बुधवार, १७ जून, २००९

आम्ही

आम्ही कायम अधले मधले
आम्ही कायम तळ्यात मळ्यात
जास्त हसलो तरीही येते
पाणि आमच्या डोळ्यात

आम्ही बाचा बाची करतो
गुंडांची कॉलर धरतो,
घामाने चींब होऊनी
मग दचकुन जागे होतो

आम्ही प्रेमगीत गाताना
आरक्त गुलाबी होतो,
हे मनातल्या मनातच
चेहरा न आरसा होतो

आम्ही आस्तिक नास्तिक नसतो
ना कंपुंमधे रमतो
ह्याचेही पटते आम्हा
त्याचेही पटवुन घेतो

आमच्या आयुष्याची गाडी
ना रोलर कोस्टर असते,
तरीही प्रिय ती आम्हा
जसे डेली मस्टर असते

असे अधले मधले आम्ही
कोणाच्या न गावी असतो,
स्टेशन येता अमुचे
गुपचुप उतरुनी जातो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा