मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५

 काळीज झालं फरार


काल रातीला लिहून चिठ्ठी

काळीज झालं फरार

पोलीस पाटील तुमीच सांगा

कुटं करु तकरार


झोप उडाली दिवसाची अन् 

राती ताल जुळंना

चाळ बोलती, त्यांचं गाणं

जीवास या उमजना


मोहीत झाले. मन हे भुलले

झाले बघा पसार

पोलीस पाटील तुमीच सांगा

कुटं करु तकरार


कोरड पडली, मनास अन् 

तापली बघा हो काया

औसद तुमच्या पाशी, यावे

तुमी लवकरी राया

 

फित्तूर काळीज, गेलं तोडून

देहामधील करार

पोलीस पाटील तुमीच सांगा

कुटं करु तकरार