शनिवार, ९ मे, २०२०

आई घरी जाताना..

नजर बोलते आणि नजरेची भाषा
नजरेला अगदी सहज वाचता येते
पण कधीकधी नजर जे वाचते, ते शब्द
ओठांवर येऊ नयेत आणि मनातही झिरपू नयेत वाटण्याचे क्षण येतात
आज असाच एक क्षण आला
माहेरपणाला आलेली आई आज घरी निघाली
मी पाया पडले, तिने डोक्यावर हात ठेवला
मी उठताना म्हंटल, "तब्येतीची काळजी घे. औषधपाणी वेळेवर घेत जा."
माझं वाक्य पुरही व्ह्यायच्या आत तिचे डोळे बोलू लागले. म्हंटल तर तसा दरवेळचाच सीन हा पण दरवेळी आधीच्यापेक्षा जास्त पोटात तुटतं. ती घराबाहेर पडताना दिसेनाशी होईपर्यंत दहावेळा मागे बघते तेव्हा नजरेत साठवण्याची धडपड जीवघेणी असते.

मी परत ये म्हणते तेव्हा हो म्हणण्याच्याही आधी ती जे पुसटसं हसते ते नको वाटतं.
अशावेळी वाटतं हसणं, बघणं वाचता येणं आणि नि:शब्दाचे अर्थ कळणं हा शाप आहे.

मग मी जरा मोठ्यानेच घरात बघून सांगते लेकीला, नवऱ्याला, "आज्जी येणार आहे पुढल्या महिन्यात. सांगून गेलेय तसं"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा