मंगळवार, ९ मार्च, २०१०
फिरुनी नवी जन्मेन मी...
रोजच्या सारखाच गजर वाजला तसा माझा दिवस सुरु झाला. नेहमी प्रमाणे मी स्वतःच आवरुन एकिकडे आधण ठेवल नी दुसर्या गॅस वर दुध तापत ठेवल. चहा-दुध होई पर्यंत फ्रिज मधे रात्री मळुन ठेवलेली कणीक, रात्रीच चिरुन ठेवलेली भाजी, खोवलेल खोबर काढुन ओट्यावर ठेवल नी एकिकडे रेडिओच बटण सुरु केलं.
सायीच्या भांड्यात साय काढुन मनुच दुध गार करत ठेवलं नी रिकाम्या झालेल्या गॅस वर भाजीची कढई नी दुसरी कडे तवा टाकला.
"गुड मॉर्निंग मुंबाSSई.....स्पेशल हेल काढत VJ "Wish u all happy Woman's Day" म्हणुन दर दोन मिनिटांनी किंचाळत होती.
"काSSय गS, तुझा मोबईल्....सक्काळपासुन वाजतोय्....आत्तापर्यंत १० sms आलेत्...हा रेडिओ किंचाळायला लागला ना की तुला त्यापुढे ऐकुच येत नाही काही...बरं चहाSS जमेल द्यायला का मी घेऊ?" अजयने माझा मोबाईल माझ्या कडे देत विचारल?
"जरा घे ना तुच गरम करुन मायक्रोवेव मधे म्हणत त्याच्या पुढे कप ठेवला नी मनु उठलेय की उठवायचय अजुन म्हणुन विचारल त्याला"
"आSज्, मनुटलीला आईच हवेय ..." चहाचा भुरका मारत एका हाताने पेपर चाळत अजयने उत्तर दिलं
"असं रे काय? जरा लाडिगोडीन समजाव ना तिला...मला अजुन डबा करायचाय..."
"मSSनू....मनूबेटा...उठा शोन्या...चला आईने ब्रशला पेस्ट लावुन ठेवलेय बाळा.....मग उशिर होतो ना शाळेला...चला चला लाजा......" म्हणत आधी मनुच्या मागे जाताना एका हाताने पोळ्यांचा गॅस बारिक केला नी एक नजर घड्याळा कडे टाकली....
बॅगराउंडला रेडीओ वाजतच होता....VJ खिदळत तमाम महिलांसाठी टिप्स देत होती....स्पेशली महिलांसाठी गाणी पेश करत होती.....
६.३० वाजले होते..... अजुन बरिच काम बाकी होती....मनुच्या हातात ब्रश देऊन मी राहिलेल्या पोळ्या पुर्ण केल्या नी भाजी गार करत टाकुन अजयला गार झालेल मनुच दुध ग्लास मधे ओतायची सुचना दिली......
एकिकडे रेडिओवरच "दिल है छोटासा छोटिसी आशा......चांद तारो को छुने की आशा.." कानावर पडत होतं दुसरी कडे हात मनुची तयारी करत होते..
"अरेच्या...आज महिला दिन आहे ना ग आशु?" "मज्जा आहे बॉ तुमची..." "wish u happy woman's day" "आज पेपर पण महिलादिन मय झालाय" अजयने पेपर फडफडवत म्हंटल
"साSहेब्..तो पेपर घाला चुलीत नी मनुच आवरायच बघा जरा...मग विश बिश करा.." म्हणत मी माझा राग व्यक्त केला.
"जो हुकुम्..." म्हणत त्याला पळावच लागल कारण रेडिओवर "मै हु..खुश रंग हिना" लागल असल तरी मी लागलीच चंडिका होऊ शकते हे अनुभवाने त्याच्या सरावाच झालेल होतं.
"रेडिओ एफएम ले आये है आपके लिये...सिर्फ आजके दिन्...आपका अपना सदाबहार प्रोग्रॅम्....आप जीत सकते है ड्ढेSर सारे इनाम....तो बेहनो...तय्यार हो जाओ एक खास् प्रतियोगिता के लिये......"
"कमर्शिअल ब्रेक्स पण महिला दिनाची बधाई देत होत्या...."
कान सवयीने टिपत होते नी हात नेहमीची काम करत होते...डोळे अर्थातच घड्याळाकडे लागलेले होते..
मनुला शाळेत पाठवुन नेहमीची लेडीज स्पेशल मिळाली....आज दुल्हनच रुप घेतलेली लोकल समारंभासारखी मिरवत होती....खास महिला दिन स्पेशल कार्यक्रम म्हणे हा.....
सिल्कच्या साड्या नी ठेवणीतले दागिने ....नेहमीच्याच गप्पा......नी तक्रारीही त्याच त्याच...
कानाला लावलेल्या हेडफोन मधुन पण तेच तेच "wish u happy woman's day" च दळण नी तेच तेच फिरुन आलेले sms...
हळदी कुंकु प्रोग्रॅम व्हावा तसेच गाडीत झालेले कार्यक्रम्.....महिला दिन साजरा व्हायलाच हवा पासुन कशाला हवा तो देखावा...पर्यंत संमिश्र प्रतिक्रिया......
"बाSSपरे आज काय गडबड ग माझी....ह्याचा डबा....पाणी.....कामवाली...कचरेवाला....लेक्...सगळी धावपण नुसती....त्यात साडी नेसायची..म्हणजे बघायलाच नको..." हे सगळ बॅगराउंड म्युझिक कानाआड करत पुस्तक घेतल वाचायला...तर कोणता तरी वुमन ऑर्गनायझेशनचा गृप कळव्याला चढला...चढल्या चढल्या डब्याचा ताबाच घेतला त्यांनी ...मग काय पुस्तक गेल पुन्हा बॅगेत...
प्रत्येकीला पिवळा गुलाब देऊन हळदी कुंकु लावता लावता "जोग काकुंपाशी"त्यांचा हात थबकला. समोरचा हात थबकला आणि त्याचवेळी काकुंचाही हात हे काय अभद्र अस म्हणत स्वतःच्या कपाळापुढे "नको नको" अशा अर्थाने आला
मला उगिचच हसु आल....वुमन ऑर्गनायझेशनला पण हळदी कुंकु लावायला कुंकवाचा धनी असावा लागतो तर....१०० व वर्ष आहे म्हणे हे जागतिक महिला दिनाच.....हम्म...अजुन बरच पुढे जायचय म्हणा...गाडी आत्ता कुठे सुरु झालेय...
"तो वुमन ऑर्गनायझेशन वाला गृप" बरेच काही क्विझ बिझ घेत होता...बक्षिस वाटत होता......तेव्हढीच म्हणे मजा ना रोजच्या रुटिन मधुन्.....अस बर्याच जणींना वाटत होत...एकंदर आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे" प्रकार होता...
मग मलाच का फारसा आनंद होत नव्हता? मी स्त्री वादी नाही आहे का? की छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायची वृत्ती हरवत चाललेय माझी? माझच मला कळत नव्हतं.....
कालच स्वप्न जसच्या तस आठवुन .....आत्ताही रस्सीखेच जाणवली मला....स्वप्नात मधे अशी मी....एक बाजुला एक हात धरुन सो कॉल्ड संस्कृती रक्षक गट्...आणि दुसर्या बाजुला सो कॉल्ड पुरोगामी आघाडी वाले...
"नाच ग घुमा.....कशी मी नाचु?"
"तुला परंपरा आवडतात का?"
"आवडतात थोड्या फार.."
"मग तू आमची..." म्हणत प्रतिगामी तिकडे खेचत
त्याचवेळी...."तू तर पेहराव तुला हवा तसा आधुनिक करतेस, टिकली मंगळसुत्र अशा चिन्हांना फारस महत्त्व देत नाहीस....तेव्हा तू आमचीच" म्हणत पुरोगामी दुसरा हात खेचत
"तुला चुल मुल पण आवडत ना? कधी मधी नटायला आवडत ना? मग तू आमचीच" इति प्र. (प्रतिगामी)
"तुला बाहेरच आकाश खुणावत ना मग तू आमचीच.." इति पु. (पुरोगामी)
"बाई ग! पु.आ. कडे जाशिल तर संसाराला मुकशील.." इती प्र.
"ए वेडे व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी कशी चालेल तुला?" इति पु.
एक इकडुन खेचतेय.... एक तिकडुन खेचतेय्....मधल्या मधे मी पार भंजाळुन गेलेले.....जोरात ओरडावस वाटल मला....तुम्ही दोघेही जा आपापल्या मार्गाने...मला माझा स्वतःचा मधला मार्ग चालुदे....कारण "ह्याचेही पटते आम्हा...त्याचेही पटवुन घेतो..."
"ए बाई असे तळ्यात मळ्यात नाही चालणार तुझे..." "प्र आणि पु. दोन्ही आघाड्यांची युती झाली.
"अरे पण मला दोन्हीतल थोड थोड पटत, आणि दोन्हीतल काही काही पटलं तरी न झेपणार असत्.....काही मला प्रायॉरिटि ठरवुन त्याप्रमाणे इकडे तिकडे कराव लागत्....मला तळ्यात मळ्यात करावच लागणार्..."
"अस म्हणताच दोन्ही गट माझे हात झटकुन निघुन पण गेले...." "तेव्हढ्यात गजर झाला नी जाग येऊन दिवसही सुरु झाला माझा...."
आता पुन्हा तेच स्वप्न आठवल नी रस्सीखेच आठवली...गाडितल्या कलकलाटाने तंद्री भंग पावली....नी मी पुन्हा एकदा कळपात जागा शोधु लागले...
कानातला हेडफोन आता एफएम वरच "जीने के लिये सोचा ही नही...." आळवत होता.....गाडी आता शेवटच्या स्टेशनवर आली......पुन्हा एकदा शुभेच्छांची देवाण घेवाण.......आलेले sms बघत ऑफिसकडे कुच केल... इमेल मधुन बर्याच कवितांचा, शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडलेला.....बर्याचशा कविता, शुभेच्छा "स्पॅम इमेल" बॉक्स मधे गेल्या होत्या.....वाचल्या नी स्क्रिन रिकामी करुन कामाला लागले..
मधेच घरुन आईंचा फोन "बाई आज उशिरा आली, उद्या येणार नाहीये म्हणालेय आणि जाताना नातवांच्या फी साठी म्हणुन १०० रुपये घेऊन गेलेय" हे सांगायला आला. "त्या बाईचा नवरा आणि मुलगा एक वारस देण्याशिवाय काही एक करत नाहीत तरी ह्यांना आधाराला असा कुंकवाचा धनी लागतोच कशाला, आता उद्या त्या दारुड्या नवर्याला दवाखान्यात नेण्यासाठी हिची दांडी आणि आपल्याला डबल व्याप" म्हणत त्यांनी फोन ठेवला.....एक महिला म्हणुन तिच्या बद्दल सहानुभुती बाळगु? असला नवरा, मुलगा ह्यांच चालवुन का घेते म्हणुन तिच्यावरच चिडु? की माझही काम वाढणार म्हणुन वैतागु? आणि हे नेमक महिला दिना निमित्त व्हाव म्हणुन योगायोग म्हणु? असो विचार करुन काही तिची परिस्थिती नी मला तिच्या दांडीमुळे पडणारी काम टळणार नव्हती...
दिवस संपत पण आला....ऑफिसमधे महिलादिन स्पेशल डिस्कशन्स ना उत आलेला....."प्रमोशन हवं, पगार तेव्हढाच हवा तर उशिरा पर्यंत का नको थांबायला? असा नेहमीचाच अजेंडा होता पुरुष विरुद्ध बायका असा.....मी कशातच नव्हते.....इथे पण आपण का नाही कुठच्या एका गृपमधले? कुबड्या नकोत्....सवलती नकोत म्हणताना....हे ही पटत की हा इथे समानतेच्या गप्पा मारणारा पुरुष कलिग त्याच्या स्वतःच्या बायकोने मात्र ऑफिसात उशिरा पर्यंत न थांबता वेळेवर घरी याव, मुलांना आईची गरज असते वगैरे पाजळतो....तेव्हा इथे ऑफिसात कलीग असलेली स्त्री पण अशीच कुणाची तरी बायको, आई असते तिच्याही घरी अशाच अपेक्षा बाळगणारा एक पुरुष म्हणजे तिचा नवरा/बाबा रहातो हे तो सोयोस्कर रित्या विसरतो...म्हणुनच मला ना तिचा पक्ष घेता येत ना त्याचा....मला माझीच काम दिसत असतात्...ऑफिसमधलीही नी घरचीही...कोण पडेल त्यांच्या वादात? म्हणत मी तीच पुर्ण करत बसले नेहमीसारखीच...
येताना मला करायची काम, नवर्याला करायला सांगायची काम एकदा तपासुन तसा sms forward केला त्याला....नी गर्दीच्या ट्रेन मधे मुक्कामाच ठिकाण येईपर्यंत "उभी" राहीले, जंप करुन सिट पकडली नाही म्हणुन्...सकाळपासुन सेलिब्रेट करुन दमलेल्या बायकांनी हक्काची सिट मिळताच झोपुन एनर्जी वाचवायच ठरवलं कारण घरी गेल्यावर ओटा त्यांचीही वाट बघणार होता......मी पुन्हा एकदा हातातल्या पुस्तकाशी हातमिळवणी करुन उभ रहाण्याचा वेळ सत्कारणी लावला....
परत येऊन पोटाच्या सोयीला लागले.....घरात असलेल्या बाईने म्हणजे साबाईंनी जेवण तयार ठेवलेल नेहमी प्रमाणे....जेवणं होऊन मागच आवरता आवरता मोठा झालेला टिव्हीचा आवाज "कोणत्या तरी चॅनल वर कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखती" ऐकवुन गेला......
"अग ए ऐक ....ग ...बघ काय सुरेख मुलाखती आहेत..." म्हणत सोफ्यावर पसरलेल्या नवर्याकडे एकदा बघुन लेकीच दप्तर त्याच्या हातात दिलं नी लेक तुझीही आहे रे...ची जाणिव करुन देत सोफ्यावर बसुन आधुनिक स्त्रीच्या प्रगतीचे टप्पे बघायला सुरुवात केली...
दिवस संपला....दुसर्या दिवशीची तयारी करुन्...घडाळ्याकडे नजर टाकुन गादीवर पाठ टेकली...नी पुन्हा स्वप्नांच्या दुनियेत सोनपरी घेऊन गेली.....म्हणाली......ये इकडे.....समोर अशी आरशापुढे उभी रहा....लहानपणा पासुन प्रत्येक विषयात प्रगती पुस्तकावर "उत्तम" शेरा मिळवायच व्यसन लाऊन घेतलयस ना..ते विसर आता.....सोडुन दे विचार तू कोणत्या गटातली ह्याचा....हे ही सोडुन दे की दिवसभर टिआरपी वाल्यांनी किती गाणी आळवली.....ट्रेन मधल्या सिल्क साड्या....तन्मणी...हळदी कुंकू.....मजा मस्ती .....आलेले समस, इमेल, काव्य सगळ सगळ सोडुन दे....तिकडे जी आरशात उभी आहे ना....तिच्याकडे फक्त बघ्.....काय आहे तिच्या डोळ्यात? काय हवय तिला......कस जमु शकेल? किती जमु शकेल? त्याचा विचार कर.....महिला दिन करावा की नाही ह्याच्या वादात तू का पडतेस? तुला अजुन काय गाठायचय त्यात शक्ती वाया घालव्......कसा गेला तुझा दिवस? जसा ७ मार्च गेला तसाच ८ चा गेला आणि तसाच ९ मार्च जाणारे......मानसिकता बदलायची वाट बघे पर्यंत तुझ्या लेकीची लेक पण म्हातारी होईल....तुझी मानसिकता तू बदल आधी...ही माझी काम आहेतच पण फक्त माझीच नाहीत हे आधी तू स्वतःला समजाव आणि मग बाकिच्यांना....त्यासाठी तुला good books मधुन बाहेर पडाव लागेल्...प्रगती पुस्तकावर "उत्तम" सुन, पत्नी, आई, मुलगी असे शेरे नाही मिळणार दरवेळेस्...त्याची तयारी ठेव.....येव्हढ केलस तरी खुप आहे सध्या...."
परिने दाखवलेल प्रतिबिंब डोळ्यातल्या पाण्याने कधी गढुळलं कळलच नाही मला.......सकाळी गजर झाला तेव्हा ओले झालेले डोळे हाताला समजले फक्त...
सवयीने आधण ठेवलं...दुध तापत ठेवुन्.....रात्री मळुन ठेवलेली कणीक आणि चिरुन ठेवलेली भाजी फ्रिज मधुन काढताना एकिकडे रेडिओच बटण चालु केल...मराठी एफएम वर "एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी.....स्वप्नाप्रमाणे भासेल सारे..जातील सार्या लयाला व्यथा..." वाजत होतं....
माझे हात सवयीने काम करत होते, ओठ मात्र रेडिओ बरोबर गुणगुणत होते.."भीती अनामी..विसरेन मी...हरवेन मी...हरपेन मी...तरिही मला लाभेन मी...एकाच ह्या जन्मी जणु फिरुनी नवी जन्मेन मी..."
(ताजा कलम : खास ह्यातल्या अजय साठी)
प्रिय नवरोबा,
नाराज झालास? अस्वस्थ झालास माझं स्वगत वाचुन?
अस्वस्थ जरुर हो, पण नाराज होऊ नकोस्..आणि स्वतःला कमी तर अजिबात लेखु नकोस.
तसा हेतुच नाही आहे माझा मुळात.
इतक्या वर्षांच्या अंगवळणी पडलेल्या सवयी, पिढ्यानुपिढ्या बघत आलेलं चित्र असं एका रात्रीत बदलेल तरी कसं?
पण तुझं अस्वस्थ होणं मात्र मला आवडलं.अंतर कमी व्हायला सुरुवात तर झाली त्यामुळे..
ते प्रगती पुस्तकाच वाचुन खरतर हसु आलं ना तुला? "अच्छा म्हणजे इतके दिवस समजुन उमजुन दोन कनांचा वापर होत होता तर" असं म्हणून पण घेतलस न तू?
आता एक आनंदाची बातमी तुझ्यासाठी...
जसं मी माझ्या प्रगती पुस्तकातल्या शेर्यांबद्दल म्हंटलय ना, तसच मी तुझ्या बाबतीतही मानते.
so don't worry about your image all the time. तू देखील उत्तम नवरा/बाबा/मुलगा नाही असु शकत दरवेळी हे ही ठाऊक आहे मला.
संसार होण, संसार करण, संसार फुलवत एकत्र चालण हे समानार्थी शब्द नाहित.. ह्यातला नेमका फरक तू जाणतोस हे काय कमी आहे का? so एक मित्र म्हणून माझं हे स्वगत वाच आणि हो अस्वस्थ मात्र जरुर हो
तुझी बायको)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
5 stars .....for the last letter to "navroba:...!!
उत्तर द्याहटवा