दिवाळीत रांगोळी काढत होते. मागे उभं राहून लेक बघत होती. मला म्हणे,
"आई ज्ञानकमळ मस्त आलय"
तिला म्हंटल ते तर यायलाच हव होतं तुझे पणजोबा लक्ष ठेवून असतील आज 😄
मग तिचा इंटरेस्ट रांगोळीवरुन पणजोबा का लक्ष ठेवत असतील वर शिफ्ट झाला. तिला त्यामागची स्टोरी ऐकवताना अशा अनेक गोष्टी एकामागोमाग एक आठवायला लागल्या.
ज्ञानकमळाची रांगोळी जेव्हा कधी काढते तेव्हा मला अस वाटत अण्णा बघतायत ती बाजूला उभे राहून. गेरु सारवतानाही हमखास त्यांची आठवण येते. अशीच एक खास रांगोळी आजीच्या आठवणीत नेणारी आहे.
कधीतरी पोळ्या करताना अचानक एखाद्या फुगलेल्या फुलक्याला गॅसवरुन खाली काढताना हलके अंगावर काटा येतो तेव्हाही वाटत अण्णा मागे उभे राहून त्याच कौतुकभरल्या प्रेमळ नजरेने लक्ष ठेवून आहेत जसे ते, मी कॉलेजमधे असताना दाराच्या चौकटीत उभे राहून मला कौतुकाने बघायचे.
गणपतीत हार करताना, दूर्वा निवडताना हमखास अण्णा आठवतात. आठ नातवंडांना एंगेज ठेवायच त्यांच कसब आठवतं.
हे अण्णा आणि आजी माझ्या आईचे आई वडील. घरातली पहिली नात म्हणून फार जास्त जीव त्यांचा माझ्यावर.
बाबांच्या आईचा सहवास फार नाही लाभला पण बेसन लाडू मला आवडायचे म्हणून ती मी तिकडे जाणार असेन तर करायचीच आणि अचानक जाणं झालं तर किमान पणशीकरांकडून आणून खाऊ घालायची असं माझी आई आणि आत्याने सांगितल होतं पूर्वी. हे कळल्यापासून मला बेसन लाडू अधिकच आवडायला लागले. मी पहिल्यांदा केले तेव्हा मला माझी आजी आणि हे आई आत्याच सांगण आठवलं. लेक पूर्वी खायची नाही पण मी पहिल्यांदा केले तेव्हापासून तिला आवडायला लागले. त्यावेळी का कोण जाणे पण मला अस वाटल आजीने तिचं प्रेम त्यात मुरवलं म्हणून लाडू पणतीला आवडले तिच्या आणि म्हणून तिच्या या नातीला करायलाही जमले. आत्याही खाऊन म्हणाली तेव्हा कि एकदम तुझ्या आजीसारखे झालेत गं.
मला आषाढीला हमखास मामा आठवतो माझा.वारी सुरु झाली कि पण तो आठवतो. मामा भाचे डोंगरसफारी, डोंगरावर केलेली भेळपार्टी, झब्बूचा रंगलेला खेळ, टेलिस्कोपमधून आकाशदर्शन, आ वासून ऐकलेल्या विज्ञान गप्पा.. अशा अनेको आठवणीतून मामा डोकावतो.
अस वाटत हि मंडळी या रुपाने अंशतः आहेतच इथे माझ्यात
आपलं एखाद माणूस जातं ना तेव्हा आपल्यातला एक अंश त्यांच्यासोबत जातो (part of us dies with the person म्हणतात तस) तसच त्यांच्यातला एक अंश आपल्यात उरतोच उरतो.
यालाच genes,legacy, heredity म्हणत असावेत का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा