बुधवार, १२ नोव्हेंबर, २०१४

अ‍ॅनीव्हर्सरी


१५ नोव्हेंबर २०१२

फारच वा‌ईट झालं.
हो ना! चेहरा डोळ्यासमोर येतो तिचा अगदी
नुकतच लग्नं झालेलं बिचारीचं. लग्नाचा अल्बम घे‌ऊन चढलेली म्हणे ती. अल्बम राहीला आत आणि ही बाहेर एका क्षणात
छे! कठीण झालय सगळच आजकाल
गर्दीच इतकी वाढलेय. बरं डोंबिवली ट्रेन्स सोडाव्यात ना जास्तीच्या ते नाही. मग सगळे त्या मस्टरसाठी करतायत आटापिटा पाच नंबरवरुन चढण्याचा.
नाहीतर काय? अजून किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे देव जाणे
------------------------------------------------

१३ नोव्हेंबर २०१३

गेल्या महिन्यात परत आपल्या ट्रेनमधून कोणीतरी पडलं ना? मला हर्षू म्हणाली काल.
हो गं. ९.०३ ला वर्षभरात झालेला हा तिसरा अपघात. स्टेशन मास्तरांना जादा गाड्या सोडण्यासाठी निवेदन दे‌ऊन पण आता सहा महिने उलटून गेले. आपल्याला यांच्या मागे लागायला वेळ नसतो ना याचा फायदा घेतात सगळे.
ह्म्म! खरय गं.
तू का येत नाहीस गाडीला सकाळी?
उशीर होतो आजकाल. पण ये‌ईन उद्या नक्की. चेन्न‌ई ट्रिपचा खा‌ऊ पण घे‌ऊन ये‌ईन येताना.
खा‌ऊ विसरलीस तरी चालेल एकवेळ पण साखरपुड्याचे फोटो नक्की आण
हे!हे! हो नक्की आणेन.
१३ नोव्हेंबर २०१३
उद्या ऍनिवर्सरी आहे मॅडमची. काय मग यंग अन्ड ब्युटीफ़ूल लेडी. काय हवय गिफ्ट आपल्याला?
गिफ़्ट नेहमीचच, फक्त माझ्या वयाला साजेसं हवं बस इतकच!
जशी आपली आज्ञा मॅडम
------------------------------------------------

१४ नोव्हेंबर २०१३

विश यु अ व्हेरी हॅप्पी ऍनिवर्सरी डि‌अर. ऍन्ड हि‌अर कम्स यु‌अर प्रेझेन्ट ....

----------------

१५ नोव्हेंबर २०१३

काल नव्हतीस ना ट्रेनला तू? काल तो हर्षूचा गृप आहे ना? त्यांच्या गृपमधली एकजण अपघातात गेली. ट्रेन एकतर लेट होती. त्यात ती लटकत होती. हातात तिच्या साखरपुड्याचा अल्बम होता म्हणे. एका क्षणात काय झालं कळलच नाही. गर्दीचं प्रेशर होतं की तिला चक्कर आली काय माहीत. तिचा रॉडला पकडलेला हात सुटला आणि ती एकदम बाहेर फेकली गेली. तिचा अल्बम तसाच फ़ुटबोर्डच्या अलिकडे पडला.
फ़ारच वा‌ईट झालं गं. गेल्या एक दिड वर्षातली ही चौथी केस त्याच ट्रेनमधली.
काय उपयोग निवेदनं दे‌ऊन? अजून किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार कोण जाणे?

--------------------------------

१३ नोव्हेंबर २०१४

उद्या तुम्हा दोघींची ऍनिव्हर्सरी ना ग?
होऽऽ होऽऽ यावर्षी दोघींना गिफ़्ट पाहीजे. ते ही सेपरेट
जशी आपली आज्ञा मॅडम!