गेला तरी "त्या" बाबतीत सुरक्षीत.

पण तिथेच कमी पडलो आम्ही. आमच्यावर ओढवल तेव्हा कळल, असेही प्रकार होतात. आणि ते देखील आपण सुरक्षीत, सुशिक्षीत म्हणवतो ना त्या समाजात.

कवी, तुला सांगायचा हेतु हाच. मागच्यास ठेच पुढचा शहाणा म्हणतात ना. मी एक ठेच लागुन मग शहाणी झाले. तुझ्या हातात लेखणी आहे. लिहीशील का हे सगळ? जेव्हढे लोक वाचतील तेव्हढे सोहम वाचतील ना ग?

पुढचा एक आठवडा मी नुसती भोवऱ्यात अडकल्या सारखी उलट सुलट फ़िरत होते. नाही उतरल ताकदीने तर? असो नाही पेललं मला तर तो माझ्या लेखणीचा दोष आणि उतरल जर समर्थ पणे तर तिची कळकळ व्यक्त झाली अस मानेन अस ठरवून लिहल आणि तुमच्या पुढे मांडलं.

ह्यात काही दोष असतील तर ते माझ्या लिखाणाचे आहेत. तिचे नाहीत, कारण ती सोळा आणे खरी आहे.

_____________________________

हि एक बातमी म्हणुन वाचली होती. सुन्न झालेले वाचून. मग मनानेच त्या आई जवळ पोहोचायचा प्रयत्न केला आणि झाली "मिसेस जोशींची" गोष्ट. काही शब्द आपण आपल्या पाशी ही उच्चारताना आजुबाजुला बघतो एव्ह्ढा आपल्या वर आपल्या संस्कारांचा पगडा. त्यातून ह्या विषयावर लिहायच ठरवल्यावर सतत भिती वाटत होती, हा विषय नुसताच नाजुक नाही तर अवघड आहे. लिहीताना काही शब्द विषयानुरुप लिहावे लागणार पण कुठे बिभत्स होता कामा नये. हे जमेल का आपल्याला. हेच ते अवघडलेपण. विषयाचा अवाका खुप मोठा आहे. हे अस काही पण होत आणि ते ही आपल्या मध्यमवर्गीय सुरक्षीत चौकटीतही, हे आधी मला पचायला जड गेलेल ते पचवुन तुमच्या पर्यंत मांडण माझ्यासाठी खुप कठीण होतं. खरतर मी पुर्ण exhaust झाले होते लिहिताना.