बुधवार, १८ फेब्रुवारी, २००९

चक्र/ वर्तुळ - भाग २

भ्भोऽऽऽ! मी एकदम दचकलेच. कसला विचार करत होतीस ग आई, माझ्या गळ्यात पडत मनू म्हणाली. काही नाही ग, उद्या बाबांचा वाढदिवस आहे ना, अनायसे रविवार आहे तर विचारच करत होते जेवायला काय करु खास.

बाकी तू काही पण कर आई, मला खीर हवीच हा!

दरवेळी खीर म्हंटल की मला ६ महीन्यापुर्वी आई येऊन गेली तोच दिवस हटकून आठवतो. किती हलक वाटल होत तिच्याशी बोलून. मनूचा पण हट्टीपणा जरा कमीच झालाय तेव्हा पासुन, का माझा सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा चष्मा बदललाय म्हणुन मलाच अस वाटतय देव जाणे.

गेल्या महीन्यात हाताला फ़्रॅक्चर होऊन पडले, तर किती धावपळ केली पोरीनी. त्यातच परीक्षा जवळ आली होती. मलाच अपराधी वाटत होत तिला अभ्यास सोडून हे सगळ बघाव लागत होत म्हणुन.

शेखरनी लगेच बोलून दाखवलच, काम करत नव्हती तरी भूणभूणत होतीस आणि आता करतेय मनापासुन तर का रडतेयस? मी म्हंटलपण त्याला असुदे तुला नाही कळायच.तेव्हा पासुन किती जपते ती मला.

आऽऽऽई! अग कुठे हरवलीस? बर नाही वाटतय का तुला? दुध ऊतु जाणार होत आत्ता.

नाही ग ठीक आहे की, मी ओशाळवाण हसत म्हंटल.

बर, आई आज कोणती साडी नेसणार आहेस. तुला लक्षात आहे ना, आज माझ्या शाळेत बक्षीस समारंभ आहे ते.

आणि तुला वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस आहे, मी वाक्य पुर्ण केल. मनू, पण अजून पर्यंत तू मला म्हणून नाही दाखवलस ह तुझ भाषण, फ़क्त बाबाशी काय ते चालू होत गुलुगुलु, मी नाराजीच्या सुरात म्हंटल.

मॉम्स! काय ग, आज कळेलच ना, मला पाहुण्यांसमोर म्हणायला सांगितलय हेड बाईंनी. ते वेगळ ग, मी म्हंटल तर माझे दोन्ही गाल पकडून म्हणाली सरप्राऽऽऽऽईझ, ओ.के.

ओ.के तर ओ.के, बर चला आवरुन घेऊ पट पट मग ऊशीर नको. मला सगळ्यात पुढच्या रांगेतून बघायचय तुला. मी विषय संपवत म्हंटल.

आई तू ना ही साडी नेस, मस्त दिसते एकदम. आणि ते बाबांनी आणलेले कानातले घाल अमेरीकन डायमंडसचे. चल ग! काय मी चिफ़ गेस्ट आहे? आई प्लीऽऽऽज, ती मधाळ आवाजात म्हणाली.

हो नाही करता करता मी तिच्या सांगण्या प्रमाणे तयार झाले. वॉव मॉम्स! एकदम फ़टाका. मनू वात्रट पणा पुरे ह, तू आईशी बोलतेयस.

येस बॉस, आता निघूया ती म्हणाली.

शाळेत लवकरच पोहोचलो, अगदी स्टेजच्या समोरची जागा पकडुन बसले. मनू आत पळाली तिच्या ग्रुप बरोबर. नेहमी प्रमाणे ५ चा कार्यक्रम ५.३० पर्यंत सुरु झाला. माझ लक्ष सगळ तिच्या एन्ट्रीकडे होत, खरतर इतरांचे प्रोग्रॅम मी ऐकायला हवे होते, म्हणजे ऐकायचेच होते मला पण सगळा १४ वर्षांचा पट डोळ्यापुढून हलेल तर ना! माझ मन तिथेच रेंगाळत होत त्या १४ वर्षांमधे.

तेव्हढ्यात निवेदीकेने घोषीत केल, आता आपल्या पुढे इयत्ता ९ वी ची विद्यार्थीनी "मानसी गोखले"..........

निवेदीका त्यापुढे त्या स्पर्धेविषयी अस काही बाही ३-४ वाक्य बोलली, पण माझ्या कुठे कानात शिरायला. डोळे आधीच भरले होते, समोर माझ्या चिमुरडीला बघून. तुम्ही हसलात ना "चिमुरडी" शब्दाला! हसा, पण मला तर अजुनही बर्‍याचदा शाळेच्या पहील्या दिवशी माझ बोट धरुन जाणारी मनु आठवते.

हॅलो!हॅलो! माईक टेस्टींग झाल आणि भाषणाला सुरुवात झाली

आदरणीय गुरुजन, इथे जमलेले सर्वजण आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला माझ्या सर्वात जिवलग मैत्रिणी विषयी सांगणार आहे. सर्वात जवळची अस जरी मी म्हंटल असल ना तरी मला "तिची" अशी काहीच माहीती नाही. ना मी तिचा सर्वात आवडता रंग सांगू शकत, ना आवडता छंद. एव्हढच काय तिचा असा खास आवडीचा एखादा रंग, पदार्थ अस काही आहे का हे देखील मी नाही सांगू शकत.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, जर मला एव्हढे देखील माहीत नाही तिच्याविषयी, तर ती माझी जवळची मैत्रीण कशी काय?

तुमचा प्रश्न चुकीचा नाही पण खरच आहे तस. ती मला आवडते पण तिला काय आवडत ते नाही माहीत मला. कारण आत्ता पर्यंत आमच्या आवडीचे तेच तिच्याही हेच बघत आलेय मी. कोड्यात नाही ठेवत फ़ार, तर अशी आहे माझी मैत्रीण, माझी आई.

आमचे सगळ्य़ांचे सगळे कार्यक्रम लक्षात ठेवणारी. आमचे वाढदिवस, आमच्या परीक्षा, आमची आजारपण सगळ सगळ माहीत असलेली. मी न सांगताच मनातल ओळखणारी माझी मैत्रीण.

तिला माझ्या विषयी सगळ ठाऊक आहे. माझी आवड, माझी नावड, माझे छंद, माझ्या मैत्रीणी, सगळ सगळ माहीत आहे. पण मला काय काय माहीत आहे तिच्याविषयी? तिच नाव, शिक्षण, तिचा वाढदिवस, आणी हो तिला पुरण पोळी खूप छान येते हे की ती मेहंदी खूप छान काढते ते? बस एव्हढेच?

काय आवडत तिला? कधी विचारलच नाही. नवीन गाणी कशी ग लक्षात रहात नाहीत म्हणून खिल्ली उडवली तिची, पण तिला कोणती गाणी आवडतात कधी विचारलच नाही.

आमच्या साठी ती नवीन नवीन पदार्थ शिकली, पण तिच्या आवडीच्या एका पदर्थाच पण नाव नाही विचारल कधी.

आई सारखे दैवत सार्‍या जगतावर नाही सारख्या कविता आणि स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी सारखे आईची महती सांगणारे सुविचार खुप असतील, पण तिला एक "व्यक्ती" म्हणुन समजुन घेणारे लेख अगदीच हाताच्या बोटावर मोजणारे असतील.

माझी आई मला प्रिय आहेच, पण आता मला तिची खरी खुरी मैत्रीण व्हायचय. एक व्यक्ती म्हणुन तिला जाणून घ्यायचय. पुढच्यावेळी जेव्हा ह्या माझ्या मैत्रीणी विषयी सांगायची वेळ येईल तेव्हा मी खात्रीने तिच्याविषयी सांगू शकेन. तसा प्रयत्न तरी मी निश्चीत करेन. आणि मला खात्री आहे तुम्ही देखील असेच कराल.

एव्हढ बोलून मी आपली रजा घेते धन्यवाद.

भाषण संपल. टाळ्या वाजत होत्या. पण मला कुठे भान होत. माझे डोळे तर केव्हाच वहायला लागले होते. अगदी समोरच असलेली मनू पण मला धुरकट दिसत होती.

एव्हढ मोठ कधी झाल माझ बाळ? आई तू हवी होतीस ग इथे ऐकायला. तू म्हणाली होतीस "नमू, तिच्यात तुझ्यातली १४ वर्षाची निमा शोध"

नाही ग आई, ही निमा पण १४ व्या वर्षी एव्हढा विचार करत नव्हती.

२ टिप्पण्या: