बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१३

आहे खरा इथे मी संसार थाटलेला

आहे खरा इथे मी संसार थाटलेला
थोडा हवाहवासा पण पंख छाटलेला
वाईट वाटते का माझी न राहिले मी?
प्रत्येक जण इथे जर नात्यात वाटलेला
अव्यक्त भावनांची दाटी बरीच झाली
जो आज व्यक्त झाला तो भाव बाटलेला
लिंपून घेतले मी नाही कुठे तडा ही
हा भास आत सारा होताच फाटलेला
उजळून दीप सारे गेला कुणी मनाचे
विझलाच तो, अता हा अंधार दाटलेला

का रे इतका लळा लावूनी...

हॉस्पिटलमधे डॉक्टर नवजात बाळ जेव्हा आई बाबांच्या हातात देतात तेव्हा कशा मिश्र भावना असतात ना मनामधे. आनंद, भीती थोडं नवखेपणाच दडपण, उत्सुकता सगळच एकाचवेळी चेहऱ्यावरुन.. देहबोलीतून ओसंडून वहात असतं.
तुला पहिल्यांदा बघितलं ना आम्ही तेव्हाही असच झालं होतं आमचं.
तुझ्या रहाण्याची तात्पुरती व्यवस्था करून मग अनुभवी दाई, ताई, मावशी, काका, मामा सगळ्यांना फोन करून चौकशी करून झाली. सगळ्यांकडून हे भरमसाठ सल्ले पोतडीत जमा झाले. गुगलबाबाही होताच मदतीला, त्याचीही वेळोवेळी मदत घेऊन झाली.
तुझ्या परीने तू स्वत:ला व्यक्त करत आमच्या पोतडीत दरवेळी नव्या गोष्टींची भर घालत होतास ते वेगळच.
वाट चुकून आलेला तू... तुझे सखे सोबती "सर्व्हावयल ऑफ़ द फिटेस्ट" च्या शर्यतीत कुठेतरी कमी पडले आणि उरलास तू आणि अजून दोघे. म्हणून मग तुम्ही तिघे तीन घरात दत्तक गेलात, आमच्या दृष्टीने तुमची जगण्याची दोरी प्रबळ करण्याच्या हेतूने.
पहिले आठ दिवस अगदी रूसून बसलेलास, नवीन वातावरणाशी जुळवून घ्याव की नाही? असा विचार करत होतास की काय कोण जाणे पण अन्नालाही शिवला नाहीस. आमचं बिपी सारखं वर खाली.. मग आमची वरात तज्ञाकडे, काय होतय तुला हे विचारायला. त्यांच्या कडून फ़क्त "डोन्ट वरी" हे ऐकण्यासाठी.
मग आठ दिवसांनी तुलाच आमची दया आली असावी किंवा आलिया भोगासी असं म्हणत तू तुझा असहकार तोडत व्यवस्थीत खायला लागला असावास.
अर्थात हे सारे आमचे अंदाज. काश! तुझी भाषा आम्हाला येत असती.
मग त्यातही माझी कॉलर बरेच दिवस ताठ कारण तू प्रथम माझ्या हाताने जेवलास. आणि मग पुढे महिना दोन महिना तू फक्त आणि फक्त माझ्या हातूनच जेवायचास.
आधी वाटलं हा माझा अंदाज आहे. भास आहे. मीच नेमकी भूक लागते तेव्हा असेन समोर खाणं द्यायला. मग मी प्रयोग केले. तुझ्या भुकेच्या वेळी बाकीच्यांना खाणं द्यायला लावलं. पण तू ढुंकूनही बघितलं नाहीस. बाकीचे म्हणे भूकच नसेल तुला कदाचित त्यावेळी. मग मी चार दाणे खाऊ घालून बघायचे तर पटकन येऊन मटकवायचास. एकदम लब्बाड मुलासारखा.
मग बाकीचे उगाच हिरमुसून जायचे. मग आपणहोऊन तू त्यांच्याकडून पण खाऊन घ्यायला लागलास.
तुला टब मधून बाहेर यायचं आहे.. तुला भूक लागलेय... तुला करवंटीत लपून रहायचय... तुला आता पाण्यात वाळू दगड नको आहेत पासून ते तुला आता शी होतेय इतकं सार तुझं वेळापत्रक आम्हाला कळेल अशा देहबोलीत सांगू लागला होतास.
मग कुठून तरी गुगल बाबा म्हणाला "दे फ़ील लोनली. दे नीड कंपनी" झालं आम्ही लग्गेच गुगल बाबा की जय म्हंटलं.
अनायसे कंपनी मिळायची लक्षण दिसल्यावर लग्गेच संधी साधली.
इथेच चुकलो का रे आम्ही? तरी लग्गेच तुम्हा दोघांची वेगळी व्यवस्था केली. पण तू शॉक घेतलास एकदम शांत शांत झालास.
आणि तुला दवाखान्यात नेलं आम्ही पण तू त्या आधी कायमचाच शांत झालास.
हेतू चांगला होता रे आमचा कंपनी आणण्यामागचा पण लक्षातच नाही आलं प्रत्येकाची प्रकृती निराळी.. गरज निराळी.. तुझी भाषा कळली असती तर...
पण असो उशीराने आलेल्या शहाणपणाला काहीच अर्थ नसतो.
आता तुला आपल्याच बागेत पुरलय. एक छानसं झाड तिथे लावायचं ठरवलय तुझी आठवण म्हणून. ते झाड तरी वाढूदे अशी प्रार्थना करशील?

आज्जी आणि तिच्या गोष्टी (शतशब्दकथा)

दिवेलागणीची वेळ म्हणजे शुभंकरोती, उदबत्तीचा सुगंध, आणि आजीच्या गोष्ट. रोज वेगळी गोष्ट. रामायण, महाभारतापासून जादुगारापर्यंत अगदी कुठलीही.
"आज्जी ग! खरच घडलय का ग हे रामायण महाभारत वगैरे?" मी एकदा तिला विचारलं होतं.
"मनु, ह्या गोष्टींना ना आपल्यामधे... आपल्या आजुबाजुला शोधायचं असतं, मग नाही हा प्रश्न पडत" तिने पट्कन सांगितलं होतं
तिच्याकडे जादुसारखी उत्तर मिळायची नेहमीच.
मग मी पण छांदिष्टासारखी आजुबाजुला शोधायला सुरुवात केली आणि जाणवलं घडतय की महाभारत इथेही.
इथे आंधळा धृतराष्ट्र आहे, द्रौपदीच्या वस्त्राला हात घालणारा दु:शासन आहे अगदी विटंबना मुकपणे बघणारा बघा दरबारही आहे... दिसत नाहीये तो फ़क्त द्रौपदीची लाज राखणारा कृष्ण.
ह्या कृष्णाबद्दल आज्जीला विचारायचच राहून गेलं.

बकुळ - शतशब्द्कथा



गोष्ट तिची आणि त्याची.. तशी सरळ साधी
कॉलेजच्या वाटेवर सुरु होणारी.. आणि वाटेतल्या बकुळीच्या झाडाजवळून जाताना क्षणभर थबकणारी
ओंजळभरुन फ़ुलं वेचून त्याचा सुगंध तिने भरुन घ्यावा आणि त्याने तो सोहळा लांबुनच हळूच टिपावा हे ही नेहमीचच
मग बराच वेळ तो गंध पाठलाग करायचा तिचाही आणि त्याचाही अगदी समांतर रस्ते आपापली वळणं घेत दिसेनासे होई पर्यंत
बरच काही बदललं, तरी इतक्या वर्षांनंतरही तिचं बकुळ वेड मात्र तसच राहिलं
"बकुळच का आवडते तुला? स्वप्नांना..नात्यांना आणि स्वत:लाही फ़ुलू द्यायच्या वयाच्या लेकीने जेव्हा हे विचारलं तेव्हा,
तिने सुकलेल्या फ़ुलांची ओंजळ तिच्या जवळ नेत म्हंटलं "सुकल्यावर ज्याचा सुंगंध वाढतो असं हे एकच तर फ़ुल आहे."