जनरली मला दहा काय पण चार दुकानही फिरायचा कंटाळा येतो खरेदीला गेल्यावर, त्यातून चप्पल खरेदी म्हणजे तर काय बघायलाच नको. चप्पलेचं आणि माझं एकमत कधीच होत नाही. जी चप्पल मला आवडते ती माझ्या पायाच्या मापाची नसते. एखादी चप्पल आवडलीच आणि मापाचीही निघाली तर ती रोजच्या ट्रेन प्रवासात टिकाव धरेल इतपत भक्कम नसते. जी भक्कम असते ती दिसायला तितकिशी आकर्षक नसते. एक ना दोन नाना तर्हा....आणि येव्हढाऽऽ चोखंदळ पणा करुन चप्पल घेऊन बाहेर पडावं, तरिही दरवेळी दुसऱ्या कुणाच्या चपला बघितल्या की वाटतं "आयला ह्यांना कशी बहुदुधी आखूड शिंगी गाय" मिळते?
तर त्या दिवशीही नेहमी प्रमाणेच अगदी तस्सच झालं. आधीच मला "तिच्या" प्रत्येक गोष्टीचं अपाऽऽर कौतूक आहे. तिच्या दिसण्याचं.. तिच्या रहाण्याचं.. तिच्या लिखाणाचं आणि तिच्या छंद जोपासण्याचं सुद्धा.
त्याचं काय आहे ना...तिचं एक मस्त छानसं, छोटसं घर आहे...तिच्या चौकोनी कुटूंबाभोवती फिरणार त्यांचं एक वर्तुळ आणि त्या वर्तुळाच्या जोडीने तिची तिची अशी जपलेली छोटी मोठी वर्तुळं... मला सगळयाचच अपाऽऽर कौतुक आहे, अगदी पहिल्या भेटीपासूनच. (प्लीज नोट वर्तुळं म्हणजे विबासं नव्हे )
तर त्या दिवशी आम्ही भेटलो तेव्हा तिच्या पायात एकदम "आखुड शिंगी बहुदुधी गाय" टाईपच्या म्हणजे दिखाऊ+टिकाऊ टाईपच्या चप्पला होत्या. त्या तिने "अमक्या ढमक्या दुकानात सेल मधे घेतल्या म्हणे दोनच दिवसा पुर्वी" मी देखील नेमके दोनच दिवसा पुर्वी बरीऽऽऽच दुकानं फिरुन शेवटी एका चप्पलेवर शिक्कामोर्तब करुन माझ्याकरता नविन जोडे घेऊन आलेले. माझ्या नविन जोड्यांचं नवखेपण जागोजागी लावाव्या लागलेल्या बॅंडेड मधुन जाणवत होत. माझ्या पायाची आणि त्यांची अजून म्हणावी तशी युती काही होत नव्हती.
पण ती मात्र सिंडरेलाच्या गोष्टीतली सिंडरेला असावी तसे तिचे जोडे तिला फिट्ट बसलेले. ना कुठे सोलवटण्याचे व्रण होते ना कुठे बॅंडेड चे ठिगळ.
मग का नाही मनातल्या मनात तिचा हेवा वाटणार, सांगा बर? उगाचच आपलं मनात आलं तिचे "हे" बुट तरी एखाद दिवस मला मिळाले घालायला तर...!
हे असं वाटणं म्हणजे ते शाळेत निबंधाला विषय असतो तसं झालं पण आता तसं वाटलं खरं त्याला काय करणार!
पण कधी कधी(च) तुमची प्रार्थना इंन्स्टंट फळाला येते आणि तुमचं नशिब तुम्हाला "छप्पर फाडके" देतं (निदान तसं भासवतं तरी), तर तो दिवस देखील त्या "कधी कधी" पैकीच एक असावा , कारण त्या दिवशी गप्पांच्या नादात माझ्या घरुन निघताना ती नेमकी चुकून माझे बुट घालून घरी गेली आणि तिच्या त्या "सिंडरेला बुटांना" माझ्याच घरी विसरुन गेली.
सिंडरेलाला तिचा तो एक हरवलेला बुट आणि त्या जोडीने भाग्य परत मिळाल्यावर जेव्हढा आनंद झाला असेल त्याच्या कैकपटीने अधिक आनंद मला त्या दिवशी तिचे बुट मिळाल्यावर झाला.
हळूच पाय त्या बुटात घालून बघितला. मस्त वाटलं एकदम. मग चालून बघण्याचा मोह झाला. चार पावलं चालताना एकदम भाऽऽरी फिलिंग आलं. मग दिवसभर तिच्याच बुटात पायाला अडकवून पायाला भिंगरी लावून निघाले फिरस्तीला, औटघटकेचं म्हणतात तसलं राज्य अनुभवायला. एकिकडे कॉन्शस का काय म्हणतात तो म्हणत होता "तिचे बूट परत करुन ये, दुसऱ्याच्या वस्तू वापरु नयेत" इत्यादी इत्यादी. पण मनातल्या हेव्याने त्यावेळी तरी त्या कॉन्शसला गप्प बसवलं.
टेलिफोनचं बील भरायला रांगेत उभी राहीले तेव्हा उगाचच वाटत होतं रांगेतल्या एकूण एक बायका माझ्या बुटांकडेच बघतायत म्हणून. समोरची प्रत्येक व्यक्ती माझ्या त्या सिंडरेला वाल्या बुटांचा हेवा करतेय असं वाटून गेलं.. उगाचच. आणि त्याचीही गंमत वाटली.
बीलं झाली भरुन... बाजारहाटही करुन झाला. आठवून आठवून कामं काढून जास्तीत जास्त वेळ त्या बुटाचा सहवास मिळवायचा प्रत्येक ठराव मनाने पास केला.
थोडावेळ बरा गेला, पण कधी कोण जाणे हळूच त्रासाने डोकं वर काढलं, पायांना जरा जरा त्रास जाणवायला लागला. कधी त्या बुटांच्या हिल्स मुळे पाय पटकन मुडपला जाऊन दुखायला सुरुवात झाली तर कधी त्या बंद बुटांमुळे पायाला चांगलाच घाम फुटायची वेळ आली. पायाचा अंगठाही जरासा का होईना सोलवटला, मग वाटेत थांबून दुखावलेल्या अंगठ्याला बँडेड लावून झाली. समोरुन बघणार्याला बंद बुटाआड लावलेली बँडेड दिसत नव्हती खरी आणि त्यामुळेच बुटांकडे वळणार्या नजरांमधला भाव अजुनही तोच होता फक्त त्याची आता मला गंमत वाटत नव्हती . त्या दुखण्याने एकंदरीतच माझ्या चालण्याचा स्पीड चांगलाच मंदावला होता आणि मंदावणाऱ्या स्पिड बरोबर ते सिंडरेलाचे बुट घालण्याचा उत्साह पण मावळला होता.
दुखर्या पायावर आणि हिरमुसल्या मनावर फुंकर मारत मी मग ऑटोने घरी येणच पसंत केलं. घरी येऊन टेकते नाही तोच बेलच्या हाकेला ओऽऽ देत मला दार गाठावं लागलं.
दारात माझी तिच ती "सिंडरेला बूऽट" वाली सखी, जिचं मला अपार कौतुक आहे..उभी होती... तिच्या स्वत:च्या दुखर्या पायावर फुंकर मारत आणि एका हातात माझे बूट सांभाळत.
"आखुड शिंगी बहुदुधी गाय"... :D:D:D
उत्तर द्याहटवा