शनिवार, ९ मे, २०२०

गोष्ट तिची त्याची


काल आपला लेक विचारत होता, "आ‌ई, तुमचं लव्ह मॅरेज की अरेन्ज? बाबाने प्रपोज केलं की तू?"
म्हंटलं आम्ही कोणीच नाही प्रपोज केलं. तर म्हणे असं कसं शक्यय?. आता त्याला तुच सांग तुझ्या भाषेत.
तुला आठवतय? आपण पहिलीत होतो. माझ्या हाताला गॅदरींगसाठी आळता लावला होता. तो ओला होता म्हणून आ‌ई म्हणाली होती की, “इथे तिथे हात नको लावूस नाहीतर डाग जाणार नाहीत.” मला तो आळता सुकवायची घा‌ई झाली होती, तेव्हा तू तुझी लाडकी टेबलफ़ॅनच्या समोरची जागा माझ्यासाठी रिकामी करुन दिली होतीस.
आणि ४थी मधली गोष्टं आठवतेय? परिक्षा संपली की आपल्याला पेप्सिकोला मिळायचा या प्रथेप्रमाणे तुझे बाबा आपल्या सगळ्यांसाठी पेप्सिकोला घेऊन आले होते. तुला खुप आवडायचा ना? पण टॉन्सील्सने खूप हैराण झाले होते मी म्हणून काकांना अगदी चार चार वेळा सांगितलं होतं, माझ्या वाटणीचाही पेप्सिकोला तुलाच द्यायला नाहीतर त्यावर तुझ्या धाकट्या बहिणीचा चिंगीचाच डोळा होता आणि संध्याकाळी काकी आमच्या आ‌ईला सांगत होत्या, "आज चिंगीची चंगळ झाली. तिला ३ पेप्सीकोले मिळाले."
माझ्या काही तपासण्या करायच्या होत्या. त्याकरता संध्याकाळनंतर काहीही खायचं-प्यायचं नव्हतं. तपासण्यांना वेळ लागला होता आणि ते १४-१५ तास तू ही माझ्यासोबत उपाशी राहीला होतास.
तुला आठवतं एका उन्हाळी सुट्टीत फ़ास्टर फ़ेणेने भारावून जाऊन मी त्या पुस्तकांची पारायणं केली होती आणि मग त्यावरची मालिका सुरू झाल्यावर तर त्यातला फ़ास्टर फ़ेणे नंबर एक आवडता हिरो म्हणून जाहीर केलं होतं मी. किती राग यायचा तुला प्रत्येक वेळी त्या फ़ास्टर फ़ेणेचा? मोठ्या घुश्यात सांगितल होतस मला, “याच्या पेक्षा चांगली गोष्टी लिहेन तुझ्यासाठी.” इतकं हसायला आलं होतं मला तुझा आवेश बघून. अजून पर्यंत वाट बघतेय मी तुझ्या गोष्टीची. कधी लिहीशील? आता हसशील ना या प्रश्नाने रोजच्यासारखा?
लब्बाड आहेस तू. बाकीच्यांसमोर पण दाखव की रे जरा हे हसू. त्यांना उगाचच वाटतं तू कधी बाहेरच येणार नाहीस कोमातून.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा