बुधवार, १२ जानेवारी, २०११

प्रेमग्रंथके पन्नोपर...

प्रकरण - १

त्याने तिच्या डोळ्यात बघीतलं... तिने त्याच्या डोळ्यात बघीतलं, बघता बघता दिलाची धकधक वाढली, डोक्यात प्रेमाची घंटी वाजली आणि त्याच्या डोळ्यात ती जग विसरुन विरघळून गेली. हे असं प्रेम प्रत्यक्षात सोडा कागदावर देखील जमणं, मला ह्या जन्मी तरी इऽ म्पॉऽ सिऽ बऽ ल.

नाही म्हणायला लग्न ठरल्यावर इतर नॉर्मल लोकांसारखेच आम्हीही अगदी रोज नेम असल्या सारखे एकमेकांना भेटलोय, बर्‍याचदा घरातल्या मोठ्यांना शेंड्या लावून गुपचुप हा भेटीचा कार्यक्रम केलाय, फ़ोनच्या रिंगचे पण कोडवड्‌र्स ठरवून झाल्येत त्यावेळी. ह्या आणि अश्यासारख्या आणखी बऱ्याच काही बाही किरकोळ, आणि काही कागदावर न मांडता येण्यासारख्या गुलाबी गोष्टी केल्यात नाही असं नाही तरीS पSSण.. खास फ़िल्मी.. कादंबरीमय गुलाबी प्रेऽऽम?????? श्याऽऽ कधी जमलच नाही.

त्याने कधी गुडघ्यात वाकून.. हातात गुलाब धरुन "आय लव्ह यु" म्हंटलं नाही आणि मी कधी अंगठ्याने जमिनीवरची माती उकरत.. पदर नाहीतर ओढणीशी चाळा करत मान वेळावत.. "आम्ही नॉऽय जॉ" असं उगाचच लाज पांघरत ओठाचा चंबू करत लाडीकपणे म्हंटलं नाही.

हे असं काही स्वत: उठून करणं एकवेळ बाजूला ठेवूयात पण असं काही, कागदावर त्या हिरो हिरविणीकडून करुन घ्यायला देखील पेन हातात धरणार्‍या हातातलं रक्तं गुलाबी असावं लागतं बहुतेक, कारण ते ही कधी जमलं नाही

पण ह्यावेळी मी अगदी नेटाने प्रयत्न करुन गुलाबी लिहायचं ठरवलं. वातावरण निर्मिती चांगली व्हावी म्हणून.. आणि आमच्या मनगटातील रक्त तापट ताम्रवर्णी असल्यामुळे, मी गुलाबी कागद आणून बघुयात असा विचार करुन गुलाबी कागद घेवून आले. घासाघीस करुन वीस रुपयांना सहा गुलाब आणून ते डायनिंग कम रायटिंग टेबलवर काचेच्या ग्लासात ठेवले. मी स्वत: गुलाबी रंगाचा ड्रेस घालून बसले. बरोबर प्रेमकथांचा बायबल कम गीता कम कुराण जे म्हणाल ते घे‌ऊन बसले आणि त्या "प्रेमग्रंथ के पन्नोपर" दिल्या बरहुकूम केली सुरुवात "अ" आणि "ब" च्या गुलाबी पहिल्या भेटीबद्दल लिहायला.

पहिल्यांदा "अ" ला सायकल वरुन येताना दाखवला, "ब" शी त्याची टक्कर हो‌ऊन "ब" ची पुस्तकं खाली पडतात आणि बॅगरा‌ऊंडला गाणं वाजतं असं लिहीलं. काय करणार? पुर्वीच्या सिनेमांचा इंपॅक्ट! नुसता सिनेमांचा नाही हा, माझ्या शाळेतल्या मला सिनि‌अर्स असणार्‍या आणि त्यावेळी तरी प्रेमजोड्या बनलेल्या लैला मजनूंचा पण इंपॅक्ट म्हणाना आता त्यातल्या बर्‍याच जोड्यांचं "दो हंसो का जोडा बिछ्ड गयो रे" झालय आणि तरिही "दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर.." असाच एण्ड झालाय ती गोष्ट वेगळी.

पण भर रस्त्यात असं कोणी कोणाचा धक्का लागून पडेऽल, मग आपण गाऽणं म्हणू, सूऽर दे‌ऊ म्हणत ही मंडळी त्याच रस्त्यावर कुठेतरी लपून बसल्येत कामधाम सोडून असं दृष्यं कितीही स्वप्नं स्वप्नं म्हणून ओरडले तरी डोळ्यापुढे काही ये‌ईना.

मग तो प्रसंग बदलायचं ठरवून कॉलेज मधेच पहिली भेट झाली असं लिहायचं ठरवून पेन चालवायला घेतलं. पण हाऽय रे दैवा! तिथेही आमचं ताम्रवर्णी रक्त आड आलं आणि काही केल्या "प्रथमं तुजं पाहताऽ... जीव वेडाऽऽवला.." काही मनात वाजलं नाही आणि कागदावरही उमटलं नाही.

मग सध्या टि‌आरपी रेस मधे आघाडीवर (?) असलेल्या (निदान आमच्या घरात तरी रेस मधे आघाडीवर असलेल्या आणि अधून मधून ना‌ईलाजास्तव बघाव्या लागणार्‍या) सिरि‌अल्सना साक्षी ठेवून विचार करावा म्हंटलं तर तिथेही आमच्या मनाच्या घोड्याने पेंड खाल्लं मी कन्फ़्युज्ड झाले, "अमर प्रेम" मधे दाखवल्याप्रमाणे आधी भांडण दाखवून मग मैत्री.. प्रेम असे टप्पे दाखवू? त्यात पण आजचे ज्वलंत (?) विषय घुसडवून कहानी मे (ओन्ली) ट्विस्ट लावू की "माझिया प्रियाला प्रीतं कळेना" सारखं त्यांच्यात आधी मैत्री, प्रेम दाखवून घरच्या घरीच हर्डल रेस असल्यासारखे मधे मधे बिब्बे घालू? श्या विचार करुन करुन नमनालाच घडाभर तेल खर्ची झालं. तरी बरं त्या कॅन्सर वाल्या सिरि‌अलला पुर्ण विराम मिळालाय आणि भाग्यलक्ष्मी सध्या आ‌ऊट ऑफ़ फ़ोकस (आमच्या घरातून आउट ऑफ फोकस ) आहे नाहीतर मी पार भंजाळूनच गेले असते. :फ़िदी:

पण तरिही गाडी काही पुढे सरकत नव्हती. म्हंटलं जा‌ऊदेत भेट बीट, टक्कर बिक्कर, ह्या न झेपणार्‍या कामांनी चक्कर यायच्या आत आपण पुढचं वर्णन बघुयात जमतय का ते. फ़ार तर काय भेट कशी झाली ते दाखवायला फ़्लॅशबॅकचा वापर करावा लागेल हाय काय नाय काय!

तर आता भेटीचं वर्णन बाजूला ठेवुयात. भेटला असेल हा "अ" त्या "ब" ला "क्ष" ठिकाणी असं समजुयात (डोन्ट वरी फ़्लॅशबॅक है ना! ) (आता म्हणाल "अ" "ब" "क्ष" ही कसली अनरोमॅंटीक नाव. तर लोकहो आता नावांच्या घोळामधे अजून अर्धा तास दवडण्या इतकी शा‌ई काही माझ्या पेनात नाही तेव्हा थोडावेळ घ्या की चालवून तशा काय कमी गोष्टी चालवून घेता काय एरव्ही ) मुळ मुद्दा काय तर ते भेटले नी प्रेमात पडले. प्रेमाच्या बायबल कम गीता कम कुराण अशा त्या प्रेमग्रंथचा पुढचा अध्याय वाचायला मी सुरुवात केली त्याशिवाय माझ्या पेनात ताकद कशी येणार हो?. "प्रेमजीवांचे वर्णन" ह्या धड्यावर ये‌ऊन थांबले.

कसाS दाखवावा बरं..अं... "अ"? गोरापान? मेघंS सावळाSS माSझा राSजा? की ऍंग्री यंग मॅन? की मिक्श्चर ऑफ़ ऑल? आणि कशी दाखवावी "ब"? गोरी गोरी पान फ़ुलासारखी छान जणू फ़े‌अर ऍंड लव्हली ची मॉडेल? की बिप्स सारखी स्मार्ट (?) सावळी (?) कशी का असेना पण ती हटके हवी हे वाक्य अगदी अधोरेखीत करुन ठेवलय पुस्तकात. आणखी एक मुद्दा अधोरेखीत केलाय त्यात ,तो म्हणजे "प्रेमात पडलेले जीव एकमेकांसाठी राजकुमार आणि अप्सराच" दुसरी काहीही उपमा नाही. "दिल आया गधी पे तो परी क्या चीज है" हे आपण म्हणतो, त्या फ़िल्ड करता आ‌ऊटसायडर्स लोकं पण तिच्या चष्म्याने तो "राजकुमार" आणि त्याच्या डोळ्यात ती "अप्सराच" . तेव्हा आपल्याला गधी वाटो नाहीतर आणखी कोणी लिहिताना मात्र त्यांचा गुलाबीवाला चष्मा लावूनच लिहायचं म्हणजे मग दोघे अगदी तस्सेच दिसणार "राजकुमार आणि अप्सराच" अगदी. आठवा की सैफ़ आणि अमृता सिंगची त्यांच्या गूड ओल्ड डेज मधली जोडी. एरव्ही तुम्ही त्यांना काय वाट्टेल ते म्हणू शकाल पण त्यांचा चष्मा लावलात तर म्हणाल ना ते दोघेही अगदी "राजकुमार नी अप्सरा" म्हणून! गेलाबाजार जुन्या जमान्यातली संध्या आठवा. नाहीतर कालपरवाची माधुरी (हो हो तिच ती रामाची सिता) आठवा. डोळे वटारु नका ती अप्सराच आहे पण तिला म्हणे कोण तो झिपर्‍या संजय दत्त आवडला होता एकेकाळी (मला नाही हो कधी खरं वाटलं मी अफवा अफवा म्हणून उडवून लावलं पण लोकं म्हणतात असं) तर सांगा आहे का तो ह्या अप्सरे पुढे कोणी? पण लावला होता ना तिने चष्मा म्हणून दिसला असेल तिला तो राजकुमार. चष्मा फुटला आणि पुढचं संकट टळलं म्हणे. आता तो अभिषेक बच्चनांचा ज्युनिअर, वाटलाच ना अ‍ॅशला राजकुमार (कोण ते मला फटके देऊ का म्हणतय? त्यांनी चष्मा काढून हेच वाक्य म्हणावं ) तर असो थोडक्यात काय त्यांच्या नजरेला ते राजकुमार आणि अप्सराच असतात.
थंबवाला रुल नंबर एक तर कळला मला त्याखाली अजून एक महत्वाचा असाच थंबवाला (अंगुठेछाप) रुल नंबर दोन दिसला. तो असा "तो आणि ती वर्णाने गोरे असोत की सावळे, गुणाने मात्र दोघेही दुधापेक्षाही गोरे हवेत. दोघेही सर्वगुणसंपन्न, म्हणजे ती अधोमुखी, नम्र, प्रेमळ, सुंदर, सोज्वळ स्मार्ट हवी म्हणजे हवीच. त्यात ग्रे शेडींग अजिब्बात चालणार नाही म्हणजे नाही. आणि "तो" देखील हुषार, नम्र, देखणा अगदी आदर्ष पुरुष असाच हवा. हवा म्हणजे काय हवाच. त्यालाही "नो ग्रेड शेडींग" रुल आहेच.

आणि हो जेवणात जसं लोणचं हवं चवी पुरतं तसं दोघांचा हा मनाचा दुधाळ गोरेपणा हायला‌ईट व्हायला एखादा त्याचा मित्रं किंवा तिची मैत्रिण किंवा असं एखादं कॅरेक्टर हवं जे मनानं एकदम काळं कुट्टं आहे. काळं कुट्टं इतकं की अमावस्येचं आकाश देखील त्याच्या पुढे उजळ ठरेल. त्यात कॉंप्रमा‌ईज चालणार नाही. मग ती व्यक्ती "ती" असेल तर तिच्या पेहरावात काहितरी भडक आणि ठसठशीत हवच म्हणजे भांगापासून नाकापर्यंतं येणारं कुंकू वगैरे किंवा तत्सम काहीतर. थोडक्यात काय तर लहान मुल घाबरुन रडेल असा मेकअप हवा तिचा. आणि व्यक्ती जर "तो" असेल तर शकुनी मामा छाप काहितरी हवच. आणि हो त्यांचं एकच काम त्यांनी सारखे बिब्बे घालायचे स्टोरीत आणि द एण्ड लवकर होण्यापासून वाचवायचं .

मग तो अंगुठेछाप म्हणजे थंबवाला रुल नंबर एक वाचून पुढे लिहायला बसले. "लैला को देखो मजनू की नजरसे" तसच "ब" को देखो "अ" की नजरसे म्हणत केलं तिला एकदम "सर्वगुणसंपन्नं अप्सरा" आणि तिच्या नजरेने बघत बघत त्यालाही केला "सर्व गुणसंपन्न राजकुमार"

आणि अंगुठेछाप म्हणजे थंबवाला रुल नंबर दोन वाचून आणला मधे एक बिब्बा त्यांच्या. दिलं त्या बिब्ब्याला नाव "क" आणि केलं त्या "क" ला खलनायिका.

येव्हढं लिहीपर्यंत दिवेलागणीची वेळ झाली. मग ती गुलाबी गुंडाळी तशीच ठेवून कुकर लावायला उठले.

आणि त्या ग्रंथातपण हेच लिहीलेलं होतं रुल नंबर तीन म्हणून, हेच म्हणजे लेखिकेने वरण भाताचा कुकर लावावा हे नव्हे तर कहाणी अशी एकदम सांगून संपवायची नाही हे लिहिलेलं. कहाणी कशी असावी तर म्हणे "ती डेली सोपसारखी वर्षानुवर्ष तरी चालायलाच हवी किमान पक्षी क्रमश:ची एण्ड नोट कमीत कमी १०-१२ वेळा तरी लागायलाच हवी"

म्हंटलं सोप्पं आहे आपण आपला "टिंब टिंब" लोकांचा नियम लावायचा. ते कसे जेवायला २ माणसं असोत नाही तर २०, डाळ तेव्हढीच १/२ भांड लावतात आणि वर म्हणतात "तुम्हाला काय कळणार, पाण्यालाही चव आणते ती खरी सुगरण!" तस्सच करायचं २ भाग कसले २ पॅरेग्राफ़ मधे संपणारं मटेरि‌अल चु‌ईंगम सारखं ताणून ताणून २० भागापर्यंत न्यायचं. त्या च्यु‌इंगम मधला सगळा रस संपून ते दाताला, ओठाला चिकटून दात दुखायला लागेपर्यंत ताणायचं आणि ताणण्याचं समर्थन म्हणून टि‌आरपीचं तुणतुणं वाजवायचं की झालं.


प्रकरण - २

तर उदरभरण झाल्यावर लिहायला सुरुवात केली, हो मला रिकाम्या पोटी गुलाबी बिलाबी विचार देखील जमत नाहीत.

"अ" ची भेट होते "ब" शी "क्ष" जागी. दोघेही प्रेमात पडतात आणि मधे येतो बिब्बा "क" नावाचा. मग पुन्हा एकदा सिरि‌अल्सचा नवनीत गा‌ईड सारखा वापर करत "क" चे थोडे काळे कुट्ट प्रताप दाखवले आणि रंगवले ताटातूट, हर्डल रेस चे प्रसंग. मग समज गैरसमज की परत सगळं निवळून सुरु होते "एका लग्नाची गोष्ट". चला संपली एकदाची गोष्ट लग्नाच्या अक्षता दे‌ऊन. त्या पुढचा भाग हा प्रेमग्रंथामधे येत नाही, तो संसारचक्र नावाच्या क्रमिक पुस्तकाचा भाग आहे त्यामुळे गुलाबी स्टोरीचा दि एण्ड, अक्षता घे‌ऊनच दाखवायचा हा थंबवाला रुल नंबर चार आहे त्या प्रेमग्रंथातला.

प्रकरण २ फ़ारच छोटं झालय का? को‌ई बात नही, घालते नंतर पाणी त्यात. आहे की फ़ंडा माझ्यापाशी तो माझ्या ओळखीच्या टिंब टिंब लोकांचा .पण प्रकरण २ चा इतकाच भाग लिहिपर्यंत रात्रीचे १२ वाजत आलेले म्हणून कष्टाने ते गुलाबी भेंडोळे दिले गादीखाली ठेवून नी डोळे मिटून निद्रादेवीच्या आधीन झाले.

जर्रा नाही झोप लागत तर खोलीत कोणाचे तरी चढेल स्वर कानावर आले. उठून बघते तर काय तीन जणं - दोन मुली आणि एक मुलगा मला घेराव घालून रागाने बडबड बडबड करत होते. मला वाटलं चोर शिरले की काय माझ्या घरात? आजकाल चोर पण एकदम बन ठनके येतात की काय? एकदम कोण्या देशीचा राजकुमार नी स्वर्गिय अप्सरा बनून? अशी एक शंका मनाला चाटून गेली. तेव्हढ्यात ती त्या तिघांमधली अप्सरा वचावचा शिव्या द्यायला लागली अगदी ट्रेन मधल्या भांडणात बायका देतात तसल्या शिव्या तिच्या शिव्यांमधे पेरलेल्या शब्दांवरुन माझ्या थोडं थोडं लक्षात आलं की ही बया सॉरी अप्सरा तर माझ्या त्या गुलाबीवाल्या कथेतली हिरवीण आहे. अरेच्चा! पण ही अधोवदना, सलज्ज, सालस मुलगी का अशी अचानक बिब्बेवाली सारखे रंग दाखवायला लागली? माझ्या मनात प्रश्न उमटतोय नाही तोच तो राजकुमार पण तिची री ओढत माझ्याशी भांडायला लागला. "तुझ्यावर केस करीन" म्हणाला. "केस करीन?" कम्माल आहे बॉ ह्यांची. तर ती तिसरी मुलगी ढसाढसा रडायला लागली. हे मात्र अती होतं अगदी. तिचा रोल काऽऽय ती रडतेय काऽऽय? जिने रडायचं ती भांडतेय आणि जिने काळेकुट्टं प्रताप करायचे ती रडतेय? काय चाल्लय काय? हे असलं काही वळण नव्हतं लिहीलं त्या "प्रेमग्रंथ के पन्नोपर" !

म्हंटलं "तुमची मागणी तरी काय?" " इतकी छान त्या ग्रंथाबरहुकूम कथा लिहीली मी मग का बर माझ्यावर इतका राग?" त्यांचा जरा कमर्शि‌अल ब्रेक साठी स्टॅच्यु होताच मी कसं बसं माझं वाक्य पुर्ण करुन घेतलं.

"मला गुडीगुडी वागून कंटाळा आलाय" अ आणि ब दोघांनी एकदमच तक्रार केली

"आणि मला नुसतं वा‌ईट्ट वा‌ईट्ट वागून कंटाळा आलाय" बिब्ब्याने संधी मिळताच बोलून घेतलं.

"आमच्या ब्लॅक एण्ड व्हा‌ईट शेड्सची सरमिसळ करा नाहीतर कोर्टात खेचू" असं त्या तिघांनी एकमतानं एकवलं.

"दुसर्‍या दिवशी बघते" असं मंत्र्यांच्या स्टा‌ईल मधे आश्वासन देत मी ती वेळ निभावून नेली. दुसर्‍या दिवशी कामाच्या धामधुमीत विसरुनच गेले मी असं काही आश्वासन दिलय ते (हे ही पोलिटिकली करेक्टच म्हणा)

लक्षात आलं तेव्हा धावत बेडरुम मधे जा‌ऊन ते भेंडोळं शोधायला सुरुवात केली. ते भेंडोळं गायब होतं तिथून. म्हंटलं सुंठी वाचून खोकला गेला. पण कसचं काय लेकीची हाक ऐकून बाथरुम मधे डोकावले तर दिसलं, त्या गुलाबी कागदाची गुलाबी होडी करुन लेक अंघोळीच्या टबात होडी होडी खेळत बसलेली.

एकदम धस्सं झालं, म्हंटलं त्या कागदावरच्या तिघांचं काय झालं असेल आत्तापर्यंत? मग लेकीचा आरडा ओरडा काना‌आड करत मी ती होडी पाण्यातून बाहेर काढली आणि भीत भीत त्या तिघांकडे बघितलं. पाण्यामधे भिजल्याने तिघांचे रंग ओळखू न येण्या इतके एकत्र झालेले. खा परत शिव्या लेखिका बा‌ई म्हणत तिघांकडे पुन्हा एकदा बघायचं धैर्य दाखवलं, तर काय? ती तिघेही चक्क शीळ घालत हसत होती आणि लेकीला धन्यवाद देत होती, त्यांना हवे होते तसे रंगांचे शेडींग झाले होत म्हणून.

माझी मात्र "केस होणार माझ्यावर" ही एकमेव चिंता अशी झटकन मिटली.

प्रकरण ३ चांगलाच धडा शिकवून गेले आणि भविष्यात ते रुल्स बरहुकूम लिहून केस होण्याची आफ़त मी ओढवून घ्यायची नाही हे ठरवून पण टाकलं. त्याप्रमाणे माझा मीच ठरवलेला थंबवाला रुल नंबर फ़र्स्ट एण्ड लास्ट म्हणून तो प्रेमकथांचा बायबल कम गीता कम कुराण असलेला "प्रेमग्रंथं" दिला माळ्यावर टाकून.

एक सुचना: माळ्यावर ठेवलेला तो ग्रंथं कुणाला हवा असेल तर एका आठवड्यात संपर्क साधा पुढच्या आठवड्यात मला सगळी रद्दी विकायची आहे

विषेश सुचना क्रमांक १: क्रमश: टाकायचे सगळे भाग/प्रकरणं एकत्रच टाकलेली आहेत तुम्हाला हवं तर रोज एक प्रकरण वाचा किंवा एकदमच वाचून संपवा.

विषेश सुचना क्रमांक २: भाग कंटाळवाणे वाटल्यास तो दोष ग्रंथाच्या रुल नंबर तीनचा मानावा

last but not least अशी टिप: सगळी प्रकरणं एका दमात न कंटाळता वाचून जो संपवेल, इथे हसून पहिली प्रतिक्रिया नोंदवेल आणि तरिही त्या ग्रंथाची मागणी संपर्कातून करेल त्याला कुरि‌अरचा खर्च माफ़

1 टिप्पणी:

  1. hi kavita,

    i have gone through your blogg earlier also.But I was not knowing how to post comment.
    I will read all, but now this article is also very nice. Develop yourself. I appreciate you.
    Give my pappi to sanu.

    Vrushali Vahini

    उत्तर द्याहटवा