सोमवार, ३० मार्च, २००९

देवाघरची फुलं

रिसेशन, बदलते आर्थिक वारे, अस्थिरता ह्या सगळ्या पार्श्वभुमीवर रविवारची ही "देवाघरच्या फुलांची" भेट खुप काही देऊन गेली.


(ह्या फोटोत पाळण्यात आहेत तिच ती "देवाघरची फुलं". मोठ्या मुलांचे चेहरे ओळखु येतील असे फोटो काढायला कायद्याने बंदी असल्या मुळे त्यांना फक्त माझ्या मनाच्या कॅमेर्‍यात बंद केलय)

अर्थात मी इथेही निमित्त मात्रच होते. माझ्या छोट्या दोस्त कंपुने मलाही सामील करुन घ्यायच ठरवल म्हणुन हे आनंदाचे तुषार मी अनुभवु शकले. त्यांच्या विषयी सांगेनच मी तुम्हाला. आधी थोड ह्या "देवाघरच्या फ़ुलांविषयी" सांगते.

"जननी आशिष" नावाच एक कुटूंब आहे. हो मी कुटूंबच म्हणण पसंत करेन अनाथाश्रम म्हणण्या पेक्षा. तर ह्या कुटूंबा सोबत, त्यातील छोट्या कुटूंबियां सोबत घालवलेले दोन अडीच तास आम्हाला बरेच काही देऊन गेले.

काय केल तिथे जाऊन आम्ही? तर एक छोटासा वाढदिवस सगळ्या मुलांचा. त्यात होता त्यांच्या आवडीचा चॉकलेट केक, फ़ुगे, कागदी टोप्या नी मास्क. पण जाता जाता ह्या मुलांनी माझाच मास्क काढुन टाकला. माझ मन मलाच म्हणाल बाई ग! नीट डोळे उघडे ठेउन बघ. परिस्थीती परिस्थीतीच रडगाण आपण गातो. कधी दैवाला, कधी नशिबाला बोल लाऊन मोकळे होतो. ह्या मुलांनी काय म्हणायच मग? तिथे ह्यातल काहीच नव्हतं. होता फ़क्त निरागस पणा, आणि होत अपार प्रेम. तुम्ही द्याल त्याच्या कितीतरी पटीत तुम्हाला भरभरुन मिळेल इतक, अगदी तुमची दुबळी झोळी भरुन वाहील इतक प्रेम.

त्या मुलांबरोबर अर्थात त्यांच्या आजीही होत्या (ज्यांना आपला बाहेरचा समाज केअर टेकर अस नाव देतो) ते आजी नातवंडांच नात बघताना मनात माझी तुलना होत होती, माझी लेक आणि मी किंवा तिची आजी ह्या नात्याशी. एक उदाहरण देते, मुलांना आम्ही केक दिला होता. चॉकलेट केक, वेफ़र्स, चॉकलेट हे सगळ्या लहान मुलांचे वीक पॉईंट, समोर दिसतोय तो पर्यंत ते त्यावर ताव मारणारच. पहिल्या दोन राऊंड झाल्यावर माझ्यातली आई अस्वस्थ झाली, जेवणाची वेळ जवळ आलेय त्यावेळी असले पदार्थ खाल्ले तर मुलं जेवत नाहीत नीट. मी सानुला म्हणजे माझ्या लेकीला नसत दिलं दोन पिसेसच्या पेक्षा जास्त एकावेळी. आमच्यातल्या एकीला मी तेच सांगत होते तेव्हढ्यात आजी आमच्या कडे आल्या आणि तिच रिक्वेस्ट आम्हाला करुन गेल्या. हेच ते प्रेम आपलेपण, खरी कळकळ, ज्यामुळे मी त्या आश्रमाला एक कुटूंब म्हंटल मघाशी.

मी सानुच्या बबतीत असा विचार करण एक सहज भाव झाला, तिनेच तर मला आई होण म्हणजे काय ते शिकवल ना! पण दुसर्‍यांच्या मुलांना आपल म्हणुन प्रसंगी वाईटपणा घेऊन त्यांना घडवण खुप कठीण काम आहे. अर्थात त्या आजींनाही सलाम कारण ती "दुसर्‍याची मुलं" हे माझ्या मनात आलेल त्यांना वाटलही नसेल तस. मी सानुला दटावाव आणि दुसर्‍या क्षणी तिने माझ्याच पोटाला मिठी मारावी इतक्या सहज होत्या त्या गोष्टी.

ह्या संस्थेशी ह्या पुर्वी गेल्या दिवाळीत माझ्या लेकीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संबंध आला होता. मला खरोखर भावलेली गोष्ट अशी की तेव्हाही त्यांनी कशाचाही आग्रह धरला नव्हता. त्यांना कशाची निकड आहे सध्याच्या घडीला असे विचारले तेव्हा त्यांनी डेटॉल, साबण तत्सम वस्तु सांगितल्या पण पुन्हा हे देखील सांगितलं "तुम्ही अमुक एकाच किंमतीच्या वस्तु द्याव्यात असा आग्रह नाही, अगदी एक छोटी डेटॉलची बाटली द्यावी अस वाटत असेल तरी देखील स्वागत आहे". हे त्यांचा प्रचार करण्यासाठी नव्हे पण एखादा गुण आवडला तर मराठी माणुस त्याच तोंड फ़ाटे पर्यंत जाऊदे पण खाजगीत देखील कौतुक करत नाही अस म्हणतात म्हणुन जे भावल ते प्रामाणिक पणे लिहायचा प्रयत्न केलाय.

अर्थात उडदा माजी काळे गोरे असणारच तत्प्रद सगळ्याच संस्थांचा सगळ्यांना चांगलाच अनुभव आला असेल अस नाही म्हणुनच जे चांगल आहे त्याला त्याच्या चांगुलपणाच माप द्याव म्हणुन हा लेख प्रपंच. तो लिहीत असताना मला माझ्या दोस्त कंपुला विसरुन कस चालेल! मघाशी म्हंटल्या प्रमाणे मी त्यांच्याशी तुमची ओळख करुन देणार आहे.

हा गृप आहे तरुण मंडळींचा. ऑर्कुट वर गप्पा मारता मारता काही समविचारी मुल मुली एकत्र आले आणि एक नेटिझन्स चा खुप छान गृप झाला. ह्या गृप मधे एम.बि.बि.एस होऊन इन्टर्न करणारी राजलक्ष्मी आहे, सिव्हील इंजिनिअर हर्षु आहे, एम.बि.ए. करणारा प्रदीप आहे आणखीही असेच बरेच जण आहेत. गेल्या दिड वर्षा पासुन वेगवेगळ्या अनाथालयांमधे हे "गेट टुगेदर" करतायत. जमेल तशी देणगी किंवा वस्तु देणं, तिथल्या मुलांसाठी चित्रकला, हस्तकला सारख्या विविध स्पर्धा आयोजीत करणं, सगळ्या मुलांचा मिळुन वाढदिवस साजरा करणं, त्या मुलांना बरोबर घेउन नाचणं गाणं थोडक्यात काय आनंद नी प्रेम देणं आणि घेणं. हे आनंदाच लेणं काय असत ह्याचा अनुभव मी ह्या रविवारी पुरेपुर घेतलाय.


(ह्या फोटोत आहेत "जननी आशिष" कुटुंबातील प्रेमळ आज्या आणि ओर्कुट गृप ज्यांच्या मुळे मी हा आनंद सोहळा अनुभवू शकले)

कोणी म्हणेल एक दिवस असा आनंद देऊन निघुन जाल, त्यामुळे मुलांचे बाकीचे ३६४ दिवस का आनंदात जाणारेत? पण ते काही खर नाही, खारीचा वाटा किती मोलाचा असतो हे आपल्याला ठाऊक आहेच. आणि ही सुरुवात आहे. त्यांच पहील पाऊल तर त्यांनी टाकलय पुढे!

तरुण पिढी बहकतेय, चंगळ वादाच्या आहारी जातेय असा घोषा लावणाऱ्यांसाठी (जो पुर्ण पणे चुकीचा नाही पण हे प्रत्येक पिढी म्हणत असते म्हणजे प्रत्येक पिढीत अशी एक फ़ळी असते प्रमाण कमी अधीक असेल) त्यांनी त्यांच्या वागणुकीने उत्तम आदर्श दिलाय. जरी आत्ता त्यांच्यावर ग्रुहस्थाश्रमाच्या जबाबदारींचे ओझे पडलेले नसले तरी पैशाचा अशा प्रकारे विनियोग करावा हे ज्यांच्या मनात येते आणि नुसतेच येत नाही तर त्याला कृतीची जोड मिळते तिथे कौतुक करायलाच हवे.

मी आधी लिहील्या प्रमाणे "देवाघरच्या फ़ुलांची" भेट, त्यातुन मला मिळालेला आनंद हा सर्वस्वी ह्या माझ्या दोस्त कंपु मुळे. हेच जर "बी"घडण असेल मित्रांनो तर "तुम्ही बि-घडाना आणि आम्हाला बी-घडवा"

थोडस ह्या संस्थे विषयी
ही संस्था डोंबिवली च्या एम आय डि सी भागात आहे. ठाणे डोंबिवली करांच्या माहीती साठी सांगते डोंबिवली जिम्खान्याच्या बरोबर समोर त्यांची इमारत आहे. ही संस्था पुर्ण पणे महिलांनी चालवलेली आहे (अर्थात त्यात पुरुष मंडळींची मदत नाही अस नाही मी म्हणणार पण संपुर्ण कमिटी, रोजचे कामकाज बघणारे सगळा महीला वर्ग आहे) ह्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर त्यांच्या २५० व्या बाळाला आई वडीलांची कुशी आणि पर्यायाने त्या आई वडीलांना निर्मळ आनंदाचा झरा मिळवुन द्यायच काम त्यांनी पुर्ण केलंय.




&

1 टिप्पणी: