रविवार, ६ जुलै, २०१४

गोष्ट तिची माझी - अगदी तिळा एव्हढी -२

गोष्ट तिची माझी - अगदी तिळा एव्हढी -२


"मी खूप्पच लक्की आहे आई" पाठीमागून येऊन मला मिठी मारत लेक उद्गारली.

आता नक्की कोणत्या मागणीला तोंड फूटणार आहे असं मनातल्या मनात म्हणत मी आपलं नुसतच "होऽऽ का रे बंड्या माझ्या" म्हणत तिला पोटाशी ओढून घेत विचारलं

"तुझ्यासारखी आई मिळाली ना मला, म्हणून"

नक्की काय असावं ह्या म्हणण्यामागे? तिच्या डोळ्यात वाचायचा प्रयत्न केला खरा मी पण तिथे तसा काही बेरकीपणा दिसला नाही.

"तू नसशील ना पण अशी लक्की लहानपणी?"

ये कुछ नया था!. "का ग बाई" मी विचारलं

"आज्जी तुझ्यासारखी नसेल ना? कोणीच नाही तुझ्यासारखं"

"का बरं इतका चास्काम आज?"

"ए मस्का नाही मारत मी. तू कशी मला समजून घेतेस. सबजेक्ट इंटरेस्टींग नसेल वाटत तर सोल्युशन देतेस. तसं करायची का आजी तू लहान असताना"
ओह! आत्ता त्या सगळ्या शब्दांमागचं कोडं मला सुटलं.

तर झालं असं होतं की ह्यावेळी सायन्स टिचर बोअर करतात, विषय समजत नाही मग वर्गात कंटाळा येतो त्यांच्या पिरिएडला म्हणून लक्षात पण रहात नाही अशी तक्रार लेकीने एक दोन दिवसांपूर्वी केली होती. आता हा विषय इंटरेस्टींग केला नाही तर मग पुढे अजून कठीण जाणार हे जाणवत होतं.

त्यातून मार्ग कसा काढायचा बघताना डोक्यात आलं आपण तिलाच जरा एक धडा तयार करुन आपल्याला शिकवायला सांगूयात. एक सबंध दिवस ती धडा वाचून मला शिकवायची तयारी करत होती. रात्री तिने मला थोडा पार्ट शिकवला. माझ्या शंकांना उत्तरं दिली. ह्यासगळ्याचा परिणाम म्हणून निदान तेव्हढ्या भागापुरते प्रश्न उत्तरं व्यवस्थित लक्षात राहिली तिच्या आणि मग शाळेत बोअर नाही झालं.

ह्या गोष्टीमुळे तिने मला लागलीच बेस्ट आईचं सर्टीफीकेट देऊन टाकलं होतं.

पण इथे हे लिहून काढावसं वाटलं त्याचं कारण माझ्यापुरतं वेगळच होतं. ते होतं तिचा पुढचा प्रश्न "आई सांग ना तू नव्हतीस ना इतकी लक्की लहानपणी?"

लहानपण जरा आठवायचा प्रयत्न केला. बऱ्याच गोष्टी जाणवल्या. माझ्या आईची लेक अशी छोट्या गोष्टींसाठी कधी येऊन मिठी मारुन आईला सर्टीफ़िकेट देत नव्हती बेस्ट असल्याचं.

मी कपडे वाळत घालत असताना माझी लेक जशी मला कपडे झटकून देते अधून मधून किंवा नुसतीच सोबत म्हणून उभी रहाते बाजूला अगदी रोज नाही तरी आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी तसं माझ्या आईची लेक कुठे करायची त्यावयात?

"आई तू हाका मारतेस आणि मी कशात तरी गुंतून दुर्लक्ष करते मग तुला बऱ्याच वेळा हाका माराव्या लागतात ना. तेव्हा मला तुझ्याकडे येताना वाटतं मी खूप मोठा गुन्हा केलाय काहीतरी तुझ्याकडे दुर्लक्ष करुन"

किंवा मग

"आई, तू हसलीस ना की खूप छान वाटतं. असं वाटतं तू नेहमी आनंदी रहावस. टेन्शन मधे असलीस की वाटतं की तू माझ्यामुळे टेन्शनमधे आहेस"

माझ्या बच्चा तू असं बोलून दाखवतेस ना तेव्हा तर अगदी लख्खं जाणवतं माझ्या आईची लेक असलं कधी बोललीच नाही तिच्याशी ती लहान असताना.

"मला वाचायची आवड लावलीस ना म्हणून तू खूप बेस्ट आहेस"

किंवा

"मला तुला सोडून कुठेच जावसं नाही वाटत. असं वाटतं २४ तास तुझ्याच बरोबर रहावं"

हे तरी कुठे ऐकलय माझ्या आईने तिच्या लेकीकडून. म्हणजे माझ्या आईच्या लेकीलाही तिची आई आवडायची. जगातली सुंदर आणि प्रेमळ आईच वाटायची तिलाही ती पण हे तिच्यापर्यंत पोहोचवावं इतकी गुणी आणि लोभस माझ्या आईची लेक कध्धीच नव्हती.

तू विचारतेस मी पण तुझ्यासारखी लक्की होते का? म्हणजे माझी आई बेस्ट आई होती का?


पण बच्चा बेस्ट आई होण्यासाठी माझ्या आईकडे अशी बेस्ट मुलगी तरी कुठे होती?   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा