शनिवार, ९ मे, २०२०

कविता

थोडी थोडी जमलेली
थोडी थोडी फसलेली
एक कविता उगाच
रंग शाईचे ल्यालेली

आच लागली लागली
कढ आली, उतू गेली
उतू जाता जाता तिची
एक कविताच झाली

झाली कोरडी कोरडी
उन्हामधे करपली
वाफ होऊन कविता
हवेमधे मिसळली

पुन्हा पाऊस होऊन
मातीमध्ये ती रुजली
एक कविता वेडीशी
मला नव्याने भेटली

थोडी थोडी आकळली 
थोडी कोडंच भासली 
एक कविता मनाचा
तळ गाठून बसली  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा