सोमवार, २२ जून, २००९

वारी

अरे! वारीची बातमी वाचली
नी तुझीच आठवण झाली
कसा आहेस?
बरीच वर्ष झाली नाही?
हसलास का?
साधी चौकशी पण करायची नाही?
असला तर असुदे की
वेड्यासारखा प्रश्न माझा
ठावुक आहे, विठोबाच्या
हृदयात मुक्काम तुझा!

आम्ही पण बरेच आहोत,
सगळं तसच चालु आहे
श्वास -नाडी - ठोके- धकधक,
एकाच लयीत चालु आहे!

पुर्वी संवाद साधायला
माध्यमाची गरज होती
नेटवर्क नॉट इन रेंज असेल
तर संवादांची खोटी होती

आता तोही प्रश्न मिटला आहे
तेव्हढाच काय तो बदल फक्त
बाकी सगळ तसच आहे!

येईन म्हणते वारी बरोबर
तेव्ह्ढीच तुझी भेट होईल
तुझ्या निमित्ताने एकदातरी
पांडुरंगाचेही दर्शन होईल

झाकली मूठ

तू येवुन माझ्या कुशीत
जूनी शिवण उसवत गेलीस
मन तुझं करुन रिक्त
ओंजळ माझी भरुन गेलीस

भरला संसार बघुन तुझा,
बरं वाटल म्हणुन गेलीस
मन मोकळं हसण्यासाठी
पुन्हा येईन सांगुन गेलीस

तू गेलीस आणि मला
पुन्हा एकदा शाळा आठवली
झाकली मूठ सव्वा लाखाची
तेव्हा शिकलो, आता कळली

गुरुवार, १८ जून, २००९

मौन

निशब्द सांजशा वेळी
तनू छेडीता धूनं,
मौनाशी बोलते माझ्या
तुझे बोलके मौनं

अस्पर्श मनीचा डोहं
उठता झंकारुनं,
तरंगातुनी त्याच्या
ही तान घेतसे मौनं

सुरावटींचा साज
लेवुन गातसे मौनं,
निश्वासाचे अर्थ बघ
कसे सांगते मौनं

अक्षय गाणे अपुले
ही अद्वैताची खुणं,
बोलक्या तुझ्या मौनाचे
कसे फेडू मी ऋणं

साई सुट्ट्यो

काय गंमत असते नाही
ओम साई सुट्ट्यो म्हणताना
सगळ्यात पहीले सुटण्याची
कट्टी तर कट्टी बालंबट्टी
म्हणत रुसुन बसण्याची

पहिला पाऊस, मातिचा गंध
मनाच्या मोराचा नाच बेधुंद
पाण्यात सोडलेली कागदाची नाव
आजच का घेतेय काळजाचा ठाव?

सोडुन चाललेत एक एक साथी
म्हणुन का आठवली जपलेली नाती?
जपलेल्या सगळ्याचीच उजळणी झाली
डोळ्यातल्या आठवांची निर्माल्ये झाली

ओम साई सुट्ट्यो म्हणुन तू सुटून गेलीस
पाऊसवार्‍यात कागदी नाव अलगद सोडुन गेलीस
नात्यांचे सुटले जरी अलगद हात
खात्री बाळग, मी ही येईन टाकुन इथेच कात!

बुधवार, १७ जून, २००९

आम्ही

आम्ही कायम अधले मधले
आम्ही कायम तळ्यात मळ्यात
जास्त हसलो तरीही येते
पाणि आमच्या डोळ्यात

आम्ही बाचा बाची करतो
गुंडांची कॉलर धरतो,
घामाने चींब होऊनी
मग दचकुन जागे होतो

आम्ही प्रेमगीत गाताना
आरक्त गुलाबी होतो,
हे मनातल्या मनातच
चेहरा न आरसा होतो

आम्ही आस्तिक नास्तिक नसतो
ना कंपुंमधे रमतो
ह्याचेही पटते आम्हा
त्याचेही पटवुन घेतो

आमच्या आयुष्याची गाडी
ना रोलर कोस्टर असते,
तरीही प्रिय ती आम्हा
जसे डेली मस्टर असते

असे अधले मधले आम्ही
कोणाच्या न गावी असतो,
स्टेशन येता अमुचे
गुपचुप उतरुनी जातो

तेच तेच नी तीच तीच

किती काळ आपलं
तेच तेच लिहायचं?
त्याच त्याच शब्दांना
पुन्हा पुन्हा आळवायच?

तीच तीच स्वप्नं
आणि त्याच पायवाटा,
पायांनाही सवयीचा
सलणारा काटा!

तीच तीच सुखं
आणि तीच तीच तृप्ती,
उदासी टाळण्याचीही
तीच जुनी युक्ती!

तीच तीच नी त्याच त्याच चा
कंटाळा आलाय,
तोच तोच पणा जरा
टाळायला हवाय!

टळेल का?
की हा चकवा
माझा मलाच हवाय?

सोमवार, १५ जून, २००९

वाट गवसुदे मुक्तीची

एकच तू पण कितीक रुपे
कितीक नावे तेजाची

रुप माध्यमे तेज बघावे
आस धरावी भक्तीची

नको भोग अन त्याग बेगडी
वाट चालुदे सत्याची

गळुन पडावे सर्व मुखवटे
वाट गवसुदे मुक्तीची

रविवार, १४ जून, २००९

आपण ह्यांना पाहीलत का?

त्या दिवशी सहजच लोकलमधे दरवाजाच्यावर लावलेल्या एका जाहिरातीकडे लक्ष गेलं

हरवला आहे
उंची : ५’ ५"
वर्ण: सावळा
वय: ४२ वर्ष

दिनांक २५/०५/२००७ पासून कळवा येथुन बेपत्ता

वरील इसम कोणाला आढळल्यास कृपया खालील पत्त्यावर संपर्क साधा
पत्ता : ......
......

हे वाचलं आणि पुन्हा अगदी शाळेत असल्या पासुन पडणार्‍या प्रश्नाने डोकं वर काढलं. वयाच्या ४२ व्या वर्षी इतका धडधाकट दिसणारा इसम कुठे आणि कसा हरवला असेल?

लहान मुल वाट चुकतं, त्याला पत्ता सांगता येत नाही क्वचित पळवली ही जातात पण मोठी माणसं कशी हरवतात? शोधुनही सापडू नयेत अशी कुठे विरघळतात?

मी ७ वी - ८ वीत असतानाची एक घटना मला अजुन स्मरणात आहे. माझ्या मैत्रिणीचा मामा, वय वर्ष २८-२९ एक दिवस ऑफ़िसला गेला तो गेलाच. परत आलाच नाही. हरवल्याची पोलिसात तक्रार केली, नातेवाईक, मित्र अशा सगळ्यांकडे चैकशी करुन झाली. येव्हढेच नव्हे तर इस्पितळे, शवागृहे देखील पालथी घालुन झाली. ह्या सगळ्याच्या बरोबरीने ज्योतिषाने सांगितलेल्या सगळ्या दिशादेखील पिंजुन झाल्या. नवस, उपास तपास ह्या सारखे उपचार देखील मानसिक समाधानासाठी करुन झाले. पण आजतागायत त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही.

काय झालं असेल नेमकं त्याला? कुठे आणि कसा हरवला असेल तो? काहीच उत्तर नाही.

लहान पणी दूरदर्शन वर "आपण ह्यांना पाहीलत का?" नावाचा एक कार्यक्रम लागायचा. आई आम्हाला तेव्हा धाक बसण्यासाठी सांगायची, लहान मुलांनी आई वडीलांचा हात सोडला तर ती अशी हरवतात. म्हणुन असेल, काय बिशाद होती आमची तिचा हात सोडुन रस्त्यात धावायची! तेव्हाही तिला विचारायचे, मोठी माणसं कशी हरवातात? ती कधी कधी काहीतरी उत्तर देऊन बोळवण करायची पण तरीही दरवेळी नव्याने तो प्रश्न समोर उभा ठाकायचा.

आजही तसच झालं. समोरची जाहीरात वाचुन मनातले विचार नुसते धावायला लागले सैरावैरा. जाहिरातीतल्या त्या अनोळखी व्यक्ती पासुन सुरु होऊन माझे विचार माणस हरवतात म्हणजे नक्की काय होतं? वर पुन्हा एकदा येऊन थांबले. वाटल कदाचित दिशा चुकत असतील ही माणसे, भुल पडत असेल कशाची तरी, कदाचीत भुतकाळ मागे टाकुन जायच असेल त्यांना लांब. का असं जावस वाटत असेल त्यांना? काय असतील कारण? परिस्थितीने लादलेली की कर्माने ओढवलेली?

विचारांची दिशा परिस्थिती पाशी येवुन थांबली आणि सहज मनात आलं एखाद्या व्यक्तीच आपल्यात नसणं, ठावठिकाणाच न लागण म्हणजे हरवणं असेल तर आपल्यातही असतील ना अशी हरवलेली, वाट चुकलेली, कुणी भरकटलेली, कुणी परिस्थितीने मात दिलेली माणसे? आणि तसं असेल तर कुठे होते त्यांची नोंद? कुठे नोंदता येते का त्यांच्या हरवण्याची तक्रार?
विचार करु पहाता जाणवतय अशी बरीच जणं आठवतायत मला, जी हरवलेत हे समजतय पण त्याची ना कुठे लिखीत स्वरुपात नोंद आहे ना त्याविषयी तक्रार नोंदवलेय, ना त्याची जाहीरात कुठे पाहीलेय.

पटत नाही ना माझं म्हणणं? मग हे वाचाच.

हरवली आहे
नाव : "अ"
उंची : अमुक तमुक
वय : २५ वर्ष
वर्ण : गोरा/सावळा/गव्हाळ
खुण : संगिताची आवड/ गाता गळा
दिनांक ? पासुन हरवली आहे.

लग्नं जमायला चांगला आहे हा छंदं ह्या विचारानी घरच्यांनी गाण्याच्या क्लासला जायची परवानगी दिली. मग त्यांचा हेतू साध्य होताच तिची आवड हळुच हात सोडुन निघुन गेली.

असाच हा दुसरा "ब"
वय : ३२ वर्ष
वर्ण : गोरा/सावळा/गव्हाळ
उंची : अमुक तमुक
खुण : वाचन/ लेखनाची आवड. कला शाखेत जायची इच्छा
दिनांक ? पासुन हरवला आहे.

मुलांसाठी आर्टस लाईन उपयोगाची नाही. पोट भरायला व्यावसायिक क्षेत्रच हव! ह्या प्रेमळ सल्ल्याच्या ओझ्याखाली, कौटुंबिक जबाबदार्‍या, कर्ता पुरुष ह्या जोखडाखाली लेखणी कधी गळुन गेली कळलच नाही.

आता ही छोटू
वय : ५ वर्ष
वर्ण: वर्ण काय विचारता? सगळ्याच वय वर्ष ५ प्रमाणे ही देखील एक बार्बी/ बाहुली
आवड : मस्ती, खेळ, चित्र काढणे, मनसोक्त उशिरा पर्यंत झोपणे, कार्टून बघणे आणिक बरेच काही.

खळाळता निर्झरच हा! नक्की कोणती आवड आहे तिच्यात, कोणता गुण आहे हे समजायच्याही आधी जड दप्तराच ओझ पाठीवर आलं, मोजुन मापुन खेळणं मोजुन मापुन रडणं देखील त्यातुनच आलं. इतका आभ्यास झालाच पाहीजे, समाधिट पणा आलाच पाहीजे, स्टेज फ़िअरही जायलाच पाहीजे. आमचं मुल आईनस्टाईनच व्हायला पाहीजे किंवा अभ्यास तर हवा पण इतर गोष्टीतही चमकल पाहीजे ह्या अपेक्षांपुढे त्यांच मुलपण कधी हरवलं त्यांना काय आपल्यालाही कळलच नाही .

असे कित्येक "अ", "ब", "क" वेगवेगळी रुपं, उंची, वर्ण असलेले. हरवुन जातात काळाच्या ओघात कधी परिस्थिती म्हणुन, कधी जबाबदार्‍या म्हणून कधी आणखीही नोंदी नसलेल्या कारणांनी.
होते का खरच ह्या अशा हरवलेल्यांची नोंद कुठे खया स्वरुपात? करतो का प्रयत्न आपण ह्यांना शोधायचा?

वाईट सवयी मुद्दाम सोडाव्या लागतात. काही चांगल्या सवयी मात्र परिस्थितिच्या दबावा खाली कधी बोट सुटून वाट हरवतात कळतच नाही. कळे कळेपर्यंत खुप पुढे निघुन जातो आपण आणि परतायची ताकदच उरत नाही कधी कधी.

ते "अ", "ब", "क" मात्र हरवुन जातात आपल्या आत कुठे तरी. विरघळत मात्र नाहीत. ते असतात तिथेच, जिथुन आपल बोट सुटलेलं असतं तिथे. चार पावलं मागे येवुन बोट पकडायची खोटी असते फ़क्त.
शोधायला तर हवच त्यांना. कारण व्यवहार पोट चालवतो तर हे मनाला जगवतात, फ़ुलवतात. सुख-समाधान, शांती मिळवण्यासाठी ह्या दोन्हींची गरज भासते म्हणुनच दोन्ही हवेत, एकही हरवुन चालणार नाही त्यातला.
हा फ़क्त एक प्रयत्न त्याची नोंद करायचा. त्यांची काही माहीती मिळते का ते शोधायचा. माझं बोट सुटुन काय कधी हरवलय तेही शोधण्याचा. कदाचित ह्या नोंदींमुळे तुम्हीही जाल चार पावलं मागे, लागेलही शोध हरवलेल्या त्यांचा तुम्हालाही. म्हणुन तर ही जाहीरात "आपण ह्यांना पाहीलत का?"