बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१३

का रे इतका लळा लावूनी...

हॉस्पिटलमधे डॉक्टर नवजात बाळ जेव्हा आई बाबांच्या हातात देतात तेव्हा कशा मिश्र भावना असतात ना मनामधे. आनंद, भीती थोडं नवखेपणाच दडपण, उत्सुकता सगळच एकाचवेळी चेहऱ्यावरुन.. देहबोलीतून ओसंडून वहात असतं.
तुला पहिल्यांदा बघितलं ना आम्ही तेव्हाही असच झालं होतं आमचं.
तुझ्या रहाण्याची तात्पुरती व्यवस्था करून मग अनुभवी दाई, ताई, मावशी, काका, मामा सगळ्यांना फोन करून चौकशी करून झाली. सगळ्यांकडून हे भरमसाठ सल्ले पोतडीत जमा झाले. गुगलबाबाही होताच मदतीला, त्याचीही वेळोवेळी मदत घेऊन झाली.
तुझ्या परीने तू स्वत:ला व्यक्त करत आमच्या पोतडीत दरवेळी नव्या गोष्टींची भर घालत होतास ते वेगळच.
वाट चुकून आलेला तू... तुझे सखे सोबती "सर्व्हावयल ऑफ़ द फिटेस्ट" च्या शर्यतीत कुठेतरी कमी पडले आणि उरलास तू आणि अजून दोघे. म्हणून मग तुम्ही तिघे तीन घरात दत्तक गेलात, आमच्या दृष्टीने तुमची जगण्याची दोरी प्रबळ करण्याच्या हेतूने.
पहिले आठ दिवस अगदी रूसून बसलेलास, नवीन वातावरणाशी जुळवून घ्याव की नाही? असा विचार करत होतास की काय कोण जाणे पण अन्नालाही शिवला नाहीस. आमचं बिपी सारखं वर खाली.. मग आमची वरात तज्ञाकडे, काय होतय तुला हे विचारायला. त्यांच्या कडून फ़क्त "डोन्ट वरी" हे ऐकण्यासाठी.
मग आठ दिवसांनी तुलाच आमची दया आली असावी किंवा आलिया भोगासी असं म्हणत तू तुझा असहकार तोडत व्यवस्थीत खायला लागला असावास.
अर्थात हे सारे आमचे अंदाज. काश! तुझी भाषा आम्हाला येत असती.
मग त्यातही माझी कॉलर बरेच दिवस ताठ कारण तू प्रथम माझ्या हाताने जेवलास. आणि मग पुढे महिना दोन महिना तू फक्त आणि फक्त माझ्या हातूनच जेवायचास.
आधी वाटलं हा माझा अंदाज आहे. भास आहे. मीच नेमकी भूक लागते तेव्हा असेन समोर खाणं द्यायला. मग मी प्रयोग केले. तुझ्या भुकेच्या वेळी बाकीच्यांना खाणं द्यायला लावलं. पण तू ढुंकूनही बघितलं नाहीस. बाकीचे म्हणे भूकच नसेल तुला कदाचित त्यावेळी. मग मी चार दाणे खाऊ घालून बघायचे तर पटकन येऊन मटकवायचास. एकदम लब्बाड मुलासारखा.
मग बाकीचे उगाच हिरमुसून जायचे. मग आपणहोऊन तू त्यांच्याकडून पण खाऊन घ्यायला लागलास.
तुला टब मधून बाहेर यायचं आहे.. तुला भूक लागलेय... तुला करवंटीत लपून रहायचय... तुला आता पाण्यात वाळू दगड नको आहेत पासून ते तुला आता शी होतेय इतकं सार तुझं वेळापत्रक आम्हाला कळेल अशा देहबोलीत सांगू लागला होतास.
मग कुठून तरी गुगल बाबा म्हणाला "दे फ़ील लोनली. दे नीड कंपनी" झालं आम्ही लग्गेच गुगल बाबा की जय म्हंटलं.
अनायसे कंपनी मिळायची लक्षण दिसल्यावर लग्गेच संधी साधली.
इथेच चुकलो का रे आम्ही? तरी लग्गेच तुम्हा दोघांची वेगळी व्यवस्था केली. पण तू शॉक घेतलास एकदम शांत शांत झालास.
आणि तुला दवाखान्यात नेलं आम्ही पण तू त्या आधी कायमचाच शांत झालास.
हेतू चांगला होता रे आमचा कंपनी आणण्यामागचा पण लक्षातच नाही आलं प्रत्येकाची प्रकृती निराळी.. गरज निराळी.. तुझी भाषा कळली असती तर...
पण असो उशीराने आलेल्या शहाणपणाला काहीच अर्थ नसतो.
आता तुला आपल्याच बागेत पुरलय. एक छानसं झाड तिथे लावायचं ठरवलय तुझी आठवण म्हणून. ते झाड तरी वाढूदे अशी प्रार्थना करशील?