सोमवार, २१ मे, २०१२

द्वंद्व


"हे आजकाल नेहमीचच झालय तुझं"

"हेऽऽ म्हणजे?"

"हे म्हणजे हेऽच. दरवेळी फिरुन तू स्वत:मधे त्या कॅरेक्टरला कोंबतेस अक्षरश: आणि.."

"आऽऽणि काय? नाही बोलच तू आता. इतके दिवस तुझ्यामुळेच लिहित नव्हते."

"मी कधी म्हणाले तुला लिहू नकोस म्हणून. हे बरय आपलं फाडलं बील माझ्या नावावर.."

"बोलली नव्हतीस गेल्यावेळी? तेच नी तेच विषय बास झाले, काही वेगळा विषय वेगळी अनुभुती असेल तर लिही म्हणून?"

"मग काय चुकीचं बोलले होते का मी?"

"नाही पण बाईसाहेब सांगा की मज पामरास, आणू कुठुन वेगळा विषय?"

"परकाया प्रवेश कराऽ की जरा मॅडम"

"आता केलाच होता ना प्रयत्न गेल्या वेळी एका कथेत. तर काय म्हणालीस?"

"ती त्या वत्सलेचीच ना कथा? आयुष्यावर बोलू काही वाली. मला नको सांगू कौतुक त्या कथेचं. किती वेळा शेवट बदललास?"

"होऽ बदलला, पटतच नव्ह्ता दरवेळी म्हणून बदलला."

"आणि शेवटी काय केलस? कोंबलस त्या वत्सलेला तुझ्यामधे. तुझा पिंड आशावादी आहे म्हणून काय कॅरेक्टरने पण तसच वागायचं? दाखव की तिला वेगळी. मुळात एखादी गोष्ट राहिली अधांतरी तर बिघडलं कुठे? एखाद्या चौकातून चार दिशांना चार रस्ते जातात आणि तुझं कथेतलं पात्र निवडतं तुला त्यातला जो रस्ता आवडतो तोच. का नाही चालुन बघत बाकिच्या रस्त्यांवरुन? सांग ना."

"अगं पण मी लिहितेय म्हणजे मीच निवडणार ना त्यांचा मार्ग?"

"अऽब आऽऽया ऊंऽट पहाड के निचे. मी तेच सांगतेय कधीची तू स्वत:ला त्यांच्यात कोंबतेस नी निर्णय घेतेस. निर्णय तू घेतेस. ते कॅरेक्टर निर्णय घेत नाही. लक्षात येतोय का फरक तुझ्या? तू लिहित्येस म्हणून "अमका" शेवट पण जर तुझ्या ऐवजी "क्ष" व्यक्ती लिहित असती तर..? सांग ना? तर वेगळा पण असता ना शेवट तू केलेल्या शेवटा पेक्षा? तू कॅरेक्टरच्या अंतरंगात शिरुन शेवट केलास हा दावा चूक आहे खरतर. त्या कॅरेक्टरच्या चपलेत तू तुझे पाय नाही घातलेस, त्या कॅरेक्टरचे पायच तुझ्या चपलेच्या मापाने बनवलेस तुझ्याही नकळत."

"मला नाही पटत तुझं म्हणणं"

"पटत नाही की रुचत नाही? का दिलास त्या कथेला आशावादी शेवट? तुला त्या नोटवर संपलेली आवडते कथा म्हणूनच ना? का नाही वेगळा शेवट केलास कथेचा?"

"वेगळा म्हणजे?"

"वेगळा म्हणजे तुझ्या वृत्तीपेक्षा वेगळा. मग भले तो शेवट तुला स्वत:ला पटो न पटो"

"माझ्या पटण्या न पटण्याचा काय संबंध? माझ्या मते ती त्या वत्सलेचीच मत होती. मी तिच्याच जातकुळीत शिरायचा प्रयत्न केला म्हणूनच शेवट बदलला नी आशावादी केला"

"...."

"हसलीस का? काऽऽ हसलीस? टु हेल वीथ यु. तू कोण आहेस शेवटी? काचेच्या तुकड्यात दिसणारी माझी एक प्रतिमा. जाऽऽ मी तुला महत्वच देत नाही. मी आरशा समोर उभं राहून बघते म्हणून तू बोलू शकतेस. मी नाहीच बघितलं तर..."

"........"

"हसू नकोस अशी."

"......."

"तुला सांगितलं ना एकदा हसू नकोस अशी. मीऽऽ मी आरसाच फोडुन टाकेन नाहितर."

-------

खळ्ळ्कन आवाज येतो. आरसा फुटतो. फुटलेल्या तुकड्यांमधे कानावर हात ठेवून उभी असलेली ती एसेमेसच्या रिंग ने दचकून जागी होते नी नेहमीप्रमाणे केरसुणी आणायला पॅसेजमधे जाते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा