गुरुवार, २८ मे, २००९

कधी कधी

कधी कधी माझं मन उगाचच उदास होतं
ढगांच्या आकारात काही बाही शोधत रहातं
कारण काहीच नसलं तरी डोळ्यांतुन बरसत रहातं
कधी कधी माझं मन उगाचच उदास होतं

अस उदास झालं की हटकुन तुझी आठवण येते
नसलेल्या पाऊलखुणा घर भर मी शोधत रहाते
कळतं पण वळत नाही, मन माझं ऐकत नाही
सुखाच्या वर्षावातही तहान काही भागत नाही

तू दिलस भरभरुन, पण माझीच कुवत तेव्हढी नव्हती
काय करु मी तरी, माझीच झोळी फ़ाटकी होती
चूक बरोबर ठावुक नाही, पण अपराधीपण जात नाही
स्वत:ला माफ़ करायची, सवय अजुन लागत नाही

(मी तशी आशावादी, पण कधी कधी उदासी मनाला घेरुन रहाते
शब्दातुन व्यक्त झाले की मग जरा मोकळे वाटते)

शनिवार, २३ मे, २००९

नियती

नियती एकदा वाटेत
मला अशीच भेटली होती
म्हणाली तुझी चौकट मीच आखली होती
फ़िरुन फ़िरुन किती फ़िरशील
पळुन पळुन कुठे जाशील
शेवटी चौकट आधीच मांडलेय मी
तू तिच्यातच अडकशील

मी म्हंटल तिला, मी! म्हंटल तिला
माझ्या मर्यादांची जाणिव आहे मला
तरी देखील रंगात रंगायचय मला
चौकट तुझी असली तरी
रंग माझे आहेत
चौकटीत पण कस जगायच
ह्याचे कायदे माझे आहेत
काही काही "सल"
हे शब्दावाटे बाहेर पडतात
काही मात्र "कन्फ़ेशन"
देऊनही मनात सलतात

शेवटी काय वर्तमानाला
हात पसरुन कवेत घ्यायचे
नियतीच्या चौकटीतही
आपले चित्र हसरे करायचे

गुरुवार, ७ मे, २००९

प्रिय आजीस

तुझ्या चेहर्‍यावरची
ती पिंपळ पानी जाळी
नी डोळ्याखालची
ती वर्तुळे काळी
आणि
पाठीवरुन फ़िरणारा
तुझा थरथरता हात
सांगुन जातो बरच काही
आणि जाणिव होते
तू चढलीस तोच गड मी चढतेय
पाउलवाटेवरच्या तुझ्या खुणा
अंगाअंगावर बाळगतेय

आज - उद्या

आजचा दिवस असाच जातो
उद्याची वाट बघण्यात
आयुष्यच सरत जाते
आज उद्याच्या झुलण्यात

फ़क्त एकच उद्याची आशा
दिवस माझा सुखावते
त्या सुखा पोटीच मी
आजचे अश्रु लपवते

उद्या कधीच येत नसतो
हे उशीरा उमगते
कळते तेव्हा, जेव्हा "आज"ची
वेळ संपत येते