मंगळवार, ८ सप्टेंबर, २००९

दृष्टीभ्रम

आज आमच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस.... घराचं गोकुळ झालंय अगदी! मला तर चहाचा साधा कपदेखील कोणी उचलू देत नाहीये! प्रत्यक्ष लग्नातदेखील येव्हढा उत्साह नव्हता आमच्या! एकतर माझे आई बाबा वेगळे झालेले, त्यांच्या काळात ही गोष्ट थोडी जडच होती समाजात पचायला.... आज काल सहा महिन्यात काडीमोड झाल्याच्या घटना ऐकू येतात!
मग माझी रवानगी आई बरोबर मामाच्या घरी. आई नोकरी करायची, आम्ही थोड्याच दिवसात सिंगल रुम का होईना, पण स्वत:च्या जागेत गेलो होतो रहायला... पण शेवटी सगळ्यांचे बाबा संध्याकाळी घरी आले की एकटं एकटं वाटायचं. मग बसायचे माझी मीच एकटी डायरी लिहीत. ...
ही डायरी मला बाबांनी दिलेली वाढदिवसाची भेट म्हणून. तो शेवटचा एकत्र वाढदिवस. मग पुन्हा कधीच बाबा आमच्यात आले नाहीत. आईला आवडायचं पण नाही ते आलेले, म्हणून मग यायचेच नाहीत कधी भेटायला. आम्ही घरातून निघताना मात्र मला जवळ घेऊन रडले, म्हणाले, "तुझं लग्न बघायचं भाग्य आहे की नाही, नाही ठाऊक! पण बाळा, पाठवणीचं दु:ख अनुभवतोय..." अर्थ कळायचं वय नव्हतं तेव्हा, पण वाक्य लक्षात राहण्याइतपत मोठी होते मी. अर्थात माझ्या समोर रडणारे बाबा, मी प्रथमच पहात होते.
मी आणि आई बाहेर पडलो, तेव्हा ही डायरी मी हळूच ठेवली माझ्या पिशवीत.
आईपण छानच होती माझी! दोघेही छान होते, पण हा मधे कोणता "पण" आला ते कळलंच नाही कधी. मोठेपणी आईला विचारलं एक दोनदा पण "तो विषय संपला" अस म्हणून गप्प बसायची. मग जेवायची देखील नाही त्या दिवशी, म्हणून मीच विचारणं सोडून दिलं....
माझी आजी कधी कधी आईला म्हणायची, "नातं अस तोडू नये, एक चूक किती काळ धरुन ठेवायची?"
आईचे डोळे पाण्याने भरायचे, पण ती बोलायची काहीच नाही, नुसतीच मला जवळ घेऊन बसायची मग.
आई छान होती, आवडत होती तरीदेखील थोडा राग यायचा तिचा. तिच्यामुळे मला असं बाबांशिवाय रहावं लागतं म्हणून. कॉलेजमधे गेले तेव्हा अजूनच बंडखोर झाले मी. आईशी भांडून बाबांकडे जाऊन राहिले काही दिवस! पण त्यांनी मधल्या काळात दुसरं लग्न केलं होतं. मला नाही जमलं तिला आई म्हणणं. कितीही भांडून, बंड करुन आले असले बाबांकडे तरीही! जुने बाबा थोडे हरवलेच होते! की मलाच तसं वाटलं देव जाणे... मग परत एकदा आईकडे आले.
तिने एका शब्दानेही विचारल नाही "तिथे काय झालं? परत का आलीस?" म्हणून. बरंच झालं म्हणा! आमचं परत एकदा जुनं रुटीन सुरु झालं. मी शेवटच्या वर्षाला असताना आई गेली आणि तिची बाजू नीटपणे माझ्या समोर येण्याआधीच त्याला पूर्णविराम मिळाला.
कॉलेज संपल्या संपल्या माझ्या लग्नाचं बघायला सुरुवात झाली. माझ्या लग्नात मामाने कन्यादान केलं. "ह्यांच" स्थळ शेजारच्या काकूंच्या माहितीतलं म्हणून फ़ारशी चौकशी न करता झटपट लग्न झालं आमचं. "हे" दिसायला सुंदर, शिक्षण नोकरी पैसा-अडका ह्या सर्वच बाबतीत उजवी बाजू. माझं रूप ह्या एका गुणा(?)मुळे आमच लग्न जुळलेलं.
"लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतो हो" असं कौतुक झेलत माप ओलांडलं तरीही "आई वडील नाहीत तर कसले मानपान हो, आता वर्षसणही असेच .." हे कळ आणणारं वाक्य कोणीतरी बोललेलं ऐकू आलंच! दुधात मिठाचा खडा पडावा तसं. लहानपणापासूनच अशा काही वाक्यांची सवय झाल्याने मनाला ते टोचणं सवयीचं झालेलं इतकंच.
ह्यांनी कधी तसं जाणवू दिलं नाही, पण काही बाबतींत फारच विचित्र वागायचे. साधी पावडर लावली तरी "कुणासाठी नटत्येस?" असं विचारुन संशय घ्यायचे. बाहेर जाताना "कधी जाणार? कुठे जाणार? कोण बरोबर आहे? किती वाजता येणार परत?" सगळा सेकंदा-सेकंदाचा हिशोब द्यावा लागायचा. हे काळजीपेक्षा अधिक काही आहे हे जाणवायचं. कोणी माझं कौतुक केलेलं चालायचं नाही, कोणत्याही बाबतीत मी वरचढ ठरलेलं खपायचं नाही.... येव्हढं सोडता, बाकी चांगलेच होते. मी आजारी पडले की रात्र रात्र उशाशी बसून रहायचे. स्वत:च्या हाताने भरवायचे. कामं देखील करु द्यायचे नाहीत!
माधवीच्या वेळेस डोहाळे कडक लागले होते, तर फुलासारखं जपलं होतं त्यांनी. घरात मोठं माणूस नव्हतं काळजी घ्यायला, पण मामाकडे न पाठवता स्वत:च सगळी देखभाल केली. पण ते सगळं त्यांच्या पद्धतीने, ते ठरवतील तसंच. ते म्हणतील ती पूर्व म्हटलं की सगळंच आलबेल.
मधल्या काळात मी नोकरी करत नव्हते. मन हलकं करायला मग पुन्हा लिखाणाकडे वळले. माझ्या लिखाणाचं कौतुक करायचे, तरीही जाणवायचं, "ते कौतुक करतात माझ्या लिखाणाचं, पण दुसर्‍या कोणी तसं कौतुक केलेल नाही खपायचं!". तिथे कबूल करायचे नाहीत "इगो" दुखावतो ते, पण काहीतरी कारणं काढून धुसफ़ुसत रहायचे....
सुरुवातीला गोड बोलून बघितलं, पण मुळात असं काही आहे असं मानायचेच नाहीत. सगळे आले की मात्र मुद्दाम बोलवायचे बाहेर आणि सांगायचे, त्यांना किती कौतुक आहे ते. आत कुठेतरी सलायचा हा देखावा. पण जगाला दाखवता येणारं अस दु:ख नव्हतंच काही, मग काय सांगायचं कुणाला?
माहेर असं नव्हतंच, म्हणून कोणाशी बोलणार हे सल? आतल्या आत दाबत गेले इतकंच. किती वेळा विचार यायचा, असला कसला हा संसार? पण डोळ्यासमोर छोटी मी यायचे, हातात डायरी घेऊन बसलेली. माधवी आणि मधुकरवर ती वेळ येऊ नये, म्हणून पायात बेड्या पडल्यासारखी दचकून मागे व्हायचे!
मुलं मोठी होत गेली तसं त्यांनाही जाणवायला लागला स्वभावातला हा फ़रक.
"आई तू का झुकतेस नेहमीच?" १४ वर्षाच्या बंडखोर मधूने मला विचारल होतं.
"मग काय करायला हवं होतं?" ह्या माझ्या प्रश्नावर "वेगळं व्हायचंस", नाहीतर "अरे ला कारे तरी करायचस कधीतरी..." असं उत्तर देऊन मोकळी झाली होती.
"सोप्पं होतं का गं ते, एकदा आईवडिलांच्या संसाराची फरफट बघितल्यावर?" माझी लहानपणी झालेली कोंडी अनुभवल्यावर असं विचारावसं वाटूनही मी गप्प राहिले.
आताशा गप्प रहाण्याची सवयच झालेय म्हणा.... "मला भांडण तंटा नकोय आणि तुम्हीही माझ्यासाठी, माझ्यावरुन वाद नका घालू पिल्लांनो..." येव्हढंच कसबसं म्हणू शकले मी तिला.
माधवी लग्न होऊन सासरी गेली. माधवी, मधुकर दोघांची आयुष्यं मार्गी लागली. ह्यांच्या कर्तव्यपूर्तीत अजून एक शिरपेच खोचला गेला. मी तशीच "लक्ष्मी नारायणासारखा जोडा आहे हो..." ह्या शब्दाला धरुन राहिले.
आज आमच्या लग्नाचा वाढदिवस, ५० वा. किती वर्ष गेली नाही अशीच! आता हेदेखील पूर्वीचे "हे" राहिलेले नाहियेत. कान - डोळे साथ सोडून चाललेत. मग ही म्हातारी, काठी म्हणून लागते सोबत. स्वभावासकट सोबतही सवयीची झालेय माझ्या.
बाहेर तो नातवाने फ़ोटोंचा स्लाईड शो का काहीतरी लावलाय, तसाच एक आत मनात उमटतोय इतकच.
आता इतक्या वर्षांनंतर कसला आलाय खेद आणि खंत? पार पलिकडे गेलंय मन त्याच्या. वेगळी होऊनही आई कुठे सुखी झाली? नी एकत्र राहूनही मी असं काय साधलं मोठं? काहीच नाही म्हणा, किंवा सगळं भरुन पावलं म्हणा. सगळा दृष्टीचा भ्रम, झालं.....
"आS ई! अण्णा..SS ! इकडे बसा.." लेकाने हाताला धरुन मुद्दाम सजवलेल्या खुर्चीवर बसवलं. सुनेने आग्रह करुन करुन खास ह्या समारंभासाठी घेतलेल्या पैठणीची घडी मोडायला लावलेय आज. मोत्याचा सेट पण घालायला लावलाय. "तू मुद्दाम जगाला दाखवायला नटतेस" अस म्हटल्यामुळे कपाटाचं धन झालेला हाच तो मोत्याचा सेट. माझी जुनी पैठणी तर कधीचीच विरली तशीच. मी धूसर दिसणार्‍या डोळ्यांनी आजुबाजुला बघितलं.
"आSS जी! इकडे बघ! से चीSSSज...!"
"ए आजी ! तो क्यूटसा मोत्याचा सेट जरा बाहेर काढ ना... फ़ोटोत झाकला जातोय पदराने..."
"आजी आजोबा थोडं क्लोज बसाना, नी थोडं अजून स्माईल द्या..... "
"आई नाव घ्या!"
"छे गं! नाव बिव काय आता घ्यायच?" मी ह्यांच्याकडे हळूच बघत म्हटलं...
तेव्हा ह्यांनी मधुकरला जवळ बोलवून काहीतरी सांगितलं. नातवंडांच्या ह्या गलक्यात मग मधुकरने घोषणा केली, "आता अण्णांना काही बोलायचंय..."
सगळे शांत बसले. ह्यांनी बोलायला सुरुवात केली....
सुरुवातीची औपचारिकता संपवून ह्यांनी आमच्या सुखी संसारावर एक कविता म्हटली, नी त्यात चक्क माझेही आभार मानले! म्हटलं, चला! भरुन पावल! सगळेच भ्रम नसतात म्हणायचे!
रात्री निजताना ह्यांनी विचारलं, "काय. कसं वाटलं आजचं आभार प्रदर्शन?" दोन दिवस पाठ करत होतो! त्या जेष्ठ सेवा संघातल्या नान्याकडून लिहून घेतलेलं.... झाल की नाही फ़र्मास?"
"हो छान झालं." मी सवयीने म्हटलं.
"आराम कर आता. उद्या तुझे डोळे तपासायला जायचंय मोतिबिंदूसाठी..." हे म्हणाले नी घोरायला देखील लागले!
"खरंय! माझी दृष्टी दगा देते खरी... " मी त्यांच्या अंगावरचे पांघरुण नीट करत म्हटले,नी पुन्हा एकदा डोळे मिटून घेतले.....