बुधवार, १८ फेब्रुवारी, २००९

मन

मन खोल खोल डोह
त्याचा पडे मला मोह
जाते शोधाया मी थांग
मग आठवांच्या संग

आठवांचे कण सारे
जोडी काळाशी ग नाळ
जाता वेचाया म सारे
तिथे थांबे बघ काळ

काळ थांबतो ग जेव्हा
घेते लेऊन मी कण
मागे परत फ़िरता
रेंगाळतो क्षण क्षण

रेंगाळला जरी क्षण
यावे लागते फ़िरुन
वाट पाहे किनार्‍याला
माझ्यासाठी वर्तमान

जाते सामोरी मी त्याला
दोन हात पसरुन
घेते आठवांच्या कणा
मग डोळ्यात भरुन

येता भरुन ग डोळे
येतो आठवांचा पूर
वर्तमान माझा मला
मग नेतो पैलतीर

पैलतीरावर येता
दिसे समोरच डोह
माझ्या मनाला ग त्याचा
पडे सारखा हा मोह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा