शनिवार, ९ मे, २०२०

तात्पर्य, जजमेंट आणि आपण



तुम्ही ती 'मऊशार कापसाच्या गाद्यांमध्ये, खालच्या कुठल्यातरी थरात असलेला खडा टोचून झोप न लागणाऱ्या राजकन्येची' गोष्ट ऐकली असेलच पूर्वीही. अशा गोष्टींखाली पूर्वी तात्पर्य नावाचा प्रकारही वाचायला मिळायचा. सोबत दिला नसेल तरी तो कथा सांगणारी व्यक्ती सांगायचीच. तर या ही गोष्टी सोबत "सूख बोचतं ते असं" अशा अर्थाच काही तात्पर्य वाचल्याच + ऐकल्याच आठवतय.

पण खरच असेल ना अशी एखादी राजकन्या / राजपुत्र ज्याला हा असा खडा टोचत असेल. टोचणी बारीकशी असेल पण तरी पाठ टेकली कि जाणवणारी असेल.

आणि आपणच काय पण तिने/त्यानेही ही राजकन्येची गोष्ट त्यातल्या तात्पर्यासकट ऐकलेली असल्यामुळे, स्वत:च स्वत:ला,"सूख बोचतय बर हे" म्हणत झटकून टाकलं असेल.

अस झटकून टाकल तरी पाठ टेकल्यावरच टोचणं मात्र झटकलं गेलं नसेल.

सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशा कितीतरी प्रकारच्या खड्यांमुळे तिची/त्याची झोप उडाली असेल. इतरांच जाऊदेत पण अशी तात्पर्य स्वत:च्याही मनात खोल रुतल्यामुळे आधी "छे! कुठे काही खडाच नाही" पासून ते, हे जे टोचतय ते "आपल्याच मनाचे चोचले आहेत" म्हणत स्वत:ला दोष दिला गेला असेल.

आणि कधीतरी या द्वंद्वात उध्वस्त होऊन कसं सावराव हे न कळून आयुष्य उधळून देत तिने/त्याने आपल्यापरीने त्याचा शेवट केला असेल.

हे मनात यायच कारण नुकत्याच ऐकलेल्या काही  आत्महत्येच्या घटना हे आहे. वरकरणी खूप सुखात भासणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत, हसत्याखेळत्या कुटुंबात घडलेल्या या घटना. नंतर मागे राहिलेल्यांना मात्र विचाराच्या वावटळीत सोडून देतात. काहीच कारण सापडत नसतं. उगा एखादा बारीकसा खडा असावा अस वाटत रहातं. आपल्या लेखी 'ते' त्या राजकन्येसारखच आयुष्य जगत असतात.

पण खर सांगू? तर तो खडा खरा असतो, त्याच टोचणं खर असतं. किमान त्यांच्यापुरत तरी ते खरं असतं.

सर्वात पहिले हे जे तात्पर्याचे, आदर्शाचे 'कोट्स' आपल्या मनात बसलेले असतात ना घट्ट ते अक्षरश: बॅन केले पाहीजेत.

कदाचित त्यांनीही हे आदर्शाचे कोट मनात वाजत राहिल्यामुळे आपल्याच मनाचे चोचले म्हणत गिल्ट बाळगून त्यांच अस्तित्वच नाकारल असेल.

त्यांनी 'हे खडे आहेत तिथे त्या सुखाच्या गादीतही लपलेले' आणि 'त्यांच्या टोचण्याने त्रास होतो' हे इतपत मान्य केल असत ना तर, तर कदाचित त्यांनी मदत मागितली देखील असती आणि मग कदाचित सूख बोचतंय अस न म्हणता 'एकतरी' मदतीचा हात त्यांच्यापुढे केला असता कोणीतरी.
आणि अस झाल असत तर मग मागे राहिलेल्यांना विचारांच्या वावटळीत जर तर ची कारण पिंजत बसाव लागलं नसतं.

तात्पर्य टाळून जजमेंटल न होता आपण इतरांकडे आणि त्याही आधी स्वत:कडे बघायला शिकूनच घेऊया आता. हे एक तात्पर्य तेव्हढ बॅन न करता शिकून घेऊया. काय म्हणता?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा