राजगड - बस नाम ही काफी है
दिवाळीतल्या सिंहगड पुरंदर कॅम्प दरम्यानच उन्हाळी कॅम्पचं ठिकाण पक्कं झालं "राजगड" बस नाम ही काफी है म्हणायला लावणारा असा हा गडांचा राजा आपल्या राजेंच्या प्रथम राजधानीचा मान पटकवणारा.
ह्याची रचनाही मोठी बघण्यासारखी आहे. मधोमध बालेकिल्ला त्याच्या तीन बाजुला पंख्याची पाती असावीत तशा तीन माच्या पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी माची. सुवेळाहून सुर्यदेवाच्या आगमनाचा आणि संजीवनी हून त्याच्या परतीच्या प्रवासाचा सोहळा बघावा आणि मधोमध असलेल्या ह्या बालेकिल्ल्याला रेलिंगचा आधार घेत का होईना पण एकदा तरी पाय रोवून नजरेत भरुन घ्यावं. सुवेळाला जाताना लागणार्या नेढ्यात मात्र आवाज न करता तिथल्या स्थानिक रहिवाशी असलेल्या मधमाशांना त्रास न देता निसर्गाचा एक घटक होऊन शांतपणे तो थरार अनुभवावा. फ़ेबुवर प्रोफ़ाईल फ़ोटू टाकण्यासाठीच्या पोझचा मोह शक्यतो इथे टाळावा निदान सोबत ४० एक मुलांचा कॅम्प नेला असेल तर नक्कीच टाळावा.
तर असा हा आमचा ट्रेक ज्याची सुरुवात झाली १३ एप्रिल च्या रात्री आणि सांगता झाली १५ एप्रिलच्या रात्री.
१३ ला रात्री निघून पहाटे वाजेघर जवळच्या भोसले वाडीत पोहोचलो. चहा पोहे खाऊन आणि आमच्या एका कार्यकर्त्याचा वाढदिवस केक कापून साजरा करुन आम्ही चढायला सुरुवात केली. सकाळची वेळ असल्याने वातावरण अल्हाददायक होतं, फारशा घामाच्या धारा अजून तरी लागलेल्या नव्हत्या. पाली दरवाजाच्या मार्गे आम्ही पद्मावती मंदिरात पोहोचलो. इथेच आमचा मुक्काम होता. तिथे ठेपले सॉस चा नाष्ता करुन आम्ही रोप घेऊन बालेकिल्ल्याकडे निघालो. घारु मंदीराची देखभाल करायला खालीच रहातो म्हणाला तसही राजे ओळखून आहेतच त्यांच्या ह्या मावळ्याला म्हणून त्याला देखरेख आणि इतर कामं देऊन आम्ही बालेकिल्ल्याकडे कुच केली. भर उन्हाचे गेलो खरे पण आमची दुपार सत्कारणी लागली येव्हढं नक्की. मुलांच्या सुरेक्षीततेच्या दृष्टीने रोप घेऊन गेलो होतो आणि ते एका अर्थी बरच झालं. तसं चढायला कठीण वगैरे नव्हतं विशेष पण रोप मुळे ५० मेंढरांना हाकायची सोय झाली. मनात भिती न बाळगता मुलं पटापट चढून वर गेली आणि नंतर तशीच परतताना न घाबरता खाली आली. खाली आल्यावर भाकरी भाजी भाताचं जेवून बर्याच मुलांनी एक छोटीशी डुलकी काढण्याला पसंती दिली. संध्याकाळचा सुर्यास्त संजीवनी वरुन बघीतला. इथे मात्र घारु गेलेला पण मी, सानिका अजून एक मुलगी आणि एक कार्यकर्ती खाली मंदिरातच थांबलो. उन्हाळी पित्ताचा त्रास होत असताना पण ट्रेकला जायची परवानगी नाकारतील बाबा म्हणून ती मुलगी घरी तब्येतीची तक्रार न करता ट्रेकला आली, इथे आल्यावर पित्तामुळे मळमळायला लागल्याने आणि सानुलाही तसाच थोडा त्रास वाटल्याने आम्ही खालीच थांबलो त्या दोघींना सोबत म्हणून.
खाली मंदिरात राहिलोच होतो इतरांना संजीवनीवर जाऊ देऊन तर म्हंटलं वेळ सत्कारणी लावून आमच्या जेवणाची सोय केलेल्या अन्नपुर्णेशी गप्पा माराव्यात. आमच्या अन्नपुर्णा बाई शोभा रसाळ वहिनी आणि त्यांचे कारभारी गुंजवणे गावचे रहिवासी. शिवसेनेच्या झुणका भाकर योजने अंतर्गत त्यांनी पद्मावती मंदिराला लागूनच स्वत:चं झुणका भाकर केंद्र चालू केलं आणि तेव्हापासून दर शनिवार रविवारी ट्रेकर लोकांच्या पोटातल्या कावळ्यांची सोय ते बघतायत. मुलांना शिकण्यासाठी पुण्यात ठेवलय म्हणाल्या. चोर दरवाज्याने सामान सुमान घेऊन दर विकांताला इथे मुक्कामी येतात. आम्ही सोमवारी निघणार होतो म्हणुन आमच्यासाठी सोमवार पर्यंत ते वरच थांबलेले. तिथेच मंदिरात नेहमी येणार्या ताकवाल्या आजींना विचारलं तर त्या म्हणे मी "फाटेला निगाले बगा घरनं पार तोरना किल्ला हाय ना तितं हाय माजं गाव" बाऽऽपरे किती ते कष्ट पोटाची खळगी भरण्यासाठी? त्यांना आमच्या शहरातल्या ट्रेन मधून गर्दीत स्वतःला लोटून देत प्रवास करण्याचं कौतुक आणि आम्हाला त्यांच्या पायपिटीचं.
संध्याकाळी नचि आणि पजोने सरप्राईझ देत आम्हाला सुखद धक्का दिला. दुसर्या दिवशी सुवेळा दर्शन, निवडक बच्चे कंपनी सकट नेढ्यात बसण्याचा थरार, खाली उतरुन आल्यावर मार्गासनी जवळच्या एका नदीवर मनसोक्त डुंबणं आणि मग जेवून परतीचा प्रवास हाच आमचा ट्रेक.
आता ह्यात वेगळं असं काहीच नाही, तसही बाकी काय लिहीणार मी वेगळं, राजगड तोच त्याच्या माच्या त्यांची वर्णनही तीच आणि तिथला थरारही तसाच बाकीच्या ट्रेकर्सनी लिहून ठेवलाय तसा. फक्त बच्चेकंपनी कॅम्प नेल्याने आलेला अनुभव, मिळालेला आनंद, पुढच्यावेळी प्री कॅम्प ट्रेनिंग म्हणून मुलांना काही सुचना देऊन ठेवायला हव्यात अशा काही गोष्टींची आमच्या अनुभव खात्यात जमा झालेली भर, वारकर्याने वारीला जावं त्या नेमाने दरवर्षी वर्षातून दोन वेळा कॅम्पला येणारे आमचे छोटे मावळे, आत्ता आत्तापर्यंत लहान वाटणार्या काही मावळ्यांचं तारुण्यातलं पहिलं अडखळतं पाऊल आणि ह्या वयाला जोडून आलेलं हे वयच असं असतं म्हणत जगाला न जुमानता हम करेसो वालं हट्टीपण, वारं पिऊन घेणारं आणि जग कवेत घेऊ शकतो वाटायला लावणारं वयातलं स्थित्यंतर आणि आम्ही फक्त त्याचे साक्षिदार, जणु आम्ही ट्रेक चढून वर आलोय आणि आता ह्या मावळ्यांना चढताना वरुन बघतोय. आमची त्यांची वाट एकच तरी प्रत्येकाचं चढणं, घसरणं सगळं स्वतंत्र वेगळं स्वत:चच असं. ह्या आणि अशा अनेक गोष्टींचं संचित म्हणजे आमचा हा राजगड कॅम्प.
आमचा गृप होता ५६-५७ लोकांचा आणि ह्या ५६-५७ लोकांपैकी मुलं होती ४०-४५, वयोगट होता ९-१९. काही मुलं पहिल्यांदाच ट्रेक हा प्रकार अनुभवणार होती आणि हे सारे पहिलटकर होते ९-१० वर्षाचे मावळे आणि त्यातही विशेष म्हणजे ते आले होते आई वडिलांच बोट सोडून आपापली सॅक आपापल्या पाठीवर घेऊन. चिंटू २ बघताना मला कितीतरी वेळ आमच्या कॅम्पची आठवण येत होती अर्थात तो सिनेमा होता त्यात बर्र्याच ट्रेक्सर्सच्या दृष्टीने ७ स्टार्स सोयी दाखवलेल्या प्रत्यक्षात ट्रेक तितकाही आरामदायी नसतो, मजेशीर आणि पुन्हा पुन्हा अनुभवण्यसारखा मात्र नक्कीच असतो.
प्रत्येकाची मानसिक, शारिरीक कुवत सारखी नसते, चालायचीही तितकीशी सवय नसते त्यात आई बाबांपासून दूर आलेली काही पिल्लं लागली की रडायला पद्मावती मंदिरात पोहोचे पर्यंत. आऽऽई पाहिजेऽऽ चा गजर झाल्यावर आणायची कुठून तिथे त्यांची आई. दादापुता करुन गोष्टी गाणी सांगून पाय चेपून दिले, भरवलं तेव्हा कुठे कळी खुलली एकेकाची. इकडे आमचं कन्यारत्न मला बाजुला घेऊन म्हणे, अशी भरवत्येस जसा काही तुझा सख्खा मुलगा आहे आणि मी इथे हाताने जेवतेय स्वत:च्या हे राम! तिनेही भरवून घेतलं मगच पळाली बाहेर खेळायला. पण ह्या वयातली मुलं तुम्हाला असं भरवू देतात, तुम्ही गोष्टी गाणी सांगता, प्रेमाने जवळ घेता तेव्हा तेव्हढ्या पुरतं का होईना आई हवीचा हट्ट विसरतात म्हणजे किती निरागसपणे ती तुम्हाला आपलं मानतात हे जाणवून अधिक जबाबदार झाल्या सारखं वाटलं. घरी जाऊन आपापल्या पालकांच्या मिठीत जाईपर्यंत ही छोटी फुलपाखरं मला माझीच बाळं असल्यासारखं वाटलं. हा अनुभव हि आमच्या कॅम्पची देन दुसरं काय?
एकीकडे निरागस पणे आपले बालहट्ट आमच्या कडून पुरवून घेणारी ही मंडळी तर दुसरी कडे टिन एज मधे पहिलं पाऊल टाकलेली तर काही टिन एज मधून बाहेर पडणारी मंडळी होती. त्यामुळेच प्रत्येक वयोगटातले वागण्यातले बदल एका ग्राफ सारखे बघायला मिळाले. अर्थात हे काही शिक्का मोर्तब करण्याइतके निष्कर्ष वगैरे नाहीत तर आलेले काही अनुभव आहेत इतकच.
ह्यातल्या एका मुलाची गोष्ट तर नक्कीच नमुद करण्यासारखी वाटतेय. हा मुलगा आमच्या बरोबर पेठगडच्या ट्रेकला तीन वर्षांपुर्वी आलेला तेव्हा तो ८-९ वीत होता. मस्तीखोर, दिलेली सुचना उडवून लावणे, आई स्पेशली वडील सोबत नाहीत म्हणून एक्स्ट्राचा फ़्रीडम मिळाल्याप्रमाणे वागणे अशा गोष्टींचा त्याने मनसोक्त आनंद लुटला आणि त्यामुळे आम्हाला एकदा अडचणीतही आणले. पण तोच मुलगा ह्यावेळी आला तो पुरेपुर बदलून. आजही तो मस्तीखोर नाही अशातला भाग नाही पण आज तो अडचणीत आणणारा मुलगा न वाटता मदत करायला तत्पर आणि उत्सुक असलेला मॅच्युअर मुलगा जास्त वाटला. अजून एक पिल्लू माझ्या लेकीच्या वयाची म्हणजे ९-१० वर्षाची असल्या पासून येतेय आता टिन एज चालू झालय तिच. पहिल्या ट्रेकच्या वेळी वाट चालताना शाळेतल्या कविता, गोष्टी, मित्र मैत्रिणी, बाई, शाळा असे विषय असायचे सोबतीला आता ह्यावेळी ते विषय थोडे मागे पडून सिनेमा, हिरो हिरॉईन्स, नवीन गाणी हे विषय होते हातात हात घालून. आत्ता आत्ता पर्यंत मैत्री ह्या एकाच नात्याने बांधलेल्या दोन जिवांचे मैत्री ते क्रश ते नवीनच प्रेमात पडलेले युगुल असे बदलते ग्राफ बघायला मिळाले आणि इतकी पटकन मोठी झाली पण ही मुलं ह्या जाणिवेचीच गंमत वाटली.
ट्रेकचा अनुभव लिहायचं ठरलं तेव्हा खरतर ट्रेक म्हणजे राजगड त्याची उंची १३९४ मीटर, त्याचे चढायचे मार्ग तीन, आम्ही निवडलेला मार्ग कोणता? काय बघीतलं हेच लिहायचा विचार होता पण लिहायला घेतलं आणि राजगड नावा बरोबर ह्या बाकीच्याही आठवणी अशा काही जोडून आल्या की प्रयत्न करुनही त्या वेगळ्या करता आल्या नाहीत म्हणून मग जी काही कडू गोड आंबट आठवणींसोबतची भेळ तयार झाली तीच तुमच्या समोर ठेवली झालं.
(hero & heroin of the day)
img
src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg-j8LUtEJJU7dAikzQ3NJtcTsDUDQI0BLLhIxKTXgTV58X3MHvTI6pczD-qMbRbZvWJoM6-63frRKTQCYWyjo43AZ3XK_rP2zhWvaFWh8QpILJn-mIZw7nmUBfjKZ4677puQjS8-D2z_g/s800/IMG-20130510-WA0008.jpg"
height="601" width="800" />