शनिवार, ९ मे, २०२०

उंदीर, भीति आणि मी





झुरळ हा समस्त बायकांना घाबरवणारा किटक आहे असं म्हणतात. आठवा, अशी ही बनवाबनवीतला अशोक सराफ़ आणि अश्विनी भावे मधला प्रसंग! बरं राहिलं, तो पडला पडद्यावरचा प्रसंग. काल्पनिक म्हणून तो काही प्रमाण मानणार नाही तुम्ही. नका मानू. पण लोकलमधे, घरात, ऑफ़ीसात अशा कुठल्यातरी ठिकाणी आलाच असेल की जवळपास असाच काहीसा अनुभव तुम्हाला! थोडक्यात काय तर मुद्दा हा आहे की नॉर्मली बायका या झुरळ नामक किटकाला घाबरतात. त्यांच्या मते त्या घाबरत नसुन त्यांना त्याची किळस वाटते म्हणून त्या किंचाळतात. असो बापड्या. पण आम्ही पडलो ऍबनॉर्मल कॅटेगरीमधल्या. आम्ही अशा क्षुद्र किटकाला बघून घाबरु की काय? छ्या! अजाबात नाही. ह्म्म! आता झुरळाच्या जागी एखादा उंदीर दिसला तर मात्र आम्ही घाबरु. ते काय तुम्हीही घाबराल हो, अनलेस तुम्ही मार्जार वर्गातले आहात. पण आता मी त्या भीतिवरही लवकरच मात करायचं ठरवलय. हे कधी ठरलं म्हणताय? तर झालं असं की यावेळी मी ते न्यु इयर रिझोल्युशन म्हणतात ते केलय. त्यामुळे यावेळी तरी मी माझी उंदीर या प्राण्याविषयीची भीति बाटलीत बंद करुन समुद्रात फ़ेकून देणार आहे हे नक्की.

मी असं ठरवलेलं बहुतेक उंदरलाही कळलं असावं. आणि त्यानेही "बघू कशी हिची भीति बाटली बंद होते" म्हणत त्याचे इवलेसे दंड थोपटले असावेत असा मला दाट संशय यायला लागलाय. या संशयालाही आधार आहे, मी उगाच लोकांसारखं हवेत तीर नाही मारत. तर याला कारणीभूत आहे माझ्या जागेत रोज खुडबुडून जाणारा एक उंदीर. जाणारा म्हंटलं असलं तरी तो जा ये करतोय की तिथेच कुठेतरी आत घर करुन दडून बसतो याचा अजून स्पष्ट पुरावा मलाही मिळालेला नाही. पण तो आहे आणि अधूनमधून येऊन (किंवा दडलेल्या जागेतून बाहेर येऊन म्हणू हवतर) नासधूस करुन जातो हे नक्की.

अर्धवट कुरतडून ठेवलेले कागदपत्रं, फ़ाईली इतकच काय पण डस्टबीन मधल्या फ़ेकून दिलेल्या वस्तूंनाही चावे घेऊन करुन ठेवलेला पसारा यावरुन तो स्वत:च अस्तित्व दाखवून देतोय पण लेकाचा हाती काही लागत नाही.

इथे तिथे नेटवर वाचून रॅट किलर आणून ठेवून पाहीलं पण काहीही झालं नाही. सापळा पण आणला विकत. त्यात त्याच्या आवडीच्या "चीज वस्तू" ठेवून त्याला पकडायचा प्रयत्नही करुन पाहीला. पण अहं! स्वारी काही बधली नाही. कुरतडणं आपलं चालूच. सगळी कागदपत्रं, महत्वाच्या वाटणाऱ्या फ़ाईल्स सगळं सगळं कडी कुलपात ठेवायला सुरवात केली. पण अशाने गोंधळ व्हायला लागला फ़ार. एक चिटकोरा कागद काढायलाही सिक्युरिटी चेकिंग पार करत जायचं यानेच जीव उबला पार. बरं, या उपायाने कुरतडणं कमी झालं का? तर नाहीच. पठ्ठ्या, कुठून मार्ग शोधायचा काय माहीत? पण त्याने तिथेच आतच कुठेतरी बीळातून भुयारी मार्ग केला असणार असं शेवटी शेवटी वाटायला लागलं मला.

मांजरही पाळून बघीतली पण हाय रे कर्मा तिने दुधाचं पातेलं त्यातल्या सायीसकट साफ़ केलं पण उंदराच्या वाटेलाही गेली नाही. बहुतेक तिचा चातुर्मास संपला नसावा. पण पुन्हा एन्ड रिझल्ट काय? तर तो उंदीर व्यवस्थित बागडत राहीला आणि दिसेल ते कुरतडत मला छळत राहीला. मी मारे रिझोल्युशन केलेलं की उंदराच्या भीतिला बाटलीत बंद करुन समुद्रात फ़ेकून देईन पण त्यादिवशी तो दिसला तेव्हा हातात काठी असूनही मी टूणकन उडी मारुन पलंगावर चढले ते तो वाकुल्या दाखवून दिसेनासा होईपर्यंत तिथेच होते. कोणी म्हंटलं पेस्ट कंट्रोल करुन घ्या तर ते ही करुन बघीतलं . तात्पुरतं दोन चार दिवस सगळं आलबेल वाटलं पण परत येरेमाझ्या मागल्या सुरूच.

त्यादिवशी मात्रं वाटलं वर्ष संपत आलं. आज तर वर्षाचा शेवटचा दिवस. उद्या नवीन रिझॉल्युशन करण्याचा दिवस मग किमान आजतरी जुनी रिझॉल्युशन पुर्ण व्हायलाच हवी. त्याला हुडकायचं ठरवून सगळे कानेकोपरे तपासले. शेवटी तो एका अगदीच सामान्य जागी (म्हणजे अडीअडचणीच्या नसलेल्या अशा जागी) दिसला. बहुतेक मी काहीच करत नाही म्हणून कॉन्फ़िडन्ट झाला होता तो. म्हंटलं या ओव्हरकॉन्फ़िडंट उंदराला आत्ताच ठीक करु. अजून आजचा दिवस आहेच रिझॉल्युशन प्रुव करायला. मग काय? सगळा जोर एकवटून ती काठी हाणली आणि दिला फ़ेकून त्याला बाहेर.

त्यादिवसापासून माझ्या मनात बीळ करुन राहीलेल्या आणि मनाला कुरतडणाऱ्या त्या उंदरापासून मला मुक्ती मिळाली.

हे एकमेव न्यु इयर रिझॉल्युशन असेल जे माझ्याकडून पुर्ण झालं.

बिंगो! म्हणत मी ३१ डिसेंबर २०१५ चं पान उलटलं डायरी बंद केली आणि २०१६ च्या नवीन कोऱ्या करकरीत डायरीचं पहीलं पान उघडलं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा