गुरुवार, ३० जुलै, २००९

संवादाचा तुटता धागा;
वाद घेतसे त्याची जागा
दुखावलेले हळवे मन;
सांधत बसते वेडे क्षण
गेला क्षण हा काल असे;
उद्या न वेड्या येत असे
नव्या उषेचे गाणे गात;
आज आजची करुया बात

बुधवार, २९ जुलै, २००९

शनिवारची एक दुपार

शनिवारची दुपारची वेळ. नुकतच पोटभर जेवुन मागचं आवरुन झालेलं. डोळ्यावर त्या जेवणाची सुरेख अशी सुस्ती आलेली. आता एरव्ही कसं एसीत बसुन डब्यात थंड झालेल्या भाजी पोळीवर भागवावं लागतं, तर मग शनिवार रविवार मस्त गरम गरम जेवण जेवताना जातात दोन घास जास्त, नी येतेच सुस्ती.

अहाहा! आता मस्त दोन तास झोप काढता येणार कारण लेक पण झोपलेय ह्या खुशीत आडवी झाले. फार फार तर १०-१५ मिनिटं गेली असतील नसतील तोच माझा मोबाईल जागा झाला. त्याच्या एकेकाळी, एकेकाळीच का? सकाळ पर्यंत सुरेल वाटणाया रिंग टोनने कर्कश्य स्वरात गायला सुरुवात केली. रडणारं मुल कसं उचलुन घेतल्या शिवाय थांबत नाही तसे हे फ़ोन नी त्याचे रिंगटोन्स. फार फार तर थोडा वेळ थांबतील, पुन्हा समोरचा त्याच्या/तिच्या फ़ोनवर खाडखुड करतो की हे इथे गळे काढणार.

लेक जागी होण्याच्या भितीने (हि भिती तेव्हा जास्त महत्वाची होती फ़ोन महत्वाचा असता नसता तरिही) मी येणार्‍या झोपेला थोडं बाजुला सारुन कडमडत जाऊन फ़ोन घेतला. आवाजातुन जास्तीत जास्त वैताग कळावा असा "हॅलो" चा उच्चार करतच मी सुरुवात केली. पलिकडुन एक बया मला "पर्सनल लोन" हवय का अस प्रेमाने विचारत होती. त्यासाठी कुठच्याही कागद पत्रांची गरज नाही अशी भलावण करत ते लोन माझ्या गळी उतरवु पहात होती.

बाई ग मला सध्या फ़क्त अडथळा फ़्री झोप हवेय, तेव्हढी एकच सध्या महत्वाची नी तातडीची गरज आहे माझी. लोन बीन अशा बिनमहत्वाच्या गोष्टींसाठी मी आठवडाभर मनाशी ठरवलेली झोप सोडू म्हणतेस? पण असल्या कोट्यांनी विचलीत न होता लक्ष साधायचं ट्रेनिंग तिला मिळालं असावं बहुतेक, कारण तिने तरिही लोनच घोडं पुढे दामटायला सुरुवात केली. आवाजातलं मार्दव (?) शक्यतो कायम ठेवत बाई मी "अंथरुण पाहुन पाय पसरावेत" हे शिकलेय हे सांगितलं. समोर अंथरुण होतं म्हणुन पण मला हि म्हण सुचली असावी. नाहितर हे म्हणी बिणी नेमक्या वेळी कुठल्या आठवायला. तिच्या ट्रेनिंग मधे म्हणी येत नसाव्यात, कारण हे वाक्यच्या वाक्य तिला बाउन्सर गेलं. तिला तसच संभ्रमात ठेवत मी तिला म्हंटलं बर देतेच आहेस तर घेते बापडी लोन. ती हुरळुन पुढची माहीती सांगण्य़ाआधीच ह्यात पण कर्जमाफ़ी वगैरे होते का? अस विचारल्यावर तिने माझी पत ओळखुन स्वत:च फ़ोन कट केला.

बरी टळली बला म्हणत मी पुन्हा अंथरुण पाहुन माझे पाय पसरले नी डोळे मिटले. पण नशिबात योगच नसेल तर काहीही होतं. पुढच्या १० मिनिटात लँड लाईन ट्रींग ट्रिंग करु लागला. कॉर्डलेस फोन मी दुरुस्त न करण्याचा आळशीपणा का केला? आता उठा कविताबाई, पळा हॉलमधे आणि घ्या तो फोन म्हणत स्वत:वरच चरफडत फोनपर्यंत जाते नाही तोच, तो नरडं आवळल्यासारखा बंद झाला. मला पलिकडची/चा खदाखदा हसतोय असा भास झाला एक क्षण. मागे वळले तर पुन्हा तेच ट्रिंग ट्रिंग. ह्यावेळी रॉंग नंबर होता. एक तर झोपेचं खोबरं होत होतं, त्यात असे बिनकामाचे नी भलत्याच कुणासाठीचे फोन उचलायचे म्हणजे काय असतं, ते फ़क्त आठवडाभर ह्या दुपारच्या झोपेची स्वप्न बघितल्यावर नेमक्या वेळी ज्याच्या स्वप्नांवर अस विरजण पडलय ना तेच जाणु शकतात.

चला यायचे तेव्हढे अडथळे येऊन गेलेत म्हणत परत झोपेच्या स्वाधीन झाले. तसही पडल्या पडल्या पाच मिनिटात झोप लागण्याच भाग्य नशिबात असल्यामुळे मी पुढच्या ५ मिनिटात झोपु शकले.

पण हाय रे दैवा! झोप लागण्याच भाग्य असलं तरी विनाखंड मिळण्याचं पण भाग्य नशिबात असावं लागतं त्याच काय? पुन्हा तेच कर्कश्य वाजणं नशिबात होतं. पण ह्यावेळी त्रास देणार साधन बदलेलं. फ़ोनच्या ऐवजी फॉर अ चेंज म्हणुन घराची बेल वाजत होती. आता कोण? तर कुरियरवाला! ह्यांना बरी दुपारची वेळ मिळते लोकांची घर ठोठवायला? चरफडत टपाल घेऊन सहीचा कागद परत दिला. हे कुरियरवाले पेन बरोबर घेऊन हिंडतात ते एक बर आहे. नाहितर ते शोधण्यात पुन्हा ५-१० मि. गेली असती फ़ुकट.

हि सगळी अडथळ्यांची शर्यत पार करेतो तीन वाजले. माझ लक्षं घड्याळा बरोबर लेकीकडेपण होतं. कारण ती दोन वाजता झोपल्ये म्हणजे चारच्या ठोक्याला उठणार. मी आत्ता झोपु शकले तर मला कमीत कमी एक तासभर झोप मिळणार. ती उठली की मग कसली झोपु देतेय मला.

पण! हो हो आहेच मधे पण. त्याच काय आहे ना, सुखासुखी झोप पण नशिबात असावी लागते. तर आज माझ्या रुसलेल्या नशिबाने पुन्हा एकदा कोणाच्या तरी रुपात दाराची बेल वाजवली. मी परत एकदा माझा मोर्चा दरवाजा कडे वळवला. आता कोण कुरियरवाला आलाय असा विचार करत दार उघडलं. आमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर एक छोटा पॅसेज आहे जो आम्ही ग्रिल लावुन सेफ़्टी दरवाजा लावुन बंद केलाय. शक्यतो कुरियर वगैरे गोष्टी हा सेफ़्टी दरवाजा न उघडता त्याच्या ग्रीलमधुनच घेतो. तर मी मुख्य दरवाजा उघडुन त्या पॅसेजमधे पोहोचले कोण आलय बघायला. समोर म्हणजे सेफ़्टी दरवाज्याच्या बाहेरच्या बाजुला एक तरुण मुलगी उभी होती. आधी वाटल चुकलेला पत्ता विचारायला किंवा समोर बस थांबा आहे तेव्हा पाणि मागायला किंवा पावसाळ्याचे दिवस आहेत तेव्हा मोकळी व्हायला आली असेल. तळमजल्याला रहाण्याचे हे तोटे आहेत. मदत न करावी तरी पंचाईत आणि करावी तरी पंचाईत, कारण आजकाल कोण खरा गरजु, कोण फुकटा, कोण ते निमित्त साधुन गंडा घालायच्या तयारीत आहे हे कळतच नाही.

पण तिने अशी पंचाईत केली नाही निदान असलं काही मला मदत करु की नको अस संभ्रमात टाकणार काम सांगितलं नाही. मग कोण हि बया चांदण्यात लोकांच्या घराची बेल वाजवतेय असा विचार येतो न येतो तोच,तिने "रेणुका शहाणे" हास्य फ़ेकुन ताई, मी तुमची दोन मिनिट घेऊ शकते का? असा टिपिकल छापील प्रश्न केला. त्या बरोब्बर माझ्या डोक्यात दिवा पेटला. अरेच्च्या! ही तर विक्रेती.

सॉरी, मला सध्या काहीही नकोय झोप सोडुन म्हणत मी दार लावायला मागे वळणार तोच पुन्हा एकदा तो कमावलेला आवाज आला.

ताई, बघुन तर घ्या. मी "अबक" कंपनी कडुन आलेय. आमच्या कंपनीने हे नविन प्रॉडक्ट लॉंच केलय. त्याची मार्केट व्हॅल्यु आहे रुपये ३० प्रत्येक १०० ग्रॅम साठी. आजच्या स्पेशल डिस्काउंट ऑफरमधे तुम्ही एक ३० रुपयाच पाकिट घेतलत तर त्यावर एक पाकिट तुम्हाला फ़्री मिळणार आहे. त्याबरोबर हा लकी ड्रॉ चा फ़ॉर्म भरुन द्यायचाय. तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ५ किलोच पॅकेट फ़्री मिळेल शिवाय फ़ॅमिली सह गोव्याला ३ दिवस २ रात्रीची सहल फ़्री.

लक बिक गोष्टी माझ्या पारड्यात असत्या तर दुपारी दोन पासुन अशी उठाबशी करावी लागली असती का? हे आपलं मनात. आम्ही मनातच म्हणणार, मग घ्या भोगा आता दोन मिनिट समोर उभं राहिल्याचे परिणाम.

मला काहिही नकोय च्या पुढे माझी गाडी काही जात नव्हती, तरीही ती चिवटपणे माझा इंटरव्ह्यु घेत होती. मी देखील वेड्यासारखी तिला खरी खुरी उत्तर देत होते. कोणती पावडर कपड्यांना वापरता पासुन सगळा कपडेपट तिने विचारुन घेतला. एकवेळ शाळेचा इंटरव्ह्यु देणं सोप असेल पण हा अनुभव नकोसा होता. नाही नाही मी चुकुन शाळेचा इंटरव्ह्यु अस नाही लिहीलेलं. आजकाल नोकरीचा इंटरव्ह्यु सोपा असेल असा शाळ प्रवेशाच्या इंटरव्ह्युचा मामला असतो.

तिच्या सगळ्या प्रयत्नांना फ़ोल ठरवत मी निग्रहाने मागे वळले. तेव्हढ्यात ताई, पाणी मिळेल का? अशी आर्जवी विचारणा झाली. होणारच! येव्हढ्या चांदण्यात पायपिट केली, येव्हढी घसाफ़ोड केल्यावर घशाला कोरड पडणारच ना? आता पाण्याला का कोणी नाही म्हणतं? मग तिला तसच सेफ़्टी डोअरच्या बाहेर तिष्ठत ठेवत मी पाणि आणायला गेले. हो आजकाल दार उघडुन आत घेण्याइतका भरवसा चांगल्या घरातली असावी असं दिसणार्‍या मुलीवरही ठेवता येत नाही.

ती पाणी पीत असताना तिचच निरिक्षण करत होते. दिसायला नीटनेटकी, २३-२४ वर्षाची हि तरुणी शिकलेली वाटत होती. पेहेरावा वरुन परिस्थिती आमच्या सारखीच म्हणजे खाऊन पिऊन (इथे पाणी अपेक्षीत आहे) सुखी अशी मध्यमवर्गीय वाटत होती. मग तिची ती डबोलवाली बॅग बघून थोडी दया आली. कोणा कोणाला काय काय करावं लागतं पोटासाठी. बिच्चारी! माझ्या मनात तिचं बारसं तोपर्यंतं बिच्चारी झालं होतं.

तिच्या ट्रेनिंग मधे मुरलेल्या अनुभवी मनाने माझ्या चेहर्‍या वरचा बिच्चारी पर्यंत झालेला अबोल प्रवास टिपला असावा. कारण पाणि पिऊन तिने एक सह्या केलेला, माहिती भरलेला कसलासा कागद माझ्यापुढे धरला. ताई, हे बघा तुमच्याच बिल्डींग मधे ४ थ्या मजल्या पासुन सगळ्यांनी घेतलय. त्या शेजारच्या काकुंनी अशी तीन पाकिटं घेतली ताई.

माझं मन थोडं द्रवलं, एकतर तिने शेजारचीला काकु आणि त्याच वेळी मला ताई म्हणुन माझ्या संतुर साबणाला दाद दिली होती. तिथेच ती अर्ध ह्रुदय जिंकुन बसली. पुन्हा ती हे सगळं मॅनेजमेंटच्या कोर्सचा भाग म्हणुन पॉईंटस मिळवण्यासाठी करतेय म्हंटल्यावर तर मला भरुनच आलं. गरज नसतानाही मी दोनावर दोन फ़्री अशी साठ रुपयांना फ़ोडणी घालुन घेतली. ती पुन्हा रेणुका शहाणे हास्य फ़ेकुन निघुन गेली.

ह्या सगळ्या प्रकारात झोपेचं खोबरं झालच होतं पण चला त्यातल्या त्यात एका अभ्यासु मुलीला मी दोन पॉईंट मिळवुन दिल्याच समाधान होतं. हा त्या ताईचा इफ़ेक्ट नसुन तिच्या चिकाटीचा होता हे मी इथे विशेष नमुद करु इच्छीते.

त्या नादात मी नविन पावडरचं उद्घाटन करायचं ठरवलं. सकाळी कपडे धुवुन झालेले होते तरीही कुठुन कुठुन शोधुन ४-५ कपडे मी त्या पावडर मिश्रित पाण्यात भिजवले. अजीबात बुळबुळीत पणा नसलेल्या ह्या पावडरला चुना म्हणावं की तिने मला ताई म्हणत चुना लावला म्हणाव न कळुन मी तो नादच सोडुन दिला. त्यापेक्षा पुर्वी मिळायचा तो सोडा परवडला असं सासु बाईंच मत पडलं.

झोपेपरी झोप गेली वर आणि शिकलेल्या नोकरी करणार्‍या बाहेरच्या जगात ववरणार्‍या मुली तुम्ही, तुम्ही तरी अशा गोष्टींना भुलणार नाही हे शालजोडीतले ऐकावे लागले बुजुर्गांकडुन. ते ऐकताना नवरा पेपर मागे तोंड लपवुन हसतोय असा भास झाला.

ह्या माझ्या किश्श्यावरुन मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. मी ५ वी ६ वीत असेन तेव्हा. घरात मी, भाऊ आणि आई असे तिघेच होतो. एक साधु (म्हणजे त्यांचा वेश तसाच होता कफ़नी वाला) आजोबा आमच्या दारात "माई भिक्षा वाढा" म्हणत उभे राहिले. त्यावेळी सेफ़्टी दार कल्पना अस्तीत्वात नव्हती निदान आमच्या चाळीत तरी नव्हती. एक तर सगळ्यांचे दरवाजे रात्री झोपे पर्यंत उघडे असायचे. एकाच्या घरी कोणी आलं तरी आजुबाजुची चार डोकी घरात डोकवायची चाळसुलभ उत्सुकतेने कोण आलय बघायला, आणि हो गरज पडली तर मदतीलाही.

आईने तांदुळ दिले. तिला आशिर्वाद देत ते म्हणाले, "माई तुमचा वर्तमान थोडा खडतर आहे. आता हे सांगायला ते कशाला हवे होते. समोर दिसणार्‍या गोष्टींवरुन कोणीही हे सांगु शकलं असतं. पण तेव्हा मोठी गम्मत वाटली होती मला. त्यात त्याने तुमची मुलं गुणी बाळं आहेत. लाखात एक त्यांच नशीब आहे माई, तुमचे यजमान तापट आहेत आईने लग्गेच मान डोलावली. पण भोळा सांब आहेत. तू पार्वती माय आहेस माई. तुझी मुलं तुला सोन्याचा दिवस दाखवणार.

अस म्हणताच आईने त्याला दहा रुपये दिले. खायला ताजी (शिळी नव्हे) पोळी भाजी दिली. कोणत्याही बाईला तू सोशीक, तू म्हणून टिकलीस अस म्हंटल की बर वाटतं. तिच्या मुलांच कौतुक केलं, त्यांचा भविष्यकाळ चांगला आहे म्हंटलं की आस्मान ठेंगणं होतं त्यात नवल ते काय? आत्ता आठवण्याच कारण म्हणजे मला १००% असं वाटतं की हे मानसशास्त्र जाणणारे त्या साधुच्या वंशातले लोकच आताच्या काळात ह्या मार्केटींग करणार्‍या मुला मुलिंच ट्रेनिंग घेत असावेत.

तर असो, असा एक शनिवार धडा घेण्यात गेल्यावर आता मी एक उपाय योजना केलेय. दुपारी दोन ते चार घराची बेल बंद ठेवणे, मोबाईल स्वीच ऑफ़ किंवा सायलेंट वर टाकणे, लॅंड लाईनची रिंग लो टोन वर करुन ठेवणे जेणेकरुन फ़ोन वाजलाच तरी हॉलमधे सुरु झालेली रिंग पॅसेजमधेच विरुन जाईल नी मी निवांत झोपेन बेडरुममधे.

(ता.क. : ह्यातला दुपारी २-४ प्रवेश बंद चा प्रयोग फ़क्त उपद्रव देणार्‍या लोकांसाठी असुन तो तुमच्या सारख्या सुह्रुदांसाठी लागु नाही. तरीही तुम्ही अगत्याने आमच्या घरी येणे करावे हि विनंती. फ़क्त येण्यापुर्वी दुपारी दोनच्या आधी फ़ोन करुन कळवल्यास त्या दिवशी बेल चालु ठेवणे, फ़ोन स्वीच ऑफ़ न करणे मला सोयीचे होईल आणि तुमची खेप फ़ुकट जाणार नाही.)

सोमवार, १३ जुलै, २००९

भक्ती

देव असे शक्ती
तो मनातली भक्ती
मार्ग चाल सत्याचा
मिळेल गे मुक्ती

तुला भावते जे रुप
तो तुझ्यासाठी घेतो
तुझ्या भक्ती भावाचा तो
एक आरसाच होतो

तोच चैतन्य स्वरुप
तुझ्यासाठी राम होतो
तोच चैतन्याचा झरा
मला कान्हा दाखवतो

कोणी म्हणे आदी माया
कोणी म्हणे आदी शक्ती
दत्तगुरुची ती छाया
म्हणे अंतरीची भक्ती

नावं वेगळी परंतू
एकरुप असे शक्ती
मनामधे का रे किंतू?
महत्वाची फक्त भक्ती

शुक्रवार, ३ जुलै, २००९

मनातला एक कवडसा

सहज मनात जरा डोकावुन बघत होते. स्वतःचेच विचार जरा तपासुन, घासुन पुसुन बघत होते. तेव्हा जाणवल ते हे की -

मला अभंग येत नाहीत पण आवडतात
मला सत्संग, गुरु, सोवळ ओवळ जमत नाही
मला देव देवळात असतो का ते देखील ठावुक नाही
पण समर्पण म्हणजे देव, सत्य म्हणजे शक्ती हे मला पटत
दया क्षमा शांती देवा दे तू माझ्या अंगी हा माझा अभंग
मी माझ्या पुरता गाते. नेहमीच यश येत नाही कारण ..
कारण मी घसरण्याला हरणं मानते
तस नसत, प्रयत्न सोडणं म्हणजे हरणं हे मनाला कळायला हव
मंदिरात माझ मन रमो न रमो, दगडात मला देव दिसो न दिसो
त्याच चैतन्य मला प्रत्येक चराचरात दिसो
माझ मन ही प्रार्थना रोज करत,
कधी यश येत कधी येत नाही
हा माझा दोष, त्याचा नाही.
चुकत माकतच शिकायचं
तसही "श्री" गिरवायला घेतला,
तेव्हा "श्री" म्हणताही येत नव्हतच की
जमेल असच हळु हळू
स्वत:ला तपासत चालत मात्र रहायला हव

हे काव्यही नाही, ललितही नाही. मग प्रश्न पडला हे इथे काय म्हणुन टाकु? मुळात टाकु की नको टाकु? मग विचार केला कोणी ह्याला काहीही म्हणो. चांगले वाईट काहीही किंवा काहिही म्हणण्या इतकेही त्यात काय आहे असा विचार करुन दुर्ल़क्ष करो. जे मनाच्या आरश्यावर उमटले, जे प्रतिबिंब मला स्वच्छ दिसले ते इथे मांडले इतकेच. कॅमेराने काढलेली प्रकाशचित्रे अल्बम करुन बघता येतात. माझ्या मनातल्या कॅमेराने टिपलेल्या ह्या कवडश्यांचे काय? कुठे टाकु ते? म्हणुन टाकले शेवटी इथे.

प्रिय सखी

प्रिय सखी,

आज आषाढी एकादशी, पाऊस कोसळतोय. जनरली आषाढी एकादशीला पाऊस पडतोच ना ग!
तुला आठवतं आपण तिघी एक वर्ष आषाढी एकादशीलाच पावसात अडकलो होतो? गाड्या ठप्प झालेल्या!
बहुतेक २००० साल असणार.

हो नक्कीच २००० च कारण माझा साखरपुडा नुकताच झालेला. तुम्ही मला हैराण केल होतत आता भेटा आणि म्हणा "बरसात मे हमसे मिले तुम सजन तुमसे मिले हम...."
सगळीच गम्मत नुसती. त्याची नेमकी गाडी चुकली होती. मोबाईल नावाची चीज तेव्हा चैन होती म्हणजे ती आपल्याकडे नसायचीच.

तरी नशीब! आपली ट्रेन भायखळा स्टेशन वर दि एन्ड झाली ते. दि एन्ड तुझा शब्द ना? की मनिषाचा ग?
काही आठवत नाही बघ. गजनी झालाय माझा. त्यात पुन्हा किती वर्षांनी अस पत्र लिहायला बसलेय तुला. ह्या इमेल नी ना हे अस पत्र लिहायची सवयच सुटलेय. आज मुद्दाम लिहीतेय. आठवेल तस नी आठवेल ते सगळं.

तुला आठवतं काय कसरत केली त्या दिवशी आपण. आधी तिथुन बाहेर पडुन गुडघाभर पाण्यातुन टेलीफोन बुथ शोधला. घरी (म्हणजे आपल्या घरांच्या जवळ ज्यांच्याकडे फोन होते त्यांच्याकडे) हालत बयान केली आपली. म्हंटल काळजी करु नका आम्ही इथेच मिनिषाच्या नातेवाईकांकडे राहु पाऊस ओसरेपर्यंत. अर्थात आपल्या तिघींच्या आई बाबांनी विठ्ठलाची आराधना सुरु केलीच असणार तेव्हा. मग नंबर ऑफिसचा, फॉर्मॅलिटी पुर्ण करण्याचा. तिथे काय "नाही येत ठिक आहे. रजा कापु" संपला विषय. पुढे कुठे जाणार, कसे जाल काही नाही. त्यांचही ठिक आहे म्हणा आपण तरी गाड्या बंद एक सुट्टी मिळाली असाच विचार केलेला ना तेव्हा. हे आता सुचतय ह पण, एक दोन रुपेरी छटा चेहरा सजवायला लागल्यावर. तेव्हा जरा रागच आलेला बॉसच्या तुटके पणाचा.

त्यानंतर आपण कुठल्याश्या हॉटेलमधे इडली सांबार खाऊन उपवासाची इतिश्री केली होती ना ग? नी आपल्या दोघिंच्या डब्यातली साबुदाण्याची खिचडी उपवास मोडला तर पुण्य मिळणार नाही अस मानणार्‍या मनिषासाठी ठेवली होती. कसल पाप-पुण्य उपवास मोडण्यात नी न मोडण्यात म्हणा!. भाव महत्वाचा झाल! हे पुन्हा माझी रुपेरी छटा बोलतेय.

तिला तरी ही उपरती झाली असेल का ग आता? की तशीच आहे ती अजुन? भेटते का तुला? तिची आपली दोस्ती(?) जरा गहनच विषय होता तो तेव्हाही आणि आत्ताही. कुठुन तरी कळल तिच लग्न झाल. चला चांगल झाल म्हणायच.

पण त्यादिवशी तरी आधार होता एकमेकिंना एकमेकिंचा. तिच्या आपल्या आचार विचारात तफावत का असेना पण त्या दिवशी तिघी घट्ट मुट्ट मैत्रिणी होतो, हे खरय.

मग थोडावेळ मनिषाच्या जवळच्या (?) नातेवाईकांकडे थांबलो, गरम गरम चहा घेतला होता नाही?. जरी घरी सांगितल असल पाऊस ओसरे पर्यंत तिथेच राहु तरी तिथुन लवकरच निघण भाग होत. आठवत ना एकतर सिंगल रुम, माणस १५ त्यातच एक ओली बाळंतिण म्हणजे आपण थांबतो म्हणण पण संकटच त्यांच्यासाठी. हे आपल्या ब्लॉटिंग पेपर मनाने चटकन टिपलं. मन म्हणजे ब्लॉटींग पेपर हे कुणाच आवडत वाक्य ग? बहुतेक तृप्तीच असेल. नाही. हम्म! मॅथ्सच्या सरांचं. आता आठवलं बघ.

मग तिथुन उगाच कोणी दुखावणार नाही अस काहीतरी कारण पुढे करुन निघालो टॅक्सी शोध मोहीमेवर. जवळ जवळ एक दिड तास शोधत असु नाही आपण टॅक्सी? येव्हढ्या पावसात कोण सुखाचा जीव धोक्यात घालणार?

शेवटी बराच दादापुता करुन आपण एका टॅक्सीवाल्याला कुर्ल्यापर्यंत सोड म्हणुन गळ घातली. तोपर्यंत एक हिरकणी ऑन रिक्वेस्ट अ‍ॅड झाली आपल्यात कुर्ल्याला रहणारी, तिच बाळ पाळणाघरात होत म्हणुन. मग चैघीजणी रडत खडत ३-४ तासानी कुर्ल्याला पोहोचलो (स्टेशन पासुन थोड अलिकडे). आठवत का कुर्ल्याला हे पाणिच पाणि बघुन तू या$$हू करुन ओरडली होतीस. गटार रस्ता हातात हात घालुन होते. समोर अंधार, खाली पाणि आपण तिघी हातात हात धरुन चेंबुरकडे विठ्ठ्लाच्या भरवशावर निघालो होतो. तेव्हढ्यात मनिषाची चप्पल वाहून गेली पाण्यात. कोण हात घालुन काढणार ती? यॅक! मग तसेच चालत राहीलो. चेंबुर च्या पुलापाशी तिच्यासाठी स्लिपर घेतल्या. आणि एकदाचे माझ्या आजीकडे चेंबुरला पोहोचलो. मग मस्त गरम पाण्याने अंघोळ करुन पुन्हा बाहेर जाऊन (हे खरच जिवावर आणि पायावर पण आलेल नाही! कारण पाय नावाच्या अवयवाची पुलंच्या पुस्तकातली गोष्ट सोदाहरण पटली होती) पण घरी विठ्ठलालाच पाण्यात घालुन बसलेल्या आई बाबाना सुखरुप असल्याच कळवण भागच होत. मग बाहेर जाण आलच नेमका आजीचा फोन नुसता लाल डब्बा झालेला तेव्हा. म्हणजे निराळ काही नाही आता जस नेटवर्क नॉट रिचेबल तसच. पण आपल उगाच एम्टीएनएल वर तोंड सुख घेतल तेव्हा.

मग आपण मुगाची खिचडी आणि कढी, पापड लोणच असा मस्त (भुक लागली की सगळच मस्त हे जास्त खरय) बेत करुन जेवलो. आजीकडे माझे ड्रेस ठेवलेले असायचे १-२ म्हणुन बरं, आपल्या दोघींची सोय झाली. मनिषाला मात्र मामीची साडी नी आजीचा ब्लाऊज अस सोंग घ्याव लागलं. (खाते पिते घरके असण अस नडल तिला)

तुला आठवत रात्री माझा मोठा मामा आणि त्याचा मित्र (वारीहुन येत होते ते) बस अडकली म्हणुन आजीकडेच आले? तू म्हणालीस पण ही एक एकादशी उपास मोडुन सुद्धा पावली. खरय ग! एकतर आपण सुखरुप पोहोचलो, आणि दुसर म्हणजे विठोबाची भेट घेऊन आलेला मामा पण भेटला. पहीला प्रसाद आपल्या मुखी गेला.

तुला ठावुक आहे का? ती एकादशी आमची एकत्र अशी शेवटची एकादशी. २००१ माझ्याच लग्न, वर्षसण ह्या नवलाईत फक्त मी आणि माझ्यामधेच गेल आणि २००२ मधे मामा कायमचाच वारीला गेला. आज एकादशी. मी आजही उपवास केलाय. पण हा उपास विठ्ठलासाठी कमी नी त्याच्यासाठी जास्त. दरवर्षी एकादशीला पाऊस पडतो. बाहेर नाही पडला तरी माझ्या मनात मात्र पडतोच पडतो. अगदी २००० साली पडला होता तसा.

तुला पत्र लिहायच कारणही तेच. नेहमी इमेल फॉरवर्ड करतो, कधी फोनाफोनी करतो, क्वचीत वेळ गाठता आली तर गाडीत भेटतोही. बाकी एरव्ही भेट होतेच अस नाही. काही दिवस, आठवणी मात्र कायम बरोबर रहातात. त्यातलीच ही एक जिला तू बरोबर होतीस. म्हणुन हा प्रपंच माझ्या बरोबर तुझी आठवण ताजी करायचा.
बाकी काय आपल्या घोळक्या पैकी बर्‍याच जणींच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या. आपण तरी अजुन ,अधुन मधुन का होईना छेदतो एकमेकिंची वर्तुळे. नेहमी मी वाढदिवसाच्या तारखा विसरते म्हणुन सगळेच ऐकवतात मला. तुझा वाढदिवस आलाच आहे २ महिन्यानी. ह्या वर्षी नाही विसरणार मी. का माहीत आहे? तुझी आणि मामाची जन्मतारिख एकच आहे. ते जोड्या लावा कस लक्षात ठेवायचो शाळेत तसा लक्षात ठेवलाय मी आता तुझा वाढदिवस.

लिही ग तू पण कधीतरी. फॉरवर्डेड इमेलनी समाधान नाही होत मनाच.

(ता.क. तो कायनॅटीक आठवतो, बघितला परवा. बायको होती बरोबर. कसला सुटलाय. बापरे!बाप म्हणजे बाप झालाच आहे तो मुलगा पण होता बरोबर. बर झाल ह तू त्याला कॉलेजमधे भाव पण दिला नाहीस ते)

तुझी,
कवी