बुधवार, १ जून, २०१६

पूल


तुला कळलं असेलच म्हणा,
कालच्या वादळी पावसात
आपल्या गावांना जोडणारा
पूलच मोडून गेला

तसं गाव नेहमीच्या
कामकाजात व्यग्र आहे;
पूल तुटल्याने काय ते
दळण्वळण फक्त बंद आहे

तसही स्वयंपूर्ण असल्याची
भावना इतकी तीव्र आहे
की आता दोन्हीकडून
परत पूल बांधायचे
प्रयत्नही होण कठीण आहे

हे देखील तुला कळलं असेलच म्हणा..

बुद्धिबळ

बुद्धिबळ शिकून घे!
तू नेहमी सांगायचास..

आयुष्यात कोण कसे
डावपेच खेळतोय;
समजायला उपयोग
होतो म्हणे त्याचा..

तू म्हणालास म्हणून;
शिकून घेतलं मी ते ही

पण; काळ्या पांढऱ्या सोंगट्या
अशी विभागणीच नसते
खऱ्या आयुष्यात

हे "चेकमेट" झाल्यावर
लक्षात आलं बघ


गुरुवार, २६ मे, २०१६

हुरहूर

बरसायची वाट पाहून
जिवाची काहिली व्हावी
आणि येतो येतो म्हणत
त्याने नुसतीच हूल द्यावी!

आता नाहीच बरसणार
म्हणत मनाची तयारी करावी;
तेव्हाच नेमकं त्याला
बरसायची हुक्की यावी...

मन पुन्हा हळवं हळवं,
बेटं तयार त्याच्या भेटीला...
परत ऊन पावसाचा
खेळ त्याच्या वाटेला!

खरं सांग, तू ढवळ्या
नि पाऊस पवळ्या आहे ना?