मंगळवार, १५ मे, २०१२

सांत्वन


जेव्हा जेव्हा कोणाकडे समाचाराला जायचा प्रसंग माझ्यावर येतो तेव्हा अजूनही माझ्या पोटात तितकाच गोळा येतो, घशाला कोरड पडते, नेमके शब्द सापडत नाहीत. मग भले ती व्यक्ती जवळची असो.


येणारा प्रत्येक जण "काय झाल? (असं) कसं झालं? फार वाईट झालं होऽऽ" ही नी अशाच प्रकारची वाक्य फेकत असतो समोरच्याच्या तोंडावर. कॅसेट रिवाईंड प्ले सारखे तेच ते प्रश्न तिच ती उत्तरं .. कंटाळा येत असेल नाही कधीतरी ज्याच्या कडे समाचाराला जातो त्या व्यक्तीलाही ह्या सगळ्या उपचारी गोष्टींचा? नेमका असाच काहीसा विचार मनात येतो नी मग समाचाराला गेल्यावर सगळे "काय झालं... कसं झालं..?" वाले प्रश्न घशातच अडकतात.

पण अशा प्रसंगातही आपलं वेगळं व्यक्तीमत्व, आपली वेगळी ओळख जपणारे काही असतात. नुकतेच माझ्या वाट्याला आलेले हे निवडक अनुभव.

प्रसंग १:- वेळ दुपारची बारा

"येऊ का?" एक लांबच्या नात्यातल्या काकू

"जेवायला बसत होतात का? चुकीच्या वेळी आले वाटतं मी. ह्या बाजूला आलेच होते म्हंटलं जाऊन यावं" पुन्हा एक पुस्ती काकुंची

"नाही नाही या ना, आम्ही सध्या आलटून पालटून जेवतो. सवय झालेय आता" मी

"आजारी होते का?" काकू

हा एकच प्रश्न, माझं १-२ वाक्यात उत्तर आणि मग बाकी सगळं संभाषण निरनिराळ्या ट्रॅक वरुन धावत धावत "अमका पण गेला, तमक्याची मुलगी पळून गेली, अजून कोणा अबक च्या मुलाने काय काय उपद्व्याप केले पासून ते थेट राजकारणाचं काय खरं नाही पर्यंत" सर्व विषयांना सर्व बाजुंनी स्पर्श करत आमचे तीन तास खर्ची घालत चालूच.

त्या "कि करुऽऽ पेट्रोल खतम ही नही होंदा" वाल्या जाहिराती सारखी ह्यांची गाडी चालूच.

"नाही पाणी नको मला. नाही तसं मी काही पाळत वगैरे नाही, की समाचाराला गेल्यावर तिथलं पाणीही पिऊ नये वगैरे.. पण नको" ह्या वाक्याने माझ्या हातातल्या पाण्याच्या ग्लासला बाजुला सारत शेवटी त्यांच्या गाडीचं इंजीन चहा नामक गरम पाणी पिऊन निघालं तेव्हा आम्ही खरतर हुश्श केलं.

अरे तुम्ही समाचाराला आलायत ना? मग चालेल तेच ते का?कधी?केव्हा? कसं वाले प्रश्नसंच विचारलेत तरी. पण कोण कुठच्या लांबच्या नातेवाईकांचा हा खबरनामा नको, असं म्हणायची वेळ येते.

असाच अजून एक वेचक प्रसंग एका नातेवाईक बाईंनी सांत्वन करयला फोन लावलेला तेव्हाचा...

संभाषणाची सुरुवात ठराविक पद्धतीनेच "काऽऽय झालं अचानक? आजारी होते का?" इ.इ.इ. ड्रेस कोड टाईप प्रश्नाने.

माझ्या मनात आतापर्यंतच्या अनुभवाने पुढचा प्रश्न त्यावर माझं छापील उत्तर सगळं तय्यार एकदम.

पण इथे तिनेच "गाईड प्रश्नावली" बाजुला ठेवून गुगली प्रश्न पुढ्यात टाकलेला. "काल तीऽऽ म्हणजे होणारी सुनबाई आलेली असं ऐकलं? खरय का?" ह्या अनपेक्षित हल्ल्याने मी एकदम गार.

प्रसंग काय? तुम्ही विचारताय काय? बरं तेव्हढ्या एका प्रश्नावर समाधान नाही होत. मग अजुन प्रश्न "ती कोण? कुठली?" कोण म्हणजे कोणत्या जातीची पातीची इ. इ. मग हा आंतर जातिय विवाह आहे कळल्यावर सुरु गोसिपंग टाईप प्रश्न एकावर एक.

अरे हे सगळं सविस्तर विचार की पण पुढच्या महिन्यात. आत्ताचे १३ दिवस तर सोडा की त्यातून. ही नक्कीच "खबरे अभी बाकी है, देखते रहिये आजतक" मधे रिपोर्टर म्हणून लागली असती.


असाच अजुन एक प्रसंग, माझी मावशी गेली तेव्हाचा, मला आत्ताही जसाच्या तसा आठवतोय.

झालं असं होतं की तिच्या दोन मुलींपैकी एक जण मोकळेपणाने रडत होती आणि दुसरी जे काही कढ येत होते ते मनात दाबून बाकिच्यांना धीर देत होती. तिचेही डोळे सहाजिकच भरुन येत होते पण तिचा पिंड एकटं असताना/मोजक्या जवळच्या गृप मधे मोकळे पणाने व्यक्त होण्यातला होता. मावशीच्या इमारतीतल्या कोणा एका बाईने तिला आपल्या मिठीत घेत "तू रो ले, तू रो ले एक बार जोरसे आवाज कर" असं म्हणत जे तिला जवळ जवळ धमकावलं ते बघुन मला तिला माझ्या मावज बहिणी विषयी वाटणाऱ्या काळजीपेक्षाही जास्त धास्ती वाटायला लागली. अग बाई, दु:खी ती ही झालेय पण तिची व्यक्त व्हायची पद्धत वेगळी असेल की. आणि त्यातून काही वाटलं तर नंतर सगळे गेल्यावर घे जवळ तिला नी कर मोकळ तिच्या दु:खाला. असं इमारतीच्या खाली सगळी मंडळी असतानाच रडली म्हणजे मोकळी होईल का ती? त्यावेळी त्यांच्या त्या शेजारणीला तरी तसं वाटत होतं हे नक्की.

दरवेळी समोरची सांत्वन करायला आलेली व्यक्तीच पेचात पाडते/ हैराण करते असं नाही हं अजिबात.

कधी कधी सांत्वन करायला आलेली व्यक्तीही "अब मै क्या करु" ह्या संभ्रमात पडते.

आमचे इनामदार सर त्या दिवशी अशाच गोंधळात पडले होते. झालं असं की बाबा गेल्याचं कळलं म्हणुन ते भेटायला आलेले. सुरवातीची चौकशी झाली. नंतरची पाच एक मिनिटं दोन्ही कडून शांततेत गेली. आणि मधेच माझ्या आत्याला आणि चुलत बहिणीला कसलीशी कैक वर्षांपुर्वीच्या कुठल्याश्या प्रसंगाची आठवण झाली. ह्या विषयीच्या आठवणीला सुरुवात कोणत्या शब्दाने झाली ते काहीच आठवत नाही. पण हळू हळू "बाबा, आत्या, ताई आणि त्यांचं गिरिगाव" अशा आठवणीं मधे काही गमतीशीर आठवणी पुढे आल्या आणि आत्ता आत्ता पर्यंतचा "हो ना हो, निदान मुलाचं लग्न तरी बघायला हवं होतं.. पण.." असा दु:खी स्वर बदलत बदलत चक्क हास्यपेरणीला सुरुवात झाली.

इकडे सरांची चुळबुळ सुरु झाली. "आता माझा रोल काय? निघावं का? आणि समोरच्यांना आठवणींमधुन बाहेर काढून येतो आता हे कसं सांगाव?" हे भाव मला सरांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. शेवटी मी आणि भावाने विषय बदलून त्यांची सुटका केली. पण त्यांची त्यावेळी सांगताही येत नाही... टाईप अडचण झालेली खरी.


आता हे सगळे प्रसंग, मला त्यातलं काही तरी खटकल्यामुळे म्हणा किंवा त्या प्रसंगात वेगळे वाटल्यामुळे म्हणा लक्षात राहिलेले. माझी स्वत:ची मात्र अशा प्रसंगी कोणाचं सांत्वन करायला जायची वेळ आली की फारच गाळण उडते. अशा वेळी शब्द पोकळ असतात हे ठावूक असतं त्यामुळे इतरवेळी चटरपटर करणारे ओठ सुईदोऱ्याने शिवल्यासारखे मिटले जातात. मग उरतो फक्त स्पर्श. पण स्वानुभवातून सांगते अशावेळी फक्त एक नजर, हातावर थोपटलेला हलकासा हात देखील पुरतो. शब्दातून सांत्वन करायची गरज इतरांना भासते. जे आपले असतात त्यांच्या देहबोलीतूनच सांत्वन व्यक्त होत असतं, नाही का?


1 टिप्पणी:

  1. Kavi,

    No doubt tu farach chan lihites.....infact chan bolte suddha ..... Amhi aiklay school madhe astana.....

    The whole subject is very wel expressed and presented.....

    For me the last four lines startimg from "mag urto fakta sparsh......." are the heart and soul of the entire passage......

    Very wel written......

    God bless U!

    उत्तर द्याहटवा