सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२

नसीब का सिक्का


पळणार्‍या घड्याळ्याच्या काट्याशी स्पर्धा करत आवरुन बाहेर पडायचं, ठरलेल्या वर्तमान पत्र वाल्या कडून ठरलेलं वर्तमान पत्र घ्यायचं. १० ची नोट द्यायची नि त्याने ७ रुपये परत केले की ते बसच्या तिकिटासाठीच्या कप्प्यात सरकवून बसच्या सुट्यांची सोयही अशी परस्पर करायची... हे ही नेहमी सारखेच

तो दिवसही त्याला अपवाद नव्हता. वर्तमान पत्र घेतलं, बॅगेत ठेवलं आणि लोकल पकडायला पुन्हा एकदा पायांना घड्याळा बरोबर पळवलं.

प्रचंऽऽड तुडुंब हे शब्द कमी पडतील अशी गर्दी व्हायच्या आधीची आमची वेळ असल्याने त्यामानाने कमी गर्दीच्या गाडीत चढून पेपर अर्धवट का हो‌ईना दुमडून वाचता येण्याचं सुख अनुभवता येतं आम्हाला. तर नेहमीच्याच शिरस्त्याने मोक्याची जागा पकडून उभी राहीले. (मोक्याची जागा म्हणजे ठाणावाल्यांचा धक्का अंगावर येणार नाही + कोणी सतराशे साठ वेळा "जरा प्लीज बॅग ठेवा... ह ह सरळ ठेवा रस भाजी आहे सांडेल.. असं म्हणत आपला हमाल करणार नाही अशी जागा पटकावणे). पेपर हातात घे‌ऊन, मोबा‌ईल गळ्यात अडकवून आणि बॅग वर ठेवून स्थिरस्थावर झाले. पेपर वाचायला घ्यायचा म्हणजे सुरवातीला नुसता चाळायचा आणि सविस्तर वाचण्यासारखं काय काय आहे ह्याची नोंद मेंदू नावाच्या संगणकात करायची, दादर ये‌ई पर्यंत हे सविस्तर वाचन प्रकरण पण संपवायचं हा ही नेहमीचाच शिरस्ता कारण दादरला बसायला मिळालं की तो वेळ शब्दकोड, सुडोकू ह्या करताचा राखून ठेवलेला वेळ.

तर अगदी काहीही बदल न होता तसच कालच्या पानावरुन पुढे नेहमीच्याच ठरलेल्या शिस्तीत ठरलेल्या वेगाने पार पडत होतं. तेव्हढ्यात हातातल्या वर्तमान पत्रातून "ते" जाहीरातीचं पान खाली पडलं. समोर बसलेलीने उचलून दिल्या बद्दल "धन्यवाद" "नो मेन्शनच्या" मॅनरिझमच्या धड्यांची उजळणी झाली आणि बाकी बातम्या बाजूला ठेवून मी तो जाहीरातीचा कागद वाचायला सुरुवात केली.

दिवाळीच्या वेळी मशरुम सारखी प्रदर्शन उगवत असतात त्यातल्याच एका प्रदर्शनाची जाहीरात होती ती.

"जुने द्या नविन घे‌ऊन जा" अशी सुरुवात करुन पुढे "अपने नसीब के सिक्के को पलटो" म्हणत आपल्या खोट्या नशीबाचे पुरावे म्हणून काही किस्से यादी स्वरुपात घे‌ऊन यायला सांगितले होते.

यादी घे‌ऊन येणार्‍याला "नसीब का सिक्का" बदलून मिळणार असल्याचं छापलं होतं.

मनात म्हंटलं हे पण काहीतरी मार्केटिंग गिमिक दिसतय. पण पाच वर्षा मधे एकदाच लागणारं हे प्रदर्शन चुकवू नये म्हणून केलेलं आग्रहाचं निमंत्रण वाचून कधीही लॉटरी न लागणार्‍या माझ्या मनाने हे गॅंबल खेळून तर बघूयात असा निर्णय उभ्या उभ्या (बसायला दादर सीट् आहे ना म्हणून उभ्या उभ्या) घेऊनही टाकला.

आता तिथे जायचा निर्णय घेतला मग यादी करणं आलं. यादी करायची ठरवल्यावर मग काय? ठेवला मनावर दगड आणि दादरला बसायला मिळाल्यावर शब्दकोडं सुडोकू साठी राखीव असलेला वेळ मी केला ह्या यादीकरता खर्च.

नोकरी, छोकरी आणि मोबा‌ईल हे कायम दुसर्‍याचेच चांगले वाटतात असं ऐकून होते म्हणून ते सोडून बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टींची यादी करायला घेतली.

दिवस मध्य रेल्वेच्या टा‌ईमटेबलने सुरु होतो म्हणून यादीची सुरुवात तिथूनच होणार हे काय वेगळं सांगायला नकोच म्हणा. मुद्देसूद यादी लिहायला सुरुवात झाली. (चवथी सीट असली तरी लिखाणात व्यत्यय येऊ न देण्याचं कसब आता पर्यंत कमावलेलं होतच कोडी सोडवून सोडवून आणि इतर सटर फटर गोष्टी लिहून ते कामी नाही आलं तरच नवल)

तर मुद्दा नंबर १) नशिबवान लोकं जेव्हा फलाटावर लेट येतात तेव्हा लोकल देखील लेट असतात आणि आपण जेव्हा लेट येतो तेव्हा लोकल ऑन टा‌ईम गेलेली असते. मग भलेही ती फलाटापासून फारकत घेतल्यावर चांगली ५ मिनिटं टुक टुक करत तश्शी उभी राहील. आपण दुसर्‍या लोकलची वाट बघत हळहळण्या पलिकडे काहीही करु शकत नाही

२)नशिबवान लोकांना जंप न करता विनासायास बसावयास मिळते. आपण जंप मोड मधे जातो तेव्हा एकतर कोणीतरी पडते, मधे येते, दार लागते किंवा ट्रेन भलतीच फ़ास्ट येते ह्यापैकी काहीही एक होते

३) आपण तिसरी सीट पकडून हुश्श होतो तेव्हा चवथ्या सीटवर आपल्या दुप्पट तिप्पट वजनाची असामी ये‌ऊन टेकते आणि.. पुढे सांगायलाच हवं का?

४) आपण लॉटरी लागल्याच्या आनंदात सटी सहामासी मिळणाऱ्या विंडो सीट वर बसण्याचा आनंद चेहर्‍यावर बाळगत स्वत:वरच खुष होतो तेव्हा नेमकं बाजूचीला झोप अनावर होते आणि कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? ह्या गाण्याचा वाक्यात उपयोग करत ती आपल्या खुषीला सुरुंग लावते

५) मुंब‌ईच्या ह्या ला‌ईफ ला‌ईन म्हणजे लोकल मधे काय विकायला येत नाही ते विचारा! पण आपल्याला एखादी गोष्ट हवी असते तेव्हा मात्र संपावर गेल्यासारखा एकही फेरीवाला फिरकत नाही.

येव्हढच काय पण आपण भुकेने व्याकूळ हो‌ऊन भेळवालीची वाट बघावी तर तिला नेमकी समोरच्या ट्रेन मधे चढायची बुद्धी होते

लोकल च्या प्रवासात दिवसाचा बराच काळ जात असल्याने लोकलचेच अनुभव पटकन फ्लॅश होतात मेमरी कार्ड मधून.

पण नसीब के सिक्को का ये सिलसिला इथेच थांबत नाही. तुम्ही "दे धक्का" म्हणत जीव, बॅग सांभाळत तुमच्या मुक्कामाच्या ठिकाणी उतरता. ठरलेले भाजी फळ फुलपुडी असे नित्य नेमाचे थांबे घेत घरी येता. चपला काढता काढता तुम्ही पहीले "लेकीच्या/ लेकाच्या दिवसभराच्या कवतिकाचा पाढा ऐकता" अर्थात सवयीचा झाल्याने तो काही फारसा डिस्टर्ब करत नाही तुम्हाला आताशा. पण सगळं आवरुन होतं आणि तुम्ही टेलिव्हिजन बघायला टेकणार तेव्हाच सुपुत्राला/ सुपुत्रीला आठवण होते दुसर्‍या दिवशी न्यायच्या क्राफ्ट ची, संपलेल्या वहीची किंवा अजून कुठल्या अलाणा फलाणा वस्तूची. अशा वेळी "हक्काचा एकमेव" घरात असेल तर बरं पण त्याचं नशीब जोरावर आणि तुमचं नशीब फिरलेलं असेल तर तो ना‌ईट शिफ्टला गेलेला असतो की मग तुम्हालाच पुन्हा बाहेर पडावं लागतं.

आधी नाही का सांगता येत हे वाक्य नेहमी प्रमाणे फुसकं ठरतं. समोरचा बालजीव कसनुसा चेहरा करण्यात पटा‌ईत झालेला असतो तुम्ही त्या निरागस भासणार्‍या चेहर्‍याकडे बघताना ढेपाळता मग तुमचा राग क्षणात हवा गेलेल्या फुग्यासारखा फ़ुस्स हो‌ऊन जातो.

येव्हढ्यावरच हे नशीब प्रकरण थांबत नाही. तर बाकीही बर्‍याच गोष्टीत ते आपापला ठसा उमटवूनच जाते.

आता हेच बघा ना, आमची इन्व्हर्टरची बॅटरी अडीच वर्षातच बदलायची वेळ आली. आता आमचे शेजारी मिस्टर ढगे त्यांनी नेमकं आमचं आणि आमच्या इन्व्हर्टर वाल्याचं बोलणं ऐकलं आणि जाता जाता आम्हाला ऐकवलं "आमची बॅटरी ५ वर्ष चालतेय, काही एक झालं नाही" आता बोला? नेमकी आमचीच बॅटरी अशी निघावी?

बाया आपापल्या मुलांचे हुशारीचे आणिक कसल्या कसल्या परिक्षांमधल्या यशाचे कवतीक करत असताना आम्ही आमची होमवर्क करुन घेतानाची दमछाक आठवतो. इतर बाया "स्वत: नी आणलेल्या गिफ्टा" दाखवताना आम्ही मनात "काय पण फेकते झालं" अशी समजूत घालून उसासतो.

कामवाली बा‌ई हा एक वेगळाच संशोधनाचा विषय आहे. कामवाली म्हंटली की ठरलेल्या वेळेवर न येणं, अचानक दांडी मारणं, आपल्या बाथरुम मधे बसून भांडी घासण्यापूर्वी दहा एक मिनिटं मनसोक्त मशेरी लावणं किंवा किमान पक्षी तोंडात तंबाखुचा बार भरणं, उसने पैसे मागणं हे सगळं कमी अधिक प्रमाणात डिफॉल्ट सेटींग मधेच असतं

नशीब बलवत्तर तर एक गेली की दुसरी कामवाली लिलया मिळवू शकता तुम्ही.

आणि आमच्या नशीबा सारखं नशीब असेल तर दिया लेके ढुंढोगे तो भी को‌ई टिकने वाली कामवाली नही मिलेगी. एक गेली की दुसरी मिळेपर्यंतच्या काळात तुम्हीच काम करता म्हणून जीम लावायची गरज भासत नाही आणि तेव्हढे पैसे वाचतात हाच काय तो फायदा असं आपण मनाला समजावतो पण नसीब के सिक्के वाल्या यादीत ह्या गोष्टींचा देखील समावेश होतो.

नशीबवान लोकं ऑफिसच्या खर्चाने महिन्या दोन महिन्यातून एकदा तरी कुठे ना कुठे ट्रिपा करतात. अरे हो त्याला ट्रिपा नाही म्हणत त्याला सा‌ईट व्हिजिट नाहीतर ऑफिशि‌अल टूर असं म्हणतात. ह्या टूरची टूर टूर ब्लॉग वर, फेसबुकावर पब्लिश करुन वर आणिक फोटो टाकून ते तुमच्या जीवाला उगाचच हुरहुर लावतात.

नशीबवान लोकं डा‌एट की ऐसी की तैसी म्हणत वाट्टेल ते हादडतात तरीही फिगर झिरो मेंटेन करतात आणि आम्ही? हवा खाल्ली तरी तुंदिलतनूच. त्यातल्या त्यात फायदा एकच बि‌इ‌एस्टी च्या बसेस मधे रांग मोडून पुढल्या दरवाजाने आरामात चढता येते.

नशीबवान लोकांनी बो‌अरवेलचं पाणी वापरलं तरी त्यांचे केस ग़ळत नाहीत आणि आमचे गॉन केस कोणत्याही उपायाने परत येत नाहीत. त्यांनी ५०१ बारने जरी अंग घासले तरी त्यांची त्वचा म‌ऊ मुलायमच रहाते आम्ही पि‌अर्स लावा, डोव्ह लावा किंवा दुधाने अंघोळ करा मुलायम त्वचा आमच्याशी फटकूनच रहाते.

तर अशी भली थोरली मारुतीच्या शेपटी सारखी वाढत जाणारी यादी घे‌ऊन मी त्या प्रदर्शनात पोहोचले. "अबबब! येव्हढे कमनशिबी लोकं माझ्याच गावात रहातात?" रांग बघून हे मनात आल्याशिवाय राहिल नाही. तरीही नेटाने माझा नंबर रांगेत कितवा हे मोजायचा एक असफल प्रयत्न करुन पाहीला.

माझा नंबर येईपर्यंत "सिक्के" संपणार तर नाहीत ह्या शंकेची पाल मनात चुकचुकून गेली.

रांगेतल्या पब्लीक ला शिस्त लावता लावता पांडू काकांच्या तोंडाला फेस यायचा बाकी राहीलेला.

बाहेर पार्किंगचा फारच् लोचा झालेला. पार्किंग व्यवस्था बघणार्‍या "मामांना" आधीच् "सिक्का" बदलून् मिळाला असावा असं वाटायला वाव होता.

आम्ही आपले ११ नंबर बसवासी, त्यामुळे मामांच्या दृष्टीने य:किंचीत जीव. मामा आणि पांडू जीगरी दोस्त त्यामुळे पांडूच्याही दृष्टीने आम्ही य:कींचीत जीव. परत त्याचं "नसीब् बदलवणार्‍या सिक्क्या" मधे आमचं स्थान म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन.

पांडूचं नशीब बदललं की रांगेतलं स्थानही बदलतं हे कळून देखील आम्ही जैसे थेच.

"उम्मीद पे दुनिया कायम है" चा मंत्र जप मनात करत आम्ही डटके तिथेच उभे आमचा नंबर येण्याची वाट पहात

अचानक आमच्या रांगे मधून एक चेहरा रांग सोडून बाजूला होतो. त्याच्या पाठोपाठ त्याचे मित्र् का सगे सोयरे का आणखी कोणी जे असतात ते बाहेर पडतात् आणि आमचा नंबर ध्यानी मनी नसताना एकदम पुढे सरकतो.

मनातल्या मनात त्या निस्वार्थी जीवांना धन्यवाद द्यायला हवेत वाटून् त्यांच्या दिशेने बघते तर् जाणवतं ह्यांना कुठेसं पाहिलय्. नातेवाईक् मंडळींपैकी हे नव्हेत्, मित्रपरिवारा पैकीही हे नाहीत् ह्याची खात्री असते. पण् मग् हे कोण् ते आठवायला खुपच् ताण् द्यावा लागतो डोक्याला. अगदी अस्सं तोंडावर् नाव् आहे पण्.. असं म्हणतो तसं ह्यांच्याबाबतीत् नेहमीचा बघण्यातला चेहरा आहे पण्... असं वाटत् होतं

बराच वेळ ताण दिल्यावर प्रकाश पडला अरे हे तेच्.. प्रसिद्ध व्यक्तीमत्व आमच्या भागातलं. ज्यांचा नुकताच वाढदिवस झाला. आमच्या भागात त्यांच्या "हारदिक अभिनन्दणाचे" फलक लागलेले.

तितक्यात् ते अभिनंदनिय व्यक्तीमत्व आमच्या जवळ येतं. मग नमस्कार चमत्कार होतात. आमची यादी हातात घेऊन् ती वाचून् त्यावर आस्थेने चौकशी होते.

"काळजी करु नका ताई आपलाच स्टॉल आहे हा. पब्लीकला "सिक्का" मिळावा म्हणून आम्ही रांगेतून बाजूला झालो ना" म्हणत गणप्याला आम्हाला सगळ्यांना सिक्के द्यायचं बजावलं जातं.

जन्तेची काळजी बघून आमचं काळीज गलबलतं. "देवा ह्यांना पण् सिक्का दे रे बाबा" असं मागणं सगळ्यात वरच्या आकाशातल्या बापाकडे मागून आम्ही मोकळे होतो.

आमचा नंबर् पुढे सरकत असतानाच माझ्या लक्षात येतं

१)लोडशेडींग मुळे हैराण होणं

२)अपुर्‍या पाणी पुरवठ्यामुळे बाहेरुन स्वखर्चाने मागवावा लागणारा टँकर्

३)वाढती महागाई

४)सगळ्यातली भेसळ

५)जागोजागीचा कचरा, खड्यातले रस्ते

ह्या काही गोष्टी यादीत मी लिहायलाच विसरलेय. तोपर्यंत एकतर माझा नंबर जवळ आलेला असल्याने शिवाय "नको बॉ उगाच अजून किती यादी वाढवत न्यायची" असा मध्यम मार्गी विचार उगाचच् टोकायला लागल्याने मी राहुद्या झालं म्हणत् तशीच् आहे ती यादी घेऊन् उभी राहीले.

जेव्हा खरोखरीच् तो "नसीब् बदलने वाला सिक्का" हाती लागला तेव्हा अगदी "आजमे उपर् आसमा नीचे" म्हणत नाचावसं वाटलं. एकदिवस जरी "सिक्का" खरा निघाला तरी खूप् झालं- नेहमीच्या सावध पवित्रा घेणार्‍या मनाने त्यातही हे मत् नोंदवून् घेतलच्.दुसर्‍या दिवशी नेहमीच्या शिरस्त्याने वर्तमान पत्र घे‌ऊन फलाटावर आले तर गाडी यायची होती. फलाटावर विशेष गर्दी देखील नव्हती. ठाण्याला उतरणार्‍यांनी दरवाजा अडवून न ठेवल्याने कुठेच नि कोणालाच धक्का बुक्की (शाब्दीक नि शारिरीक दोन्ही) न करता ट्रेनमधे अलगद आत आले. आत घाटकोपर सीट मिळाली (नाही निसीब का सिक्का बिक्का असला तरी डोंबिवलीला चढल्या चढल्या बसायला मिळणे किंवा ठाण्याला बसायला मिळणे इतकीही फ़ॅन्टसी बरी नव्हे)

ट्रेन वेळेवर पोहोचली. संध्याकाळी जंप न करता विनासायास बसायला मिळालं. कुणाच्या खांद्यावर... गाणं आळवावं लागलं नाही आणि आरामात प्रवास झाला. उतरताना "दे धक्का" करावा न लागता सुखरुप उतरले.

घरी आले तर लेकीने अभ्यास संपवून दप्तर भरुन ठेवलेलं, खेळ आवरुन जागेवर गेला होता.

कामवाली न कुरकुरता कामावर आल्याचं समजलं.

नवरोबाने सरप्रा‌ईझ म्हणून मोगर्‍याचा गजरा आणलेला (इथेही मोगर्‍याचा गजरा हिच आमची फ़ॅन्टसीची शिकस्त)

नेहमीचा "कहानी घर घर की" चा एपिसोड न लागता त्याजागी "तुझ्या गळा माझ्या गळा" ची कॅसेट वाजत असलेली बघून मन भरुन आलं.

दिवस संपला तसं लिहायच्या राहून् गेलेल्या "त्या" गोष्टी टाकायला हव्या होत्या असं वाटून् हळहळायला झालं.

"सिक्क्याची एक्पायरी डेट् बघून् घ्या" असा वैधानिक् इशारा छापलेला होता त्या जाहिरातीत, हे लेक मॅग्निफाईंग ग्लासचे उपयोग करत होती म्हणून ध्यानात् आलं. तसही वैधानिक इशारे हे मॅग्निफाईंग ग्लासने बघितले तरच दिसावेत असेच छापावे लागतात. तरच त्यांना वैधानिक इशारा असा दर्जा प्राप्त होतो.

आता परत वाट बघायची प्रदर्शन लागायची म्हणत मी नव्याने लागलेले "अभिनन्दणाचे" फलक वाचत रस्ता क्रॉस केला आणि पळणार्‍या घडाळाच्या काट्यांबरोबर् स्वत्:ला पळवत् लोकल गाठायला फलाटावर् धावले.


बुधवार, २६ सप्टेंबर, २०१२

प्रार्थना


करिते मी धावा । संकट निवारा ।
भयमुक्त करा । गजानना ॥

चिंता क्लेष माझे । जाणसी तू सारे ।
रक्षण करावे । विघ्नहारा ॥

थकले हारले । मोडून पडले ।
शरण मी आले । सावरावे ।

ठरेना वादळ । भरकटे तारु ।
सुखरुप न्यावे । पैलतिरा ॥

तुच माझा राम । तुच माझा शाम ।
सगुण स्वरुप । चैतन्य तू ।

स्विकारुनी सेवा । आशिर्वाद द्यावा
सुखी व्हावे सर्व । आप्तजन ॥

मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१२

प्रार्थना

जा‌ऊ दे जळून । अमंगल सारे।
रुजू दे विचार । मांगल्याचा॥

क्षमा अनुकंपा । कणा जीवनाचा।
कळोनी वळावे । माझ्या मना॥

मत्सराचे विष । सर्वांत जहाल।
हो‌ईल निष्प्रभ । तुझ्या कृपे॥

चुका ह्या होतात । पदोपदी माझ्या ।
बुद्धी दे त्यातून। शिकण्याची॥

हाची आशीर्वाद । द्यावा मला देवा ।
दांभिकता मना । शिवू नये॥

एक विनवणी । तुझ्या चरणाशी ।
वृथा अहंकार । लोप पावो ॥

चुकले माकले । लेकराचे काही ।
सांभाळूनी घ्यावे । देवा तुची ॥

यथामती केली । प्रार्थना जी देवा ।
मानुनिया गोड । स्वीकारावी ॥

शुक्रवार, २२ जून, २०१२

एक उत्तर नसलेला प्रश्नशेवटचा अध्याय
कधीचाच सुरु झालाय
हे कळलंय केव्हाच,
पचवलय ही हळू हळू
पण नेमकी किती प्रुष्ठसंख्या?
हेच तेव्हढं ज्ञात नाही
अज्ञानातत सुख असतं
असही म्हणता येत नाही
प्रत्येक क्षणीचा हा ताण
टाळताही येत नाही
नी विश्वास टाकून तुझ्या वर
निर्धास्त होणं जमत नाही
काय करु? तुच सांग

मंगळवार, १९ जून, २०१२

उरले केवळदु:ख साहणे उरले केवळ
श्वास मोजणे उरले केवळ
लिहून ठेवीले सटवाईने
तेच भोगणे उरले केवळ
हताश झाले जरी कितीही
आस उद्याची सुटली नाही
"उद्या" न येई तरी उद्याची
वाट पाहणे उरले केवळ
पतंग कटता आकाशी मग
दिशाहीन भरकटतो तो ही
वार्‍यावरती भिस्त ठेवूनी
बघत राहणे उरले केवळ

सोमवार, २१ मे, २०१२

द्वंद्व


"हे आजकाल नेहमीचच झालय तुझं"

"हेऽऽ म्हणजे?"

"हे म्हणजे हेऽच. दरवेळी फिरुन तू स्वत:मधे त्या कॅरेक्टरला कोंबतेस अक्षरश: आणि.."

"आऽऽणि काय? नाही बोलच तू आता. इतके दिवस तुझ्यामुळेच लिहित नव्हते."

"मी कधी म्हणाले तुला लिहू नकोस म्हणून. हे बरय आपलं फाडलं बील माझ्या नावावर.."

"बोलली नव्हतीस गेल्यावेळी? तेच नी तेच विषय बास झाले, काही वेगळा विषय वेगळी अनुभुती असेल तर लिही म्हणून?"

"मग काय चुकीचं बोलले होते का मी?"

"नाही पण बाईसाहेब सांगा की मज पामरास, आणू कुठुन वेगळा विषय?"

"परकाया प्रवेश कराऽ की जरा मॅडम"

"आता केलाच होता ना प्रयत्न गेल्या वेळी एका कथेत. तर काय म्हणालीस?"

"ती त्या वत्सलेचीच ना कथा? आयुष्यावर बोलू काही वाली. मला नको सांगू कौतुक त्या कथेचं. किती वेळा शेवट बदललास?"

"होऽ बदलला, पटतच नव्ह्ता दरवेळी म्हणून बदलला."

"आणि शेवटी काय केलस? कोंबलस त्या वत्सलेला तुझ्यामधे. तुझा पिंड आशावादी आहे म्हणून काय कॅरेक्टरने पण तसच वागायचं? दाखव की तिला वेगळी. मुळात एखादी गोष्ट राहिली अधांतरी तर बिघडलं कुठे? एखाद्या चौकातून चार दिशांना चार रस्ते जातात आणि तुझं कथेतलं पात्र निवडतं तुला त्यातला जो रस्ता आवडतो तोच. का नाही चालुन बघत बाकिच्या रस्त्यांवरुन? सांग ना."

"अगं पण मी लिहितेय म्हणजे मीच निवडणार ना त्यांचा मार्ग?"

"अऽब आऽऽया ऊंऽट पहाड के निचे. मी तेच सांगतेय कधीची तू स्वत:ला त्यांच्यात कोंबतेस नी निर्णय घेतेस. निर्णय तू घेतेस. ते कॅरेक्टर निर्णय घेत नाही. लक्षात येतोय का फरक तुझ्या? तू लिहित्येस म्हणून "अमका" शेवट पण जर तुझ्या ऐवजी "क्ष" व्यक्ती लिहित असती तर..? सांग ना? तर वेगळा पण असता ना शेवट तू केलेल्या शेवटा पेक्षा? तू कॅरेक्टरच्या अंतरंगात शिरुन शेवट केलास हा दावा चूक आहे खरतर. त्या कॅरेक्टरच्या चपलेत तू तुझे पाय नाही घातलेस, त्या कॅरेक्टरचे पायच तुझ्या चपलेच्या मापाने बनवलेस तुझ्याही नकळत."

"मला नाही पटत तुझं म्हणणं"

"पटत नाही की रुचत नाही? का दिलास त्या कथेला आशावादी शेवट? तुला त्या नोटवर संपलेली आवडते कथा म्हणूनच ना? का नाही वेगळा शेवट केलास कथेचा?"

"वेगळा म्हणजे?"

"वेगळा म्हणजे तुझ्या वृत्तीपेक्षा वेगळा. मग भले तो शेवट तुला स्वत:ला पटो न पटो"

"माझ्या पटण्या न पटण्याचा काय संबंध? माझ्या मते ती त्या वत्सलेचीच मत होती. मी तिच्याच जातकुळीत शिरायचा प्रयत्न केला म्हणूनच शेवट बदलला नी आशावादी केला"

"...."

"हसलीस का? काऽऽ हसलीस? टु हेल वीथ यु. तू कोण आहेस शेवटी? काचेच्या तुकड्यात दिसणारी माझी एक प्रतिमा. जाऽऽ मी तुला महत्वच देत नाही. मी आरशा समोर उभं राहून बघते म्हणून तू बोलू शकतेस. मी नाहीच बघितलं तर..."

"........"

"हसू नकोस अशी."

"......."

"तुला सांगितलं ना एकदा हसू नकोस अशी. मीऽऽ मी आरसाच फोडुन टाकेन नाहितर."

-------

खळ्ळ्कन आवाज येतो. आरसा फुटतो. फुटलेल्या तुकड्यांमधे कानावर हात ठेवून उभी असलेली ती एसेमेसच्या रिंग ने दचकून जागी होते नी नेहमीप्रमाणे केरसुणी आणायला पॅसेजमधे जाते.
मंगळवार, १५ मे, २०१२

सांत्वन


जेव्हा जेव्हा कोणाकडे समाचाराला जायचा प्रसंग माझ्यावर येतो तेव्हा अजूनही माझ्या पोटात तितकाच गोळा येतो, घशाला कोरड पडते, नेमके शब्द सापडत नाहीत. मग भले ती व्यक्ती जवळची असो.


येणारा प्रत्येक जण "काय झाल? (असं) कसं झालं? फार वाईट झालं होऽऽ" ही नी अशाच प्रकारची वाक्य फेकत असतो समोरच्याच्या तोंडावर. कॅसेट रिवाईंड प्ले सारखे तेच ते प्रश्न तिच ती उत्तरं .. कंटाळा येत असेल नाही कधीतरी ज्याच्या कडे समाचाराला जातो त्या व्यक्तीलाही ह्या सगळ्या उपचारी गोष्टींचा? नेमका असाच काहीसा विचार मनात येतो नी मग समाचाराला गेल्यावर सगळे "काय झालं... कसं झालं..?" वाले प्रश्न घशातच अडकतात.

पण अशा प्रसंगातही आपलं वेगळं व्यक्तीमत्व, आपली वेगळी ओळख जपणारे काही असतात. नुकतेच माझ्या वाट्याला आलेले हे निवडक अनुभव.

प्रसंग १:- वेळ दुपारची बारा

"येऊ का?" एक लांबच्या नात्यातल्या काकू

"जेवायला बसत होतात का? चुकीच्या वेळी आले वाटतं मी. ह्या बाजूला आलेच होते म्हंटलं जाऊन यावं" पुन्हा एक पुस्ती काकुंची

"नाही नाही या ना, आम्ही सध्या आलटून पालटून जेवतो. सवय झालेय आता" मी

"आजारी होते का?" काकू

हा एकच प्रश्न, माझं १-२ वाक्यात उत्तर आणि मग बाकी सगळं संभाषण निरनिराळ्या ट्रॅक वरुन धावत धावत "अमका पण गेला, तमक्याची मुलगी पळून गेली, अजून कोणा अबक च्या मुलाने काय काय उपद्व्याप केले पासून ते थेट राजकारणाचं काय खरं नाही पर्यंत" सर्व विषयांना सर्व बाजुंनी स्पर्श करत आमचे तीन तास खर्ची घालत चालूच.

त्या "कि करुऽऽ पेट्रोल खतम ही नही होंदा" वाल्या जाहिराती सारखी ह्यांची गाडी चालूच.

"नाही पाणी नको मला. नाही तसं मी काही पाळत वगैरे नाही, की समाचाराला गेल्यावर तिथलं पाणीही पिऊ नये वगैरे.. पण नको" ह्या वाक्याने माझ्या हातातल्या पाण्याच्या ग्लासला बाजुला सारत शेवटी त्यांच्या गाडीचं इंजीन चहा नामक गरम पाणी पिऊन निघालं तेव्हा आम्ही खरतर हुश्श केलं.

अरे तुम्ही समाचाराला आलायत ना? मग चालेल तेच ते का?कधी?केव्हा? कसं वाले प्रश्नसंच विचारलेत तरी. पण कोण कुठच्या लांबच्या नातेवाईकांचा हा खबरनामा नको, असं म्हणायची वेळ येते.

असाच अजून एक वेचक प्रसंग एका नातेवाईक बाईंनी सांत्वन करयला फोन लावलेला तेव्हाचा...

संभाषणाची सुरुवात ठराविक पद्धतीनेच "काऽऽय झालं अचानक? आजारी होते का?" इ.इ.इ. ड्रेस कोड टाईप प्रश्नाने.

माझ्या मनात आतापर्यंतच्या अनुभवाने पुढचा प्रश्न त्यावर माझं छापील उत्तर सगळं तय्यार एकदम.

पण इथे तिनेच "गाईड प्रश्नावली" बाजुला ठेवून गुगली प्रश्न पुढ्यात टाकलेला. "काल तीऽऽ म्हणजे होणारी सुनबाई आलेली असं ऐकलं? खरय का?" ह्या अनपेक्षित हल्ल्याने मी एकदम गार.

प्रसंग काय? तुम्ही विचारताय काय? बरं तेव्हढ्या एका प्रश्नावर समाधान नाही होत. मग अजुन प्रश्न "ती कोण? कुठली?" कोण म्हणजे कोणत्या जातीची पातीची इ. इ. मग हा आंतर जातिय विवाह आहे कळल्यावर सुरु गोसिपंग टाईप प्रश्न एकावर एक.

अरे हे सगळं सविस्तर विचार की पण पुढच्या महिन्यात. आत्ताचे १३ दिवस तर सोडा की त्यातून. ही नक्कीच "खबरे अभी बाकी है, देखते रहिये आजतक" मधे रिपोर्टर म्हणून लागली असती.


असाच अजुन एक प्रसंग, माझी मावशी गेली तेव्हाचा, मला आत्ताही जसाच्या तसा आठवतोय.

झालं असं होतं की तिच्या दोन मुलींपैकी एक जण मोकळेपणाने रडत होती आणि दुसरी जे काही कढ येत होते ते मनात दाबून बाकिच्यांना धीर देत होती. तिचेही डोळे सहाजिकच भरुन येत होते पण तिचा पिंड एकटं असताना/मोजक्या जवळच्या गृप मधे मोकळे पणाने व्यक्त होण्यातला होता. मावशीच्या इमारतीतल्या कोणा एका बाईने तिला आपल्या मिठीत घेत "तू रो ले, तू रो ले एक बार जोरसे आवाज कर" असं म्हणत जे तिला जवळ जवळ धमकावलं ते बघुन मला तिला माझ्या मावज बहिणी विषयी वाटणाऱ्या काळजीपेक्षाही जास्त धास्ती वाटायला लागली. अग बाई, दु:खी ती ही झालेय पण तिची व्यक्त व्हायची पद्धत वेगळी असेल की. आणि त्यातून काही वाटलं तर नंतर सगळे गेल्यावर घे जवळ तिला नी कर मोकळ तिच्या दु:खाला. असं इमारतीच्या खाली सगळी मंडळी असतानाच रडली म्हणजे मोकळी होईल का ती? त्यावेळी त्यांच्या त्या शेजारणीला तरी तसं वाटत होतं हे नक्की.

दरवेळी समोरची सांत्वन करायला आलेली व्यक्तीच पेचात पाडते/ हैराण करते असं नाही हं अजिबात.

कधी कधी सांत्वन करायला आलेली व्यक्तीही "अब मै क्या करु" ह्या संभ्रमात पडते.

आमचे इनामदार सर त्या दिवशी अशाच गोंधळात पडले होते. झालं असं की बाबा गेल्याचं कळलं म्हणुन ते भेटायला आलेले. सुरवातीची चौकशी झाली. नंतरची पाच एक मिनिटं दोन्ही कडून शांततेत गेली. आणि मधेच माझ्या आत्याला आणि चुलत बहिणीला कसलीशी कैक वर्षांपुर्वीच्या कुठल्याश्या प्रसंगाची आठवण झाली. ह्या विषयीच्या आठवणीला सुरुवात कोणत्या शब्दाने झाली ते काहीच आठवत नाही. पण हळू हळू "बाबा, आत्या, ताई आणि त्यांचं गिरिगाव" अशा आठवणीं मधे काही गमतीशीर आठवणी पुढे आल्या आणि आत्ता आत्ता पर्यंतचा "हो ना हो, निदान मुलाचं लग्न तरी बघायला हवं होतं.. पण.." असा दु:खी स्वर बदलत बदलत चक्क हास्यपेरणीला सुरुवात झाली.

इकडे सरांची चुळबुळ सुरु झाली. "आता माझा रोल काय? निघावं का? आणि समोरच्यांना आठवणींमधुन बाहेर काढून येतो आता हे कसं सांगाव?" हे भाव मला सरांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. शेवटी मी आणि भावाने विषय बदलून त्यांची सुटका केली. पण त्यांची त्यावेळी सांगताही येत नाही... टाईप अडचण झालेली खरी.


आता हे सगळे प्रसंग, मला त्यातलं काही तरी खटकल्यामुळे म्हणा किंवा त्या प्रसंगात वेगळे वाटल्यामुळे म्हणा लक्षात राहिलेले. माझी स्वत:ची मात्र अशा प्रसंगी कोणाचं सांत्वन करायला जायची वेळ आली की फारच गाळण उडते. अशा वेळी शब्द पोकळ असतात हे ठावूक असतं त्यामुळे इतरवेळी चटरपटर करणारे ओठ सुईदोऱ्याने शिवल्यासारखे मिटले जातात. मग उरतो फक्त स्पर्श. पण स्वानुभवातून सांगते अशावेळी फक्त एक नजर, हातावर थोपटलेला हलकासा हात देखील पुरतो. शब्दातून सांत्वन करायची गरज इतरांना भासते. जे आपले असतात त्यांच्या देहबोलीतूनच सांत्वन व्यक्त होत असतं, नाही का?


शुक्रवार, २० एप्रिल, २०१२

ek kavitaa

सांग तुझ्या मनामधे
असे काय खुपतसे
का रे बहराच्या वेळी
पानगळ सतावते?

मळभ हे कोणते जे
मनभर पसरते
असे कोणते ग्रहण
वर्तमान झाकोळते?

कर स्मृतींची निर्माल्य
सोड हळूच पाण्यात
पुजा आजच्या क्षणाची
कर मन गाभाऱ्यात

मग होईल मोकळे
डोईवरचे आभाळ
आणि बहरेल पुन्हा
झाला ओसाड जो माळ

शुक्रवार, ६ एप्रिल, २०१२

एक उत्तर नसलेला प्रश्नदेवा, तू खरच खुप चतुर आहेस
मनात अपराधी भाव राहू नयेत
म्हणुन ना जाण्यापुर्वी तू नात्यांचे पीळ सोडवलेस?

अरे, पण आता मी काय करु?
अजुन बरीच नाती आहेत
पीळ कायम असलेली
पीळ सुटला की नात्यांचे बोटही सुटतेय
असा अंध का म्हणेनास पण विश्वास बसत चाललाय

त्याचे काय?

तुझ नसणं

तुझ नसणं आता

मनानेही स्विकारलय

पाऊलखुणांचा वेध घेण
तर केव्हाच बंद झालय

आठवांच्या कणांना
मी कधीचं मुक्त केलय

एखादा चुकार क्षण
वळिव बनुन बरसतो
इतकच

बाकी काहीच नाही

रायटर्स ब्लॉक

काय गं रायटर्स ब्लॉक सतावतोय का?
काही लिहीलं नाहीस बरेच दिवसात?

तिच्या प्रश्नावर माझा मोठ्ठा पॉज

काय सांगणार तिला?
पुर्वी बरच काही खदखदायचं
एका क्षणी मग उतु जायचं

तितक्या तीव्रपणे आता
खदखदतच नाही
मनाचा तळही
ढवळून निघत नाही

तू म्हणतेस,
"काही लिहिलं नाहीस बरेच दिवसात?"

आणि आई म्हणते,
"रुळली माझी बाय शहरात"