बुधवार, १८ फेब्रुवारी, २००९

देवबाप्पाला पत्र

प्रिय देवबाप्पा उर्फ़ एक शक्ति,

काल सहस्त्रावर्तन होत घरी. खुप छान प्रसन्न वाटत होत. पण तरीही मनात काही प्रश्न उठतच होते. हे माझ नेहमीचच आहे म्हणा. मला धड ठरवता येतच नाही कधी, मी आस्तीक आहे की नास्तिक ते.

नस्तिक म्हणाव तर मला ही पुजा, पुजा म्हणण्यापेक्षा त्याबरोबर येणारी प्रसन्नता खुप आवडते. तुझ्या नामस्मरणाने मिळणारी शांती लोभावते.

पण तरीही प्रश्न पडतो, देवा तुझी इतकी वेगवेगळी नाव रुप पण तू नक्की कसा आणि कोण?

फ़क्त पुजा, नामस्मरण मनाला प्रसन्नता देत ह्या एका कारणासठी मी मला अस्तिक म्हणाव तर तुझ्या पुजेतले, कहाण्यांमधले सगळेच्या सगळे नाही पटत मनाला.

सगळ्या गोष्टींचा कर्ता करवीता तुच आहेस, तुझ्या ईच्छेशीवाय झाडाच एक पान देखील हलत नाही अस माझी एक काकू म्हणत होती त्या दिवशी. पुढे ती असही म्हणाली, की कालच्या आख्यानात बुवांनी सांगीतल तुमची पुण्य कर्म तुम्हाला चांगली फ़ळ देतात. तिला म्हंटल तुझी दोन्ही वाक्य परस्पर विरोधी नाहीत काय? जर तोच कर्ता करविता असेल तर आपली अशी काय राहीली कर्म, तोच करवुन घेणारा सगळे काही आणि मग जगात चांगल्या बरोबर जे जे वाईट घडत त्याचीपण जबाबदारी देवावरच टाकावी लागेल. आणि जर तुझा पुण्य कर्म वाला कन्सेप्ट खरा असेल तर "तो" सगळ्याचा कर्ता करविता कसा?

त्याबरोबर मला माझ्या नसलेल्या नस्तिक पणावरुन ऐकाव लागल. माझा इथेच तर गोंधळ होतो देवा! मला तुझ अस्तित्व एक शक्ति म्हणून मान्य, एकदम मान्य. पण सगळ करणारा तुच हे नाही पटत मला. सगळ पटत नाही म्हणून मी अस्तिक वाल्यांच्या गटात पण सामावत नाही. आणि तुझ अस्तित्व मन नाकारत नाही म्हणून नस्तिक वाले देखील मला त्यांच्यातली मानत नाहीत. मनाला प्रसन्नता मिळते म्हणून मी पुजा करते, हात जोडते. पण त्यापलीकडे जाऊन खुप वेळ देऊन काही करावस वाटत नाही, त्यापेक्षा गरजवंताला मदत केलेली जास्त पटते.

अधली मधली त्रिशंकू अवस्था झालेय माझी.

आता सानिका, माझी मुलगी पण मला प्रश्न विचारायला लागलेय तुझ्याबद्दल. काय सांगु तिला?

तुझ्या उत्तराची वाट बघतेय. पत्ता नाही ठावुक. पण तु सर्व व्यापी आहेस म्हणजे, तसही तुला मिळेलच माझ पत्र.

काही उण दुण झाल असेल तर क्षमस्व.


--

एक शंकेखोर आई.


त्यावर मला आलेल उत्तर


तुझ पत्र मिळाल. बाळा जरा विचार केलास तर कळेल त्याची उत्तरही तुझ्याकडेच आहेत. माझी वेग वेगळी रुप, त्या कहाण्या ह्या तुम्हीच तुमच्यासाठी रचलेल्या आहेत. त्या एक भाव आहेत बस इतकच. त्यापलीकडेही मी आहेच.

ह्या कहाण्या, ही रुप हा एक मार्ग झाला पण तो एकच मार्ग आहे अस नाही. प्रत्येकाने ज्याचा त्याचा मार्ग निवडला आणी प्रत्येक वेळी मला एक एक नवीन रुप मिळाले.

शेवटी मी म्हणजे तरी काय? एक सत्य. आणि सत्य हिच एक शक्ती होय. २+२ = ४ तसच ३+१ =४ आणी ५-१ देखील चारच. तू मार्ग कोणताही ठरव ऊत्तर एकच "सत्य" असेल.

बर झाल तू पत्र लिहिलस ते, मलाही तुला सांगायचच होत की माणसांनी मला वेगवेगळी रुप दिली ती एक त्यांची वाट होती सत्यापर्यंत पोहोचण्याची पण आता सगळे वाटेलाच मुक्काम समजू लागलेत आणि माझ्या नावाने भांडू लागलेत.

मी कसा दिसतो अस विचारलस म्हणून सांगतो तुझ्या बाळाच्या शांत झोपलेल्या चेहेर्‍यावरच्या भावासारखा दिसतो (आता तुझ्या सोई साठी मी सांगतो म्हंटल, तू जर कशी दिसतेस विचारल असतस तर मी सांगते म्हंटल असत. कारण सत्य निर्गूण निराकार असत, तसच सत्य पुलींग / स्त्रिलींग अस नसत)

तु फ़क्त एकदा स्वत:मधे बघ. आस्तिक - नास्तिक हे तुमच्या सोइसाठी,मला विचारशील तर तुझी कर्म माझ्या दॄष्टीने महत्वाची. शेवटी भाव महत्वाचा मग तो पुजेत असो किंवा एखाद्याला मदत करण्यात असो. तू तुझी वाट निवड, तुझी लेक आपोआपच तिची वाट निवडेल. तुमच्या सोबत मी आहेच.

तुझा
देवबाप्पा / एक शक्ति/ एक सत्य (नाव काहीही दे)

1 टिप्पणी: