सोमवार, १६ नोव्हेंबर, २००९

पिक्चर परफेक्ट

तू मलम लावल्या सारख कर
मी घाव भरल्या सारख करतो
म्हणजे कसं चौकटित
चित्र हसरच दिसेल
एकदम "पिक्चर परफेक्ट"
शेवटी, दिसणं जास्त महत्वाच.. असण्यापेक्षा
नाही का?

असं वाटतं

असं वाटतं, झोकुन देऊन
जीव लावणं सोडुन द्याव
प्रेमात देखील जमाखर्च
मांडायला शिकुन घ्याव

विषापेक्षा जहरी शब्द
वापरायला शिकुन घ्याव
आपण हरतोय वाटल की
शब्दांनाच हत्यार कराव

नात विरल पर्वा नाही
डाव आपण जिंकुन जाव
प्रेमात देखील जमाखर्च
मांडायला शिकुन घ्याव

अस वाटत.. वाटत खर
पण..मग वाटत, जाउदे
डावपेच की नातं, दान
ज्याच त्यानं निवडायच

तू खुशाल मांड हिशोब..प्रेमाचा
मांड जमाखर्च त्यातील नात्याचा
मी ठरवलय,माझ्यापुरत
माझ्यासाठी, हे नातं निभवायच

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २००९

महागाईग्रस्त मध्यमवर्गाचा अभंग

महागाईचा ह्या | उच्चांक रे झाला ||
फाटका हा झाला | खीसा माझा ||

भाजी घेऊ जाता | होतो बहु ताप ||
खाऊ काय काप? | बटाट्याचे ||

हापुसचा आंबा | चित्रात बघतो ||
आणि मी खातो | चीकु केळे ||

स्वप्न बघतो मी | मिळे मला धन ||
मिळता ते धन | घेऊ न्यानो ||

गरिब तरीही | लाचार मी नाही ||
कष्टाला ही नाही | घाबरत ||

एकवेळ ऐसी | चालेल गरिबी ||
नको रे गरिबी | वैचारिक ||


(मायबोलीच्या विंडबंन स्पर्धे साठी पोस्ट केलेली कविता)

ओझ्याचा बैल

नकाराच्या भीतीन मी न लिहीलेल प्रेमपत्र
रोझ डेला माझ्या हातून गळून गेलेला गुलाब
आमंत्रण येऊनही चुकवलेल तुझ लग्न
हे सारच आयुष्याच्या वळणावर
जेव्हा पुन्हा सामोर येईल
तेव्हा ओझ्याच्या बैलासारखा
वाकलेला नवरा मला दिसेल आणि त्या प्रसंगीही
मी वाचू शकेन थेट त्याच्या डोळ्यात
"साल्या, तू सुटलास नी मी झालो
फक्त ओझ्याचा बैल"


(मायबोलीच्या विडंबन स्पर्धेतली कविता)

सांग सख्या रे

 
सांग सख्या रे हे; असे काय व्हावे?
तू दूर तरिही; तुझे भास व्हावे!
 
जरी दर्पणी ह्या; मला मी बघावे  
तुझे रुप त्याने; हाय दाखवावे!
श्वासही माझे; तुला फितूर व्हावे?
कसे भान नुरले, मला ना कळावे
 
कळीने जसे त्या, उमलुन यावे
तसे मी फुलावे, बहरुन जावे
अशी काय जादु? असे काय व्हावे?
तीर नाही तरी मी, घायाळ व्हावे
 
सरींनी स्वरांच्या मन चिंब व्हावे
तू सूर अन मी तुझी वेणु व्हावे
तुझे श्वास, निश्वास मी ओळखावे
सांग सख्या रे हे; असे काय व्हावे?

काय रे देवा..(संदिप खरेच्या "काय रे देवा" च्या चालीवर)

आता पुन्हा
आपली मॅच असणार

आता पुन्हा आपली मॅच असणार
मग आपण टिव्ही पुढे चिकटणार
मग सचिन चा विक्रम होणार
पण तरिही आपण मॅच हरणार
काय रे देवा..
मॅच हरलो की आपण चिडणार
मग आपण फिक्सिंग फिक्सिंग ओरडणार
फक्त अ‍ॅड करत रहा म्हणणार
दुसर्‍या दिवशी हीच चर्चा रंगणार
ट्रेन पासुन - चॅटिंग पर्यंत
सगळी कडे हेच असणार
तरिही पुन्हा अशीच मॅच होणार
आपण टिव्हीपुढे असेच बसणार
मग पुन्हा आपण मॅच हरणार
मग पुन्हा आपण चिडणार
त्यांच्या नावाने लाखोली वहाणार
काय रे देवा...
तावातावाने, चवी चवीने
आपण तेच तेच बोलत रहाणार
मग विषय खेळण्याचा की खाण्याचा (पैसे)
ते विसरुन भरकटणार
विषय पलटी मारत रहाणार
क्रिकेट जाऊन शब्दांचा
खो खो मात्र खेळत रहाणार
एक बोट समोर रोखुन
ऐटित वाद घालत रहाणार
चार बोट आपल्या कडची
सोयिस्कर विसरुन जाणार
काय रे देवा..

वाद काल झाले.., आजही होतायत.., वाद उद्याही होणार...
काय रे देवा...

मंगळवार, १० नोव्हेंबर, २००९

ट्रेक नाणेघाटाचा - प्रवास एका इच्छाशक्तीचा..!

(जाऊन आल्यापासुन आज लिहू उद्या लिहू करत करत नोव्हेंबरची १० तारिख उजाडली. उत्साहाच्या भरात तिथुन आल्या आल्या लगेचच ड्राफ्ट लिहुन निवड्क मैत्रिणींना पोस्ट करुन झाल होत दरम्यान नेट गंडण, दिवाळी आणि सर्वात मुख्य माझा आळशीपणा ह्या सगळ्याचा एकत्रीत परिणाम म्हणुन लिखाण पुर्ण काही होत नव्हत. मग पहिला उत्साह मावळल्यावर वाटल
काय मोठासा वेगळा अनुभव आहे तर पुन्हा एक पान खर्च करा नी तेव्हढी पांढर्‍यावर काळी केलेली अक्षर इतरांना म्हणजे चुकुन माकुन जे मैत्रीण म्हणुन म्हणा किंवा सहज म्हणुन म्हणा वाचतील त्यांना शिक्षा केल्या सारखी वाचायला लावा?

मग पुन्हा एकदा मी माझा ड्राफ्ट वाचला. वाटलं एक वेगळा, म्हणजे नेहमीच्या ट्रेकर्सना येतो त्यापेक्षा एक वेगळा अनुभव पण आलाय की मला तिथे... ड्राफ्ट लिहायचा उत्साह देखील त्यामुळेच आला होता तेव्हा.
मग त्याच कारणा साठी पुर्ण करायला हवा हा लेख.. हे मनाशी घोकुन पुन्हा बसले टायपायला)

तर आता करते सुरुवात -- ट्रेक नाणेघाटाचा - प्रवास एका इच्छाशक्तीचा..!


(इथे पोहोचायचय आम्हाला)

बर्‍याच दिवसांपासुन चाललेलं विश्वेश नी त्याच्या गृपचं १०-११ ऑक्टोबरचा विकांत "नाणेघाटावर" घालवायचा. अनायसे सानुच्या शाळेला दिवाळीची सुट्टी लागत होती म्हणुन तिलाही नेतो असं त्याने आधीच डिक्लेअर केलेलं. मनातून एकीकडे मला देखील जायचं होतं. खरं खरं लिहायचं ठरवल्यावर खोट नाही लिहीणार, मला जायचं होतं त्याला दोन प्रमुख कारण होती.

जायचं ह्या यादीत सगळ्यात वरती कारण होतं "सानु".
ती बरोबर जाईल ना? तिच्याकडे बाबाचं "तेव्हढं" लक्ष राहील का दरवेळी?

अर्थात हे वाक्य तमाम बाबा लोकांच्या मते आक्षेपार्ह्य आहे ह्याची मला कल्पना आहे, पण.. आई ह्या कॅटेगरीला वाटणार्‍या "नको येव्हढ्या" काळजी ह्या सदरात ते मोडत असल्याने आणि सुदैवाने/दुर्दैवाने मी त्याच टाईपची आई असल्याने मला तसं वाटलं हे मी प्रामाणिकपणे इथे कबुल करतेय.

हे जरी प्रमुख कारण असलं तरी दुसर कारण हे माझ्या पुरतं महत्त्वाचंच होतं. एकतर मी असा ट्रेक ह्या आधी कधीच केला नव्हता. दरवेळी "सानिकाला घेऊन जाता येणार नाही”, “कठीण ट्रेक आहे" ह्या अधोरेखीत केलेल्या वाक्यांमुळे मी आणि सानु घरीच रहात होतो, नी ट्रेकला फक्त विश्वेशची हजेरी लागत असे.

त्याच्या गृपचे बरेच ट्रेक ओव्हर नाईट स्वरुपाचे असल्याने आठवड्यातले पाच दिवस नोकरी निमित्तम तिला घरी सोडुन जावच लागत मग पुन्हा विकांताला तिला घरी ठेवुन दोघच जाण मनाला पटायच नाही म्हणुन माझं एकतरी ट्रेक करायचाच हे स्वप्न तसच रहात होतं, ते ह्या निमित्ताने पुर्ण होणार होतं. पण दिवाळी तोंडावर आलेली असताना "दिवाळी स्पेशल" घरातली काम सोडुन असा सुट्टीचा विकांत घराबाहेर काढायचा म्हणजे आधीचे/नंतरचे दिवस घरी ओव्हरटाईम करायची तयारी ठेवावी लागणार हे सांगायला पंचांग बघायची गरज नव्हतीच, तरिही "ह्यावेळी हा अनुभव घेऊन बघायचाच" ह्या इच्छेने उचल खाल्ली नी जायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी मी माझीही सॅक पॅक केली.

घरातून निघाल्यापासुन मायबोली वरचे ट्रेकिंगचे लेख आठवत होते. "यो रॉक्स" तर ट्रेक मास्टर आहे त्यामुळे त्याची आठवण झाली तरी खर्‍या अर्थाने लेख आठवले ते "ललिता-प्रिती" नी "कायवाट्टेलते" ह्या दोघांचे. त्यात डोंबिवली - कल्याण वारी करेपर्यंतच सानुच्या पोटात दोन -तीन वेळा कळ आल्याने आमच्या ट्रेकची सांगता परतीच्या कल्याण लोकलने होते की काय अस वाटायला लागलेल.

पण नाही, इच्छाशक्ती इच्छाशक्ती अस घोकत पुढे निघालो.कल्याणहुन जीप करुन आम्ही पायथ्याच्या गावाशी (बहुतेक घाटघर) येऊन पोहोचलो. तेव्हढ्यातल्या तेव्हढ्यात हि एक्साईटमेंट ललिता-प्रितीशी शेअर करुन झाली. ह्यानंतर मोबाईलची रेंज जाणार ह्याची खात्री होती (तसाही माझा मोबाईल नेहमी आउट ऑफ कव्हरेज एरियाच असतो त्यावरुन मला...”फेकुन दे तो तुझा फोन" असा प्रेमळ सल्ला देखील ऐकावा लागतो हा भाग वेगळा )

"वेलकम टू नाणेघाट" ह्या बोर्ड ने आमच स्वागत केल नी दुप्पट उत्साहाने आम्ही सगळी मरगळ विसरुन चढण्यासाठी आतुर झालो.



इथुन सुरु झाला आमचा ट्रेकचा प्रवास.एकुण २२ जणांच्या चमु मधे सानिका धरुन आम्ही चौघे पहिल्यांदा ट्रेक करणारे वीर होतो. सुरुवात तर मस्त झाली. वाटेत २ का ३ ओढे लागल्यावर तिथेच पाय सोडुन बसायचा मोह झाला खरा, पण कॅप्टनच्या "हाकाराच्या शिट्टी" मुळे तो बेत रहीत करुन "येताना इथे थांबुयात्" ह्या अश्वासनांवर मनाची समजुत काढुन आम्ही मार्गस्थ झालो.

जस जस चढाव चढु लागलो तस तस नेहमीचे ट्रेकर्स आणि आम्ही ह्यात अंतर पडु लागल. (हे तर होणारच होतं म्हणा, एरव्ही कुठे आलेय इतक चालायची सवय ते ही पाठीवर ओझं घेऊन!)

मला गावकर्‍यांची खरी कमाल वाटते काय झपाझप चढत उतरत होते ते. एका गावकर्‍याच्या टोपलीत खेकडे होते. नाणेघाट चढुन वरच्या पठारावरच्या भागात खेकड्यांची बीळं आहेत तिथुन खेकडे पकडुन नाणेघाट उतरुन घाटघर किंवा मुरबाड च्या बाजारात ते विकायचे हा त्याचा पोटापाण्याचा धंदा.

केव्हढी ती कसरत नी मेहनत पोटाची खळगी भरण्यासाठी? मला मात्र त्यावेळी माझाच भाजी किंवा तत्सम गोष्टी घेताना १-२ रुपयांसाठी घासाघीस करुन गड जिंकल्याचा आनंद व्यक्त करणारा चेहरा डोळ्यासमोर वाकुली दाखवत होता.

हळु हळु आमचा स्पीड चांगलाच मंदावला. शेवटी कॅप्टन ने आघाडीच्या वीरांना पुढे केव्हजच्या साफसफाईसाठी जाऊ देऊन दोन तीन ट्रेकर्स चा गृप आमच्या सारख्या नवख्यांसोबत ठेवला. सुरुवातीची बडबड संपुन आता फक्त जोर जोरात घेतलेले श्वासांचे आवाज येत होते स्वत:चे स्वतःलाच.

"कॅप्टन अजुन किती वेळ?" ह्या प्रश्नाला दरवेळी "और बस १० ही मिनीट, हे काय आलच" अस उत्तर मिळत होत. (आणि हे और बस दस मिनिट चांगल दिड दोन तास चाललेलं.) इतक चालायची सवय नसलेल्या पायांना चुचकारत माझ आपल चालण चालु होतं. पुढे पुढे तर स्पिड सोडुनच द्या पण प्रत्येक वळणाला "अरे! जरा थांबुयात. आजुबाजुच निसर्ग तर अनुभवुयात.." असा बहाणा करुन विश्रांती घेणं चालु होतं.

आता फक्त एकच वळण, कमॉन कविता तू चढू शकतेस अस माझं मीच माझ्या पायांना ओढत स्वतःशी म्हणत, एकदाचा हा दिड तासाचा ट्रेक तीन तासात का होईना पुर्ण करुन वरती झेंडा लावला.

समोर कॅप्टन बरोबर आधी पोहोचलेली सानिका मला आमची केव्हजमधली जागा दाखवत होती.
"आई, आपण इथे झोपायचं, इथे रुचा काकु,इथे हे काका नी तिथे अमुक तमुक अशी विभागणी तिची तिचीच करुन झालेली."



(ते दोन दिवस हे आमच घर होतं)


(केव्ह्जच्या बाहेरच्या बाजुला असलेली हनुमंताची कोरीव मुर्ती)

आधी पोहोचलेल्यांनी साफसफाई करुन स्लिपिंग मॅटस अ‍ॅरेंज करुन ठेवलेल्या होत्या.
सानिकाला मात्र हे दाखवु आईला का ते अस झालं होतं.

"आई, इथे बघ पाणि आहे प्यायच. एकदम थंड, फ्रिज नसताना..!" तिचा जगातल सातव आश्चर्य बघितल्यासारखा चेहरा अस काही बाही सतत मला दाखवत होता.

"इथे बघ इथुन काय सुरेख दिसतय खालच..अस म्हणत माझा हात धरुन ती मला केव्हजच्या बाहेरच्या बाजुला घेऊन गेली."


ते दृश्य नी टाकांमधल थंडगार पाणि पिऊन सगळा थकवा, दुखणारे पाय विसरायला झालं.





(वदनी कवळ घेता...)




(पंच पक्वांनाच ताट..)

आणलेली शिदोरी मधोमध ठेवुन केळी सदृश्य पानांवर जेवणं झाली नी बरोबर आणलेल्या दुर्बिणीतून आलो तो पट्टा न्याहाळायचा कार्यक्रम सुरु झाला. दूरवर एक पांढरे-लाल टिशर्ट घातलेला गृप चढताना दिसत होता. आमच्या बॅगा लगेच केव्हजच्या एका बाजुला लावुन आम्ही आमची साईड सिक्युअर करुन घेतली. नविन येणारा गृप राहिलाच तिथे तर समोरचा एक भाग त्यांच्या साठी राहिल अस आमच सामान लावुन टाकलं नी रपेटी साठी निघालो.


सर्वात प्रथम "टोल स्पेशल" रांजण बघितला.



(रांजणा कडे जाणारा रस्ता)



(सातवाहन काळात ह्याचा जकात वसुली साठी उपयोग व्हायचा)




मग तसेच चालत पुढे जाऊन एका गावकर्‍याच्या घरी थोडी विश्रांती घेऊन त्यालाच वाटाड्या म्हणुन बरोबर घेऊन निघालो. "इथे वीज पडली होती", "इथे धबधबा आहे" , "इथे फायस्टार (त्याच्याच भाषेत लिहितेय) हॉटेल होणार होत", "ही मिलिंद गुणाजीची १ मजली बंगली" अस काही बाही तो दाखवेल ते बघत पुन्हा परतताना त्या वाटाड्याच्या घरी चहा पिऊन आम्ही नानाचा अंगठा चढण्यासाठी निघालो.



(मिलिंद गुणाजीच्या बंगलीच्या अलिकडचा परिसर.इथेच कुठेतरी गुणाजी कडाचा मिलिंद गुणाजीने लावलेला नी गावकर्‍यांनी काढुन टाकलेला फलक बघायला मिळाला)



(समोरच्या बाजुच्या ह्या डोंगर रांगेला "नवरा-नवरी करवली व वर्‍हाडी असं नाव आहे)



(मिलिंद गुणाजीच्या बंगली समोर उभ राहुन घेतलेला आमच्या गृपचा फोटो)

सुर्यास्ताच्या आधी तिथे म्हणजे नानाच्या अंगठ्यावर पोहोचायचं होतं.




(हा नानाचा अंगठा)



सानिका तिच्या महेंद्र काकांबरोबर माझ्या आधी वरती पोहोचली होती. सुर्यास्त व्हायला थोडाच अवकाश बाकी होता. कॅमेरे सरसावले. मी डोळ्याच्याच लेन्सने टिपायच ठरवल नी एकटक समोर बघत राहिले. एका हाताने सानुला घट्ट पकडुन ठेवल होत नी लक्ष समोरच्या लाल गोळ्याकडे होतं. सगळ आभाळ अस नजरेच्या टप्प्यातं. हळु हळु आपल्या सहस्त्र किरणांनी आम्हाला टाटा बाय बाय करत सुर्यनारायण त्यांच्या घरी गेले.




कितीही रेंगाळावस वाटल तरी भरभर केव्हज कडे जाणं भाग होतं. कारण सुर्यबाप्पा अस्ताला गेल्यावर थोड्याच वेळात अंधाराच राज्य सुरु होणार होतं. सात साडे सातलाच रात्रीचे १० वाजले असावेत इतका काळोख होता (खरतर शहरात कधीच रात्र नसते. The City that never sleeps अस नाहितरी मुंबापुरीला म्हणतातच. तर तिथे आम्ही खर्‍या अर्थाने अंधाराच साम्राज्य अनुभवलं)

अशा अंधारातच आम्ही आमचं कँडल लाईट डिनर केलं, दुसर्‍या दिवशी सकाळी चूल पेटवुन पोहे केले. खानविलकर काकांनी खास सानु साठी मॅगी करुन दिल (मॅगी चांगल नसत म्हणुन आई फारफार कमी वेळा करते अशी तिची माझ्या विषयी तक्रार सुद्धा करुन झाली) आणि हो ट्रेकच्या नियमाला अनुसरुन परत येताना आमच्या ग्रुपची चुकामुक देखील झाली. येताना बच्चे कंपनीच नी काही मोठ्यांच पण ओढ्यामधे मनसोक्त डुंबुन झालं. कपडे बदलायची सोय नसल्याने आम्ही पाय बुडवण्यात समाधान मानलं.

खाली उतरल्यावर खरतर कॅप्टनला ११ नंबरच्या बसने सगळ्यांना कल्याणला किमानपक्षी मुरबाड रोड पर्यंत न्यायच होत पण आमच्या दुखणार्‍या पायांनी नी पोटात खवळलेल्या भुकेनी त्याच्याशी असहकार करत तिथेच पथारी पसरली. आय आयटी मुंबई वाल्यांचा गृप आम्ही उतरत असताना चढत होता. त्यांच्याच बस वाल्याला रिक्वेस्ट करुन थोडे पैसे देऊन घाटघर पर्यंत आलो. तिथुन मुरबाड पर्यंत एक जीप नी पुढे कल्याण पर्यंत दुसरी अस करत आम्ही कल्याणला येऊन पोहोचलो नी हॉटेल गुरुदेव मधे पोटपुजा करुन आमच्या ट्रेकची उत्तर पुजा पुर्ण केली.

खरच, कल्याण ट्रेननेच सांगता झाली ट्रेकची पण ट्रेक पुर्ण करुन मगच.

--------------
आता विचाराल ह्यात कसला आलाय वेगळा अनुभव? हेच तर सगळ म्हणजे असच काहिस ललिताने किंवा काय वाट्टेलते ने लिहीलय की. मग वेगळा अनुभव नाही तर वेगळ ललित कशासाठी खर्च केलस? तिथे त्यांच्या लेखातच प्रतिसाद मधे लिहायच ना! मला माहित आहे असच काहिस येतय तुमच्या मनात.
हम्म थोडंफार खरय, पण थोडं फारच. कारण दमण जरी तसच असलं, इच्छाशक्तीही तशीच असली, वरती पोहोचल्या वरचा आनंदही तसाच असला तरिही हा ट्रेक एका वेगळ्या कारणा साठी मनावर कोरला गेलाय. आणि हे वेगळ कारणच मला लिहायला भाग पाडतय.

ज्या कारणासाठी हा ट्रेक विशेष करुन लक्षात राहिला ते मुद्दामच शेवटी नमुद करतेय कारण मला वाचताना तेच तेव्हढ लक्षात रहाव अस मनापासुन वाटतय.

आम्ही जेव्हा केव्ह्ज मधे परतत होतो तेव्हा "तो" दुपारी दुर्बिणीतून बघितलेला गृप हळु हळु वर चढत होता. "हा गृप, ह्या गृपचे ट्रेकर्स हाच तर वेगळेपणा आहे मला आलेल्या अनुभवात"

ह्या गृपविषयी सांगण्या पुर्वी मला एक सांगा...ट्रेक कशाच्या जोरावर पुर्ण होते?

स्टॅमिना..?

ट्रेकची सवय..?

शारिरी़क ताकद..?

हम्म! लागत असतील ह्या गोष्टी पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे "इच्छाशक्ती" हे मला त्यादिवशी कळलं जेव्हा मी "फिनिक्स" ह्या संस्थेचे "जवान" हा ट्रेक पुर्ण करत असताना बघितले.आम्ही दुर्बीणीतुन बघितला होता तो हाच गृप फिनिक्स च्या जवानांचा.

फिनिक्स ही तुमच्या आमच्या दृष्ट्या शारिरीक अपंगांची संस्था. कोणी पोलिओने पाय गमावलेत, कोणी अपघातात गमावलेत, कोणाला कृत्रिम पाय लावलाय, कोणाचा स्टिलचा पाय गुढग्यात वाकु शकत नाही अशा लोकांचा हा समुदाय जवळ जवळ २५०० फुट उंच अशी नागमोडी वाट चढतो तेव्हा स्टॅमिना,शरिराची ताकद ह्यापेक्षा त्यांची मनाची उभारी, दुर्दम्य इच्छाशक्ती आपल्याला त्या डोंगरा पेक्षाही उंच भासते.





(फिनिक्स चे हेच ते जवान वीर... केव्हजच्या इथे विश्रांती घेत असताना काढलेला फोटो)

शारिरिक अपंगत्वावर दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर विजय मिळवता येतो.. हा धडा मी त्यादिवशी शिकले.
हॅटस ऑफ टु देम यार.. म्हणुन हा स्वतंत्र लेखाचा प्रपंच त्यांना मानाची वंदना देण्यासाठी, त्यांची धडपड त्यांचा उत्साह तुमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठीमला दम लागला, माझी चढताना "नाही बॉ जमत आता मला" "मला नाही वाटत मी पुढचा काय हा ट्रेक पण पुर्ण करेन" अशी अवस्था एक नाही अनेक वेळा झाली. ह्या पार्श्वभुमीवर ह्या वीरांचं यश हे खरच कौतुकास्पद आहे. तुम्हा आम्हाला एक धडा शिकवणार आहे.

हा गॄप ह्या आधीही बर्‍याच गडांना पावन करुन गेलाय हे कळतं तेव्हा हाती पायी धडधाकट असलेल्या आपल्या सारख्या लोकांनी "किती छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडायचं?" अस स्वतःलाच विचारावसं वाटत. असं वाटायला लावणं हे माझ्या ह्या झालेल्या ट्रेकचं यश वाटलं, म्हणुन इथे तुमच्या समोर मांडायचा प्रामाणिक प्रयत्न केला.

पुढच्या वेळी ट्रेक करताना "नही जमेगा" वाटल ना तर हा गृप आणा डोळ्यासमोर. शिव खेराच "येस यु कॅन" न वाचता देखील समोर उभं राहिल ही खात्री मी देते.

(ह्या गृपच्या ह्या ट्रेक विषयी म.टा. मधे पहिल्या पानावर १३ ऑक्टोबरला बातमी आली होती)

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5117535.cms (ही त्या अर्टिकलची लिंक)