शुक्रवार, २४ डिसेंबर, २०१०

नको खंत आता

झुगारुन दे बंधने तू मनाची
उगा बाळगा का, भिती ही कुणाची?

असे' ही खुपावे, 'तसे' ही खुपावे
अशी रीत आहे, इथे ह्या जगाची

उद्या काय व्हावे, न कोणास ठावे
नको व्यर्थ चिंता, करु तू कशाची

सुखाच्या क्षणांना, उराशी धरावे
नको खंत आता, व्यथेच्या क्षणाची

जसा काळ येतो, तसे त्या भिडावे
किती आळवावी, कहाणी फुकाची

कोलाज / स्लाईड शो

घरातली कामं आटपून पटपट तयार होऊन ती आईकडे गेली आणि नेहमी प्रमाणेच पुन्हा बाबांनी तिचं डोकं सटकवलं. ते बाहेर पडले आणि आईने हताशपणे तिच्याकडे बघीतलं.


"जाऊदे ग! आजारपणात माणूस जास्तच चिडचिडा होतो" तिने आईची समजूत घातली.. पुन्हा एकदा.

"आजचं आहे का हे?" आईच्या ह्या प्रश्नावर मात्र तिच्याकडे ऊत्तर नव्हतं. ती तशीच वायफळ बडबड करुन १५-२० मिनिटात तिथून निघाली आणि तिच्या तिच्या घरट्यात पडदा ओढून बसली.

तरी पुन्हा दुसर्‍या दिवशीची सुरुवात "बाबा कसे आहात?" ह्या "सुप्रभात कॉलनेच" झाली, पुढे तसेच नेहमीचेच संवाद आणि "मी करेन पुन्हा फोन" ह्या नेहमीच्याच वाक्याने शेवट.

पुन्हा विकांताला एक चक्कर त्यांना भेटायला जी त्यांच्या आजारपणाचं कळल्यापासून शक्यतो न चुकता व्हायची ... नी पुन्हा एकदा तसच गुदमरणं...

गेल्या दोन तीन महिन्यापासून जणू हे तिचं रुटीनच होऊन गेलेलं.

"तरीही का करते ती फोन? त्यांना बरं वाटावं म्हणून? तिला बरं वाटावं म्हणून? की एक मुलगी म्हणून असलेलं कर्तव्य म्हणून?" तिच्या मनात आलं.

"अफकोर्स त्यांना बरं वाटतं आणि कुठेतरी तुलाही बरं वाटतं" मनातून आतून एक आवाज तिला म्हणाला.

"हम्म! पण मग प्रत्यक्ष भेटल्यावर तो ओलावा का पटकन आटतो? का नेहमीच असं वाटतं की इथून पटकन निघून जावं? ही दुनिया पाठी टाकून पुन्हा मोकळ्या हवेत जाऊन छाती भरून ऑक्सीजन घ्यावा?"

"नक्की कोणती भावना खरी? एकाच वेळी एकाच व्यक्ती विषयी प्रेम, माया अगदी मदरली प्रेम म्हणतात तसं प्रेम आणि त्याच वेळी तितकीच तीव्र कटुता, वाटू शकते?" मनात पुन्हा एकदा ह्या प्रश्नाने गर्दी केली.

तिला ठावूक आहे ह्या सगळ्याची मुळं फार खोल बालपणात दडल्येत. कारण तिला अजूनही आठवतात सगळ्या सगळ्यांच्या.. नातेवाईकांच्या, मित्र मैत्रिणींच्या, शाळेतल्या शिक्षिकांच्या, शेजारी पाजारी अगदी इस्त्रीवाल्यापासून वाण्यापर्यंत सगळ्यांच्याच तिच्या विषयी, तिच्या भावाविषयी डोळ्यात कणव दाटलेल्या नजरा.

अजूनही आठवतं तिला बाहेरचं जग आणि घरातलं जग ह्यातलं तिचं समांतर वावरणं आणि आठवतय तिला अजूनही "हे घर माझं आहे, इथे माझेच नियम चालतील" म्हणत चालणारं "त्यांचं" हुकूमशाही वागणं.

"त्यांच" लोकांच्या देखत स्वतःच्याच थोबाडात मारुन घेणंही आठवतय स्पष्ट अजुनही आणि मग बुरखा घालायची मुभा असती तर बर... कोणी तिला बघायला नको नी कोणाला तिने असं तिला वाटायचं त्याप्रयेक वेळी हे देखील आठवतय अजूनही तितकच स्पष्ट.

ऐन दहावीच्या परिक्षेला सिंगल रुम मधे रहाताना टेबल लँपचा प्रकाशही त्यांना सहन होत नाही म्हणून.. आणि हे घर त्यांचं आहे ह्या एका वाक्यामुळे भावाला शेजार्‍यांच्या दाराबाहेरच्या दिव्याखाली करावा लागलेला अभ्यासही आठवतोय आणि त्याच्या तिथे तसं बसण्यामुळे आईचही त्याच्या बाजूला बराच वेळ बसून मूक सोबत करणं... तिचं तिच्या भावावर असलेलं अपार प्रेम आणि त्यातूनच कधी त्याच्या बाजूने तर कधी स्वतःसाठी, आईसाठी अस करत तिच्या त्यांच्याशी उडणार्‍या चकमकी.... हे सगळं सगळं आणखीही काही बाही बरचसं आठवत रहातं तिला.

आणि त्याच बरोबर हे देखील की ही कवितेशी मैत्री देखील त्यांच्यामुळेच आहे. पुस्तकांच्या दुनियेशी ओळख आणि लहानपणचा खूप सुंदर अशा हँडमेड पेपर वर छापलेल्या.. त्याकाळी महाग असणार्‍या अनुवादीत रशियन कथांच्या पुस्तकांच्या कलरमय जगातला वावर देखील त्यांच्यामुळेच आहे.

तिचं लग्न ठरलं तेव्हा "त्यांच" गुपचूप डोळे पुसून घेणही आठवतं आणि पहिला महिनाभर तिचं बाळ रात्री लाईट बंद करताच रडायचं तेव्हा अख्ख्या खोलीभर दिवे लावून त्यांचं दिवाळी साजरी करण देखील आठवतं

तरीही .. अजूनही अधून मधून झटका आल्यासारखं दुखेलसं बोलणारेही तेच आहेत आणि ती निघून गेल्यावर आईपाशी "मी खूप वाईट वागलो" अशी कबूली देणारेही तेच आहेत.

त्यामुळेच की काय तिला वाटायचं दारु हे जसं एक व्यसन आहे ना तसाच हेकेखोर, तापट स्वभाव हे देखील एक व्यसनच असलं पाहीजे. नाहीतर कवितांच्या दुनियेत रमणारा माणूस इतका कसा विक्षिप्त वागू शकतो!

कदाचित त्यांचं बालपण, त्यांचा स्वभाव आणि दरवेळी आलेलं अपयश ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम असू शकेल... किंवा स्वभावामुळे अपयश आणि मिळणार्‍या प्रत्येक अपयशाबरोबर वाढत जाणारा तापटपणा असही होत असावं .

तसही प्रत्येक क्रिकेटर "सचिन तेंडूलकर" व्हायचीच स्वप्नं बघत असतो पण "सचिन" हा एखादाच असतो हे कळणं आणि कळून पचवणं जमलं नसेल त्यांना, असही तिला वाटून गेलं कुठेतरी.

म्हणूनच कितीदा ठरवलं तिने जे काय कोलाज समोर आहे त्याला प्रामाणिक पणे सामोरं जायचं. कुठचही लेबल न लावता, कसलही एडिटींग न करता, तो तो रंग मनात जसा आहे तसाच त्या प्युअर फॉर्म मधे बघायचा.

"जमेल?" मनात मगाचचा शंकेखोर एको पुन्हा उमटला.

"प्रामाणिक प्रयत्न करायला तर हरकत नाही ना?" पुन्हा एकदा मनानेच साथ देत म्हंटलं.

"पण अस जाहीर पणे व्यक्त झाल्यावर कोणी मला कृतघ्नपणाची लेबलं लावली तर? किंवा कोणी माझी कीव केली तर?" पुन्हा एक शंका उमटतेच.

"हसून सोडून द्यायचं.. सिंपल..." पुन्हा एकदा आतून उत्तर आलं.

तिने ह्याच उत्तराच्या वाटेवरुन जायचं ठरवून प्रोजेक्टर जोडून स्लाईड शो पुन्हा सुरु केला. त्यात एक कोलाज उमटलं. त्यावरुन हात फिरवता फिरवता प्रत्येक चित्रं जिवंत होत गेलं.. तसे चित्रातून पण ऐकू येणारे आवाज हळू हळू मोठे होत गेले नी तिने कान बंद करुन घेतले, तरिही ते आवाज जाणवतच गेले.

फिरत फिरत हात एका चित्रावर स्थिरावला. मोठ्या हौसेने आईच्या बुंड्या कानांकरता खाऊच्या मिळालेल्या पैशातून आईसाठी कुड्या घेऊन आलेली मुलं दिसली चित्रात, आईच्या चेहर्‍यावरच्या आनंदाश्रुनी आताही हात ओलावला... तेव्हढ्यात त्याच्याच बाजूला खळ्ळकन फुटून काच हातात घुसावी तसे "बाप नालायक आहे हे जगाला दाखावण्यासाठी हे सगळं केलत.." म्हणत कधीही भरुन न येणारी, अजूनही ओली असलेली जखम वागवणारं चित्र पुन्हा तशीच कळ आणून गेलं. अशा स्लाईडस मनात नेहमीच एका मागोमाग स्टोअर होत असाव्यात कदाचित कारण "त्या" स्लाईड मागोमाग "तशाच" चित्रांनी कॅन्व्हास भरुन वहायला लागला.

ती दरवेळी असं झालं की तो प्रोजेक्टरच बंद करुन टाकायची. पण आता सरत्या वर्षाला स्मरुन तिने ठरवलेलं होतं, आहे तसं त्यांना सामोरं जायचं. अस्वस्थं वाटलं... वाटून घ्यायचं, रडावसं वाटलं... रडून घ्यायचं, पुन्हा एकदा तितक्याच तिव्रतेने जीव लावावासा वाटला..... तो ही लावायचा. रस्ता चालत रहायचं मागे फिरायचं नाही त्यापासून पळायचं तर अजिबात नाही. जे जसं आहे ते ते तसं म्हणूनच स्विकारायचं. आणि त्यातल्या कोणत्याही एका चित्राला, आठवणीला नाकारायचं नाही. कारण कळत नकळत ह्या प्रवासाला त्यातलं प्रत्येक चित्रं कारणीभूत आहे.

तिच्या मनात आलं "माझं माझ्या आजच्या "मी" वर मनापासून प्रेम आहे आणि ही "मी" व्हायला प्रत्येक सल, प्रत्येक ओरखडा हा... प्रत्येक प्रेमळ अनुभवां इतकाच जबाबदार आहे. तेव्हा त्याला नाकारुन कसं चालेल?

आता तिने स्लाईड शो पुर्ण बघितला. तिच्यापुरतं विचारांचं वर्तुळ पुर्ण झालं. आता ती त्या कोलाज चित्रापाशी नव्या आत्मविश्वासाने थांबली आणि... तिने नविन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला पुन्हा एकदा मोबाईल हातात घेतला.

बुधवार, ६ ऑक्टोबर, २०१०

मळभ

बर्‍याच दिवसांचं साचलेपण मनभर पसरुन राहिलेलं. तिने तसच स्वतःला रेटत यांत्रिकपणे सगळी कामं उरकली. रोजच्या शिरस्त्याने पुस्तक हातात घेऊन, काल ठेवलेलं खूणेचं पान उघडून वाचायला सुरुवात केली. जेमतेम एक पान संपवलं आणि अस्वस्थ होऊन पुस्तक तसच हातात ठेवून, डोळे मिटून मळभ दूर होण्याची वाट बघत खुर्चीत पडून राहिली.

फोनच्या रिंगने जाग आली, तेव्हा "आई गं!" म्हणत, खुर्चीच्या हातावर स्वतःच्या एका हाताचा जोर देत, दुसरा हात डोळ्यावर धरत वातावरणाशी अ‍ॅड्जस्ट होत ती उठली आणि इतका वेळ एकाजागी अवघडून झोपल्यामुळे पायाला आलेल्या मुंग्यांमुळे अडखळत फोनपाशी गेली.

फोनपाशी जाता जाता एक नजर सोफ्यावर बसल्या बसल्या डुलकी लागलेल्या अभय कडे गेली. "टिव्ही बघता बघता झोप लागली वाटतं ह्याला!"

टिव्हीचं बटण बंद करता करता फोनपाशी जात मनाशी आलं "तब्येत तर ठिक आहे ना ह्याची, अशी अवेळी कधी झोप लागत नाही एरव्ही?"

फोन झाला की बघुयात म्हणून रिसीव्हर उचलून कानाला लावला आणि पलिकडुन नेहमीचाच वहात्या झर्‍यासारखा आवाज कानावर पडला "हाय आई! मी बोलतेय"

"हम्म!" इथुन नुसताच हुंकार.

तिकडे वहात्या पाण्याचा खळखळाट तर इथे साचलेपणातनं आलेलं शेवाळं, तुलना करायला एक सेकंदही लागला नाही मनाला.

"आई, तुम्ही दोघं जेवलात?" पलिकडून पुन्हा एकदा आवाज आला.

उत्तर द्यायला तिने तोंड उघडलं आणि जाणवलं...घसा सुकलाय कधीचा. तसाच आवंढा गिळून तिने विचारलं "आजपण उशीर होणारे तुला?"

"हो... म्हणजे... जरा काम आहे आई, पण तुम्ही जेवून घ्या. माझी वाट बघु नका"

"बरं" असं म्हणेपर्यंत पलिकडून फोन कट पण झालेला.

ती तशीच बसून राहिली रिसिव्हर हातात धरुन, तिथून उठायची देखील शक्ती नव्हती आत्ता तिच्यात.

"काय होतय नेमक?"

तेच तर कळत नव्हतं ना तिला. कसला असा काळोख मनभर पसरला होता, कोण जाणे.

"आई, रिटायरमेंट जवळ आलेय ना तुझी म्हणून असं वाटतं तुला" लेकीने दहा हज्जार वेळा ऐकवलेलं वाक्य पुन्हा एकदा मनात घुमलं.

"खरच?" तिने स्वतःलाच प्रश्न केला, उत्तराची अपेक्षा न करता. आजकाल स्वतःपाशीही बोलायचा कंटाळा यायचा तिला.

तिला आठवलं, पुर्वी ती किती बोलायची.. भरभरुन बोलायची. समोरच्याच्या एका वाक्यावर तिची कमीत कमी पाच वाक्य तरी असायचीच. त्यावरुन तर बर्‍याचदा बापलेक दोघेही चेष्टा करायचे तिची. कोणी नसेल बोलायला तर स्वतःपाशीच बोलायची, इतकी ती बोलघेवडी होती. आणि आज? आज तिला स्वतःशी देखील संवाद नकोसा वाटत होता.

तिने बाहेर नजर टाकली. बाहेर अजुनच अंधारुनच आलेलं. पण नुसतच झाकोळलं होतं. भरलेलं आभाळ रिकामं काही होत नव्हतं.

टाचणी लागावी आणि फुगा फुटावा तसं आभाळ फुटून जावं, इतकं की त्याच्या बरोबर मनभर पसरलेलं हे मळभ देखील वाहून जावं असं एक क्षण वाटलं तिला.

सवयीनेच बाहेर नजर गेली. बाहेर अंगणात साळुंक्यांची जोडी दाणे टिपताना दिसली. पुर्वीच्या म्हणजे फार पुर्वीच्या ऐन तारुण्यातल्या तिने, अशी साळुंक्यांची जोडी बघून फिंगर्स क्रॉस करत त्याला ऐकवलं होतं 'टू फॉर लव्ह" आणि त्याने "वेडुबाई" म्हणत मारलेली टपली हळूच बोटांचा क्रॉस सोडुन मुठीत घट्ट धरुन ठेवली होती. पुढे बरीच वर्ष ह्या एका टपलीसाठी ती हे वाक्य त्याला ऐकवायची. पण आज तो बाजुला येउन उभा राहिल्याचही कळलं नाही तिला. मळभच कारणीभुत दुसरं काय?

"वादळ येइलसचं वाटतय, वारा पण सुटलाय. खिडकी लावुन घ्यायला हवी" त्याचं वाक्य तेव्हढं कानावर आलं.

"हम्म! वादळाचीच तर वाट बघतेय केव्हाची" तिने मनातल्या मनात म्हंटलं तरीही खिडकी घेतलीच लावून.

"मनूचा फोन होता? आजपण उशीर होणार म्हणालेय का?" त्याने विचारलं तशी त्याच्या प्रश्नावर कळेल न कळेलसा होकार देत ती आत जायला वळली.

"पाऊस पडला तर बर होईल ना! असा पाऊस कोसळावा की सारी तगमग दूर व्हावी आणि अशा पावसात तुझ्या हातची गरमा गरम भजी खावी.. अहाहा! स्वर्गच जणु. व्हावी आणि खावी... काय जुळतय का यमक तुझ्या भाषेत?" त्याने मुद्दाम चिडवत विचारलं. त्याचं चिडवणं फुकट गेलेलं बघून त्याने पुन्हा विचारलं "मग आज काय बेत आहे म्हणायचा?"

पुर्वी त्याच्या ह्याच प्रश्नाने उखडत "हे काय हॉटेल आहे का, नेहमी नेहमी वेगळे वेगळे बेत असायला?" असा प्रति टोला केलाच असता तिने. पण आज ती फक्त येव्हढच म्हणाली "काही विशेष नाही, नेहमीचच आहे. काही हवं होतं का वेगळं?"

"नाही नको, मनू आल्यावर जेवायलाच बसुयात" त्याने तिच्या मागून स्वयंपाक घरात येत म्हंटलं.

"नको, तिला उशीर होणारे. तिने जेवून घ्या म्हणून सांगितलय" तिने आमटीचं पातेलं गरम करायला ठेवत म्हंटलं.

"बरं वाटत नाहीयो का तुला?" त्याने विचारलं.

"नाही ठीक आहे" तिने आयुष्यात पहिल्यांदाच एका वाक्यात उत्तर दिलं असेल.

"ऑफिसमधे काही टेंशन आहे का? की मनूच्या लग्नाचं टेंशन घेतलयस?" "का रिटायरमेंट नंतर काय ह्याचं टेंशन घेतलयस तू?" त्याने कधी नव्हे ते वक्त्याची भुमिका घेत विचारलं.

"नाही रे तसं काही नाही आणि तशीही मी कुठे असणारे रिकामी. असतील की व्यवधानं पाठीमागे बरीच." तिने बर्‍याच वेळाने एक मोठ्ठं उत्तर दिलं त्याला.

"मग?" त्याच्या प्रश्नावर ती पुन्हा गप्प.

तिलाच कळत नव्हतं तर ती त्याला काय सांगणार होती?

कंटाळा... पुर्ण अंगात भरला होता, बाहेर जसा अंधार व्यापुन राहिलेला तसा. काय होतय? काय खुपतय? ह्याचा विचार करायचा देखील कंटाळा आलेला तिला.

"थोडे दिवस कुठे तरी फिरुन यायचं का? थोडा बदल झाला की बर वाटेल तुलाही" त्याने विषयाला वाट फोडायचा प्रयत्न करत म्हंटलं.

"मी काय विचार केला नाहिये का पुर्वीच ह्या शक्यतेचा?" तिने स्वतःच्याच मनाशी चिडून घेत मनातच म्हंटलं. बाहेर फक्त त्यातलं "नको, इथेच बरं आहे" इतकच उमटलं.

त्याची तिला बोलतं करायची धडपड तिला कळायची, पण बाहेर कुठेही जाण्याने काहीही होणार नाही ह्याबद्दल तिची पक्की खात्री होती. हे साचलेपण आजचं नव्हतं, रिटायरमेंटशी ह्याचा तसा काही संबंध नव्हता. अगदी पुर्वीपासून अधुन मधुन तिला वाटायचं "सगळं व्यर्थ आहे. कशालाच काही अर्थ नाही. आयुष्याचा प्रवास घडत गेला काय आणि आपण आखुन घडवला काय, दोन्ही शेवटी सारखच मिथ्या. पुन्हा बाकी शुन्यच. त्यापेक्षा गणित मांडणं नको आणि कसली समिकरणच नकोत."

तिला आठवले हट्टाने स्वतःला हवेत तसे आखून चाललेले काही क्षण. आठवले काही मिळवल्याचे...काही गमावल्याचे क्षण. त्या त्या वेळी कधी जिंकल्यासारखे.... कधी हरल्यासारखे वाटायला लावणारे क्षण.

पण तेव्हा हरल्या नंतर जिंकण्याची आशा होती. आता कळत चाललय, ते हरणं काय आणि जिंकणं काय दोन्हीही एक बुडबुडाच शेवटी. खरा आहे तो फक्त अंधार, आत बाहेर दोन्ही कडे पसरलाय तसा.

"ही नैराश्येची लक्षणं आहेत का?" तिला विचारांनीच दमायला झालं.

पण नाही ही नुसती निराशा नाही. हे त्यापलिकडचे काही आहे. Nothing is true वाटायला लावणारं. आपण करतोय ती कामं, जगतोय ते जगणं, हसणं...रडणं, घडणं .... घडवणं सगळच.. का? कशासाठी? हा प्रश्न विचारणारं आणि त्याचच उत्तर सापडत नाही किंवा शोधायची ताकद आणि इच्छा दोन्हीही नाही म्हणून मनाला आलेलं हे मळभ. ते कसं दूर होणार जागा बदलण्याने? ते तर आत आहे, मनात खोल. कुठेही गेलं तरी सोबत करणारं. काही काळ मनाला चकवा लागतही असेल अशा उपायांनी, पण त्याचा फोलपणा कळल्यावर मग काय? एक मिलीसेकंद देखील आपल्या मालकीचा नसतो हेच खरं.

गेल्या आठवड्यात उषा म्हणाली होती "सुंदराबाईला गार्डनचा सेल लागलाय, लंच मधे जाऊन येऊ"

"घरात इतक्या साड्या पडल्यात की त्याचाच सेल लावायची वेळ आलेय" तेव्हा तिला ऐकवलं होतं.

"चल ग! तू विकत काही घेउ नकोस. नुसती बघायला चल. नविन कपड्यांचा वास मनात भरुन घ्यायला चल." तिने आग्रहं करत हो म्हणायला भाग पाडलं होतं ते आठवलं आणि त्याच्याबरोबरीने तिला पॅरेलिसिस झाल्याचा फोन आल्यावर अडकलेला श्वासही आठवला जसाच्या तसा .

"असं कसं होईल, काल तर आम्ही ठरवत होतो सेल बघायला जायचं? ह्या प्रश्नाची टोचणी संपत नव्हती.

"मला मरणाची भीती वाटतेय का?" तिच्या मनात पटकन चमकून गेलं. "हे मळभ त्यामुळेच तर नव्हे?"

"नाही तसं नसावं. म्हणजे भीती तर असतेच की मनात कुठेतरी दडलेली, पण ही नुसत्या मरणाची भिती नाही. ही हतबलता, अस्वस्थता वेगळी आहे. पुढच्या क्षणाचं चित्र मला माहित नाही. त्यावर माझा कंट्रोल सोडा पण त्याचा साधा अंदाजही मला नाही, ह्यातून आली असावी कदाचित ही भीती.

पुढचा क्षण माहित नाही, गेलेला क्षण येव्हढच काय जाणारा क्षण देखिल पुर्णपणे माझा नव्हता. मी काहिही केलं नाही तरी आला दिवस संपणार आहे. पुढला क्षण यायचा तसाच येणार आहे. मग मी आत्ता पर्यंत केला तो प्रवास नक्की काय होता? मी काहीच केलं नाही? जो प्रवास केला तो झाला, इतकच? इतके दिवस "माझा माझा" पसारा म्हणत होते, त्याचं काय? मी काय करतेय? कशासाठी? आणि का?

ह्या का? का? आणि का? ची आवर्तनं संपत नव्हती.

डोळे मिटून ती विचारांच्या बरोबर फरफटत राहिली. तेव्हढ्यानेही दमली. हवा अजूनही तशीच होती.

"आई झोपलेय का बाबा?" दुरुन कुठुनतरी मनुने विचारल्या सारखं वाटलं का भास झाला? कुणास ठावूक.

रात्रीचे किती वाजलेत ठावूक नाही. जेवली असेल का मनू नीट? पांघरुण तरी घेतलय का बघायला हवं, गारवा वाढत चाललाय. मनाला ह्या विचारांच्या गोंधळातही जाणवलं.

"आई, तशीच झोपलीस ना अवघडुन? बाहेर गारवा वाढलाय" धडपडत उठणार्‍या शरिराला मनू अंगावर घालत असलेलं पांघरुण जाणवलं.

पांघरुणाच्या उबेत विरघळून जाताना वाटलं "सगळं मिथ्या वाटत असताना ही मधेच कोणती उब हविशी वाटते? धरुन ठेवावीशी वाटते? ज्याने अंधार पुर्णपणे संपला नाही तरी आता त्याची भिती कमी झाल्यासारखी वाटतेय?"

बहुतेक टाचणी लागून फुगा फुटलाय आणि आभाळही कोसळतय मोकळं होऊन.

शुक्रवार, १८ जून, २०१०

२१ अपेक्षित - ग्रुमिंग सेंटर

सुस्वागतम..! आपल्या क्लासचा आजचा आठवा दिवस आहे. आज आपण सरप्राईझ टेस्ट ठेवलेय. तर करुया सुरुवात..?


हम्म.. बन्या तुझ्यापासून सुरवात करुया..


मी: बन्या पहिला पाठ लक्षात आहे?


बन्या: होSS सर


मी: चल तर मग... पटापट उत्तर दे.


बन्या: खूप आनंद झाSSआS (घाम पुसत) लाय. ह्या यशाचं श्रे..(थुंकी गिळून)य म.मी

मी: ममी नाही रे मी.. मी म्हणायचं. आणि आनंद झाला सांगताना चेहरा का असा सुतक लागल्यासारखा? अगोदर घाम पुस. अरे..अरे! बाहीला नाही रे रुमालाला पूस

एक आठवडा प्रॅक्टिस करुन घेतली तरी ही हालत? घरी आरशासमोर उभ राहून केलीच नसेल म्हणा प्रॅक्टिस? कसं होणार तुझं? आता जेमतेम एक आठवडा राहिलाय. हा सराव म्हणजे खायचं काम नाही गड्या. बोर्डात येणं सोप असेल एखादवेळेस.. त्या बेस्ट फाईव्ह मुळे १००% पण मिळतील... पSSण ह्या मुलाखती देणे हे येSराSगबाSळ्याचेSS काSSम नाSSही

बस आता खाली. तो २१ अपेक्षित संच नेलायस ना घरी? पाठ कर तो. आरशापुढे उभ राहून घोकंपट्टी करायची? कळलं?


चिंगे तू आता पेढा खायचा सराव करुन दाखव बघू. ह्या नमीला कर तुझी आई तात्पूरती.


हं... नमी तू भरव पेढा चिंगीला. अगंSS असंS काSSय करतेसS? ते बिस्किट ठेवलय नाS पाSरले जी .. हSS.. तेSच भरव पेढा म्हणून्...खरे पेढे ३०० च्या पुढे आहेत. सगळ्या वर्गाला प्रॅक्टिकलला द्यायला गेलो तर दिवाळं निघेल क्लासचं.


चिंSगेSS असं नाही गSSSSS नमे भरव परत. तो पेढा असा.. अर्धा तोंडात असला पाहीजे फोटोग्राफर फोटो काढताना...आणि दोघींचे चेहरे कॅमेर्‍याकडे... सराव करा आत्त्ताच, लक्ष समोर ठेवायचं पण बाजूचीला पेढा भरवायचा.. कळलं का? गेलाSS माझा ४ रुपयाचा पुडा अख्खा फुकट गेला दोघींवर


चिंगे अग पेढा भरवतेय ती... कारल्याचा रस नाही.. चेहरा हसरा ठेव बाळा. तुला आनंद झालाय ना बोर्डात आल्याचा? मग दिसूदे की जगाला..


आता सदू भाऊ तुमचं काय? नवीन कपडे घेतलेत रिझल्ट्साठी म्हणून.. कप्पाळ! अरे तुला अ‍ॅडमिशन देतानाच सांगितलं ना मी.. तू फाटकेच कपडे ठेवायचे मुलाखतीच्यावेळी त्यानेच वजन पडेल. त्या मुलाखत कारांना चटकपटक बाईट्स हव्या असतात त्या कशा मिळणार? तुझी गरिबी.. तुझ्या आईचे कष्ट हे सगळं फ्रेम होणारे. तू ढिग मजेत गेलं बालपण म्हणत असशील... नको नको असच म्हण मग कॅप्शन टाकता येईल त्यांना की "गरिबीतही हसत मुख रहाणारा सदा रडे बोर्डात दुसरा" हो रे आता बोर्ड नाही म्हणे?


म्हणजे आमचं क्लासचं मार्केट डाऊन की काय? फिकर नॉट हरी, अरे ह्या क्लासची सेलिबिलिटी कायम रहाणार. मी गेल्या १० वर्षातल्या पेपरमधल्या बातम्या, न्युज चॅनल वरच्या बाईट्स गोळा केल्यात ह्या बाबतीतल्या. माझा अभ्यास एकदम पक्का आहे.


हे बघ लोकल पेपर असो की र्‍हाईम्स ऑफ इंडिया सगळी कडे बातम्यांचा टाईप फिक्स आहे. त्यावरुनच हे २१ अपेक्षित तयार केलेय. (ह्यात नुसते प्रश्न नाहीत तर काही इमोशन्स कसे द्यायचे ह्याचाही समावेश आहे.)


उदाहरणार्थ हे काही निवडक दाखले बघा:


१) काय/कसं वाटतय तुला बोर्डात आल्यावर? (बोर्ड जाऊन बेस्ट फाईव्ह आले तर फार्फार तर बोर्ड शब्द जाईल पण अमुक % मिळाल्यावर हा प्रश्न कायम राहील.त्याला मरण नाही..अगदी जगाच्या अंताSपर्यंत.)

जळ्ळ ह्यांचं लक्षण ते.! कोणाला दु:ख होतं का बोर्डात आल्याबद्दल? सांगा आहे का कोणी असा जीव ह्या भूतलावावर? तरीही हा प्रश्न येतोच.


२) ह्या यशाचं श्रेयं तुम्ही कोणाला देऊ इच्छीता?


मी शेजारच्या बंटीला/बबलीला देऊ इच्छीते/तो असं कोणी म्हणतं का? ते ही जाहीरपणे? किंवा असं कोणी म्हणतं का..? की बाबा टिव्हीला चिकटून एचबिओ बघत बसायचा.. आई मायबोलीवर टिपी करत बसायची, ताईटली फोनला चिकटून गुलुगुलु गप्पा मारत खुदखुदायची त्यामुळे ह्या यशाचं श्रेय हे फक्त आमच्या कामवालीला आहे. तिने शेवटच्या काही महिन्यात दांड्या मारल्या म्हणून आधी आई कामाला लागली.. मग तिने बाबाला कामाला लावलं आणि बाबाने ताईला त्यामुळे घरात त्यांना टिव्ही बघायला, मायबोलीवर बागडायला आणि फोनवर खुदखुदायला वेळ मिळायचा नाही आणि त्यामुळेच मला शांतता लाभली अभ्यासाला म्हणून ह्याचं श्रेय आमच्या रजेवर गेलेल्या कामवालीला.


ते श्रेयं नेहमी आई, वडील, भाउ/बहीण, शिक्षक्/शाळा, क्लास इ.इ.इ. लाच असते. हे विचारणारा, बोलणारा नी ऐकणारा सगळ्यांना माहीत असते तरी प्रश्न येतोच येतो.


३) तुला वाटलं होतं का बोर्डात येशील म्हणून?


होSSS मला नाकपण पुसता येत नव्हत त्या वयापासून पक्की खात्री होती मी बोर्डात येईन, म्हणून मी घरी भिंतीलाच बोर्ड समजून त्यावर माझं नाव लिहून ठेवलेल लहानपणीच


४) अभ्यासा व्यतिरिक्त काय छंद आहेत?


सांगता न येण्यासारखे चिक्कार आहेत (जसे शिक्षकांची खोडी काढणं, व्रात्यपणा करणं, आई वाचत असते त्या बाफवरल्या सारखे नसते उद्योग करणं इ.इ.) पण सांगण्यासारखे विसरुनच गेलेय्/गेलोय ८ वी पासून घाण्याला जुंपल्या सारखी/खा मी व्हेकेशन बॅच, रेग्युलर बॅच्,स्पेशल बॅच, टेस्ट पेपर स्पेशल बॅच सारख्या बॅचमधे गरागरा गरागरा फिरतेय्/तोय. असं इतक्या स्पष्ट पणे कोणी सांगतं का?


५) केमेर्‍यामनने ग्रीन सिग्नल दिल्यावर नेमक्या वेळेत नेमके एक्स्प्रेशन देऊन पेढा भरवण... हे काही वाटतं तितकं सोपं काम नाहीये.


माझ्या साखरपुड्याला एकदा फोटोग्राफर साठी आणि एकदा व्हिडीओ रेकॉर्ड करणार्‍या सदगृहस्तासाठी मी माझ्या होणार्‍या बायको कडून ५० पेढे भरवून घेतलेत.. खोटं नाही, नंतरचा अख्खा दिवस मी सारखा "आम्ही जातो अमुच्या गावा" चित्रपटाची आठवण काढण्यात घालवला


६) पेपर वाल्यांना द्यायची पोझ, चॅनल समोरची पोझ ह्यात व्हेरिएशन राखावं लागतं. कधी आई बाळ बाबा असं त्रिकुट डोक्याला डोकं लावून फ्रेम मधे बसवायचं, कधी घरातल्या पाळीव प्राण्याबरोबर फोटो... त्यातही दरवर्षी नवीन काही तरी ट्रेंड येतच असतो त्याचा अभ्यास ही मंडळी कधी करणार? आता ह्यावर्षी टुम आहे ती मोबाईल कानाला लावलेल्या स्नॅपची. बघा उघडून सगळी वर्तमान पत्र. काय दिसतय फोटोत? आहेत ना मोबाईल कानाला लावलेली बाळं? मग.. हा ट्रेंड आम्ही आधीच ओळखतो तशी तयारीच करुन घेतो आमच्या ग्रुमिंग सेंटर मधे.


ह्याची गरज काय विचारता?


अहोSS..आता एकवेळ बोर्डात येणं सोपं असेल पण आमच्या ह्या हुषार बाळांना ९-१० कधीकधी ८ वी पासूनच एकदम अभ्याSस एकेSS अSभ्याSSस असं घोकायला लावलेलं असतं.. असा एकदम पुस्तका बाहेरचा प्रश्न आला की गांगरतात ते. सवय असते का त्यांना असं माईक पकडून कॅमेर्‍याकडे बघत उत्तरं द्यायची?


म्हणून मी हा क्लास चालू केला. इथे शिकवणच दिली जाते. अगदी थिअरी ते प्रॅक्टिकल. उभं कसं रहायचं, कसं बघायचं, कधी कुठे बघायचं, कपडे, मेकअप किती? बोलायचं काय... ते बोलायचं कसं? हे सगळ तयारच करुन घेतो इथे.

फी एकदम वाजवी आहे आमची. म्हणजे करुन घेतलेल्या तयारीच्या मानाने तर एकदमच कमी. (अंदरकी बात सांगतो, गेल्या वर्षी काही आघाडीच्या चॅनलनी आणि पेपर वाल्यांनी टायपच केलय आमच्याशी) आणि आम्ही चॅरिटी करतो तर.. एखाद्या सदूभाऊ सारख्या विद्यार्थ्याला फ्री प्रवेश देतो (फक्त त्याने आमच्या क्लासच नाव जमेल तितक्या ठिकाणी घ्यावं येव्हढीच माफक अपेक्षा ठेवतो आम्ही)


गेल्या वर्षी आम्हाला पिटी चॅनलने (म्हणजे जो चॅनल बघितल्याबद्दल बघणार्‍याबद्दलच पिटी वाटत आपल्याला त्याला पिटी चॅनल म्हणतात) आम्हाला क्लासच्या मुलांबरोबर, त्यांचा रिअ‍ॅलिटी शो बघायला आमंत्रित केलं होतं. तिथे म्हणजे कसं सSगळं कंट्रोल्ड... उभं रहाण्यापासून ते पार पार्टिसिपेंटसच्या कमेंटस पर्यंत. कोणी रडायचं, कोणी कधी फेटे उडवायचे, कोणी तोंडावर हात ठेवून त्या सुस्मिता सेन फेम आश्चर्य दाखवायचं. इतकच नाही किती सेकंदभर हे आसु,हासु नी आश्चर्य दाखवायचं... सगळं सगळं कंट्रोल्ड अगदी होऊ, जाऊ दिलेल्या टाळ्याही अर्धी टाळी कमी नाही की अर्धी टाळी अधीक नाही अशा स्वरुपाच्या.


तेव्हा आमच्या क्लासच्या मुलांनी त्या पार्टिसिपेंटसना तिथे जाऊन धडे द्यावेत, आम्हीही काही महत्वाच्या लास्ट मिनिट टिप्स द्याव्यात म्हणून त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं. ती मिस झिप्रे मिसमॅचे, ती आली होती ना आम्हाला आमंत्रण करायला. तिलाही दिला की आम्ही सल्ला... तो ही मोफत "म्हंटलं बाई ग..! ४ आठवडे मिसमॅचच कपडे घालायचे, मग ५ व्या आठवड्यात घातलेल्या मॅचिंग कपड्याने आपण चर्चेत रहातो"


पुढे मागे चॅनलसाठी पण असं ग्रुमिंग सेंटर चालू करायचा विचार आहे, तस पिटी चॅनलशी बोलणही झालय. पण तुर्तास तरी आम्ही दहावी बारावी वर लक्ष केंद्रित केलय. काय आहे ही मुलं आपली भावी पिढी आहे. पुढचा समाज घडवणारी म्हणून त्यांचं व्यवस्थित ग्रुमिंग होणं ही खरतर सरकारची जबाबदारी आहे पण सरकार तरी कुठे कुठे लक्ष देणार? म्हणून आम्हीच पुढाकार घेऊन हे ग्रुमिंग सेंटर चालू केलय.


गेल्यावर्षी १० जणांना घेऊन सुरु केलेल्या एका बॅचच्या ह्यावर्षी ३० जणांच्या ३ बॅचेस झाल्यात. पुढच्या वर्षी किमान ३ शहरात शाखा सुरु करायचा मानस आहे त्या दृष्टीने प्रशिक्षक ग्रुमिंग सेंटर नुकतस सुरु केलय. त्याच्याही बॅचेस फुल्ल झाल्यात.


ह्यावर्षी पेपर मधले एका साच्यातले फोटो बघून कळलच असेल तुम्हाला ते सारं आमच्या ग्रुमिंग सेंटरचं यश आहे. आमच्या यशाचं श्रेयं हे सर्वस्वी चॅनलवाले आणि पेपरवाले ह्यांना जातं.


खरतर आम्ही रिझल्ट च्या एक महिना आधी बॅच सुरु करतो पण ह्यावर्षी पालकांच्या खास आग्रहास्तव पुढच्या वर्षीची बॅच आताच सुरु करायचा विचार आहे. बुकिंग यायला सुरुवात झालेय. लिमिटेड सिट्स फक्त बाकी आहेत. तेव्हा त्वरा करा...! हाऊसफुलचा बोर्ड कधीही लागू शकतो आणि ह्यावर्षी तरी 'आमची कुठेही शाखा नाही...!"

बुधवार, १९ मे, २०१०

ठेवा

आSSSई, कित्ती मोठ्ठ विमाSSन खिडक्या पण दिसतायत..." म्हणताना लेकीची मान घरावरुन उडणार्‍या विमानाबरोबर वळत होती नी आश्चर्य तोंडभर पसरुन... वासलेला आ बघुन, मला फाSSर मजा वाटत होती..


"मSSनू इकडे ये.." मी तिचा हात धरुन तिला पुढच्या दारातुन घरात घेऊन जवळजवळ धावत मागच्या दारातुन बाहेर घेऊन आले...

"हे बघ, तेच विमान..." तिला ते विमान दाखवताना मला आमचं लहानपणीचं, विमान बघताना ह्या दारातुन त्या दारातल पळणं आठवल.

"अगं…! कुठे निघालात…? कणेरी प्या मग जा…." म्हणत आजी वळली

"आजी ग, आम्ही आलोच्...मनूला प्राजक्ताच झाड नी रामाच देऊळ दाखवुन आलेच मी...."

गणपतीत भल्या पहाटे म्हणजे इतर वाडीला जाग यायच्या आधी आमच्या आठ जणांची धांदल उडायची. प्राजक्ताचा सडा वेचुन आम्ही अण्णांबरोबर बाकिच्या झाडांची फुलं वेचायला जायचो...झाडावर चढुन फुलं काढायची हौस पुर्ण करुन मग गाठायचो गांधी मैदान....तिथे दुर्वा वेचायच्या नी घरी येऊन प्रत्येकाने त्या निवडायच्या...आठ जणांचे आठ हार गणपतीला घातले की काहीतरी अ‍ॅचिव्ह केल्या सारखं वाटायचं....

आज तेच सारं मनूला दाखवायच होतं....

मधेच अण्णा...."अरे उन्हाच नका धावडवू रे त्यांना..." म्हणत मागच्या दारी कुंड्यांना पाणी घालायला निघून गेले.

नेहमी सारखा टोपली भर प्राजक्त गोळा करायला गेले तेव्ह्ढ्यात विमानाच्या आवाजाने तंद्री मोडली. टोपली रिकामीच राहिली...

विमान कसलं... गजराचं घड्याळ काळाची जाणिव करुन देत होतं......स्वप्न होतं तर हे सारं.....

परत एकदा रुटिन गाडं सुरु...मनूची शाळा....आमचं ऑफिस....घर.........मित्र मैत्रिणी ........नातेवाईक...कार्यक्रम. नी परत एकदा आमचं आजोळचं घर झालं - कुलुप बंद..

कॉलेजमधे असेपर्यंत वेळ मिळेल तेव्हा आजोळी म्हणजे चेंबूरच्या घरी जाणं व्हायचं. आजकाल मात्र स्वप्नातच फक्त तिथे जाणं होतं

अण्णा जाऊन १० वर्ष झाली, आता आजीही गेली.........ती गेली तेव्हा दाटून आलेले हे सगळे विचार....

लिहू का नको लिहू च्या उंबरठ्यावर असलेले....बर्‍याच वेळा मनातल्या मनात पुर्ण केलेले नी पुन्हा पुन्हा त्यावर खोडरबर चालवुन पुसुन टाकलेले....

ह्या १४ तारखेला पुन्हा एकदा त्या विचाराने उचल खाल्ली. १४ ला आजीचा वाढदिवस्....त्या निमित्ताने पुन्हा एकदा सगळ्यांबरोबर तिच्या-आमच्या घरात फिरुन आले.....मनानेच.

वेगवेगळे विचार तिच्या आठवणींचं बोट धरुन फिरायला लागले....अगदी १ वर्षा पुर्वी मी "आपण तिला चेंबूरला त्याच त्या "तिच्या-आपल्या" घरी घेऊन जाउयात तिची इच्छा आहे तर..." असं सगळ्या भावंडांना सांगत होते...तेव्हा भावाचं म्हणणं पडल्... "नको ताई, नको नेऊयात तिला.....आता काय राहिलय तिथे?....तिच्या मनात जपलेली जूनी वास्तूच बरोबर राहुदे शेवटपर्यंत तिच्या पाशी..."

कधी मोठा झाला माझा लहान भाऊ? पटलं मला त्याच नी जाणं राहितच झालं.

ती गेली त्याच्या दोन दिवस आधी आई नी मामी तिला भेटून आलेल्या...मला कळल्यापासुन मन सारखं फिरुन तिच्या पाशीच जात होत शेवटी काहीही झाल तरी तिला भेटून यायचच असं ठरवुन रविवारी सकाळीच निघाले घरुन, नेहमीचीच ऑफिसला जाताना पकडते ती ट्रेन पकडुन गेले भेटायला.....क्षण दोन क्षण ओळख पटली असावी तिला....बराच वेळ बसले.

खरंतर तिचा हात हातात घेतला तेव्हा आलेले विचार होते "नको अडकूस आता आमच्यात्...तू हवीच असणारेस... नेहमी करताच, पण... , नको आता....हे अस नाही बघवत तुला...." "देवा, जे काही होईल ते शांतपणे होऊदे, निदान नेताना फुलासारखी अलगद ने रे"

नंतर आश्चर्य वाटलेल माझं मलाच, आपल्या आवडत्या व्यक्ती विषयी असे म्हणजे निरोपाचे विचार कसे येऊ शकतात मनात...

दुसर्‍या दिवशी परत त्याच ट्रेनने ऑफिसला जाताना फोन वाजला...."मावशी कॉलिंग..." असं वाचुनच कळलं कशासाठी फोन आहे ते.एक क्षण आईची काळजी वाटली, कशी येईल ती गर्दीतून.....अशा मन:स्थितीत? पण माझा भाऊ नी नवरा दोघेही होते तिच्या बरोबर म्हणुन थोडी काळजी कमी झाली.

पुन्हा सगळं रविवारच्या क्रमानेच झाल.रविवारी ज्यावेळी कांदिवलीला उतरले होते त्याच वेळेला सोमवारी उतरले....त्याच वेळेची बस पकडली.....त्याच खोलीत परत जायचं होतं ...पण आत जायचं बळच नव्हतं पायांमधे.

आदल्या दिवशी भले तिने एकच क्षण ओळखलं असेल. पण... ती होती तेव्हा आणि आज नाही.....हा केव्हढा मोठा फरक होता एका रात्रीत झालेला...आदल्या दिवशी मीच प्रार्थना करत होते...देवा नको हाल करुस तिचे आणि तरीही.......... प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा हातपाय गळून गेलेले माझे.

माझ्या पेक्षा आई बरी म्हणायची.तिची प्रतिमा हळवी नी माझी खंबीर तरिही हा क्षण तिने जसा निभावून नेला तसा मला नाही जमला.

वाडीतली आमची ममता मावशी नेहमी म्हणत असते, "येऊन जा ग एकदा, बघ तरी कस झालय घर आता..."

नकोच वाटतं मला. एकदा बघितलं तर स्वप्नातुन पण उडून जाईल पुर्वीच चित्र, असं वाटत. म्हणुन तिला फक्त हो बघुयात कसं जमतय म्हणत फोन ठेवते मी....

घरातली माणसं गेली, घराचीही पडझड झाली. काय दाखवू लेकीला तिथे? मुळात आता आहे त्या परीस्थितीतलं घर ओळखीचं वाटेल का मला? लेकीने बघितलच नाहीये काही, पण मी जे अनुभवलय, बघितलय ते दिसेल का तिथे मला परत..?

का त्यापेक्षा हे असं स्वप्नांमधे दिसतं तेच तेव्हढं जपून ठेवू मी? तिथला प्राजक्ताचा सडा आजकाल फक्तं स्वप्नातच दिसतो. वाळवी लागलेल्या भिंतीही तिथेच पहिल्यासारख्या होतात, भयाण शांतता भरुन राहिलेलं घर हे स्वप्नातच लेकुरवाळं होतं नी स्वप्नातच फक्त किलबिलतं.

काळाबरोबर सगळं बदलणार हे जरी कळलं तरी मनाला नको वाटतं. काळ तर बदलता येत नाही मग त्या काळाला झब्बू द्यायला स्वप्ना शिवाय पर्याय तरी आहे कुठे दुसरा?

माणसांबरोबर वास्तूही इतिहास जमा होतात

काळाच्या पडद्याआड पाऊलवाटाही पुसटतात

आठवणीत जमा झालेल सारं

फक्त स्वप्नातच दिसू शकतं

सत्य नाकारत नाही मी,

तरी मन वेडं त्या स्वप्नातच रमतं

बुधवार, ७ एप्रिल, २०१०

रिझल्ट

चित्रगुप्ताच्या ऑफिस बाहेर;
मी ही रांगेत उभी होते
स्वर्गात प्रवेश नक्कीच मिळणार;
ह्या खुषीत दंग होते

इतकं वाचन, इतका अभ्यास
म्हणजे A+ नक्कीच मिळणार
जोडीला समाजभान म्हणजे;
शेरा उत्तमच असणार

नंबर येताच रिझल्ट घेतला;
रिझल्ट पाहुन गोंधळ वाढला
स्वर्गच काय, नरकही नाही
पुन्हा नशिबात फेरा आला

असं कसं झालं पण?
अभ्यास तर मी केला खुप
अभ्यासाच्या जोडीने
अध्यात्मही वाचल खुप..

चित्रगुप्त हसला, म्हणाला बाळा
मडकं अजुन कच्चच आहे
ह्यावेळी अध्यात्मा बरोबर;
माणुस थोडा वाचुन ये

चालेल नाही झालीस माड;
लव्हाळ व्हायला शिकुन घे

मंगळवार, ९ मार्च, २०१०

फिरुनी नवी जन्मेन मी...

 
रोजच्या सारखाच गजर वाजला तसा माझा दिवस सुरु झाला. नेहमी प्रमाणे मी स्वतःच आवरुन एकिकडे आधण ठेवल नी दुसर्‍या गॅस वर दुध तापत ठेवल. चहा-दुध होई पर्यंत फ्रिज मधे रात्री मळुन ठेवलेली कणीक, रात्रीच चिरुन  ठेवलेली भाजी, खोवलेल खोबर काढुन ओट्यावर ठेवल नी एकिकडे रेडिओच बटण सुरु केलं.

सायीच्या भांड्यात साय काढुन मनुच दुध गार करत ठेवलं नी रिकाम्या झालेल्या गॅस वर भाजीची कढई नी दुसरी कडे तवा टाकला.

"गुड मॉर्निंग मुंबाSSई.....स्पेशल हेल काढत VJ "Wish u all happy Woman's Day" म्हणुन दर दोन मिनिटांनी किंचाळत होती.

"काSSय गS, तुझा मोबईल्....सक्काळपासुन वाजतोय्....आत्तापर्यंत १० sms आलेत्...हा रेडिओ किंचाळायला लागला ना की तुला त्यापुढे ऐकुच येत नाही काही...बरं चहाSS जमेल द्यायला का मी घेऊ?" अजयने माझा मोबाईल माझ्या कडे देत विचारल?

"जरा घे ना तुच गरम करुन मायक्रोवेव मधे म्हणत त्याच्या पुढे कप ठेवला नी मनु उठलेय की उठवायचय अजुन म्हणुन विचारल त्याला"

"आSज्, मनुटलीला आईच हवेय ..." चहाचा भुरका मारत एका हाताने पेपर चाळत अजयने उत्तर दिलं
"असं रे काय? जरा लाडिगोडीन समजाव ना तिला...मला अजुन डबा करायचाय..."

"मSSनू....मनूबेटा...उठा शोन्या...चला आईने ब्रशला पेस्ट लावुन ठेवलेय बाळा.....मग उशिर होतो ना शाळेला...चला चला लाजा......" म्हणत आधी मनुच्या मागे जाताना एका हाताने पोळ्यांचा गॅस बारिक केला नी एक नजर घड्याळा कडे टाकली....

बॅगराउंडला रेडीओ वाजतच होता....VJ खिदळत तमाम महिलांसाठी टिप्स देत होती....स्पेशली महिलांसाठी गाणी पेश करत होती.....

६.३० वाजले होते..... अजुन बरिच काम बाकी होती....मनुच्या हातात ब्रश देऊन मी राहिलेल्या पोळ्या पुर्ण केल्या नी भाजी गार करत टाकुन अजयला गार झालेल मनुच दुध ग्लास मधे ओतायची सुचना दिली......

एकिकडे रेडिओवरच "दिल है छोटासा छोटिसी आशा......चांद तारो को छुने की आशा.." कानावर पडत होतं दुसरी कडे हात मनुची तयारी करत होते..

"अरेच्या...आज महिला दिन आहे ना ग आशु?" "मज्जा आहे बॉ तुमची..." "wish u happy woman's day" "आज पेपर पण महिलादिन मय झालाय" अजयने पेपर फडफडवत म्हंटल

"साSहेब्..तो पेपर घाला चुलीत नी मनुच आवरायच बघा जरा...मग विश बिश करा.." म्हणत मी माझा राग व्यक्त केला.

"जो हुकुम्..." म्हणत त्याला पळावच लागल कारण रेडिओवर "मै हु..खुश रंग हिना" लागल असल तरी मी लागलीच चंडिका होऊ शकते हे अनुभवाने त्याच्या सरावाच झालेल होतं.

"रेडिओ एफएम ले आये है आपके लिये...सिर्फ आजके दिन्...आपका अपना सदाबहार प्रोग्रॅम्....आप जीत सकते है ड्ढेSर सारे इनाम....तो बेहनो...तय्यार हो जाओ एक खास् प्रतियोगिता के लिये......"
"कमर्शिअल ब्रेक्स पण महिला दिनाची बधाई देत होत्या...."

कान सवयीने टिपत होते नी हात नेहमीची काम करत होते...डोळे अर्थातच घड्याळाकडे लागलेले होते..

मनुला शाळेत पाठवुन नेहमीची लेडीज स्पेशल मिळाली....आज दुल्हनच रुप घेतलेली लोकल समारंभासारखी मिरवत होती....खास महिला दिन स्पेशल कार्यक्रम म्हणे हा.....
सिल्कच्या साड्या नी ठेवणीतले दागिने ....नेहमीच्याच गप्पा......नी तक्रारीही त्याच त्याच...
कानाला लावलेल्या हेडफोन मधुन पण तेच तेच "wish u happy woman's day" च दळण नी तेच तेच फिरुन आलेले sms...

हळदी कुंकु प्रोग्रॅम व्हावा तसेच गाडीत झालेले कार्यक्रम्.....महिला दिन साजरा व्हायलाच हवा पासुन कशाला हवा तो देखावा...पर्यंत संमिश्र प्रतिक्रिया......

"बाSSपरे आज काय गडबड ग माझी....ह्याचा डबा....पाणी.....कामवाली...कचरेवाला....लेक्...सगळी धावपण नुसती....त्यात साडी नेसायची..म्हणजे बघायलाच नको..." हे सगळ बॅगराउंड म्युझिक कानाआड करत पुस्तक घेतल वाचायला...तर कोणता तरी वुमन ऑर्गनायझेशनचा गृप कळव्याला चढला...चढल्या चढल्या डब्याचा ताबाच घेतला त्यांनी ...मग काय पुस्तक गेल पुन्हा बॅगेत...

प्रत्येकीला पिवळा गुलाब देऊन हळदी कुंकु लावता लावता "जोग काकुंपाशी"त्यांचा हात थबकला. समोरचा हात थबकला आणि त्याचवेळी काकुंचाही हात हे काय अभद्र अस म्हणत स्वतःच्या कपाळापुढे "नको नको" अशा अर्थाने आला

मला उगिचच हसु आल....वुमन ऑर्गनायझेशनला पण हळदी कुंकु लावायला कुंकवाचा धनी असावा लागतो तर....१०० व वर्ष आहे म्हणे हे जागतिक महिला दिनाच.....हम्म...अजुन बरच पुढे जायचय म्हणा...गाडी आत्ता कुठे सुरु झालेय...

"तो वुमन ऑर्गनायझेशन वाला गृप" बरेच काही क्विझ बिझ घेत होता...बक्षिस वाटत होता......तेव्हढीच म्हणे मजा ना रोजच्या रुटिन मधुन्.....अस बर्‍याच जणींना वाटत होत...एकंदर आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे" प्रकार होता...

मग मलाच का फारसा आनंद होत नव्हता? मी स्त्री वादी नाही आहे का? की छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायची वृत्ती हरवत चाललेय माझी? माझच मला कळत नव्हतं.....

कालच स्वप्न जसच्या तस आठवुन .....आत्ताही रस्सीखेच जाणवली मला....स्वप्नात मधे अशी मी....एक बाजुला एक हात धरुन सो कॉल्ड संस्कृती रक्षक गट्...आणि दुसर्‍या बाजुला सो कॉल्ड पुरोगामी आघाडी वाले...

"नाच ग घुमा.....कशी मी नाचु?"

"तुला परंपरा आवडतात का?"

"आवडतात थोड्या फार.."

"मग तू आमची..." म्हणत प्रतिगामी तिकडे खेचत

त्याचवेळी...."तू तर पेहराव तुला हवा तसा आधुनिक करतेस, टिकली मंगळसुत्र अशा चिन्हांना फारस महत्त्व देत नाहीस....तेव्हा तू आमचीच" म्हणत पुरोगामी दुसरा हात खेचत

"तुला चुल मुल पण आवडत ना? कधी मधी नटायला आवडत ना? मग तू आमचीच" इति प्र. (प्रतिगामी)

"तुला बाहेरच आकाश खुणावत ना मग तू आमचीच.." इति पु. (पुरोगामी)

"बाई ग! पु.आ. कडे जाशिल तर संसाराला मुकशील.." इती प्र.

"ए वेडे व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी कशी चालेल तुला?" इति पु.

एक इकडुन खेचतेय.... एक तिकडुन खेचतेय्....मधल्या मधे मी पार भंजाळुन गेलेले.....जोरात ओरडावस वाटल मला....तुम्ही दोघेही जा आपापल्या मार्गाने...मला माझा स्वतःचा मधला मार्ग चालुदे....कारण "ह्याचेही पटते आम्हा...त्याचेही पटवुन घेतो..."

"ए बाई असे तळ्यात मळ्यात नाही चालणार तुझे..." "प्र आणि पु. दोन्ही आघाड्यांची युती झाली.

"अरे पण मला दोन्हीतल थोड थोड पटत, आणि दोन्हीतल काही काही पटलं तरी न झेपणार असत्.....काही मला प्रायॉरिटि ठरवुन त्याप्रमाणे इकडे तिकडे कराव लागत्....मला तळ्यात मळ्यात करावच लागणार्..."

"अस म्हणताच दोन्ही गट माझे हात झटकुन निघुन पण गेले...." "तेव्हढ्यात गजर झाला नी जाग येऊन दिवसही सुरु झाला माझा...."

आता पुन्हा तेच स्वप्न आठवल नी रस्सीखेच आठवली...गाडितल्या कलकलाटाने तंद्री भंग पावली....नी मी पुन्हा एकदा कळपात जागा शोधु लागले...

कानातला हेडफोन आता एफएम वरच "जीने के लिये सोचा ही नही...." आळवत होता.....गाडी आता शेवटच्या स्टेशनवर आली......पुन्हा एकदा शुभेच्छांची देवाण घेवाण.......आलेले sms बघत ऑफिसकडे कुच केल... इमेल मधुन बर्‍याच कवितांचा, शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडलेला.....बर्‍याचशा कविता, शुभेच्छा "स्पॅम इमेल" बॉक्स मधे गेल्या होत्या.....वाचल्या नी स्क्रिन रिकामी करुन कामाला लागले..

मधेच घरुन आईंचा फोन "बाई आज उशिरा आली, उद्या येणार नाहीये म्हणालेय आणि जाताना नातवांच्या फी साठी म्हणुन १०० रुपये घेऊन गेलेय" हे सांगायला आला. "त्या बाईचा नवरा आणि मुलगा एक वारस देण्याशिवाय काही एक करत नाहीत तरी ह्यांना आधाराला असा कुंकवाचा धनी लागतोच कशाला, आता उद्या त्या दारुड्या नवर्‍याला दवाखान्यात नेण्यासाठी हिची दांडी आणि आपल्याला डबल व्याप" म्हणत त्यांनी फोन ठेवला.....एक महिला म्हणुन तिच्या बद्दल सहानुभुती बाळगु? असला नवरा, मुलगा ह्यांच चालवुन का घेते म्हणुन तिच्यावरच चिडु? की माझही काम वाढणार म्हणुन वैतागु? आणि हे नेमक महिला दिना निमित्त व्हाव म्हणुन योगायोग म्हणु? असो विचार करुन काही तिची परिस्थिती नी मला तिच्या दांडीमुळे पडणारी काम टळणार नव्हती...

दिवस संपत पण आला....ऑफिसमधे महिलादिन स्पेशल डिस्कशन्स ना उत आलेला....."प्रमोशन हवं, पगार तेव्हढाच हवा तर उशिरा पर्यंत का नको थांबायला? असा नेहमीचाच अजेंडा होता पुरुष विरुद्ध बायका असा.....मी कशातच नव्हते.....इथे पण आपण का नाही कुठच्या एका गृपमधले? कुबड्या नकोत्....सवलती नकोत म्हणताना....हे ही पटत की हा इथे समानतेच्या गप्पा मारणारा पुरुष कलिग त्याच्या स्वतःच्या बायकोने मात्र ऑफिसात उशिरा पर्यंत न थांबता वेळेवर घरी याव, मुलांना आईची गरज असते वगैरे पाजळतो....तेव्हा इथे ऑफिसात कलीग असलेली स्त्री पण अशीच कुणाची तरी बायको, आई असते तिच्याही घरी अशाच अपेक्षा बाळगणारा एक पुरुष म्हणजे तिचा नवरा/बाबा रहातो हे तो सोयोस्कर रित्या विसरतो...म्हणुनच मला ना तिचा पक्ष घेता येत ना त्याचा....मला माझीच काम दिसत असतात्...ऑफिसमधलीही नी घरचीही...कोण पडेल त्यांच्या वादात? म्हणत मी तीच पुर्ण करत बसले नेहमीसारखीच...

येताना मला करायची काम, नवर्‍याला करायला सांगायची काम एकदा तपासुन तसा sms forward केला त्याला....नी गर्दीच्या ट्रेन मधे मुक्कामाच ठिकाण येईपर्यंत "उभी" राहीले, जंप करुन सिट पकडली नाही म्हणुन्...सकाळपासुन सेलिब्रेट करुन दमलेल्या बायकांनी हक्काची सिट मिळताच झोपुन एनर्जी वाचवायच ठरवलं कारण घरी गेल्यावर ओटा त्यांचीही वाट बघणार होता......मी पुन्हा एकदा हातातल्या पुस्तकाशी हातमिळवणी करुन उभ रहाण्याचा वेळ सत्कारणी लावला....

परत येऊन पोटाच्या सोयीला लागले.....घरात असलेल्या बाईने म्हणजे साबाईंनी जेवण तयार ठेवलेल नेहमी प्रमाणे....जेवणं होऊन मागच आवरता आवरता मोठा झालेला टिव्हीचा आवाज "कोणत्या तरी चॅनल वर कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखती" ऐकवुन गेला......

"अग ए ऐक ....ग ...बघ काय सुरेख मुलाखती आहेत..." म्हणत सोफ्यावर पसरलेल्या नवर्‍याकडे एकदा बघुन  लेकीच दप्तर त्याच्या हातात दिलं नी लेक तुझीही आहे रे...ची जाणिव करुन देत सोफ्यावर बसुन आधुनिक स्त्रीच्या प्रगतीचे टप्पे बघायला सुरुवात केली...

दिवस संपला....दुसर्‍या दिवशीची तयारी करुन्...घडाळ्याकडे नजर टाकुन गादीवर पाठ टेकली...नी पुन्हा स्वप्नांच्या दुनियेत सोनपरी घेऊन गेली.....म्हणाली......ये इकडे.....समोर अशी आरशापुढे उभी रहा....लहानपणा पासुन प्रत्येक विषयात प्रगती पुस्तकावर "उत्तम" शेरा मिळवायच व्यसन लाऊन घेतलयस ना..ते विसर आता.....सोडुन दे विचार तू कोणत्या गटातली ह्याचा....हे ही सोडुन दे की दिवसभर टिआरपी वाल्यांनी किती गाणी आळवली.....ट्रेन मधल्या सिल्क साड्या....तन्मणी...हळदी कुंकू.....मजा मस्ती .....आलेले समस, इमेल, काव्य सगळ सगळ सोडुन दे....तिकडे जी आरशात उभी आहे ना....तिच्याकडे फक्त बघ्.....काय आहे तिच्या डोळ्यात? काय हवय तिला......कस जमु शकेल? किती जमु शकेल? त्याचा विचार कर.....महिला दिन करावा की नाही ह्याच्या वादात तू का पडतेस? तुला अजुन काय गाठायचय त्यात शक्ती वाया घालव्......कसा गेला तुझा दिवस? जसा ७ मार्च गेला तसाच ८ चा गेला आणि तसाच ९ मार्च जाणारे......मानसिकता बदलायची वाट बघे पर्यंत तुझ्या लेकीची लेक पण म्हातारी होईल....तुझी मानसिकता तू बदल आधी...ही माझी काम आहेतच पण फक्त माझीच नाहीत हे आधी तू स्वतःला समजाव आणि मग बाकिच्यांना....त्यासाठी तुला good books मधुन बाहेर पडाव लागेल्...प्रगती पुस्तकावर "उत्तम" सुन, पत्नी, आई, मुलगी असे शेरे नाही मिळणार दरवेळेस्...त्याची तयारी ठेव.....येव्हढ केलस तरी खुप आहे सध्या...."

परिने दाखवलेल प्रतिबिंब डोळ्यातल्या पाण्याने कधी गढुळलं कळलच नाही मला.......सकाळी गजर झाला तेव्हा ओले झालेले डोळे हाताला समजले फक्त...

सवयीने आधण ठेवलं...दुध तापत ठेवुन्.....रात्री मळुन ठेवलेली कणीक आणि चिरुन ठेवलेली भाजी फ्रिज मधुन काढताना एकिकडे रेडिओच बटण चालु केल...मराठी एफएम वर "एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी.....स्वप्नाप्रमाणे भासेल सारे..जातील सार्‍या लयाला व्यथा..." वाजत होतं....

माझे हात सवयीने काम करत होते, ओठ मात्र रेडिओ बरोबर गुणगुणत होते.."भीती अनामी..विसरेन मी...हरवेन मी...हरपेन मी...तरिही मला लाभेन मी...एकाच ह्या जन्मी जणु फिरुनी नवी जन्मेन मी..."

(ताजा कलम : खास ह्यातल्या अजय साठी)

प्रिय नवरोबा,

नाराज झालास? अस्वस्थ झालास माझं स्वगत वाचुन?

अस्वस्थ जरुर हो, पण नाराज होऊ नकोस्..आणि स्वतःला कमी तर अजिबात लेखु नकोस.
तसा हेतुच नाही आहे माझा मुळात.

इतक्या वर्षांच्या अंगवळणी पडलेल्या सवयी, पिढ्यानुपिढ्या बघत आलेलं चित्र असं एका रात्रीत बदलेल तरी कसं?

पण तुझं अस्वस्थ होणं मात्र मला आवडलं.अंतर कमी व्हायला सुरुवात तर झाली त्यामुळे..

ते प्रगती पुस्तकाच वाचुन खरतर हसु आलं ना तुला? "अच्छा म्हणजे इतके दिवस समजुन उमजुन दोन कनांचा वापर होत होता तर" असं म्हणून पण घेतलस न तू?

आता एक आनंदाची बातमी तुझ्यासाठी...

जसं मी माझ्या प्रगती पुस्तकातल्या शेर्‍यांबद्दल म्हंटलय ना, तसच मी तुझ्या बाबतीतही मानते.

so don't worry about your image all the time. तू देखील उत्तम नवरा/बाबा/मुलगा नाही असु शकत दरवेळी हे ही ठाऊक आहे मला.

संसार होण, संसार करण, संसार फुलवत एकत्र चालण हे समानार्थी शब्द नाहित.. ह्यातला नेमका फरक तू जाणतोस हे काय कमी आहे का? so एक मित्र म्हणून माझं हे स्वगत वाच आणि हो अस्वस्थ मात्र जरुर हो

तुझी बायको)

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१०

कन्फ़ेशन

(हे लिखाण गेल्यावर्षी मायबोली.कॉम वर प्रकाशीत केल आहे. इथे तेच कॉपी पेस्ट करतेय)

ही रुढ अर्थाने कथा नाही, लेखही नाही. हे कन्फ़ेशन आहे, एका केलेल्या न केलेल्या, असलेल्या नसलेल्या गुन्ह्याचे.

कोड्यात नाही ठेवणार तुम्हाला कारण एकदा कन्फ़ेशन द्यायचच म्हंटल्यावर मग काय करायचेय झाकपाक.

बिरबल आणी माकडीणीची कथा तशी सगळ्यांनाच माहीत आहे. तर हे आहे त्याच माकडीणीचे कन्फ़ेशन. आपण सोई साठी तिला माकडीणीची कथा म्हणूयात.

तर माकड माकडीणीच ते पहिल वहील पिल्लू असत. जगातल्या सगळ्याच सामान्य जोडप्या प्रमाणे ती दोघे देखील आनंदाच्या परमोच्च शिखरावर असतात.पण! एक मोठ्ठा पण त्यांच्या आणी त्यांच्या भाग्याच्या मधे असतो.

एकदिवस त्यांचा डॉक्टर त्यांना सांगतो "सॉरी, वुई कान्ट गो अहेड, वुई हॅव टू टर्मिनेट" कधी कधी अती भावनिक न होता एखादी गोष्ट सांगायला परक्या भाषेचा आधार बरा असतो.

शॉक! कानावरुन नुसतेच शब्द जातायत. काय सांगितल आत्ता डॉक्टरांनी? "वुई हॅव टू टर्मिनेट, म्हणजे?????

डोक्टर काहीतरी समजावतात, "लाखात एखादी केस अशी असते......."

लाखात एखादी मग ते आम्हीच का? मन आक्रंदत. मग सुरु होतो प्रवास एका डॉक्टर कडुन दुसर्‍याकडे, दुसर्‍याकडुन तिसर्‍याकडे. पण गोळाबेरीज एकच. सगळेच डॉक्टर त्यांना लवकर निर्णय घ्यायला सांगतात. प्रोबॅबिलीटी, वय आणी इतर अनेक घटकांच्या आधारे समजावतात "तोच" निर्णय योग्य कसा ते.त्यांचही चुक नाही म्हणा, त्यांच्या संपुर्ण आयुष्यात अशा कितीतरी "केसेस" त्यांनी हाताळलेल्या असतात.

पण, माकड माकडीणीच काय? काय ठरवायच त्यांनी? शारिरीक, मानसीक अपंगत्व असलेल पिल्लू, ज्याच्यावर ईलाज नाही अस त्याच आजारपण आणी धोकादायक बाळंतपण? की "टर्मिनेशन" आणी ईलाज पुढच्या निरोगी बाळंतपणासाठी?

हेच ते कन्फ़ेशन, बिरबलाची गोष्ट उजवी ठरते आणी माकडीण आपला जीव वाचवते.

पुढे काय? बिरबल गोष्टी सांगून संपवतो पण तुम्हाला ठावुक आहे का त्याची गोष्ट जिथे संपते तिथे तिची गोष्ट सुरू होते.

पुढच्या निरोगी बाळाच दान पदरात पडुनही तिच्या मनात अपराधीपणाचा सल रहातोच. आणी अस अपराधी वाटण पण एक अपराध वाटायला लागतो म्हणून हे कन्फ़ेशन.

तिच्याही नकळत २ परस्पर विरोधी व्यक्तिमत्व तिच्यातच झगडत असतात. तिच्यातला कौन्सलर तिला सतत सांगत असतो हा अपराधीपणा काढून टाकण्यासाठी, भूतकाळाचा विचार न करता वर्तमान आणी भविष्य जपण्यासाठी.

तिलाही कुठेतरी पटत पण वळत नाही, भूतकाळाशी जोडलेली नाळ तोडण जमत नाही, म्हणुन हे कन्फ़ेशन, तिच तिच्यासाठीच आणी थोडस बिरबलाच्या गोष्टीसाठी. पुर्णविरामाच्या पुढे असणार्‍या टिंबांसाठी. तिच्या बरोबर सतत असणार्‍या अपराधीपणासाठी जो कदाचीत तिच्याबरोबर कायम रहाणार.

खरच कौन्सलर म्हणतो तस स्वत:ला माफ़ करायला ती कधी शिकणार?

---------------------------------------------------

ही कथा वजा लेख माझ्या मनाच्या तळाशी बरेच दिवस पडुन होता, कागदावर उतरवायचा की नाही ह्या संभ्रमात तसाच होता बिचारा. मग दादचं "घडी" वाचल आणी विचार आला, ह्या घडीलाही होडी करुन पाण्य़ात सोडायला हवी. तेव्हा प्रथम त्या घडीची होडी झाली. परत ती तिथे काही दिवस माझ्या डायरीच पान अडवून बसली. तिला अस उघड्या पाण्यात सोडायचा धीर होईना. मग मंजूच "निवाडा" वाचल आणी वाटल अशा अजुन किती "यशू " असतील त्यांच्या साठी तरी ही होडी पाण्यात सोडायलाच हवी. मग कुणी तिला "इललॉगिकल म्हणो, किंवा कोणी काही.

कदाचीत तिची स्वत:ला माफ़ करण्याची सुरुवात असेल ही तिच्या पद्धतीने केलेली.

आता ते कन्फ़ेशन म्हणून जगापुढे मांडल्यावर ती असही म्हणू शकत नाही "माझ्या" नजरेने बघा म्हणून. असो पटल तर घ्या नाहीतर सोडुन द्या ती जाईलच तरुन एकदा पाण्य़ात पडल्यावर.

बुधवार, २० जानेवारी, २०१०

अजुन किती काळ?


 

अजुन किती काळ
आम्ही बळी जायचं?
तुमची होते मजा..आणि;
आम्ही मरण कवटाळायच?
दोन अश्रु, नुसती हळहळ
एखादं काव्यं, की संपली कळकळ....
आधी दुर्मिळ करुन;
मग "दुर्मिळ" म्हणुन जगवायच..!
तुमचं असं गणित म्हणा, मला कसं कळायच?
सांगा ना; अजुन किती काळ अस बळी जायचं?
 

(माहीत नाही वरच्या फोटोत नीट समजुन येतय का ते, पण आज पतंगाच्या मांज्यामुळे एक कबुतर समोर तडफडुन गेलेल बघितल आणि पोटात गलबललं )

मन माझे

आठवांच्या सरी मधे
मन माझे चिंब झाले
चिंब मनाच रे सख्या
अलवार गीत झाले
 
असे गीत पापणीच्या
शिंपल्यात लपविले
तरी गूज हे मनाचे
हलकेच ओघळले
 
असे ओघळता मोती
तुझ्या हाताने टिपले
आता कुठे माझे गीत?
तुझे तुझेच रे झाले

प्रार्थना

नको द्वेष हेवा | नको मनी कावा |
अंतरात देवा | क्षमा नांदो ||

दुर्बळांची सेवा | असे जर पुजा |
देवा अशी पुजा | नित्य घडो ||

द्या हो देवा कणा | आणि अनुकंपा |
जगण्यास देवा | दोन्ही लागे ||

सार्थ अभिमान | वृथा अहंकार |
ह्यातला फरक | कळो देवा ||

सन्मार्गाचा मार्ग | जरी खडतर |
चालण्याचे बळ | देई देवा ||

हिच माझी देवा | विनवणी तुला |
सोहळा जन्माचा | सार्थ होवो ||