सोमवार, ९ डिसेंबर, २०१३

ऍन्ड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर..

ऍन्ड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर..
ह्या वाक्यापाशी संपते "त्यांची" कहाणी.
सुरुवातीला होता दोघांच्याही घरुन विरोध.
घरात लग्नाची बहिण आहे, समाज काय म्हणेल? पासून
"हाच तुझा निर्णय असेल तर आ‌ईबाप मेले समज"
इतपर्यंत विरोध करुन पाहिला दोघांच्याही घरच्यांनी
पण ही दोघे ठाम होती स्वत:च्या निर्णयावर.
तडजोडीशिवाय आयुष्य नाही हे त्यांनाही माहित होतं पण,
आयुष्यभर् मुखवटा चढवून नात्याला फसवत जगण्यासारखं दुसरं दु:खं नाही हे ही पटलं होतं.
इन्डीविज्युअल म्हणून चांगले असलो तरी एकमेकांना कॉम्पॅटिबल नाही हे लक्षात आलं,
तेव्हा निभावून् नेण्याचं नाटक करायचं नाकारत ते वेळीच वेगळे झाले
म्हणूनच लिहिलं
ऍन्ड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर..
ह्या वाक्यापाशी संपते "त्यांची" कहाणी.

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१३

आहे खरा इथे मी संसार थाटलेला

आहे खरा इथे मी संसार थाटलेला
थोडा हवाहवासा पण पंख छाटलेला
वाईट वाटते का माझी न राहिले मी?
प्रत्येक जण इथे जर नात्यात वाटलेला
अव्यक्त भावनांची दाटी बरीच झाली
जो आज व्यक्त झाला तो भाव बाटलेला
लिंपून घेतले मी नाही कुठे तडा ही
हा भास आत सारा होताच फाटलेला
उजळून दीप सारे गेला कुणी मनाचे
विझलाच तो, अता हा अंधार दाटलेला

का रे इतका लळा लावूनी...

हॉस्पिटलमधे डॉक्टर नवजात बाळ जेव्हा आई बाबांच्या हातात देतात तेव्हा कशा मिश्र भावना असतात ना मनामधे. आनंद, भीती थोडं नवखेपणाच दडपण, उत्सुकता सगळच एकाचवेळी चेहऱ्यावरुन.. देहबोलीतून ओसंडून वहात असतं.
तुला पहिल्यांदा बघितलं ना आम्ही तेव्हाही असच झालं होतं आमचं.
तुझ्या रहाण्याची तात्पुरती व्यवस्था करून मग अनुभवी दाई, ताई, मावशी, काका, मामा सगळ्यांना फोन करून चौकशी करून झाली. सगळ्यांकडून हे भरमसाठ सल्ले पोतडीत जमा झाले. गुगलबाबाही होताच मदतीला, त्याचीही वेळोवेळी मदत घेऊन झाली.
तुझ्या परीने तू स्वत:ला व्यक्त करत आमच्या पोतडीत दरवेळी नव्या गोष्टींची भर घालत होतास ते वेगळच.
वाट चुकून आलेला तू... तुझे सखे सोबती "सर्व्हावयल ऑफ़ द फिटेस्ट" च्या शर्यतीत कुठेतरी कमी पडले आणि उरलास तू आणि अजून दोघे. म्हणून मग तुम्ही तिघे तीन घरात दत्तक गेलात, आमच्या दृष्टीने तुमची जगण्याची दोरी प्रबळ करण्याच्या हेतूने.
पहिले आठ दिवस अगदी रूसून बसलेलास, नवीन वातावरणाशी जुळवून घ्याव की नाही? असा विचार करत होतास की काय कोण जाणे पण अन्नालाही शिवला नाहीस. आमचं बिपी सारखं वर खाली.. मग आमची वरात तज्ञाकडे, काय होतय तुला हे विचारायला. त्यांच्या कडून फ़क्त "डोन्ट वरी" हे ऐकण्यासाठी.
मग आठ दिवसांनी तुलाच आमची दया आली असावी किंवा आलिया भोगासी असं म्हणत तू तुझा असहकार तोडत व्यवस्थीत खायला लागला असावास.
अर्थात हे सारे आमचे अंदाज. काश! तुझी भाषा आम्हाला येत असती.
मग त्यातही माझी कॉलर बरेच दिवस ताठ कारण तू प्रथम माझ्या हाताने जेवलास. आणि मग पुढे महिना दोन महिना तू फक्त आणि फक्त माझ्या हातूनच जेवायचास.
आधी वाटलं हा माझा अंदाज आहे. भास आहे. मीच नेमकी भूक लागते तेव्हा असेन समोर खाणं द्यायला. मग मी प्रयोग केले. तुझ्या भुकेच्या वेळी बाकीच्यांना खाणं द्यायला लावलं. पण तू ढुंकूनही बघितलं नाहीस. बाकीचे म्हणे भूकच नसेल तुला कदाचित त्यावेळी. मग मी चार दाणे खाऊ घालून बघायचे तर पटकन येऊन मटकवायचास. एकदम लब्बाड मुलासारखा.
मग बाकीचे उगाच हिरमुसून जायचे. मग आपणहोऊन तू त्यांच्याकडून पण खाऊन घ्यायला लागलास.
तुला टब मधून बाहेर यायचं आहे.. तुला भूक लागलेय... तुला करवंटीत लपून रहायचय... तुला आता पाण्यात वाळू दगड नको आहेत पासून ते तुला आता शी होतेय इतकं सार तुझं वेळापत्रक आम्हाला कळेल अशा देहबोलीत सांगू लागला होतास.
मग कुठून तरी गुगल बाबा म्हणाला "दे फ़ील लोनली. दे नीड कंपनी" झालं आम्ही लग्गेच गुगल बाबा की जय म्हंटलं.
अनायसे कंपनी मिळायची लक्षण दिसल्यावर लग्गेच संधी साधली.
इथेच चुकलो का रे आम्ही? तरी लग्गेच तुम्हा दोघांची वेगळी व्यवस्था केली. पण तू शॉक घेतलास एकदम शांत शांत झालास.
आणि तुला दवाखान्यात नेलं आम्ही पण तू त्या आधी कायमचाच शांत झालास.
हेतू चांगला होता रे आमचा कंपनी आणण्यामागचा पण लक्षातच नाही आलं प्रत्येकाची प्रकृती निराळी.. गरज निराळी.. तुझी भाषा कळली असती तर...
पण असो उशीराने आलेल्या शहाणपणाला काहीच अर्थ नसतो.
आता तुला आपल्याच बागेत पुरलय. एक छानसं झाड तिथे लावायचं ठरवलय तुझी आठवण म्हणून. ते झाड तरी वाढूदे अशी प्रार्थना करशील?

आज्जी आणि तिच्या गोष्टी (शतशब्दकथा)

दिवेलागणीची वेळ म्हणजे शुभंकरोती, उदबत्तीचा सुगंध, आणि आजीच्या गोष्ट. रोज वेगळी गोष्ट. रामायण, महाभारतापासून जादुगारापर्यंत अगदी कुठलीही.
"आज्जी ग! खरच घडलय का ग हे रामायण महाभारत वगैरे?" मी एकदा तिला विचारलं होतं.
"मनु, ह्या गोष्टींना ना आपल्यामधे... आपल्या आजुबाजुला शोधायचं असतं, मग नाही हा प्रश्न पडत" तिने पट्कन सांगितलं होतं
तिच्याकडे जादुसारखी उत्तर मिळायची नेहमीच.
मग मी पण छांदिष्टासारखी आजुबाजुला शोधायला सुरुवात केली आणि जाणवलं घडतय की महाभारत इथेही.
इथे आंधळा धृतराष्ट्र आहे, द्रौपदीच्या वस्त्राला हात घालणारा दु:शासन आहे अगदी विटंबना मुकपणे बघणारा बघा दरबारही आहे... दिसत नाहीये तो फ़क्त द्रौपदीची लाज राखणारा कृष्ण.
ह्या कृष्णाबद्दल आज्जीला विचारायचच राहून गेलं.

बकुळ - शतशब्द्कथा



गोष्ट तिची आणि त्याची.. तशी सरळ साधी
कॉलेजच्या वाटेवर सुरु होणारी.. आणि वाटेतल्या बकुळीच्या झाडाजवळून जाताना क्षणभर थबकणारी
ओंजळभरुन फ़ुलं वेचून त्याचा सुगंध तिने भरुन घ्यावा आणि त्याने तो सोहळा लांबुनच हळूच टिपावा हे ही नेहमीचच
मग बराच वेळ तो गंध पाठलाग करायचा तिचाही आणि त्याचाही अगदी समांतर रस्ते आपापली वळणं घेत दिसेनासे होई पर्यंत
बरच काही बदललं, तरी इतक्या वर्षांनंतरही तिचं बकुळ वेड मात्र तसच राहिलं
"बकुळच का आवडते तुला? स्वप्नांना..नात्यांना आणि स्वत:लाही फ़ुलू द्यायच्या वयाच्या लेकीने जेव्हा हे विचारलं तेव्हा,
तिने सुकलेल्या फ़ुलांची ओंजळ तिच्या जवळ नेत म्हंटलं "सुकल्यावर ज्याचा सुंगंध वाढतो असं हे एकच तर फ़ुल आहे."

रविवार, २ जून, २०१३

माणसे

जंगले ही माणसांची
तरी बेट झाली माणसे
भिडती सिमा तरी ना
भेटती ही माणसे
ना जणू आली त्सुनामी
वाहिले नाही जणू
कोरडी इतकी कशाने
आज झाली माणसे?
टाळण्या अपघात येथे
काळजी घेती किती!
राखूनी अंतर स्वतःशीच
चालती मग माणसे
काय ह्यांच्या अंतरंगी?
कोणती ह्यांची लिपी?
वाचता येती न मजला
दुर्बोध इतकी माणसे
मी तरी कोठे निराळी?
जर पाहते परिघातूनी
अन म्हणे का कोण जाणे
कळलीच नाही माणसे

सोमवार, १३ मे, २०१३

राजगड - बस नाम ही काफी है


राजगड - बस नाम ही काफी है


दिवाळीतल्या सिंहगड पुरंदर कॅम्प दरम्यानच उन्हाळी कॅम्पचं ठिकाण पक्कं झालं "राजगड" बस नाम ही काफी है म्हणायला लावणारा असा हा गडांचा राजा आपल्या राजेंच्या प्रथम राजधानीचा मान पटकवणारा.
ह्याची रचनाही मोठी बघण्यासारखी आहे. मधोमध बालेकिल्ला त्याच्या तीन बाजुला पंख्याची पाती असावीत तशा तीन माच्या पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी माची. सुवेळाहून सुर्यदेवाच्या आगमनाचा आणि संजीवनी हून त्याच्या परतीच्या प्रवासाचा सोहळा बघावा आणि मधोमध असलेल्या ह्या बालेकिल्ल्याला रेलिंगचा आधार घेत का होईना पण एकदा तरी पाय रोवून नजरेत भरुन घ्यावं. सुवेळाला जाताना लागणार्‍या नेढ्यात मात्र आवाज न करता तिथल्या स्थानिक रहिवाशी असलेल्या मधमाशांना त्रास न देता निसर्गाचा एक घटक होऊन शांतपणे तो थरार अनुभवावा. फ़ेबुवर प्रोफ़ाईल फ़ोटू टाकण्यासाठीच्या पोझचा मोह शक्यतो इथे टाळावा निदान सोबत ४० एक मुलांचा कॅम्प नेला असेल तर नक्कीच टाळावा.
तर असा हा आमचा ट्रेक ज्याची सुरुवात झाली १३ एप्रिल च्या रात्री आणि सांगता झाली १५ एप्रिलच्या रात्री.
१३ ला रात्री निघून पहाटे वाजेघर जवळच्या भोसले वाडीत पोहोचलो. चहा पोहे खाऊन आणि आमच्या एका कार्यकर्त्याचा वाढदिवस केक कापून साजरा करुन आम्ही चढायला सुरुवात केली. सकाळची वेळ असल्याने वातावरण अल्हाददायक होतं, फारशा घामाच्या धारा अजून तरी लागलेल्या नव्हत्या. पाली दरवाजाच्या मार्गे आम्ही पद्मावती मंदिरात पोहोचलो. इथेच आमचा मुक्काम होता. तिथे ठेपले सॉस चा नाष्ता करुन आम्ही रोप घेऊन बालेकिल्ल्याकडे निघालो. घारु मंदीराची देखभाल करायला खालीच रहातो म्हणाला तसही राजे ओळखून आहेतच त्यांच्या ह्या मावळ्याला म्हणून त्याला देखरेख आणि इतर कामं देऊन आम्ही बालेकिल्ल्याकडे कुच केली. भर उन्हाचे गेलो खरे पण आमची दुपार सत्कारणी लागली येव्हढं नक्की. मुलांच्या सुरेक्षीततेच्या दृष्टीने रोप घेऊन गेलो होतो आणि ते एका अर्थी बरच झालं. तसं चढायला कठीण वगैरे नव्हतं विशेष पण रोप मुळे ५० मेंढरांना हाकायची सोय झाली. मनात भिती न बाळगता मुलं पटापट चढून वर गेली आणि नंतर तशीच परतताना न घाबरता खाली आली. खाली आल्यावर भाकरी भाजी भाताचं जेवून बर्‍याच मुलांनी एक छोटीशी डुलकी काढण्याला पसंती दिली. संध्याकाळचा सुर्यास्त संजीवनी वरुन बघीतला. इथे मात्र घारु गेलेला पण मी, सानिका अजून एक मुलगी आणि एक कार्यकर्ती खाली मंदिरातच थांबलो. उन्हाळी पित्ताचा त्रास होत असताना पण ट्रेकला जायची परवानगी नाकारतील बाबा म्हणून ती मुलगी घरी तब्येतीची तक्रार न करता ट्रेकला आली, इथे आल्यावर पित्तामुळे मळमळायला लागल्याने आणि सानुलाही तसाच थोडा त्रास वाटल्याने आम्ही खालीच थांबलो त्या दोघींना सोबत म्हणून.
खाली मंदिरात राहिलोच होतो इतरांना संजीवनीवर जाऊ देऊन तर म्हंटलं वेळ सत्कारणी लावून आमच्या जेवणाची सोय केलेल्या अन्नपुर्णेशी गप्पा माराव्यात. आमच्या अन्नपुर्णा बाई शोभा रसाळ वहिनी आणि त्यांचे कारभारी गुंजवणे गावचे रहिवासी. शिवसेनेच्या झुणका भाकर योजने अंतर्गत त्यांनी पद्मावती मंदिराला लागूनच स्वत:चं झुणका भाकर केंद्र चालू केलं आणि तेव्हापासून दर शनिवार रविवारी ट्रेकर लोकांच्या पोटातल्या कावळ्यांची सोय ते बघतायत. मुलांना शिकण्यासाठी पुण्यात ठेवलय म्हणाल्या. चोर दरवाज्याने सामान सुमान घेऊन दर विकांताला इथे मुक्कामी येतात. आम्ही सोमवारी निघणार होतो म्हणुन आमच्यासाठी सोमवार पर्यंत ते वरच थांबलेले. तिथेच मंदिरात नेहमी येणार्‍या ताकवाल्या आजींना विचारलं तर त्या म्हणे मी "फाटेला निगाले बगा घरनं पार तोरना किल्ला हाय ना तितं हाय माजं गाव" बाऽऽपरे किती ते कष्ट पोटाची खळगी भरण्यासाठी? त्यांना आमच्या शहरातल्या ट्रेन मधून गर्दीत स्वतःला लोटून देत प्रवास करण्याचं कौतुक आणि आम्हाला त्यांच्या पायपिटीचं.
संध्याकाळी नचि आणि पजोने सरप्राईझ देत आम्हाला सुखद धक्का दिला. दुसर्‍या दिवशी सुवेळा दर्शन, निवडक बच्चे कंपनी सकट नेढ्यात बसण्याचा थरार, खाली उतरुन आल्यावर मार्गासनी जवळच्या एका नदीवर मनसोक्त डुंबणं आणि मग जेवून परतीचा प्रवास हाच आमचा ट्रेक.
आता ह्यात वेगळं असं काहीच नाही, तसही बाकी काय लिहीणार मी वेगळं, राजगड तोच त्याच्या माच्या त्यांची वर्णनही तीच आणि तिथला थरारही तसाच बाकीच्या ट्रेकर्सनी लिहून ठेवलाय तसा. फक्त बच्चेकंपनी कॅम्प नेल्याने आलेला अनुभव, मिळालेला आनंद, पुढच्यावेळी प्री कॅम्प ट्रेनिंग म्हणून मुलांना काही सुचना देऊन ठेवायला हव्यात अशा काही गोष्टींची आमच्या अनुभव खात्यात जमा झालेली भर, वारकर्‍याने वारीला जावं त्या नेमाने दरवर्षी वर्षातून दोन वेळा कॅम्पला येणारे आमचे छोटे मावळे, आत्ता आत्तापर्यंत लहान वाटणार्‍या काही मावळ्यांचं तारुण्यातलं पहिलं अडखळतं पाऊल आणि ह्या वयाला जोडून आलेलं हे वयच असं असतं म्हणत जगाला न जुमानता हम करेसो वालं हट्टीपण, वारं पिऊन घेणारं आणि जग कवेत घेऊ शकतो वाटायला लावणारं वयातलं स्थित्यंतर आणि आम्ही फक्त त्याचे साक्षिदार, जणु आम्ही ट्रेक चढून वर आलोय आणि आता ह्या मावळ्यांना चढताना वरुन बघतोय. आमची त्यांची वाट एकच तरी प्रत्येकाचं चढणं, घसरणं सगळं स्वतंत्र वेगळं स्वत:चच असं. ह्या आणि अशा अनेक गोष्टींचं संचित म्हणजे आमचा हा राजगड कॅम्प.
आमचा गृप होता ५६-५७ लोकांचा आणि ह्या ५६-५७ लोकांपैकी मुलं होती ४०-४५, वयोगट होता ९-१९. काही मुलं पहिल्यांदाच ट्रेक हा प्रकार अनुभवणार होती आणि हे सारे पहिलटकर होते ९-१० वर्षाचे मावळे आणि त्यातही विशेष म्हणजे ते आले होते आई वडिलांच बोट सोडून आपापली सॅक आपापल्या पाठीवर घेऊन. चिंटू २ बघताना मला कितीतरी वेळ आमच्या कॅम्पची आठवण येत होती अर्थात तो सिनेमा होता त्यात बर्र्‍याच ट्रेक्सर्सच्या दृष्टीने ७ स्टार्स सोयी दाखवलेल्या प्रत्यक्षात ट्रेक तितकाही आरामदायी नसतो, मजेशीर आणि पुन्हा पुन्हा अनुभवण्यसारखा मात्र नक्कीच असतो.
प्रत्येकाची मानसिक, शारिरीक कुवत सारखी नसते, चालायचीही तितकीशी सवय नसते त्यात आई बाबांपासून दूर आलेली काही पिल्लं लागली की रडायला पद्मावती मंदिरात पोहोचे पर्यंत. आऽऽई पाहिजेऽऽ चा गजर झाल्यावर आणायची कुठून तिथे त्यांची आई. दादापुता करुन गोष्टी गाणी सांगून पाय चेपून दिले, भरवलं तेव्हा कुठे कळी खुलली एकेकाची. इकडे आमचं कन्यारत्न मला बाजुला घेऊन म्हणे, अशी भरवत्येस जसा काही तुझा सख्खा मुलगा आहे आणि मी इथे हाताने जेवतेय स्वत:च्या फिदीफिदी हे राम! तिनेही भरवून घेतलं मगच पळाली बाहेर खेळायला. पण ह्या वयातली मुलं तुम्हाला असं भरवू देतात, तुम्ही गोष्टी गाणी सांगता, प्रेमाने जवळ घेता तेव्हा तेव्हढ्या पुरतं का होईना आई हवीचा हट्ट विसरतात म्हणजे किती निरागसपणे ती तुम्हाला आपलं मानतात हे जाणवून अधिक जबाबदार झाल्या सारखं वाटलं. घरी जाऊन आपापल्या पालकांच्या मिठीत जाईपर्यंत ही छोटी फुलपाखरं मला माझीच बाळं असल्यासारखं वाटलं. हा अनुभव हि आमच्या कॅम्पची देन दुसरं काय?
एकीकडे निरागस पणे आपले बालहट्ट आमच्या कडून पुरवून घेणारी ही मंडळी तर दुसरी कडे टिन एज मधे पहिलं पाऊल टाकलेली तर काही टिन एज मधून बाहेर पडणारी मंडळी होती. त्यामुळेच प्रत्येक वयोगटातले वागण्यातले बदल एका ग्राफ सारखे बघायला मिळाले. अर्थात हे काही शिक्का मोर्तब करण्याइतके निष्कर्ष वगैरे नाहीत तर आलेले काही अनुभव आहेत इतकच.
ह्यातल्या एका मुलाची गोष्ट तर नक्कीच नमुद करण्यासारखी वाटतेय. हा मुलगा आमच्या बरोबर पेठगडच्या ट्रेकला तीन वर्षांपुर्वी आलेला तेव्हा तो ८-९ वीत होता. मस्तीखोर, दिलेली सुचना उडवून लावणे, आई स्पेशली वडील सोबत नाहीत म्हणून एक्स्ट्राचा फ़्रीडम मिळाल्याप्रमाणे वागणे अशा गोष्टींचा त्याने मनसोक्त आनंद लुटला आणि त्यामुळे आम्हाला एकदा अडचणीतही आणले. पण तोच मुलगा ह्यावेळी आला तो पुरेपुर बदलून. आजही तो मस्तीखोर नाही अशातला भाग नाही पण आज तो अडचणीत आणणारा मुलगा न वाटता मदत करायला तत्पर आणि उत्सुक असलेला मॅच्युअर मुलगा जास्त वाटला. अजून एक पिल्लू माझ्या लेकीच्या वयाची म्हणजे ९-१० वर्षाची असल्या पासून येतेय आता टिन एज चालू झालय तिच. पहिल्या ट्रेकच्या वेळी वाट चालताना शाळेतल्या कविता, गोष्टी, मित्र मैत्रिणी, बाई, शाळा असे विषय असायचे सोबतीला आता ह्यावेळी ते विषय थोडे मागे पडून सिनेमा, हिरो हिरॉईन्स, नवीन गाणी हे विषय होते हातात हात घालून. आत्ता आत्ता पर्यंत मैत्री ह्या एकाच नात्याने बांधलेल्या दोन जिवांचे मैत्री ते क्रश ते नवीनच प्रेमात पडलेले युगुल असे बदलते ग्राफ बघायला मिळाले आणि इतकी पटकन मोठी झाली पण ही मुलं ह्या जाणिवेचीच गंमत वाटली.
ट्रेकचा अनुभव लिहायचं ठरलं तेव्हा खरतर ट्रेक म्हणजे राजगड त्याची उंची १३९४ मीटर, त्याचे चढायचे मार्ग तीन, आम्ही निवडलेला मार्ग कोणता? काय बघीतलं हेच लिहायचा विचार होता पण लिहायला घेतलं आणि राजगड नावा बरोबर ह्या बाकीच्याही आठवणी अशा काही जोडून आल्या की प्रयत्न करुनही त्या वेगळ्या करता आल्या नाहीत म्हणून मग जी काही कडू गोड आंबट आठवणींसोबतची भेळ तयार झाली तीच तुमच्या समोर ठेवली झालं.

  (hero & heroin of the day)
 
img src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg-j8LUtEJJU7dAikzQ3NJtcTsDUDQI0BLLhIxKTXgTV58X3MHvTI6pczD-qMbRbZvWJoM6-63frRKTQCYWyjo43AZ3XK_rP2zhWvaFWh8QpILJn-mIZw7nmUBfjKZ4677puQjS8-D2z_g/s800/IMG-20130510-WA0008.jpg" height="601" width="800" />

सोमवार, २२ एप्रिल, २०१३

माझ्या माहेराची वाट


माझ्या माहेराची वाट
वाटेवर हिरवाई
उन्हामधे रापलेल्या
मना सावली ती देई

माहेराच्या वाटेवरी
वाहे खळाळता पाट
शब्द पडती तोकडे
आहे त्याचा असा थाट

उंबर्‍याशी उभी माय
वाट माझी पहातसे
दारातच ओवाळून
दृष्ट माझी काढतसे

मला बघून अंगणी
येई कपीला धावत
हंबरे ती अशी जणू
आले तिचेच पाडस

चार दिसं माहेराचे
होते पुन्हा मी लहान
लहानग्या पोरी परी
घेते घास भरवून

चार दिस उलटता
होते सैरभैर मन
आठवते मनामधे
माझ्या घराचे अंगण

दारापुढची तुळस
गेली असेल सुकून
कोण जाई शिळोप्याच्या
गप्पा तिच्याशी मारुन

अंगणात येता चिऊ
उपाशीच ग जाईल
तिच्यासाठी दाणापाणी
सांग कोण ग ठेवील?

सय तुझी येते माय
परी घर खुणावते
काय करु दोन्ही कडे
मन माझे अडकते

तुझ्या आठवणीं सगे
घर माझे मी गाठते
तुझ्या हातची गोधडी
उब ममतेची देते

बुधवार, ३ एप्रिल, २०१३

बोच


सखी, फार नेटाने चढवला असशील ना
सगळं काही ठीक असल्याचं भासवणारा मुखवटा?
कदाचित आदल्या रात्री येऊन गेलेलं वादळ
पापणी आड परतवून
उसन्या उत्साहाने गेली असशील सामोरी
सकाळच्या पहिल्या किरणाला

वाळूच्या घड्याळातली निसटत जाणारी
वाळू दिसावी,
पण नुसतं बघण्यापलिकडे
काहीही करता येऊ नये
ह्या असहाय्यतेला नुकतीच शिवण घालून
लागली असशील पुन्हा चक्रातलं
आयुष्य जगायला

आणि नेमकं तेव्हाच त्या शिवणीचा दोरा
नकळत अडकून उसवला जावा माझ्याकडून?
तुझ्या जखमेवरची खपली निघायला
मी निमित्त झाले ह्याची बोच राहील
आता बराच काळ मनात

तशी मी ही मुखवट्या आड लपवेन ती बोच
शिवून टाकेन लग्गेच तिला, नकळत झालेली चूक म्हणून
लिहीन त्यावर एक कविता, मिळवेन बरे वाईट प्रतिसाद त्यावरही
कदाचित तू ही वाचशील आणि देशील प्रतिसाद एक तिऱ्हाईत म्हणून
गुरफटून जाऊ आपण दोघीही आपापल्या व्यापात
कायमची एक बोच घेऊन



मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१३

नंदनवन फुलले


बोल बोबडे घरी गुंजतील
निर्मळ हसणे मना शांतवील
लोभस रुपडे क्रिष्णाचे हे
तुझ्या घरी अवतरले
पाहुनिया हा सुख सोहळा
मन माझे हर्षिले

कवटाळीशी तू जेव्हा कान्हा
प्रसवेल ममतेचा पान्हा
प्रेमाचे हे रुप अलौकिक
पाहुनी लोचन हे भरले
घराचे गोकुळ की झाले

आई म्हणूनी हाक ऐकता
रोमांचित ग होईल काया
अवीट अशा ह्या आनंदावर
नको कधी दु:खाची छाया

राहो गोकुळ सदा सुखी हे
आशिर्वचन देवा मज द्यावे
हसले बाळ नि बाळा संगे
घर सारे हसले
तुझ्या कृपेने घरामधे
ह्या नंदनवन फुलले

शुक्रवार, ११ जानेवारी, २०१३

इतकच लागतं जगायला

तू म्हणालास,

"जपून ग!
घाटातली वाट, त्यात धुकं दाट"

मी म्हंटलं,
"असुदे रे!
तू सोबत आहेस ना?
मग कसलं धुकं आणि कसला घाट
सोबतीने करु की पार ही वाट"

तू म्हणालास,
"जपून ग!
जगणं म्हणजे नुसती,
अडथळ्यांची शर्यत आहे"

मी म्हंटलं,
"असुदे रे!
सोबत असण्याचं महत्व
म्हणून ना कळत आहे?"

तू म्हणालास,
"आणि मी खचलो तर?"

मी म्हंटलं,
"मी आहे की"

जोड विजोड, रुप अनुरुपता
कळत नाहीत रे मला

अवघड वाटेवर
सोबतीने चालण्याचं वाण
मनापासून निभावतोय
हेच काय ते
ठावूक आहे मला

आणि विश्वास ठेव,
इतकच लागतं जगायला
बाकी काहीच नाही