शनिवार, ९ मे, २०२०

स्पेस

काहीगोष्टीनाएकदमघिश्यापिट्यावाटतीलपणतरीत्याआवश्यकआहेतपटतनाहीनामाझंम्हणणंपणतेनीटबघितलसतरपटेलकिमानकाहीनाहीतरएकटक्कातरीनक्कीपटेल.

काय झालं? वाचताना अवघड जातय? दमायला होतय समजून घेताना?

का होतय असं? कारण मी वाक्य, वाक्यासारख नीट तोडून लिहीत नाहीये. एक वाक्य संपल कि द्यायचा पूर्णविराम मी देत नाहीये. ना कुठे स्वल्पविराम देतेय.

तुझही तेच होतय का? ध्येय समोर ठेवणं, त्या ध्येयाचा पाठलाग करणं, ते करताना त्याचा आनंद घेणं हे छानच आहे सगळं पण जरा श्वासही घे अधूनमधून. थोडी विश्रांती घे. फुलस्टॉप दे गरज असेल तिथे आणि काही ठिकाणी स्वल्पविराम तरी नक्की वापर. काहीही न करता घालव एखादा दिवस. किंवा त्या दिवसाकडे ठरवून 'एक उनाड दिवस साजरा करायचा आहे' असच ध्येय आहे असं म्हणून बघ. दुसरा श्वास घेण्यासाठी आधी उच्छ्वास सोडावा लागतो आणि विश्वास ठेव या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत.

अस्वस्थ वाटतय? वाटूदेत की. अस्वस्थ असणही चांगलं असतं. अस्वस्थ असणं म्हणजेच प्रवास सुरु असण्याच लक्षण आहे. प्रवास आपली दिशा घेऊन येतो. आपण फक्तं कान बंद करुन मनाच ऐकायच, मन दिशा ओळखत.

आणि चुकली दिशा अस वाटल एक क्षण,नाही अगदी ते वाटणं खर जरी आहे मान्य केलं आपण तरी त्या दिशेने चालताना मनाला आलेला सुंदर अनुभव तर खरा असेल ना? तो घेऊन फिरायच मागे नवीन दिशा शोधायला.

प्रत्येकाच अस्वस्थ होणं वेगळ आणि प्रत्येकाचा 'पीस ऑफ माईंडही' वेगळा त्यामुळे आपण फक्त आपल्याशी प्रामाणिक रहातोय ना हे बघायच. तेव्हढही खूप आहे, खरच! स्वत:वर विश्वास ठेव नक्की मार्ग सापडेल.

दोन शब्दांमधेही अंतर असतं आणि ते असतं म्हणून ते शब्द नीट वाचता येतात. हि जी दोन शब्दांमधली ब्लॅन्क स्पेस आहे ना ती खूप महत्वाची आहे. त्यामुळे तू ब्लॅंक स्पेसच गिल्ट कधीच नको बाळगूस. हि ब्लॅंक स्पेसच तुझा पुढचा प्रवास ठरवेल कुणी सांगाव?

म्हंटल ना मगाशीच, काही गोष्टी ना एकदम घिश्यापिट्या वाटतील पण तरी त्या आवश्यक आहेत. पटत नाही ना माझं म्हणणं? पण ते नीट बघितलस तर पटेल. किमान काही नाही, तर एक टक्का तरी नक्की पटेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा