शुक्रवार, ५ जून, २०२०

ती मी नव्हेच


ती, संवेदनशील कलाकार वगैरे
मी? प्रॅक्टिकल रुक्ष स्वार्थी वगैरे
ती, गाते नाचते भाव प्रकटते
मी? अभावानेही व्यक्त न होते
ती, नि:शब्दालाही वश करते
मी? शब्दांमधेही चाचपडते
ती, मोत्याचे दाणे पेरते
मी? उगवेल ते आपलं म्हणते
ती, देहात अडकूनही मुक्त
मी? मुक्त असूनही बांधलेली
ती, अस्वस्थ झाली कि साद घालते
मी? तिच्या अस्वस्थतेला वाट देते
ती, मग येते माझ्या स्वप्नात कधीकधी
मी? मग उतरवते तिची स्वप्न कधीकधी
ती, व्यक्त होऊन माझ्यापाशी, परत रिती होते
मी? तिच्या व्यक्त होण्याला माझी कविता म्हणून मोकळी होते
ती,  त्यावरही कधी आक्षेप घेत नाही
मी? स्वार्थी असले तरी इतकीही धाडसी नाही
म्हणूनच आज हे मान्य करायला हवेच
माझ्यातच रहात असली तरी
ती मी नव्हेच

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा