बुधवार, २९ जुलै, २००९

शनिवारची एक दुपार

शनिवारची दुपारची वेळ. नुकतच पोटभर जेवुन मागचं आवरुन झालेलं. डोळ्यावर त्या जेवणाची सुरेख अशी सुस्ती आलेली. आता एरव्ही कसं एसीत बसुन डब्यात थंड झालेल्या भाजी पोळीवर भागवावं लागतं, तर मग शनिवार रविवार मस्त गरम गरम जेवण जेवताना जातात दोन घास जास्त, नी येतेच सुस्ती.

अहाहा! आता मस्त दोन तास झोप काढता येणार कारण लेक पण झोपलेय ह्या खुशीत आडवी झाले. फार फार तर १०-१५ मिनिटं गेली असतील नसतील तोच माझा मोबाईल जागा झाला. त्याच्या एकेकाळी, एकेकाळीच का? सकाळ पर्यंत सुरेल वाटणाया रिंग टोनने कर्कश्य स्वरात गायला सुरुवात केली. रडणारं मुल कसं उचलुन घेतल्या शिवाय थांबत नाही तसे हे फ़ोन नी त्याचे रिंगटोन्स. फार फार तर थोडा वेळ थांबतील, पुन्हा समोरचा त्याच्या/तिच्या फ़ोनवर खाडखुड करतो की हे इथे गळे काढणार.

लेक जागी होण्याच्या भितीने (हि भिती तेव्हा जास्त महत्वाची होती फ़ोन महत्वाचा असता नसता तरिही) मी येणार्‍या झोपेला थोडं बाजुला सारुन कडमडत जाऊन फ़ोन घेतला. आवाजातुन जास्तीत जास्त वैताग कळावा असा "हॅलो" चा उच्चार करतच मी सुरुवात केली. पलिकडुन एक बया मला "पर्सनल लोन" हवय का अस प्रेमाने विचारत होती. त्यासाठी कुठच्याही कागद पत्रांची गरज नाही अशी भलावण करत ते लोन माझ्या गळी उतरवु पहात होती.

बाई ग मला सध्या फ़क्त अडथळा फ़्री झोप हवेय, तेव्हढी एकच सध्या महत्वाची नी तातडीची गरज आहे माझी. लोन बीन अशा बिनमहत्वाच्या गोष्टींसाठी मी आठवडाभर मनाशी ठरवलेली झोप सोडू म्हणतेस? पण असल्या कोट्यांनी विचलीत न होता लक्ष साधायचं ट्रेनिंग तिला मिळालं असावं बहुतेक, कारण तिने तरिही लोनच घोडं पुढे दामटायला सुरुवात केली. आवाजातलं मार्दव (?) शक्यतो कायम ठेवत बाई मी "अंथरुण पाहुन पाय पसरावेत" हे शिकलेय हे सांगितलं. समोर अंथरुण होतं म्हणुन पण मला हि म्हण सुचली असावी. नाहितर हे म्हणी बिणी नेमक्या वेळी कुठल्या आठवायला. तिच्या ट्रेनिंग मधे म्हणी येत नसाव्यात, कारण हे वाक्यच्या वाक्य तिला बाउन्सर गेलं. तिला तसच संभ्रमात ठेवत मी तिला म्हंटलं बर देतेच आहेस तर घेते बापडी लोन. ती हुरळुन पुढची माहीती सांगण्य़ाआधीच ह्यात पण कर्जमाफ़ी वगैरे होते का? अस विचारल्यावर तिने माझी पत ओळखुन स्वत:च फ़ोन कट केला.

बरी टळली बला म्हणत मी पुन्हा अंथरुण पाहुन माझे पाय पसरले नी डोळे मिटले. पण नशिबात योगच नसेल तर काहीही होतं. पुढच्या १० मिनिटात लँड लाईन ट्रींग ट्रिंग करु लागला. कॉर्डलेस फोन मी दुरुस्त न करण्याचा आळशीपणा का केला? आता उठा कविताबाई, पळा हॉलमधे आणि घ्या तो फोन म्हणत स्वत:वरच चरफडत फोनपर्यंत जाते नाही तोच, तो नरडं आवळल्यासारखा बंद झाला. मला पलिकडची/चा खदाखदा हसतोय असा भास झाला एक क्षण. मागे वळले तर पुन्हा तेच ट्रिंग ट्रिंग. ह्यावेळी रॉंग नंबर होता. एक तर झोपेचं खोबरं होत होतं, त्यात असे बिनकामाचे नी भलत्याच कुणासाठीचे फोन उचलायचे म्हणजे काय असतं, ते फ़क्त आठवडाभर ह्या दुपारच्या झोपेची स्वप्न बघितल्यावर नेमक्या वेळी ज्याच्या स्वप्नांवर अस विरजण पडलय ना तेच जाणु शकतात.

चला यायचे तेव्हढे अडथळे येऊन गेलेत म्हणत परत झोपेच्या स्वाधीन झाले. तसही पडल्या पडल्या पाच मिनिटात झोप लागण्याच भाग्य नशिबात असल्यामुळे मी पुढच्या ५ मिनिटात झोपु शकले.

पण हाय रे दैवा! झोप लागण्याच भाग्य असलं तरी विनाखंड मिळण्याचं पण भाग्य नशिबात असावं लागतं त्याच काय? पुन्हा तेच कर्कश्य वाजणं नशिबात होतं. पण ह्यावेळी त्रास देणार साधन बदलेलं. फ़ोनच्या ऐवजी फॉर अ चेंज म्हणुन घराची बेल वाजत होती. आता कोण? तर कुरियरवाला! ह्यांना बरी दुपारची वेळ मिळते लोकांची घर ठोठवायला? चरफडत टपाल घेऊन सहीचा कागद परत दिला. हे कुरियरवाले पेन बरोबर घेऊन हिंडतात ते एक बर आहे. नाहितर ते शोधण्यात पुन्हा ५-१० मि. गेली असती फ़ुकट.

हि सगळी अडथळ्यांची शर्यत पार करेतो तीन वाजले. माझ लक्षं घड्याळा बरोबर लेकीकडेपण होतं. कारण ती दोन वाजता झोपल्ये म्हणजे चारच्या ठोक्याला उठणार. मी आत्ता झोपु शकले तर मला कमीत कमी एक तासभर झोप मिळणार. ती उठली की मग कसली झोपु देतेय मला.

पण! हो हो आहेच मधे पण. त्याच काय आहे ना, सुखासुखी झोप पण नशिबात असावी लागते. तर आज माझ्या रुसलेल्या नशिबाने पुन्हा एकदा कोणाच्या तरी रुपात दाराची बेल वाजवली. मी परत एकदा माझा मोर्चा दरवाजा कडे वळवला. आता कोण कुरियरवाला आलाय असा विचार करत दार उघडलं. आमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर एक छोटा पॅसेज आहे जो आम्ही ग्रिल लावुन सेफ़्टी दरवाजा लावुन बंद केलाय. शक्यतो कुरियर वगैरे गोष्टी हा सेफ़्टी दरवाजा न उघडता त्याच्या ग्रीलमधुनच घेतो. तर मी मुख्य दरवाजा उघडुन त्या पॅसेजमधे पोहोचले कोण आलय बघायला. समोर म्हणजे सेफ़्टी दरवाज्याच्या बाहेरच्या बाजुला एक तरुण मुलगी उभी होती. आधी वाटल चुकलेला पत्ता विचारायला किंवा समोर बस थांबा आहे तेव्हा पाणि मागायला किंवा पावसाळ्याचे दिवस आहेत तेव्हा मोकळी व्हायला आली असेल. तळमजल्याला रहाण्याचे हे तोटे आहेत. मदत न करावी तरी पंचाईत आणि करावी तरी पंचाईत, कारण आजकाल कोण खरा गरजु, कोण फुकटा, कोण ते निमित्त साधुन गंडा घालायच्या तयारीत आहे हे कळतच नाही.

पण तिने अशी पंचाईत केली नाही निदान असलं काही मला मदत करु की नको अस संभ्रमात टाकणार काम सांगितलं नाही. मग कोण हि बया चांदण्यात लोकांच्या घराची बेल वाजवतेय असा विचार येतो न येतो तोच,तिने "रेणुका शहाणे" हास्य फ़ेकुन ताई, मी तुमची दोन मिनिट घेऊ शकते का? असा टिपिकल छापील प्रश्न केला. त्या बरोब्बर माझ्या डोक्यात दिवा पेटला. अरेच्च्या! ही तर विक्रेती.

सॉरी, मला सध्या काहीही नकोय झोप सोडुन म्हणत मी दार लावायला मागे वळणार तोच पुन्हा एकदा तो कमावलेला आवाज आला.

ताई, बघुन तर घ्या. मी "अबक" कंपनी कडुन आलेय. आमच्या कंपनीने हे नविन प्रॉडक्ट लॉंच केलय. त्याची मार्केट व्हॅल्यु आहे रुपये ३० प्रत्येक १०० ग्रॅम साठी. आजच्या स्पेशल डिस्काउंट ऑफरमधे तुम्ही एक ३० रुपयाच पाकिट घेतलत तर त्यावर एक पाकिट तुम्हाला फ़्री मिळणार आहे. त्याबरोबर हा लकी ड्रॉ चा फ़ॉर्म भरुन द्यायचाय. तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ५ किलोच पॅकेट फ़्री मिळेल शिवाय फ़ॅमिली सह गोव्याला ३ दिवस २ रात्रीची सहल फ़्री.

लक बिक गोष्टी माझ्या पारड्यात असत्या तर दुपारी दोन पासुन अशी उठाबशी करावी लागली असती का? हे आपलं मनात. आम्ही मनातच म्हणणार, मग घ्या भोगा आता दोन मिनिट समोर उभं राहिल्याचे परिणाम.

मला काहिही नकोय च्या पुढे माझी गाडी काही जात नव्हती, तरीही ती चिवटपणे माझा इंटरव्ह्यु घेत होती. मी देखील वेड्यासारखी तिला खरी खुरी उत्तर देत होते. कोणती पावडर कपड्यांना वापरता पासुन सगळा कपडेपट तिने विचारुन घेतला. एकवेळ शाळेचा इंटरव्ह्यु देणं सोप असेल पण हा अनुभव नकोसा होता. नाही नाही मी चुकुन शाळेचा इंटरव्ह्यु अस नाही लिहीलेलं. आजकाल नोकरीचा इंटरव्ह्यु सोपा असेल असा शाळ प्रवेशाच्या इंटरव्ह्युचा मामला असतो.

तिच्या सगळ्या प्रयत्नांना फ़ोल ठरवत मी निग्रहाने मागे वळले. तेव्हढ्यात ताई, पाणी मिळेल का? अशी आर्जवी विचारणा झाली. होणारच! येव्हढ्या चांदण्यात पायपिट केली, येव्हढी घसाफ़ोड केल्यावर घशाला कोरड पडणारच ना? आता पाण्याला का कोणी नाही म्हणतं? मग तिला तसच सेफ़्टी डोअरच्या बाहेर तिष्ठत ठेवत मी पाणि आणायला गेले. हो आजकाल दार उघडुन आत घेण्याइतका भरवसा चांगल्या घरातली असावी असं दिसणार्‍या मुलीवरही ठेवता येत नाही.

ती पाणी पीत असताना तिचच निरिक्षण करत होते. दिसायला नीटनेटकी, २३-२४ वर्षाची हि तरुणी शिकलेली वाटत होती. पेहेरावा वरुन परिस्थिती आमच्या सारखीच म्हणजे खाऊन पिऊन (इथे पाणी अपेक्षीत आहे) सुखी अशी मध्यमवर्गीय वाटत होती. मग तिची ती डबोलवाली बॅग बघून थोडी दया आली. कोणा कोणाला काय काय करावं लागतं पोटासाठी. बिच्चारी! माझ्या मनात तिचं बारसं तोपर्यंतं बिच्चारी झालं होतं.

तिच्या ट्रेनिंग मधे मुरलेल्या अनुभवी मनाने माझ्या चेहर्‍या वरचा बिच्चारी पर्यंत झालेला अबोल प्रवास टिपला असावा. कारण पाणि पिऊन तिने एक सह्या केलेला, माहिती भरलेला कसलासा कागद माझ्यापुढे धरला. ताई, हे बघा तुमच्याच बिल्डींग मधे ४ थ्या मजल्या पासुन सगळ्यांनी घेतलय. त्या शेजारच्या काकुंनी अशी तीन पाकिटं घेतली ताई.

माझं मन थोडं द्रवलं, एकतर तिने शेजारचीला काकु आणि त्याच वेळी मला ताई म्हणुन माझ्या संतुर साबणाला दाद दिली होती. तिथेच ती अर्ध ह्रुदय जिंकुन बसली. पुन्हा ती हे सगळं मॅनेजमेंटच्या कोर्सचा भाग म्हणुन पॉईंटस मिळवण्यासाठी करतेय म्हंटल्यावर तर मला भरुनच आलं. गरज नसतानाही मी दोनावर दोन फ़्री अशी साठ रुपयांना फ़ोडणी घालुन घेतली. ती पुन्हा रेणुका शहाणे हास्य फ़ेकुन निघुन गेली.

ह्या सगळ्या प्रकारात झोपेचं खोबरं झालच होतं पण चला त्यातल्या त्यात एका अभ्यासु मुलीला मी दोन पॉईंट मिळवुन दिल्याच समाधान होतं. हा त्या ताईचा इफ़ेक्ट नसुन तिच्या चिकाटीचा होता हे मी इथे विशेष नमुद करु इच्छीते.

त्या नादात मी नविन पावडरचं उद्घाटन करायचं ठरवलं. सकाळी कपडे धुवुन झालेले होते तरीही कुठुन कुठुन शोधुन ४-५ कपडे मी त्या पावडर मिश्रित पाण्यात भिजवले. अजीबात बुळबुळीत पणा नसलेल्या ह्या पावडरला चुना म्हणावं की तिने मला ताई म्हणत चुना लावला म्हणाव न कळुन मी तो नादच सोडुन दिला. त्यापेक्षा पुर्वी मिळायचा तो सोडा परवडला असं सासु बाईंच मत पडलं.

झोपेपरी झोप गेली वर आणि शिकलेल्या नोकरी करणार्‍या बाहेरच्या जगात ववरणार्‍या मुली तुम्ही, तुम्ही तरी अशा गोष्टींना भुलणार नाही हे शालजोडीतले ऐकावे लागले बुजुर्गांकडुन. ते ऐकताना नवरा पेपर मागे तोंड लपवुन हसतोय असा भास झाला.

ह्या माझ्या किश्श्यावरुन मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. मी ५ वी ६ वीत असेन तेव्हा. घरात मी, भाऊ आणि आई असे तिघेच होतो. एक साधु (म्हणजे त्यांचा वेश तसाच होता कफ़नी वाला) आजोबा आमच्या दारात "माई भिक्षा वाढा" म्हणत उभे राहिले. त्यावेळी सेफ़्टी दार कल्पना अस्तीत्वात नव्हती निदान आमच्या चाळीत तरी नव्हती. एक तर सगळ्यांचे दरवाजे रात्री झोपे पर्यंत उघडे असायचे. एकाच्या घरी कोणी आलं तरी आजुबाजुची चार डोकी घरात डोकवायची चाळसुलभ उत्सुकतेने कोण आलय बघायला, आणि हो गरज पडली तर मदतीलाही.

आईने तांदुळ दिले. तिला आशिर्वाद देत ते म्हणाले, "माई तुमचा वर्तमान थोडा खडतर आहे. आता हे सांगायला ते कशाला हवे होते. समोर दिसणार्‍या गोष्टींवरुन कोणीही हे सांगु शकलं असतं. पण तेव्हा मोठी गम्मत वाटली होती मला. त्यात त्याने तुमची मुलं गुणी बाळं आहेत. लाखात एक त्यांच नशीब आहे माई, तुमचे यजमान तापट आहेत आईने लग्गेच मान डोलावली. पण भोळा सांब आहेत. तू पार्वती माय आहेस माई. तुझी मुलं तुला सोन्याचा दिवस दाखवणार.

अस म्हणताच आईने त्याला दहा रुपये दिले. खायला ताजी (शिळी नव्हे) पोळी भाजी दिली. कोणत्याही बाईला तू सोशीक, तू म्हणून टिकलीस अस म्हंटल की बर वाटतं. तिच्या मुलांच कौतुक केलं, त्यांचा भविष्यकाळ चांगला आहे म्हंटलं की आस्मान ठेंगणं होतं त्यात नवल ते काय? आत्ता आठवण्याच कारण म्हणजे मला १००% असं वाटतं की हे मानसशास्त्र जाणणारे त्या साधुच्या वंशातले लोकच आताच्या काळात ह्या मार्केटींग करणार्‍या मुला मुलिंच ट्रेनिंग घेत असावेत.

तर असो, असा एक शनिवार धडा घेण्यात गेल्यावर आता मी एक उपाय योजना केलेय. दुपारी दोन ते चार घराची बेल बंद ठेवणे, मोबाईल स्वीच ऑफ़ किंवा सायलेंट वर टाकणे, लॅंड लाईनची रिंग लो टोन वर करुन ठेवणे जेणेकरुन फ़ोन वाजलाच तरी हॉलमधे सुरु झालेली रिंग पॅसेजमधेच विरुन जाईल नी मी निवांत झोपेन बेडरुममधे.

(ता.क. : ह्यातला दुपारी २-४ प्रवेश बंद चा प्रयोग फ़क्त उपद्रव देणार्‍या लोकांसाठी असुन तो तुमच्या सारख्या सुह्रुदांसाठी लागु नाही. तरीही तुम्ही अगत्याने आमच्या घरी येणे करावे हि विनंती. फ़क्त येण्यापुर्वी दुपारी दोनच्या आधी फ़ोन करुन कळवल्यास त्या दिवशी बेल चालु ठेवणे, फ़ोन स्वीच ऑफ़ न करणे मला सोयीचे होईल आणि तुमची खेप फ़ुकट जाणार नाही.)