रविवार, २५ ऑक्टोबर, २००९

ती...स्वप्नपरी..!

सवयीने घड्याळाकडे नजर गेली. नऊ वाजले, म्हणजे 'ती' आता बसस्टॉपवर उभी असेल तिच्या मैत्रिणींबरोबर. घरातून निघून गाडीत बसल्याबरोबर मन तिचाच विचार करायला लागतं आजकाल. बसस्टॉप जवळ आला, की आपसूकच लक्ष घड्याळाकडे जातं.

ती दिसायला काही खूप सुंदर नाही, तरी तरतरीतपणा जाणवतोच. केस थोडेसे पोनीटेलमधून बाहेर आलेले, कपाळावर टिकली, क्वचित कधी साडी... म्हणजे सणासुदीला. एरवी सलवारसूट किंवा ट्राउझर आणि थोडा लाँगच कुर्ता अशीच असते ती. एखाददिवशी हलकी लिपस्टिक. एका हातात दोन बांगड्या... बहुतेक सोन्याच्या असाव्यात नि एका हातात घड्याळ, बस बाकी काहीच मेकअप नाही. तिची उभं राहायची जागासुद्धा ठरलेली. स्टॉपवर हीऽऽ भली मोठ्ठी रांग दिसते बससाठी. पण ही, मैत्रिणींबरोबर रांगेच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला उभी दिसते. बहुतेक मिळेल ती बस पकडून लटकून जात असावी. एक दिवस गाडी बाजूला उभं करून बघितलं पाहिजे. का तिलाच लिफ्ट द्यावी एक दिवस?

ह्या विचारानेच हसू आलं चेहर्‍यावर. जे शक्य नाही, त्याचंच का मन स्वप्न बघतं? पाच मिनिटांत गाडी बसस्टॉपपाशी आली. सगळ्या विचारांना आवरून डोळे तिला शोधायला लागले. तिचा ग्रूप होताच तिथे, नेहमीसारखाच हसत चेष्टामस्करी करत. पण ती नव्हती त्यात. काय झालं असेल? बरं नसेल का तिला? की गाडी चुकली असेल तिची? खरंच रोज लटकून प्रवास करणार्‍यांना साष्टांग दंडवतच घातला पाहिजे. सकाळी लवकर उठत असेल नाही ती? सगळं आटोपून धावतपळत ट्रेन गाठून यायचं, म्हणजे तारेवरची कसरतच होत असेल तिची. पण तरी किती फ्रेश दिसते ती... पूर्ण ग्रूपच तसाच म्हणा त्यांचा. तरी ती विशेष जवळची वाटते. कारण ठाऊक नाही. त्या रोजच काहीना काही बोलत असतात, हसत असतात. किती आनंदी इन्फॉर्मल वाटतात त्या!

क्वचित, अशा ह्या पावसाळ्यात जवळजवळ पूर्ण भिजलेल्या अवस्थेत बसची प्रतीक्षा करणार्‍या त्यांच्या चेहर्‍यांवर थोडा वैताग, नाराजी त्याहीपेक्षा मस्टर गाठून लेटमार्क टाळायची घाई किंवा त्यापायी आलेली चिंता दिसते... पण तरीही एक मोकळेपणा, खरेपणा, एक... एक वेगळंच स्मित, तेज असतं त्यांच्या चेहर्‍यांवर.

कुठून येतो एवढा उत्साह? थोडंसं का होईना स्वत:चं आकाश दिसतं, म्हणून येत असेल का?
तिलाही कळत असेल का माझं हे असं रोज तिचं निरीक्षण करणं? असावं बहुतेक.
आज काय झालं पण तिला? आता पूर्ण दिवस तिच्याच विचारात जाणार. धड ना काम होणार, ना माझे विचार संपणार...
"मितू, मी पुढच्या आठवड्यात दिल्लीला जाणारे. तिथे त्या कपूर अँड कपूरचं डील जवळजवळ फायनल झालंय. तो आठवडा इथले क्लाएंट्स तेवढे तुला मॅनेज करावे लागतील. त्या माथुरबरोबरची मीटिंग साळवींना घेऊन अटेंड कर. तो साऽला xxx असला तरी आपला इथला मोठ्ठा मासा आहे.. अगं, लक्ष कुठे आहे तुझं?"
"अं..अं..! नाही, काही नाही. जरा वेगळे विचार होते डोक्यात. सॉरी, काय म्हणालास?"
"मी इथे कपूरच्या डीलची गोष्ट करतोय.. हे डील फायनल झालं, की आपणही एसी गाडी घ्यायची. आजकाल ही असली साधी गाडी कुणाकडेही असते."
"अरे, पण ही काय वाईट आहे?" मी नाराजीच्या स्वरात म्हटलं. "आणि तुला माहीत आहे, मला ती बंद काचवाली एसी गाडी आवडत नाही, जीव घुसमटतो माझा त्यात. जगापासून तुटल्यासारखं वाटतं."
"तुझं आपलं काहीतरीच! म्हणे जगापासून तुटल्यासारखं वाटतं.. आणि खिडकी उघडून बाहेर बघायचं तरी काय? ती गर्दी, त्यात धक्के खात बसची वाट बघणारी माणसं? म्हणजे जे नको, म्हणून ही अशी स्वतःला विसरून मेहनत केली, तीच पुन्हा बघायची? बघायचंच असेल, तर मेहराकडे बघ, त्या माथुरकडे बघ. साले बापांच्या जिवांवर कसे ऐष करतायत, दोन-दोन एसी गाड्या बाळगून आहेत. तुझीच इच्छा होती ना, आपली स्वत:ची कंपनी असावी, बंगला असावा, गाडी असावी म्हणून? तुझं ना गणितच मला कळत नाही, अक्षता झाल्यापासून अधिकच बिघडलंय गणित!" इति शेखर.
'तुलाच काय मलाही कळेनासं झालंय माझं गणित' मी मनातच म्हटलं. हेही खरंय, माझीच इच्छा होती. पण मला नव्हतं रे ठाऊक मी हरवून जाईन ह्या सगळ्यांत. त्या सुरुवातीच्या काळात क्लाएंट मिळवण्यासाठी अटेंड केलेल्या पार्ट्या, काही आपण दिलेल्या.. ते चकचकीत दिखाऊपण, खोटं हास्य ह्यात कोणी खरं जवळचं, जिवाभावाचं जोडलंच गेलं नाही. जे होते, ते पाऽऽऽर लांब गेलेले आपल्यापासून...
'अजून काही वर्षं, अजून हे होईपर्यंत...' असं करत करत तू पार पुढे निघून गेलास. तुझा दोष नाही म्हणत मी, पण अक्षता झाल्यापासून माझी माझ्यातच हे दोन दुवे जोडताना दमछाक होते. पूर्वी वाटायचं, पैसा नाही किंवा कमी आहे म्हणून आपण सुखी नाही. आता वाटतं, हे धावणंही एक मृगजळ आहे. सुख, समाधान आतातरी कुठे आहे?
"हे सगळे मीडिऑकर विचार झाले मितू. जरा आपल्या स्टेटसप्रमाणे वाग. कंटाळा आला असेल, तर शॉपिंगला जा, कालच मिसेस मेहरांचा फोन आला होता ना तुला? किटीपार्टीला बोलावत होत्या म्हणालीस ना? तिथे जा. पैशांचा विचार करू नकोस. खर्च कर, राणी खर्च कर."
"गेलंच पाहिजे का तिथे? माझं मन नाही रमत अशा पार्टीत. काय आपलं दागिन्यांचं नि साड्यांच प्रदर्शन केल्यासारखं मिरवायचं?"
"Now stop crying, for God's sake! खोटं का होईना, पण रमता आलंच पाहिजे तुला अशा पार्टीत. त्याला बिझिनेस एटीकेट्स म्हणतात मॅडम. इस रेसमें आगे जाना है, तो ये सब करना पडता है."
"रेस, पैसा, एटीकेट्स ह्यांशिवाय दुसरं जगच नाहीये का शेखर? किती बदललास तू! दिवसचे दिवस आपला संवाद फक्त क्लाएंट, डील्स, गुंतवणूक ह्या नि अशाच गोष्टींमध्ये फिरतोय, लक्षात येतंय का तुला? त्यापेक्षा पैसा कमी होता, तेव्हा बरं होतं असं वाटायला लागलंय मला. निदान आपलं विश्वतरी एक होतं, स्वप्नं एक होती. मला खोटंखोटं हसत स्टेटसचं घोंगडं पांघरून प्रदर्शन करावं लागत नव्हतं. भले धावपळ होत होती, दाराशी गाडी नव्हती, पण तू आणलेला एक गजराही मला खुलवायला पुरेसा होता. आता वाटतं मीच पायावर धोंडा मारून घेतला माझ्या."
"तुला विश्रांतीची गरज आहे, बाकी काही नाही. मी परत आलो, की चार दिवस कुठेतरी जाऊन येऊ. तुलाही बरं वाटेल."
"ठीक आहे, तू म्हणशील तसं." असं म्हणत मी विषय संपवला. कारण तुझं पुढचं वाक्य मला पाठ झालेलं-'भावनांपेक्षा पैसा महत्त्वाचा राणी, पैसा हवा पैसा.. छन् छन् छन्...' मन मात्र तिच्याच विचारात गुरफटलं....

***

श्शी! आज खूपच उशीर झाला. सगळ्या गेल्या असतील आज. सकाळीसकाळी जरा दहा मिनिटं आरामात उठू म्हटलं एक दिवस, तरी बिघडलंच चक्र सगळं. नेहमीची गाडी चुकली, म्हणजे आलंच उभ्याने जाणं. सकाळी सगळ्या धावपळीत फुरसतीने एका जागी बसून चहासुद्धा प्यायला मिळत नाही कधी, ना पेपराचं तोंड बघायला मिळत. तशी ऐश करायला जावं, तर पळणारे घडयाळाचे काटे समोर दिसतात राक्षसांसारखे.
'तरी नशीब आजकालचे नवरे त्यांच्या बायकांना मदत करतात,' घराबाहेर पडतापडता हे वाक्य कानांवर येऊन आदळलंच नेहमीच्या सवयीने. गंमत वाटते ह्या वाक्याची, पण खरंही आहे म्हणा. तरीही वाटतं, किती हा सेकंदासेकंदाचा हिशोब, कसं हे काट्यावरच जगणं....?
अग्गंबाई! आज चढायलातरी मिळणार का गाडीत? आत्ताच ८.१५ होऊन गेलेत.. अजून इंडिकेटरही लावला नाहीये. आता आलीच गाडी नि चढले धकून त्यातच, आणि ती गेली जरी वेळेवर तरी ९.१५ - ९.३० होणार बसस्टॉपवर जाईपर्यंत. किती ते जर-तरचे डोंगर पार करायचे? आज तरी जायला हवं होतं नेहमीच्याच ट्रेनने. सगळ्या बरोबर असत्या, तर उभ्या उभ्या प्रवासाचं काही वाटलं नसतं.
९.३० झालेच शेवटी, आता बसच्या प्रतीक्षेत किती वेळ जातो कुणास ठाऊक! बस पटकन मिळाली, तर आजचा लेटमार्क वाचेल. बाकीच्या गेल्या असतील नेहमीच्या वेळेला.
'ती'सुद्धा गेली असेल, मस्त स्वतःच्या गाडीतून, खिडकीशेजारी बसून, वार्‍यावर उडणारे केस सारखे करत.. काल काय मस्त गुलाबी रंगाची लखनवी साडी नेसली होती तिने. तिच्या रंगाला खुलून दिसत होती. माझी लखनवी साडी दहा वेळा बाहेर काढून कपाटात ठेवली. कधी उशीर झाला म्हणून, कधी गर्दीच्या वेळी ऑफिसात पोचेपर्यंत पार चोळामोळा होईल म्हणून.. 'तिच्या सारखी गाडी असती तर.....!' तेवढं कुठचं भाग्य म्हणा. मग आहेच हाताला लागलेला पंजाबी ड्रेस - तोही शक्यतो पावसात, गाडीच्या गर्दीत चालेल असा. नाहीतर ट्राउझर झिंदाबाद. किती 'तिचा' विचार तो? 'तिच्या' खिजगणतीतही असू का आपण?? कशी भुर्रकन निघून जाते एखाद्या परीसारखी!
आणि केलाच जरी तिने विचार आपला, तरी काय.. कीवच करत असेल आपली.

***

हेवा.. हेवा वाटतो मला 'तिचा'! माझं मन अजूनही तिचाच विचार करत होतं. दगदग झाली, धावपळ झाली, घर चालवताना थोडीफार काटकसरही करावी लागली तिला, तरी ती राणी आहे तिच्या जगाची. निदान तिला मैत्रिणी आहेत, त्यांच्याबरोबर थोडाकाळ का होईना हसायचं, मनसोक्त मस्करी करायचं स्वातंत्र्य आहे तिला. तिचं हसू कसं स्वच्छ आहे एकदम, आकाशाच्या तुकड्यासारखं. नाहीतर मी.. काच खाली केली, तरी शेवटी खिडकीच्या चौकटीत दिसेल तेवढंच माझं आकाश नि तेवढंच माझं स्वातंत्र्य. नाही म्हणायला दिमतीला गाडी आहे. गाडी घेऊन कुठेही भटकायचं स्वातंत्र्य आहे, पण ह्याच्या इभ्रतीला शोभेल असंच.. म्हणजे किटीपार्टी, मॉल, मल्टीप्लेक्स वगैरे वगैरेच. त्याच्या म्हणण्यानुसार हाय स्टेटस जगायचं. सगळी सुखं विकत घेता येतील, इतका पैसा मिळवायचा आणि तो उपभोगायचासुद्धा. अक्षता दिमाखात गाडीने शाळेत जायला हवी, तेही IB School मध्ये. जे जे बेस्ट, ते ते सगळं तिला द्यायचं. त्यासाठी ह्या पार्ट्या आवश्यक. त्यातूनच क्लाएंटशी ओळख वाढते म्हणे. असेलही खरं त्याचं, पण त्यामुळे माझ्या ओळखीचा शेखर धूसर होत चाललाय ना, की मीच चुकतेय कळत नाही. आईलाही वाटतं माझंच चुकतंय, हे भिकेचे डोहाळे आहेत म्हणते...

पण मन परत परत 'तिच्या'भोवतीच फिरतंय. ती, तिचं जग, तिचा उत्साह, तिचा दमलेला तरीही आनंदी चेहरा... सगळं परत जुन्या 'मिता'पाशी घेऊन जातं. आरशात बघावं तसं. तिच्यात जुनी मिता शोधता शोधता, जुना शेखरसुद्धा कुठे हरवला ते शोधायला जावं, तेव्हा उमजतं कधी काळी किती चुकीचं गणित मांडल होतं आपण. दगदग, धावपळ करूनही तिच्या चेहर्‍यावर जो आनंद, समाधान दिसतं, ते मला गाडीतून प्रवास करूनही का मिळत नाही? तिच्याकडे गाडी नाही, तरीही ती आनंदी दिसते. शेखर म्हणतो तसं मिडिऑकर जगणं जगते ती, तरीही इतकी उल्हसित कशी असते? का तिच्या जगात अजूनही भावनांचंच पारडं झुकलेलं आहे म्हणून असं होतं? ते स्मित, तो उत्साह, ते समाधान मला ह्या ऐषारामात मिळत नाही, म्हणून मला तिचा हेवा वाटतो.
कितीतरी दिवस ठरवतेय वाळूत अनवाणी चालायचं. घामाच्या वासांनी गुदमरले तरी चालेल, पण गर्दीत हरवून जायचं. एकदातरी ही परीटघडी विसरून माणूस म्हणून श्वास घ्यायचाय. जमेल का? सतत स्टेटसचा विचार, त्याच त्याच लोकांशी बिझनेस पार्टीज, 'सोशल'च्या नावाखाली खोटंखोटं हसणं. ह्यालाच सुख म्हणतात का? बिझनेस एटीकेट्स, बिझनेस मॅनर्स, बिझनेस ग्रूप नि बिझनेस गप्पा.. इतके मिळवले, इतके गुंतवले.. नवीन गाडी घेतली, मग त्या अ‍ॅचीव्हमेंटचं प्रदर्शन म्हणून फॉर्मल पार्ट्या. तशीच बायको नावाची वस्तू ह्या सगळ्या अ‍ॅचीव्हमेंटपैकी एक.
पूर्वी असं अगदी नव्हतं ना...
कुणालाच त्रास होत नाही ह्याचा. ना आईला, ना बहिणीला, ना वहिनीला, भावाला, बाबांना, दिराला, नवर्‍याला. कुण्णाकुण्णालाच होत नाही. मग मलाच का होतो?
का मन सारखं सारखं बंद दारावर धडका मारतं? सोन्याचा झाला तरी हा पिंजराच शेवटी, असं मलाच का वाटतं?

***

शेवटी लेटमार्क लागलाच. हा या महिन्यातला दुसरा लेटमार्क! अजून एक झाला, तर हाफ डे कट होणार... मनूच्या वाढदिवसाला एक सुट्टी नक्की आहे. तरी नशीब सध्या कुणाची लग्नकार्यं नाहीयेत.. श्रावणातली सवाष्णदेखील आता सोयीने रविवारी चालते, सवाष्ण जेवायला येणारीला तरी कुठे सुट्टी घेणं परवडतंय त्यासाठी? तरीही सुट्ट्या वाचवायला हव्यात. आजारपणं, न जाऊन चालणार नाही अशी लग्नकार्यं नि अजून काय काय. तिथे सुट्ट्या जाणारच आहेत, अशी लेटमार्कपायी गेलेली फुकटची सुट्टी नाही परवडायची.

असा विचार करत करत टेबलापाशी येऊन कामाला लागताच ऑफिसमध्ये असलेल्या एसीचा सुखद गारवा मनालाही थंडावा देऊन जातो नि त्यासरशी एसी=श्रीमंती, एसी=सुखवस्तूपणा असा विचार मनात शिरताशिरताच तो गारवा 'तिची', त्या 'गुलाबी लखनवी साडीवाल्या परीची' आठवण करून देतो.
मज्जा असेल नाही तिची. गाडीची गर्दी सहन करणं नको, घामाच्या बजबजपुरीत घामेजलेलं होऊन निघणं नको, इस्रीची पार वाट लागेल म्हणून दहा वेळा विचार करून साडीची घडी मोडणं नको आणि आज काय पाणी साठलं म्हणून ट्रेन लेट आहेत, उद्या काय ओव्हरहेड वायर तुटली म्हणून खोळंबा आहे, असली कारणंही नकोत. मस्त गाडीत बसायचं, परीटघडीचे कपडे जस्से सकाळी, तस्सेच शेवटपर्यंत संध्याकाळी. नाहीतर आम्ही! कॉटनची साडी तर नेसायलाच नको गर्दीत. आणि मस्त नवर्‍याबरोबर ऑफिसला जायचं. नवराच सोडत असेल तिला. म्हणजे ओझरतंच बघितलंय बसस्टॉपवर उभं असताना, पण निमालाही नवराच वाटलेला तो तिचा. शोफर नसावाच तो. किती गप्पा मारतमारत, हसतखेळत जात असतील ना दोघं. नाहीतर आम्ही... फोनवर फक्त विचारणार - 'आज काय आणायचंय? काय संपलय? ह्यांव नि त्यांव'. गप्पा मारायला ना त्राण, ना वेळ. काही वाटलं, खुपलं, आवडलं, तर पहिले कळणार आमच्या ग्रूपला, ट्रेनमध्ये. कारण तोच तेवढा आमचा आमच्यासाठी विचार करायचा वेळ.
म्हणून तर, पेपर वाचायचा, ट्रेनमध्ये.
यादी करायची, ट्रेनमध्ये.
केळवण, हळदीकुंकू, डोहाळेजेवण, सगळं ट्रेनमध्येच.
"हॅलो! हॅलो!"
"हम्म, बोला.."
"अगं पोचलीस का नीट? आज लेट होत्या ना गाड्या? बसायला मिळालं का थोडावेळ तरी? बरं, आज निघालीस. की मला आठवण कर - येतानाच मनूचा युनिफॉर्म घेऊन यायचाय इस्रीवाल्याकडून, नाहीतर रात्री पुन्हा धावपळ होईल. आणि काहीतरी मागवून खा बाहेरून, आज नाष्ट्याचा डबा घरीच विसरलीस धावपळीत."
"होऽऽ, मागवते काहीतरी आणि करते तुला फोन नंतर. चल, ठेवू आता? आधीच लेटमार्क झालाय म्हणून साहेब खवळलाय" म्हणत मी फोन ठेवला नि कामाला लागले.
अशी अधूनमधून चौकशी करतो, नाही असं नाही. पण काल म्हटलं, 'ती नॅनो काय आलेय ना टाटाची. तर करूयात का SBIमध्ये लोनसाठी अर्ज?' तर म्हणे, 'हवीये कशाला कार? आपण रोज करणार ट्रेनचीच सवारी नि त्याच्या पेट्रोलसाठी दुसरं लोन काढावं लागेल त्याचं काय?'
थोडीही महत्त्वाकांक्षा नाही ह्या माणसात. कित्ती स्वप्न बघते मी, आमचं स्वतःचं घर असेल, घरापुढे बाग, एकतरी गाडी. एसी नसली, तरी चालेल. रोज ट्रेननेच जायचं झालं, तरी कधीतरी कुठे जायचं झालं की आरामात-सुखात, परीटघडी विस्कटेल, गर्दीत जीव घुसमटेल ह्याची पर्वा न करता जाता येईल. तो, मी नि मनू. टॅक्सी केली, तरी स्वतःच्या गाडीचं सुख मिळणार आहे का?
किती दिवसांत आमचे आम्ही म्हणजे मी, नवरा नि लेक कुठे गेलो नाही आहोत. कधी मिळेल तिच्यासारखं गाडीतून फिरायला? मग ती गर्दी नको, घामाची घुसमट नको नि परीटघडी मोडते म्हणून लखनवी साडी परत कपाटात ठेवणं नको.
हम्म! पुन्हा रमलं मन स्वप्नरंजनात...

***

काय झालंय मला? पुन्हा वेडं मन स्वप्नं बघायला लागलं. खरंच कधी हसू शकेन मी तिच्यासारखी मनमोकळं? कधीतरी मिळतील का मलाही सख्या जिवाभावाच्या - तिच्या ग्रूपसारख्या? अशी एकतरी जागा असेल का, जिथे मी हसू शकेन, रडू शकेन, मोठ्याने ओरडू शकेन, हा स्टेटसचा मुखवटा फेकून?
पूर्वी कधीतरी आईला, बहिणीला नि अगदी माझ्या जन्माचा सोबती असलेल्या नवर्‍यालाही हे सांगून बघितलं. सगळ्यांनी 'काय वेड लागलंय हिला,' असं बघितलं माझ्याकडे. खरंच का हे इतकं वेड्यासारखं मागणं आहे? का सतत पैसा एके पैसा नि पैसा दुणे पैसा अशा व्यापारी जगात मन नावाच्या गोष्टीला जागाच नाहीये?

किती सुखी असेल ना ती! कामावरून दमून घरी गेल्यावर, प्रेमाने विचारपूस करणारा नवरा, करत असेलच तिची विचारपूस तो. किती उत्साही नि आनंदी दिसते ती स्टॉपवर असते तेव्हा! काय बोलत असतील ते दोघे? कदाचित वाण्याची यादी नि भरायची बिलं, एकत्र बघितलेली स्वप्नं, आपण पूर्वी बघायचो तशी... असेना का तसंच... पण संवादतरी होतो त्यांचा. एकमेकांना जाणून घ्यायला वेळतरी देता येत असेल त्यांना. थोडीतरी समजत असतील ना त्याला तिची स्वप्नं, तिचे विचार. मुखवटा घालून तरी वावरावं लागत नसेल ना तिला सदासर्वकाळ. गर्दीतून धक्के खात येतानाही तिला तिच्या जिवाभावाच्या सख्या आहेत मन हलकं करायला. मी कुठे जाऊ??

इतके महिने तिला रोज बघतेय गाडीतून. आता हा जाणारे दिल्लीला, तेव्हा द्यावी का तिला लिफ्ट? वाढवावी का ओळख तिच्याशी? आणि सांगावं का तिला, बाई गं तुला ठाऊकही नसेल, की तू कित्ती कित्ती भाग्यवान आहेस, नि हो माझ्या स्वप्नांतली परी आहेस म्हणून?

***

उद्या नाही असा उशीर करायचा. रोजची गाडी नि रोजचा ग्रूप अजिबात चुकवायचा नाही. आपल्याला काय येणार आहे का तिच्यासारखी गाडी सोडायला नि आणायला? मग उगाच का त्रास? मनोज म्हणतोय तेच खरं, सध्या आपल्याला गाडीची तशी गरज नाहीये. मनूसाठी कपाट करून घ्यायचंय, नवीन वॉशिंग मशीन घ्यायचंय, बोअरवेलचं एक कनेक्शन बाथरूममधून फिरवून किचनमध्ये घ्यायचंय. गाडी काय घेऊ पुढेमागे जमलं तर. तोपर्यंत आहेच आपली 'राष्ट्रीय संपत्ती!' तिचं जग वेगळं, आपलं वेगळं. आपण आपली झेपतील, ती स्वप्नं बघावीत हे बरं.

पण खरंच कधी चुकूनमाकून ओळख दिलीच तिने... अर्थात ती कशाला देईल म्हणा ओळख... तरीही.. दिलीच ओळख, तर सांगणार आहे तिला, 'तू खूऽऽप खूऽऽप भाग्यवान आहेस.. अगदी माझ्या स्वप्नांतली परी आहेस' म्हणून.

(पुर्व प्रकाशित मायबोली दिवाळी अंक २००९)