शनिवार, ९ मे, २०२०

प्राक्तन


उष्टेमाष्टे खरकटलेले
असे काही मी खातच नाही
स्वप्न पहावे असे काही तर,
पोट रिकामे; झोपच नाही
उजाड माळावरी वस्तीला,
क्षण सुखाचा फिरकत नाही
भुयारातल्या अंधाराची,
ओढ अताशा थांबत नाही
इतके सारे वार सोसूनी
उमेद कशी रे संपत नाही?
वेताळाचा प्रश्न 'उगाचच'
तरी उत्तरे विक्रम काही
गतकाळाचे व्रण पुसटसे,
वस्तीवर ना दुसरे काही
सुर्य उगवतो नेमाने, तो
वसा घेतला मोडत नाही
गोठवणाऱ्या थंडीसारखे
दु:ख जाहले, हरकत नाही
पाणी बन तू, पाण्यामधले
जीवन गोठून थांबत नाही
असेच असते वेताळा हे,
चक्र अखंडीत चालत राही
जसे तुझे नि माझे प्राक्तन,
याला दुसरे उत्तर नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा