बुधवार, ३ एप्रिल, २०१३

बोच


सखी, फार नेटाने चढवला असशील ना
सगळं काही ठीक असल्याचं भासवणारा मुखवटा?
कदाचित आदल्या रात्री येऊन गेलेलं वादळ
पापणी आड परतवून
उसन्या उत्साहाने गेली असशील सामोरी
सकाळच्या पहिल्या किरणाला

वाळूच्या घड्याळातली निसटत जाणारी
वाळू दिसावी,
पण नुसतं बघण्यापलिकडे
काहीही करता येऊ नये
ह्या असहाय्यतेला नुकतीच शिवण घालून
लागली असशील पुन्हा चक्रातलं
आयुष्य जगायला

आणि नेमकं तेव्हाच त्या शिवणीचा दोरा
नकळत अडकून उसवला जावा माझ्याकडून?
तुझ्या जखमेवरची खपली निघायला
मी निमित्त झाले ह्याची बोच राहील
आता बराच काळ मनात

तशी मी ही मुखवट्या आड लपवेन ती बोच
शिवून टाकेन लग्गेच तिला, नकळत झालेली चूक म्हणून
लिहीन त्यावर एक कविता, मिळवेन बरे वाईट प्रतिसाद त्यावरही
कदाचित तू ही वाचशील आणि देशील प्रतिसाद एक तिऱ्हाईत म्हणून
गुरफटून जाऊ आपण दोघीही आपापल्या व्यापात
कायमची एक बोच घेऊन