"रोज केर काऽढूनच मग पोतेरं घ्यायचं. बाकिच्यांकडे चालतं तसलं एक दिवस केर आणि एक दिवस पोतेरं असला प्रकार माझ्याकडे नकोऽ. उशीऽर चालणाऽऽर नाही. आणि सारख्या दांड्या पण मारायच्या नाहीत. एखादवेळी लागलीच रजा घ्यायला तर आधी सांगून घेतली तर चालेल, अचानक घ्यावी लागली तर फोन नंबर दिलाय तुला, त्यावर एक फोन करुन तरी सांगायला हवं" मी आधीच्या सगळ्या कार्यानुभवातून शिकलेलं ग्यान पणाला लावत तिला ऐकवलं.
सगळ्या कामवाल्या बाया काम मिळेपर्यंत ज्या खालमानेने सगळ्या सुचनांना होकाराची मान हलवतात तसच तिनेही केलं.
"नाव काय म्हणालीस तुझं?"
"प्रगती" तिने माझ्याकडे न बघताच उत्तर दिलं.
"अरे बापरे! प्रगती?" मी मनातल्या मनात वैतागून म्हंटलं. माझं नाव लग्नात बदलू दिलं नाही आणि आता कामवालीचं नाव मालकिणीच्या नावाशी साधर्म्य साधतं ह्या कारणाकरता बदलायची प्रथा नाही.
पण करणार काय? गरज.. "तिला कामाची" आणि "मला कामवालीची" ह्या एका गोष्टीने आम्ही एकमेकींशी जोडून घ्यायचं ठरवलं आणि ती आमच्या घरात प्रवेशकर्ती झाली.
"प्रगतीऽऽ, अगं वाजले किती? आटप लवकर. दप्तर कुठेय मनुचं?" ह्याच्या प्रश्नावर आम्ही दोघींनीही एकाचवेळी चमकून बघितलं.
सुरवातीचा हा महिना "कोण, कोणासाठी, काय म्हणाले" ह्यावर गोंधळ उडण्यात खर्ची पडण्याची सुरवात झाली होती. त्यातून ह्याने "प्रगती" अशी मला जरी हाक मारली तरी ती बिचारी लाजून गोरी मोरी व्हायची. मग आम्ही एक पॅक्ट केला. ह्याने निदान ती काम करत असताना मला "आई" म्हणायचं आणि तिला "ओऽ बाई" म्हणून हाक मारायची.
पहिला महिना बरा गेला. म्हणजे तिने सबंध महिन्यात एकही खाडा केला नाही की उशीर केला नाही. बाई कामालाही तशी बरी होती. कोणी एकलं तर नजर लागायची नेमकी पण होती खरी चटचटीत. आमच्या घरापासून १० मिनिटावर असलेल्या झोपडपट्टीत रहायची. रोज अंघोळ करुन स्वच्छ साडी नेसून यायची. त्यामुळे बरं वाटायचं. नाहीतर आधीची बाई. माझ्या घरातले कपडे धुवायचे साबण दिले तिला तरिही एक विशिष्ठ दर्प यायचा तिच्या कपड्यांना. आणि त्या वासाने सगळच ढवळून निघायचं... आतपासून.
तो वाऽऽस.. पुन्हा एकदा "टाईम मशीन" ने मागे नेत नेत मला ह्या सार्या प्रवासातल्या काही अप्रिय घटनांची नेमकी आठवण करुन द्यायचा. माझ्यापाशी सोयीने नोंदी आठवायचं टुल असायला हवं होतं असं मला नेहमीच वाटयचं.
आधीची बाई गेली आणि तिच्या बरोबर तो चिरपरिचीत वासही गेला. त्याबरोबर त्या आठवणीही पुसट झाल्या. आता ही प्रगती बाई बरी आहे.
घड्याळात बघितलं तर तिची यायची वेळ उलटून तब्बल २० मिनिटं झाली होती.
"काल पगार घेऊन गेलेय.. आज आता येते की नाही ही बया? संपले की काय नव्याचे नऊ दिवस हिचे?" असे अशुभं विचार मनात येतच होते तोच ती गेट उघडून आत येताना दिसली.
"पोरीच्या शालत गेल्ते म्हनुन उशीर झाला" तिने आल्या आल्या स्पष्टीकरण देऊन टाकलं.
"बरं" असं नुसतं मानेनेच दर्शवून मी तिला आधी देवघराचा केर काढून घ्यायला सांगितलं.
ती व्हय म्हणून पण तिथेच घुटमळली तसं तिला मुद्दामच कपाळाल्या पुरेशा आठ्या घालून विचारलं "काय?"
"ताई, जुनी छत्री असल तर द्याल का मला. पोरांच्या शालच्या फिया, बुकं नी रेनकोट घेन्यातच पैशे संपले बगा. राशन पण भरलं कालच" तिने मान खाली घालूनच माझ्या "काय" ला उत्तर दिलं.
"बघते" असं मोघम उत्तर देऊन मी संभाषण तोडलं.
खरतर मी देऊ शकते माझी जुनी छत्री तिला. मी काढून पण ठेवलेय आधीच एक छत्री तिला द्यायची म्हणून, तिने सांगायच्याही आधीच. पण काय होतं माहित्ये का, एकाच वेळी ह्यांच्या अशा परिस्थितीची दया येते आणि बोट दिलं तर हात तर घेणार नाहीत ना आपला अशी शंकाही मनात उठते.
झोकून देऊन तळागाळातल्याशी समरस होऊन समाजसेवा वगैरे पुस्तकात वाचताना, थोरा मोठ्यांची उदाहरणं ऐकताना भारावून जायला होतं पण प्रत्यक्ष आचरणात आणणं जमत नाही. दरी रहातेच किंवा राखली जाते आणि अंतर राखून होईल तेव्हढी मदत केली जाते.
"ही घे छत्री. ह्यावेळी नेमकी आहे म्हणून देतेय हं मी" मी मुद्दाम सावधपणा अंगात बाणवत तिला म्हंटलं.
"आणि ही थोडी जिलबी बांधून ठेवलेय ती पण घेऊन जा मुलांसाठी. आज रक्षाबंधन म्हणून आणलेय घरी. तू पण इथेच घे एखादी खाऊन. घरी काहीच उरणार नाही तुला" मी तिला म्हंटलं, तसं तिच्या डोळयात पाणी तरळलं.
"काय झालं ग?" म्हंटलं हिला आवडलं नाही की काय असं जिलबी घेऊन जा सांगितलं ते असं वाटून घाबरतच विचारलं.
"ताई, माझा उपास हाय आज."
"माजा भाव मी लहान अस्ताना गेला ह्याच दिशी. म्हनून मी गोडाचं कायबी खात नाय आजच्याला. मला तर त्यो आटवत पन नाय पन आय साटी करते मी उपास"
"अरे बापरे! गेला म्हणजे? काय झालं होतं त्याला?"
"मारला त्याला. आमच्या झोपडपट्टीत भांडाण झालं त्यात मारामारी होऊन ग्येला त्यो."
"मऽग! ज्यांनी मारलं त्यांना शिक्षा नाही झाली?" माझं मध्यमवर्गिय कायदेकानुन पाळणारं मन लग्गेच म्हणालं.
"नाही ताई, बाप नव्हता आधीच. आई शाळेच्या बाईंना मदत करायची. लोकांच्या घरची कापडं धुवायची आन भांडी घासायची. मी लहान व्हती. मोठी जाल्यावर आयला इचारलं तर म्हनली जायचा त्यो ग्येला. आपून काही केलं असतं तर त्या लोकान्नी तुलाबी ठेवलं नसतं नी मलाबी. त्यापरीस शांतीने जिंदगी घालवू इथ."
"अग पण असं कसं? तो खून होता ना!" खून शब्द उच्चारतानाही मला घाम फुटलेला.
"कसला खून नी कसलं काय ताई. आय म्हनायची त्यो आधी दारु पियाचा बापा सारखाच. बाईंनी बोलून त्याची दारु कमी केली. त्याला कामाला लावला. पण डोस्क फिरलं शालेवरनं आनि पुन्ना पिऊन आला. मंग मारामारी झाली नी त्यात ग्येला त्यो. त्यो गेला तवा मी पाच सा वर्साची असन"
"दारू प्यायचा? अगं पण लहानच असेल ना तेव्हा तो वयाने?"
"आमच्या इथं १२ वर्षाचं पोरगं पन पितय, ताई."
"बाऽपरे! बरं कुठे रहायचात तुम्ही प्रगती?"
"लायनी पल्याडला."
"लायनी पलिकडे कुठे?" मी श्वास रोखून विचारलं. पुन्हा एकदा तो वास मेंदूला त्रास द्यायला लागला होता. "ही तिच तर नसेल?" हा विचार झटकून वर्तमान काळात परत यायला खुप प्रयास करावा लागला.
"काय नीट आठवत नाय आता. आमी दोगीबी ती जागा सोडून मामाकडे जाऊन ऱ्हायलो मंग. भावाच्या जल्मा नंतर झालेली समदी पोरं जगत नवती. मीच तेवढी जगले. त्यात त्यो पन ग्येला असा, मंग आमी दोगीच ऱ्हायलो. माज्या आयला मला शिकवायची हुती पन मामा झाला तरी परक्याचच घर ना! मंग काय ती मला शालत घालनार. पन मी आता माझ्या मुलांना शिकीवनार. माज्या सारकं माज्या लेकीचं लगीन लवकर नाय करनार" ती बोलतच होती.
"ताई, उद्याच्याला मी काम करुन जाईन. पन परवाच्याला मला एक दिस सुट्टी मिलाली तर....."
"माज्या घराशेजारचीच झोपडी घेतली धा हज्जारला आनी आता आयला मामाकडनं घेऊन ईन इथे र्हायला. म्हन्जे तिची कालजी नाय लागून र्हानार मला"
"तुझ्या नवर्याला चालेल का तू असं तुझ्या आईसाठी खर्च केलेलं?" माझ्या मनात उगाचच एक शंका चुटपुटली.
"न्हाय, आदी नवता तयार. पन त्येला आय बा कोनच नाय. मंग आय र्हायली शेजारलाच की मंग पोरांची बी कालजी नाय ना मला. तिच्या माग ती झोपडी माजीच तर हाय. ह्ये सांगितलं तवा जाला तय्यार"
मला तिच्या रडत न बसता मार्ग काढणार्या आवृत्तीच खरच कौतूक वाटलं.
"परवा म्हणजे १५ तारखेला ना? मग ठिक आहे. पण १६ ला कामावर पाहिजेस ह मला तू" मी उदार मनाने तिला एक दिवसाची सुट्टी देऊन टाकली.
"ताई, तुमी किती मायेने इचारता. बाकी कोन बी असं बोलत नाय बगा" ती म्हणाली खरी पण माझी आतली "अंतर राखणारी नजर" मलाच हसल्यासारखी भासली.
"प्रगती, ह्या बायकांचं लाईफ वेगळं आपलं वेगळं. जास्त खोलात शिरायचं नाही आणि जास्त जवळिक दाखवायची नाही." आतल्या मध्यममार्गी विचाराने थोड्याश्या खळबळ माजलेल्या मनाला झापत म्हंटलं आणि मी पुन्हा एकदा त्या वासाला आणि त्यामुळे दरवेळी वर येणार्या कटू आठवणींना हद्दपार करत कामाला लागले.
तिच्या आईची भेट घेऊयात एकदा कधीतरी हे मनात आलं खरं पण हे सगळं आईला सांगावं का नाही ह्या विषयी मात्र पटकन निर्णय होईना. शेखरच्या हाक मारण्याने विचारांची साखळी तुटून मी पुन्हा वर्तमान काळात आले.
"शेखर तुला लक्षात आहे ना मी आपली जेवणं झाली की आईकडे जाऊन येणार आहे ते? पिल्लूला घेऊन जाणारे आणि रात्री परस्पर जेवून येणार मग मी. तुझं जेवण केलेलं आहे ते घे गरम करुन" मी जाण्याची तयारी करत करतच त्याला आठवण करुन दिली.
अंगावर येणारं नारळीभाताचं जेवण जेवून आईकडून पुन्हा निघायची वेळ झाली तेव्हा पिल्लू पार पेंगुळलेलं.
"प्रगती, आता विनयची बॅंगलोरची नोकरी पक्की झाली तो येत्या आठवड्याभरात जाईल तिथे. मग पुन्हा घरात मी आणि तुझे बाबा दोघेच असू. झेपतय तो पर्यंत तरी तुम्हा दोघांपैकी कोणाकडेही येऊन रहणार नाही आहोत आम्ही. लागलं सवरलं तर तुम्ही आहातच पण झेपतय तोपर्यंत राहू आम्ही ह्याच मठीत."
"अग! पण..."
माझं वाक्य अर्ध्यावर तोडत ती म्हणाली "प्रगतीऽऽ ऐकून तर घे आधी. तू रहातेस पलिकडे. हा जाणार बॅन्गलोरला. माझ्याकडे आता रिकामा वेळ भरपूर आहे. त्या साठे बाई भेटलेल्या परवा. त्याच म्हणाल्या "आता मोकळ्या आहात तर करा की परत सुरु शाळा"
"पुन्हाऽऽ शाळा?" मला पुन्हा एकदा त्या वासाने गुदमरायला लागलं.
पुन्हा एकदा टाईम मशीन टिकटिकायला लागलं... तेव्हा मी असेन ७ वी ८ वीत. आईची घरातली शाळा बंद होऊन बराच काळ लोटलेला. आम्ही दोघेही आता तसे आपलं आपलं करण्या इतपत मोठे झालेलो, म्हणून मग आईने काही समविचारी बायकांना बरोबर घेऊन घराजवळच्या झोपडपट्टीत शाळा सुरु करायचं ठरवलं.
"प्रामाणिक पणे काम केलं की सगळं मार्गी लागतं ग" आई भाबड्या विश्वासाने आणि कामावरच्या श्रद्धेवर विसंबून म्हणाली.
आणि त्याच भाबड्या विश्वासावर विसंबून संस्था रजिस्टर करणं, तिथल्या लोकांना समजावून एका एका गोष्टीला तयार करणं सगळं एका लयीत चालू झालं.
"आईऽ हे काऽय आज पण नुसतीच शिकरण पोळी?"
"आजच्या दिवस..., काल संस्थेच्या रजिस्ट्रेशन संबंधी ठाण्याला चकरा मारुन पाय नुसते तुटले माझे. एकदा हे काम मार्गी लागलं ना की मग मी मोकळी होईन बघ. मग फक्त शाळा आणि घर. बाकीचं काऽऽही बघावं नाही लागणार जास्त"
"तुझ्या संस्थेत तू एकटीच आहेस का? तुच का दरवेळी पुलंचा नारायण व्हायचस? मग खजिनदार, सेक्रेटरी मंडळी काय करणार?" मी माझा राग व्यक्त करत विचारलं.
"होत्या की ग सप्रे बाई काल माझ्यासोबत" तिने गुळमुळीत उत्तर दिले.
"होत्या पण तुझ्या ४ खेपा एकटीने झाल्यावर एक खेप घालतात त्या तुझ्यासोबत." पुन्हा एकदा माझी धुसफुस अशी बाहेर पडली.
"तुला पिठलं देऊ का टाकून पटकन?" आईला वाटलं ह्या नादात आमच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं म्हणून फक्त मला राग येतोय.
"काही नक्को, मी लावलाय कुकर." मी कुरकुरतच तिला म्हंटलं.
आईची शाळा काय अशी लगेच सुरु होण्यातली नव्हतीच, पण नेमका एका राजकीय पक्षाने मतांसाठी का होईना पुढाकार घ्यायचं ठरवलं आणि एका शुभमुहुर्तावर एका रिकाम्या झोपडीत आईची शाळा सुरु झाली.
सुरुवातीला आई घरी आली की एक विशिष्ठ वास यायचा तिच्या कपड्यांना. मग आम्ही तिला "ए तुझ्या शाळेच्या साड्या डेटॉल मधे धू ग बाई" असं म्हणायचो.
"शाळेत जाऊन आलीस की मगच कपड्यांना हा वास येतो. ईऽऽ ग बाई कशी जातेस तिथे तू?" आम्ही अगदीच दुसऱ्या दुनिये विषयी बोलावं तसं बोलायचो.
तिथल्या मुलांचे शेंबडाने भरलेले नाक पुसण्या पासून ते मुलींच्या डोक्यातील उवा काढून तेल लावून वेणी घालून देण्यापर्यंत त्यांना नागरी बनवण्याचे हरएक प्रयत्न तिने केले.
"आई, चल जेवून घेवुयात आता. पुरे ना तुझं ते काम"
"येव्हढी यादी करते पुर्ण मग बसते. तू घे जेवून"
"अनौपचारिक शिक्षण योजना आहे ना सरकारची त्याकरता ह्या याद्या द्याव्या लागतील तिथे"
"कशाला? गेल्यावेळसारखच काम झालं... मानधन सुरु झालं की तू कोणा तरी गरजूला तिकडे लावणार आणि पुन्हा दुसऱ्या कामाला जुंपून घेणार. आपण पण काय टाटा बिर्ला आहोत काय? पैसे नको घेउस एकवेळ पण केल्या मेहनतीचं क्रेडीट तर घे"
"कोणी तरी नाही गं ती शेवंता बाई आहे. तिथेच रहाणारी. दहावी नंतर लगेचच लग्न करुन दिलं आणि शिक्षण थांबलं तिचं. तरी तिथे तिच एक शिकलेली आहे. माझ्या सांगण्यावरुन तिने मॉंटेसरीचा कोर्स पण पुर्ण केलाय. मग नको का तिला संधी द्यायला?"
"आणि हे अनौपचारीक योजनेचं काम करतेय की मी. ती लहान मुलांचे वर्ग घेते मी मोठ्या वयाच्या मुलांना शिकवून म्युनसिपल स्कूल मधे जाण्या इतपत तयार करेन. जमलं तर पुढे मागे प्रौढ शिक्षण आणि महिलांसाठी शिवणकाम पण सुरु करायचय" तिने एकामागोमाग एक कामांची जंत्री सांगायला सुरुवात केली आणि मी तिला कोपरापासून हात जोडत ताटं घ्यायला सुरवात केली.
"आजची तुमची मिटिंग त्या सप्रे बाईंच्याच घरी घे ना. माझी परिक्षा सुरु होतेय उद्या पासून."
"अगं ह्या मिटींगला "तिथली" पण दोन चार माणसं येतात. सप्रे बाईंच्या घरी नाही चालत बाई..." तिने तिचा नाईलाज माझ्यापुढे मांडला
"अगं पण आपली एकच खोली आहे. मी अभ्यास कुठे करु मग?" मी देखील माझी कुरकुर पुरेशी व्यक्त केली.
"बरं मिटींग शाळेतच ठेवते, तू कर अभ्यास" तिने तिच्या परिने तोडगा काढला.
एकीकडे आई करत असलेल्या कामा विषयी अभिमान आणि आदर तर दुसरी कडे आम्हाला कराव्या लागणाऱ्या तडजोडींमुळे आणि नासमज वयामुळे झालेली धुसफुस. इतरांनी नुसतच क्रेडीट घ्यायला येणं आणि हिने नुसत्याच लष्कराच्या भाकर्या भाजत रहाणं हे सगळं जसच्या तसं आठवलं आज पुन्हा.
हे आठवलं तसच मी पहिल्यांदा तिच्या बरोबर तिच्या शाळेत गेले तो दिवसही डोळ्यासमोर स्पष्ट उभा राहिला.
"मला तुझी शाळा बघायचेय". मी तिला म्हंटलं आणि ती प्रचंड खुष झाली
पण तिथे त्या तिच्या शाळेच्या परिसरात पाय ठेवला आणि पहिल्या प्रथम तो वास भस्सकन नाकात घुसला आणि तेव्हापासून तो वास आणि ती जागा ह्यांचा एक घट्ट संबंध डोक्यात पक्का झाला.
"हि बघ ही पण एक प्रगती" आईने एका तान्ह्या बाळाला माझ्यापुढे धरत म्हंटलं.
"तिने तुझ्यासारखं शाळेत जावं मोठ्ठं व्हावं म्हणत ह्या काळुबाईने हिचं नाव पण प्रगती ठेवलं." माझी आई कौतूकाने म्हणाली आणि तिच्या आईने भक्ताने देवाकडे बघावं तसं बघत मान डोलावली.
तिची आई माझ्या आईची मदतनीस. स्वत: अंगुठे बहाद्दर आणि दारुड्या नवऱ्याचा त्रास सहन करणारी सोशीक सिंधू. पण मुलांनी शिकून मोठं व्हावं असं मनापासून वाटणारी तुमच्या आमच्या सारखीच एक आई. नवर्याच्या बरोबर १२ वर्षाच्या मुलालाही दारुची सवय लागली म्हणून कळवळणारी आई. ह्या उप्पर माझ्या मेंदूत तिची अशी वेगळी ओळख असण्याचं काही कारणच नव्हतं.
बाईंची मुलगी म्हणून लोकं माझ्याकडे वेगळ्या आदराने बघत होते. त्यानंतरही एक दोन वेळा तिच्या शाळेत जायचा योग आला. दरवेळी तो वास मात्र नकळत नोंदवला जायचा मेंदूकडून.
"राजकारणाशी आपलं काही देणं नाही नी घेणं नाही. आपण आपलं काम करावं" असं आई म्हणायची नेहमी.
"माझी मुलं आता बरीच सुधारल्येत. शिकून बाहेर पडतील बघ ती ह्यातनं एकदिवस." ती त्या मुलां विषयी बोलताना नेहमी म्हणायची.
आपण राजकारणात पडायचं नाही हे ठिकच आहे पण राजकारणात कोणी कोणाचा नसतो हे त्या बदलाची झळ लागेपर्यंत तिला कळलच नाही.
जागा वाटपाच्या मुद्यावरुन ताणाताणी झाली आणि एका रात्री दुसऱ्या एका पार्टीने तिथल्या नेत्याला तिकिट देऊन आपलसं केलं. तिथल्या तिथे दोन गट पडले. दोन वेगवेगळ्या रंगांच्या झेंड्यांनी हद्द आखली गेली. "पार्टी" देऊन माणसं राखली गेली तसच "पार्टी" देऊन ती फोडलीही गेली.
ह्यासगळ्यात "शाळा" हा मुद्दा गौण ठरला आणि शाळा कोणाची हाच मुद्दा ऐरणीवर आला. आधीच "पार्टी" मुळे तर्र झालेल्या मंडळींची बाचाबाची झाली आणि "मी बगतो कोन नाय शाला उघडू देत त्ये" असं म्हणून शाळेचं कुलुप काढायला निघालेल्या काळुबाई गुंजाळच्या गणेशचा हकनाक बळी गेला.
काळूबाई लहानग्या प्रगतीला घेऊन उर फुटेस्तोवर रडली.
पण "नग बाई पोलीस कंप्लेट. ग्येला त्यो ग्येला. आहोत त्येस्नी जगाया पायजेल" असं म्हणून तिचा मार्ग निवडून मोकळी झाली.
आईला मात्र "शाळा ती चालवायची म्हणजे कळत नकळत तिच्या मुळे झालं हे सगळं" असा सल टोचत राहिला तसा काहीएक संबंध नसताना.
ज्याने मारलं तो ही आईच्याच हाताखाली शिकलेला आणि जो गेला तो ही तिचाच एक विद्यार्थी. हा धक्का तिच्यासाठी फार मोठा होता.
त्यानंतर किती तरी दिवस... महिने... वर्ष गेली आईलाही ह्यातून बाहेर पडायला. शाळा तर बंदच झाली कधीचीच पण त्या शाळेची आठवण देखील तिच्यासाठी त्या दिवसाची आठवण घेऊन यायची. आमच्या साठीही तो सगळा काळ फारच कठीण गेला.
तिचं आमच्याकडे थोडं फार दुर्लक्ष झालं तिच्या कामामुळे तरी चालेल, तिने पायाला भिंगरी लावून लष्काराच्या भाकऱ्या भाजल्या ते ही अजिबात क्रेडिट न घेता तरिही चालेल एकवेळ. अगदी पुलंचा नारायण व्हायचं ठरवलं तरिही चालेल पण अशी आत्मविश्वास हरवलेली स्वत:लाच मनातल्या मनात कोसत रहाणारी आई पहाणं... ह्यासारखं दुर्दैवं नाही. १५-१६ च्या वयात आईची आई व्हाव लागणं म्हणजे काय हे जो त्यातून जातो तोच समजू शकतो.
म्हणूनच दरवेळी ती शाळा म्हंटली की ती आठवण आणि तो वास म्हंटलं की ती शाळा हे समिकरण डोक्यात इतकं घट्ट रुजलं की मग कुठुनही तो वास आला की डोक्यात "आईच्या शाळा कालखंडातल्या" नको त्या आठवणी पिंगा घालायला लागायच्या.....
आणि आता आई म्हणतेय "साठे बाई भेटल्या आणि पुन्हा शाळा सुरु कर म्हणाल्या..."
"पुन्हा शाळाऽऽ...?" मी माझ्याही नकळत अस्वस्थ होत तिला विचारलं.
"नाही ग, आता काय वय आहे का इथून तिथून धावपळ करायचं? शाळा नाही पण मी शिकवण्या घ्यायचं ठरवलय. म्हणजे झेपतील तितक्याच घेणार आहे मी. पण फि नाही घेणार, जे गरिब आहेत ज्यांना बाहेरचे क्लास परवडत नाहीत अशांच्या मुलांच्या शिकवण्या घेईन म्हणते."
"साठे बाई म्हणत होत्या, की "...." पक्षाची जागा देते तुम्हाला शिकवण्यांसाठी हव तर आपल्या इथल्या नगरसेवकाला सांगून"
"मग तू काय म्हणालीस?" मी पुन्हा अस्वस्थ..
मी म्हंटलं त्यांना "नको ते राजकारण, आणि नको तो पक्ष बिक्ष. माझ्याच घरात जमेल तेव्हढं करेन मी"
"खरय..पक्ष आला की राजकारण आलं आणि राजकारण आलं की राजकारणी मंडळी पण आली. त्यांची असेल कातडी गेंड्याची पण आपल्याला..." माझा श्वास त्या घटनेच्या आठवणीने असा काही अडकला की मला पुढे बोलवेचना.
"खरय तुझं.." तिने माझ्या हातावर थोपटत म्हंटलं.
"आई, तुला काळूबाई गुंजाळ आठवतेय का ग?"
"कशी नाही आठवणार? बिचारी तिच्या बाबतीत फारच वाईट झालं पण. आज का आठवली तुला ती अचानक?"
"नाही गं.. काही नाही असच, कुठे असते ग आता ती? काही कल्पना?" मी माझ्या नव्या कामवाली बद्दल जे वाटतय ते बोलावं का बोलू नये ह्या संभ्रमात तिला विचारलं.
"तिच्या मुलाचं तसं झालं आणि ती मुलीला घेऊन तिच्या भावाकडे निघून गेली. नंतर माझही मन उडालं त्या शाळेतून. काहीच ठिक वाटेना. दोन्ही माझीच मुलं गं. माझ्याच हाताखाली शिकलेली. अशी कशी...." आईला पण कढ आवरेना.
खपलीच्या आतली जखम अजुनही थोडी ओलीच आहे तर. फार मेहनतीने प्रयत्न पुर्वक तिला बाहेर काढलय आम्ही सगळ्यांनी ह्यातून आणि आता नुसत्या आठवणींनीही तिला त्रास होणार असेल तर आत्तातरी "प्रगती" विषय नको नंतर कधी तरी बघू असं मी माझ्याच मनाशी ठरवून टाकलं.
"म्हणून मी नको म्हणते गं आता पुन्हा तो पसारा.." मी आईच्या हातावर हात ठेवत तिला म्हंटलं.
"आता काय पसारा घालतेय मी नव्याने? आता आवरायचे दिवस सुरु झालेत. हे आपलं जमेल तेव्हढं घरात बसून होण्यासारखं वाटलं म्हणून करुन बघावं म्हंटलं"
"असं का बोलतेस अगदी? तुझी काळजी वाटते म्हणून बोलते ना मी? कर बाई कर काय करायचं ते पण जरा स्वत:ला सांभाळून कर म्हणजे झालं" मी तिच्यापुढे हात टेकत म्हंटलं.
मधली पाच दहा मिनिटं नुसतीच चुळबुळ करण्यात गेली.
"चल जरा बागेत" शांततेचा भंग करत मला पुन्हा एकदा मुड मधे आणत विषय बदलायचा म्हणून तिने मला बागेत नेलं.
"बरीच नविन रोपं लावलेली दिसतायत ह्यावेळी." मी पण ठरवून विषय बदलत म्हंटलं
"अरेच्चा! इथला मनी प्लॅंट काय झाला गं?" मीच आणुन लावलेला म्हणून मला बरोबर आठवत होता तो.
"आणि हे जाईचं रोप ना गं, गेल्या पावसात लावलेलं. इतके दिवस मला वाटलेलं गेलच ते. मस्त पालवी आलेय ग त्याला पुन्हा."
"मनी प्लॅन्ट ना काढून टाकला मी, वाढतच नव्हता."
"कुठेही वाढतो ना पण तो?"
"हो गं पण नाही वाढला खरा. मग काढून टाकला. ही बघ त्याच जागी ही तुळस लावलेय. तुझं जाईचं रोप जातं जातं वाटलं तरी तगलं. आता पालवी फुटलेय त्याला. पुढच्या वेळी येशील तेव्हा गजरा पण घालशील.."
"काय केलस? खत बीत घातलस काय त्याला वेगळं?"
"मी काय करणार अजून वेगळ? बाकीच्या झाडांना घालते तसच ह्यालाही पाणी.. खत घातलं. ते नाही जगलं हे जगलं.... " तिने माझ्यासाठी बाजूला काढून ठेवलेलं कृष्ण तुळशीच रोप माझ्या हातात देत म्हंटलं
"तू देत्येस खरी ही तुळस. पण जगेल का माझ्याकडे? गेल्यावेळची जळून गेली नुसती.."
"ही घेऊन जा. मग बघू. नाही तगली तर परत लावू" ती म्हणाली
"ह्म्म! खरय..." रोप लावायचं सोडायचं नाही... एका क्षणात हा विचार चमकून गेला आणि इतका काळ अडकलेला श्वास अचानक मोकळा झाल्यासारखा वाटला.
कविताजी, छान कथा आहे.
उत्तर द्याहटवावाचता वाचता अचानक संपल्यासारखी वाटली.
मग क्षणभरात संपूर्ण कथाच मनासमोर फ्लॅशबॅक सारखी सरकत गेली. आणि "रोप लावायचं सोडायचं नाही....." या शेवटच्या वाक्याने सगळा उलगडा झाला..... मनाला स्पर्शून गेली कथा.
G.A KULKARNI yaanchee ek asheech katha bareech vegli pan asach shikvoon jaanaree....vaachli hoti...u made me remeber that....!!...liked !!
उत्तर द्याहटवा